रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १४ )




१] पेंढारी युद्धास आरंभ :- पेशव्याचे राज्य जिंकण्याच्या हेतूने परंतु, वरकरणी पेंढाऱ्यांच्या बंदोबस्ताच्या नावाखाली इंग्रजांनी स. १८१७ च्या पावसाळ्यात मोहिमेस आरंभ केला. पेशव्याचे प्रकरण गव्हर्नर जनरलने जॉन माल्कमच्या गळ्यात टाकून त्यांस दक्षिणेत रवाना केले. यावेळी पुण्याचा तह उरकून ' उद्विग्न ' अवस्थेत बाजीराव पंढरपूरला गेला होता. तेथून त्याने माहुलीला काही काळ मुक्काम केला. अर्थात, वरकरणी हि पेशव्याची दरवर्षी प्रमाणे ' देवदर्शन ' मोहीम असली तरी निर्णायक लढ्याच्या तयारीकरताच तो पुण्यातून बाहेर पडला होता. माहुलीच्या तळावर त्याने माल्क्मची भेट घेऊन, ' इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचा आपला विचार असला तरी अलीकडे एल्फिन्स्टनच्या अरेरावी वर्तनामुळे आपणांस याविषयी पुनर्विचार करणे भाग असल्याचे ' मोठ्या सूचकपणे सांगितले.

    
वास्तविक माल्कमचे या भेटीमागील उद्देश अनेक होते. (१) पेशवा इंग्रजांशी निष्ठेने राहण्यास तयार आहे कि नाही हे पहाणे. (२) पेंढाऱ्यांवरील स्वारीत तो इंग्रजांना मनापासून मदत करेल कि नाही याची चाचपणी करणे. (३) जर पेशवा युद्धाची तयारी करत असेल तर पेंढारी प्रकरणाच्या निमित्ताने त्याची उचलबांगडी करणे.
पुढील इतिहास पाहता माल्कमने आपले काम चोख बजावल्याचे दिसून येते. पेशव्यानेही आपल्या अकलेची शर्थ करत त्यांस तोडीस तोड देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याची हि राजकीय खेळी शेवटी व्यर्थच गेली !    

    
माल्कमच्या भेटीपूर्वी वा नंतर पेशव्याने सातारकर छत्रपतींना माहुलीला आणून त्यांची भेट घेऊन संभाव्य युद्धात आपल्या पाठीशी राहण्याची कळकळीने विनंती केली. यावेळी पेशव्याने आपले बिघाडाचे बेत छत्रपतींच्या कानी घालून त्यांस मसलत गुप्त ठेवण्याची विनंतीवजा सूचना केली. छ्त्रपतीनेही पेशव्याला आश्वस्त करून भेटीचा वृत्तांत, मसलतीसह एल्फिन्स्टनला कळवला तर सावधगिरीचा उपाय म्हणून पेशव्याने छत्रपतीला परिवारासह वासोटा किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवले.

    
बाजीरावाच्या या कृत्याबद्दल इतिहासकारांनी त्यांस सडकून दोष दिला असला तरी, मूर्ख बाजीरावास जितकी अक्कल होती तितकी या विद्वान इतिहासकारांस नसल्याचे मोठ्या खेदाने नमूद करावे लागत आहे. कारण, इंग्रजांच्या भावी डावपेचांचा अंदाज जसा पेशव्याला आला होता, तसा आमच्या बव्हंशी देशी विद्वान इतिहासकारांना बिलकुल आला नाही व अजूनही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. छत्रपतीला हाताशी धरून इंग्रज आपली उचलबांगडी करणार याची पेशव्याने अचूक अटकळ बांधली होती. त्याला इंग्लंड राष्ट्र माहिती नसेल. इंग्लंडची राणी - पार्लमेंट - कंपनी सरकार यातील फरक समजत नसेल पण छत्रपती - पेशवा यातील फरक / अंतर तो ओळखून होता. फार लांब कशाला, महादजीने मिळवलेल्या वकील - इ - मुतलकीवर वॉरन हेस्टिंग्सचा डोळा होता, यातून चाणाक्ष वाचकांनी बोध घ्यावा !

    
इकडे उत्तरेत गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्यांची मोहीम चालवण्यासाठी कलकत्त्याहून आपला मुक्काम इटाव्याला हलवला. (  सप्टेंबर, स. १८१७ ) दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत बाजीरावाने अदूरदर्शीपणाने बुंदेलखंड इंग्रजांना देऊन टाकल्याचा हा दृश्य परिणाम ! खासा ' लाटसाहेब ' उरावर येउन बसल्याने दौलतरावाच्या युद्धाच्या बाता जागच्या जागी जिरल्या. गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली मोठी फौज बुंदेलखंडात आल्याने अमीरखानाने देखील आपली पगडी फिरवली. शीख राजा रणजितसिंहाने दिल्लीकडील आपली नजर हटवून अफगाण आणि काश्मीरकडे आपला मोर्चा वळवला. एका स्त्रीच्या हाताखाली लढण्यास नाखूष असणाऱ्या होळकरी सरदारांच्या एका गटास मनातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ' कोणीही यावे नि बडवून जावे ' अशी गत झालेल्या बेवारशी राजपूत संस्थानिकांना नवा जोम प्राप्त झाला. सारांश, गव्हर्नर जनरलच्या बुंदेलखंडातील नुसत्या उपस्थितीने हे राजकीय उलथापाथीचे खेळ सुरु झाल्याने राजकारणाच्या पटावर इंग्रजांच्या सोंगट्यांचा वरचष्मा वाढला !

२] पेंढारी, शिंदे, होळकर, भोसले इ. चे तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील वर्तमान :-  लॉर्ड हेस्टिंग्सच्या छावणीचे मुख्य मुक्काम मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहेत. सप्टेंबरमध्ये इटावा, ऑक्टोबरमध्ये कानपूर व नंतर तेथून तो आगऱ्याच्या समोर आला. याचा परिणाम म्हणजे ता. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी दौलतराव शिंदे आणि कंपनी सरकारच्या दरम्यान आणखी एक तह होऊन, त्यात दौलतराव पुरता इंग्रजांच्या कचाट्यात सापडला. या वेळपर्यंत पेंढाऱ्यांवरील मोहिम सुरु झाली होती. इंग्रजांच्या मदतीला गेलेले शिंद्याचे सरदार पेंढाऱ्यांचा अंतस्थरित्या शक्य तितका पाठपुरावा करत होते पण, मुख्य धनीच इंग्रजांच्या विरोधात हात - पाय गाळून बसल्याने त्यांना याहून अधिक विशेष असे काही कार्य करून दाखवता आले नाही. लॉर्ड हेस्टिंग्सला शिंद्याचा भरवसा अजिबात नसल्याने त्याने डिसेंबर आरंभी आपला तळ ग्वाल्हेरनजीक सोनारी येथे हलवला. खासा लाटसाब छाताडावर येउन बसल्याने दौलतरावाचे विलासी डोळे पांढरे
व्हायचे बाकी राहिले होते.
 
    वास्तविक, पेशव्याने इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारून तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धास आरंभ केला होता. इंग्रजांची एक मोठी तुकडी पेंढाऱ्यांच्या पाठीवर गुंतून पडली होती. दौलतरावाने होळकरांना मायेत घेऊन आजवरच्या कारस्थानांनुसार गव्हर्नर जनरलवर चाल करून जाण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु, हे त्याच्याने झाले नाही.

    
इकडे लष्करांत फाटाफूट झालेली असल्याने तुळसाबाईने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. यावेळी बाजीरावही पुण्याची लढाई आटोपून उत्तरेकडे यायला निघाला होता. होळकर -  पेशव्याची गाठ न पडावी यासाठी माल्कम आणि हिस्लॉप जिवाचा आटापिटा करत होते. होळकरी सरदारांना, अमीरखानाला फितवण्याचा माल्कमचा उद्योग सुरूच होता. तसेच दौलतरावाप्रमाणे होळकरांशीही तह करून त्यांना आपल्या पक्षात वळवून घेण्याचा माल्कमचा प्रयत्न चालला होता.
 
तुळसाबाईने एकीकडे इंग्रजांशी तहाची बोलणी चालवत दक्षिणेकडे आपली वाटचाल सुरूच ठेवत महित्पूरला क्षिप्रा नदीकाठी  स. १८१७ च्या डिसेंबरात तळ ठोकला. इंग्रजांना हर तऱ्हेने होळकरांची दक्षिणेकडील आगेकूच रोखायची असल्याने त्यांनी होळकरशाही पेंढारी सरदार गफूरखान मार्फत ता. २० डिसेंबरच्या रात्री तुळसाबाईचा ' मोठ्या शौर्याने, पराक्रमाने ' खून करवून आपल्या विजयाची निश्चिती केली !
    
तुळसाबाईच्या खुनाचे वर्तमान दुसऱ्या दिवशी लष्करांत पसरते न पसरते तोच हिस्लॉप व माल्कमची सेना होळकरी छावणीनजीक येउन त्यांनी ' शरण या अथवा युद्धाला सज्ज व्हा ' या आशयाचा निरोप होळकरी सरदारांना पाठवला. यावेळी लष्करांत बराच गोंधळ माजला. कित्येक फितुरी सरदार, अंमलदार आपापल्या पथकांसह निघून जाऊ लागले. तुळसाबाईच्या मृत्यूमुळे सैन्याचे नेतृत्व बारा वर्षांचा मल्हारराव आणि त्याचा चुलतभाऊ हरीराव होळकर करत होते. या दोन मुलांनी व होळकरांच्या निष्ठावंत सरदारांनी महित्पूरला इंग्रजांशी शक्य तितका निकराचा सामना दिला. घडल्या संग्रामात इंग्रजांचे सुमारे १७४ लोक मारले जाउन ६०४ जखमी झाले. जखमी व मृतांत इंग्रजी अंमलदारांचा मुख्य भरणा होता हे विशेष !
महित्पूरच्या लढाईचा निकाल इंग्रजांच्या बाजूने लागताच अमीरखानाने उघडपणे आपला पक्ष बदल यशवंतरावाच्या पत्नीवर --- केसरबाईवर इंग्रजांशी तह करण्याचा दबाव आणला. यावेळी होळकरांना मुख्य आधार तो या अमीरखानाचाच होता व त्यानेच बाजू दिल्याने निरुपाय जाणून सर्व सरदारांनी केसरबाईला तह करण्याचाच सल्ला दिला. तेव्हा ता. ६ जानेवारी १८१८ रोजी मंदसोर येथे केसरबाईने माल्कम मार्फत कंपनी सरकारशी तैनाती फौजेचा तह करून एकप्रकारे शरणागती पत्करली.

    
इकडे पाठीवर इंग्रज फौजा घेऊन करीमखान व वसील महंमद ग्वाल्हेरकडे तर सीतू होळकरांच्या प्रदेशात शिरू लागले. सीतूचे होळकरांशी अंतस्थसूत्र जुळले होते. संधी मिळताच होळकरांची फौज सीतूच्या पाठीवरील इंग्रजी सैन्यावर चढाई करण्याच्या बेतात होती. माल्कमला याची जाणीव असल्याने त्याने अमीरखानला फोडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. कारण, अमीरखान हा सर्व पेंढारी सरदारांत बराच सामर्थ्यवान आणि कुशल सेनानी असल्याने त्याची दहशत इंग्रजांना बरीच होती. परंतु, अमीरखानलाच इंग्रजांच्या आश्रयास जाण्याची मोठी उत्कंठा लागल्याने माल्कमचा पुढील कार्यभाग बराच सुलभ झाला. अमीरखान व त्याचे हस्तक इंग्रजांना अनुकूल झाल्याने पेंढाऱ्यांचा इंग्रजांपुढे फार काळ निभाव लागू शकला नाही. त्यातच दौलतराव शिंदे अगदीच स्वस्थ बसल्याने व तुळसाबाईचा खून करून इंग्रजांनी महित्पूरची लढाई मारल्याने उत्तरेतील पेंढाऱ्यांचा आश्रय साफ तुटून स. १८१८ च्या फेब्रुवारीपर्यंत पेंढाऱ्यांचा दंगा बव्हंशी आटोक्यात आला.
    
दौलतराव शिंदे पतंग उडवण्याचा खेळ बघण्याच्या आविर्भावात हा सारा तमाशा आपल्या संस्थानाच्या प्रदेशात बसून निमुटपणे पहात होता.

    
स. १८१७ च्या फेब्रुवारी आरंभी नागपूरकर परसोजीचा खून होऊन राज्यास दुसरा वारस नसल्याने व आपासाहेबास इंग्रजांचा पाठिंबा असल्याने त्याने राज्याची सूत्रे आपल्या हाती घेत पूर्वप्रघातानुसार पेशव्याकडून ' सेनासाहेबसुभा ' पदाच्या वस्त्रांची मागणी केली. यावेळी पेशवा - इंग्रजांमधील संबंध सलोख्याचे असल्याने एल्फिन्स्टन वा जेन्कीन्सनने त्यांस हरकत घेतली नाही आणि बाजीरावानेही फार ताणून न धरता आपासाहेबास पदांची वस्त्रे पाठवून दिली. याचे मुख्य कारण माझ्या मते, आपासाहेब व बाजीरावाचे अंतस्थरित्या जुळलेलं सूत्र असावं. पुण्याहून अधिकारपदाची वस्त्रे येईपर्यंत आपासाहेबाने वरकरणी इंग्रजांशी स्नेहाची बोलणी चालवत आतून त्यांच्याशी लढाईची तयारीही चालवली होती. परंतु, आपासाहेबाचे बरेचसे राजकारण आजवर इंग्रजांच्या मदतीने झाल्याने नागपूर दरबारची कित्येक मंडळी त्याच्यापासून दुरावली होती. त्यांनी या समयी आपासाहेबास मनापासून मदत केली नाही. अर्थात, यावेळचे परस्परांचे बलाबल आणि मराठी संघराज्यातील सर्वांनाच एकमेकांविषयी वाटणारा अविश्वास यांमुळे तत्कालीन मुत्सद्दी - सरदारांना दोष देण्यात फारसा अर्थ नाही.
    
स. १८१७ च्या ऑक्टोबर अखेर पेशवा - इंग्रजांचे संबंध कमालीचे ताणले जाऊन नोव्हेंबर आरंभी उभयतांचे युद्ध सुरु झाल्याची बातमी नागपुरास आली आणि पाठोपाठ पेशव्याने आपासाहेबास दिलेली अधिकारपदाची वस्त्रे येउन पोहोचली. आता आपासाहेबाच्या परीक्षेची वेळ होती. त्याने रेसिडेंट जेन्किन्सनला ' दि. २४ नोव्हेंबर रोजी आपण अधिकारपदाची वस्त्रे धारण करणार असल्याचे ' कळवले. अर्थात, इंग्रज - पेशव्यात युद्ध सुरु झाल्याने पेशव्याकडून आलेल्या वस्त्रांचा स्वीकार करण्यास रेसिडेंटने नापसंती दर्शवली. पण त्यास न जुमानता ता. २४ नोव्हेंबर १८१७ रोजी आपासाहेबाने मोठ्या समारंभाने पेशव्याने पाठवलेल्या वस्त्रांचा स्वीकार केला. यावेळी इंग्लिश रेसिडेंटास सोहळ्याचे आमंत्रण देऊनही तो उपस्थित न राहिल्याने आपासाहेबास कळायचं ते कळून चुकले.
    
ता. २६ नोव्हेंबर १८१७ रोजी सायंकाळी इंग्रजांच्या छावणीवर हल्ला करण्याची
आपासाहेबाने सैन्यास आज्ञा दिली.भवितव्याची कल्पना येउन चुकल्याने इंग्रजांनी सीताबर्डीच्या टेकड्यांचा आश्रय घेऊन आपल्या संरक्षणाची शक्य ती तरतूद करत आपासाहेबाच्या सरदार - मुत्सद्द्यांत फूट पाडण्याचा सडकून प्रयत्न केला. परिणामी ता. २७ नोव्हेंबर १८१७ पर्यंत सीताबर्डीच्या टेकड्या भोसल्यांच्या ताब्यात न येता इंग्रज कायम राहून, उलट ठीकठिकाणच्या इंग्लिश पलटणी वेगाने त्यांच्या मदतीस येऊ लागल्या. यावेळी स. १८०३ मध्ये बाजीरावाने जी भूमिका बजावली जवळपास त्याचीच पुनरावृत्ती आपासाहेबाने केली. ठामपणे इंग्रजांच्या विरोधात उभं न राहता पराभवाचा रंग पाहून त्याने समेटाची बोलणी चालवली. मऊ लागल्यावर कोपराने खणायची संधी दवडेल तो राजकारणी कसला ? जेन्किन्सनने या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आपासाहेबास ता. १६  डिसेंबर १८१७ रोजी आपल्या ताब्यात घेतले.
    
इंग्रजांना यावेळी संपूर्ण नागपूरचे राज्य खालसा करणे अशक्य असल्याने त्यांनी भोसल्यांचे राज्य व सैन्य कमी करून आणि किल्ल्यांचा संपूर्ण ताबा आपल्याकडे घेऊन राज्यपदाची सूत्रे परत एकदा आपासाहेब भोसल्यास दिली. ( जानेवारी, स. १८१८ ) कागदी तहावर भोसल्याने सैन्यास रजा दिली असली व किल्ल्यांचा ताबा इंग्रजांना लिहून दिला असला तरी कमी केलेली फौज बाजीरावाच्या मदतीस पाठवून दिली तर अखेरपर्यंत किल्ले लढवण्याची ताकीदपत्रे किल्लेदारांना अंतस्थरित्या रवाना करण्यात आली. सीताबर्डीच्या संग्रामाआधी नागपुरातून चांद्याला पाठविलेला खजिना, जडजवाहीर आपासाहेबाने परत न मागविता अज्ञात स्थळी त्याची रवानगी केली. आपल्या हस्तकांमार्फत पेशव्याशी अंतस्थ सूत्र राखून त्याच्या मदतीला जाण्याची तजवीज चालवली. आपसाहेबाच्या या खटपटीवर जेन्किन्सनची नजर होतीच. त्याने या संदर्भात गव्हर्नर जनरलला रिपोर्ट पाठवून पुढील कारवाईसाठी आदेशांची मागणी केली. इकडे आपासाहेबाचा सरदार गणपतराव सुभेदार पेशव्याला घेऊन नागपुरास येऊ लागला. चांद्याला जाउन पेशव्याला सामील होण्याचा आपासाहेबाने बेत आखला. तेव्हा जेन्किन्सनने गव्हर्नर जनरलच्या आदेशांची वाट न बघता ता. १५ मार्च १८१८ रोजी सकाळी आपासाहेबास कैद करून दि. ३ मे १८१८ रोजी अलाहाबादेस रवाना केले. परंतु, ता. १३ मे १८१८ रोजी रायचूर मुक्कामी आपासाहेब इंग्रजांच्या कैदेतून निसटून गेला. गोंडांच्या सहाय्याने त्याने नंतर इंग्रजांना बराच उपद्रव दिला पण दरम्यान पेंढारी, पेशवा यांची धडपड बंद पडल्याने आपासाहेब लाहोरकडे सटकला. लाहोरास जाउन त्याचे काम न झाल्याने किंवा तिकडे जाता न आल्याने त्याने जोधपुरचा राजा मानसिंगचा आश्रय घेतला. आपासाहेबास आपल्या ताब्यात देण्याविषयी इंग्रजांनी जोधपुरकरांवर बरेच दडपण आणले पण मानसिंगाने त्यांस न जुमानल्याने अखेर इंग्रजांनी त्याविषयीचा आग्रह सोडून दिला. जोधपुरास असताना ता. १५ जुलै १८४० रोजी आपासाहेबाचे निधन झाले. इकडे आपासाहेब कैदेतून पळून गेल्यावर इंग्रजांनी नागपूरच्या गादीवर दत्तकाची नियुक्ती करून नाममात्र ते राज्य राखले !
     
    आपासाहेबाच्या पराभवाची कारणे, भोसल्यांच्या पूर्वेतिहासात भरपूर सापडतील. अगदी थोरल्या माधवरावाच्या काळापासूनची ! परंतु, तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धापुरता विचार करायचा झाल्यास नागपूरकर भोसल्यांचा प्रदेश पेंढारी सरदारांना गनिमी पद्धतीने लढण्यास अतिशय उपयुक्त होता. दुर्गम प्रदेश, अपरिचित रस्ते यांमुळे इंग्रजांना त्या प्रदेशात दीर्घकाळ युद्ध चालवणे शक्य नव्हते. या ठिकाणी जॉन माल्कमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्याने स. १८१७ च्या नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये पेंढाऱ्यांत फूट पाडण्याचे, होळकरी दरबारात फितूर पेरण्याचे कार्य करून त्यांना माळव्यातून खाली उतरू दिले नाही. जर होळकर माळव्यातून खाली आले असते अन पेंढारी नागपूरकरांच्या प्रदेशांत शिरले असते तर पेंढारी, आपासाहेब आणि होळकरांच्या पुढे इंग्रजांचा बिलकुल निभाव लागला नसता !

३] बाजीराव - एल्फिन्स्टनचे राजकीय शह - प्रतिशह :- स. १८१७ च्या जूनमध्ये इंग्रजांसोबत तह करून बाजीराव पंढरपूरच्या यात्रेसाठी बाहेर पडला. पंढरपूर, माहुली करत कार्तिकस्वामीला जाण्याचा त्याने बेत जाहीर केला. मात्र, कार्तिकस्वामीला जाण्याऐवजी त्याचा माहुलीलाच बराच काळ मुक्काम झाला. याच सुमारास जॉन माल्कमने त्याची भेट घेतली. पेशव्याच्या या भेटीत माल्कम वरवर जरी बाजीरावाच्या संभाषणाने भारावला असला तरी त्याच्यातील महत्त्वकांक्षी राजकारणी पुरुष जास्तच सावध झाला. त्याने पेशव्याविषयीचा आपला रिपोर्ट गव्हर्नर जनरलला पाठवून ' त्याच्याशी सामोपचाराचे धोरण ठेवण्यात कंपनीचे हित असल्याचे ' कळवले. अर्थात, माल्कमचा हा शेरा एल्फिन्स्टनच्या अति आक्रमक धोरणावरील ठपका असला तरी पेंढारी युद्धाच्या निमित्ताने पेशव्याने इंग्रजांविरोधी केलेली लष्करी व राजकीय व्युहरचना त्याच्या लक्षात आली होती. माल्कम हा जरी आक्रमक साम्राज्यवादी राजकारणी असला तरी आपल्या सत्तेची पाळेमुळे या जमिनीत दृढ होण्यासाठी थोड्याफार राजकीय मवाळपणाचीही गरज असल्याचे त्यांस चांगलेच ठाऊक होते. खेरीज, पेंढारी वगैरे प्रकरणे उरकल्यावर मग एकाकी पेशव्याचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेणे कंपनी सरकारसाठी अतिशय सोईचे जाणार होते, याचीही त्यास जाणीव होती.

    
माल्कमची भेट झाल्यावर पेशवा कार्तिकस्वामीच्या यात्रेस जाणार असल्याचे समजताच एल्फिन्स्टनने पेशव्याच्या भेटीकरता माहुलीला येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा पेशवा पुण्यास परतला. यावेळी गव्हर्नर जनरलने आखलेल्या पेंढारी मोहिमेच्या तयारीकरता म्हणून पेशव्याने उघडपणे सैन्य भरती आरंभली होती. एल्फिन्स्टनच्या मते पेशव्याची हि तयारी पेंढाऱ्यांवरील स्वारीच्या जरुरीपेक्षा जास्त होती. त्याने पेशव्याला आपली फौज कमी करण्याचा सल्ला देत नवीन फौज पुण्याच्या आसपास न ठेवता राज्याच्या सरहद्दीवर पाठवण्याची सूचना केली. तेव्हा पेशव्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र जनरल स्मिथ पेशव्याची तैनाती फौज आपल्या सोबत घेऊन पेंढारी मोहिमेकरता राज्याच्या सरहद्दीवर जाऊ लागला तेव्हा बाजीरावाने सरदार विंचूरकरांचे एक पथक स्मिथच्या मदतीसाठी पाठवून ' कंपनी सरकारशी आपल्याला मैत्रीचे संबंध राखायचे असल्याचे ' कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाखवून दिले.

    
पेशवा आणि इंग्रज वरकरणी परस्परांशी कितीही प्रेमभाव दाखवत असले तरी आतल्या अंगाने दोन्ही पक्ष निर्णायक लढ्याकरता परस्परांच्या विरोधात शक्य तितक्या सर्व खटपटी करत होते. ज्याप्रमाणे एल्फिन्स्टनने पेशव्याच्या अवती - भवती हेरांच जाळं विणलं होतं, त्याचप्रमाणे पेशव्यानेहि एल्फिन्स्टनला घेरलेलं होतं. उभयपक्षांची माणसे याकामी निष्ठेने फितुरीचे कार्य बजावीत होती. मात्र, पेशव्याकडील इंग्रजांना फितूर होणाऱ्या लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक होते तर यशवंतराव घोरपड्यासारखे ' डबल एजंट ' दोन्हीकडून पैसे खाउन आपला स्वार्थ साधत होते. बाजीरावाने इंग्रजी सैन्यात फितूर करण्याची शिकस्त केली. त्याचा मुख्य भर कॅप्टन फोर्डच्या तैनातीखालील पलटणींना आपल्या पक्षात वळवून घेण्यावर होता. कागदावर जरी हि फौज बाजीरावाने स्वतःकरता स्वतंत्रपणे उभारली असली तरी तिचा सेनानायक इंग्रज असल्याने तो कोणत्या पक्षाकडून लढणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती !


    एल्फिन्स्टनने पेशव्याभोवती जे हेरांचे जाळे विणले होते त्यातून पेशव्याच्या राजकीय – लष्करी तयारीची त्यास इत्यंभूत म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी बातमी मिळत होती असे म्हणावे लागते. कारण, जर खरोखर त्यांस परिपूर्ण, अचूक माहिती मिळाली असती तर तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा शेवट स. १८१७ मध्येच झाला असता ! असो, गुप्तहेरांकडून मिळालेल्या बातम्या व अनेक मार्गांनी जमवलेली माहिती ज्यामध्ये --- पेशव्याच्या राज्याचे महसूल उत्पन्न, फौज, सैन्याच्या अधिकाऱ्यांची नावे, पेशवा आणि त्याच्या सरदारांचे चारित्र्य रिपोर्ट इ. त्याने दख्खनचा सरसेनानी हिस्लॉपकडे पाठवून दिली. एल्फिन्स्टनच्या या माहितीचा हिस्लॉपला --- पर्यायाने कंपनी सरकारला किती फायदा झाला हे वाचकांना निराळे सांगायची गरज नाही !



    असो, इंग्रजांच्या विरोधात पुकारल्या जाणाऱ्या लढ्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी पेशव्याने आपल्या तर्फेने युद्धाची कसून तयारी चालवली. गड – किल्ल्यांच्या बंदोबस्ताकरता विशेष हुकुम सोडण्यात आले. आरमाराची डागडुजी चालवली. त्रिंबकजीला हस्ते – परहस्ते मोठमोठ्या रकमा पोहोचवल्या जाऊ लागल्या. पेशव्याच्या कारवायांना तोंड देण्याकरता इंग्रजांनीही निरनिराळ्या कारणांस्तव लष्करभरती आरंभली. परंतु, इंग्रजी सैन्यात दाखल होण्यापासून एतद्देशीय लोकांना परावृत्त करण्यासाठी पेशव्याने आपल्या प्रांतिक अधिकाऱ्यांना विशेष हुकुम दिले. परिणामी, इंग्रजांकडील भरतीचा ओघ मंदावून पेशवा आणि त्याच्या जहागीरदारांच्या पथकांत लोकं मोठ्या उत्साहाने नि संख्येने दाखल होऊ लागले. पेशव्याच्या या वेगाने वाढणाऱ्या सैन्यामुळे एल्फिन्स्टन प्रभूती इंग्रजांच्या मनात आरंभी धडकी जरी भरली असली तरी आज सैन्यात दाखल झालेला शिपाई व अनुभवी सैनिकातील फरक ते चांगलेच ओळखून होते. या बाबतीत पेशवा आणि त्याच्या सरदारांचेही वेगळे मत नव्हते !



    अखेर स. १८१७ च्या १४ ऑक्टोबर रोजी बाजीराव – एल्फिन्स्टनची पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात भेट झाली. या भेटीत बाजीराव – एल्फिन्स्टनने परस्परांच्या मनाचा थांग लावण्याचा प्रयत्न केला व दोघेही काही प्रमाणात त्यात यशस्वी झाले. यानंतर ता. १९ ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा समारंभ झाला. त्यावेळी अलीकडच्या रिवाजानुसार पेशव्याने रेसिडेंटच्या सलामीचा स्वीकार करणे टाळले. एल्फिन्स्टनला हा आगाऊ इशारा होता. परंतु, बाजीरावाच्या नाटकी वर्तनाचा एल्फिन्स्टनच्या मनावरील पगडा पूर्णपणे दूर न झाल्याने अजूनही बाजीराव युद्धाचा धाक घातल्यास हात बांधून शरण येईल अशी त्यांस कुठेतरी खुळचट आशा वाटत होती. मात्र, त्या जोडीला विपरीत प्रसंगाला तोंड देण्याचीही त्याने तयारी चालवली. इंग्लिश फौजा पुण्यापासून बऱ्याच दूर गेल्या होत्या. जनरल स्मिथ तैनाती व कंपनीच्या सैन्यासह जालन्याला होता. त्याला एल्फिन्स्टनने पत्राद्वारे संभाव्य धोक्याची इशारत देत ‘ ज्या दिवशी माझ्याकडून येणारी डाक चुकेल त्याच दिवशी पुण्याकडे चाल करून यावे ‘ अशा आशयाची सूचनाही देऊन ठेवली. मुंबईच्या सैन्यालाही पुण्याकडे येण्याच्या तयारीत राहण्याचे आदेश दिले गेले. सारांश, स. १८१७ च्या दसऱ्यानंतर उभय पक्ष वर्दळीवर येण्याची चिन्हे दिसू लागली होती. फक्त आरंभ कोण करतो याचीची बाकी होती आणि नेमके याच गोष्टीवर दोन्ही पक्ष काहीसे संभ्रमित होते.



    इंग्रजांची तयारी, पेंढारी युद्धाला झालेला आरंभ पाहता याच वेळी बिघाड करावा कि अजून काही काळ लोटून द्यावा याचा पेशव्याला विचार पडला होता. तसेच खुद्द पेशवा यावेळी युद्धास उभा राहिला नाही तर शिंदे होळकर प्रभूती सरदारही युद्धात उतरणार नाहीत हे देखील उघड होते. अशा स्थितीत बिघाडाची नेमकी वेळ ठरवण्याच्या विवंचनेत पेशवा पडला होता. त्याउलट, पेंढारी युद्धांत आपल्यावर बाजू उलटली वा तशीच एखादी अडचणीची वेळ कंपनी सरकारवर आली कि पेशवा आपल्या विरोधात शस्त्र उपसण्यास मागे पुढे पाहणार नाही हे एल्फिन्स्टनला कळून चुकले होते.



४] तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धास आरंभ :- स. १८१७ चा दसरा उलटून गेल्यावर घटना मोठ्या वेगाने घडू लागल्या. एल्फिन्स्टन व बाजीराव पेशवा बैठ्या राजकारणात कितीही थंड वृत्ती धारण करत असले तरी उभयपक्षाच्या सरदारांना व सैनिकांना आवरून धरणे उत्तरोत्तर अवघड बनू लागले. पुण्यात यावेळी कंपनीची फार मोठी फौज नव्हती. मुळा – मुठेच्या संगमावर रेसिडेन्सी असून तिथे काही जुजुबी सैन्य होते. काही पथके गारपीरावर होती. त्याखेरीज पेशव्याने स्वतःसाठी स्वतंत्र उभारलेली कॅप्टन फोर्डच्या नेतृत्वाखालील एक मोठी लष्करी तुकडी दापोडीला तळ ठोकून होती. या फोर्डला आणि त्याच्या सैन्याला आपल्या पक्षात वळवण्याचे शक्य तितके उपाय पेशव्याचा कारभारी मोरदीक्षित मराठेने केले. परंतु, त्यांस यश आले नाही. तेव्हा निदान फोर्डने तटस्थ राहावे अशी मोरदीक्षितने त्यांस सूचना केली असता, तीही फोर्डने फेटाळून लावल्याने फोर्ड व त्याचे सैन्य यावेळपासून शत्रूपक्षात मोडू लागले.



    एल्फिन्स्टनची हलाखी पाहून बापूने याचवेळी इंग्रजांशी युद्ध करण्याचे निश्चित केले. परंतु, पेशव्याच्या मनाचा निश्चय होत नव्हता. त्याची राजकारणे अजून आकारास आली नव्हती. पेंढारी युद्धाच्या निमित्ताने मिळणारी हवी तशी संधी अजून दृष्टीक्षेपात नव्हती. इतर संस्थानिकांकडून पत्रोत्तरी मिळणारा अनुकूल प्रतिसाद अपवाद केल्यास इतर कसलीच आशादायक वार्ता येत नव्हती. आणि त्याही उपर म्हणजे युद्धप्रसंग राजधानीत घडवून आणणे योग्य आहे कि नाही यावरही त्याच्या मनाची आणि सल्लागारांची चलबिचल उडाली होती.



    एका पक्षाच्या मते युद्ध पुकारल्यावर राजधानी वगैरेचा विचार करणे चुकीचा आहे तर दुसऱ्या गटाच्या मते युद्धप्रसंग राजधानीपासून दूरवर करणे केव्हाही श्रेयस्कर. रणभूमीचा कसलाच अनुभव नसलेला बाजीराव यांमुळे गांगारून गेला नसल्यास नवल ! पेशव्याने युद्धाचा निर्णय घ्यावा यासाठी बापू त्यावर दडपण आणू लागला होता. ता. २८ ऑक्टोबर रोजी रात्री मराठी सैन्याच्या तळावर युद्धाच्या दृष्टीने हालचाली होऊ लागली. एल्फिन्स्टनचा मुक्काम नजीकच संगमावर असल्याने तो यावेळी अगदीच भांबावून गेला. याक्षणी किंवा उद्या सकाळीच लढाईला तोंड लागले तर आपली धडगत नसल्याचे त्याने ओळखले. परंतु, त्याच्या सुदैवाने रात्रभर विचार करून पेशव्याने युद्धाचा निर्णय पुढे ढकलला व एल्फिन्स्टनसह इंग्रजांनी सुटकेचा निःश्वास टाकला !



    पेशव्याकडून बिघाडाचा निर्णय घेण्यात होणाऱ्या दिरंगाईचा परिणाम म्हणजे ता. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईची फौज खडकीला येऊन दाखल झाली व मुंबईची पलटणे येताच एल्फिन्स्टनने गारपीरवरची तुकडी खडकीला पाठवली. बापू गोखले वगैरे जाणत्या सरदारांच्या दृष्टीने पेशव्याने व्यर्थ काल दवडून एक ‘ सोन्यासारखी संधी ‘ वाया घालवली होती. कारण, मुंबईची फौज येण्यापूर्वीच पुण्यातील मुठभर इंग्लीशांचा चुराडा करून मग मुंबईकरांना लोळवण्याचा त्यांचा विचार होता. खेरीज, ठीकठिकाणच्या इंग्लिश पलटणी पुण्याकडे चालून येत असल्याच्या बातम्याही त्यांना मिळत होत्या. लवकरात लवकर निर्णय घेऊन इंग्रजांशी युद्ध न पुकारल्यास उत्तरोत्तर पुण्यातील कंपनी सरकारचा सेनासागर वाढत जाऊन वसईसारखा प्रसंग उद्भवण्याची दाट शक्यता होती. परंतु, बाजीरावाला सर्व काही कळूनही वळत नव्हते. तीच गोष्ट एल्फिन्स्टनचीही ! दोघेही आपापल्या स्थळांची मोर्चेबंदी करून ‘ प्रथम आगळीक विरुद्ध पक्षाने ‘ करायची वाट बघत बसले.



    या कुचंबलेल्या स्थितीतून मार्ग काढणारी एक घटना ता. २ नोव्हेंबर रोजी घडली. संगमावरून मुंबईला जाणाऱ्या शॉ नामक इंग्रजास गणेशखिंडीजवळ दोन – तीन मराठी सैनिकांनी भाला मारून जखमी केले. कुरापतखोर एल्फिन्स्टनसाठी हे एक चांगले निमित्त होते. परंतु, नेहमीच्या पद्धतीने घडल्या घटनेची त्याने पेशव्याकडे तक्रार केली. पेशव्यानेही पूर्वसंप्रदायानुसार चौकशी, कारवाईचे आश्वासन दिले. २ नोव्हेंबरचा दिवस मावळून गेला. पाठोपाठ ३ नोव्हेंबरही उलटून गेला. पेशव्याकडून होणाऱ्या चालढकलीने इंग्रज काहीसे गोंधळात पडले होते. पेशवा नेमका कधी युद्ध घोषित करणार याचा त्यांना अंदाज येत नव्हता. यामुळेच कि काय ररेसिडेंट एल्फिन्स्टन संगमावरील आपल्या निवासस्थानी तळ ठोकून राहिला होता. अर्थात, रेसिडेन्सीतील बिनलढाऊ बुणगाईत व अधिकाऱ्यांचे कबिले खडकीला पाठवून दिलेले होतेच. परंतु, तांत्रिक कारणांमुळे एल्फिन्स्टनने आपली मुक्कामाची जागा काही सोडली नाही. युद्ध आपल्यावर लादले गेल्याचा त्यांस कांगावा करता यावा याकरताही तो तेथे राहिला असण्याची शक्यता आहे.



    अखेर ता. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी बापूने छावणीत जाऊन लष्कराला सज्जतेचे आदेश दिले. बापूची हि कृती सैन्याला वा पेशव्याला अनपेक्षित नसली तरी मराठी सैन्याच्या हालचालीने शहरवासीयांच्या मनाचा बांध फुटून घबराटीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते. असो, सैन्याची जबाबदारी बापूवर सोपवल्यावर बाजीराव आपल्या परिवारासह पर्वतीकडे गेला.

ता. ५ नोव्हेंबर १८१७ रोई खडकी येथे पेशव्याच्या व इंग्रजांच्या सैन्याचा सामना घडून आला. तोफांच्या मारगिरीस दुपारी आरंभ होऊन सायंकाळच्या सुमारास बापू गोखल्याने घोडदळाच्या सहाय्याने पलटणांवर हल्ला चढवला. परंतु त्याच्या घोड्याला गोळ्या लागल्याने व अंधार पडत चालल्याने हा हल्ला निर्णायक न ठरता त्यांस मागे यावे लागले. खडकीच्या युद्धास आरंभ झाल्याचे समजताच कॅप्टन फोर्ड दापोडीहून आपली पलटणे घेऊन खडकीला येऊ लागला. फोर्डच्या हालचालींची आगाऊ अटकळ बांधून त्यांस वाटेतच रोखण्याची जबाबदारी बापूने विंचूरकर आणि मोर दीक्षित मराठेवर सोपवली होती. या दोघांनी खडकीच्या संग्रामात फोर्डची कुमक इंग्रजी पक्षाला अजिबात मिळू दिली नाही परंतु, या प्रयत्नात मोर दीक्षित मराठे मात्र जीवानिशी गेला !



    रात्र पडल्याने खडकीचे झुंज निकाली निघाले नाही. उभयपक्षांच्या मनुष्यहानीचे इतिहासकारांनी दिलेले विविध विषम आकडे पाहता या युद्धाच्या हकीकती विजयी पक्षाने बऱ्याच विकृत केल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ, या लढाईत पेशव्याच्या बाजूच्या मृत वा जखमी सैनिकांचा आकडा ५०० दिला असून इंग्रजांचे फक्त ८६ जायबंदी वा मृत झाल्याचे नमूद केले आहे. असो, खडकीच्या अनिर्णीत संग्रामात फितुरीचा फटका उभयपक्षांना चांगलाच बसला. कॅप्टन फोर्डच्या सैन्यातील सुमारे २०० सैनिक युद्धापूर्वीच वा युद्धास आरंभ झाला त्या दिवशी छावणी सोडून निघून गेल्याचा उल्लेख मिळतो. यांमुळे पेशव्याच्या तुलनेने अल्प सैन्यबळ असलेल्या इंग्रजांना थोडाफार धक्का बसला. त्याउलट खडकीच्या युद्धास आरंभ होण्यापूर्वी मराठी सैन्याच्या एका पथकाने संगमावर हल्ला चढवला. त्यावेळी एल्फिन्स्टन काही मोजक्या शिपायांसह तिथे होता. मराठी सैन्य जवळ आल्याचे पाहताच गुप्त पत्रे जाळून साहेब मजकूर अंगावरच्या वस्त्रांनिशी नदी पार करून खडकीच्या दिशेने पळू लागले. काही स्वारांच्या आटोक्यात तो आला असतानाही थोडाफार गोळीबार करत सहीसलामत निघून जाण्यात तो यशस्वी झाला. मराठी सैनिकांनीही साहेबाला पकडण्याचे वा मारण्याचे प्रयत्न न करता संगमावरील बंगल्यांची लुट, जाळपोळ करण्यात धन्यता मानली !



    खडकीची लढाई वस्तुतः पेशव्याच्या फौजेने सहज निकाली काढली असती असे, लढाईची उपलब्ध वर्णने वाचून माझे मत बनले आहे परंतु, कित्येक सरदारांचा मानस ‘ इंग्रज मोडण्याचा ‘ नसल्याने त्यांनी झटून काम केले नाही. त्यामुळे खडकीची लढाई --- वास्तविक त्यांस लढाई ऐवजी ‘ चकमक ‘ हाच शब्दप्रयोग योग्य आहे --- अनिर्णीत बनल्यास नवल ते काय ! असो, खडकीच्या चकमकीनंतर दुसऱ्या दिवशी फिरून हल्ला चढवण्याची बापूने तयारी चालवली परंतु, यावेळी पेशव्याने त्यांस मोडता घातला. बाजीरावाच्या या अनकलनीय राजकीय निर्णयाचा फटका मराठी पक्षास बसायचा तो बसलाच ! परंतु, बाजीरावाने याच वेळी पुण्यातील इंग्रजी सैन्याचा नायनाट का करू दिला नाही याचे उत्तर चिकित्सक इतिहास अभ्यासकांनी शोधणे अत्यावश्यक आहे.



    इकडे ता. ५ नोव्हेंबरची एल्फिन्स्टनची डाक चुकताच जनरल स्मिथ दि. ८ नोव्हेंबर रोजी जालन्याहून पुण्यास यायला निघाला. यावेळी पुण्यात पेशवा आणि इंग्रजांचे मोर्चे कायम असून उभयपक्षी वाटाघाटी आणि चकमकींचा उद्योग सुरूच होता. वास्तविक, पेशव्याने इंग्रजांशी चालवलेल्या या वाटाघाटींना आता राजकीयदृष्ट्या काही अर्थ नव्हता. इंग्रजांना रणभूमीवर मराठी सैन्याने अजून सडकून मार न दिल्याने पेशव्याला अनुकूल अशा अटींवर ते तहास तयार होतील याची इतक्यात तरी शक्यता नव्हती. त्यामुळे पेशव्याने वाटाघाटींचे गुऱ्हाळ का लावले ते समजत नाही. उलट अशा वाटाघाटींत दिवस वाया घालवण्यात एल्फिन्स्टनचा मोठा फायदा होता, हे पेशव्याला अगदीच समजत नसेल असे संभवत नाही. अन्यथा त्याने जनरल स्मिथची वाट अडवण्याकरता नारो आपटे व अक्कलकोटकर भोसल्यांना पाठवले नसते. या बाबतीत असाही एक तर्क केला जाऊ शकतो कि, खडकीच्या लढाईचे वृत्त सर्वत्र पसरताच ठीकठिकाणच्या मराठी सरदारांनी, संस्थानिकांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याची पेशवा वाट बघत होता. पण हा अतार्किक तर्क आहे. कारण, समस्त हिंदुस्थानच्या संस्थानिकांचा असा काही कट असल्याचे पुरावे नाहीत. राहिला प्रश्न मराठी सरदारांच्या संघटन व उठावाचा तर हे कार्य खडकीच्या विजयाने जितक्या सहजतेने व प्रभावीपणे घडून आले असते तितके खडकीच्या अनिर्णीत चकमकीनंतर थंडपणे बसून राहिल्याने थोडीसाध्य होणार होते ? असो, ता. ६ नोव्हेंबर पासून दि. १३ नोव्हेंबरपर्यंतचा अमुल्य वेळ पेशव्याने निष्फळ चर्चेत वाया घालवून आपल्या पराभवाचा पाया रचला. या दरम्यान आपटे व अक्कलकोटकरांना धुडकावत ज. स्मिथ ता. १३ नोव्हेंबर रोजी येरवड्यास येऊन दाखल झाला.                    



५] येरवड्याची लढाई आणि पुण्यावर इंग्रजांचा अंमल :- जनरल स्मिथ येरवड्यास येऊन दाखल झाला तरी आपणहून मराठी सैन्यावर चाल करण्याचे धाडस त्याने केले नाही. याचे कारण म्हणजे, नदी किनारा तोंडावर धरून तो मोर्चेबंदी करून उभा राहिल्याने नदीपार करून आपल्या अंगावर चालून येण्याचे अवघड कोडे त्याने बापू गोखल्यास घातले. नाईलाजाने बापूने देखील हे आव्हान स्वीकारले. ता. १६ नोव्हेंबर १८१७ रोजी मराठी सैन्याने जनरल स्मिथच्या पलटणांवर चढाई केली. गोखले, पुरंदरे, रास्ते, आपटे, पटवर्धन मंडळींनी प्रयत्नांची शिकस्त केली. या लढाईत  मराठी सैन्यातील प्रादेशिक – भाषिक अर्थाने ‘ मराठी लोकां ‘ पेक्षा अरब व गोसावी जास्त शौर्याने लढले. परंतु, फितुरांनी या ठिकाणीही त्यांचा घात केला. विंचूरकराच्या समोर इंग्रजी पलटणांनी पेशव्याच्या तोफा ताब्यात घेतल्या असता त्याच्या स्वारांनी त्यांस अडथळा केला नाही. आबा पुरंदरे जिथे उभा होता तिथे अचूक दहा हातांवर इंग्रजी तोफखान्याचे गोळे येऊन पडू लागले. अशा स्थितीत रात्र पडली तरीही युद्ध उभयपक्षी युद्ध सुरूच होते. अखेर मराठी सैन्याने टोळ्या - टोळ्यांनी झुंज देत रणभूमीतून माघार घेण्यास आरंभ केला. त्यांचा प्रमुख बाजीराव पेशवा यापूर्वीच सासवडला निघून गेला होता. पाठोपाठ त्याची पिछाडी सांभाळत गोखले वगैरे पद्धतशीरपणे लढाईतून बाहेर पडले. पेशवा आणि त्याच्या सरदारांनी सैन्यासह पुणे सोडल्याने येरवड्याची लढाई आपण जिंकल्याची शेखी इंग्रजांना मिरवता आली. वास्तविक, खडकी प्रमाणेच येरवड्याचाही संग्राम निर्णायक ठरला नव्हता. जनरल स्मिथ ना पेशव्याच्या संपूर्ण फौजेचा पराभव करू शकला ना माघार घेणाऱ्या सैन्याची लांडगेतोड वा लुट ! परंतु, कारण नसताना पेशव्याने पुणे सोडल्याने येरवड्याची लढा आपण जिंकल्याचा दावा इंग्रजांना करता आला आणि रणभूमीचा ताबा घेणारा पक्ष विजयी म्हणून मानण्याची परंपरा असल्याने याविषयी आक्षेप तरी कोण आणि कसा घेणार ?



    येरवड्याच्या लढाई नंतर पेशवा पुणे सोडून गेल्यावर इंग्रजांनी पुण्याचा ताबा घेतला. दि. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी बाळाजीपंत नातूच्या मार्फत इंग्रजांनी शनिवारवाड्यावर आपला ध्वज फडकवला. हि गोष्ट / घटना पुरेशी बोलकी आहे. बोधप्रद आहे. असो, येरवड्याहून सासवडला गेल्यावर तेथून बाजीराव जेजुरी, तांबवे, देहू, पाडळी करत ता. १४ डिसेंबर रोजी सिद्धटेकास आला. या मुक्कामी नारोपंत आपटे वासोट्याहून छत्रपतींना सहपरिवार घेऊन पेशव्यास सामील झाला. पेशव्याच्या पाठीवर, तोंडावर ठीकठीकाणांहून इंग्लिश पलटणे धावून येत होती व गोखले, विंचूरकर, घोरपडे इ. सरदार त्या पलटणांना तोंड देत पेशव्याची वाट निर्धोक करत होते.



   येरवड्यानंतर इंग्रज – पेशव्याचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. पेशव्याच्या मुक्कामाच्या दौडी व हुलकावण्या पाहून ता. ६ डिसेंबर १८१७ रोजी एल्फिन्स्टनने ज. स्मिथला पत्र पाठवून थेट पेशव्यालाच हस्तगत करण्याची सूचना केली. परिणामी, चारी बाजूंनी स्मिथने पेशव्याला घेरण्याचा उपक्रम चालवला. अशा स्थितीत एक दोन ठिकाणी मोठ्या लढाया घेऊन शत्रूवर आपला शह बसवण्याऐवजी पेशवा मुक्कामाच्या जागा बदलत व तहाच्या हुलकावण्या देत राहिला. यातील मुख्य लढाया टाळण्यामागील कारणपरंपरा लक्षात येते पण तहाच्या हुलकावण्या का ? उलट यामुळे आपल्या अस्थिर मनोवृत्तीच्या सहाय्यकांना फुटण्यास प्रोत्साहन मिळेल याचा पेशव्यास कसा विसर पडला ? खैर, इंग्रज – पेशव्याच्या या सुमारे दीड महिन्याच्या पाठशिवणीच्या खेळात ज. स्मिथने सुमारे ४०० मैलांचा प्रदेश तुडवला. मात्र, त्याच्या पदरी त्या मानाने काहीच यश पडले नाही. किरकोळ चकमकी वगळता पेशव्याच्या सैन्याशी त्याचा निर्णायक संग्राम होत नव्हता. अशा स्थितीत ज. स्मिथला हुलकावण्या देत बाजीराव ता. ३१ डिसेंबर १८१७ रोजी भीमा – कोरेगावला येऊन पोहोचला. याच वेळी पेशवा कदाचित पुण्याला जाईल म्हणून शिरूरची एक इंग्लिश तुकडी पुण्याच्या दिशेने येत होती, ती याच सुमारास कोरेगाव जवळ आली. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना वाटले ‘ आता आपण बरे कचाट्यात सापडलो ! ‘ पेशव्याच्या तुलनेने इंग्लिश फौज अत्यल्प असल्याने तिला समोर सर्वनाश दिसत होता तर पेशव्याला हा एक सापळाच वाटला. कोरेगावी शिरूरची फौज आडवी आली. दुसऱ्या बाजूने पुण्याची फौज येऊन त्यांनी आपणांस येथेच रोखले तर पाठीमागून ज. स्मिथची धाड आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत त्याने शिरूरच्या फौजेला रोखण्यासाठी एक तुकडी कोरेगावी ठेवली आणि तो स्वतः छत्रपतीला घेऊन साताऱ्याच्या दिशेने गेला. इकडे पाठीमागे ता. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगावी इंग्रज – मराठी सैन्याची दिवसभर चकमक घडून आली. आधीच्या लढायांप्रमाणेच हि झुंज देखील निकाली न निघता अंधार पडताच मराठी फौज लढाईतून बाहेर पडली तर इंग्रजांनी शिरूरचा रस्ता धरला.



    भीमा – कोरेगाव नंतर इंग्रजांनी आपल्या धोरणात बदल केला. यावेळपर्यंत उत्तरेत होळकरांचा निकाल लागून गेला होता. दौलतराव शिंदे गपगार बसला असून सीताबर्डीच्या टेकड्यांवर भोसल्यांच्या तलवारीची धार बोथट झाली होती. पेंढाऱ्यांची वाताहत होऊन ते चारी दिशांना जीव घेऊन पळत सुटले होते. अशा स्थितीत, एक बाजीराव पेशवा सुसज्ज फौज घेऊन दक्षिणेत फिरत होता. पेशव्याला असाच भटकू देणे इंग्रजांना परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा पेशव्याला कोंडीत पकडण्यासाठी एल्फिन्स्टनने प्रिट्झलरला सोबत घेऊन साताऱ्याचा किल्ला ताब्यात घेत गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार दि. ११ फेब्रुवारी १८१८ रोजी बाजीराव विषयी जनतेस  उद्देशून एक जाहीरनामा काढला. 

    या जाहीरनाम्यानुसार इंग्रजांनी प्रथमच अधिकृतपणे गंगाधरशास्त्र्याच्या खून प्रकरणात त्रिंबकजीला प्रत्यक्ष तर बाजीरावास अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरले. खुनाचे काम तडीस नेण्याची जबाबदारी त्रिंबकजीची तर त्यामागील डोके बाजीरावाचे अशी ती दोष विभागणी होती. मात्र, यासाठी जनवार्तेचा आधार घेत लोकांच्या दृष्टीनेही बाजीराव कसा गुन्हेगार असूनही आपण केवळ मैत्रीखातर त्यांस त्यावेळी माफ केल्याची ‘ उदार बुद्धीही ‘ इंग्रजांनी दाखवून दिली. तसेच पेशव्याच्या कैदेतून छत्रपतीला मोकळे करून राज्यावर नेमण्याची पुडी सोडण्यात आली. त्याशिवाय हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत जो कोणी पेशव्याची नोकरी सोडून येईल त्याचे वतन, इनाम पूर्ववत चालवले जाण्याचे आश्वासन देण्यात आले. उलट जो पेशव्याला चिटकून राहील त्याच्या वतनाची, इनामाची जप्ती करण्याची धमकीही देण्यात आली. प्रांतिक अधिकाऱ्यांना पेशव्याकडे महसूल जमा न करण्याची एक प्रकारे आज्ञा फर्मावत, पेशव्याला मदत केल्यास सूड उगवण्याचा इशाराही देण्यात आला. खेरीज, पेशव्याचे राज्य खालसा होऊन कंपनी सरकारचे राज्य आल्यावर इनामे, वर्षासने पूर्ववत चालवण्याचे मधाचे बोट लावण्यात आले.



    पेशव्याच्या विरोधात इंग्रज इतके आकाश – पातळ एक करत असताना बाजीराव काय करत होता ? या काळातील पेशव्याच्या बाजूची विश्वसनीय माहिती अजून माझ्या वाचनात आली नाही. या काळातील जी माहिती मिळते त्यानुसार आपल्या हिंदुस्थानभर पसलेल्या सर्व सरदारांशी, कित्येक संस्थानिकांशी पेशव्याचा पत्रव्यवहार चालला होता. हाताशी सुसज्ज फौज असूनही इंग्रजांशी एखादी मोठी लढाई करण्याचे तो टाळत होता. तहाच्या वाटाघाटी इंग्रजांशी त्याच्या चालल्या होत्या व ‘ आपल्या आणि इंग्रजांच्या दरम्यान जो काही दुरावा आला आहे त्याचे मूळ बापू गोखले असून आजवर घडल्या दोषांपासून कंपनी सरकार आपणांस मुक्त करणार असेल तर आपण गोखल्यास विषप्रयोगाने ठार करण्यास तयार ‘ असल्याचे बाजीरावाने गव्हर्नर जनरलला कळवले होते. ‘ आता प्रश्न असा आहे कि, गव्हर्नर जनरलची हि नोंद खरी मानायची कि पुढील घटनाक्रम पाहता बाजीरावाची हि ‘ भीषण हुलकावणी ‘ होती असे म्हणायचे ? या प्रकाराला नेमके काय म्हणायचे हे निदान माझ्या तरी आकलना पलिकडचे आहे.



६] गोपाळअष्टीची लढाई, बापू मातीशी तर छत्रपती इंग्रजांना मिळाला :-   जानेवारी – फेब्रुवारीत पेशव्याची घोडदौड सुरूच होती. आरंभी निपाणीकडे मोठी लढाई घेण्याचा त्याचा व सरदारांचा विचार चालला होता पण फितुरीमुळे पेशव्याने तो बेत रद्द करून सोलापूरकडे जमल्यास लढाई घेण्याचे ठरवून ता. १९ फेब्रुवारीला गोपाळअष्टीला आला. यापूर्वीच कंपनी सरकारचा जाहीरनामा प्रसिद्ध होऊन पेशव्याच्या गोटातील कित्येकजण इंग्रजांना फितले होते. ज्या दिवशी पेशवा अष्टी मुक्कामी आला त्याच दिवशी जनरल स्मिथ अवघ्या काही मैलांवर वेळापुरास येऊन थडकला. यावेळी मराठी तळावर छत्रपती व पेशवा हि दोन महत्त्वाची राजकीय मोहरी असून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने बापू गोखले व आपा देसाई निपाणकरावर होती. जोडीला बाबर, रास्ते, गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे होतेच. मात्र यांपैकी आपा देसाई आतल्या अंगाने इंग्रजांना मिळाला होता तर पेशव्याची साथ सोडण्याचे छत्रपतीने निश्चित केले होते. परिणामी जनरल स्मिथ जवळ आल्याचे समजूनही त्याच रात्री मुक्काम न हलवता पेशव्याचा तळ आहे तिथेच राहून दि. २० फेब्रुवारी रोजी ज. स्मिथ आपल्या सैन्यासह पुढे चालून आला.

    यावेळी छावणीत गोंधळ माजून इंग्रजांना रोखण्याच्या कामगिरीवर पेशव्याने बापू व निपाणकराला पाठवले. पैकी, बापू आज्ञेबरहुकूम कामगिरीवर गेला तर देसाई मागे राहिला. छ्त्रपती प्रतापसिंहाने आपल्या घोड्याचा वेग मंद राखत सहपरिवार इंग्रजांच्या गोटात जाणे पसंत केले. इकडे बापू  गोखले आणि आनंदराव बाबर जीवावर उदार होऊन इंग्रजांशी लढता – लढता अष्टीच्या संग्रामात मारले गेले. पेशव्याची भली मोठी फौज या समयी असूनही प्रत्यक्ष संग्रामात फार थोड्यांनीच सहभाग घेतला. इंग्रजांना यावेळी मोठेच यश लाभले. योजनेबरहुकुम त्यांना छत्रपती – पेशवा या दुकलीला ताब्यात घेता आले नसले तरी बापूचा मृत्यू व छत्रपतीचे ताब्यात येणे हेही यश थोडके नव्हते !



    अष्टीच्या संग्रामानंतर सर्व चित्र पालटले. फौजबंद असूनही पेशव्याच्या डोक्यावरील छत्रपतीचे छत्र इंग्रजांनी हिरावून घेतल्याने तो साफ उघडा पडला. बाजीरावाला पायबंद घालण्याकरता इंग्रजांनी छत्रपतीमार्फत पेशवेपदावरून दूर केल्याचा जाहीरनामा ता. ४ एप्रिल १८१८ रोजी प्रसिद्ध केला. यामुळे बाजीरावच्या उद्योगाला बंडखोरीचे स्वरूप येऊन उत्तरोत्तर त्याच्या तळावरून निघून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. मात्र, तरीही पेशवा आपला लढा जिवंत ठेवण्याकरता इंग्रजांना हुलकावण्या देत उत्तरेत जाण्याचा प्रयत्न करू लागला. मधल्या काळात होळकरांचा सरदार रामदीन काही पथकांसह त्याला येऊन मिळाला होता. अष्टीनंतर चांद्याकडे जाऊन आपासाहेब भोसल्याशी हातमिळवणी करण्याचा बाजीरावाचा बेत इंग्रजांनी आपासाहेबास कैद करून हाणून पाडत आणि चारी बाजूंनी इंग्लिश सरदार पेशव्याला घेरण्यास पुढे सरसावू लागले. पेशव्याच्या सोबत असलेला आपा देसाई इंग्रजांना बाजीरावाच्या मार्गाची, मुक्कामाची शक्य तितकी अचूक बातमी देण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पेशव्याच्या लहरीपणामुळे किंवा सावधगिरीमुळे आपा देसायाच्या हेरगिरीला यश मिळत नव्हते. 


७] धुळकोट येथे पेशव्याची शरणागती आणि पेशवाईचा अस्त :- नागपूरकर आपासाहेब भोसले इंग्रजांच्या कैदेत पडल्याचे समजताच बाजीरावाने आपला मोर्चा दौलतराव शिंद्याकडे वळवला. यावेळी मराठी सरदारांपैकी एक दौलतराव तेवढा कायम असल्याने अजूनही पेशव्याला थोडीफार आशा वाटत होती. बाजीराव शिंद्याकडे जाण्यास जर यशस्वी झाला तर डाव आपल्या अंगावर उलटू शकतो याची इंग्रजांना जाणीव असल्याने त्यांनीही पेशव्याची नाकेबंदी करण्याचे कसून प्रयत्न चालवले. आपा देसायानेही प्रयत्नांची शिकस्त चालवली. परिणामी मे महिन्यात अशीरगड नजीक धूळकोट मुक्कामी इंग्रजांनी पेशव्याला घेरून शरण येणे वा लढून मरणे हे दोनच पर्याय बाजीरावासमोर ठेवले. बाजीरावाने निरुपाय जाणून इंग्रजांशी तहाची बोलणी आरंभली. त्याच्या सुदैवाने जॉन माल्कम यावेळी जवळपास असून प्रसंगानुसार राजकीय बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्याच्या हाती असल्याने त्याने आपल्या जबाबदारीवर पेशव्यासोबत तहाच्या वाटाघाटी करून ता. ३ जून १८१८ रोजी कराराच्या शर्तींवर सही करण्यास भाग पाडले.



    या तहानुसार बाजीरावाने स्वतःहून आपल्या राजकीय सत्तेचा त्याग केला. म्हणजे छत्रपतीने जरी तांत्रिकदृष्ट्या कागदावर त्यांस पदावरून दूर केले असले तरी व्यवहारात अजूनही तो ‘ पेशवा ‘ होता. त्याच्या ताब्यात बराच मोठा भूप्रदेश, किल्ले आणि सैन्य होते. त्यामुळे पेशव्याने आपल्या राजकीय सत्तेचा स्वहस्ते राजीनामा लिहुन देणे इंग्रजांसाठी अत्यावश्यक बनले होते. खेरीज, पावसाळा तोंडावर आलेला असल्याने जर तहाची बोलणी फिसकटून मोहीम लांबणीवर पडली तर हातातोंडाशी आलेला विजयाचा घास कदाचित हिरावला जाण्याचीही शक्यता होती. सर्व शक्यतांचा विचार करून माल्कमने दबाव आणि गोडीगुलाबीचे धोरण अवलंबत पेशव्याला राजीनामा देण्यास भाग पडले. बाजीरावानेही वस्तुस्थिती लक्षात घेत माल्कमच्या कलाने घेत शक्य तितकी आपली व्यवस्था लावून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यानुसार, राज्याचे उदक इंग्रजांच्या हाती सोडून त्याने कंपनी सरकार सांगेल तिथे राहण्याचे मान्य केले. त्याबदल्यात माल्कमने त्यांस सालीना ८ लाखांची तैनात बांधून देण्याचे मान्य केले. तसेच ज्या सरदारांनी शेवटपर्यंत पेशव्याची चाकरी बजावली त्यांच्याविषयी सूडबुद्धी न वागवण्याचे मान्य केले आणि पेशव्यांनी जसा आजवर धर्म – ब्राम्हणांचा परामर्ष घेतला, तो तसाच पुढे घेण्याचेही माल्कमने कबूल केले.



    यानंतर पेशव्याच्या मुक्कामाची जागा बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निश्चित करण्यात येऊन त्याची रवानगी तिकडे करण्यात आली. बाजीराव धुळकोट येथे इंग्रजांना शरण आला तेव्हा त्याच्याजवळ स्वार आणि पायदळ मिळून चार हजार फौज होती. परंतु, जसजसा पेशवा बिठूरकडे जाऊ लागला तसतशी त्याच्या सैन्यात घट होऊन अखेर सहाशे स्वार आणि दोनशे पायदळ सोबत राहिले. आपल्या उर्वरित सैन्यासह आणि परिवार व आश्रित मंडळीसोबत बाजीराव ब्रम्हावर्तला गेला व त्या स्थळीच त्याचा ता. २८ जानेवारी १८५१ मृत्यू झाला.



८] उपसंहार :- अनेक अर्थांनी मराठी राज्याच्या इतिहासात दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द अपूर्व अशीच आहे. या पेशव्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी राज्याची सातत्याने अवनती होत जाऊन शेवटी तिचा अस्त झाला. परंतु खरोखर मराठी राज्याचा अस्त स. १८१८ मध्ये झाला का ?



    तटस्थ दृष्टीने पाहिले असता स. १८१८ मध्ये मराठी राज्याचा अस्त झाला, हे विधान अर्धसत्य असून, या वर्षी मराठी साम्राज्यातील, किंबहुना मराठी सरदारांच्या संघराज्यातील ‘ पेशव्याच्या राज्याचा अस्त ‘ झाला हे विधान ऐतिहासिक सत्यास धरून आहे. कित्येकांना माझे हे विधान धक्कादायक, अवास्तव वाटेल पण तेच सत्य आहे.



    मराठी राज्य स. १८१८ नंतरही सातारा, कोल्हापूर, इंदूर, बडोदा, नागपूर, ग्वाल्हेर इ. ठिकाणी कायम राहिले. ग्वाल्हेरचा लष्करी दबदबा स. १८४० पर्यंत कायम होता. मग मराठी राज्य स. १८१८ त संपले असे का म्हणायचे ? जर पेशवाईचा अस्त हा मराठी राज्यचा अस्त मानायचं ठरवलं तर मग स. १८०२ मध्येच त्याचे स्वातंत्र्य लुप्त झाले होते, याकडे दुर्लक्ष का करायचे ? तसेच छत्रपती व पेशवा यांमधील मराठी सत्तेचा मुख्य मालक, उगम लक्षात न घेता स. १८०२ वा १८१८ मध्ये मराठी राज्य बुडून पारतंत्र्य आल्याची हाकाटी का उठवायची ? वास्तविक हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कारण, तांत्रिकदृष्ट्या सत्तेचा मुख्य मालक कोण व व्यवहारात तिचा वापर करणारा याची सुस्पष्ट विभागणी करून मूळ मालकाचे अस्तित्व कायम राहून त्याची सत्ता उपभोगणारा सेवक नामशेष झाल्यास मुळची दौलत बुडाली असे म्हणणे कोणत्या तर्कात बसते ?   



    धार्मिक, सामाजिकदृष्ट्या पाहिले असता इतर पेशव्यांपेक्षा बाजीरावाच्या कारकिर्दीत फारसे वेगळे असे काही झाल्याचे दिसून येत नाही. बाजीरावाच्या कारकिर्दी आरंभी व अखेरीस राज्यात जी काही अंदाधुंदी झाली त्याची थोडीफार माहिती अनंतफंदीच्या काव्यातून मिळते. त्यानुसार या काळात जबरदस्ताचे प्राबल्य होऊन प्रचलित उच्च – नीच भाव तसेच जात – पात असा भेद न मानता प्रत्येकजण आपल्या मनास येईल तसा वर्तत होता. परंतु हा रावबाजी गादीवर बसल्याचा परिणाम नसून तत्पूर्वीच हि स्थिती उद्भवल्याचे ऐतिहासिक पत्रांतून दिसून येते. दुसरे असे कि. सवाई माधवरावाच्या अखेरीची तसेच बाजीरावाच्या कारकिर्दीतील दुष्काळाची जी वर्णने अनंतफंदीच्या कवनांतून येतात ती वाचली असता त्या काळात, भूकेपोटी लोकांनी कसलाही विधिनिषेध न बाळगता विविध पशु – प्राणी तसेच प्रसंगी मनुष्यदेहाचेही भक्षण केल्याची माहिती मिळते. अर्थात कवीच्या काव्यातील अतिशयोक्ती वजा केली तरी तत्कालीन भीषण दुष्काळाची तसेच आहारासाठी सर्व प्रचलित नीती – नियम बंधने समाजाने झुगारल्याचे दिसून येते.



    याशिवाय समाजाच्या नैतिक अधःपतनाचे अर्थात, स्वैराचाराचे वर्णनही अनंतफंदीने केले असून या अवनतीला त्याने बाजीरावास जबाबदार धरल्याचे दिसून येते. बाजीरावाच्या विलासी वृत्तीविषयी मागील लेखांत आपण सविस्तर चर्चा केली असल्याने त्याबद्दल या ठिकाणी फार काही लिहिण्याची गरज नाही. फक्त एक – दोन मुद्यांचा या ठिकाणी विचार करणे आवश्यक आहे.



    राज्यकर्त्याच्या नैतिक वर्तनाचे अनुकरण जनता करते. त्यामुळे समाजाच्या प्रगती वा अवनती होते असे मानले जाते. त्यानुसार बाजीरावाच्या स्वैर विलासी वर्तनान तेव्हाची जनतीही तशी वागू लागल्याचे अनंत फंदीप्रमाणेचे कित्येकांचे मत आहे. परंतु, बाजीराव आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा वागत नव्हता आणि सामाजिक अनाचारही पूर्वपरंपरेप्रमाणेच चालू होते. राहिला प्रश्न रावबाजी आणि सरदारांच्या स्त्रियांचा तर या बाबतीत इंग्रजांनी जाणीवपूर्वक पेशव्याच्या रंगेल, विलासी वृत्तीचा भलताच विपर्यास केला आहे.



    बाजीरावाचे ज्या सरदारांच्या स्त्रियांशी संबंध होते, त्यांची नावे तत्कालीन कागदपत्रांत अगदी उघडपणे येतात. त्यावेळी बाजीराव इंग्रजांशी स्नेहाने वर्तत असल्याने इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, बाजीराव इंग्रजांच्या विरोधात कारवाया करू लागल्यावर जे जे सरदार इंग्रजांच्या विरोधात बाजीरावाला मदत करत होते त्या त्या सरदारांच्या बायकांना इंग्रजांनी कागदावर तरी पेशव्याच्या बिछान्यात पाठवून दिले. इंग्रजांच्या या कृत्यामागील कारणपरंपरा उघड उघड दिसत असूनही आमच्या इतिहासकारांनी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत बाजीरावाच्या निष्ठावंत सरदारांच्या स्त्रियांच्या विषयीचा निंदनीय उल्लेख उचलून धरत एकप्रकारे इतिहासाचे विकृतीकरण केले.



    राजकीयदृष्ट्या बाजीराव अपयशी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या शिक्षणाची नाना फडणीसने केलेली दुरावस्था ! आपल्या इतिहासकारांची पण एक मोठी गंमत आहे. नाना फडणीस किती हुशार, अष्टावधानी, शहाणा, दूरदृष्टीचा होता हे सांगताना त्याने बाजीरावाच्या बाबतीत स्वीकारलेल्या धोरणाकडे दुर्लक्ष करायचे आणि तोच बाजीराव सत्तेवर येऊन त्याने पेशवाई बुडवल्यावर बाजीराव कसा अक्कलशून्य होता, नालायक होता याची रसभरीत चर्चा करण्यात समाधान मानायचे. सोयीस्कर इतिहास लिहिणाऱ्यांनी जितकी आपल्या इतिहासाची हानी केली आहे तितकी कदाचित शत्रूनेही केली नसावी !



    तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील येरवड्याच्या लढाईतून बाजीरावाने पळ काढल्याने इंग्रजांना पुण्याचा ताबा घेता आला असे सांगितले जाते पण, पाच्छापूरकर बखरीनुसार बापूने चौदा वेळा विनंती केल्यावर पेशव्याने रण सोडले त्याचे काय ? बरं, बखरीचा उल्लेख बाजूला ठेवला तरी अष्टीच्या लढाईनंतर व छत्रपतीने पेशव्यास बंडखोर म्हणून जाहीर केल्यावर पेशव्याला लढाई पुढे चालवण्याची गरजच काय होती ? बापू पडल्या – पडल्या तो इंग्रजांशी तह करू शकत नव्हता का ? त्यासाठी मे वा जून पर्यंत वाट बघण्याची काहीच गरज नव्हती.



    सारांश, ज्यांस राज्ययंत्र सांभाळण्याचे शिक्षण मुळातच न देता त्यांस राज्यावर स्थापल्यावर जे घोटाळे माजायचे, ज्या चुका त्या व्यक्तीकडून व्हायच्या त्या बाजीरावाच्या काळात झाल्याने त्याचा पराभव झाला असल्यास त्यात आश्चर्य ते काय ! राहिला प्रश्न पेशवाईच्या अस्ताचा तर इथे बाजीरावाचे दुर्दैव थोडं आडवं आलं. इंग्रजांच्या ऐवजी एतद्देशीय सत्तेने असा पेशव्यावर विजय मिळवला असता तर कदाचित मर्यादित मुलखाच्या आत पुण्यापुरती पेशवाई जिवंत राहिली असती. परंतु, गाठ पडली परक्या इंग्लिशांशी ! त्यांना इथे आपल्या सत्तेची पाळेमुळे दृढ करायची असल्याने एकाच वेळी छत्रपती – पेशव्याची संस्थाने एकाच भूप्रदेशात नांदून देणे परवडण्यासारखे नव्हते. पेशव्याचा काटा काढायला छत्रपतीला हाताशी धरल्याने, पेशव्याचे संस्थान नाहीसे होणे स्वाभाविक होते ! दिल्लीच्या बाबतीतही इंग्रजांनी याच धोरणाचा अवलंब केला होता.



    तात्पर्य, बाजीराव ज्या परिस्थितीत पेशवाईवर दाखल झाला ती परिस्थिती लक्षात घेता पेशवाई व पेशवेपदाच्या रक्षणाकरता त्याने शक्य तितके उपाय योजल्याचे मान्य करावे लागते. अर्थात, त्याच्या अनुभवातून शिकण्याच्या वृत्तीने व थोड्या धरसोडीने जरी त्यांस अखेरीस अपयश आले तरी स. १८१८ पर्यंत त्याने पेशवाई राखली हेच मोठे यश मानायला पाहिजे !

                                            ( समाप्त )

संदर्भ ग्रंथ यादी :-

१) पेशव्यांची बखर :-  संपादक – का. ना. साने

२) मराठ्यांची बखर :- ग्रांट डफ ( मराठी अनुवादित ६ वी आवृत्ती )

३) अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या :- चित्रशाळा प्रकाशन ( ४ थी आवृत्ती )

४) ऐतिहासिक पोवाडे ( खंड – २ ) :- य. न. केळकर

५) मराठ्यांच्या लढायांचा इतिहास :- शि. म. परांजपे

६) काव्येतिहास संग्रह – पत्रे व यादी :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर

७) पेशवाईच्या सावलीत :- संपादक – ना. गो. चापेकर

८) नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे

९) मराठी रियासत ( खंड ५ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई

१०) ब्रिटीश रियासत ( खंड – २ ) :- गो. स. सरदेसाई

११) मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- संपादक – वि. ल. भावे

१२) मस्तानी :- द. ग. गोडसे   

१३) शिंदेशाही इतिहासाची साधने ( खंड – ४ ) :- संपादक – अ. वा. वाकणकर, प्रकाशक – आनंदराव भाऊ फाळके   

१४) पेशव्यांचे विलासी जीवन :- डॉ. वर्षा शिरगांवकर

१५) नाना फडणवीस यांचे चरित्र ( आत्मचरित्रासह ) :- वा. वा. खरे ( आवृत्ती ४ थी )

१६) एल्फिन्स्टन :- प्रमोद ओक

१७) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर

१८) सरदार बापू गोखले :- सदाशिव आठवले

१९) मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन, मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे

२०) काही अप्रसिद्ध चरित्रे :- य. न. केळकर

२१) मराठेशाहीतील वेचक वेधक :- य. न. केळकर

२२) भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :- य. न. केळकर 
२३ ) हिंगणे दफ्तर ( खंड – ३ ) :- संपादक – सदाशिव आठवले  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: