रविवार, २६ जुलै, २०१५

अटकस्वारी संबंधी नानासाहेब पेशव्याची दोन महत्त्वाची पत्रे




लेखांक [ ९० ]       श्री      * १८१४ अधिक आश्विन वद्य १४
                                   [ १२ अक्टुबर १७५७ ]
चिरजीव राजमान्य राजश्री दादा यांसि   बालाजी बाजीराव प्रधान आसिर्वाद उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहिणे विशेष. राजेश्री बलवंतराव गंनपत [ मेहेंदळे ] याणी कडपेवाले अबदुलमजीदखांन याजकडे राजश्री शामराव भिवराव यांस पाठविले. ते कडपियास गेले. तो खासा तेथे नव्हते. सिघोटास गेले होते. कडपियास गनुमिया व सिलैमखान तेथ होते. लाख रुपयाहून जाजाती जाबसाल न करीत. हे वर्तमान यास कलताच मारनिले कुळतूर कडपेवाले याचा तालुका तेथून सड्या फौजा आपण बुलगियात मागे दबावास राहून राजश्री इद्रोजी कदम व सोनजी भांपकर व हरबा बापु सखाजी विसाजी कृष्ण नरसिंगराव संभाजी घोरपडे खडेराव दरकर भगवंतराव कदम व हैबतराव जाधव यशवंतराव लक्षुमण वगैरे लोकसुधा रवाना केले. ते कडपियास न गेले. मध्येच होते. तो खबर आली की गनीमिया व सिलीमखान पलून कडपियातून गेले. कडपियात काही नाही त्याजवरून हे सारे कडपियांस जाउन लागले. मोर्चे बसविले. हे खबर अबदुलमजीदखान यास सिघोटास कलतांच तेथून आपले फौजेनसी दीड हजारपर्येत त्या होउन जुमामर्दीने मारीत मारीत कडपियात सिरोन मग कडपे भांडवावे या उमेदीने निघाला. ही खबर सरदारांस अवगत होताच हे सारे जमा होउन विचार केला की तो येथे येउ न द्यावा. पुढे जाउन त्यांसि झुजावे  त्याजवरून सारे चालून कडपियापासून तीन कोसावर गाठ घातली. ते पठाण चागले. हत्यार फार तीरतरवार याचे जाहाले. लोकानी आपल्यानी निकड फार खाशाखाशाने केली. उड्या घातल्या. त्या समई खासा अबदुलमजीदखान यास हतीवर गोली लांगली. तो हती हरबानी पाडाव केला. सीर खासियाचे कापून आणले. सरकारचे लोक सदरहु मातबर नामी सरदार थोडथोड जखमी जाहाले परतु सारियाची खैर जाहाली. विसाजी कृष्ण [ बीनीव ले ] याचे घोडीस दोन तीर. बाजीपंत मारनिलेचा त्याचे थनसरीस गोली थोडकी. संभाजी घोरपडे मात्र ठार पडले. वरकड जखमी घोडीमाणसे पंडली त्याची खबर तपसीलवार लिहिली आली नाही. त्याजकडील दोनअडीचसे पठाण कापून काढिले. दोनतीनसे जखमी आहे. नव हती पाडाव जाहाले. तेथून कडपियास आले. येथील प्यादियाने कौल घेतला. सरकारचे निशाण चढून ठाणे बसले. तेथे हाती सात सापडले. पैका नाहीं. तोफा मातबर तीन चार आहेत. गनीमिया व सिलीमखान करनालाकडे गेले. हे फते बलवतराव याणी फारच चागली गे[के]ली. करणाटकात याजबरोबर लडणार मातबर कोण्ही नाहीं. याजवर याप्रमाणे सलाबत पडून विसा लाखाचा मुलुक हाती लागला. यापरी दुसरा कोणी उजरून गोष्ट सागणार नाही. फांरच दहशत पडली. हे कामें खाशे फौजेने करावी ते बलवंतराव मागे राहून सरदाराजवलून काम करविले यामुले तो फारच दांब लोकावर वाढला. पुढेही कामें राहिली ती चागलीच करितील. हे संतोषचे वर्तमान कलावे याजकरिता लिहिले असे. दिलीचे गुत्यामुले रुजू[हुजूरू]तून निघावे. फारच जरूर असेल तरी मल्हारबास त्याचे फौजेसुधा ठेवावे. जर विशेष पैका मिलत असिला तर मात्र राहावे परंतु उगेच [होलकराचे] गपाचे आशेत गुतू नये. याअन्वये पत्रे लिहिली त्याचे उतर येत नाहीं. तरी सविस्तर अर्थ लिहिणे. बसालतजगानी शाहानवाजखानास दंगा करून मारिले यास्तव पचविसाची जहांगीर नगर देउ केले परंतु आता फौजा जमा करुंन काहीसा चड खात आहेत. दतबा [व] चिरजीव पंधरा हजार जमा जाहाले. आता दबउन काम करतील. आम्हींही सत्वरच बाहेर निघोन स्वारीस निघणार आहों. होईल ते लिहून पाठउ. आपण कासी पटणे येथील येथील सिकार येकहाती फौजेने मारावी. उसीर करू नये. दिली कवल कंगाल होउन गेली आहे. आसपास वोस आहे. पैका आकारणार नाही. नावे मात्र माहालाची मोठी. वसूल होणे कठिण पडेल. दिलीची मांमलत तीस लाख जाहाली म्हणून गपा येतात. तुमचे पत्र आले नाहीं परंतु वसूल होणे यास विलंब लागेल सर्व वाटते. छ* २५ मोहरम. हे आसिर्वाद.
                                                            [१९ नवबर १७५७]


=================================================

लेखांक [९२]                  श्री    * संवत १८१५ चैत्र शुद्ध ३
                                    [ १० अप्रेल १७५८ ]
                       
                        राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
                        सखाराम भगवंत स्वामी गोसावी यास.
पौप    बालाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणे विशेष. सांप्रत तुम्हीं कोठे आहा. काय मनसुबां करिता ते सर्व लिहिणे. ईकडील सर्व सविस्तर चिरंजीव यास लिहिला असे त्यांजवरुंन कलेल. आमचे मते मल्हारबावर दिलीपासून लाहोरपावेतो कामाचा यखतियार देउन चिरंजीवास घेउन भेटीस यावे. विशेष पैका मिळणे नसता खावंदगिरीचे तेज खराब करून गुंतून पडावे हे सहसा न व्हावे. * छ १ साबान. हे विनंती.
                                                      पो| छ ९ रमजान समान.
                              मु|| व्यासनदीपूर्वतीर
                               [ १७ मे १७५८ ]
==============================================
    
    विश्लेषण :- लेखांक ९० चे पत्र अटक स्वारीपूर्वीचे असून यात कर्नाटक मोहिमेची माहिती देऊन नानासाहेब पेशव्याने रघुनाथरावास दिल्लीत पैशांची प्राप्ती होत नसल्यास काशी – पटण्यास जाण्याची सूचना केली आहे तर लेखांक ९२ नुसार रघुनाथराव अटक मोहिमेत असताना दिल्ली ते लाहोरच्या बंदोबस्ताचे काम होळकरावर सोपवून त्यांस माघारी घेऊन येण्याचा आदेश सखारामबापूस पेशव्याने केला आहे.





( संपादकांनी दिल्याप्रमाणे मूळ पत्रे जशीच्या तशी येथे उतरून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )



संदर्भ ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- संपादक – आनंदराव भाऊ फाळके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: