गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ८ )


    बाजीरावाच्या मनधरणीने नाना अप्रत्यक्षपणे का होईना कारभारात आला. पेशव्याने आपल्या संरक्षणार्थ मुंबईला दोन इंग्रजी पलटणे पोसण्याचा उपद्व्याप चालवला असल्याचे त्यांस समजताच त्याने बाजीरावास त्या पलटणांचा करार रद्द करण्याची सुचना केली व पेशव्यानेही आपल्या कारभाऱ्याची सुचना लगेच अंमलात आणली.

    या काळातील घटनाक्रम ; बाजीराव, नाना, दौलतराव इ. महापुरुषांची कृत्ये ; अस्सल पत्रव्यवहार व त्यावरील इतिहासकारांचे स्वतःच्याच विधानांशी विसंगत असणारे निष्कर्ष वाचले कि, दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द म्हणजे निव्वळ ' गाढवांचा गोंधळ ' वाटू लागतो. नाना - बाजीराव एकमेकांना पाण्यातही पाहतात. स्वहित साधण्याकरता इंग्रजांच्या गळ्यांत गळे काय घालतात व परत लगेच एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमत होत एकत्र काय येतात. सारेच विचित्र ! 

    असो. तर दरबारी कट - कारस्थानात पेशवे - फडणीस मग्न असले तरी अधून - मधून त्यांची  नजर राज्यहिताकडेही वळत होती. परशुरामभाऊ कर्नाटकांत करवीरकरांशी लढण्यात गुंतल्यामुळे बाजीरावाने रामचंद्र परशुरामास निजाम - इंग्रजांच्या टिपूविरुद्ध मोहिमेत, आपल्या वतीने सामील होण्याची आज्ञापत्रे रवाना केली. परंतु , रामचंद्र श्रीरंगपट्टणच्या आसपास देखील पोहोचला नाही तोच टिपू मारला गेल्याची बातमीपत्रे पुण्यास येऊन थडकली. 

    इकडे इंग्रजांनी, टिपूच्या राज्याचे चार भाग करून पैकी ४४ लाखांचा प्रदेश म्हैसुरच्या मूळ राज्यघराण्याचा वंशज कृष्णराज वोडीयार यांस देऊन त्याची स्थापना केली. सात लक्ष सत्याहत्तर हजार उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांनी स्वतःकडे ठेवत निजामाला सहा लाखांचा प्रांत दिला व २ लक्ष ६३ हजार उत्पन्नाचा प्रदेश मोहिमेत सहभागी  होणाऱ्या पेशव्यास पुढील अटींवर देऊ केला :- 
१) करारात ठरल्याप्रमाणे पेशव्यांची फौज आमच्या मदतीस आली नाही. इतकेच नव्हे तर टिपू बरोबर आमचे युद्ध सुरु असताना पुणे दरबारने टिपूचा वकील आपल्या पदरी बाळगला. सबब वाटणी मागण्याचा त्यांस हक्क नाही.

२) परंतु , आम्ही पेशव्यांस दहा लक्ष रुपये उत्पन्नाचा मुलुख देऊन पण त्याकरता त्यांनी आमच्या खालील अटी मान्य केल्या पाहिजेत :-

(१) म्हैसुरच्या राजाकडून चौथाई मागू नये.
(२) निजामाप्रमाणे पेशव्यांनीही आमच्यासोबत तैनाती फौजेचा करार करावा.
(३) निजाम - पेशवे यांच्यात तंटा उद्भवल्यास आमच्या मध्यस्थीने निकाल व्हावा.
(४) परचक्र आले असता निजाम - इंग्रज - पेशवे यांनी एकमेकांना मदत करावी. या प्रकरच्या करारास नागपूरकर भोसले अनुकूल असतील तर त्यांनाही सहभागी करून घ्यावे.
(५) सुरत शहराच्या उत्पन्नात पेशव्यांचा जो हिस्सा आहे तो त्यांनी सोडून द्यावा. बदल्यात तितक्याच उत्पन्नाचा प्रदेश त्यांना दिला जाईल.
(६) पेशव्यांनी फ्रेंच लोकांना आपल्या राज्यात आसरा व सैन्यात नोकरी देऊ नये.           


    इंग्रजांच्या या अटींवर बाजीराव - नानाने पुढीलप्रमाणे उत्तरे कळवली :-
राज्यातील कलहामुळे मोहिमेस वेळेवर सैन्य पाठवता आले नाही. टिपूच्या वकिलाचे म्हणाल तर, दोन राज्यात युद्ध चालू असताना परस्परांचे दरबारी एकमेकांच्या वकिल असण्याचा जुनाच रिवाज आहे. त्याने वाटणीच्या हक्कास बाधा येत नाही.
(१) इंग्रज जो आम्हांला दहा लक्षांचा प्रांत देत आहेत त्याबदल्यात म्हैसुरवरील चौथाई सोडून देण्याचे आम्ही मान्य करतो.
(२) इंग्रजांची तैनाती फौज आम्ही जरूर बाळगू पण मग तिच्यावर हुकुमत आमची असेल व आम्ही सांगू त्या कामगिरीवर तिने गेले पाहिजे. आम्ही जंजिऱ्यावर मोहीम काढू तेव्हा या पलटणांना सोबत घेऊ.
(३) निजाम व आमच्यात काही तंटा उद्भवल्यास मध्यस्थीकरता इंग्रजांनी मध्ये पडण्याचे काहीच कारण नाही.
(४) एकमेकांच्या संरक्षणार्थ निजाम - इंग्रजांशी करार करायचा झाल्यास त्यात नागपूरकरांचा सहभाग कशाकरता हवा ? ते आमचे नोकर असल्याने आमच्या परवानगी खेरीज परराज्याशी करार करू शकत नाहीत.
(५) सुरत शहराच्या उप्त्न्नातील हिस्सा आम्ही सोडणार नाही.
(६) फ्रेंचांनी हिंदुस्थानवर स्वारी केल्यास त्यांना हाकलून लावण्यासाठी आम्ही इंग्रजांना मदत करू पण त्या जातीच्या लोकांना नोकऱ्या न देण्याची अट नामंजूर आहे.
 

[ महत्त्वाची नोंद :- म्हैसुर राज्याच्या वाटणीत नेमका किती लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याला मिळणार होता या संबांधी सरदेसाई आणि खरे यांच्यात एकवाक्यता नाही. खऱ्यांच्या माहितीनुसार दहा लाख रु. उत्पन्नाचा तर सरदेसाईंच्या मते २ लक्ष ६३ हजार रु. उप्त्न्नाचा प्रांत इंग्रजांनी पेशव्याला देऊ केला होता. ]         
    वरवर पाहता देखील या अटी बाजीरावाने मान्य करणे म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावणेच होतं. बाजीराव राजकारणात कितीही अनभिज्ञ असला तरी त्याला इंग्रजांच्या या अटींमागील कपटाची चांगलीच जाणीव होती. त्याने या अटी मान्य करण्याचे साफ नाकारले व पेशव्याच्या वाटणीचा मुलुख निजाम - इंग्रजांनी आपसांत विभागून घेतला. 


    इंग्रजांचे धोरण आक्रमक असले तरी नैतिकतेच्या बळावर ते आपले प्यादे पुढे दामटत होते. म्हैसुरच्या मूळ वोडीयार घराण्यास बाजूला सारून त्यांच्या पदरी लष्करी अंमलदार असलेल्या हैदरअलीने म्हैसुरची सत्ता बळकावली होती. पेशव्यांनी आजवर म्हैसुरवर इतक्या स्वाऱ्या केल्या पण त्यांना कधीही या वोडीयार घराण्याची वा त्यांच्या अधिकारांची आठवण झाली नाही. परंतु इंग्रजांनी या वोडीयार घराण्याची ढाल पुढे करून पुणेकरांना हात चोळत बसण्यास भाग पाडले. नानासाहेब पेशवा, थोरला माधवराव व पुढे नाना फडणीस या तीन शहाण्यांना जे जमले नाही ते वेल्स्लीने अल्पवधीत केले !  

    म्हैसूर युद्धांतील हातातून निसटलेला डाव भरून काढण्यासाठी बाजीरावाने निजामावर स्वारी काढण्याचा बेत रचला. जोडीला शिंद्याची पलटणे असल्याने त्याला निजामाची धास्ती बिलकुल नव्हती. परंतु , पेशव्याची राजकीय चाल ओळखून वेल्स्लीने निजामाला मदतीचे आश्वासन तर दिलेच पण त्या आश्वासन पत्राची नक्कलच त्याने पुणे दरबारास पाठवून दिल्याने बाजीरावाने आपले मनोरथ गुंडाळून ठेवले.


    इकडे कर्नाटकांत कोल्हापूरकरांनी रत्नाकरपंत राजाज्ञास पेशव्यांच्या प्रदेशात स्वारी करण्यास रवाना केले. पेशव्याच्या वतीने धोंडोपंत गोखले त्याच्याशी लढत होता. स. १७९८ च्या अखेरीस त्याने राजाज्ञास पिटाळून लावण्यात यश मिळवले असले तरी पेशव्याच्या आज्ञेने परशुरामभाऊ सातारचे प्रकरण उरकून कर्नाटकांत रवाना झाला. गोखल्याने राजाज्ञास चेपलेले पाहून सुरापूरकडची खंडणी गोळा करत तो मनोळीकडे येऊ लागला. रत्नाकरपंताचा यावेळी मनोळीस मुक्काम असून खुद्द करवीरकर छत्रपती शिवाजीराजे त्याच्या पाठपुराव्यासाठी तिकडे येत होते. याच काळात शिंदे बाया कोल्हापूरकर व पटवर्धन अशा दोन्ही ठिकाणी, आपणांस कोणाचा आश्रय मिळतो याची चाचपणी करत होत्या. पैकी, भाऊ कर्नाटकांत असल्याने त्याचा व बायांचा संबंध आला नाही आणि करवीरकरांची बायांशी प्रत्यक्ष भेट घडूनही त्यांची परस्परांना कसलीच मदत होऊ शकली नाही. उलट कोल्हापूरच्या शिवाजीने दौलतराव व नाना फडणीसकडे पटवर्धनांशी लढण्याकरता मदत मागितली. बायजाबाईच्या बापाची जहागीर कागल --- कोल्हापूरकरांच्या अखत्यारीत असल्याने दौलतरावाची चांगलीच पंचाईत झाली. इकडे नानालाही कोल्हापूरकरांची मागणी मान्य - अमान्य करणे जड गेले व त्याने भाऊला कोल्हापूरचा नाद सोडण्याचा सल्ला दिला. परंतु तिकडे साफ दुर्लक्ष करून भाऊ करवीरकरांवर चालून गेला.


     दि. १७ सप्टेंबर १७९९ रोजी पट्टणकुडीचा संग्राम घडून त्यात भाऊ मारला गेला. लढाईत त्याचे दोन्ही पुत्र पराभव होताच पळून गेले. भाऊ देखील पराभवाचा रंग पाहून निघाला असेल अशी त्यांची कल्पना होती पण तो गोटातच राहून त्याची छत्रपतींच्या शेलक्या सैनिकांशी झुंज होऊन त्यांत मरण आले. भाऊच्या निधनाने पेशव्याच्या राज्याला फार मोठा धक्का बसला असे काही नाही. तसेच करवीरकरांचाही मोठा लाभ झाला असेही नाही. परंतु, पुणे दरबारात आता नाना व तात्या दोघे एकाकी मात्र पडले हे निश्चित ! 
    परशुरामभाऊचा सूड घेण्याकरिता पेशव्याने पटवर्धनांच्या मदतीला मानाजी फाकडे, मालोजी घोरपडे, तोफखाना प्रमुख गणपतराव पानसे, विंचूरकर, पेठे, जाधव, पवार, नाना फडणीसची पथके व शिंद्याच्या काही पलटणी ब्राऊनरिंगच्या हाताखाली स. १७९९ अखेर पाठवल्या. स. १८०० च्या जानेवारीच्या उत्तरार्धात शिराळयाचे ठाणे काबीज करून पुण्याच्या फौजा पटवर्धनांच्यासह थेट कोल्हापूरास जाऊन भिडल्या. कोल्हापूरास हा संग्राम सुरू असताना पुण्यास वेगळ्याच घटना घडू लागल्या होत्या.

     स. १७९९ च्या नोव्हेंबरात इंग्रजांकडून वकील आले व त्यांनी पेशव्यास सांगितले कि, ' तुमच्या नावे इंग्रज बादशाहचे फर्मान आणले असून त्याचा स्वीकार करण्यासाठी पेशव्याने मुद्दाम बाहेर डेरे द्यावे. फर्मनास सामोरे जाऊन त्याच्या स्वीकृतीसाठी दरबार व फर्मानबाडीचा समारंभ करावा. फर्मान दरबारात हजर केले जाईल तेव्हा पेशव्याने उभे राहून त्याचा स्वीकार करावा व फर्मान स्वीकारल्यावर १०० तोफांची सलामी द्यावी.'  इंग्रजांच्या या मागणीवर बाजीरावाचे गोंधळून जाणे स्वाभाविक होते. पूर्व रिवाजांची त्यांस कल्पना नसल्याने त्याने याविषयी नानाचा सल्ला विचारला. तेव्हा नानाने त्यांस सांगितले कि, ' फर्मानबाडीचा समारंभ फक्त दिल्लीच्या बादशाह करिता होतो. तेव्हा इंग्रज बादशाह करता तो करण्याची गरज नाही. फर्मान दरबारात प्रवेशते त्या समयी पेशव्याने उभं राहावं अशी इंग्रजांची मागणी मान्य करण्याचे काही कारण नाही. पूर्वी थोरल्या माधवरावाचा काळात असेच फर्मान घेऊन मॉस्टीन आला. ते त्याने नेहमीच्या दरबारात पेशव्याच्या हाती दिले होते. तेव्हा यावेळी विशेष दरबार भरवण्याची गरज नाही. तसेच पेशवे दरबारात येण्यापूर्वी फर्मान घेऊन इंग्रजांनी दरबारात हजर राहावे व पेशव्यांनी तख्तनशीन होण्यापूर्वी पेशव्याकडे अथवा मुनशीकडे द्यावे. तसेच खुशाली करता तोफेचे १०० बार करण्याइतकी हि काही मोठी घटना नसल्याने नेहमीच्या प्रथेनुसार वीस बार करावेत. ' नानाने सांगितलेली उत्तरे पेशव्याने इंग्रजांस कळवली तेव्हा त्यांनी त्यांस अनेक आक्षेप घेतले खरे पण नानाने सुचवलेल्या शर्तींवरच त्यांना हा फर्मानाचा समारंभ दि. ७ जानेवारी १८०० रोजी पार पाडता आला. 

    टिपूच्या नाशाचे राजकीय परिणाम  काय झाले आहेत हे पेशव्यांच्या, विशेषतः हिंदुस्थानच्या तमाम संस्थानिकांना जाहीर व्हावेत याकरता इंग्रजांची हि फर्मानबाडीची धडपड होती. परंतु, नाना - बाजीरावने ती हाणून पाडली !


    स. १७९९ - १८०० च्या दरम्यान पुण्यात एक बातमी पसरली कि, ' अंगठीवरील हिरा काढून नवीन बसवायचा आहे. ' या बातमीला अफवा म्हणून इतिहासकारांनी दुर्लक्षित केले असले तरी तत्कालीन घटनाक्रम पाहता हि बातमी खरीच होती असे म्हणावे लागेल. खुद्द बाजीरावाचा याबद्दल असा समज झाला कि, अमृतरावाचा मुलगा विनायकराव यांस स. माधवाच्या पत्नीस दत्तक देऊन पेशवा बनवण्याचे कारस्थान चालले असून याचे सुत्रधार नाना, बाळोबा व अमृतराव हे तिघे आहेत. नाना व इतरांच्या संशयास्पद हालचाली पाहता बाजीरावाचा हा समज अवास्तव नव्हता असे म्हणणे भाग आहे. 

    स. १७९७ मधील भांबुर्ड्याच्या लढाईत जीव वाचवून पळालेल्या विठोजी - यशवंत या होळकर बंधूंचे सामार्थ्य यावेळी बरेच वाढले होते. यशवंतराव यावेळी माळव्यात प्रबळ झाला होता. होळकरांचे संस्थान दौलतरावाच्या कह्यात चाललेलं होळकरशाहीच्या जुन्या - जाणत्या निष्ठावान सरदार मुत्सद्द्यांना स्षष्ट दिसत होते. त्यांना यशवंतरावाच्या रूपाने नवा नेता मिळाला व त्याच्या नेतृत्वाखाली गोळा होऊन त्यांनी शिंद्याविरुद्ध लढा पुकारला. उत्तरेत ठिकठिकाणी आपला अंमल बसवत व शिंद्याच्या पलटणांचा समाचार घेत यशवंतराव होळकर घराण्याची एक प्रकारे पुनर्स्थापना करत होता. नाना फडणीसचा होळकर घराण्याला पूर्वीपासूनचा पाठिंबा होता. आता दौलतरावाची लष्करी घमेंड उतरवण्याचे सामर्थ्य यशवंतरावाकडे असल्याचे पाहून त्याने यशवंतरावला दक्षिणेत येण्याचे आमंत्रण दिले. 


    इकडे दक्षिणेत विठोजी होळकरही अमृतरावाच्या नावाने धुमाकूळ घालत होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी पेशव्याच्या प्रदेशाची धूळदाण उडवण्यास सुरवात केली. त्याच्या बंदोबस्तासाठी बाजीरावाने रवाना केलेले कित्येक सरदार एकतर पराभूत झाले वा त्यालाच जाऊन मिळाले. खुद्द शिंद्याचेही पगार न मिळालेले काही सरदार विठोजीच्या गोटात दाखल झाले. विठोजीचा हा सारा उपद्व्याप अमृतरावाच्या नावाने चालला होता व अमृतराव नानाला सामील असल्याने बाजीराव काळजीत पडणे स्वाभाविक होते. 

    आपल्या विरोधात चाललेली कट - कारस्थानं हाणून पाडण्यासाठी त्याने दौलतरावाकडे सर्जेरावास कैदेतून सोडण्याची गळ घातली. परंतु, सर्जेरावास बंधमुक्त करण्यास बाळोबा तयार नव्हता. तसेच सर्जेरावास मोकळे केल्यास महादजीच्या स्त्रिया बिथरण्याचा संभव असल्याने मनात असूनही सर्जेरावास मोकळे करण्याची दौलतरावाची हिंमत होत नव्हती. तेव्हा पेशव्याने त्यांस मसलत सुचवली. त्यानुसार बापाला कैदमुक्त करावे म्हणून बायजाबाईने अन्नत्याग केला. तेव्हा बायको उपाशी असताना आपण कसे जेवायचे म्हणून दौलतरावानेही उपोषणास आरंभ केला. कारभाऱ्याच्या दुराग्रहाने धनी - धनीण उपाशी राहू लागले हा प्रवाद टाळण्याकरता दि. ४ जानेवारी १८०० रोजी बाळोबातात्याने सर्जेरावास मोकळे केले. महापराक्रमी सर्जेरावाने कैदेतून सुटका होताच बाजी व दौलतरायासमोरील संकटांचे निवारण करण्यास आरंभ केला.

    दौलतरावाच्या विरोधी पक्षाचे बलस्थान म्हणजे यशवंतराव होळकर. तूर्तास तो दृष्टीआड असल्याने आपल्या जवळचे जे त्यांस पटकन अनुकूल होतील असे म्हणजे --- कारभारी मंडळ व महादजीच्या स्त्रिया ! पैकी महादजीच्या स्त्रियांचे शिंद्यांच्या लष्करावरील वजन सर्जेरावाने चांगलेच अनुभवले असल्याने त्याने थेट महादजीच्या बायकांनाच मारण्याचे ठरवले. त्यानांच जर नाहिसे केले तर प्रसंग पडला असता लष्कर कारभारी मंडळींच्या विरोधात दौलतरावाच्याच पाठीशी उभा राहील अशी त्याची अटकळ होती. त्यानुसार दि. १४ जानेवारी १८००  रोजी त्याने महादजीच्या स्त्रियांच्या छावणीवर भल्या पहाटे हल्ला केला. पण स्त्रिया सावध असल्याने सर्जेरावाचा डाव फसला व हल्लेखोरांना झोडपत महादजीच्या स्त्रिया बचावून बाहेर पडल्या. 


    सर्जेरावाच्या या कृत्याने बाळोबा वगैरे मंडळी हादरून गेली. खुद्द शिंद्याचा कारभारी बाळोबा तात्या जीवाच्या भीतीने दरबारी जायचा बंद झाला. सर्जेराव कधीही आपणांस दगा देईल म्हणून धरणे बसविण्याच्या निमित्ताने त्याने सरदार - शिलेदार जवळ बाळगले व दौलतरावास निरोप पाठविला कि, ' मी कारभार करत नाही. पाहिजे तर मला कैद करा वा निरोप द्या ! ' तेव्हा चार मध्यस्थांच्या मदतीने दौलतरावाने बाळोबाची समजूत काढली व त्यांस कारभारावर येण्यास भाग पाडले. प्रसंग पाहून बाळोबाने दौलतरावाची मर्जी राखली पण अंतस्थरित्या त्याने परशुरामभाऊच्या मुलाला --- रामचंद्रआपास सावधतेच इशारा दिला. रामचंद्र त्यावेळी शिंद्यांच्या व पुणे दरबारच्या सरदारांच्या मदतीने कोल्हापूर मोहिमेत व्यस्त होता. अजून तरी करवीर आघाडीवर सर्जेरावाची नजर पडली नव्हती. अशा स्थितीत जानेवारी उलटून गेला व फेब्रुवारीत नाना फडणी
तापाने आजारी पडला. त्याचा ताप वाढत जाऊन दि. १३ मार्च १८०० रोजी त्याचे निधन झाले !
                                                                                  ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: