रविवार, २५ जानेवारी, २०१५

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १३ )


    स. १८१५ मधील गंगाधरशास्त्र्याच्या खून प्रकरणाने पेशवा आणि इंग्रजांमधील उरले सुरले स्नेहसंबंध साफ संपुष्टात येऊन दोन्ही पक्ष परस्परांच्या नाशासाठी प्रवृत्त झाले. पेशवा आणि इंग्रजांच्या या निर्णायक लढ्यात विजय नेमका कोणाचा होणार हे अद्यापही निश्चित होत नव्हते. कागदोपत्री तहांनी मराठी सरदारांचा राज्यसंघ इंग्रजांनी जरी खिळखिळा केला असला तरी त्यांचे आतून परस्परांशी पक्के असलेले संघटन इंग्रज तोडू शकले नव्हते. लष्करीदृष्ट्या मराठी सरदारांच्या फौजा इंग्रजी सैन्याच्या तुलनेने अधिक सामर्थ्यशाली होत्या. केवळ रणभूमीवर या झगड्याचा निकाल लावू म्हटल्यास सामना जड जाण्याची इंग्रजांना खात्री होती. तेव्हा त्यांनी लष्करी सामर्थ्याला राजकीय बुद्धिबलाची जोड देत मराठी सरदार व पेशव्याच्या चुकांचा भरपूर फायदा उठवत संभाव्य संघर्षातील विजयाचा पाया रचण्यास आरंभ केला.

१] सातारकर छत्रपती :- स. १८०८ च्या पूर्वार्धात छत्रपतीपदी बसलेल्या प्रतापसिंहाचे बाजीराव पेशव्यासोबत आरंभी तरी संबंध तसे सलोख्याचे होते. परंतु, स. १८११ मधील चतुरसिंग ( चतरसिंग ? छ्त्रासिंह ? ) भोसल्याच्या प्रकरणापासून हळूहळू पेशवा - छत्रपतीमध्ये बेबनाव निर्माण होऊ लागला होता. या काळातील प्रचलित पद्धतीनुसार पेशव्याच्या विरोधात दाद मागण्याचे ठिकाण म्हणजे कंपनी सरकार असल्याने, प्रतापसिंहाने त्यांच्याकडे धाव घेतली. जिथे दिल्लीकर बादशाह, खुद्द पेशवा व त्याचे भाऊबंद आणि सरदार आपापल्यावरील अन्यायाच्या तक्रारींचा पाढा वाचण्यास जात होते, तिथे सातारकरांनी जाऊ नये असा नियम थोडाच होता ?


    प्रथम इंग्रजांनी सातारकरांच्या बाजीरावविरोधी कागाळ्यांची दखल घेतली नाही. कारण, स. १८११ पासून पुढील चार पाच वर्षांचा काळ कंपनी सरकार आणि समस्त इंग्लंड राष्ट्राच्या दृष्टीने बराचसा अडचणीचा होता. या काळात युरोपांत नेपोलियनने इंग्रजांच्या तोंडाला अगदी फेस आणला होता. त्यात सातारकरांच्या निमित्ताने पेशव्याला दुखवून हिंदुस्थानातील आपल्या सत्तेला धोका पोहोचेल असे कृत्य करण्याचे धाडस इंग्रजांमध्ये अजिबात नव्हते. त्यामुळे पेशव्याला न दुखावता त्यांनी सातारकरांना मधाचे बोट लावून ठेवण्याचा अवघड पण राजकारणातील अपरिहार्य मार्ग स्वीकारला. पुढे स. १८१५ मधील गंगाधरशास्त्री व त्रिंबकजी प्रकरणानंतर पेशवा - छत्रपती प्रकरणी निश्चित भूमिका घेणे भाग असल्याचे एल्फिन्स्टनला कळून चुकल्याने पेशव्याच्या अपरोक्ष त्याने छत्रपतीकडे अंतस्थरित्या संधान बांधायला सुरवात केली.


    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचा अनुभव गाठीशी असल्याने एल्फिन्स्टन व त्याच्या समविचारी अधिकाऱ्यांनी आपल्यापुरते युद्धधोरण निश्चित केले होते. त्यानुसार (१) संभाव्य युद्ध मर्यादित प्रदेशातच होईल असे प्रयत्न करणे (२) युद्ध अल्पावधीत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणे (३) शक्यतो पेशव्याला राजधानीतच कोंडून दीर्घकालीन युद्धाचा प्रसंग टाळणे. हि सर्व वा यातील कोणतेही एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी छत्रपती हाताशी असणे आवश्यक असल्याने एल्फिन्स्टनने प्रतापसिंहाभोवती जाळे विणायला आरंभ केला व दुसरा बाजीराव तसेच त्याच्या पूर्वजांनी छत्रपतींना दिलेल्या आजवरच्या वागणुकीचा परिणाम म्हणून प्रतापसिंहाने इंग्रजांचा आश्रय घेण्याचा स्वाभाविक निर्णय घेतला. याबाबतीत त्यांस सर्वथा दोष देणे गैर आहे.

 
२] गुजरातवर इंग्रजांचा ताबा :- गंगाधरशास्त्र्याच्या खुनाच्या निमिताने ज्याप्रमाणे इंग्रजांनी पेशव्याला चेपण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे, बडोदेकर गायकवाडांनाही त्यांनी गुडघ्यावर आणले. बडोद्याच्या इंग्रजविरोधी गटाचा प्रमुख --- सीताराम रावजी यांस त्यांनी कैदेत बसवले. त्यामुळे इंग्रजविरोधी खटपट बरीचशी थंडावली. तसेच ता. १३ जून १८१७ च्या तहान्वये एल्फिन्स्टनने पेशव्याचा बडोदेकरांशी असलेला राजकीय संबंध साफ तोडून टाकला. यामुळे जरी गायकवाड पेशव्याला द्याव्या लागणाऱ्या आर्थिक भरपाईतून बचावले असले तरी या करारानुसार गायकवाडीवरील इंग्रजी वर्चस्वास कायद्याचे नैतिक पाठबळ प्राप्त झाले.

३] पेंढाऱ्यांना पेशव्याचे उत्तेजन, त्रिंबकजीचे कैदेतून पलायन :- पंढरपूरचा जहागीरदारांचा तह झाल्यापासून बाजीराव वसईच्या तहातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या सुदैवाने त्रिंबकजी डेंगळे सारखा कल्पक साथीदार त्यांस प्राप्त झाला. इंग्लिश पलटणी व एल्फिन्स्टनसारखा जागरूक रेसिडेंट छाताडावर बसलेला असताना इंग्रजविरोधी लढ्यासाठी उघड फौजा जमवणे शक्य नाही हे ओळखून त्रिंबकजीने पेशव्याला पेंढाऱ्यांच्या ' भाडोत्री फौजा ' सेवेत घेण्याची कल्पना सुचवली. अर्थात हि युक्ती अगदीच नवीन नसून दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत मराठी सरदारांनी या पर्यायाचा वापर केल्याचे खुद्द ऑर्थर वेल्स्लीने नमूद केले आहे. या ठिकाणी ' पेंढारी ' या संकल्पनेची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

    हिंदुस्थानात काय आणि जगभरात काय, पूर्वापारपासून नियमित लष्करासोबत लुटमारीचा व्यवसाय करणारा एक वर्ग सैन्याबरोबर सेवेत सहभागी असल्याचे आढळून येते. हिंदुस्थानातील विशेषतः, पेशवेकाळातील पेंढारीही यांस अपवाद नव्हते. या पेंढाऱ्यांची स्वतःची शस्त्रे आणि घोडे असत. यांना पगार देण्याची गरज नसे. लुटीवरच यांचा निर्वाह असल्याने व तोच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत असल्याने लुटीच्या वेळी ते अजिबात दयामाया दाखवत नसत. अर्थात, युद्धकर्मांत ते अगदीच निरुपयोगी असले तरी भारी मजला मारण्यात त्यांची बरोबरी करणारे फारच थोडे हिंदुस्थानात होते. पेशव्यांचे व त्यांच्या सरदारांचे कार्यक्षेत्र जसे विस्तारले तशी त्यांना पेंढाऱ्यांची गरज जास्ती भासू लागली. साम्राज्यविस्ताराची आकांक्षा ठेवणाऱ्या सत्तेला आपल्या शेजारील राज्यांसोबत  सदासर्वदा शांतता नांदावी असे थोडीच वाटणार ? पेंढाऱ्यांच्या मार्फत पेशवे आणि त्यांचे सरदार विरुद्ध पक्षाला त्रस्त करून आपला कार्यभाग साधून घेत.


    अर्थात, पेंढारी हे दुधारी शस्त्राप्रमाणे असल्याने मोहिमा वा कामगिरी नसल्यास प्रसंगी आपल्याच नाममात्र मालकाच्या प्रदेशांत लुटालूट करण्यास मागे - पुढे पाहत नसत. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धापर्यंत पेंढाऱ्यांचे स्वरूप सामान्यतः असेच होते. त्यानंतर मात्र, ज्याप्रमाणे हिंदुस्थानातील लष्करी व्यवस्थेची पद्धती बदलत गेली, त्याचप्रमाणे पेंढारीही बदलत गेले. काळाची पावलं ओळखून पूर्वीच्या विस्कळीत टोळ्या आता संघटीत होऊ लागल्या होत्या. अमीरखानसारखे महत्त्वकांक्षी व युद्धकुशल पेंढार सरदार कवायती पलटणे व तोफखाना बाळगून ' भाडोत्री सैन्याची ' भूमिका बजावू लागले होते. एकप्रकारे कंपनी सरकारच्या तैनाती फौजेची हि देशी भ्रष्ट नक्कलच होती !


    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीश सत्ता देशात विस्तारली जाऊन तुलनेने एतद्देशीय संस्थाने आकुंचित होऊ लागली. पैशांअभावी कित्येकांनी आपापल्या नियमित फौजांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली. आयुष्यभर शिपाईगिरी केलेल्या कित्येकांना निर्वाहासाठी दुसरा कोणताच पर्यायी व्यवसाय उपलब्ध नसल्याने त्यांनी ' पेंढारी ' टोळ्यांत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पेंढारी बनण्यातील प्रमुख फायदे म्हणजे भयंकर रक्तपाताचे फारसे युद्धप्रसंग नसणे व हमखास लुट मिळण्याची शक्यता ! अर्थात, यांमुळे पेंढाऱ्यांची संख्या देशात न वाढल्यास नवल !  


    राजकीय आघाडीवर इंग्रजांकडून माती खाल्लेल्या मराठी सरदारांनी ' पेंढार ' व्यवस्थेचा पुरेपूर वापर करत त्यांच्या म्होरक्यांना पैसा पुरवून कंपनी सरकार व त्यांच्या ताटाखालील संस्थानिकांच्या प्रदेशाला उपद्रव देण्याची मसलत सांगितली. अमीरखान सारख्यांच्या दृष्टीने हि सुवर्णसंधीच होती ! त्यांनी यात वाटेल तसे हात धुवून घेतले. उत्तरेतील पेंढाऱ्यांची वर्तमाने ऐकून दक्षिणेत त्रिंबकजीने पेशव्यालाही पेंढाऱ्यांना पाठीशी घालण्याची सूचना केली. परिणामी, दख्खनमध्येही पेंढाऱ्यांच्या मोठ मोठ्या टोळ्या घिरट्या घालू लागल्या. या ' पेंढाऱ्यांत ' कित्येक व्यावसायिक सैनिकांचा भरणा असल्याने यांच्या दौडीही पूर्वीपेक्षा मोठ्या वेगाने होत जाऊन दिवसाला ५० - ६० किमी अंतर ते सहज पार करू लागले.


    दक्षिणेतील पेशवाविरोधी, विशेषतः निजामाच्या राज्याला त्यांचा फारच उपद्रव होऊ लागला. पेंढाऱ्यांच्या मार्फत स्थानिक सत्ताधीशांना उपद्रव देण्याच्या पेशव्याच्या राजकीय खेळीमागील उद्दिष्ट स्पष्ट होते. ब्रिटीश अंकित संस्थानिकांच्या फौजा पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यास उपयुक्त नसल्याने त्यांना स्वतःहून फौज भरती करण्याची सूचना इंग्रजांनी करावी किंवा तैनाती फौजेत वाढ करावी हे दोनच पर्याय उपलब्ध होते. पैकी, सरसकट दुसऱ्या पर्यायाचा अवलंब कंपनी सरकार करू शकत नव्हते. कारण, कित्येक संस्थानिकांनी करार करतेवेळी ठरलेल्या तैनाती पलटणांपेक्षा अधिक न ठेवण्याचे कलम आधीच मंजूर करून घेतले होते. तेव्हा कित्येक तैनाती फौज वाढवण्याचा पर्याय बाद ठरत असल्याने पहिलाच उरतो. आणि जर तो अवलंबला व तैनाती फौजेपेक्षा संस्थानिकाची लष्करी ताकद तुलनेने वाढली तर तो इंग्रजांच्या अधीन का म्हणून राहील ? सारांश, इतिहासकार समजतात तितके दुसरा बाजीराव आणि त्याचे सल्लागार मंडळ मूर्ख नव्हते !


    स. १८१५ साली नाईलाजाने स्वतःहून इंग्रजांच्या स्वाधीन झालेल्या त्रिंबकजीला अलाहाबाद वा चुनारगड येथे कैदेत ठेवण्याची एल्फिन्स्टनची शिफारस फेटाळून गव्हर्नर जनरलने त्यांस मुंबई प्रांतातील ठाण्याच्या किल्ल्यात बंदिवान म्हणून ठेवले. परिणामी, सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही ता. १२ सप्टेंबर १८१६ रोजी रात्रीच्या वेळी त्रिंबकजी ठाण्याच्या किल्ल्यातून पळून गेला. त्रिंबकजीच्या पलायनामागे पेशव्याचा हात असल्याचे एल्फिन्स्टनने ताडले. त्याने पेशव्याकडे त्रिंबकजीला फिरून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु, त्रिंबकजी पळाला असला तरी तो आपल्या राज्यात आश्रयास्तव न आल्याची सबब सांगत बाजीरावाने आपली असमर्थता व्यक्त केली. अर्थात, पेशव्याची हि लबाडी ओळखून देखील एल्फिन्स्टनला त्याच्यावर तसा उघड आरोप करता येईना. इकडे त्रिंबकजीने कैदेतून सुटका होताच प्रथम काही दिवस अज्ञातवासात व्यतीत करून मग इंग्रजविरोधी निर्णायक लढ्यासाठी फौजांची जुळवाजुळव आरंभली. यामागे अर्थात पेशव्याची सक्रिय मदत होतीच ! एल्फिन्स्टनने याबाबतीत पेशव्याकडे आपली नापसंती वारंवार कळवली. परंतु, पेशव्याला आता इंग्रजांच्या राजी - नाराजीची थोडीच पर्वा होती ?

[४] एक हुकलेली संधी :- बाजीराव त्रिंबकजीला पाठीशी घालत असल्याचे पाहून एल्फिन्स्टनने जनरल स्मिथला शिरूर येथे लढाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देत गव्हर्नर जनरलकडे पेशव्याविरोधात युद्ध पुकारण्याची परवानगी मागितली. एल्फिन्स्टनचा यावेळी बेत उघड व बराचसा धाडसी होता. पेशव्याची गुप्त व उघड फौज पुण्याजवळ नसताना प्रकरण वर्दळीवर आणून थेट पेशव्यालाच ताब्यात घेण्याचा त्याचा डाव होता. त्यासाठी मुद्दाम त्याने पेशव्याला सांगितले कि, ' महिन्याच्या आत त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करावे. जोवर त्रिंबकजी पकडला जात नाही तोवर जामीन म्हणून गुजराथ प्रांत आणि रायगड, सिंहगड, त्रिंबक व पुरंदर हे चार किल्ले आमच्या ताब्यात द्यावेत.' ( ता. ६ एप्रिल १८१७ )
पाठोपाठ आसपासच्या इंग्लिश पलटणीही त्याने पुण्याच्या सरहद्दीवर आणायला आरंभ केला.


    दरम्यान गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सने एल्फिन्स्टनच्या खलित्याला आशादायक जबाब पाठवला. त्यानुसार (१) पेशव्याने त्रिंबकजीला पकडून दिले वा त्या कार्यात मनापासून सहभाग घेतला तर पेशव्यासोबत पूर्ववत मैत्रीचे संबंध ठेवावेत. (२) पेशवा लढाईला उभा राहिला तर त्यांस कैद करून राज्य जप्त करावे. (३) पेशवा काहीच न करता चालढकल करू लागला तर तहाने त्यास बांधून घ्यावे.

 
    पेशव्यासोबत नव्याने तह करावा लागल्यास त्याच्या शर्तीही गव्हर्नरने लिहून पाठवल्या. त्यानुसार --- पेशव्याने परदरबारी आपले वकील ठेवू नये. त्याचप्रमाणे परदरबारच्या वकिलांनाही आपल्या दरबारातून रजा द्यावी. सर्व जहागीरदारांना रजा द्यावी. इथून पुढे मराठी राज्याचा प्रमुख म्हणून न राहता ब्रिटिशांचे मांडलिक म्हणून राहावे. तैनाती फौजेच्या खर्चाकरता काही प्रांत तोडून द्यावा आणि त्रिंबकजी गुन्हेगार असल्याची कबूली द्यावी. ( दि. १२ एप्रिल १८१७ )  गव्हर्नर जनरलच्या या अटींचा अर्थ काय होतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. 

    गव्हर्नरचा खलिता एल्फिन्स्टनला ता. १० मे रोजी मिळाला. पण तत्पूर्वीच दि. ७ मे रोजी एल्फिन्स्टनने एक धाडसी डाव टाकला. त्या दिवशी त्याने पुण्याला वेढा घालून पेशव्याकडे गुजराथ प्रांत आणि रायगड, पुरंदर, त्रिंबक व सिंहगड या किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्यांची मागणी केली. आपल्या मागण्या पेशवा कधीच मान्य करणार नाही, त्याचप्रमाणे पेशव्याच्या फौजा पुण्यापासून लांब असल्याने पुण्यात फार मोठा युद्धप्रसंग न उद्भवता पेशवा सहजरीत्या हस्तगत होईल अशी एल्फिन्स्टनची अटकळ होती. त्यानुसार त्याने सर्व तयारी केली परंतु, पेशव्याने आपली कमहिंमत (?), भित्रेपणा (?) दाखवत एल्फिन्स्टनच्या मागण्या मंजूर करून प्रांत व किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्या देऊन टाकल्या. परिणामी एल्फिन्स्टनचा एक कल्पक पण धाडसी डाव याप्रकारे सपशेल हुकला.

५] शिंदे - होळकर - भोसले त्रिवर्गाची स. १८१७ पर्यंतची स्थिती :- दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत सडकून खाल्लेल्या मारामुळे दौलतराव शिंद्याचे विलासी नेत्र काहीसे उघडले. इंग्रजांच्या विरोधात वेळीच सावध होऊन काही उपाय योजना न केल्यास आपणांस आपल्या दौलतीला मुकावे लागेल याची त्यांस कल्पना येउन चुकली. मात्र, त्याकरता लागणारी आवश्यक कार्यक्षमता त्याच्या अंगी असल्याचे बिलकुल दिसून येत नाही. इंग्रजांच्या सत्तेविरोधात असंतुष्ट असणाऱ्या एतद्देशीय संस्थानिकांना अंतस्थपणे चिथावणी देण्याचे कार्य तो नेमाने करत होता. परंतु, भविष्यात इंग्रजांशी पुन्हा एकदा सामना जुंपल्यास त्याकरता लागणाऱ्या लष्करी सज्जतेच्या तरतुदीकडे त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले. पेशवाईचा अस्त होईपर्यंत बाजीरावाशी त्याचा अखंड पत्रव्यवहार सुरु होता. पेशव्याच्या बव्हंशी गुप्त बेतांची --- इतर सरदारांपेक्षां --- त्यांस पुरेपूर कल्पना होती. पुढे - मागे पेशवा इंग्रजांशी लढा पुकारणार असल्याची जाणीव स. १८१४ मध्येच पुण्याच्या निष्ठावंत सरदारांना झाली होती. दौलतरावही त्यांस अपवाद नव्हता ! 

    त्यादृष्टीने पाहता संभाव्य लढ्यासाठी आवश्यक त्या उपाय योजनांची आखणी करून त्या अंमलात आणायचे सोडून दौलतराव आपल्याच विश्वात रममाण झाला. कधीतरी खुळ्या बाजीरावाचे, मूर्ख होळकराचे त्यांस इंग्रजविरोधी आघाडीत सहभागी होण्याचे पत्र येई, त्यावेळी दौलतराव भानावर यायचा.  मग एकाला दहा अशी लांबलचक आश्वासने उलटपत्री रवाना करून आपल्या दुनियेत परत जायचा. सारांश, महादजीच्या या पराक्रमी, कर्तबगार नातवाने वाडवडिलांनी कमावलेल्या राज्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यातच आपल्या आयुष्याचे सार्थक केले !
    दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत इंग्रजांना अगदी सरंपुरंस्तोर खडं चारणारा एकमेव मराठी सेनानायक यशवंतराव होळकर दि. २७ ऑक्टोबर १८११ रोजी मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा मल्हारराव याची होळकरांच्या गादीवर स्थापना करून यशवंतरावाच्या पत्नीने --- तुळसाबाईने राज्यकारभार हाती घेतला. स्त्री, मग ती कोणत्याही जाती / धर्माची का असेना, तिने कारभार हाती घेताच पुरुषांनी तिच्या ताबेदारीत इमानाने चाकरी बजावल्याची उदाहरणे या देशात अपवादानेच आढळतील ! दुर्दैवाने तुळसाबाईची राजकीय कारकीर्द देखील या नियमास अपवाद निघाली नाही. यशवंतरावाच्या पश्चात त्याच्या सरदारांत दुफळी माजली. होळकरशाहीचा निष्ठावंत पेंढारी सरदार अमीरखान ---  आता होळकरी दौलतीला आपल्या नियंत्रणाखाली आणू पाहात होता तर हडपसरच्या मैदानात गमावलेला डाव भरून काढण्यासाठी सोबत्यांचा दौलतराव कट - कारस्थाने रचत होता. या सर्वांना मोठ्या धीराने तोंड देत तुळसाबाई होळकरी दौलतीचा कारभार मोठ्या दक्षतेने पाहात होती.

    बाजीरावाचे यशवंतरावाशी लाख शत्रुत्व असेल पण, इंग्रजांशी बिघाड करायचे ठरवल्यावर त्याने आपल्या बापाच्या प्रमुख आधारस्तंभाच्या वारसांची उपेक्षा केली नाही. होळकरांकडे गुप्तपणे पत्रे पाठवून भावी युद्धात आपल्या सोबत सहभागी होण्याची त्याने विनंतीवजा सूचना केली. वास्तविक, पेशव्याने आपणहून होळकरांशी अधिकृतरित्या संबंध तोडल्याने बाजीरावाच्या आज्ञेला / विनंतीला मान देण्याची तुळसाबाईस अजिबात आवश्यकता नव्हती. परंतु, दौलतीची पूर्वपरंपरा आणि नवऱ्याची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने पेशव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व वैर विसरून दौलतरावासही भावी संग्रामात पेशव्याच्या मदतीला येण्याची विनंतीपत्रे तिने रवाना केली. इकडे बाजीरावाने दि. १३ जून १८१७ रोजी इंग्रजांशी अखेरचा तह करून लगेचच गणेशपंत पिटके * व धोंडोपंत तात्या यांना होळकर, शिंदे, अमीरखान व कोटेकरांना इंग्रज विरोधी मसलतीत मिळवून घेण्यासाठी उत्तरेत रवाना केले.

    नागपूरकर भोसल्यांची कथा शिंदे - होळकरांपेक्षा थोडी वेगळी असली तरी जवळपास त्याच वळणाची आहे. दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील पराभवानंतर नागपूरचा दुसरा रघुजी भोसले बराचसा भानावर आला असला व त्याच्या मनी इंग्रजांच्या विषयी कितीही शत्रुभाव वसत असला तरी आपल्या पक्षाची मजबुती करण्याकडे त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याच्या सत्तेखालील प्रचंड मोठा, पण दुर्गम प्रदेश असल्याने झटक्यासरशी तो ताब्यात घेणे इंग्रजांना सहजसाध्य नव्हते. त्यात जर रघुजीने आपले लष्कर अधिक सुधारले असते तर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धानंतरही भोसल्यांचा पूर्वीचा दरारा, इभ्रत राखण्यात त्यांस यश मिळाले असते. परंतु, त्याच्या अंगी आवश्यक त्या गुणांचा अभाव असल्याने हे कार्य त्याच्याकडून घडून आले नाही. मात्र, नागपूरकरांना तैनाती फौजेच्या बंधनांनी बांधून घेण्याची इंग्रजांची मसलत त्याने आपल्या हयातीत सिद्धीस जाऊ दिली नाही, हे देखील विसरता येत नाही. 

    दि. २२ मार्च १८१६ रोजी रघुजीचा मृत्यू होऊन भोसल्यांच्या गादीवर त्याचा मुलगा परसोजी भोसले विराजमान झाला. यासमयी परसोजीचे वय सुमारे अडतीस असून बौद्धिकदृष्ट्या तो या पदास योग्य नव्हता. परसोजी खेरीज भोसल्यांच्या वंशात आणखी एक वारस होता व तो म्हणजे रघुजीचा पुतण्या, व्यंकोजीपुत्र मुधोजी उर्फ आपासाहेब हा होय ! रघुजीच्या निधनसमयी याचे वय वीस वर्षांचे होते. रघुजीच्या मनी आपल्या पुतण्याविषयी अजिबात प्रेमभाव नव्हता. त्याने त्याची जहागीर देखील जप्त करून त्यास जवळपास निष्प्रभ केले होते. परंतु, आपासाहेब बराच महत्वकांक्षी आणि खटपटी प्रवृत्तीचा होता. त्याने नागपूरचा इंग्लिश रेसिडेंट जेन्किन्सनच्या मार्फतीने आपली व्यवस्था लावून घेतली. रघुजीच्या पश्चात परसोजी नामधारी राज्यप्रमुख राहून सर्व कारभार रघुजीचा रक्षापुत्र धर्माजीच्या हाती गेला. त्याने रघुजीच्या मुलीचा मुलगा --- चिटकोजी गुजरला दत्तक घेण्याची योजना आखली. आपासाहेबास याची कुणकुण लागताच त्याने इंग्रजांकडे खटपट करून नागपूरचा कारभार आपल्याकडे आल्यास तैनाती फौजेच्या तहावर सही करण्याची त्यांना लालूच दाखवली.
    त्यानुसार इंग्रजांच्या मदतीने आपसाहेबाने धर्माजीला कैद करून नागपूरचा कारभार आपल्या हाती घेऊन स. १८१६ च्या एप्रिल अखेर इंग्रज रेसिडेंट जेन्किन्सन मार्फत तैनाती फौजेचा करार केला. आपासाहेबाने हा करार करू नये यासाठी नागपूरातील कित्येक वजनदार दरबारी इसमांनी, पेशव्याने त्याच्यावर हस्ते - परहस्ते दडपण आणले. परंतु, आपासाहेबाने त्या सर्वांस झिडकारले. पुढे दि. १ फेब्रुवारी १८१७ रोजी सकाळी परसोजी बिछान्यात मृतावस्थेत आढळून आला. परसोजीच्या खुनाआधी काही दिवस आपासाहेब नागपुरातून बाहेर गेला होता. त्याच्या अनुपस्थितीने संशयाची सुई जरी त्याच्याकडेच वळली असली तरी इंग्रजांच्या दमदार पाठींब्याने त्यातूनही तो निभावून गेला.  

    परसोजीच्या निधनानंतर भोसल्यांची गादी आपासाहेबांस मिळाली. आता त्यांस कायदेशीर मान्यता मिळावयाची बाकी असल्याने, त्याने पेशव्याकडे  वस्त्रांची मागणी केली. इथवर इंग्रजांशी त्याचे वर्तन चांगले होते. परंतु, स. १८१७ च्या जूनमधील तहाने पेशवा आणि नागपूरकरांचा संबंध साफ तुटला. तसेच या घटनेनंतर काही महिन्यांतच बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारल्याने त्याने आपासाहेबाकरता पाठवलेल्या सरदारीच्या वस्त्रांचा स्वीकार करण्यास इंग्रजांनी हरकत घेतली. परंतु, इंग्रजांची आडकाठी न जुमानता ता. २४ नोव्हेंबर १८१७ रोजी मोठ्या समारंभाने हि वस्त्रे स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, महत्त्वकांक्षी आपासाहेबास नागपूरची गादी मिळवण्यापुरतीच इंग्रजांची गरज होती. परंतु, अननुभवामुळे त्याने तैनाती फौजेचे लोढणे गळ्यात बांधून घेतल्याने त्याचा हा डाव सपशेल फसला. तसेच, हाती अधिकार आल्यावर संग्रामाच्या दृष्टीने पुरेशी पूर्वतयारी करण्यास त्यांस फारसा वेळही मिळाला नाही व परसोजी प्रकरणामुळे नागपुरातील एक मोठा गट त्याच्या विषयी नेहमी साशंक राहिल्याने त्याच्या इंग्रजविरोधी लढ्याच्या तयारीस स्वाभाविकच मर्यादा पडत गेल्या.
 
६] दि. १३ जून १८१७ चा तह :- आधीच्या कलमांत सांगितल्यानुसार गव्हर्नर जनरलच्या खलित्यावरून एल्फिन्स्टनने ता. १ जून रोजी वसई व पंढरपूरच्या तहानंतर जे काही पेशव्याचे राजकीय स्वातंत्र्य उरले होते, ते हिरावणाऱ्या अटी पेशव्यास कळवल्या. त्यानुसार, (१) नर्मदेपलीकडील उत्तरेतील पेशव्याच्या ताब्यातील सर्व मुलुख इंग्रजांना देणे (२) स्वतःच्या सरदारांकडे तसेच इतर दरबारी असणारे वकील परत बोलावणे आणि आपल्या दरबारातील सरदार व इतरांच्या वकिलांना रजा देणे, या गोष्टी मुख्य होत्या. या अटी मान्य पेशव्याचे ' पेशवे ' पद फक्त नाममात्र राहून तो त्याच्याच पदरी असलेल्या पटवर्धन प्रभूती जहागीरदारांपैकी एक बनणार होता. म्हणजे छत्रपतींच्या अष्टप्रधानातील मुख्य प्रधानाचा राजकीय दर्जा आता त्याच्या हाताखालील चाकारांच्या बरोबरीचा होणार होता.

    बाजीरावाला आता इंग्रजांशी मैत्रीचे संबंध राखण्यात अजिबात स्वारस्य उरलं नसल्याने त्याने फार आढेवेढे न घेता तहास मंजुरी देऊन टाकली. पेशव्याच्या या वर्तनाचा अर्थ एल्फिन्स्टनलाही समजत होता. परंतु, यावेळी चाणाक्ष एल्फिन्स्टनही पेशव्याच्या कृतीने गोंधळात पडला, हेही तितकेच खरे ! हा तह सहजासहजी घडेल अशी एल्फिन्स्टनची मुळातच अपेक्षा नव्हती. आणि समजा झालाच तर पेशवा तातडीने त्याविरोधात काही तरी हालचाल करेल असाही त्याचा एक अंदाज होता. या हालचाली म्हणजे हस्ते - परहस्ते कंपनी सरकारविरुद्ध लढा पुकारणे, कारस्थाने रचणे इ. होय. परंतु, खासा पेशवा युद्धास उभा राहील असे एल्फिन्स्टनला अजिबात वाटत नव्हते.

    इकडे पेशव्याने इंग्रजांशी केलेल्या नवीन तहाची माहिती मराठी संघराज्यात त्वरेने पसरली. वरकरणी पेशव्याने सरदारांचे व सरदारांनी पेशव्याचे वकील आपापल्या दरबारातून काढून टाकले असले तरी खासगी कामानिमित्त ते नेमलेल्या शहरीच तळ ठोकून राहिले. पेशव्याने लष्कराची सर्व सूत्रे बापू गोखल्याच्या हाती दिली. कारण, त्याबाबतीत नाव घेण्यासारखा दुसरा सरदार त्याच्या पदरी नव्हता आणि दक्षिण हिंदुस्थानात बापू खेरीज इतर मराठी सरदाराची इंग्रजांना अजिबात दहशत नव्हती ! स. १८१७ च्या ऑक्टोबर पूर्वी केव्हातरी पेशव्याने लष्कराची जाबाबरी बापुवर सोपवून राजकीय कारस्थानांची आघाडी स्वतःकडे घेतली. तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाचे हे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. नाहीतर आतापर्यंत एकाच व्यक्तीला राजकीय व लष्करी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. बाजीरावाने या परंपरेस छेद देऊन एकप्रकारे हि नवीन प्रथा सुरु केली असे म्हणता येईल.

७] कंपनी सरकारची पेंढाऱ्यांविरुद्ध मोहीम :- नेपाळ युद्ध थंडावताच गव्हर्नर जनरल हेस्टींग्सने पेंढाऱ्यांच्या बंदोबस्ताचे प्रकरण हाती घेतले. पेंढाऱ्यांविरुद्धची मोहीम देशभर चालणार असल्याने इंग्लिशांच्या अंकित असणाऱ्या प्रत्येक संस्थानिकाने या स्वारीच्या यशाकरता सक्रिय मदत करावी असे गव्हर्नरचे मत होते. हि मदत प्रामुख्याने आर्थिक व लष्करी स्वरुपाची असून संस्थानिकांनी आपापल्या फौजफाट्यासह स्वतःच्या राज्याच्या सरहद्दींवर युद्धाच्या तयारीने सज्ज राहायचे होते. म्हणजे इंग्रजांकडून मार खाउन पळणाऱ्या पेंढाऱ्यांना कोणत्याच प्रदेशात, राज्यात आसरा मिळू नये अशी यामागील इंग्रजांची राजकीय व लष्करी खेळी होती.  

    इंग्रजांच्या माहितीनुसार उत्तरेतील पेंढाऱ्यांचा वावर मुख्यतः शिंदे - होळकरांच्या राज्यात व राजपुतान्यात प्रामुख्याने होता. तेव्हा या मोहिमेसाठी हेस्टिंग्सने आपल्या लष्कराचे मुख्य दोन भाग करत --- उत्तरेकडील प्रदेशाची जबाबदारी स्वतःकडे घेत बुंदेलखंडातील कलिंजर व यमुना नदीच्या दरम्यान ठिकठिकाणी लष्कराच्या तुकड्या पेरल्या. उत्तर हिंदचा असा बंदोबस्त करून हेस्टिंग्सने दक्षिणेची जबाबदारी सर टॉमस हिस्लॉपवर सोपवत त्याच्या सोबत राजकीय आघाडी सांभाळण्याकरता जॉन माल्कमची नियुक्ती केली. खेरीज डोव्हटन, स्मिथ, फ्लॉयर व प्रिट्झलर हे चार सेनानीही हिस्लॉपच्या हाताखाली तैनात करण्यात आले. जॉन माल्कमला हिस्लॉपच्या सोबत पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्त केल्याने एल्फिन्स्टनला वैषम्य वाटलं. कारण, पेंढाऱ्यांच्या नावाखाली पेशवाईला तिलांजली देण्याचा जो व्युह त्याने आखला होता, त्याची अंमलबजावणी आता माल्कमच्या परवानगीने करणे आवश्यक बनले. परिणामी, हा एल्फिन्स्टनच्या कार्यक्षेत्रात एकप्रकारचा अधिक्षेप होता. परंतु, कंपनीची नोकरी व राष्ट्राभिमान यांमुळे इंग्रजांच्या आपसांतील मानापमान नाट्यावर मर्यादा पडत ! असो, पेंढाऱ्यांवरील या मोहिमेसाठी कंपनी सरकारने सुमारे १ लक्ष १६ हजार सैन्य जमवले होते. त्याखेरीज ३०० तोफांचा प्रबळ तोफखानाही होता. याव्यतिरिक्त इंग्रजांच्या मांडलिक संस्थानिकांची जी फौज होती ती वेगळीच ! या तुलनेने पेशवा, मराठी सरदार आणि पेंढाऱ्यांच्या फौजेचा आकडा किती होता ?

     इंग्रजांच्या माहितीनुसार स. १८१४ मध्ये सीतू पेंढारी १५ हजार फौजेचा धनी होता. दोस्त / वसील महंमदकडे ६ हजार तर इतर पेंढारी सरदारांकडे मिळून ८ हजार स्वार होते. म्हणजे स. १८१७ मध्ये पेंढाऱ्यांचे सैन्य २० - ३० हजारांहून कमी नव्हते हे निश्चित ! याखेरीज सर्वात मोठा व प्रबळ पेंढारी सरदार म्हणजे अमीरखान होय. याच्याकडे ३० हजार सैन्याचा भरणा असून त्यात प्रशिक्षित कवायती पायदळ आणि तोफखान्याचाही समावेश होता. होळकरांच्या सैन्याची आकडेवारी मला मिळाली नाही, तरीही त्यांची फौज २० - २५ हजाराहून कमी नसावी. शिंद्याकडे ४० हजाराचे लष्कर असून त्यात मुख्यतः कवायती पलटणांचा अधिक भरणा होता. पेशव्याकडे स. १८१५ च्या अखेरीस ११ हजार स्वार आणि ६ हजार पायदळ मिळून १७ हजारांची फौज होती. त्याशिवाय  नागपूरकर भोसले आणि जहागीरदारांची भरती वेगळीच ! सारांश पेंढारी, पेशवा व शिंदे - होळकर मिळून मराठी पक्षाकडे इंग्रजांइतकेच १ लक्षाहून अधिक सैन्य होते.

    परंतु, या सैन्याचे नेतृत्व एकमुखी नव्हते. पेंढारी सरदारांच्या टोळ्या होत्या. अमीरखान ' उगवत्या सूर्याला प्रणाम ' करणाऱ्यांमधला होता. होळकरांच्या सैन्यात फाटाफूट झाली होती. शिंद्याला तर फौजेचा पगार वर्षानुवर्षे कधी देताच आला नाही. नागपूरकरांची तऱ्हा याहून वेगळी होती. आपासाहेबाचे स्वतःच्या सरदारांवर --- पर्यायाने सैन्यावर फारसे नियंत्रण नव्हते. राहता राहिला पेशवा, तर त्याची बव्हंशी फौज नवीन असून मुख्य मदार बापू व इतर जहागीरदारांवर ह्होती. तात्पर्य, इंग्रज - मराठी पक्षांचे पारडे समतोल जरी असले तरी परस्परांच्या गुण - दोषांमुळे त्यांची बल व वैगुण्यं मुख्य युद्धाआधीच उघड होऊ लागली होती. 


                                                                                  ( क्रमशः )      

( * गणेशपंत पिटकेला बाजीरावाने उत्तरेत नेमके कधी रवाना केले याविषयी रियासतकार सरदेसाईंनी आपल्या ' मराठी रियासत खंड ८ ' मध्ये दोन परस्परविरोधी विधाने केली आहेत. पहिल्या विधानानुसार स. १८११ - १२ दरम्यान पेशव्याने पिटकेला यशवंतरावाकडे पाठवल्याचा उल्लेख आहे तर दुसऱ्या ठिकाणी स. १८१७ मध्ये. यातील नेमके कोणते विधान ग्राह्य धरायचे ? मुख्य म्हणजे मराठी रियासतीच्या स. १९९२ च्या द्वितीय आवृत्तीच्या संपदकांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: