शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ९ )


    ता. १३ मार्च १८०० रोजी नानाचे निधन होऊन पेशवाईतील एका कर्तबगार व्यक्तीच्या युगाची इतिश्री झाली. अंगची उपजत बुद्धिमत्ता व प्रसंगावधान वृत्ती यांमुळे पहिल्या तीन पेशव्यांनी एकत्रित मिळून जे कार्य केले ते एका नाना फडणीसने आपल्या एकाच आयुष्यात करून दाखवले. त्याचे दुर्दैव असे की, त्याची परंपरा चालवणारा योग्य वारस त्यांस न मिळाल्याने त्याची सर्व मेहनत, शहाणपण फुकट गेले. असो, नानाच्या मृत्यूनंतर दौलतरावाचा उत्तरेत जाण्याचा रस्ता मोकळा झाला तर बाजीरावाचा निर्वेधपणे राज्यकारभार करण्याचा ! 

    नानाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या द्रव्य संचयावर नजर ठेवून दौलतरावाने पेशव्याकडे अशी मागणी केली कि, ' नानाकडे आमचे एक कोट रुपये येणे बाकी असल्याने त्याचे कुटुंब व मालियत आमच्या हवाली करण्यात यावे.' परंतु, हि गोष्ट बाजीरावाने घडून दिली नाही. नानाच्या स्त्रीला त्याने शनिवारवाड्यावर बंदोबस्ताने ठेवले. नानाच्या पत्नीला दत्तक देऊन त्याच्या फडणीशीचा दरक पुढे चालू ठेवावा या मताला अमृतरावाचा पाठिंबा होता तर बाजीरावाला मोरोबास फडणीशी द्यायची होती. मात्र, त्याबदल्यात भल्या मोठ्या नजराण्याची अपेक्षा बाजीराव - दौलतराव बाळगत होते व ती पुरी करण्याचे मोरोबात सामर्थ्य नसल्याने हि गोष्ट एवढ्यावरच थांबली. अमृतराव हा नानाच्या पक्षातील असला तरी आपला भाऊ आहे व आता नानाच्या माघारी तो आपल्या विरोधात काय खटपट करणार या भावनेने पेशव्याने त्यांस दिवाणगिरी दिली. 

    अमृतराव कारभारावर आला खरा पण बाजीरावाचा कारभार काही सुरळीत चालण्याची चिन्हे दिसेनात. सर्जेराव मोकळा झाल्याने बाळोबा व त्याच्या पक्षियांच्या मनात भीती भरली होती. परंतु, त्यांना उभारी मिळेल अशा काही घटनाही घडू लागल्या होत्या. आगऱ्याचा सुभेदार लखबादादा लाड हा महादजीच्या स्त्रियांचा पक्षपाती असून प्रसंग पडल्यास कुमक करण्यास आपण तयार असल्याचे त्याने बाळोबाला कळवले होते. तिकडे यशवंतराव होळकर उत्तरेतील शिंद्यांचा अंमल उखडून काढत होता. प्रसंगी त्याची मदत घेण्याचीही महादजीच्या स्त्रियांची तयारी होती. यशवंतराव, लखबादादा यांचा भक्कम आधार मिळण्याची --- विशेषतः लखाबादादाचा पाठिंबा असल्याची खात्री पटताच बाळोबाने अमृतरावास हाताशी धरून नानाचा डाव पुरा करण्याचे ठरवले. त्यानुसार, सर्जेरावाला कैदेत टाकून बाळोबा दौलतरावास घेऊन उत्तरेत जाणार होता तर अमृतरावाने बाजीरावास रगडून राज्यकारभार करायचा होता. बेत उत्तम होता. नानाचे बव्हंशी पक्षपाती अमृतरावास रुजू झाले होते. खेरीज, बाजीरावाचेही आरंभी त्यांच्या विषयी मन बरेचसे साफ होते. त्यामुळे बाळोबा - अमृतरावास आपली मसलत रचण्यास बरीच अनुकूल स्थिती व सवड प्राप्त झाली. परंतु, त्यांच्या मसलतीला धक्का पोहोचवू शकेल असा एक वजनदार इसम यावेळी कार्यरत होता व तो म्हणजे सर्जेराव घाटगे ! 

    कैदेतून सुटका झाल्यावर व महादजीच्या स्त्रियांच्या छावणीवर छापा घालून झाल्यावर सर्जेरावाचे खांदे नवीन कामगिरी पेलण्यासाठी फुरफुरत होते. सर्जेरावाची उपद्रव क्षमता बाळोबा - अमृतरावास परिचित असल्याने त्यांनी सर्जेराव - दौलतरावाचे बलस्थान असलेल्या पलटणांमध्ये फितुरी करण्यास आरंभ केला. परंतु, त्यांचे हे प्रयत्न फार काळ गुप्त न राहता कर्णोपकर्णी  बाजी - दौलत - सर्जे या ' त्रिरावांना ' कळाले. तेव्हा या फितुरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पेशव्याने अलिजाबहाद्दरांवर सोपवली. त्यानुसार अलिजाबहाद्दरांनी बाळोबातात्याची भेट घेऊन त्याच्या पायांवर डोकं ठेवून दौलतीच्या रक्षणाची विनंती करण्याचे कपटनाट्य केले. परंतु, तात्या सर्व लबाड्या ओळखून असल्याने त्याने, ' आपले आता वय झाले. महायात्रेस पाठवा, कैद करा किंवा जवळ ठेवा. आपली काही हरकत नाही व कारभाराची इच्छा नाही.' असे सुनावले.

    यानंतर उत्तरेतून लखबाने जयपूरवर स्वारी करून तेथून खंडणी घेतल्याची बातमी आली. त्याप्रीत्यर्थ दौलतरावाने आपल्या तळावर दरबार भरवून त्यात बाळोबाला अटक केली व कोल्हापुरास आपल्या पलटणांना रामचंद्र पटवर्धनास कैद करण्याचा हुकुम सोडला. परंतु, दौलतरावाची आज्ञा करवीराला पोहोचण्यापूर्वीच पुण्यातील बदलाचे वारे रामचंद्र आप्पाच्या गोटावर येऊन थडकल्याने सावध रामचंद्र पटवर्धन जमखिंडीला निघून गेला. त्यामुळे शिंद्यांची पलटणे करवीरचा वेढा उठवून माघारी वळली. परंतु, मध्येच पेशव्याने मिरजेचे ठाणे पटवर्धनांच्या ताब्यातून काढून घेण्याची त्यांस आज्ञा केल्याने त्यांची धाड तिकडे सरकली खरी पण, पटवर्धनांच्या शिपाईगिरीपुढे त्यांची मात्रा न चालल्याने ती पुण्यास निघून आली. 

    इकडे सर्जेरावाच्या मदतीने दौलतरावाने बाळोबातात्याच्या समर्थकांना कैद करून तुरुंग वा आसमान दाखवण्यास आरंभ केला. जिवबादादा बक्षीचा मुलगा नारायणराव यांस अंगी बाण बांधून उडवण्यात आले. काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आले तर काहींच्या डोक्यांत मेखसू घालण्यात आले. ज्या शेणवी वीरांनी महादजीच्या पडत्या काळात देखील त्यांस साथ देऊन त्याची चाकरी निष्ठेने बजावली. त्यांची दौलतरवाने सासऱ्याच्या संगतीने अशी दुर्दशा करून टाकली !    

    दौलतराव आपल्या दौलतीचा खेळ करत असताना बाजीरावाचा ' धडपडी ' राज्यकारभार रडतखडत चालला होता. अमृतराव आपल्या विरोधात कारवाया करत असल्याचे पाहून त्याने प्रथम नानाच्या समर्थकांकडे आपली दृष्टी वळवली. नानाच्या पत्नीस दत्तक देण्याच्या मुद्द्यावर चर्चेकरता म्हणून नानाच्या पक्षपात्यांना पेशव्याने शनिवारवाड्यावर बोलावले व कैद केले. त्यामुळे अमृतरावाचा पक्ष अगदीच हलका पडला. तेव्हा बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेऊन त्याने पेशव्याकडून स्वतंत्र जहागीर घेऊन पुण्यातून निघून जाण्याची खटपट आरंभली व पेशव्यानेही त्याची मर्जी रक्षून सात लाखांचा सरंजाम त्यांस नेमून देण्याचे मान्य केले. तसेच याच वर्षीच्या जून महिन्यात त्याने अमृतरावाच्या ऐवजी बाळोजी कुंजरला आपली दिवाणगिरी देऊन राज्य्कारभारातून अमृतरावास एकप्रकारे निवृत्त करून टाकले.  

    अशा प्रकारे राजधानीतील प्रमुख उपद्व्यापी गृहस्थांचा बरा - वाईट बंदोबस्त केल्यावर पेशव्याने आपले लक्ष शिंदे प्रकरणात घातले. बाजीरावाचे स. १८०० पर्यंतचे वर्तन पाहता एखाद्या राज्यकर्त्या प्रमाणे ते संधिसाधू असल्याचे दिसून येते. नाना हयात असेपर्यंत त्याने शिंद्याला जवळ केले. नाना मरण पावल्यावर व त्याच्या समर्थकांना जाग्यावर बसवल्यावर पेशव्याने मधल्या काळात शिंद्याचे वाढलेले महत्त्व कमी करण्याचा उदयोग हाती घेतला. भांबुर्ड्याच्या लढाईत मरण पावलेल्या मल्हारराव होळकराची पत्नी व मुलगा पुण्यातील कुंट्यांच्या वाड्यात होते. यशवंत आणि विठोजी होळकराने काशिरावाच्या पर्यायाने दौलतरावच्या विरुद्ध शस्त्र उपसल्याने दौलतराव किंवा काशिराव त्यांना दगा करण्याची दाट शक्यता होती आणि काशिरावाने तसा एक प्रयत्नही केला होता. तेव्हा बाजीरावाने त्यांना तेथून हलवून आपल्या वाड्यात बंदोबस्ताने ठेवण्याची तजवीज केली. अर्थात, यामागे राजकीय हेतूही होते. यशवंतरावाचा बंडावा - मल्हाररावाच्या म्हणजे खंडेराव होळकराच्या नावाने चाललेला असून तो काशिराव होळकरास जुमानत नव्हता. तेव्हा प्रसंगी होळकरांच्या गादीचा वारस आपल्या हाताशी असणे केव्हाही चांगले असा व्यावहारिक विचार पेशव्याने केला व अंमलात आणला हे उघड आहे.

    अशा प्रकारे हळूहळू शिंद्याचे महत्त्व पुणे दरबारातून कमी करण्याच्या प्रयत्नात पेशवा असताना तिकडे कर्नाटकांत वेगळ्याच हालचाली घडू लागल्या होत्या. कर्नाटकांत धोंडजी पवार उर्फ वाघाचे बंड यावेळी अतोनात माजले होते. स. १७७५ पासून धोंडजी वाघ हा कर्नाटकच्या राजकारणातील एक महत्त्वाचे प्रस्थ मानले जात होते.  टिपूचा पाडावानंतर कर्नाटकातील पूर्वीची अस्थिरता जाऊन तिथे इंग्रजांची स्थिर राजवट रुजू पाहत होती. त्यांचे शेजारी असलेले करवीरकर त्यांना दबून राहू लागले होते तर निजाम त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला. अशा स्थितीत कोणाचीच ताबेदारी न मानवणाऱ्या वाघाने इंग्रजांच्या विरोधात बंड उभारणे यात नवल नव्हते. वाघाचा बंदोबस्त करणे इंग्रजांना फारसे अवघड नव्हते पण कर्नाटकातील विचित्र राजकीय परिस्थितीने वाघाचा प्रश्न काहीसा किचकट बनला होता.

    दीर्घकाळ कर्नाटकांत वाघाचा वावर असल्याने टिपू, करवीरकर, पुणे दरबार, पटवर्धन, निजाम इ. सोबत त्याचा कधी ना कधी बरा - वाईट संबंध आलेलाच होता. टिपूचे राज्य इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर त्यांना वाघा सारख्यांचा आपल्या राज्यातील वावर मानवणे शक्यच नव्हते. बरे, वाघ काही संस्थानिक नव्हता. त्यामुळे पाठीवर बिऱ्हाड असणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम काढल्यास वाघ कोल्हापूर वा पेशव्याच्या प्रदेशात शिरण्याची  शक्यता होती व तसे घडल्यास इंग्रजांसाठी अडचणीचा प्रसंग उद्भवणार होता. कारण, वाघाच्या पाठीवर पेशव्यांच्या वा करवीरकरांच्या राज्यात त्यांना शिरता येणार नव्हते व वाघाला पुणे अथवा कोल्हापूर दरबारचा आश्रय मिळणेही त्यांना परवडणारे नव्हते.

    या विचित्र परिस्थितीतून सेनापती ऑर्थर वेल्स्लीने हुशारीने मार्ग काढला व परिस्थितीनेही त्याला हात दिला. परशुरामभाऊ कोल्हापूरकरांशी लढत असताना धोंडोपंत गोखल्याने वाघाला कर्नाटकातून पिटाळून लावले. तेव्हा तो करवीरकरांच्या आश्रयास गेला. तिथे फौजांची उभारणी करून व परशुरामभाऊ मारला गेल्याचे पाहून तो पटवर्धनांच्या मुलखात लुटालूट करू लागला. पटवर्धनांचा मुलुख म्हैसूर व कोल्हापूरकरांना लागून असल्याने गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीने आपल्या भावाला --- ऑर्थरला पटवर्धनांच्या मदतीने वाघाचा बंदोबस्त करण्याचा हुकुम दिला. वास्तविक पटवर्धनांची मदत इंग्रजांना मिळाली काय व न मिळाली काय, दोन्ही सारखेच. परंतु, पटवर्धनांना सोबतीला घेऊन इंग्रजांनी पुणेकरांविरुद्ध आपले जाळे विणायला आरंभ केला हे निश्चित ! गव्हर्नर जनरलच्या आदेशान्वये ऑर्थरने परशुरामभाऊच्या मुलांना व भाऊबंदांना आपल्या मदतीस बोलावले आणि वाघाची मोहीम संपल्यावर कोल्हापूर स्वारीसाठी मदत कार्नायचे आश्वासन दिले. खेरीज, या काळात पटवर्धनांच्या प्रांतांमध्ये शिंद्यांची पलटणे असल्याने इंग्रजांशी मतलबी जवळीक करणे पटवर्धनांच्याही फायद्याचे असल्याने त्यांनी वाघाच्या स्वारीसाठी इंग्रजांना मदत करण्याचे ठरवले.
पटवर्धनांप्रमाणेच धोंडोपंत गोखल्याचाही सरंजामी मुलुख कर्नाटकांत असल्याने त्यानेही वाघाविरुद्धच्या मोहिमेत इंग्रजांना सक्रीय मदत केली. परंतु या कामासाठी या दोन्ही सरदारांनी पेशव्याची आज्ञा घेतली होती का, हा प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहतो. कारण , वाघ जर पेशव्याच्या मुलखांत शिरला तर इंग्रज पलटणी त्याच्या पाठीवर येणार व हि सरळ सरळ पेशव्याच्या राज्यात इंग्रजांची घुसखोरी ठरणार होती. तसेच बाजीरावाचा यावेळी वाघाला अंतस्थ पाठिंबा होता कि काय याचाही खुलासा होत नाही. असो, स. १८०० च्या उन्हाळ्यात इंग्रजांची धोंडजी वाघाविरुद्ध मोहीम सुरु होऊन त्यांत टप्प्याटप्प्याने गोखले व पटवर्धन सहभागी झाले. या मोहिमेच्या आरंभी वाघाचा जोर अधिक होता. जूनच्या अखेरीस डवगीनाला येथे वाघाने छापा मारून धोंडोपंत व त्याचा पुतण्या आप्पा गोखले यांना ठार करून त्यांच्या पथकाची नासाडी केली. आप्पा गोखलेचा धाकटा भाऊ बापू हा जखमी अवस्थेत इंग्रजांच्या आश्रयास निघून गेला. त्यानंतर पटवर्धन, गोखले व इंग्रजांनी लष्करी डावपेचांच्या बळावर वाघाची कोंडी करत दि. १० सप्टेंबर १८०० रोजी नंदिहाळ येथे गाठून ठार केले.

    धोंडजी वाघाची मोहीम पेशवाईच्या इतिहासांत विशेष स्थान मिळवण्याइतपत महत्त्वाची नसली तरी या मोहिमेच्या निमित्ताने ज्या राजकीय शह - प्रतिशहांचे खेळ खेळण्यात आले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. गोखले व पटवर्धन इंग्रजांच्या मदतीकरता कर्नाटकांत गुंतलेले असताना इकडे पुण्यात बाजीराव व सर्जेराव यांच्यात वैमनस्य निर्माण होऊ लागले होते. बाजीरावाला राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती हवी होती तर सर्जेराव त्यांस आपल्या पंखाखाली आणू पाहत होता. बाजीराव शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्याचा उपयोग आपले आसन बळकट करण्यासाठी करतोय हे तर उघड गुपित होते. तेव्हा या बदल्यात पेशव्याने आपल्यास तशीच काहीतरी मोठी बक्षिसी द्यावी अशी सर्जेरावाची रास्त अपेक्षा होती व ते इनाम देखील त्याने निश्चित केले होते. पटवर्धनांना पेशव्यांनी आजवर जो काही सरंजामी मुलुख दिला होता तो सर्वच्या सर्व शिंद्यांना मिळावा अशी त्याने बाजीरावाकडे मागणी केली. बाजीरावास सर्जेरावाची हि अवास्तव मागणी बिलकुल पसंत पडली नाही. पटवर्धनांच्या विषयी जरी त्यांस विशेष ममत्व वाटत नसले तरी शिंद्याचे वर्चस्व दक्षिणेत वाढणे आपल्यास घटक ठरेल हे तो ओळखून होता. त्याने सर्जेरावाच्या मागणीला सरळ झिडकारून लावले तेव्हा लष्करी बळावर पटवर्धनांचा प्रदेश हस्तगत करण्याची भाषा सर्जेराव बोलू लागला. परिणामी, शिंद्यांच्या --- विशेषतः सर्जेरावाविषयी बाजीरावाचे मन साशंक बनले व सर्जेरावाची घमेंड उतरवण्याकरता त्याने इंग्रज रेसिडेंट पामरचा पदर धरला. 

    पुण्यातील राजकीय हालचालींवर गव्हर्नर जनरलचे बारीक लक्ष होतेच. त्याने पामर व ऑर्थर वेल्स्ली मार्फत असे ठरवले कि, शिंद्याने पेशव्याला कैद केले वा तो आपणहून बाहेर पडला तर ऑर्थरने थेट पुण्याच्या दिशेने चाल करावी. पेशव्याच्या मदतीकरता पुणे दरबारच्या सरदारांचे मन वळवण्याची जबाबदारी पामरने पार पाडावी. त्यानुसार पेशव्याच्या संरक्षणास्तव पुण्यात एका गुप्त मंडळाची स्थापना करण्यात येऊन त्याचे अध्यक्षपद अमृतरावास देण्यात आले. खेरीज या मंडळात बाळोजी कुंजर, सदाशिव माणकेश्वर, गोपाळराव मुनशी, सय्यद बडेखान इ. गृहस्थांचा समावेश होता. यांनी पारी फौजा बाळगून प्रसंगी इंग्रजांच्या मदतीने शिंद्यांचा काटा काढायचा असे ठरवण्यात आले. आता फक्त शिंद्याने बाजीरावाला कैद करणे वा त्याने पुण्यातून निघून जाण्याचेच बाकी राहिले होते.

    वास्तविक, पेशव्याच्या मदतीचे निमित्त करून पुणे दरबारावर आपले वर्चस्व लादण्याचा हा इंग्रजांचा एक प्रयत्न होता. या उपद्व्यापातून जर यदाकदाचित समस्त मराठी सरदारांशी युद्धप्रसंग करण्याची वेळ आली असती तर त्यांस तोंड देण्याची यावेळी इंग्रजांची बिलकुल तयारी नव्हती. केवळ लष्करी हालचाली व राजकीय डावपेचांच्या बळावर आपला डाव सिद्धीस नेण्याची खटपट ऑर्थरने आरंभली. त्यानुसार वाघाची मोहीम संपली तरी म्हैसूरला परत न जाता त्याने हुबळीस तळ ठोकून पटवर्धनांनाही त्याने जवळपास राहण्याची सूचना केली. खेरीज, निजामाच्या फौजाही परिंडा - राक्षसभुवनच्या दरम्यान आणून उभा करण्यात आल्या. इंगाजांच्या या हालचाली पाहून जाणत्यांची मने धास्तावली. खुद्द पटवर्धनांच्यातच यांमुळे बरीच खळबळ माजली.
इकडे बाजीरावाचे मात्र निराळेच ढंग सुरु होते. शिंद्यांच्या जबरदस्तीमुळे त्याने घटकाभर इंग्रजांचा आश्रय जरी घेतला असला तरी इंग्रजांची महत्त्वकांक्षा काय आहे, हे तो जाणून होता. त्यामुळे त्याने पुण्यातून आपला मुक्कामही हलवला नाही व शिंद्याबरोबरचा वादही निकरावर आणला नाही. उलट स्वतः दौलतरावाच्या छावणीत जाऊन त्याने त्याची गाठभेट घेतली व पेशव्याची स्वारी मुक्कामास परत निघाली असता त्याच्या अंबारीत बसून बाजीरावावर चवरी ढाळण्याचे काम दौलतरावाने केले. स. १८०० च्या ऑक्टोबर मधील या घटनेने इंग्रजांचे डोळे चांगलेच उघडले. इतक्या सहजासहजी आपणांस पुणेकरांवर शह बसवता येणार नाही याची त्यांना साफ जाणीव झाली. ऑर्थरचा हा अपमान ( ? ) कमी होता कि काय म्हणून बाजीरावाने त्यांस कळवले कि, वाघाची मोहीम संपली आहे. तेव्हा तुम्ही आमच्या राज्यातील फौजा आपल्या हद्दीत परत न्याल तर बरे होईल. बिचारा ऑर्थर ! निमुटपणे, मनातल्या मनात चरफडत आपल्या पलटणी घेऊन माघारी परतला. पेशव्याच्या या विश्वासघाताने ( ? ) संतापलेला पामर त्यांस शिव्यांची लाखोली वाहत बसला. 

    दुसऱ्या बाजीरावाच्या या कपटवृत्तीचा इंग्रजांनी चांगलाच अनुभव घेतल्याने त्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. पेशव्याला आपल्या अंकित करण्यापूर्वी शक्य तितके त्याचे सरदार आपल्या लगामी लावून घेणे वा त्यांना दुर्बल करून टाकण्याचे धोरण त्यांनी जाणीवपूर्वक अंमलात आणले. पटवर्धन व गोखल्याशी त्यांची मैत्री जुळली होतीच. खेरीज इतर किरकोळ सरदारांशी देखील त्यांनी घसट वाढवण्यास आरंभ केला. त्याचप्रमाणे पेशव्याचे मातबर समजले जाणारे व भविष्यात त्रासदायक ठरणाऱ्या गायकवाड, शिंदे, होळकर, भोसले इ. सरदारांनाही पेशव्यापासून अलग करण्याचे, दुर्बल करण्याचे प्रयत्न आरंभले. पैकी, होळकरी दौलतीचे वारस आपसांत व शिंद्याशी भांडत बसल्याने त्यांना त्यांची पर्वा नव्हती. शिंद्याचे प्रकरण थोडे वेगळे होते पण, तूर्तास तो यशवंतराव आणि महादजीच्या स्त्रियांशी लढण्यात गुंतलेला असल्याने त्याचीही फारशी तमा बाळगण्याचे इंग्रजांना कारण नव्हते. उलट दौलतरावाची अडचण वाढवण्याकरता त्यांनी महादजीच्या स्त्रियांना अंतस्थरीत्या चिथावणी देण्याचे कार्य पार पाडले. नागपूरकर भोसले पूर्वीपासूनच आपल्या पायांपुरते पाहत आल्याने त्यांच्याविषयी थोडे सावधगिरीचे धोरण इंग्रजांनी बाळगले. राहता राहिले गायकवाड ! तर सालबाईच्या तहापासून गायकवाड दरबारावर नियंत्रण मिळवण्याचे इंग्रजांचे प्रयत्न चाललेलेच होते. त्यांच्या या प्रयत्नांना बाजीराव पेशवेपदी येताच विशेष बळ प्राप्त झाले. गुजरातमधील पेशव्याच्या वाटणीचा जो मुलुख होता त्यावर नाना फडणीसचा पक्षपाती आबा शेलुकरची हुकुमत होती. नाना फडणीसला जेव्हा पेशव्याने शिंद्याच्या मार्फत कैद केले तेव्हा आबा शेलुकर गुजरातमध्ये होता. पेशव्याने गायकवाडांना अंतस्थरीत्या शेळूकराविरुद्ध चिथावणी दिली. गुजरातमधून पेशव्याचा पाय काढून टाकण्यास टपलेल्या गायकवाडांनी हि संधी दवडली असती तरच नवल होते. परंतु, स. १७९८ पासून १८०० पर्यंत -- हि दोन वर्षे आबाने गायकवाडांची डाळ बिलकुल शिजू दिली नाही. पण खुद्द त्याचा धनीच त्याच्या विरोधकांचा बनल्याने त्याचा नाईलाज होऊन त्यांस शस्त्र खाली ठेवावे लागले. शेलुकर - गायकवाडांच्या या तंट्यात बडोद्यात हात - पाय पसरण्यास इंग्रजांना बरीह सवड प्राप्त झाली. त्याखेरीज गायकवाड दरबार अंतर्गत भांडणांनी इतका पोखरुन निघाला होता कि, स. १८०२ च्या उत्तरार्धापर्यंत त्यांनी स्वखुशीने इंग्रजांचे जोखड मानेवर लादून घेतले. 

    स. १८०० च्या उत्तरार्धात दौलतराव शिंद्याने अखेर उत्तरेत जाण्याचा निर्णय एकदाशी घेऊन तो अंमलातही आणला. कारण, यावेळी उत्तरेत लखाबाने महादजीच्या स्त्रियांची बाजू घेऊन दौलतरावाच्या अंबूजी इंगळे व पेरॉं या सरदारांना अक्षरशः घाम फोडला होता. यशवंतराव होळकरही त्यांना सामील होण्याचा रंग दिसू लागला होता. जरी यशवंतराव त्यांना सामील झाला अथवा नाही तरी स्वतंत्रपणे तो दौलतरावाच्या विरोधात कारवाया करतच होता. अशा स्थितीत फार काळ दक्षिणेत राहणे म्हणजे आजवर पूर्वजांनी कमावलेली सर्व दौलत  गमावण्यासारखेच होते, हे ओळखून दौलतरावाने पुण्यातील आपला मुक्काम आटोपता घेतला. मात्र,  आजपर्यंत बाजीरावाच्या रक्षणास्तव जो पुण्यात तळ ठोकला होता, त्याचा संपूर्ण खर्च देण्याची रास्त मागणी त्याने पेशव्याकडे केली. बाजीराव शिंद्यांचे किती पैसे देणे लागत होता याची स्पष्टता होत नसली तरी त्याने शिंद्याला बरीचशी रक्कम पोहोचवली असून उर्वरित ४७ लाख रुपयांच्या बाकीसाठी त्याने १० लाखांची वराता गायकवाड व १२ लाखांची बुंदेलखंडाच्या सुभेदारावर लिहून दिली आणि उर्वरित २५ लाखांची पुण्यातील सावकारावर नेमली. जर पुण्याच्या सावकारांनी वेळेत पैसे दिले नाही तर त्यांच्याऐवजी राज्याच्या खजिन्यातून शिंद्याला पैसे देण्याचे पेशव्याने मान्य केले. या २५ लाखांच्या वसुलीसाठी दौलतरावाने सर्जेरावास पुण्याला ठेवले व  मल्हारराव होळकराचे कुटुंब आपल्या ताब्यात घेतले. या दोन्ही गोष्टी घडू नयेत याकरता पेशव्याने बराच त्रागा केला पण दौलतरावाने त्यांस बिलकुल दाद दिली नाही.

    दौलतराव पुण्यातून निघून गेल्यावर पेशव्याने आपले लक्ष विठोजी होळकर व त्याच्या सहाय्यकांवर केंद्रित केले तर याच वेळी सर्जेरावाने परतत एकदा कर्नाटकातील पटवर्धनांचा सर्व सरंजामी मुलुख शिंद्यांच्या नावे करण्याची पेशव्याकडे मागणी केली. नेहमीप्रमाणे बाजीरावाने घाटग्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत विठोजीच्या प्रश्नाकडे लक्ष पुरवले. स. १८०० च्या उत्तरार्धात पेशव्याकडून स्वतंत्र जहागीर पदरात पाडून पुण्यातून बाहेर पडलेल्या अमृतरावाने होळकर बंधूंना, महादजीच्या स्त्रियांना अंतस्थरित्या हाताशी धरून राज्यातील शिंद्याचे महत्त्व कमी करण्याचा व पेशव्याचे मुख्य कारभारीपद मिळवण्याचा खटाटोप आरंभला होता. त्यानुसार दक्षिणेत विठोजी होळकराने अमृतरावाच्या नावाने किल्ले व ठाणी ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्याला होळकरशाहीतील जिवाजी यशवंत, मोत्याजी गावडा यांची व खुद्द बाजीरावाचा सरदार बाळकृष्ण कानडेची सक्रीय मदत होती. त्यांच्या मदतीने विठोजीने करकुंब, सोलापूर, पैठण, पंढरपूर, मंगळवेढा एवढ्या टापूत  धुमाकूळ घातला होता. तेव्हा पेशव्याने  त्रिंबक पुरंदरे, यशवंतराव पानसे व बापू गोखले यांना विठोजीचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली. 

    इकडे दक्षिणेत विठोजी पेशव्याच्या सरदारांविरुद्ध लढत असताना उत्तरेत यशवंतराव शिंद्याच्या व काशिरावच्या पलटणांशी झुंजत होता. दौलतरावाने आपले बव्हंशी अनुभवी सरदार कैद वा ठार केल्याने व उर्वरित गृहकलहात गुरफटल्याने यशवंतरावाच्या गनिमी हल्ल्यांना तोंड देणे दौलतरावाच्या कवायती पलटणांना जड जाऊ लागले. दक्षिणेतील विठोजीचा जोर व उत्तरेतील यशवंतरावाची चढती कमान पाहून काशिरावाने यशवंतरावासोबत वाटाघाट आरंभली व आपल्या नवे कारभार करण्याची तोड सुचवली. इतकेच नव्हे तर तो यशवंतरावाला सामील होण्याकरता महेश्वरी निघून गेला. काशिरावाने पक्ष बदल केल्याचे पाहताच बाजीरावाने त्यांस निक्षून आज्ञा केली कि, त्याने तातडीने शिंद्याकडे परत जावे. परंतु काशिरावाने पेशव्याची आज्ञा दुर्लक्षित केली तेव्हा पेशव्याने कठोर शिक्षेचे पाऊल उचलत काशिराव होळकराचा सर्व सरंजाम जप्त केल्याचे जाहीर करून आधीच्या अस्थिर राजकीय स्थितीत आणखी एका गोंधळाची भर घातली. बाजीरावाचा या आज्ञेचा परिणाम म्हणजे होळकरशाहीतील जे सरदार अद्याप यशवंतरावास सामील झाले नव्हते, ते देखील त्यास जाऊन मिळाले. 

    दौलतराव राजकारणात कितीही अननुभवी असला तरी काशिरावाचा सरंजाम जप्त होऊन पेशव्याचा पक्ष बळावणे त्यांस धोक्याचे वाटत होते. त्याने स्वतःहून पुढाकार घेत यशवंतरावा बरोबर समेटाची बोलणी आरंभली. ' खंडेरावास तुमच्या ताब्यात देतो व पेशव्यांकडून तुमच्या सरदारीचा बंदोबस्त करून देतो ' अशा आशयाचा निरोप त्याने यशवंतरावास पाठवला. दौलतरावाच्या या समेटाच्या भाषेने शिंदे - होळकरांचा संघर्ष पूर्णतः नसला तरी काही प्रमाणात थंडावला.

    याच सुमारास इकडे पुण्यात काही वेगळ्याच घटना घडू लागल्या होत्या. दौलतराव व बाजीराव होळकर बंधूंच्या बंदोबस्तात गुंतल्याचे पाहून सर्जेरावाने कर्नाटक प्रांत हाताखाली घालण्यासाठी उचल खाल्ली. पेशव्यावर जबरदस्ती करून त्याने पटवर्धन, रास्ते,गोखले इ. सरदारांच्या नावे असलेला कर्नाटकांतील सरंजामी प्रांत शिंद्यांच्या नावे करून घेतला व त्यावर अंमल बसवण्याकरता तो स्वतः आपल्या पलटणांसह तिकडे निघाला. जोडीला त्याने करवीरकरांची फौजही मागून घेतली. सर्जेरावाची स्वारी पुण्यातून बाहेर पडताच पेशव्याने पटवर्धन प्रभूती सरदारांना परिस्थितीची कल्पना देऊन सर्जेरावाजवळील सनदांना न जुमानण्याची सूचना करत कर्नाटकची सुभेदारी बाळोजी कुंजीरच्या नावे केली व कुंजीराचा अंमल बसवून देण्याकरता घाटग्याशी लढण्याची उपरोक्त सरदारांना आज्ञा केली.  

    यावेळी बापू गोखले हा पानसे व पुरंदरेच्या सोबत विठोजीच्या पाठीवर होता. या त्रिवर्ग सरदारांना पाठीशी घेऊन विठोजी कर्नाटकांत शिरणाऱ्या सर्जेरावच्या पलटणांवर चालून जाण्याच्या विचारांत होता पण, एकाच वेळी पेशव्याचे सरदार व शिंद्यांच्या पलटणांशी लढणे आपल्या आवाक्याबाहेरचे असल्याचे ओळखून त्याने तूर्त सर्जेरावाचा नाद सोडून बाजीरावाच्या सरदारांवर शस्त्र उपसले. बाजीरावाचे सरदार विठोजी व त्याच्या मदतनीसांचा पाडाव करण्यासाठी रणावर मेहनत करत होते तर बाजीराव कपटनीतीचे शस्त्र वापरून विठोजीच्या सहाय्यकांत फूट पाडण्याचा उद्योग करत होता. त्यानुसार बळवंतराव नागनाथ मार्फत त्याने बाळकृष्ण कानडे व जिवाजी यशवंतचा भाऊ रघुनाथ यांना शपथपूर्वक अभयाचे इमान देऊन पुण्यास बोलावून कैद केले. पर्यायाने विठोजीचे तेवढेच बळ खचले. 

    तिकडे गोखले, पुरंदरे व पानश्याने दि. १३ मार्च १८०१ रोजी विठोजीच्या सहाय्यकांचा मंगळवेढ्यास पराभव केला. या संग्रामात विठोजी हजर होता कि नाही याची स्पष्टता होत नाही परंतु,मांडवगण येथे बापू गोखल्याने त्यांस कैद केल्याचा पाच्छापूरकर बखरीत उल्लेख असल्याचे बापूचे चरित्रकार सदाशिव आठवले लिहितात. असो, विठोजी व त्याच्या कबिल्याला कैद करून बापूने त्यांची रवानगी पुण्याला केली. विठोजी होळकर पुण्यास येताच पेशव्याने आपल्या अधिकारांत त्याचा निवाडा केला.


    पेशव्याच्या विरोधात बंड पुकारणे, पेशव्याच्या प्रदेशांत लुटालूट करणे इ. आरोपांची विठोजीस पुढीलप्रमाणे शिक्षा देण्यात आली :- बापूने विठोजीला बेड्या घालून पुण्यास पाठवले होते. तेव्हा त्यांस शिक्षा करताना प्रथम बेडी काढण्यात आली. नंतर दोनशे कमच्या मारण्यात आल्या. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर हत्तीच्या पायी त्यांस साखळदंडाने बांधण्यात येऊन हत्तीला पळवण्यात आले. परिणामी हत्तीच्या पायी विठोजीच्या देहाचा चोळामोळा झाला. हा सर्व प्रकार पेशव्याने आपल्या समोर शनिवारवाड्या समोरच्या पटांगणात मुद्दाम घडवून आणला. ( दि. १६ एप्रिल १८०१ )


    शिक्षेची अंमलबजावणी होऊन विठोजी मारला गेला तरी त्याचे प्रेत जवळपास चोवीस तास तसेच तिथे ठेवण्यात आले. विठोजीच्या पत्नीने पेशव्याकडे सती जाण्याची परवानगी मागितली असता ती नाकारत तिला व तिच्या मुलाला कैदेत टाकण्यात आले.


    विठोजी होळकरला बाजीराव पेशव्याने दिलेला देहदंड कोणत्याही पद्धतीने समर्थनीय तर नाहीच पण विठोजीचा अशा प्रकारे राजकीय खून करण्याने बाजीराव नेमके काय साध्य करणार होता हे समजायला मार्ग नाही. जर त्याचा हेतू अमृतराव व त्याच्या समर्थकांना दहशत बसवण्याचा होता तर तो सध्या होण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण, अमृतराव व त्याचे पक्षपाती फौजबंद असून त्या सर्वांचा समाचार घेण्याची शक्ती व कुवत बाजीरावात बिलकुल नव्हती. समजा, जर अमृतरावास दहशत घालायची होती तर एखाद्या मातबर सरदाराचा बळी का घेतला नाही ? कि बापाप्रमाणेच रक्षापुत्रांविषयी त्याचे मत होते ? परंतु, तसेही म्हणता येत नाही. कारण, महादजीच्या स्त्रिया उत्तर हिंदुस्थानी बंडावा करीत निघून गेल्या तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जात असल्याचे यशवंतराव होळकाराने पेशव्यास कळवले होते व पेशव्याने देखील उलट पत्री त्यांस हे कार्य लवकरांत लवकर उरकण्याची आज्ञा केली होती. या घटना स. १८०० मधीलच आहेत. दुसरे असे कि, विठोजीला अशा प्रकारची शिक्षा अखेर कोणत्या गुन्ह्यांकरता देण्यात आली ? गावं - धर्मस्थळांची लुट करणे हा जर गुन्हा असेल तर त्यापासून अलिप्त कोण राहिलं होतं ? खुद्द बाजीरावाच्या परवानगीने शिंद्याने पुण्यात याहून वेगळे काय केले होते ? पेशव्याविरुद्ध बंडावा करणे हा जर भयंकर मोठा अपराध मानला तर मग बाळाजी कानडे व रघुनाथ यशवंतला का हत्तीच्या पायी देण्यात आले नाही ? खुद्द दौलतराव शिंद्याने देखील अल्पकाळाकरता बाजीरावास कैद केले होते,त्या अलिजाबहाद्दरांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचेही रावबाजीस का धारिष्ट्य झाले नाही ? तिसरे असे कि, विठोजीला अशा प्रकारे दंड देण्याची मुख्य कल्पना कोणाची ? रियासतकार सरदेसायांनी याबाबतीत बाळोजी कुंजीरला दोषी मानले आहे परंतु, त्याकरता काही आधार दिलेला नाही. य. न. केळकरांनी देखील बाळोजीस मुख्य अपराधी मानले असून या कृत्याने याला काय साध्य करायचे होते ते देखील नमूद केले आहे पण, हि सर्व कारस्थानी बाळोजीची होती याचा पुरावा दिला नाही. माझ्या मते, विठोजीला अशी शिक्षा देण्याची सल्ला बाळोजीने दिली न दिली यापेक्षा बाजीरावाने ती अंमलात का आणली हा मोठा प्रश्न आहे. आपल्या या निर्णयाचे परिणाम काय होतील याची कल्पना त्यांस अजिबात नव्हती हे म्हणवत नाही. असो, विठोजी होळकरचे प्राण हरण करून व त्याचे प्रेत तसेच चौकांत चोवीस तास ठेवून बाजीरावाने आपल्या विकृतीचे एकप्रकारे जाहीर प्रदर्शन केले याविषयी दुमत होऊ शकत नाही. 


    बाजीरावाने विठोजीचा अमानुष खून केल्याचे वर्तमान विजेच्या वेगाने सर्वत्र पसरले. काही काळ यशवंतराव या वार्तेने बेफाम झाला व शिंद्यांची समेटाची बोलणी उडवून लावून त्याने त्याच्याशी भयंकर संग्राम आरंभला. इथून पुढे शिंदे - होळकरांची लहान - मोठी पथके जिथे म्हणून एकमेकांना भेटली तिथे ती परस्परांवर तुटून पडली. सदासर्वकाळ विलासांत निमग्न असणाऱ्या दौलतरावाची यशवंतरावापुढे मती अगदीच कुंठीत झाली. त्याच्या कवायती पलटणांचा या लढ्यात फारसा उपयोग न होता उलट यशवंतरावच त्यांना वाटेल तिथे पकडून सडकून काढू लागला. तेव्हा नाईलाजाने दौलतरायाने सासरेबुवांना आपल्या मदतीकरता येण्याची विनंती केली. यावेळी सर्जेराव कर्नाटकांत असून करवीरकरांच्या मदतीने पेशव्याच्या पटवर्धन, रास्ते प्रभूती सरदारांशी त्याचे युद्ध पेटणारच होते. अशा स्थितीत दौलतरावाची विनंतीपत्रे येताच सर्जेराव तातडीने पुण्यास परतला व त्याने पेशव्याकडे उर्वरित २५ लाख रुपयांसाठी तगादा लावला. कारण, यशवंतरावाविरुद्ध लढण्यासाठी पदरी पुरेसा फौजफाटा व द्रव्याची नितांत आवश्यकता होती. तेव्हा या रकमेच्या वसुलीकरता बाजीराव व त्याच्या कारभारी बाळोजी कुंजीर यांची मानगूट धरणे त्यांस भागच होते. परंतु, पेशव्याची वेळ निघून गेलेली असल्याने त्याने सर्जेरावाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यालाच जगातून नाहीसा करण्याचा घाट बाळोजी मार्फत जमवला. सर्जेरावाच्या भीतीने बाळोजीने आपल्या वाड्यात धरणे बसवण्याच्या निमित्ताने चार - पाचशे लोक बाळगले होते. त्यांच्या मदतीने त्याने सर्जेरावाचा काटा काढण्याचे योजले व समेटाची बोलणी करण्याच्या निमित्ताने त्याने सर्जेरावास मेजवानीचे निमंत्रण दिले.
 

    सर्जेराव देखील बाळोजीवर विसंबून त्याच्या वाड्यात गेला पण तेथील संशयास्पद हालचाली पाहून कुंजीराला तलवारीच्या धारेवर धरून तो वाड्यातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने शनिवारवाडा व पुणे शहराची राखरांगोळी करण्याची आवई घातली. यांमुळे बाजीराव गडबडून गेला व त्याने इंग्रज रेसिडेंट पामरच्या मार्फत सर्जेरावाची समजूत काढण्याचा प्रयत्न चालवला. सर्जेरावाने देखील हे प्रकरण फारसे ताणून धरले नाही. कारण ; उत्तरेत ठिकठिकाणी यशवंतरावाची सरशी होत चालली होती. महादजीच्या स्त्रियांचाही पक्ष बळावत चालला होता. अशा स्थितीत फार काळ पुण्यास राहणे योग्य नाही हे ओळखून त्याने दि. १२ जुलै १८०१ रोजी पुण्यातील आपला तळ उठवून उत्तर हिंदुस्थानी केले. मात्र, पैशांच्या वसुली करता त्याने आपला मुलगा हिंदुराव आणि सिधोजी नाईक निंबाळकर उर्फ पा देसाई निपाणकर यांना पेशव्याजवळ ठेवले.
 

    अशा प्रकारे शिंद्यांचा पुण्यातील संपूर्ण तळ उठून बाजीराव पेशव्याचा प्रदीर्घ कारकिर्दीतला एक महत्त्वाचा अध्याय संपला. स. १८०० - ०१ या केवळ दोनच वर्षांत पेशव्याने आपल्या चित्रविचित्र निर्णयांनी राज्य विनाशाच्या वाटेवर नेऊन ठेवले. आपल्या राज्याचा मुख्य शत्रू इंग्रज असल्याचे माहिती असूनही त्याच्या बंदोबस्ताकरता प्रयत्न न करता आपले आसन बळकट करण्याच्या नादात पेशव्याने आपल्याच सरदारांना दुर्बल करण्याचा आत्मघाती डाव आरंभला. या दीड - दोन वर्षांतील पेशव्याच्या प्रत्येक लहान - मोठ्या राजकीय हालचालींवर इंग्रजांची विशेष काकदृष्टी होती व याच दीड - दोन वर्षांतील लहान - मोठ्या घटनांच्या आधारे त्यांनी पुढील वर्षी पेशव्याच्या पायांत वसईच्या बेड्या अडकवल्याचे दिसून येते.
                                                                            ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: