स. १७९५ पासून ते स. १७९६
अखेरपर्यंत पेशवेपदी कोणाला बसवायचे यावरून पुणे दरबारात जी काही कट – कारस्थानं
झाली, गटबाजी झाली त्यामुळे पुणे दरबारात जो काही एकसंधपणा अवशिष्ट राहिला होता,
तो पार लयास जाऊन त्याची शकलं झाली. इतउत्तर कोणाचा विश्वास ठेवायचा न ठेवायचा हाच
प्रश्न प्रत्येक दरबारी मुत्सद्द्याच्या --- अगदी पेशव्याच्याही मनी कायम राहून
अविश्वासाचे, गळेकापूपणाचे जे राजकारण बनत गेले, त्यानेच पुढे पेशव्याच्या
राज्याचा नाश झाला. शिवाय याच काळात राज्य – राजनिष्ठा, फितुरी या संकल्पनांचे
संदर्भ इतके बदलत गेले कि, आजही पेशवाईच्या अखेरीस कोण फितूर व कोण राज –
राज्यनिष्ठ हे ठरवणं अशक्यप्राय बनलं आहे.
स. १७९५ च्या ऑक्टोबरात
सवाई माधव मारला जाऊन पेशव्याची गादी बिनधन्याची झाली. यावेळी बाळाजी विश्वनाथाचा
वंश फक्त दोनच ठिकाणी अस्तित्वात राहिला होता. एक जुन्नरला रघुनाथाच्या मुलांच्या
रूपाने तर दुसरा बुंदेलखंडात समशेरबहाद्दरच्या पुत्राच्या रूपाने. पैकी, समशेरच्या
वंशजांना गादी मिळणे शक्य नव्हते. या कामी मस्तानीचा दर्जा, धर्म या फुटकळ बाबी
आडव्या येत असल्या तरी महत्त्वाची बाब म्हणजे समशेरपुत्र अलीबहाद्दार हा कर्तबगार,
पराक्रमी असून स्वतंत्र वृत्तीचा होता. अर्थात, दरबारी मुत्सद्द्यांच्या ओंजळीने
पाणी न पिणारा धनी त्यांना रुचणारा नव्हता हे उघड आहे. त्यामुळे हा पर्याय बाद.
रघुनाथाचे यावेळी तीन
पुत्र नजरकैदेत होते. पैकी, अमृतराव हा वयाने मोठा व अनुभवी पण दत्तक असल्याने
त्याला पेशवाई देणे शक्य नाही. दुसरा बाजीराव यावेळी २० वर्षांचा तरुण होता तर
तिसरा चिमाजी अकरा वर्षांचा होता. मुत्सद्द्यांसमोर बाजी – चिमाजी हे दोनच पर्याय
उपलब्ध होते. त्यातील बाजीराव प्रौढ असल्याने मुत्सद्द्यांना तो नको होता. याकरता
‘ मागील द्वेष मनात आणतील ‘ म्हणून त्याचे नाव बाद करण्यात आले. चिमाजीच्या
नावापुढेही याच कारणाकरता फुली मारून दत्तकाच्या खटपटीला नाना लागला परंतु,
इतरांनी प्रथम संमती व नंतर विरोध दर्शविल्याने नानाने चिमाजीला स. माधवाच्या
पत्नीस दत्तक देण्याचा पर्याय निवडून या प्रश्नावर आपल्या मते निर्णायक तोडगा
काढला. मात्र यात काही प्रमुख अडचणी होती.
पहिली अडचण हि कि,
बाजीरावाने या दत्तविधानास परवानगी देणे आवश्यक होते. दुसरी अडचण अशी कि, चिमाजी
हा स. माधवाचा चुलता अर्थात स. माधवाची पत्नी --- यशोदाबाईचा नात्याने चुलत सासरा
लागत होता. तिसरी सर्वात मोठी अडचण अशी कि, नाना फडणीसकडे हुकमी असे बलवान लष्कर
नसल्याने त्याची भिस्त सरदारांवर होती व एक पटवर्धन वगळल्यास नानाच्या पक्षाला इतर
कोणत्याही वजनदार सरदाराचा पाठिंबा नव्हता. होळकर फडणीसाच्या मायेतील. परंतु
तुकोजी यावेळी आजारी असून त्याच्या हयातीतचं वारसा हक्कासाठी त्याची मुलं भांडू
लागल्याने त्याची मदत नानाला होणार नव्हती. राहता राहिला शिंदे !
तर महादजीच्या पश्चात
त्याच्या भावाचा नातू – तुकोजीपुत्र आनंदरावचा वंशज --- दौलतराव यांस सरदारीची
वस्त्रे मिळाली. महादजीला पुत्र नसल्याने त्याने दौलतरावास पुढे – मागे दत्तक
घेण्याचे ठरवले होते. परंतु तत्पूर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याने दत्तविधान झाले
नाही. पुढे अनेक खटपटी होऊन दौलतरावास शिंद्यांची सरदारी मिळाली. तसेच वकील इ
मुतलकीच्या नायबीची वस्त्रेही प्राप्त झाली. शिवाय नाना फडणीसला यासमयी शिंद्यांची
फडणीशीही प्राप्त झाली. महादजीने जसे नानाशी बंधुत्वाचे नाते ठेवून वर्तन केले
त्याचप्रमाणे पुढे चालवण्यासाठी नाना – दौलतरावाच्या लेखी शपथाही झाल्या. मात्र
इतके होऊनही दौलतराव शिंदे नाना फडणीसच्या पक्षाला अजिबात चिटकून राहिला नाही.
महादजीच्या पश्चात
मुत्सद्द्यांनी निवडलेला हा वारस, शिंद्यांचा वंश चालवण्यास जरी लायक असला तरी
सरदारी रक्षून व राजकारण खेळून राज्यरक्षणाच्या कामी अजिबात नालायक होता. चैनी,
ख्यालीखुशाली, मनोरंजनाचे खेळ, द्रव्य – प्रादेशिक लोभ यांतच तो मरेपर्यंत गुरफटून
गेला. महादजीप्रमाणे दरबारात वर्चस्व गाजवण्याची त्याची अनिवार हौस. मात्र अंगी
कर्तबगारीचा ठणाणा असल्याने नुसत्या हौसेनं काय होणार ?
जेव्हा पेशवे घराण्यात
दत्तकाचे राजकारण चालू झाले तेव्हा जुन्नरला नजरकैदेत बसलेल्या बाजीरावाने दौलतराव
शिंद्यास आपल्या पक्षात वळवून घेतले. एक दौलतराव आपल्या बाजूला ठामपणे उभा राहिला
तर पेशवाई हस्तगत करण्यापासून आपणांस कोणी रोखू शकणार नाही अशी बाजीरावाची समजूत
असून ती बव्हंशी खरीही होती. नानाला बाजी – दौलत युतीची बातमी लागताच त्याने
परशुराम पटवर्धनामार्फत जुन्नरहून बाजी – चिमाजीला तातडीने पुण्यास आणण्याची खटपट
आरंभली. परंतु हे कार्य सिद्धीस न जाता उलट परशुरामभाऊ थोडाबहुत बाजीरावास वश
झाला. पुढे पटवर्धन बाजीराव – चिमाजीला घेऊन पुण्याजवळ आला खरा, परंतु शिंदे
यावेळी पुण्यात नसल्याने तो येईपर्यंत बाजीराव शनिवारवाड्यात जायला तयार होईना.
नंतर शिंदे मंडळी आली व पुन्हा एकदा राजकारणाने पलटी मारली. परशुरामभाऊ नाना –
बाजीराव ऐवजी दौलतराव शिंद्याचा कारभारी --- बाळोबातात्यास सामील झाला व त्यांनी
बाजीरावाऐवजी चिमाजीला पेशवा बनवण्याचे ठरवत नानाला राजकारणातून सक्तीने निवृत्त
होण्यास भाग पाडण्याचा बेत आखला.
कटाची कुणकुण लागताच नाना
पुण्यातून निघून प्रथम साताऱ्यास व नंतर महाडला निघून गेला. बाजीरावाला शिंद्यांनी
नजरकैद दाखवली व चिमाजीस पेशवाईवर स्थापन करण्यात आले. ( ता. २ जून १७९६ )
इकडे अज्ञातवासात उडी मारून
बसलेला नाना व नजरकैदेतील बाजीराव काही स्वस्थ बसले नव्हते. उभयतांनी आपसांत
संगनमत करून पटवर्धन – शिंद्यांचा बेत हाणून पाडण्यासाठी आपापली अक्कल पणाला
लावली. त्यातून महाडच्या कारस्थानाच जन्म होऊन दौलतराव शिंद्यामार्फत बाजीरावाने
पेशवाई तर बाजीरावामार्फत नानाने आपले कारभारीपद परत प्राप्त करून घेतले. ( ५
डिसेंबर १७९६ )
महाडच्या कारस्थानाने जरी
पुणे दरबारात राज्यक्रांती झाली असली तरी तिचे दृश्य – अदृश्य परिणाम पुणे दरबारास
जाचल्याशिवाय राहिले नाहीत. या कारस्थान उभारणीकरता नानाला राज्यातील सरदार,
परराज्यातील सत्ताधीशांशी विविध करार करावे लागले. त्यामुळे पुढे भलताच गोंधळ
माजून गेला. पैकी, कोल्हापूरकर – सातारकरांशी केलेल्या कराराने पटवर्धन अडचणीत आले
व पुढे परशुरामभाऊ कोल्हापूरकरांच्या बंदोबस्ताकरता गेला असता त्याच स्वारीत मारला
गेला. खर्ड्यावर गमावलेली प्रतिष्ठा यावेळी निजामाने कमावून घेतली. इंग्रजांना
नानाने मधाचे बोट लावले खरे पण प्रत्यक्षात पुढे इंग्रजांकडेच त्याला मदतीकरता हात
पसरण्याची वेळ आली. सारांश, महाडचे कारस्थान रचण्यात नानाचा काहीएक फायदा नव्हता.
नानाच्या पक्षपात्यांचे म्हणणे
असे कि, राज्याचा कारभार आपल्या हाती असेल तरच निभाव लागेल अशी नानाची प्रामाणिक
समजूत असून ती स्वार्थमूलक नव्हती. मग हीच अपेक्षा बाजीरावाची असेल तर त्याला दोष
का द्यावा ? दुसरे असे कि, बाजीरावाचे – त्याचे जमणे शक्य नाही, हे माहिती असूनही
त्याने बाजीरावासचं का पुढे आणावे ? त्याहीउपर म्हणजे, बाजीराव दुर्वर्तनी
असल्याचे त्याचे मत होते तर भटांचा वंश डावलून सर्व सत्ता त्याने आपल्याच हाती का
घेतली नाही ? किंवा छत्रपतींना बाहेर काढून राज्याची सूत्रे त्यांच्या हाती सोपवून
द्रव्यबळाच्या आधारावर त्यांचेच कारभारीपद का घेतले नाही ? या प्रश्नांची उत्तरे
नानाच्या समर्थकांनी द्यावीत.
बाजीराव समर्थकांची देखील
जवळपास हीच कहाणी आहे.
बाजीरावाच्या समर्थनार्थ ते पुढील मुद्दे उपस्थित करतात :-
(१)
मागील सर्व द्वेष विसरून
नानाच्या सल्ल्याने कारभार करण्याची बाजीरावाची इच्छा होती परंतु नानाच्या
अधिकारलोभामुळे बाजीरावासही दुटप्पीपणा करावा लागला.
(२)
बाजीराव अननुभवी असून
राज्यकारभार विषयक त्याच्या शिक्षणाकडे नानाने मुद्दामहून दुर्लक्ष केल्याने
अनुभवातून शिकत त्याने राज्याचा कारभार केला. अर्थात, अशावेळी त्याच्या हातून काही
चुका होणे अपरिहार्य होते.
(३)
आपल्या चुकांची जाणीव होताच
बाजीराआने पुढे राज्यरक्षणासाठी प्रयत्नही केले. परंतु अपयश आल्याने त्यांस राज्य
सोडून ब्रम्हावर्तला जावे लागले.
बाजीराव समर्थकांचे म्हणणे
मान्य. परंतु घडलेल्या चुकांतून बोध घेत शिकत जाण्याच्या वृत्तीने जरी बाजीरावाने
कारभार केला असला तरी याच काळात लष्करी तसेच इतर आघाड्यांवर त्याचे झालेले
दुर्लक्ष, यांमुळे त्याला अंती पराभव पत्करावा लागला त्याचे काय ? इंग्रज आपले
राज्य घेण्यास टपल्याचे त्याला पेशवाईची सूत्रे हाती घेतल्यापासून माहिती होते.
जसजशी त्याची कारकीर्द पुढे सरकत गेली तसतशी इंग्रजी राज्याची सीमा त्याच्या
राज्याला भिडून सरहद्दीवर ठिकठीकाणी मोक्याच्या जागी इंग्लिश पलटणे तैनात होऊन
बाजीरावास घेरण्याची इंग्रजांनी तयारी केली. या सर्व घटनांची पूर्ण कल्पना असूनही
बाजीरावाने शत्रूच्या प्रतिकारार्थ आखलेल्या योजनांची काही माहिती आहे का ? प्रश्न
अनेक आहेत. परंतु समाधानकारक उत्तरं देणारे कोणी नाही.
काही काही महाभाग तर असेही
आहेत कि, नाना फडणीसने राज्य राखले व पुढे राज्यरक्षणा करता बाजीरावानेही झुंज
दिली असे बेधडक ठोकून देतात. मग राज्य का बुडालं तर सरदारांनी दगा केला. अरे पण
सरदारांनी दगा का केला म्हणावं तर मग वतनांची लालूच, स्वार्थ, परस्परांतील
अविश्वास इ. फालतू, अर्थहीन मुद्दे पुढे केले जातात. सारांश, नाना पण निर्दोषी व
बाजीरावही सोवळा ! दोषी कोण तर, यांच्या तंत्राने राजकारण खेळणारा. लढाया करणारा !
वाह रे इतिहासकार. इतिहास संशोधक !!
महाडच्या कारस्थानाने
बाजीराव पेशवेपदी बसला तर नाना कारभारी. परंतु उभयतांच्या मनी अविश्वास ! त्यात भर
दौलतराव शिंद्याची. पैशासाठी पठ्ठा दोन्ही पक्षांकडे सूत्र लावून बसलेला. बाजीराव –
नाना दोघेही बनेल वृत्तीचे. ते काही शिंद्याला रोख रक्कम देईनात व शिंदे उत्तरेत
जाईना. हा घोळ सुरु असतानाच तुकोजी होळकराचे पुणे मुक्कामी वृद्धापकाळाने निधन
झाले व दौलतरावास होळकरशाही गिळण्याची संधी लाभली. तुकोजीचे पुत्र काशिराव –
मल्हारराव सरदारीसाठी भांडू लागले. काशिराव लष्करी चाकरीसाठी असमर्थ असल्याने
त्यांस सरदारीची वस्त्रे देऊन त्याने दिवाणी कारभार सांभाळावा व मल्हाररावास
लष्करी चाकरी द्यावी अशी तोड तुकोजीच्या हयातीतच चाललेली. पण उभयतांचाही त्यास साफ
नकार होता. दुहाती कारभाराचे परिणाम अहिल्या – तुकोजीच्या रूपाने त्यांनी चांगलेच
अनुभवले होते. परिणामी, तुकोजीच्या पश्चात उभयतांचा झगडा वर्दळीवर येणार हे उघड
होते.
संधी पाहून दौलतरावाने
काशिरावास आपल्या बाजूला वळवून घेत होळकरांचा वारस म्हणून त्यांस आपला पाठिंबा देऊ
केला. शिंद्याचे प्रस्थ कमी करण्याची संधी नाना शोधतचं होता. त्याने मल्हारराव
होळकरास हाताशी धरले. मल्हारराव म्हणजे अफाट, अचाट वृत्तीचा माणूस. धाडस, शौर्य,
इ. गुणांत तो समकालीन मानाजी शिंदे उर्फ फाकडेच्या परंपरेत मोडणारा. नानाला
मल्हाररावाचे गुण माहिती असल्याने त्याने त्यांस आपलं अंतस्थ पाठिंबा देऊ केला.
परिणामी, नानाचा नक्षा उतरवण्यासाठी दौलतरावाने मल्हारराव होळकराच्या गोटावर छापा
मारला. त्या दंग्यात मल्हारराव मारला गेला तर त्याचे भाऊ विठोजी व यशवंतराव बचावून
जाण्यात यशस्वी ठरले. ( दि. १४ सप्टेंबर १७९७ )
या घटनेनंतर उभयता होळकर
बंधूंना नानाने अंतस्थरित्या चिथावणी देऊन शिंद्याचा सूड घेण्यास उद्युक्त केले.
इकडे बाजीराव दरबारातील शिंदे – नानाचे वर्चस्व कमी करून स्वतःचे वजन वाढवण्याच्या
खटपटीत होता. ना हाती पैसा ना लष्करी सिद्धता ! त्याचे बोल ऐकून कोण घेणार ?
नानाकडे द्रव्यबळ होते पण लष्करी बाबतीत त्याची हलाखी होती तर शिंद्याची बलवान फौज
पैशांअभावी टेकीस आलेली. आणि तिघेही परस्परांचे वैरी व मित्र ! अशा स्थितीत
राज्याचा कारभार कसा चालला होतं याची वाचकांनीच कल्पना करावी.
मल्हारराव होळकराचा काटा
काढल्यावर बाजीरावाने शिंद्याच्या मार्फत नानालाही त्याच वर्षाखेरीस कैदखाना दाखवत
दरबारची सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला परंतु पेशव्याची सत्ता आता
दौलतराव शिंदे व त्याचा सासरा सर्जेराव घाटगे वापरू लागले. शिंद्याला बाजीरावाने
वेळोवेळी ज्या भरमसाठ रकमा कबूल केल्या होत्या, त्या देण्याची शक्ती पेशव्याच्या
खजिन्यात नसल्याने घाटगे – शिंदे पुण्यातून नानाच्या पक्षपात्यांकडून सक्तीने पैसा
वसूल करू लागले.
दरम्यान शिंद्याच्या घरातही
तंटे निर्माण झाले. महादजीच्या परिवाराची काळजी घेण्याचे दौलतरावाने
दत्तविधानापूर्वी मान्य केले असले तरी त्यांत तफावत पडल्याने महादजीच्या स्त्रिया
नाराज झाल्या व त्यांनी दौलतरावाचे दत्तविधान रद्द करून दुसरा दत्तक घेण्याच्या
दृष्टीने सरकारात बोलाचाली आरंभल्या. महादजीच्या स्त्रियांना नानाचा पाठिंबा
होताच. शिवाय बाजीरावाचा मोठा भाऊ --- अमृतरावही यावेळी महादजीच्या स्त्रियांचा
पक्षपाती बनला. अमृतराव यावेळी काहीसा नाना फडणीसला मिलाफी बनला होता. त्याचा
हेतू, पेशव्याचे कारभारीपद मिळवण्याचा असून शिंद्याचे दरबारात अतोनात वाढलेलं
वर्चस्व कमी करून पेशवेपद व दरबारास पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्याचा
बेत होता. परंतु, अमृतरावाच्या या राजकीय हालचालींनी बाजीराव त्याच्याविषयी साशंक
बनल्याने अमृतरावाच्या धडपडीचा राज्यालाच काय पण त्याला स्वतःलाही फायदा झाला नाही
!
दौलतराव शिंद्याच्या
विरोधात महादजीच्या स्त्रियांनी उठाव केला. शिंदेशाही लष्करातील एक भाग त्यांना
मिळाला तर बव्हंशी कवायती पलटणे दौलतरावाच्या पाठीशी उभी राहिली. शिंद्यांच्या
लष्करातील हि फूट पुढे त्यांच्या व पेशव्याच्याही राज्यास घातक ठरली. परंतु हा
परिणाम अनुभवास येण्यास बराच काळ जावा लागला.
दौलतराव – बाजीराव या
जोडगोळीत काही बाबतीत साधर्म्य होते. दोघेही मोठ्या पदाचे, अधिकाराचे, राज्याचे
वारसदार होते व दोघांनाही सत्ता, अधिकार प्रिय होते. या सत्तेवरून, अधिकारपदावरून
आपणांस पायउतार करण्यास आपले हितशत्रू टपल्याची भावना उभयतांच्याही मनी असल्याने
कित्येकदा ते आपल्या हितचिंतकांशीही शत्रुत्वाच्या भावनेने वागले. परिणाम
सर्वांच्या समोर आहे.
पेशव्याच्या राज्यात नाना
फडणीस, परशुराम पटवर्धन, अमृतराव प्रभूती प्रमुख मुत्सद्दी मंडळी कर्तबगार, अनुभवी
होती. परंतु हि मंडळी बाजीरावाच्या शत्रूवर्गात मोडत असल्याने बाजीरावाने त्यांची
संभावना नेहमीच बंडखोर म्हणून केली. या मंडळींचे जे कोणी पक्षपाती, समर्थक होते
तेही बाजीरावाच्या मर्जीत फारसे राहिले नाहीत. हाच वर्तनक्रम दौलतराव शिंद्याच्या
बाबतीतही दिसून येतो. पेशवाईची अखेर समजावून घ्यायची असल्यास प्रथम हि परिस्थिती
नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. असो, नाना फडणीस कैद झाला तरी बाजीरावाचे मनोरथ पूर्ण
न झाल्याने शिंद्यालाही अपेक्षित द्रव्यलाभ न झाल्याने त्याने नानाला कैदमुक्त
करण्याच्या बदल्यात द्रव्याची मागणी केली. नानाने त्यांस सशर्त अनुकूल प्रतिसाद
देताच शिंद्याच्या मदतीने नाना फडणीस पुन्हा एकदा पुणे दरबारी आपल्या अधिकारपदी
विराजमान झाला. मात्र बाजीराव – नानाचे अंतस्थ विरुद्ध असल्याने इतउत्तर
कारभारातील त्याचा सहभाग कमी होत गेला
इकडे महाडच्या कारस्थानात
नानाने जे काही करारमदार केले होते त्यांचा गोंधळ उत्तरोत्तर वाढत जाऊन पेशव्याच्या
दृष्टीने अनिष्ट अशी सातारकर – कोल्हापूरकर छत्रपतींची युती जुळून आली.
छत्रपतींच्या बंदोबस्तासाठी पेशव्याने आरंभी योजलेले उपाय निष्फळ ठरले. तेव्हा
चिमाजीला पेशवेपदी बसवण्याच्या अपराधाखातर कैदेत असलेल्या परशुराम पटवर्धनावर
बाजीरावाने हि कामगिरी सोपवली. पटवर्धनाने सातारकरांचा बंदोबस्त केला पण
करवीरकरांशी झालेल्या संघर्षात तो मारला गेला.
पेशवा व मुत्सद्दी घरच्या
कारभारात दंग असताना इंग्रजांनी निजामाला मदतीस घेऊन टिपूचा समूळ नाश करत मराठी
सत्तेला मोठा धक्का दिला. ( स. १७९९ )
टिपू नष्ट झाल्याने
सत्तासमतोल आता पूर्णतः बिघडून इंग्रजांचे पारडे जड झाले होते. अशा प्रसंगी
निजामाला लगामी लावून ठेवण्यात जो यशस्वी होईल तोच दक्षिणचा अधिपती अशी स्थिती
असतानाही बंडखोरांचा बंदोबस्त करण्याच्या भरात पेशव्याने या आघाडीकडे म्हणावे तसे
लक्ष न पुरवल्याने पुढच्याच वर्षी निजामाला इंग्रजांनी आपल्या छत्रछायेखाली घेत
त्याच्याशी तैनाती फौजेचा तह केला. इतउत्तर इंग्रज – पेशव्याचा सामना जुंपणे अटळ
होते. अनिवार्य होते. परंतु, वस्तुस्थितीचा बोध होऊनही पुणेकरांना याविषयी अधिक
काही करता आले नाही. बाजीरावाची समजूत अशी कि, मी राज्यावर असण्यातच राज्याचा
निभाव आहे. तेव्हा विरोधकांना समजावून वा दंडित करून त्यांचा बंदोबस्त करण्यास
त्याने अग्रक्रम दिला.
उलट बाजीराव विरोधकांचे
असेच मत असल्याने राज्य रक्षणाचा विचार यावेळी त्यांच्या मनात असला तरी कृतीत उतरू
शकला नाही. अशा स्थितीत दि. १३ मार्च १८०० रोजी नाना फडणीसचे निधन होऊन बाजीरावाची
बाजू निर्धोक झाली तर विरोधकांचे बळ काहीसे खचले.
अंतर्गत राजकारणासाठी
कित्येकदा बाहेरच्या सत्ताधीशांची मदत घेण्याचा रिवाज सर्वत्र प्रचलित आहे.
त्यानुसार पुणे दरबारातील कित्येक मुत्सद्दी आपापल्या पक्षाच्या बळकटी करता तत्कालीन
सामर्थ्यशाली सत्तेच्या --- म्हणजे इंग्रज कंपनी सरकारच्या संपर्कात होते. या
मुत्सद्द्यांपैकी एक प्रमुख म्हणजे अमृतराव होय !
नाना फडणीसच्या मृत्यूनंतर
नानाचे बव्हंशी समर्थक अमृतरावास येऊन मिळाले. पुण्यातील इंग्रज वकील पामर देखील
अमृतरावास अनुकूल होता. यामागील मुख्य कारण म्हणजे, बाजीरावाच्या पाठी शिंदे
असल्याने त्यांस इतर कोणाच्या लष्करी मदतीची गरज नव्हती. मात्र अमृतरावाची स्थिती
विपरीत असल्याने इंग्रजांनी त्यांस उचलून धरणे स्वाभाविक होते. अर्थात,
इंग्लिशांच्या हेतूंची मुत्सद्द्यांना कल्पना असल्याने त्यांनीही एका
मर्यादेपर्यंतच इंग्रजांशी स्नेहसंबंध राखला होता.
इकडे बाजीराव – दौलतरावात
कितीही प्रेमभाव असला तरी पैशांच्या मुद्द्यावरून उभयतांमध्ये सडकून वितुष्ट पडलं
होतं. त्यात भर सर्जेरावाची पडली ! दौलतरावाचा सासरा पुण्यात प्रतिपेशवाच बनून
वर्तत होता. त्याच्या मनमानी कारभाराला सर्वच विटून गेलेले. खुद्द बाजीरावही इतका
वैतागून गेला कि, त्याने पामर मार्फत कंपनी सरकारशी संधान बांधून शिंद्याच्या
जाचातून सुटका करण्याची बोलणी आरंभली.
यावेळी हिंदुस्थानचा
गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्ली असून देशात इंग्रजी सत्ता स्थापन करण्याचे त्याचे
मुख्य उद्दिष्ट होते. टिपूचा काटा उखडून फेकल्यावर त्याने निजामालाही गुंडाळत आणले
होते. दक्षिणेत एक पेशवा तेवढा मोकळा होता. त्याच्यावर शह बसवण्याची संधी चालून
येताच वेल्स्लीने त्यानुसार सापळा रचला.
कर्नाटकातील धोंडजी पवार
उर्फ वाघाचे बंड मोडण्यासाठी ग. ज. चा धाकटा भाऊ ऑर्थर वेल्स्ली पेशव्याच्या
सरदारांसह मोहिमेत होता. ग. ज. ने त्यांस पामर मार्फत पुढील हालचालींची स्पष्ट
सूचना देत, शिंद्याने पेशव्यास कैद केल्यास वा बाजीराव पुण्यातून निघून गेला कि
एकदम पुण्यावर चालून जाण्याचा आदेश दिला.
बाजीरावच्या मदतीखातर
इंग्रजांनी हा जो सापळा रचला होता, त्यामध्ये अमृतराव, बाळोजी कुंजर, सदाशिव
माणकेश्वर हि मंडळी देखील सामील होती. इंग्रजांचा वसईच्या तहावेळी
जो दृष्टीकोन होता तोच यावेळी असल्याने याविषयी अधिक काय लिहायचं !
शिंद्यांचे महत्त्व
त्याच्या कवायती पलटणांमुळे वाढलेलं असल्याने त्याच्या लष्करी बळाची घमेंड
उतरवण्यासाठी बाजीराव – अमृतरावास तसलाच खमक्या मदतनीस हवा असल्याने त्यांनी
इंग्रजांना जवळ केले. जे धोरण नानासाहेब पेशव्याने आंगऱ्यांच्या विरोधात स्वीकारले
होते, जवळपास त्याचीच हि पुनरावृत्ती होती. परिणामही तसाच घडून आला असता. परंतु
ऐनवेळी बाजीरावाने पलटी खात शिंद्यांशी पूर्वीहून अधिक स्नेहाचे संबंध ठेवले.
पर्यायाने इंग्लिशांचा डाव हुकला.
याबाबतीत बाजीरावचे विरोधक
त्याच्या या कृत्यास दबकावणीचे, लबाडीचे राजकारण म्हणत टीका करतात. तर समर्थक याच
कारणांनी त्याचे गुणगान गातात. मात्र एक गोष्ट सर्वच नजरेआड करतात व ती म्हणजे दोन
वर्षांनी परत एकदा असाच प्रसंग उद्भवल्यावर इंग्लिशांनी मागील चुकांची उजळणी केली
नाही. परंतु पेशव्याला मात्र, त्यावेळी पूर्वीहून अधिक काही करता आले नाही.
इंग्रजांशी हातमिळवणी सुरु
असतानाच अमृतराव दरबारातील नाना फडणीस समर्थक गोटातील सरदारांनाही दौलतराव
शिंद्याच्या विरुद्ध उत्तेजन देत होता. विठोजी व यशवंतराव हे होळकर बंधू
शिंद्याच्या विरोधात नानाच्या पक्षास सामील होते. नानाच्या मृत्यूनंतर अमृतरावाने
या दोघांशी संधान बांधून त्यांना शिंद्याच्या विरोधात चिथावणी देण्याचे कार्य
केले. अमृतरावाचा पाठिंबा मिळताच विठोजीने काही समविचारी सरदारांसह अमृतरावाच्या
नावाने प्रांतात धुमाकूळ घालण्यास आरंभ केला. विठोजी व त्याच्या मित्रांच्या
बंदोबस्तासाठी पेशव्याने कित्येक सरदार रवाना केले. पैकी, काही त्यांस जाऊन मिळाले
तर काही पराभूत होऊन आले. याच सुमारास उत्तरेत यशवंतराव होळकराचा जोर बळावून
तिकडील शिंदेशाहीचा दबदबा त्याने बराच खच्ची केला होता. होळकरबंधूंच्या पराक्रमाने
व अमृतरावाचा त्यांस असलेल्या पाठींब्याने बाजीराव – दौलतराव बिथरून गेले.
दौलतरावाने बाजीरावाकडून बाकी असलेल्या पैशांची आशा सोडून पुण्यातून उत्तरेत
प्रयाण केले तर बाजीरावाने बापू गोखले, पानसे, पुरंदरे इ. सरदारांना विठोजी होळकर,
बाळकृष्ण कानडे उर्फ बावनपागे, जिवाजी यशवंत यांच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. शिवाय
बळवंत नागनाथ मार्फत पेशव्याने बाळकृष्ण बावनपागे, जिवाजी यशवंतशी बोलणी सुरु करून
त्यांना शपथपूर्वक अभयवचने देऊन पुण्यास बोलावून घेतले. त्यानुसार हे सरदार
पुण्याला येताच पेशव्याने त्यांना अटकेत टाकले. इकडे बापू गोखल्याने विठोजी
होळकराला युद्धात पराभूत करून कैद केले व पुण्यास त्याची रवानगी केली. तिथे
पेशव्याने ता. १६ एप्रिल १८०१ रोजी हत्तीच्या पायी दिले.
पेशव्याने विठोजीला
देहदंडाची शिक्षा फर्मावताच विंचूरकराने याबाबतीत रदबदली करण्याचा प्रयत्न केला
असता त्यांस जुमानण्यात आले नाही. विठोजीचा खून हा बाजीरावाच्या पेशवेपदावरील
कारकिर्दीला लागलेला कलंक आहे. घडल्या प्रकारात पेशव्याने ना न्याय केला ना
राज्यकर्त्याच्या कर्तव्याचे पालन ! जे काही केलं ते अविचार, पोरकटपणाचे कृत्य
होतं. असं कृत्य, ज्याने पेशव्याच्या राज्याची मृत्यूघंटा वाजली.
विठोजीने प्रांताची नासधूस
केली, लुटालूट केली मान्य. परंतु हे कृत्य कोण करत नव्हतं ? खुद्द पुण्यात
सर्जेरावी कशी चालली होती हे पेशव्याला माहिती नव्हते का ? पेशव्याचे सरदारही
राज्यभर काय करत होते ? विठोजीला सामील झालेल्या व कैद होऊन हाती लागलेल्या इतर
सरदारांना बाजीरावाने हीच शिक्षा का फर्मावली नाही ?
विठोजी अमृतरावाच्या
पक्षातला होता व त्याचे कृत्य जरी बंडावा / बंडखोरी / राजद्रोहाच्या वर्गात मोडत
असले तरी विठोजी हा होळकर घराण्याचा वारस होता. पेशव्याच्या राज्याचे जे दोन मुख्य
आधारस्तंभ होते, त्यापैकी एकाचा वंशज ! अशा वेळी राज्यकर्त्यास थोडं समजुतीनं
घ्यावं लागतं.
याबाबतीत स. माधवरावाच्या
काळात नाना फडणीसने मल्हारराव होळकराचा बंडावा मोडून परत सन्मानाने त्याची उत्तरेत
रवानगी केल्याचा दाखला पेशव्यास माहिती नव्हता का ? अन जर पेशव्याला माहिती नसेल
असं म्हटलं तरी बाजीरावाचे जे पक्षपाती इतिहासकार आहेत, त्यांनाही याची माहिती नसावी
हे मोठं आश्चर्य आहे. त्याहीपूर्वी निजामाला मिळालेल्या सरदारांशी थोरल्या
माधवरावाने केलेल्या वर्तनाचाही अभ्यासकांना विसर पडला कि काय ?
विठोजीच्या हत्येचे वर्तमान
यशवंतरावास समजताच तो अधिक बेफाम झाला. त्याच्या झंजावातासमोर दौलतरावाच्या
पलटणींचा पार पाचोळा झाला. यशवंत व अमृतरावाचे अंतस्थ सूत्र असून अमृतरावास
कारभारीपद मिळवण्याकरता होळकराची मदत हवी होती. त्याबदल्यात पेशव्याकडून मल्हारराव
होळकराच्या मुलास सरदारी देऊन त्याची मुतालकी यशवंतरावास देण्याचे त्याने मान्य
केले.
याच आशयाची बोलणी
यशवंतरावाने दौलतराव व बाजीरावाशी चालवली होती. मात्र, शिंद्याने याविषयी थोडीफार
अनुकुलता दर्शवूनही बाजीरावाने आपला विचार बदलला नाही. उलट त्याने होळकरांचे उत्तर
– दक्षिणेतील सर्व महाल जप्त करून टाकले.
तेव्हा प्रत्यक्ष
पेशव्याच्या भेटीसाठी यशवंतराव होळकर दक्षिणेत यायला निघाला. तेव्हाची युद्धमान
स्थिती पाहता त्याच्यासोबत भलीमोठी फौज असणे स्वाभाविक होते. मात्र, यशवंतरावाचा
हेतू आपणांस पदच्युत करून अमृतराव अथवा त्याच्या मुलास पेशवेपदी स्थापण्याचा आहे,
असा बाजीरावाचा ग्रह होऊन त्याने शिंद्याला तातडीने दक्षिणेत येण्याची आज्ञा केली.
नागपूरकर भोसल्यांनाही त्वरित पुण्यास येण्याविषयी पत्रे पाठवली.
अमृतराव दत्तकपुत्र
असल्याने त्यांस पेशवेपद मिळणे अवघड असले तरी त्याच्या मुलाला --- विनायकबापूला स.
माधवाच्या पत्नीस --- यशोदाबाईला दत्तक देऊन त्याच्या नावे पेशवेपद मिळवणे अवघड
नसल्याचे हेरून बाजीरावाने यशोदाबाईला रायगडी पाठवून दिले. परंतु याच काळात त्याने
अमृतरावास कैद का केले नाही, हे समजायला मार्ग नाही. अमृतरावास त्याने कैद केले
असते तर हा बंडावा मोडला असता. असो.
शिंदे – भोसले पुण्यात
येईपर्यंत पेशव्याने दक्षिणेतील सर्व सरदारांना यशवंतरावाच्या मुकाबल्यासाठी
पुण्यास येण्याची पत्रे पाठवली. परंतु, पुरंदरे, पानसे, घोरपडे, रास्ते प्रभूतींचा
अपवाद करता इतर कोणी आल्याचे दिसत नाही. आपल्या आगमनाचा पेशव्याने भलताच ग्रह
केल्याचे पाहून यशवंतरावाने आपले वकील पुण्यास पाठवून बोलाचालीने प्रकरण निकाली काढण्याचा
प्रयत्न केला. परंतु बाजीराव यावेळी हट्टास पेटल्याने व शिंद्याची काही फौज
उत्तरेतून पुण्यास आल्याने समेट झाला नाही. अखेर ता. १५ ऑक्टोबर १८०२ रोजी यशवंतरावाच्या
नेतृत्वाखाली होळकरी सैन्याने पेशवा – शिंदेच्या संयुक्त फौजेचा हडपसरला धुव्वा
उडवला. लढाई बिघडल्याचे कळताच बाजीरावाने कोकणचा रस्ता धरला. दौलतराव शिंदे
उत्तरेतून आणखी कुमक घेऊन येईपर्यंत कोकणात राहण्याचा त्याचा विचार होता.
इकडे पुणे शहर होळकराच्या
ताब्यात येताच त्याने अमृतरावास तातडीने पुण्यास येण्याचा निरोप पाठवला व इंग्रज
वकील क्लोज यांस पुण्यातून न जाण्याची विनंती केली. अर्थात, यशवंतरावाची धूर्त
खेळी पाहून क्लोजही काही दिवस पुण्यात थांबला व नंतर मुंबईला गेला.
यशवंतरावाच्या निरोपावरून
अमृतराव पुण्यास आला व त्याने कारभार हाती घेतला खरा परंतु, राज्याचा मालक यावेळी
अमृतरावास बंडखोर मानत असल्याने त्याचा जम बसने शक्य नव्हते. यावेळच्या स्थितीत
फक्त २ पर्याय अमृत – बाजीरावासमोर होते. (१) बाजीरावास पदच्युत करून अमृतरावाने
पेशवेपद स्वतःच्या नावे अथवा मुलाच्या नावे करून घेणे (२) बाजीरावाने निमुटपणे
पुण्यास येऊन अमृत – यशवंतरावाच्या तंत्राने राज्यकारभार हाती घेणे. तिसरा
पर्यायचं आता शिल्लक नव्हता. पैकी, पहिला पर्याय अवलंबण्यास आरंभी तरी अमृतराव
राजी नव्हता. त्याच्यासमोर नाना – बापूच्या कारभाराचा आदर्श असावा. परंतु त्या
बारभाईंकडे निदान बालपेशव्याचा नाममात्र पाठिंबा तरी होता. इथे पेशवाच विरोधात
होता ! दुसरा पर्याय बाजीराव स्वीकारणे शक्य नव्हते. मिळून दोघा पेशवेबंधूंच्या
ढिलाईमुळे राज्य विनाशाकडे वेगाने वाटचाल करू लागले.
प्राप्त स्थितीवर तोडगा
काढण्याचे यशवंतरावाचे प्रयत्न दोन्ही पेशवेबंधूंनी उधळून लावल्यावर त्याने
अमृतरावाकडे लष्कराच्या खर्चाची मागणी केली. त्यावेळी पुण्यातून काही लक्षांची
वसुली करून अमृतरावाने रकमेचा भरणा होळकराकडे केला. शिवाय कर्नाटकातील
प्रतिनिधीच्या प्रांतातून दहा लाखांच्या वसुलीची पत्रेही दिली.
पुण्यातील बातमीकडे पेशवा –
इंग्रज दोघांचेही लक्ष होतेच. इंग्रज वकिलाने पुण्यात फार काळ न दवडता मुंबईला
प्रयाण केल्याचे बाजीरावाला समजताच बाजीराव महाडचा मुक्काम सोडून सुवर्णदुर्गाचा रस्ता धरला.
यावेळच्या राजकीय घडामोडी पाहता परस्परांवरील अविश्वास, संशय, भीती
इ. मुळे मराठी सरदार वा पेशव्याकडून राज्यनाशाचेचं अधिक प्रयत्न झाल्याचे लक्षात
येते.
पेशवा पुण्यात नसल्याने
होळकराचे प्रश्न तसेच प्रलंबित पडले होते. त्याच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे
सामर्थ्य अमृतरावात नव्हते. दुसरे, अमृतराव पेशवाईही घ्यायला तयार होईना. अशा
स्थितीत यशवंतरावाने आपल्या तर्फे आणखी एक तोडगा काढला. त्याने बाजीरावाशी परत
एकदा समेटाची बोलणी सुरु करत अमीरखानास कोकणात पाठवले. यामागील त्याचा उद्देश
पेशव्याला संतोषाने वा जबरीने पुण्यास परत आणणे हा असून शिवाय जमल्यास रायगडावरील
यशोदाबाईस सोडवून आणून अमृतरावाच्या मुलास तरी पेशवेपद देऊन कोंडी फोडण्याचा
त्याचा बेत होता.
यशवंतरावाचा बेत धाडसी असला
व तो बरा – वाईट कसाही असला तरी तेव्हाच्या कुचंबलेल्या स्थितीत असाच एखादा धाडसी
उपक्रम आवश्यक होता.
यावेळी होळकराची स्थिती
अतिशय बिकट होती. बाजीरावाने त्यांस बंडखोर ठरवले होते. त्याच्या धास्तीने पेशवा
राजधानीतून बाहेर पडला होता. यशवंतरावाच्या बंदोबस्तासाठी उत्तरेत फौजा गोळा करून
शिंदे पुन्हा दक्षिणेत उतरणार होता. भोसल्यांनाही पेशव्याने यासंबंधी आज्ञापत्रे
रवाना केली होती. शिवाय पेशव्याने निजाम वा इंग्रजांशी तह केल्यास त्यांचेही
शत्रुत्व पदरी पडणार होते. मिळून सर्वच बाजूंनी होळकर अडचणीत आला असताना, ज्याच्या
भरवशावर त्याने पुण्यास येण्याचा धोका पत्करला --- तो अमृतराव शाब्दिक वाटाघाटींत
वेळ वाया घालवू लागल्यावर त्याने आणखी काय करायला पाहिजे होते ?
बाजीराव सुवर्णदुर्गी असता
त्यांस अमीरखानाची बातमी समजली. तेव्हा तो तेथून रेवदंडा व नंतर मुंबईला गेला. तिथे
फार काळ न थांबता त्याने तडक वसई गाठली. पेशव्याने यावेळी इंग्रजांचा पाहुणचार
घेण्याचा देखावा करून होळकरास भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु इकडे
यशवंतरावाने साताऱ्याहून पेशवाईची वस्त्रे आणून बाजीरावचा डाव जवळपास हाणून पाडला
होता. मात्र, ऐनवेळी अमृतरावाने वस्त्रांचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवली. ना
त्याने स्वतः पद घेतले ना मुलाला घेऊ दिले. उलट रायगडाहून यशोदाबाईस सोडवून
आणण्याचा त्याने अव्यवहार्य सल्ला दिला. अमृतरावाच्या या ढिलाईचा फायदा इंग्रजांनी
बरोबर उचलला.
पुण्यात यावेळी नवा पेशवा
गादीवर बसला असता तर पुन्हा एकदा बारभाई प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन इंग्रजांना
हात चोळत बसावे लागले असते. त्यामुळे त्यांनी बाजीरावाला आपणहून मदत करण्याची
तयारी दर्शवली. इंग्रजी गोटांत शिजणारे बेत बाजीरावास समजत नव्हते अशातला भाग
नाही. परंतु, त्याने कितीही निकडीने पुण्यास येण्याकरता शिंद्याला पत्रे रवाना
केली असली तरी उत्तरेतील फौज दक्षिणेस येण्याकरता दीड – दोन महिन्यांचा अवधी
लागणारचं होता. एवढ्या काळात पुण्यातील मुत्सद्दी गप्प बसले असते का ?
भित्यापाठी
ब्रम्हराक्षस त्यातला हा प्रकार होता. यावेळी यशवंत व बाजीराव दोघेही विचित्र
चक्रात अडकलेले. भीती दोघानांही होती व त्यावर मात करण्याचे दोघांनीही आपपल्या
परीने प्रयत्न केले. पैकी, यशवंतरावाचा उपाय अमृतरावाच्या नाकर्तेपणाने चालला नाही
तर बाजीरावाने जाणूनबुजून असंगाचा संग केला.
ता. ३१ डिसेंबर १८०२
रोजी पेशवा – इंग्रज यांच्यात वसईचा तह घडून आला. बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली
ती अमृतराव, यशवंतराव प्रभूती बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी. परंतु इंग्रजांनी
पेशव्याच्या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्याच्या मित्रांवरचं शस्त्र उपसले.
यासाठी त्यांना निमित्तही मिळाले व ते म्हणजे, पेशव्याच्या सरदारांनी वसईच्या तहास
मंजुरी न देण्याचे !
पेशव्याने वसईचा तह
केल्याचे समजताच मराठी सरदार गडबडून गेले. पेशवा इंग्रजांच्या मदतीने पुण्यास
येणार याचा अर्थ कारभारात इंग्रजांचे प्रस्थ माजून सरदारांवरही त्यांची हुकुमत
येणार. वसईच्या तहाचा सर्वात मोठा फटका शिंद्याला बसणार असून त्या खालोखाल
भोसल्यांचा नंबर होता. होळकर तूर्तास तरी बंडखोर असल्याने त्याचा प्रश्नचं नव्हता.
यावेळी गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीने ऑर्थर वेल्स्ली व लॉर्ड लेक यांची
अनुक्रमे दक्षिण व उत्तर विभागाचे सेनापती म्हणून नियुक्त करत पुढील कारवाईचे
स्पष्ट निर्देश दिले. त्याचे प्रमुख उद्दिष्ट कोणत्याही प्रकारे, परिस्थितीत
पेशव्यावर आपला शह बसवणे व उत्तरेतील शिंद्यांचे वर्चस्व मोडीत काढणे, हे होते. पेशव्याला
इंग्रजांच्या धोरणाची कितपत कल्पना होती माहिती नाही, परंतु सरदार मात्र सर्व काही
ओळखून असल्याने त्यांनी या तहास मान्यता देण्याचे टाळले. त्याबरोबर इंग्रजांनी
प्रथम शिंदे – भोसल्यांवरचं युद्ध पुकारले. परिस्थितीची गरज म्हणून सेनापती
ऑर्थरने अमृतराव, होळकरास बिलकुल छेडले नाही. उलट त्यांच्याशी मैत्रीचेच संबंध
ठेवले. अमृतराव पेशवे कुटुंबातला होता तर यशवंतराव बंडखोर असून पेशव्याकडून
त्याच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचे आमिष ऑर्थरने त्यांस दाखवले. इंग्रजी कावा
ओळखून होळकराने शिंदे – भोसल्यांशी हातमिळवणी चालवली.
इंग्रजांशी
लढण्यासाठी शिंदे – भोसल्यांनाही होळकराच्या मदतीची गरज असल्याने त्यांनीही त्याच्याशी
मित्रता दर्शवली. मात्र बाजीरावास हे पसंत नव्हते. त्याने होळकराचा बंदोबस्त
करण्याची शिंदे – भोसले तसेच इंग्रजांना टोचणी लावली. याचवेळी, होळकराची समजूत
काढून प्रथम इंग्रजांचा बंदोबस्त करू व मग होळकराला नरम करू, अशा आशयाचे
दौलतरावाने पेशव्यास पाठवलेले पत्र अमृतरावास मिळाले. यावेळी अमृतरावाने भवितव्यता
पाहून इंग्रजांशी मित्रता दर्शवत हे पत्र ऑर्थर वेल्स्लीकडे पाठवले. वेल्स्लीने
ते, यशवंतरावास पाठवण्याची सूचना केली. त्यानुसार अमृतरावाने यशवंतरावास शिंदे –
पेशव्याची पत्रे पाठवून दिली. परिणामी होळकराने शिंदे – भोसल्यांची साथ सोडून
माळव्याकडे प्रयाण केले.
त्यानंतर इंग्रजांनी
भेद व शौर्याच्या बळावर शिंदे – भोसल्यांना पराभूत करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे
तह केले. बाजीरावास पुण्याची पेशवाई, उत्तरेतील शिंद्यांचे महत्त्व घटवणे, शिंदे –
भोसले इंग्रजांच्या वर्चस्वाखाली येणे हे वसईच्या तहामागील अपेक्षित परिणाम पदरी
पडताच इंग्रज होळकराच्या पाठी लागले. परंतु यावेळी इंग्रजांना पराभव पत्करून
होळकराशी मित्रत्वाचा तह करावा लागला.
सारांश, स. १८०३ पासून १८०५ पर्यंतच्या
काळात झालेल्या दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धामुळे मराठी सरदारांचा राज्यसंघ पुरता
विस्कळीत करत व्यवहारात मान – सन्मानापलीकडे त्यांचे परस्परांशी व पेशव्याशी फारसे
संबंध राहू न देण्याची खबरदारी इंग्रजांनी घेतली.
दुसरे इंग्रज –
मराठा युद्ध सुरु होतानाचा बाजीरावाच्या मनाचीही चलबिचल झाली. कित्येकदा तर त्याने
अंतस्थरित्या पुणे दरबारच्या सरदारांना --- जे वसईच्या तहास मान्यता देऊन
बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्याच्याच आज्ञेने इंग्रजांना सामील झाले होते
--- इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्याचा हुकुम केला.
राज्यकर्त्याने
परराज्याशी राजकारण करताना दुटप्पीपणा करावा. स्व राज्यातील सरदारांशी मर्यादित
प्रमाणात दुटप्पीपणाचे वर्तन ठेवावे, अशी राजनीती असताना बाजीरावाने सर्वांशीच
सारखे धोरण ठेवल्याने सरदारांनीही पेशव्याच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले. परिणामी
वसईच्या तहामुळे होणारा स्वातंत्र्यसंकोच बाजीरावास निमुटपणे पाहण्यापलीकडे काही करता
आले नाही.
दुसऱ्या इंग्रज –
मराठा युद्धाच्या समाप्तीनंतर पेशव्याने इंग्रजांच्या विरोधात गुप्तपणे कारवाया
करण्यास, राजकारण करण्यास आरंभ केला. इंग्रजांनाही पेशव्याच्या धोरणाची चांगलीच
कल्पना असल्याने इतउत्तर त्यांनी मराठी सरदारांपासून पेशव्याला पूर्णतः अलग
पाडण्यावर लक्ष केंदित केले. त्यांच्या सुदैवाने बडोद्याचे गायकवाड त्यांच्यापुढे
सहज वाकले. यशवंतराव होळकर अल्पायुषी निघाल्याने तीही धास्ती मिटली. नागपूरकर
रघुजी भोसले मरण पावल्याने भोसल्यांच्यात पुन्हा वारसाच्या भानगडी होऊन तिथेही
इंग्रजांचा बऱ्यापैकी शिरकाव झाला. सातारकर – कोल्हापूरकर छत्रपती पेशव्यावर कधीच
प्रसन्न नसल्याने, त्यांच्याकडेही इंग्रजांचे चांगलेच बस्तान बसले. अशा प्रकारे
बाहेरून इंग्रजांनी पेशव्यास साफ घेरून त्याला मधल्यामधे कोंडून धरला. अशा वेळी
पुण्यात काय चालले होते ?
इंग्रजांच्या
बेतांची माहिती करून घेत बाजीराव अंतस्थरित्या आपल्या सरदारांना भावी युद्धाची
तयारी करण्यासाठी प्रोत्साहन, आज्ञा देत होता. शिवाय या ना त्या निमित्ताने त्याने
आपली फौजही वाढवली होती. खेरीज हरप्रयत्ने त्याने खजिन्याचीही तरतूद करून ठेवली
होती. फक्त आरंभ कुणी, कधी व केव्हा करायचा याचीच देरी होती. इंग्रजांना
पेशव्याच्या युद्धतयारीची वार्ता असल्याने त्यांनीच बाजीरावावर उलटून प्रहार
करण्याचे ठरवत पेशवा व त्याच्या सरदारांच्या प्रदेशांत मोक्याच्या ठिकाणी लष्करी
तळ उभारले व पेंढारी युद्धाचे निमित्त करून प्रथम त्यांनी होळकरास लोळवले. नंतर
भोसल्यांचा काटा काढला. दरम्यान बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारून
त्यांच्याशी संघर्ष आरंभला होता. परंतु कागदावर पेशव्याने केलेली युद्धतयारी
प्रत्यक्ष अंमलात येऊ शकली नाही.
पदावर आल्यापासून
बाजीरावाने ज्या काही अननुभवातून चुका केल्या, त्यांची फळं त्यांस मिळत गेली.
त्याचे भरवशाचे सरदार त्याची साथ सोडून गेले. आपा देसायाने तर आष्टीला बाजीरावाच्या
सेनापतीचा --- बापू गोखल्याचा विश्वासघाताने इंग्रजांना बळी दिला. तर त्याच लढाईत
सातारकर छत्रपतीही इंग्रजांच्या गोटात दाखल झाले. पानसे, पुरंदरे, रास्ते, आपटे
प्रभूती सरदार शक्य होते तोवर निष्ठेने लढले. पटवर्धन वगैरे मंडळी काळाची पावलं
ओळखून निघून गेली. पेशव्याचा भाऊ चिमाजी देखील अखेरपर्यंत भावासोबत राहिला नाही.
अखेर ता. ३ जून १८१८ रोजी बाजीराव इंग्रजांना शरण गेला. त्यावेळी इंग्रजांशी
झालेल्या तहात त्याने आपल्या राज्याची सोडचिठ्ठी लिहून दिली. बदल्यात इंग्रजांनी
त्यांस वार्षिक तनखा मंजूर करत उत्तरेत बिठूर येथे मर्यादित संस्थान तोडून दिले.
तिसऱ्या इंग्रज –
मराठा युद्धांत इंग्रजांनी पेशव्याचे राज्य खालसा करण्याचे अगोदरच निश्चित केले
होते. जरी बाजीरावाने युद्ध पुकारले नसते तरी इंग्रज पेशव्याचे राज्य घेणारचं
होते. त्यामुळे पेशव्याने युद्ध पुकारल्याने इंग्रजांनी त्याचे राज्य खालसा केले
असे म्हणवत नाही. परंतु इंग्रजांनी फक्त पेशव्याचेच राज्य तेवढे नष्ट करून
सरदारांची राज्यं का अस्तित्वात ठेवली, असा एक तद्दन बालिश प्रश्न बऱ्याचदा
उपस्थित करून सरदारांनी पेशव्याच्या विरोधात कारवाया केल्याने, इंग्रजांना अंतस्थ
मदत केल्यानेच इंग्रजांनी त्यांच्यावर हि मेहरबानी केली असा एक अत्यंत आवडता,
सोयीस्कर तर्क काढून त्याची मांडणी केली जाते.
वस्तुतः ज्याने
पेशवाईच्या समग्र इतिहासाचे डोळसपणे अध्ययन केले आहे, त्यांना या प्रश्नाचे उत्तर
सहजगत्या मिळू शकते. दिल्लीच्या राजकारणात बादशाह निष्प्रभ झाल्यावर वजिराचे जे
महत्त्व राहिले होते तेच, साताऱ्याला छत्रपती निस्तेज झाल्यावर पेशव्यास लाभले.
पुढे दिल्लीचे वजीर नामशेष होऊन प्रांतिक अधिकारी स्वतंत्र संस्थानिकाप्रमाणे राहू
लागले. काहींची संस्थाने तर पुढे मोगल बादशाही नष्ट झाल्यावर देखील कायम राहिली.
तोच घटनाक्रम मराठी राज्यातही घडून आला. मराठी राज्य नष्ट करायचं असेल तर
पेशव्याला उखडून काढणे महत्त्वाचे होते.
तसेही दुसऱ्या
इंग्रज – मराठा युद्धानंतरच्या दीड दोन दशकात इंग्रजांनी विविध तहांच्या द्वारे
पेशव्याला त्याच्या सरदारांपासून विभक्त करतचं आणले होते. व प्रत्येक वेळी पेशवा
इंग्रजांपुढे मान तुकवतचं गेला. बाजीराव इंग्रजांशी उघडपणे तह करी व अंतस्थरित्या
सरदारांना चिथावणी देई. याचा परिणाम अंती सरदारांना घातक ठरे. त्यामुळे उत्तरोत्तर
सरदारांनी पेशव्याच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केल्यास नवल काय ?
दुसऱ्या इंग्रज –
मराठा युद्धांत पेशव्याला आपलं गमावलेलं स्वातंत्र्य परत मिळवण्याची निर्णायक संधी
होती. त्यावेळी त्याने जर वसईचा तह झुगारला असता तर त्यांस कैद करण्याची
इंग्रजांची छाती नव्हती. तसेच सरदारही त्याच्या विरोधात गेले नसते. कारण, त्यावेळी
स्वातंत्र्याचे थोडेफार वारे त्यांच्यात खेळत होते. परंतु हातातली हि सुवर्णसंधी
दवडून पेशवा स. १८१८ पर्यंत अनुकूल परिस्थितीची वाट बघत बसला. या प्रदीर्घ काळात
इंग्रजांनी चारी बाजूंनी त्याच्या भोवती फास आवळत नेला. इंग्रजांच्या राजकारणाची
चाल भलेही पेशव्याने ओळखली. त्यावर मात करण्याची त्याने तयारीही केली. परंतु
इंग्रजी आक्रमण उलथवण्याची त्याच्यात कुवत नव्हती. धमक नव्हती हे उघड आहे. असो.
इंग्रजांच्या
विरोधात शस्त्र उपसणाऱ्या सरदारांना इंग्रजांनी अजिबात शिक्षा केली नाही, असेही
घडलेलं नाही. नागपुरच्या आप्पासाहेब भोसल्याला रानोमाळ भटकून जोधपुरास आश्रिताप्रमाणे राहावे लागले. तुळसाबाई होळकरचा
तर इंग्रजांनी खूनचं घडवून आणला. बापू गोखले जीवानिशी गेला तर त्याच्या कुटुंबाचा
बाजीरावाने परामर्श घेतल्याने निभाव लागला. परंतु बापूच्या सेवकांवर इंग्रजांची
वक्रदृष्टी कायम राहिली. त्रिंबकजी डेंगळे मरेपर्यंत कैदेत राहिला. विंचूरकराची तर
बरीच वाताहत झाली.
पंतसचिव, पटवर्धन,
आपा देसाई निपाणकर, अक्कलकोटकर भोसले काळाची पावलं ओळखून आधीच इंग्रजी गोटात
गेल्याने बचावले. परंतु या मंडळींच्या पक्षबदलाने पेशव्याचे राज्य गेले असे म्हणता
येत नाही. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड हे पेशव्याच्या राज्याचे चार प्रमुख खांब.
पैकी, भोसले – होळकरांची माहिती वर आलीच आहे. उरलेल्या दोघांपैकी, गायकवाड
स्वतःहून इंग्रजांच्या घरात गेले. राहता राहिला दौलतराव शिंदे ! तर दुसऱ्या इंग्रज
– मराठा युद्धांत बाजीराव पेशव्याने जी भूमिका बजावली तीच भूमिका यावेळी दौलतराव
बजावत होता. अंतस्थरित्या पेशवा आणि इतर सरदारांशी पत्रव्यवहार करून इंग्रजांच्या
विरुद्ध चिथावणी देणे, पेशवा तसेच इतर सरदारांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी
मदत करण्या संदर्भात आपल्या सेवकांना गुप्त सूचना देणे इ. कामे शिंद्याने केली.
परंतु उघडपणे तो युद्धास उभा राहिला नाही. माझ्या मते, फक्त एवढाच त्यांस ठपका
देता येईल. परंतु फितूर वा राज्यद्रोही त्यास म्हणता येणार नाही.
छत्रपतीने आपल्या
अधिकारात बाजीरावास पेशवाईवरून बडतर्फ केल्याने त्याची साथ करणारे बंडखोर ---
अर्थात छत्रपतीचे गुन्हेगार ठरणार होते. दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धांत इंग्रजांनी
पेशव्याच्या मदतीच्या नावाखाली जे केलं तेच यावेळी छत्रपतीला मदत करण्याच्या
नावाखाली साधून घेतलं, एवढंच म्हणता येईल. त्यावेळी जर पेशवा आपल्या समजुतीशी,
भावनेशी प्रामाणिक होता तर छत्रपती यावेळी कसा चुकीचा ठरावा ? बरे, या युद्धानंतर
बाजीरावाला राजकीय गुन्हेगारासारखे न वागवता त्याला संस्थानिकाच दर्जा देऊनचं
वागवण्यात आल्याचे कसे दुर्लक्षित करता येईल ? तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धानंतर
छत्रपतीला पेशव्याच्या ताब्यातील राज्य मिळालं नाही, परंतु इंग्रजांनी त्याला जे
मर्यादित राज्य दिलं, तेवढं तरी पेशव्यांच्या काळात त्यांना मिळालं होतं का ? शिवाय
वसईचा तह करताना बाजीरावाच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या इंग्रजांनी पूर्ण केल्या
नाहीत. तेव्हा बाजीरावाने तरी काय केलं होतं ? ज्या प्रमाणे सवाई माधवराव पेशवा
असताना नजरकैदेतील बाजीरावास नाना फडणीसच्या अपरोक्ष पेशव्याशी संधान बांधण्याचा
हक्क होता, तसाच तो सातारकर छ्त्रपतीला पेशव्याच्या अपरोक्ष इंग्रजांशी अंतस्थ
सूत्र जुळवताना का असू नये ?
प्रश्न फितुरी, गद्दारी,
राज्यद्रोह वा राज्यनिष्ठेचा बिलकुल नाही. प्रश्न किंवा मुद्दा हा आहे कि, एका
व्यक्तीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा, हि कोणती अभ्यास वा लेखन पद्धती ? गेलेलं पेशवेपद
परत मिळवण्यासाठी रघुनाथरावाने हातपाय मारले कि तो राज्यबुडव्या. मग महाडच्या
कारस्थानात नानाने जे केलं ती काय राज्यनिष्ठ होती ? रघुनाथाचे कारस्थान यशस्वी
होऊन अंती परिणाम प्रतिकूल झाला असता तर त्यांस शिव्या घालणे, टीका करणे, दोष देणे
समजता येते. परंतु त्याचे राजकारण अयशस्वी होऊनही त्यांस दोषाचे पात्र बनवणे कितपत
सयुक्तिक आहे व महाडचे कारस्थान नाममात्र यशस्वी होऊनही त्याचा अधिकाधिक गौरव करणे
कितपत योग्य आहे ? वसईला जाऊन बाजीरावाने तह करण्यापेक्षा पुण्यास परत येऊन
यशवंतरावाची भेट घेतली असती तर काय बिघडणार होते ? अमृतराव किंवा यशवंतराव त्याला
कैद करणार होते का ? अमृतरावात तेवढी धमक नव्हती व यशवंतरावाची ती ताकदही नव्हती.
मग जीवास अपाय तर लांबची गोष्ट. मग निव्वळ दहशत खाऊन त्याने आपले स्वातंत्र्य
विकले असे का न म्हणावे ? अशा वेळी मग अननुभवीपणाची सबब पुढे केली जाते तर मग तीच
छत्रपतीलाही का लागू पडत नाही ?
प्रश्न अनेक आहेत.
मुद्दे भरपूर आहेत. गरज फक्त डोळस अभ्यासकांची आहे. राजकीय इतिहास लिहिताना
पक्षपातीपणा केल्यास इतिहासाची हानीच होत राहणार आहे. तेव्हा अशी हानी करत राहायचं
कि, वेळोवेळी नव्याने उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे वाचकांना शक्य तितका
तपशीलवार, वास्तवदर्शी राजकीय इतिहास सांगायचा, हे आता इतिहास अभ्यासकांनी ठरवावे.
( समाप्त )
संदर्भ ग्रंथ :-
१)
छत्रपती शिवरायांची अस्सल
पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)
ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स.
सरदेसाई
३)
काव्येतिहास संग्रहांत
प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या.
मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)
मराठी रियासत ( खंड १ ते ८
) :- गो. स. सरदेसाई
५)
मराठ्यांची लष्करी व्यवस्था
:- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)
मराठेशाहीतील वेचक – वेधक
:- य. न. केळकर
७)
भूतावर भ्रमण : ऐतिहासिक
लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)
काही अप्रसिद्ध ऐतिहासिक
चरित्रे :- य. न. केळकर
९)
नाना फडनवीस यांचे चरित्र
:- वा. वा. खरे
१०)
मराठ्यांच्या इतिहासाची
साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)
मराठी दफ्तर रुमाल पहिला
(१) :- वि. ल. भावे
१२)
मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :-
वि. ल. भावे
१३)
फार्शी – मराठी कोश :-
प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)
मराठ्यांच्या इतिहासाची
साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)
दिल्लीच्या शहाजहानचा
इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)
छत्रपती शिवाजी :- सेतू
माधवराव पगडी
१७)
ताराबाई – संभाजी ( १७३८ –
१७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)
ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर
( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)
पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :-
कृ. वा. पुरंदरे
२०)
नागपूर प्रांताचा इतिहास :-
या. मा. काळे
२१)
सरदेसाई स्मारक ग्रंथ :-
श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)
मराठी सत्तेचा उत्कर्ष :-
न्या. महादेव गोविंद रानडे
२३)
शिंदेशाही इतिहासाची साधने,
भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके
२४)
मराठ्यांची बखर :- ग्रँट डफ
लिखित व कॅप्टन डेविड केपन अनुवादित ( आवृत्ती ६ वी )
२ टिप्पण्या:
जबरदस्त मालिका!
-गामा पैलवान
Gamma Pailvan,
धन्यवाद सर !
टिप्पणी पोस्ट करा