गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ७ )


    ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानच्या गव्हर्नर जनरलपदी सर जॉन शोअरच्या जागी रिचर्ड वेल्स्लीची नियुक्ती केली व तो दि. १७ मे १७९८ रोजी अधिकारपदी दाखल झाला. यावेळी नेपोलियनचा मुक्काम इजिप्तमध्ये असून त्याचा हिंदुस्थानात येण्याचा विचार असल्याचे वेल्स्लीला वाटेतच समजले होते. तेव्हा हिंदुस्थानात जाताच फ्रेंच धार्जिण्या सत्तांना आपल्या पंखाखाली आणण्याचा त्याने प्रवासातच बेत आखला होता. इकडे येऊन पोहोचल्यावर जेव्हा त्याने ठीकठीकाणच्या वकिलांचे राजकारणी खलिते अभ्यासले तेव्हा त्याने पेशवा, निजाम व टिपू हे आपले संभाव्य तीन शत्रू व नेपोलियन / फ्रेंचांचे मित्र  मानून त्यांच्याविरोधात राजकीय व लष्करी मोहिमा आखण्यास आरंभ केला. 

    सध्या तरी त्याला पुणे दरबारची फिकीर करण्याची गरज नव्हती. कारण, तिथे प्रत्येकजण आपल्यापेक्षा दुर्बलाची मुंडी मुरगळण्यात मग्न होता. अशा स्थितीत पुणे दरबार इंग्रजांच्या विरोधात काही कारवाई करेल हे संभवत नव्हते. पण त्यांच्या आपसांतील झुंजीचा फायदा घेऊन पेशव्यावर आपला शह बसवण्यासाठी त्याने आपल्या पुण्यातील वकीलास --- पामर यांस लिहिले कि, ' बाजीराव जर शिंद्याला दूर करेल तर अडी - अडचणीच्या प्रसंगी इंग्रज सरकार त्यांस मदत करेल. '  तसेच ' नाना फडणीस आपल्या मदतीची अपेक्षा बाळगत असेल तर आपल्या हितास बाधा न येईल अशा प्रकारे त्यांस मदत करता आली तर करा ! ' असेही त्याने पामरला सांगितले. त्यानुसार पामर पुण्यात खटपट करत राहिला. शिंद्यांच्या अरेरावीने वैतागलेल्या बाजीरावाने पामर करवी दोन पलटणे आपल्या संरक्षणास्तव मागून घेतली पण शिंद्यांशी विरुद्ध न दिसावे यासाठी ती मुंबईतच ठेवून प्रसंग पडला असता पुण्यास यावीत अशी तजवीज केली. या पलटणांचा दरमहा खर्चही तो पामरला देऊ लागला होता. या प्रकारे पेशव्याचे प्रकरण काहीसे मार्गी लागताच वेल्स्लीने निजामाकडे आपले लक्ष वळवून दि. १ सप्टेंबर १७९८ रोजी तैनाती तहाने त्यांस आपल्या पक्षात वळवून घेतले. निजामाच्या कवायती फौजेचा फ्रेंच सेनानी यावेळी मरण पावल्याने वेल्स्लीला हे कार्य सहज पार पाडता आले. अशा प्रकारे निजाम - पेशव्यांची प्रकरणे मार्गी लागताच वेल्स्लीने शिंदे - टिपूकडे आपला मोर्चा वळवला. 


    दौलतराव शिंद्याच्या कर्तबगारी एव्हाना सर्वांनाच कल्पना येऊन चुकली होती पण, त्याच्याजवळील महादजी वेळचे अनुभवी सरदार व फ्रेंच अंमलदारांच्या हाताखालील पलटणांची इंग्रजांना धास्ती होती. तेव्हा शिंद्याला हाताळण्यासाठी वेल्स्लीने निराळाच उपक्रम आरंभला. ' अफगाण बादशाह जमानशाह मोगल बादशाहला शिंद्यांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी दिल्लीवर चालून येणार असून या स्वारीसाठी तो इंग्रजांची मदत मागत असल्याचे ' वेल्स्लीने दौलतरावास कळवले. यानिमित्ताने दौलतराव उत्तरेत जाईल व त्याच्या अनुपस्थितीत टिपू बद्दल  निश्चित धोरण अंमलात आणता येईल. तसॆच जमानशाह जर हिंदुस्थानात आलाच तर शिंदे - अफगाण परस्पर लढून दुर्बल होतील तर त्यात अंती इंग्रजांचाच फायदा होता. परंतु, दौलतरावाने वेल्स्लीचा निरोप फारसा मनावर न घेतल्याने त्याचा हा डाव वाया गेला व शिंद्याच्या उपस्थितीतच त्याला टिपूचे प्रकरण उरकावे लागणार असा रंग दिसू लागला ! 


    तेव्हा त्याने पेशव्यास कळवले कि, ' श्रीरंगपट्टणच्या वेळी ठरलेल्या करारानुसार टिपूचे वर्तन नसल्याने लवकरच त्याच्याशी युद्धप्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. आधीच्या निजाम - इंग्रज - पेशवा त्रिवर्ग करारानुसार संभाव्य मोहिमेत आपण आम्हांस सामील होणार कि नाही ? होणार असाल तर सर्वप्रथम शिंद्यांच्या सैन्यातील फ्रेंच अधिकारी काढून टाकावेत. कारण, फ्रेंच - टिपूची मैत्री असल्याने व फ्रेंच आमचे शत्रू असल्यामुळे संभाव्य मोहिमेत फ्रेंचांची उपस्थिती आम्हांस अडचणीची आहे. ' बाजीराव - नानाला इंग्रजांची मसलत समजली पण त्यांच्या तडफेचा अंदाज काही आला नाही.  याच सुमारास निजामाने इंग्रजांच्या सोबत केलेल्या तैनाती कराराची नक्कलही पेशव्यास पाठवण्यात आली. परंतु त्याकडे यावेळी सर्वांनीच दुर्लक्ष केले. 

    नाना आपला जम बसवण्याच्या नादात होता तर बाजीराव राज्यकारभार शिकण्याच्या ! दौलतराव यावेळी कोणत्या खेळात मग्न होता काय माहित ? परंतु, बाजीरावावर आपला शह बसवण्यासाठी लॉर्ड वेल्स्ली मात्र अत्यंत आतुर, उत्सुक होता. आपल्याविषयी पेशव्यास आत्मियता वाटावी, विश्वास बसावा याकरता रघुनाथरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवलेले अलंकार त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज माफ करून बाजीरावास दिले.  जवाहिरांसाठी दादा मरेपर्यंत झुरला. इंग्रजांकडे मागणी करून थकला. पण इंग्रजांनी त्यावेळी त्यांस दाद दिली नाही. परंतु , आता मात्र त्यांच्या हृदयाला स्वार्थी पाझर फुटला. वेल्स्लीच्या या दर्यादिलीचा बाजीरावाच्या मनावर कितपत प्रभाव पडला हे रावबाजीच जाणे ! 

    इंग्रज समस्त हिंदुस्थानावर आपले वर्चस्व लादण्याच्या बेतात असताना इकडे पुण्यात वेगळाच तमाशा चालला होता. गादीवर पेशवा होता पण त्याचे हुकुम, अधिकार शहरात सोडा, दरबारात पण चालत नव्हते. पेशव्याचा कारभारी नाना फडणीस --- पदावर नियुक्ती होऊनही कारभार हाती घेत नव्हता. अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे हा राज्यकारभार सोडून इतर कामांत व्यस्त होता. अशाने राज्यकारभार सुरळीत होणार तरी कसा ? बाजीरावाने यावेळी थोडा कमीपणा घेऊन दि. १४ नोव्हेंबर १७९८ रोजी रात्रीच्या वेळी फक्त एक शिपाई सोबत घेऊन वानवळ्यांच्या वाड्यात मुक्कामास असलेल्या नानाची भेट घेऊन त्याच्या पायांवर डोकं ठेवलं व राज्य सांभाळण्यासाठी त्याची आर्जवं केली. तेव्हा नानाने त्यांस संमती दर्शवली पण, ' आपण स्वतः दरबारात येणार नाही. आपल्या वतीने नारोपंत चक्रदेव तिथे हजर राहिल व आपल्या सल्ल्याने तो कारभार करेल ' अशी नानाने अट घातली. पेशव्याने ती मान्य केली. नाना फडणीसचे प्रकरण मार्गी लागते न लागते तोच पटवर्धनांचा मामला पुढे आला. परशुराम भाऊस पेशव्याने कैदमुक्त करून मोहिमेवर पाठविले असले तरी त्याचा सरंजाम अजून मोकळा केला नव्हता. पटवर्धनांच्या कारकुनाने याविषयी बोलणे काढले असता पेशव्याने पटवर्धनांची जहागीर कायम करण्यास्तव सरकारी नजर तर मागितलीच पण शिंद्याकडे दहा लाखांचा भरणा करण्यासही सांगितले. या दरम्यान इतरही घटना घडतच होत्या.


     शिंदे बायांच्या पक्षातून अमृतराव जरी फुटला असला तरी चालू राजकारणातून निवृत्ती घेण्याची त्याची इच्छाही नव्हती व वयही नव्हते ! त्याने पाहिले इंग्रजांचे राजकारण चढाईचे आहे. बाजीराव कारभारात धडपडत आहे तर नाना पायापुरते पाहतोय. निजाम इंग्रजांच्या कच्छपी लागला. सर्जेरावीत पुण्याची व जुन्या मुत्सद्द्यांची दुर्दशा झाली. महादजी शिंदेच्या वेळचा शिंदेशाहीचा फक्त दरारा राहिला होता. दौलतरावामुळे तोही आता पोकळ बनू लागला होता. अशात कारभार आपल्या हाती घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही असे ठरवून त्याने नानाचा हस्तक गोविंदराव काळे यांस आपल्या बाजूला वळवले व त्याच्या आणि शिवराम थत्तेच्या मार्फत शिंद्याकरवी नानाला पकडण्याचा घाट रचला. या बदल्यात चाळीस लाख रुपयांचे आमिषही दौलतरावास दाखवण्यात आले. परंतु दौलतराव सध्या नानाच्या उपकाराखाली दबलेला असल्याने त्याने हि गोष्ट सरळ नानाच्या कानी घातली. नानाला याविषयी बाजीरावाचा संशय येऊन त्याने थेट पेशव्याकडेच या बाबत विचारणा करताच त्याने याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करत दोषींवर कारवाई करण्याचे नानास स्वातंत्र्य दिले. तेव्हा काळे, थत्ते यांना कैद करून नानाने अनुक्रमे सिंहगड, कर्नाळा येथे पाठवले.
 

    अशा प्रकारे पुणे दरबार आपसांतील तंट्यात गुरफटला असताना तिकडे निजाम - इंग्रजांच्या फौजा टिपूविरुद्ध लढण्यासाठी तयार होऊ लागल्या होत्या. त्रिवर्गाच्या श्रीरंगपट्टण मोहिमेने म्हैसुरकरांचे कंबरडे आधीच मोडले होते. त्यात पुन्हा त्यांची स्वारी आल्यास आपला निभाव लागणार नाही हे हेरून टिपूने पेशव्याकडे वकील पाठवून, पैसा भरून हि स्वारी रद्द व्हावी --- निदान पुणेकरांनी त्यात सहभागी न व्हावे अशी खटपट चालवली. बाजीरावानेही परराज्य धोरणावर नजर ठेवत इंग्रज व टिपू --- दोघांकडेही आपली सुत्रे राखली. टिपूकडून तो पैसाही घेत होता व लढाईसाठी फौजही जमवत होता. प्रस्तावित मोहिमेत सहभाग घेण्यासाठी मराठी सेना माधव रामचंद्र कानडेच्या नेतृत्वाखाली पाठवण्याचा पेशव्याचा बेत होता तर या स्वारीत परशुरामभाऊने जावे असे नानाचे मत होते. परंतु भाऊला मात्र यावेळी टिपूपेक्षा कोल्हापूरची मोहीम आवश्यक वाटत होती. नानाच्या प्रेरणेने कोल्हापूरकरांनी पटवर्धनांच्या मुलखाची नासाडी चालवलेली असल्याने सातार प्रकरण हातावेगळे होताच त्याने कोल्हापूरवर स्वारी करण्याचे योजले पण, याचवेळी धोंडोपंत गोखले कर्नाटकांत अडचणीत सापडल्यामुळे व पुढील मोहिमांकरता पुरेसे द्रव्य गोळा करण्यासाठी भाऊला कोल्हापूर मोहिमेचा बेत तात्पुरता तहकूब करून कर्नाटक प्रांती जाणे भाग पडले.

    इकडे नानाला कैद करण्याचा डाव फसल्यावर अमृतरावाने नानाची भेट घेऊन त्याचा पक्ष स्वीकारला. नाना - अमृतराव एकत्र येताच आपला पक्ष लष्करीदृष्ट्या बळकट व्हावा याकरता त्यांनी भाऊशी हातमिळवणी केली व पुणे दरबारातील शिंद्याचे प्रस्थ कमी व्हावं याकरता नानाने दौलतरावास उत्तरेत निघून जाण्याची टोचणी लावली. परंतु, सैन्याचा थकित पगार दिल्याखेरीज इथून हलणे शक्य नसल्याचे दौलतरावाने स्पष्ट केले. तेव्हा नानाने त्यांस मुक्काम हलवताना सात लक्ष, जांबगावी जाताच चार लाख व बऱ्हाणपुरी गेल्यावर बारा लक्ष देण्याचे मान्य करून उर्वरित तेवीस लक्षांची वरात बुंदेले व झांशीवाले यांच्यावर देण्याचे स्पष्ट केले. पण नानाचा भरवसा नसल्याने दौलतरावाने उर्वरित तेवीस लाखांसाठी जामीन मागितला असता हरिभक्ती सावकाराचा भाचा दुल्लभदास व अन्याबा अभ्यंकर यांस शिंद्याच्या ताब्यात जामीन म्हणून दिले तेव्हा स. १७९९ च्या जानेवारीत सातच्या ऐवजी दहा लाख रुपये घेऊन दौलतराव वानवडीवरून मांजरीस गेला व तिथेच दहा - पंधरा मुक्काम त्याने केले. तेथूनच त्याने उर्वरित रकमेसाठी नानाकडे तगादा लावला तेव्हा नानाने त्याकडे दुर्लक्ष केले. मग आपले चंबू गबाळे उचलून दौलतराव निमूटपणे पुण्यात येऊन बसला ! दौलतरावाच्या या लेझीम नृत्यामागे बाजीरावाचाही थोडाफार हातभार होताच.


     स. माधवराव पेशव्याचा अपघाती मृत्यू झाला हा सर्वसामान्यपणे सर्वांचाच --- अगदी इतिहास संशोधक ते अभ्यासकांचा समज असला तरी त्याचा खून करण्यात आला होता याबद्दल बाजीरावाच्या मनात अजिबात शंका नव्हती. जवळपास बव्हंशी मुत्सद्द्यांना नको असलेला पण भट घराण्याचा औरस जेष्ठ वारस असलेल्या बाजीरावास शत्रू सर्वत्र होते. तेव्हा आपल्या जीवाच्या रक्षणासाठी त्याने दौलतरावास अंतस्थरित्या गळ घातली कि, कोणत्याही स्थितीत आम्हांला नानाच्या हवाली करून जाऊ नका. पण इतक्यावरच थांबतील ते रावबाजी कसले ?


     जांबगावी स्वस्थ बसलेल्या महादजीच्या स्ञियांना
बाजीरावाने अंतस्थ चिथावणी देऊन त्यांना दौलतरावाविरुद्ध बंड करण्यास उत्तेजन दिले. म्हणजे, आपल्या बचावास्तव राहिले निदान सरदारीच्या रक्षणासाठी तरी दौलतराव दक्षिणेत राहील अशी त्याची धारणा होती. महादजीच्या स्ञियांनी फिरून धामधूम करण्यास आरंभ करताच दौलतरावाचा दक्षिणेतला मुक्काम रेंगाळला. परिणामी, नानाला परत एकदा आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली. 

    अमृतरावाच्या रूपाने त्याच्याकडे बाजीरावावर ठेवण्याकरता एक शह होता. परशुरामभाऊ शिंद्याच्या लष्करी सामर्थ्यावर उतारा होता. परंतु , शिंद्याने मुळातच आपल्या विरोधात जाऊ नये असे करता आले तर ? तशी एक सुवर्णसंधी त्याकडे चालून आली. नानाच्या मध्यस्थीमुळे महादजीच्या स्ञियांचा दंगा तात्पुरता थांबला होता. जांबगावी गेल्यावर त्यांना खुद्द पेशव्याचे अंतस्थ प्रोत्साहन मिळताच परत त्यांनी हैदोस मांडला. आपला जीव व पेशवाई रक्षणाच्या नादात रावबाजी आता आगीशी खेळू लागले होते !   

 
    महादजीच्या स्त्रियांचा बंडावा हळूहळू पुन्हा वाढू लागला होता. महादजीच्या हयातीतच शिंदेशाही सैन्यातील दोन गटांत सुप्त ईर्ष्या निर्माण झाली होती. शिंद्यांचे परंपरागत सैन्य व नव्या कवयाती पलटणी यांची आपसांत अंतस्थ अशी चुरस होती. परंतु , आणखी त्यात मुत्सद्द्यांच्या गट होतेच. यांपैकी एक गट --- म्हणजे शेणवी मंडळींचा शिंदे बायांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचे उत्तरेतील नेतृत्व लखबादादा लाड करत होता तर दक्षिणेत नारायणराव बक्षी ! या गटाला थोरल्या बाजीरावाचा नातू -- बांदा संस्थानिक अलीबहाद्दरचा सक्रीय पाठिंबा होता. दौलतरावाने हे बंडाचे प्रस्थ आटोक्यात आणण्यासाठी उत्तरेतील आपल्या दोन प्रमुख सरदारांना -- अंबुजी इंगळे व पेराँ यांस लखबाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सांगितली व बायांचे प्रकरण निस्तारण्यासाठी बाळोबातात्या पागनीसची कैदेतून सुटका केली. बाळोबाने कैदेतून मुक्तता होताच शिंंदे बायांशी तडजोडीचे बोलणे चालवले. यावेळी महादजीच्या स्त्रियांचा मुक्काम जतच्या आसपास असून दौलतरावामार्फत आपली व्यवस्था लावून घेण्याकरता त्यांनी परशुरामभाऊस मध्यस्थ करण्याचे ठरवले. परंतु भाऊ कर्नाटकांत असल्याने त्यांनी कोल्हापूरकरांशी हातमिळवणी केली. आपण लावलेली आग आता वणव्यात बदलत आहे हे पाहून बाजीराव शुद्धीवर आला व त्याने भाऊला पत्रे पाठवून कोल्हापूरकर व शिंदेबायांची जुट फोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार, भाऊने आपले तडजोडीचे उपाय चालवलेच पण जोडीला आपलेही प्रश्न निकाली काढण्याचा त्याने प्रयत्न आरंभला.


     या पार्श्वभूमीवर बाळोबा पागनीस कारभारावर आला. तात्या येताच भाऊचा व त्याचा तसेच नानाचा स्नेहसंबंध जुळण्यास विलंब लागला नाही. मुख्य या तिघांची युती होताच महादजीच्या स्त्रियांचा प्रश्नही चर्चेअंती निकाली निघाला. त्यानुसार बायांच्या खर्चासाठी जहागीर तोडून देणे, त्यांचा पक्ष घेणाऱ्या सरदारांना त्रास न देणे व त्यांना पूर्ववत सेवेत दाखल करून घेणे, बायांचे कर्ज वारणे व मुख्य म्हणजे सर्जेरावास कारभारातूनच नव्हे तर आपल्या जवळपासही न ठेवण्याचे दौलतरावाने मान्य केले. तसेच कोल्हापूरकर व पटवर्धन यांच्यात ऐक्य करून देण्याचीही जबाबदारी त्याने घेतली. करवीरकरांचा उपद्रव बंद पडल्याखेरीज भाऊ कारभारात मुक्तपणे लक्ष घालू शकत नव्हता. शिंद्याच्या मध्यस्थीने त्यांचा बंदोबस्त झाला तर तो भाऊला हवाच होता.


    अशा प्रकारे स. १७९९ चे सबंध वर्ष आपसांतील तंट्यात एकप्रकारे वाया गेले. कारण, भाऊ - नाना - तात्या या त्रिकुटाचे मेतकुट जमणं  हे बाजीरावास काही बरोबर वाटले नाही. खुद्द दौलतरावासही कारभारातील बाळोबाचे वाढतं प्रस्थ मंजूर नव्हतं. करवीरकर - पटवर्धन यांचा वैराग्नी कोणाच्याही मध्यस्थीने शमणारा नव्हता. शिंंदेशाही लष्करातील भांडणं महादजीच्या स्त्रिया स्वस्थ बसल्याने बंद पडणार नव्हती. हे सर्व सर्वांनाच माहिती असूनही प्राप्त स्थितीवर आपण तोडगा काढल्याच्या भ्रमात सारे होते आणि अशातच बातमी आली …. …. निजाम - इंग्रजांच्या संंयुक्त मोहिमेत टिपू सुलतानचा मृत्यू .  दि. ४ मे १७९९ रोजी झालेल्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू मारला गेला. या बातमीने पुणे दरबार तात्पुरता खडबडून जागा झाला. टिपू विरुद्धची मोहीम सुरु झाली कधी व संपली कधी हे त्यांना घरगुती बुद्धीबळाच्या खेळात समजलेच नाही व वेल्स्लीची धडाडीही उमगली नाही !
                                                                                                              


                                                                           ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: