स. १७७४ पासून स. माधवाचा संरक्षक व नंतर एकप्रकारे पालक म्हणून वीस वर्षांहून अधिक काळ पेशव्यांची सत्ता नाना उपभोगत होता. त्यामुळे आपल्या हातातील सत्ता कायम राहावी यासाठी नानाचे प्रयत्नशील असणे स्वाभाविक होते. रघुनाथरावाचे पुत्र हे आपले प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याची खुणगाठ त्याने कधीच आपल्या मनाशी बांधलेली असल्याने ते सोडून इतर कोणाही लायक इसमास --- लायक म्हणजे त्याच्या ऐकण्यातील --- पेशवा बनवण्याची त्याची तयारी होती. त्या दृष्टीने पेशवाईच्या संभाव्य वारसाचा शोध व त्याविषयीच्या वाटाघाटी होऊ लागल्या. नानाच्या राजकारणाचे मुख्य बलिष्ठ स्थान म्हणजे प्रसंगी नियतीवर मात करण्याची क्षमता असलेलं त्याचं बुद्धीचातुर्य व मुख्य वैगुण्य म्हणजे लष्करी सामर्थ्याचा अभाव ! त्यामुळे त्याचे सर्व शहाणपण वाया गेलं. फुकट गेलं. नानाला आपल्या कमकुवत बाजूची जाणीव नव्हती असे नाही. त्यासाठीच त्याने प्रथम महादजी शिंदे नंतर हरिपंत फडके व पटवर्धनांना तसेच आता होळकरांना जवळ केले होते. परंतु, दुसऱ्याच्या सामर्थ्याच्या बळावर उभारलेल्या मसलतींचा पाया हा नेहमी कच्चाच असतो हे नानास प्रथम अनुभवास आले नव्हते. ते यावेळी येऊ लागले. या ठिकाणी एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद करणे अयोग्य होणार नाही व ती म्हणजे नाना कारभारी असतान सरकारी फौजेकडे होत असलेलं त्याचं दुर्लक्ष कसं चुकीचं व आत्मघाताचं आहे याविषयी अहिल्याबाई होळकरने त्यांस कित्येकदा सांगितले होते. हमेशा पंचवीस तीस हजार सरकारी फौज जय्यत तयार असल्या खेरीज कोणतंही राजकारण, मनसुबा सिद्धीस जाणार नाही हा तिने नानाला पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाच्या वेळी दिलेला इशारा नानाने साफ दुर्लक्षित केला. त्याचा दुष्परिणाम काय झाला हे इतिहास अभ्यासकांना - वाचकांना सांगण्याची गरज नाही ! असो, पेशवाईवर नवीन वारसाची स्थापना करण्यासाठी नानाला लष्करी गटाचा पाठिंबा हवा होता व त्यावेळी शिंदे - होळकर हे दोघंच काय त्यादृष्टीने सर्वांत बलिष्ठ होते. पैकी, आरंभी दोघांनीही पेशवेपदी बाहेरचा --- म्हणजे दत्तक वारस नेमण्यास मंजुरी दिली. प्रमुख सेनापतींचा पाठिंबा मिळताच नानाने दत्तक मुलाचा शोध आरंभला. इकडे नानाला पाठिंबा देणाऱ्या व त्याच्या विरोधात असणाऱ्या अशा दोन्ही गटांत त्यामुळे चलबिचल माजू लागली. त्यात जुन्नरास बसलेल्या बाजीरावाचीही भर पडली !
नारायणाच्या खुनानंतर ते स. माधवाच्या मृत्यूपर्यंत नानाने आपल्या हाती पेशवाईची सुत्रे कशी ठेवली होती हे सर्वांना दिसले होते. कळून चुकले होते. स. माधवाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस दत्तक देताना परत एकदा राज्याची सर्व सुत्रे नानाच्या हाती जाऊ देण्याइतपत मुत्सद्दी दुधखुळे नव्हते. नानाच्या हातातील कारभार काढून घेण्याचे महादजी शिंदेने केलेले प्रयत्न केवळ स. माधवाच्या मध्यस्थीने अपयशी ठरले होते. परंतु महादजीची हि महत्त्वकांक्षा त्याच्या मृत्यूनंतर का होईना पूर्ण करण्याची हाव त्याच्या सहकाऱ्यांत होती. त्यामानाने होळकरांची भूमिका वेगळी होती. अहिल्याबाईचे नुकतेच निधन झालेलं असल्याने होळकरांची सरदारकी पूर्णतः तुकोजीच्या हाती आली होती. मात्र त्याची वृद्धावस्था व मुलांमधील बेबनाव यांमुळे तसेच महादजीच्या सरदारांच्या मनात होळकरी दौलतीविषयी असलेल्या वैरभावामुळे तुकोजी होळकरास पुण्याचे कारभारीपद हाती घेण्याची इच्छा नव्हती. मात्र आपल्या पाठींब्याने नाना वा इतर कोणी कारभार हाती घेत असेल तर त्यांस ते नको होते असे नाही. म्हणजे सत्तेची प्रत्यक्ष सुत्रे हाती न घेता पडद्यामागून सुत्रचालकत्व करण्याची तुकोजीची इच्छा होती. परंतु, परिस्थिती त्याला फारशी अनुकूल नव्हती. तशी ती इतरांना तरी कुठे अनुकूल होती ? प्रत्येक मुत्सद्दी, प्रत्येक गट दुसऱ्याचे बेत हाणून पाडून आपलंच घोडं पुढे दामटण्याचा यत्न करत होते. नानाने दत्तकाचे प्यादे पुढे ढकलताच विरोधकांनी रघुनाथरावच्या मुलांना पुढे केले. नानाने संभाव्य दत्तक विधानासाठी गोळा केलेल्या मुलांमध्ये एक नानाचा नातलग असून नाना त्यांसच पेशवा बनवणार असल्याची वार्ता उठली. त्यामुळे नानाचे पक्षपातीही दबकले. त्यांनी नानाला समर्थन देण्याच्या बाबतीत फेरविचार सुरु केला. इकडे जुन्नरास बसलेल्या बाजीरावही शांत बसला नव्हता. आपल्या उपजत राजकीय व कारस्थानी बुद्धीचा वापर करून त्याने पेशवेपद प्राप्त करण्याच्या दृष्टीने डावपेच आखण्यास आरंभ केला. त्याचा मोठा भाऊ अमृतराव --- याचा एक मेव्हणा शिंद्यांच्या छावणीत होता. त्याच्या मार्फत बाजीरावाने शिंद्यांचा प्रमुख कारभारी बाळोबा पागनीसला आपल्या पक्षास वळवून, ' आपणांस पेशवेपदी बसवल्यास तुम्हांस सव्वा कोट रुपये व पंचवीस लाखांची जहागीर देऊ ' असे वचन दिले. झाले. बाळोबाने आपल्या धन्यास --- दौलतराव शिंद्यास बाजीरावाच्या पक्षाला पाठिंबा देण्यास तयार केले. अशा प्रकारे शिंदे बाजीरावास सामील होताच नानाचे दत्तकाचे राजकारण खोळंबले.
दत्तकाच्या योजनेस आरंभी अनुकूल असलेले शिंदे अचानक विरोधात गेल्याचे पाहून नाना गोंधळून गेला. नंतर त्याच्या लक्षात आले कि, आपल्या योजनेस फक्त शिंदेच नाही तर बव्हंशी लोकांचा विरोध आहे व विरोधाचे प्रकट कारण, भट घराण्याचे औरस वंशज हजर असताना दत्तकाचे काम काय, हे होते. काळाची व मुत्सद्दयांची पावलं ओळखून नानाने आपला पवित्रा बदलला. रघुनाथाच्या वंशाचा गादीला विटाळ होऊ न देण्याची आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवून दादासाहेबाचा धाकटा पुत्र चिमणाजी आपा यांस स. माधवाची पत्नी यशोदाबाई --- हिला दत्तक देऊन चिमणाजी माधवराव नावाने पेशवा बनवण्याचे त्याने योजले. चिमणाजी यावेळी अवघा १० - १२ व चा असून नात्याने स. माधवाचा चुलत चुलता होता. त्यांस आता आपल्याच सुनेच्या ओटीत जाण्याची पाळी आली होती. राजकारणाचे हे नातेसंबंध पार जाणारे धागेदोरे - डावपेच खरोखर अनाकलनीय असेच आहेत म्हणावे लागेल !
दत्तकाच्या योजनेस आरंभी अनुकूल असलेले शिंदे अचानक विरोधात गेल्याचे पाहून नाना गोंधळून गेला. नंतर त्याच्या लक्षात आले कि, आपल्या योजनेस फक्त शिंदेच नाही तर बव्हंशी लोकांचा विरोध आहे व विरोधाचे प्रकट कारण, भट घराण्याचे औरस वंशज हजर असताना दत्तकाचे काम काय, हे होते. काळाची व मुत्सद्दयांची पावलं ओळखून नानाने आपला पवित्रा बदलला. रघुनाथाच्या वंशाचा गादीला विटाळ होऊ न देण्याची आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवून दादासाहेबाचा धाकटा पुत्र चिमणाजी आपा यांस स. माधवाची पत्नी यशोदाबाई --- हिला दत्तक देऊन चिमणाजी माधवराव नावाने पेशवा बनवण्याचे त्याने योजले. चिमणाजी यावेळी अवघा १० - १२ व चा असून नात्याने स. माधवाचा चुलत चुलता होता. त्यांस आता आपल्याच सुनेच्या ओटीत जाण्याची पाळी आली होती. राजकारणाचे हे नातेसंबंध पार जाणारे धागेदोरे - डावपेच खरोखर अनाकलनीय असेच आहेत म्हणावे लागेल !
नव्या डावाची आखणी करून नानाने त्यांस आपल्या व विरुद्ध पक्षाच्या मुत्सद्दयांचा वरकरणी तरी पाठिंबा मिळवला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याचा नसला तरी बाळाजी विश्वनाथाचा वंशज गादीवर बसणार असेल तर त्यांस विरोध कोण करेल ? नानाचा हा बेत कदाचित तडीसही गेला असता, जर बाजीराव आड आला नसता तर !
चिमणाजी यावेळी आपल्या भावांसह जुन्नरास होता. त्यांस पुण्याला आणायची जबाबदारी नानाने परशुरामभाऊ पटवर्धनवर सोपवली. राजकारणाच्या बदलत्या हवेचा अंदाज बाजीरावास लागल्याने त्याने दौलतराव शिंद्यास त्वरेने पुण्यास येण्याची आज्ञा केली. परंतु यावेळी त्याचा प्रमुख सेनानी जिवबादादा बक्षी मरण पावल्याने व महादजीच्या स्त्रियांनी दौलतरावाविरुद्ध बंड पुकारल्याने त्यांस तातडीने पुण्याला येणे जमले नाही. परंतु, आपले हस्तक वकिलीच्या निमित्ताने जुन्नरास रवाना करून बाजीरावास थोडे निश्चिंत केले.
इकडे नानाच्या आज्ञेनुसार परशुरामभाऊ जुन्नरला आला खरा पण तत्पूर्वीच शिंद्यांचा वकील रामजी पाटील तेथे येऊन पोहोचल्याने भाऊ थोडा चपापला. ' बऱ्या बोलाने बाजीरावाने चिमणाजीस स्वाधीन न केले तर प्रसंगी जबरदस्ती करण्याची ' नानाची त्यांस आज्ञा होती. परंतु, शिंद्याचा वकील तेथे येऊन बसल्याने आता बोलाचालीनेच काम पार पाडावे लागणार हे भाऊस कळून चुकले. त्यानुसार त्याने बाजीरावाशी वाटाघाट आरंभली. नानाची मसलत त्याच्या समोर उघड करून चिमाजीला आपल्यासोबत पाठवण्याची भाऊने बाजीरावास विनंती केली. त्यावेळी बाजीरावाने भाऊच्या पायांवर डोकं ठेवून अश्रुपात करून ' थोरल्यास बंदीत ठेवून धाकट्यास गादीवर बसवणे योग्य आहे का ? ' अशा आशयाची भाषणे केली. बाजीरावाच्या या पवित्र्याने भाऊ गडबडला. काय करावे तेच त्याला सुचेना. मुळात तो शिपाईगडी. आपणांस कारस्थानी पुरूष म्हणवून घेण्यापेक्षा लढवय्या म्हणवून घेणे त्यांस भूषण वाटे. त्याच्या गळ्यात नानाने हि भलतीच जोखीम टाकली होती व २० - २१ वर्षीय बाजीरावाने त्याचा स्वभाव ओळखून त्यांस आपल्या राजकीय चतुराईने पुरते हतबल करून ठेवले होते. भाऊने याबाबतीत नानाला कळवले कि, ' बाजीराव ऐकत नाही व शिंद्यांची फौज याच रोखे येत आहे. पुढे काय करावे ? ' भाऊच्या निरोपावरून डाव शिंद्यांच्या हाती जात असल्याचा अंदाज नानाला आला व त्याने भाऊला बाजीरावासह चिमाजीला पुण्यास आणण्याची सुचना केली. एकदा का बाजीराव - चिमाजी पुण्यास आले कि मग आपणांस हवं ते साध्य करता येईल अशी त्याची धारणा होती.
नानाच्या सुचनेनुसार भाऊ बाजीराव - चिमाजीला घेऊन पुण्याजवळ दि. ३ मार्च १७९६ रोजी खडकी येथे आला. भाऊच्या मार्फत नाना - बाजीरावाची भेट घडून नानाला ' हे प्रकरण ' साधं नसल्याची जाणीव झाली. त्याने आपला आधीचा बेत बदलून बाजीरावासच पेशवाईवर बसवण्याचे निश्चित केले. यावेळी उभयतांचा एकमेकांच्या बचावाचा, मागील वैरभाव विसरण्याचा आणा - शपथांचा करार घडून आला. बाजीरावाने नानामार्फत पेशवाई स्वीकारताना दोन अटी घातल्या. (१) आपण बाजीराव रघुनाथ याच नावाने मसनदीवर बसणार (२) स. माधवाच्या वेळेस पेशव्यावर जी काही नानाची बंधने होते ती आपण पाळणार नाही. बदल्यात आपण नानांच्याच सल्ल्याने कारभार करू, असे बाजीरावाने मान्य केले. इकडे नानाने आपल्या हातातील डाव उपटल्याचे पाहून शिंदे चिडला. त्याचा कारभारी बाळोबातात्यावर याच वेळी अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याचा वा त्यांस मारण्यासाठी मारेकरी त्याच्या गोटात दाखल झाल्याचा बोभाटा झाला. तेवढ्यावरून या कृत्यामागे नानाचा हात असल्याची बाळोबाने बोंब ठोकली आणि नानाच्या बंदोबस्तासाठी फौजा घेऊन तो पुण्यास येऊ लागला. शिंद्याच्या स्वारीस तोंड देण्याची नानाने आपल्या परीने राजकीय तयारी केली. बाजीरावास शिंद्यापासून आपला बचाव करण्याची गळ घातली पण जे कार्य करण्यास पेशवाईचा एकेकाळचा सर्वेसर्वा यावेळी असमर्थ होता ते नुकताच बंदीवासातून बाहेर पडलेला बाजीराव काय करणार ? त्याने आपली असमर्थता व्यक्त केली तेव्हा नानाने आपल्या लष्करी सल्लागारांस --- म्हणजे भाऊकडे सल्ला मागितला असता त्याने नानास पुणे सोडण्याची सुचना केली.
पुढील घटनाक्रम पाहता भाऊची हि सुचना अयोग्य होती असे म्हणता येईल पण तत्कालीन स्थिती पाहता यावेळी त्याच्या हाती तरी काय होते ? शिंद्याच्या सैन्याशी मुकाबला करण्याची वेळ आली तर त्यांस भाऊची तयारी नव्हती. होळकर कोणत्या पक्षास मिळेल याचा भरवसा नव्हता. त्याखेरीज दरबारचे मुत्सद्दी व सरदार मंडळी कोणता निर्णय घेतील याविषयीही साशंकता होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे खुद्द बाजीराव खंबीरपणे कोणाच्या पाठीशी उभा राहतो याचा त्याला अंदाज नव्हता. तेव्हा तो तरी काय करेल ? खेरीज खुद्द नानाकडेही प्रसंगी उपयोगी पडेल असे प्रबळ लष्करी बळ कुठे होते ? तेव्हा भाऊचा नानाला पुणे सोडून जाण्याचा दिलेला सल्ला अयोग्य होता असे म्हणता येत नाही.
भाऊच्या सल्ल्यानुसार नानाने पुण्यातून मुक्काम हलवण्याची व्यवस्था केली. आपल्या सहकाऱ्यांना पुणे सोडण्याची सुचना करून आपल्या पत्नीची त्याने रायगडी रवानगी केली व तो स्वतः दि. २२ मार्च १७९६ रोजी साताऱ्यास रवाना झाला. नानाचा मुक्काम हलल्यावर बाळोबा शिंदयांची फौज घेऊन पुण्यास येऊन पोहोचला. पाठोपाठ दौलतरावाची स्वारी आली. बाजीराव - दौलतरावाची भेट घडून आली. आता फक्त बाजीरावास पेशवाईची वस्त्रे मिळणे बाकी होते. ती मिळताच बाजीराव आपल्यासोबत केलेला करार पूर्ण करेल अशी दौलतरावाची समजूत होती परंतु, बाजीरावाने शिंदयासोबत केलेला करार पाळण्यास आपण बांधील नसल्याचे स्पष्ट केले.कारण, करारानुसार शिंदयांनी बाजीरावास जुन्नरहून पुण्यास आणलेच नाही व पेशवाई देखील प्राप्त करून दिली नाही. तेव्हा शिंदयांसोबत केलेला करार पाळण्याची आपणांस गरज वाटत नसल्याचे बाजीरावाने सांगितले. यांमुळे शिंदे तोंडघशी पडला. नानाशी त्याने आता उघड शत्रुत्व घेतले होते. तेव्हा आता काय करावे या संभ्रमात तो राहिला.
इकडे त्याचा कारभारी बाळोबा मात्र नानाचा सूड उगवण्यास बेकरार झाला होता. परंतु, परशुरामभाऊने त्यांस आवरले. खुद्द बाजीराव देखील यावेळी नानाच्या बचावासाठी पुढे झाला. त्याने दौलतरावास नानासोबत मिळतं - जुळतं घेण्याची सल्ला दिली. इतिहासकार सांगतात कि, बाजीरावास पेशवाईची वस्त्रे हवी होती व नानाचा मुक्काम त्यावेळी साताऱ्यास असल्याने तो छत्रपतींकडून बाजीरावास मिळणाऱ्या वस्त्रांना हरकत करेल अशी त्यांस भीती वाटत असल्याने त्याने नानाचा बचाव केला. परंतु, माझ्या मते यावेळी खरोखरच बाजीरावाची नानाचा बचाव करण्याची इच्छा होती. यामागे त्याचा स्वार्थ नव्हताच असे मी म्हणत नाही. परंतु, राज्यास नानाची गरज आहे याची त्यांस जाणीव अजिबात नव्हती असेही दिसून येत नाही. नाना आपली फडणीशी व मर्यादा रक्षून राहील तर ते बाजीरावास हवे होते पण नानाला नेमकं तेच जमत नव्हतं ! असो, इकडे दौलतरावाला बाजीरावाच्या इच्छे - अनिच्छेशी काही देणं - घेणं नव्हतं. त्याला फक्त प्रादेशिक व सांपत्तिक लोभ होता. बाजीरावाने बोलल्याप्रमाणे पैसा व जहागीर देण्याचे नाकारताच दौलतरावाची दृष्टी पालटली. तो, त्याचा कारभारी बाळोबातात्या व परशुरामभाऊ यांनी नवी मसलत उभारली.
बाजीरावास पेशवेपदी न बसवता नानाच्या मूळ बेतानुसार चिमणाजी आपास यशोदाबाईस दत्तक देऊन त्यासच पेशवा बनवायचे आणि कारभार परशुरामभाऊने बघायचा. चिमाजी - भाऊचा जम बसवून देण्याची जबाबदारी शिंद्याने स्वीकारली. बदल्यात भाऊने शिंद्यांना पैसे व जहागीर देण्याचे मान्य केले. तात्या - भाऊ बाजीरावासोबत रोज बसत - उठत होते पण त्याला शेवटपर्यंत या दुकलीच्या कटाचा काही पत्ता लागला नाही. उलट वस्त्रे घेण्यासाठी जेव्हा बाजीराव साताऱ्यास निघाला तेव्हा शिंद्याने फौजेच्या देण्याचा गवगवा पुढे करून बाजीरावास अडवून धरले. त्यावेळी भाऊने उभयतांमध्ये मध्यस्थी केल्याने बाजीरावाची पटवर्धनांवर अधिकच मर्जी बसली. पुढे काही दिवसांनी लष्कराच्या देण्या - घेण्यावरून बाजीराव - शिंद्याचा वाद झाला असता त्याची समजूत काढण्यासाठी बाजीराव शिंद्याच्या गोटात निघाला. त्यावेळी त्याने भाऊला आपल्या बरोबर येण्याची सुचना केली असता पोटात दुखत असल्याचे निमित्त सांगून भाऊ मागे राहिला व बाजीराव शिंद्याच्या छावणीत गेल्याचे समजताच आधी ठरवल्याप्रमाणे भाऊने बाजीरावाच्या गोटात जाऊन चिमाजीला जबरदस्तीने ताब्यात घेतले व पुण्याचा रस्ता धरला. भाऊ चिमाजीस घेऊन पळाल्याचे बाजीरावास समजले तेव्हा त्याने शिंद्यांस भाऊचा पाठलाग करण्याची आज्ञा केली. परंतु रात्र असल्याने सकाळी शोध घेता येईल असे शिंद्याने त्यांस सांगितले. तेव्हा बाजीरावाने त्या रात्री शिंद्याच्या गोटात मुक्काम करण्याचे ठरवले. कारण आपल्या छावणीत परत गेल्यास दगा होण्याची त्यांस भीती होती. परंतु, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने आपल्या तळावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांस सर्व डाव उमगला. बाजीरावाच्या भोवती आता शिंद्याचे चौकी - पहारे बसले होते ! पेशवा बनायला निघालेला बाजीराव परत एकदा फिरून राजकीय बंदीवासात पडला !!
इकडे भाऊ चिमाजीसह पुण्यास आला. धर्मशास्त्रे धाब्यावर बसवून सासऱ्याला सुनेच्या मांडीवर दत्तक दिले आणि दि. २ जून १७९६ रोजी पेशवेपदी स्थापन केले. भाऊ चिमाजीच्या नावे पेशवाईची व कारभारीपदाची वस्त्रे छत्रपतींकडून घेत असताना नाना शांतपणे बसून राहीला. नव्या राजकीय स्थित्यंतरात आपले भवितव्य नेमके काय असेल याचा तो अंदाज घेत होता. त्यामुळेच त्याने त्या वस्त्रांना अजिबात हरकत घेतली नाही. राजकारणात कधी कधी अशी प्रतिपक्षाला संभ्रमात पाडणारी भूमिका घ्यावी लागते. परंतु, बाळोबातात्यापुढे नानाची हि सहेतुक राजकीय तटस्थतेची मात्रा लागू पडणार नव्हती. चिमणाजी पेशवा बनल्यावर तात्याने नाना फडणीसला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास आरंभ केला. कारण ; नाना जाग्यावर बसल्याखेरीज आपला कारभार सुरळीत चालणार नाही याची त्या राजकारणीपटुस जाणीव होती. परंतु, भाऊने नानासोबतचे आपले पूर्वसंबंध स्मरून नानाच्या बचावाचे प्रयत्न चालवले. नाना राज्यकारभारात हस्तक्षेप करणार नाही. तो त्याची फडणीशी सांभाळून राहील असे वचन त्याने नानाच्या वतीने बाळोबास दिले. तेव्हा बाळोबाने त्यांस संमती दर्शवून नानाच्या ताब्यातील गडकिल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्यांची मागणी केली. भाऊने याबाबतीत नानाशी बोलाचाली केल्या असता नाना त्याबाबतीत चालढकल करू लागला. तेव्हा बाळोबातात्याने समेटाचे धोरण गुंडाळून नानाला पकडण्यासाठी फौजा रवाना केल्या. यावेळी नाना मेणवलीस होता. नाना बाळोबाच्या तावडीत सापडला तर त्याचे धिंडवडे निघतील हे लक्षात घेऊन भाऊने आपल्या मुलास --- महादजीपंतास नानाला ताब्यात घेण्यासाठी मेणवलीस पाठवले. नानाने संभाव्य धोका ओळखून मेणवली सोडून रायगड गाठला. परंतु, तेथील हवा न मानवल्याने त्याने महाडला आपला तळ ठोकला. तत्पूर्वी कोकणात उतरणारे सर्व घाट रस्ते - वाटा खोदून, झाडे तोडून बंद केले. लष्करी चौक्या बसवून चोख बंदोबस्त ठेवला. या काळात पावसाळा सुरू असल्याने आता लष्करी आक्रमणाची त्यांस भीती नव्हती. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व थंड हवामानात बसून नानाने एकूण राजकीय स्थितीचा विचार करून एक मोठे कारस्थान रचण्यास आरंभ केला. ज्यास इतिहासात ' महाडचे कारस्थान ' म्हणून ओळखले जाते.
( क्रमशः )
२ टिप्पण्या:
संजय क्षीरसागर,
लेखमाला उत्तम आहे. स्वसैन्यासंबंधी अहिल्याबाईंनी अनेकदा सल्ला देऊनही नाना फडणीसाने तिकडे लक्ष दिलं नाही. सल्ल्याप्रमाणे २५ ३० हजार सैन्य खडं करणं नानाला अशक्य खचितच नव्हतं. मग का केलं नाही असा प्रश्न पडतो. बहुधा छुप्या विलासी उपभोगांवर नानाचा बराच पैसा खर्च होत असावा. अन्यथा संगती लागत नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Gamma Pailvan,
प्रतिक्रियेबद्दल आपला आभारी आहे !
टिप्पणी पोस्ट करा