शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - २ )


    मागील लेखात आपण सालबाईच्या तहापर्यंतच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेतला. सालबाईच्या तहानंतर वरवर जरी गायकवाड इंग्रजांच्या ताब्यातून  निसटल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नव्हते. गायकवाडांच्या घरात पुढे अनेक उलाढाली झाल्याने इंग्रजांना त्यांच्यात हस्तक्षेप करण्याची संधी नेहमी मिळत गेली. स. १७८९ मध्ये फत्तेसिंहाचे अपघाती निधन झाले तेव्हा त्याचा भाऊ मानाजी हा पुढे आला. सयाजीच्या नावे तो कारभार पाहू लागला. यासाठी त्याने पेशव्यांना ६० लक्ष रुपये भरण्याचे कबूल केले.परंतु, अल्पवधीतच म्हणजे स. १७९३ मध्ये मानाजी मरण पावला आणि गोविंदरावाने अधिकारपदासाठी दावा पेश केला. तेव्हा सुमारे सव्वा कोटीहून अधिक रुपयांचा पुणे दरबारी भरणा करण्याचे त्याने मान्य केले. तसेच तापीच्या दक्षिणेकडचा मुलुख, सुरत बंदराच्या जकातीच्या उत्पन्नातील हिस्सा देण्यासही गोविंदरावाने कबुली दिली. गोविंदरावाने पेशव्यांच्या मागण्या भराभर मान्य केल्या खऱ्या पण इंग्रजांनी तापीच्या मुद्द्यावर हरकत घेतली. कारण, त्यामुळे सालबाईच्या तहातील अटीचा भंग होत होता. असो, गोविंदरावाची नानाने गुजरातला रवानगी केली. सोबत रावजी आपाजी यास आपल्या तर्फेने गोविंदरावाचा कारभारी म्हणून नेमून दिले. तसेच अहमदाबाद सुभ्याची पेशव्यांच्या हिश्याची व्यवस्था पाहण्यासाठी आबा शेलकूर यास नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी एक अतिशय गैरलागू ठरणारी पण महत्वाची नोंद नमूद करणे योग्य ठरेल व ती म्हणजे रावजी आपाजी सोबत गंगाधरशास्त्रीचे वडील व गंगाधरशास्त्री गुजरातला रवाना झाले होते. असो. 

    स. १७९७ पर्यंत गोविंदरावाने ७८ लक्ष रुपयांचा भरणा करून ६० लक्ष रुपयांची सुट मिळवली. तरीही पेशव्यांचे ४० लाख रुपयांचे देणे अजून बाकी होते. अशात नाना फडणीसचे निधन होऊन बाजीरावाच्या अंतस्थ चिथावणीवरून गोविंदरावाने आबा शेलूकरास पकडून अहमदाबाद ताब्यात घेतले. आबाच्या सुटकेसाठी बाजीरावाने विशेष प्रयत्न केले नाही. तसेच अहमदाबाद सुभ्याची वहिवाट दरसाल ५ लक्षांच्या बोलीवर ५ वर्षांसाठी भगवंतरावाच्या नावे करून देण्यात आली. { वि. सु. :- भगवंतराव गायकवाड विषयी निश्चित अशी विश्वसनीय माहिती मिळत नाही. काहींच्या मते तो गोविंदराव गायकवाडचा मुलगा होता तर काहींच्या मते आनंदराव गायकवाड हा त्याचा बाप होता. मुद्दाम लक्षात घेण्याची बाब म्हणजे आनंदराव हा गोविंदरावाचा पुत्र असल्याचे उल्लेख मिळतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती ! }   इकडे स. १८०० च्या दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोविंदराव गायकवाड मरण पावला व त्याचा ( तत्कालीन समजुतीनुसार वेडसर )  आनंदराव गादीवर आला. गोविंदरावाचा पराक्रमी पण अनौरस पुत्राने -- कान्होजीने आनंदरावास नजरकैदेत टाकून कारभार आपल्या हाती घेतला. हा प्रकार गायकवाड कुटुंबीयांस पसंत पडला नाही. त्यांनी रावजी आपाजीच्या मार्फत कान्होजीला पकडण्याचे कारस्थान रचले व ते सिद्धीसही गेले. परंतु त्यामुळे मूळ प्रश्न सुटला नाही. कान्होजी कैदेत पडला तरी गोविंदरावाचा आणखी एक मुलगा मुकुंदराव व दमाजी गायकवाडचा पुतण्या मल्हारराव यांनी आनंदरावाच्या विरोधात दंड थोपटले आणि  इंग्रजांकडे मदतीची याचना केली व इंग्रजांना हव्या असलेल्या सुरत चौऱ्यांशी परगण्याची त्यांना लालूच दाखवली.  ईस्ट इंडिया कंपनीने यावेळी हिंदुस्थानची जबाबदारी वेल्स्ली बंधूंच्या खांद्यावर सोपवली असून त्यांनी अधिकारपदाची सूत्रे हाती घेताच ' ठोकून काढण्याचे ' धोरण स्वीकारले होते. सर जॉन शोअरच्या तटस्थ धोरणाने अंगी शक्ती असूनही खर्ड्याच्या समर प्रसंगी निव्वळ माशा मारत बसलेल्या उपद्व्यापी इंग्रज अधिकाऱ्यांना अधिकार पदावरील या बदलाने नवा जोम प्राप्त झाला. त्यांनी वेल्स्लीच्या धोरणास अनुकूल अशी पावले उचलण्यास आरंभ केला. त्यानुसार मुंबईचा गव्हर्नर डंकन याने मेजर वॉकर यांस बडोद्याला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा अंदाज घेण्यास पाठवले. वॉकरला प्रसंगी लष्करी बळाचा आधार असावा म्हणून खंबायतमधून दोन हजार फौजही त्याच्या दिमतीला दिली. इकडे वॉकर येण्यापूर्वीच रावजी - मल्हारराव यांचा झगडा जुंपला. मल्हाररावास तोंड देणे शक्य नसल्याने रावजीने दौलतराव शिंद्याकडे मदत मागितली पण तो यशवंतरावाशी लढण्यात गुंतल्याने रावजीने इंग्रजांच्या समोर पदर पसरला. स. १८०२ च्या जानेवारीत वॉकर बडोद्यास आला. आनंदरावाची भेट घेताच त्याला पुढील उपक्रमाची दिशा गवसली.  

    ता. २३ फेब्रुवारी १८०२ रोजी वॉकर गायकवाडांची फौज सोबत घेऊन मल्हाररावावर चालून गेला. मल्हाररावाने दोन महिने संघर्ष करून शरणागती पत्करली. वॉकरने त्याचे समाधान करून त्यास नडियाद येथे स्थायिक केले. पुढे किरकोळ बंडखोरांचा बंदोबस्त करून सहा महिन्यांत वॉकरने आनंदरावाचा --- पर्यायाने रावजीचा जम बसवून दिला. याबदल्यात ता. २९ जुलै १८०२ रोजी आनंदरावाने आपले सर्व अधिकार मेजर वॉकरच्या स्वाधीन केले. वॉकरच्या विरोधात खुद्द स्वतःच्या हातचा लेख असला तरी तो आपल्या अधिकाऱ्यांनी मानू नये अशा आशयाचे कलम या तहान्वये आनंदरावाने मान्य केले. या तहाने वॉकर, रावजी व त्याचे कुटुंबीय यांचा एक गट झाला. अशा प्रकारे गुजरात इंग्रजांच्या घशात जात असताना बाजीराव पेशवा शिंदे - होळकरांची राज्यविनाशक झुंज बघत बसला होता. वॉकरचा ठराव झाल्यावर वर्षभरातच रावजी मरण पावला. दरम्यान इकडे बाजीरावाने वसईचा तह करून इंग्रजांचा आश्रय घेतला होता. या तहानुसार गायकवाड हा इंग्रजांचा तह असल्याचे बाजीरावाने मान्य केले. तसेच इथून पुढे गायकवाडासोबत जो काही पेशव्यांचा तंटा असेल त्याचा निकाल इंग्रजांच्या दरम्यानगिरीने करण्याचे बाजीरावाने कबूल केले. सारांश, स. १७८०, १७८३, १८०२ व १८०३ च्या तहांनी गायकवाड हे इंग्रजांच्या पूर्णतः कह्यात गेले. गादीवरील नवीन वारसास मान्यता देण्याखेरीज पेशव्यांचा गायकवाडांसोबत आता फारसा संबंध उरला नव्हता. 

    रावजीला पुत्र नसल्याने मृत्युच्या आधी दि. २२ मे १८०३ रोजी त्याने वडील बंधूचा धाकटा पुत्र सीताराम यास दत्तक घेतले. या प्रकारास वॉकरची संमती होती. सीताराम व गंगाधरशास्त्री समवयस्क असून रावजीच्या सांगण्यानुसारच वॉकरने शास्त्रीला स. १८०३ च्या फेब्रुवारी महिन्यात गायकवाड दरबारच्या वतीने इंग्रज रेसिडेंटशी बोलणी करण्याच्या कामी --- वकीलीवर नियुक्त केले होते. वरकरणी रावजीच्या तंत्राने वॉकर कारभार पाहत असल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात सर्व कारभार इंग्रजांच्याच तंत्राने चालल्याचे बडोदेकर मुत्सद्दी मंडळीच्या लक्षात आले. दरम्यान इकडे आणखी एक वेगळीच घटना घडून आली. आनंदरावास फत्तेसिंह नावाचा भाऊ असून त्यास जेजुरीच्या खंडोबास वाहिलेलं असल्याने तो व त्याची आई जेजुरी येथे राहत होते. यशवंतराव होळकर जेव्हा पुण्यास आला तेव्हा त्याने फत्तेसिंहास जेजुरीवरून काढून गुजरातमध्ये रवाना केले. गायकवाड अभिमानी मंडळींनी इंग्रजांचा वरचष्मा कमी करण्याच्या हेतूने फत्तेसिंह व सीताराम यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न केला. वॉकरला याची कुणकुण लागताच त्याने फत्तेसिंहाला आपल्या पक्षास मिळवून घेतले पण सीताराम मात्र वॉकरच्या पक्षातून फुटला. यामुळे गायकवाड दरबारात इंग्रजधार्जिण व इंग्रजविरोधी असे दोन पक्ष निर्माण झाले. इंग्रजविरोधी मंडळाने पेशव्याकडे मदतीची याचना केली. परंतु यावेळी स्वतः पेशवाच इंग्रजांच्या सोनेरी जाळ्यात अडकलेला असल्याने तो त्यांची मदत काय करणार ?  

    तरीही स. १८०४ मध्ये वसईच्या तहात गमावलेल्या गायकवाडीला परत मिळवण्याचा बाजीरावाने प्रयत्न केला. आधी सांगितल्यानुसार बाजीरावाने भगवंतरावास अहमदाबादची वहिवाट पाच वर्षांसाठी मक्त्याने दिली होती. त्याची मुदत स. १८०५ मध्ये भरत होती परंतु, तत्पूर्वीच --- म्हणजे ता. २ ऑक्टोबर १८०४ रोजी सालीना साडेचार लक्षांचा पुणे दरबारी भरणा करण्याच्या बोलीवर दहा वर्षासाठी अहमदाबादची वहिवाट बाजीरावाने भगवंतरावाच्या नावाने करून दिली. बाजीरावाची हि चाल हाणून पाडण्याचा वॉकरने उपक्रम आरंभला. भगवंतराव हा अनौरस असला तरी हुशार होता व त्यासच आपला वारस म्हणून नियुक्त करण्याची आनंदरावाची इच्छा होती. परंतु, यामुळे पेशव्याचा पक्ष बळावेल हे जाणून वॉकरने फत्तेसिंहास हाताशी धरले. लहानपणी त्यास देवाला वाहिलेलं असल्याने स. १८०६ मध्ये त्याची तुला करून त्यास शुद्ध करण्यात आले. तसेच गायकवाडांचा कारभार चालवण्यासाठी जे रीजन्सी कौन्सिल बनवण्यात आले त्याचे अध्यक्षपद वॉकरने स्वतःकडे ठेवून फत्तेसिंहास रिजंट, नेटिव्ह असिस्टंट गंगाधरशास्त्री, दिवाण बाबाजी आपाजी व मुजुमदार अशा नियुक्त्या केल्या. बाबाजी आपाजी हा मयत रावजी आपाजीचा बंधू असून तो इंग्रजांना अनुकूल होता व सीतारामाची कोंडी करण्यासाठीच वॉकरने त्यास अधिकार मंडळावर नेमले होते. 

                                                                               ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: