रविवार, २१ डिसेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १० )




     . १८०१ च्या जुलैमध्ये सर्जेराव घाटगे उत्तरेत निघून गेल्यावर पुण्यात बाजीराव पेशवा बराचसा निर्धास्त निरंकुश बनला. विठोजीचा काटा काढून त्याने अमृतरावाच्या कारस्थानाचा दक्षिणेतील पाया कमकुवत केलाच होता. आता त्याची दृष्टी इतरांकडे वळली. सर्जेरावाच्या पलटणी पुण्यात असतानाच त्याने काहीतरी खुसपट काढून माधवराव रास्त्याला कैद केले होते. सरदार रास्त्यांचा बंदोबस्त होतो होतो तोच प्रतिनिधीचे प्रकरण अनावर झाले. वस्तुतः प्रतिनिधी हा छत्रपती नंतरचा महत्त्वाचा पेशव्याचा वरिष्ठ अधिकारी. परंतु कालांतराने पेशव्यांच्या सामर्थ्यापुढे जिथे खुद्द छत्रपती नामधारी बनले तिथे इतरांची काय कथा ! वंशपरंपरागत जहागिर पदे सांभाळत पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकत दिवस ढकलत होते. बाजीराव पेशव्याच्या वेळेस परशुरामपंत हा प्रतिनिधी असून लहानपणीच त्यांस नाना फडणीसने पुण्यात आणून ठेवले होते. आरंभी प्रतिनिधीचा कारभार पेशव्याने नियुक्त केलेले अधिकारी प्रतिनिधीची आई बघत असे. पुढे प्रतिनिधी वयात येताच त्याने कारभार आपल्या हाती घेतला पण त्याचा त्याच्या आईचा आपसांत विरोध पडून दोघेही परस्परांचा अंमल बसू देण्याकरता आपल्याच सरंजामी मुलखाची लूट करू लागले. याबाबतीत प्रतिनिधीने बरीच आघाडी मारली. खेरीज विवाहाच्या दोन स्त्रियांना त्यागून तेली जातीच्या रक्षेबरोबर तो अधिक काळ व्यतीत करू लागला. प्रतिनिधीच्या या कृत्यांची कागाळी पेशव्याकडे जाताच त्याने सर्जेरावाच्या मदतीने परशुरामाला अटक करून नजरबंदीत ठेवले. पुढे प्रतिनिधीने दौलत - सर्जेरावामार्फत पेशव्याकडून आपली सुटका करून घेतली परत पूर्वीचेच ढंग अधिक जोराने सुरु केले. रामोशांची पथके उभारून स्वतः त्यांचे नेतृत्व करत आपल्याच प्रांतात तो दरोडेखोरी करू लागला. तेव्हा बाळोजी कुंजीरा मार्फत पेशव्याने त्यास पकडून गोविंदराव काळ्याच्या वाड्यात नजरकैदेत ठेवले आणि त्याचा सर्व सरंजाम जप्त करून टाकला. वास्तविक प्रतिनिधीच्या सरंजामाची घालमेल करण्याचा अधिकार फक्त छत्रपतींना होता. परंतु आधीच्या पेशव्यांनी आणि नंतर नाना फडणीसने छत्रपतींना अगदीच गुंडाळून टाकल्याने बाजीरावास हा निर्णय अंमलात आणणे फारसे कठीण गेले नाही
 
    रास्ते, प्रतिनिधी यांची वासलात लावल्यावर पेशव्याने पटवर्धनांकडे लक्ष वळवले. रामचंद्र पटवर्धनाकडून सावनुर प्रांत काढून घेण्यासाठी याने बापू गोखले, चतुरसिंग भोसले कुंजीर मंडळींना . १८०१ च्या मध्यावर रवाना केले. पटवर्धन पुणेकरांचा झगडा वर्षभर चालला. दरम्यान हा लढा निकाली निघण्यापूर्वीच उत्तरेत शिंद्याच्या पलटणींचा निकाल लावून यशवंतरावाची विजयी सेना दक्षिणेकडे सरकू लागली. 
 

    मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे यशवंतरावाच्या चढाईस आळा घालण्याकरता दौलतरावाने सर्जेरावास उत्तरेत पाचारण केले. सर्जेराव उत्तरेत निघाला त्याच वेळी बाजीरावानेही शिंदे होळकरांच्या दरम्यान समेट करण्याकरता उत्तरेत जाण्याचा मनोदय जाहीर केला खरा, पण त्यानुसार तो अंमलात न आणता त्याने कोपरगावी व इतरत्र जाऊन पर्यटनाचा आनंद मात्र लुटला. खेरीज, कचेश्वर येथे अमृतरावास भेटीला बोलावून घेऊन यशवंतरावा विषयी त्याचा अंदाज काढण्याचाही प्रयत्न केला. अमृतरावाच्या या भेटीपूर्वी होळकरांविषयी आपली कृपादृष्टी दाखविण्याकरता बाजीरावाने काशिराव होळकरचा जप्त केलेला सरंजाम मोकळा केला होता खरा पण, अमृतरावाच्या भेटीनंतर स. १८०१ च्या ऑक्टोबर महिन्यात होळकरांचे उत्तर दक्षिण हिंदुस्थानातील सर्व महाल जप्त करून टाकले. माझ्या मते, यशवंतरावाच्या बंडामागे अमृतरावाचीच प्रेरणा असल्याची पक्की खात्री झाल्यावर व हे दोघे मिळून आपणांस पदभ्रष्ट करतील या भीतीने त्याने हा निर्णय घेतला. परंतु, विठोजी प्रकरणी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती असेच पेशव्याच्या या निर्णयाच्या बाबतीत म्हणावे लागेल. 


    पेशव्याने समग्र होळकरशाही खालसा केल्याचे समजताच यशवंतराव आणि समस्त होळकरशाही अभिमानी सरदार चवताळून उठले. त्यांच्या व शिंद्याच्या फौजांच्या सबंध हिंदुस्थानभर चकमकी घडू लागल्या. या झगड्यावर उभयतांनी परस्परांच्या राजधान्यांचाही विध्वंस करून टाकला. परंतु, या आत्मघाती यादवीत शेवटी होळकरांची सरशी होण्याची चिन्हे दिसू लागली. दौलतरावाचे प्रचंड सैनिकी सामर्थ्य, आधुनिक शस्त्रास्त्र सामग्री वगैरे सर्व गोष्टी यशवंतरावापुढे कुचकामी ठरल्या. अर्थात, शिंद्याच्या घरातील व लष्करातील अंतर्गत वैमनस्यंही यांस तितकीच कारणीभूत असल्याचे विसरता कामा नये. असो, उत्तरेत शिंद्याला लोळवून व काशिराव होळकरची महेश्वरी व्यवस्था लावून आपल्या सेनासागरासह यशवंतराव पुण्याच्या दिशेने येऊ लागला. आपला निर्णय अंगलट येत असल्याचे पाहून पेशव्याने शिंदे होळकरांना उद्देशून आज्ञा काढली कि, ‘ उभयतांनी आपसांत सुरु असलेला संघर्ष तात्काळ थांबवावा. दोघांच्याही समजुतीचा तह सरकारातून ठरे पर्यंत शिंद्याने सर्व सैन्यासह बऱ्हाणपुरी तर होळकाराने थालनेरास राहावे.परंतु पेशव्याच्या या आज्ञेला उभयतांनीही भीक घातली नाही. दौलतराव पेशव्याला जुमानत नव्हता तर होळकराचा सर्व सरंजाम पेशव्यानेच जप्त केल्याने तांत्रिकदृष्ट्या तो आता पेशव्याचा नोकरच नव्हता !


    दौलतरावाला बगल देऊन यशवंतरावच्या आघाडीची पथके स. १८०२ च्या आरंभी दक्षिणेकडे सरकू लागली. पाठोपाठ यशवंतरावहे आपली मजबुती करत हळूहळू दक्षिणेकडे जाऊ लागला. संभाव्य लष्करी व राजकीय  आक्रमणाला तोंड देण्याकरता बाजीरावानेही तयारी चालवली. कर्नाटकात गेलेल्या सरदारांना पुण्यास येण्याची आज्ञापत्रे रवाना होऊ लागली. शिंदे उत्तरेत अडकल्याने नागपूरकर भोसल्यांना पुण्यास येण्याची गळ घातली जाऊ लागली. सवाई माधवाची पत्नी यशोदाबाईला जबरदस्तीने रायगडी रवाना करून तिथे नजरबंदीत ठेवण्यात आले. जोडीला स्वतःच्या व चिमाजीच्या बायकोलाही पाठवून दिले. यामागील पेशव्याचा हेतू उघड होता. यदाकदाचित आपल्याला पदभ्रष्ट करण्याचा अमृतराव यशवंतरावाने यत्न केला तर दत्तक विधानासाठी त्यांना भट घराण्यातील कोणत्याही स्त्रीचा आधार मिळू नये. अमृतराव व यशवंतराव हे एकविचाराने वागत असल्याची त्याची एव्हाना खात्री पटली होती परंतु, अमृतरावाला कैद करून संभाव्य राज्यक्रांती / बंडाचा लागलीच उपशम करण्याची त्यांस बुद्धी वा हिंमत झाली नाही.


    पुण्यास परतल्यावर पेशव्याने होळकराच्या संभाव्य स्वारीचा मुकाबला करण्यासाठी कसून तयारी चालवली. जुन्या सरदारांना पुण्यास येण्याची आज्ञापत्रे यापूर्वीच पाठवण्यात आली असली तरी रास्ते, पुरंदरे, घोरपडे, पानसे इ. वगळता बाकी कोणी आले नाही. बाजीराव गादीवर बसल्यापासून  आजवर जी काही विविध कट कारस्थाने घडली त्याची झळ बव्हंशी जुन्या सरदारांना बसल्याने त्यांनी यावेळी पेशव्याच्या मदतीला न जाण्याचे ठरवले. अर्थात याकरता प्रत्येकाकडे भरपूर कारणे होतीच. पेशव्याचा कर्नाटकातील अलीकडचा महत्त्वाचा सरदार बापू गोखले देखील येतो, येतो म्हणत अखेरपर्यंत आला नाही. उलट त्याने परस्पर यशवंतराव सोबत मैत्रीचा पत्र व्यवहार आरंभला. बापू किंवा इतरांचा वर्तनाची कारणे उघड व स्पष्ट होती. होळकराच्या बाबीतील पेशव्याचे वर्तन सर्वांनाच अन्यायी वाटत होते. तसेच कोणत्याही निमित्ताने पेशव्याने सरदारांचे सरंजाम जप्त करण्याही मोहीम चालवली होती त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भवितव्याची काळजी लागून राहिली होती. यशवंतरावाची स्वारी यशस्वी होऊन अमृतराव कारभारात आला तर या स्थितीत फरक पडेल अशी त्यांची भावना होती. जुन्या सरदारांचे मनोगत ओळखून पेशव्याने नवीन सरदार उभे करण्यास आरंभ केला. आपल्या मावसभावास --- गोविंदराव परांजपेला नवीन तोफा ओतण्याची आज्ञा फर्मावली. दौलतराव शिंद्याकडे पत्रांवर पत्रे पाठवून होळकराविरुद्ध लढण्यासाठी लष्करी मदतीची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यशवंतराव होळकराकडे पत्रे रवाना करून तहाची बोलणीही सुरु करण्यात आली. परंतु, होळकराशी वाटाघाट करून सन्माननीय तोडगा काढण्याची यावेळी बाजीरावास बिलकुल इच्छा नव्हती असे परिणामांवरून दिसून येते.


    यशवंतराव - अमृतराव हे एकविचाराने वर्तत असून कोणत्या न कोणत्या निमित्ताने दक्षिणेत उतरून आपणांस पदच्युत करण्याचा होळकराचा डाव आहे असेच त्यांस वाटत होते. त्याउलट होळकराची असली तरी ती अधिक मुत्सद्दीपणाची होती. जरी तो अमृतरावाच्या निरोपावरून दक्षिणेत उतरत असला तरी केवळ अमृतरावाच्या भीडेखातर तख्तनशीन पेशव्याशी वैर बांधण्याची त्याची इच्छा नव्हती. उलट पेशव्याकडे त्याने खास वकील पाठवून आपल्या प्रमुख मागण्या कळवल्या, त्या पुढीलप्रमाणे :-

(१)        मल्हारराव होळकराचा मुलगा व पत्नी अशीरगडावर शिंद्याच्या कैदेत आहेत त्यांना आपल्या स्वाधीन करण्यात यावे. तसेच होळकरांची सरदारी मृत मल्हाररावाच्या मुलाच्या नावे --- खंडेरावाच्या नावे करून त्याची मुतालकी यशवंतरावास द्यावी.

(२)        शिंदे होळकर दोघेही बरोबरीचे सरदार असताना अलीकडे पेशव्यांनी शिंद्याला दहा लाखांची जहागीर व एक किल्ला दिला आहे तर त्याप्रमाणे होळकरांना देखील देण्यात यावे. जर हे शक्य नसल्यास शिंद्याला दिलेली जहागीर व किल्ला सरकारात परत घ्यावे.

(३)        उत्तर हिंदुस्थानची वाटणी शिंदे, होळकर, पेशवे आणि पवार यांच्या विभागून असताना अलीकडे शिंदे इतरांचे --- विशेषतः होळकरांचे हक्क राजरोसपणे स्वतःच उपभोगत आहे तर असे नसावे. सर्वांचे हक्क पूर्ववत प्रमाणे चालावेत. 


    होळकराच्या या मागण्या न्याय्य नाहीत असे कोणी म्हणू शकेल  काय ? परंतु, या सध्या व न्याय्य मागण्या मान्य करण्याचेही पेशव्याने सौजन्य दाखवले नाही ! उलट यशवंतरावाशी लढण्याची त्याने कसून तयारी चालवली. इकडे दौलतरावाने पेशव्याच्या मदतीला पाठवण्याकरता कर्जवाम उभारून काही फौज सदाशिवराव बक्षीच्या नेतृत्वाखाली पुण्याकडे पाठवून दिली. यशवंतरावाचे या सर्व हालचालींवर बारीक लक्ष होते. त्याने बक्षीला अडवण्याकरता अमीरखानाची नेमणूक करून बारामतीला जमलेल्या पेशव्याच्या सैन्याचा समाचार घेण्याकरता फत्तेसिंग मानेची योजना केली. पैकी, अमीरखानाने बक्षीची ठिकठिकाणी अडवणूक केल्याने लढाई देत, मार्ग काढत तो कसाबसा दि. २२ ऑक्टोबर १८०२ रोजी वानवडीस दाखल झाला तर तत्पूर्वीच म्हणजे ता. ८ ऑक्टोबर १८०२ रोजी मान्याने पेशव्याच्या  पुरंदरे, घोरपडे, कुंजीर, पानसे इ. सरदारांचा बारामतीच्या लढाईत पराभव केला होता. 


    बारामतीची लढाई बिघडल्याचे समजताच बाजीरावाने पुणे सोडून कोकणात जाण्याचा निर्णय घेतला पण बाळोजी कुंजीरने भीड घातल्यामुळे व बक्षीच्या नेतृत्वाखाली शिंद्याच्या फौजा पुण्याजवळ आल्याने त्याने तो बेत तूर्त रहित केला. शिंदेशाही सैन्य पुण्यात दाखल होताच पाठोपाठ होळकरांची सेनाही पुण्याजवळ आली पण लागलीच युद्धाला तोंड न फोडता यशवंतरावाने फिरून एकदा समेटाची बोलणी आरंभली व बोलणी पक्की अन यशस्वी व्हावी याकरता पेशव्याने बाबुराव आंग्रे, निंबाजी भास्कर, दाजीबा देशमुख व बाळोजी कुंजीर यांना पाठवावे अशी मागणी केली. तसेच या चार मातबरांच्या जीवास अपाय होण्याची भीती वाटत असेल तर फातेसिंग माने वा पेशवा सांगेल त्या सरदारास ओलीस देण्याची  तयारीही दर्शवली. याशिवाय समेटाची बोलणी फिसकटून शिंद्यासोबत संग्राम झालाच तर त्यात पेशव्याने सहभागी न होण्याची व लढाई बिघडल्यास पेशव्याने पुणे न सोडण्याचीही सुचना यशवंतरावाने बाजीरावास केली. परंतु, यांपैकी एकही गोष्ट पेशव्याच्या मनास आली नाही. त्याच्या लेखी, यशवंतराव शत्रू होता व शत्रूच्या बोलण्यावर विश्वास तो काय ठेवायचा ? उलट होळकराच्या या समेटाच्या बोलण्याला वरवर तरी आपली अनुकुलता आहे हे दर्शवण्यासाठी पेशव्याने आपला मेव्हणा रघुनाथ भागवत, बाळोजी कुंजीरचा कारभारी आबाजी शंकर, पुण्यातील सावकार भिवजी नाईक कोलते व नागपूरकर भोसल्यांचा नारायणराव वैद्य या चौघांना यशवंतरावाकडे बोलणी करण्यास पाठवले. स. १७९६ साली पेशवाईवर आलेल्या बाजीरावाने स. १८०२ मध्ये इतका अपरिपक्वपणा दाखवावा याचे आश्चर्य वाटते !
  

    अखेर दि. २५ ऑक्टोबर १८०२ रोजी शिंदे पेशवे यांच्या संयुक्त सैन्याची गाठ यशवंतरावाच्या फौजेशी पडली. संग्राम अटीतटीचा होऊन उभयपक्षांची मिळून दहा हजार माणसे यात मारली गेल्याचे इतिहासकार नमूद करतात. या लढाईत बाजीराव नेमका कुठे होता याची अचूक अशी माहिती मिळत नाही. बव्हंशी इतिहासकारांच्या मते, त्या दिवशी प्रातःकाळीच भोजन आटोपून चिमणाजीला सोबत घेऊन लढाईची गंमत पाहण्याकरता तो वाड्यातून बाहेर पडला पण अर्ध्या वाटेतच लढाई बिघडल्याचे समजताच तो पुण्यातून बाहेर निघाला. रियासतकारांनी याविषयी दोन उल्लेख केले आहेत. पहिला उल्लेख उपरोक्त प्रमाणे असून दुसऱ्या टिकाणी त्यांनी बारा घटका दिवसास श्रीमंत उभयतां बंधु वानवडीस जरी पटक्याजवळ गेले. चार घटका तेथे होते. तों शिंद्याकडील पलटणे कचरली. धीर न धरता सरकारचा जरीपटका निघाला तेव्हां श्रीमंत सुद्धां शिंद्याची फौज पश्चिमेकडे पर्वतीचे अंगास आली. दोन घटका श्रीमंत पर्वतीस होते. होळकराचे फौजेच्या टोळ्या अंगावर येताना दिसू लागतांच श्रीमंत वडगांवचे बागेंत व तेथून डोणजास निघून गेले अशी माहिती दिली आहे. संबंधित उतारा त्यांनी कोठून घेतला याचा मात्र खुलासा त्यांनी केलेला नाही तेव्हा विश्वास कशावर ठेवावा ?
 

    यशवंतरावाचा मुख्य राग शिंद्यावर असल्याने रणातून पळणाऱ्या सरकारी फौजेस त्याने सुखरूप माघार घेण्याची मुभा दिली पण शिंद्याच्या फौजेला अजिबात दयामाया दाखवली नाही शिंद्याची माणसे त्याच्या सैनिकांनी टिपून मारली. त्याचे बुणगे व तोफखाना साफ लुटले गेले. बाजीरावाने पुणे सोडल्याचे समजताच त्याला परत आणण्यासाठी यशवंतरावाने हरनाथ होळकरला रवाना केले. परंतु, होल्कारी सेना आपल्या मागावर येत असल्याचे पाहून सावध श्रीमंत पर्वतीहून वडगाव व तेथून सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे गेले. काही अंतर राखून होळकरांची पथके पाठीशी होतीच. पेशव्याला जबरदस्तीने कैद करण्याचे सामर्थ्य होळकराकडे निश्चित होते पण ते आततायी कृत्य त्याने केले नाही हाच दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर यांच्यातील महत्त्वाचा फरक आहे ! असो, यशवंतरावाची फौज आपला पिच्छा सोडत नसल्याचे पाहून बाजीरावाने महाडचा रस्ता धरला व कोकणात उतरणारे घाटरस्ते रोखण्याची जबाबदारी बाळोजी कुंजीरवर सोपवली.


    इकडे पेशव्याने पुणे सोडल्यावर यशवंतरावाने पुण्याची नाकेबंदी करून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला. त्यासोबतच बाजीरावाच्या सल्ल्गार मंडळाच्या समर्थकांची  व शिंद्याच्या माणसांची घरे शोधून त्यांची चीजवस्त जप्त करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर कोणालाही त्रास न देण्याची त्याची सैन्याला आणि सरदाराना सक्त आज्ञा होती. खेरीज, नानाचे जे पक्षपाती कैदेत होते त्यांची सुटका करण्यात येऊन अमृतरावास पुण्यात येण्याचे आमंत्रण धाडण्यात आले. अमृतरावला जुन्नरहून पुण्यात येण्यास नोव्हेंबरची ७ तारीख उजडावी लागली. अमृतरावाने या वेळी जी दिरंगाई केली त्याचा पुरेपूर फायदा बाजीराव आणि इंग्रजांनी घेतला.

  
    स. १८०१ च्या अखेरीस पुण्याच्या रेसिडेन्सीवर पामरच्या जागी बॅरी क्लोझची नेमणूक झाली होती व त्याचा असिस्टंट म्हणून एल्फिन्स्टनही तेथे येऊन दाखल झाला होता. स. १८०२ च्या सबंध वर्षातील घडामोडींवर यांचे बारीक लक्ष असून यशवंतरावाने पुण्याचा ताबा घेतल्यावर क्लोझने त्याची भेट घेऊन त्याच्या हेतूंची चाचपणी केली. वास्तविक, यशवंतरावाची यावेळी अतिशय विचित्र परिस्थिती झाली होती. पेशव्याने होळकरांची सरदारी जप्त केल्याने आता तो पेशव्यांचा सरदार न राहता एक बंडखोर बनला होता. ज्या अमृतरावाच्या भरवशावर तो पुण्यास आला तो अमृतराव जुन्नराहून पुण्यास येण्यास भलताच विलंब लावू लागला होता. खुद्द पेशवा यावेळी महाडला मुक्काम ठोकून राहिला होता. अशा स्थितीत पेशव्याच्या राजधानीचा ताबा आपल्या हाती घेणे राजकीयदृष्ट्या अडचणीचे असल्याचे न ओळखण्याइतपत यशवंतराव मूर्ख नव्हता. त्याने राजकीयदृष्ट्या आपल्या पक्षाची बळकटी करण्याकरता इंग्रजांशी सलोख्याची बोलणी आरंभली. पेशव्याशी आपले भांडण नसून फक्त शिंद्यांशी आपला तंटा आहे व पेशव्याने जरी राजधानी सोडली असली तरी पेशव्याच्या अनुपस्थितीत तिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे व त्यामुळेच इंग्रज रेसिडेंटनेही पूर्ववतप्रमाणे पुण्यातच राहून या राजकीय भ्रमास पाठबळ द्यावे अशी त्याची राजकीय खेळी होती. परंतु, पेशवाईवर आपला अंकुश बसवण्यास आतुर असलेल्या इंग्रजांनी होळकराचा पक्ष का धरावा ?

                                                                                 ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: