सोमवार, १८ जानेवारी, २०१६

बाजीराव - मस्तानी ( भाग १ )




  
    काही ऐतिहासिक गोष्टी अशा असतात, ज्या दंतकथा असूनही खऱ्याच वाटतात व खऱ्या कथा आख्यायिका बनून राहतात. अशांपैकी एक म्हणजे बाजीराव - मस्तानी प्रेमकथा ! सबंध पेशवाईतील हे एकमेव प्रेमप्रकरण असावं, ज्यावर कधी भीत भीत तर कधी भरभरून लिहिण्यात आलंय. पण या लेखनामध्ये बाजीरावाविषयी आपणांस जितकी माहिती मिळते तितकी मस्तानीची मिळत नाही. मस्तानी मुळची कोण ? बाजीरावाची तिची भेट कशी झाली ? बाजीरावाच्या आयुष्यात तिचं नेमकं स्थान काय ? तिचा मृत्यू कसा व कुठे झाला ? इ. विषयी आपणांस फारच त्रोटक माहिती वाचायला मिळते. प्रस्तुत लेखांत मस्तानी विषयक उपलब्ध झालेल्या संदर्भ ग्रंथांतील माहितीच्या आधारे उपरोक्त प्रश्नांच्या उत्तरांचा धांडोळा घेण्याचे योजले आहे.

    श्री. द. ग. गोडसे यांनी ' मस्तानी ' विषयक एक पुस्तक स. १९८९ मध्ये लिहिले होते. त्यामध्ये मस्तानीच्या पूर्वेतिहासाबद्दल विश्वसनीय माहिती देणारे तीन प्रमुख वूत्तांत आहेत.

(१) पहिला वृत्तांत आहे, छत्रसालच्या कारकिर्दीत लालकवीने रचलेल्या ' छत्रप्रकाश ' या काव्यग्रंथाचा. हा ग्रंथ छत्रसाल - बाजीरावाच्या समकालीन असल्याने यातील वृत्तांत अधिक विश्वसनीय मानता येईल. यानुसार, " बुंदेलखंडातून पुण्यास परत जाताना बाजीरावाने मस्तानी नावाची मुसलमान युवती बरोबर नेली. " असं लालकवी म्हणतो. 

(२) दुसरा वृत्तांत आहे, कॅ. ब्रिग्जने पेशव्याच्या सरदारांच्या तयार केलेल्या वंशवर्णन पत्रिकेचा. स. १८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाल्यावर ब्रिग्जने हा वृत्तांत बनवला. त्यामध्ये पेशव्याच्या सरदारांनी आपापल्या वंशाची जी माहिती दिली त्यात मस्तानीच्या वंशजांचीही असून त्यात असं लिहिलंय कि, " छत्रसालने बाजीरावास आपल्या राज्यातील साडेतेहतीस लाख वार्षिक उत्पन्नाचा भाग आणि बुंदेलखंडातील हिऱ्याच्या खाणींच्या उत्पन्नाचा तिसरा भाग इत्यादी बक्षीस दिले. याशिवाय छत्रसालने यवनीच्या संबंधापासून झालेली ' मस्तानी ' नावाची स्वतःची अनौरस मुलगी बाजीरावास दिली. "

(३) तिसरा वृत्तांत आहे, मस्तानीच्या वंशजांच्या वंशावळीचा. बांदेवाल्या नवाबांच्या वंशावळीतील मजकूर पुढीलप्रमाणे :- " पेसवा साहबकी सवारी आयकर परनाके ( पन्ना ) उपर लढाई कर के बंगसको भगा दिया. और राजा छत्रसाल को गादीपर कायम किया. उस वक्त तीन हिस्से राजके करके येक हिस्सा पेसवा साहबको दिया और महालसे मस्तानी औरत, कुबल सूरत थी, सो राजाने पेसवा साहब को दी. " 

    खेरीज बुंदेलखंडाच्या तवारिखीमध्येही मस्तानी हि छत्रसालची अनौरस मुलगी असल्याचा उल्लेख आहे, असे गोडसेंनी नमूद केले आहे. परंतु तवारिखीचा रचनाकाल माहिती नसल्याने त्यातील उल्लेख या क्षणी तरी ग्राह्य धरता येत नाही.



    उपरोक्त प्रमुख तीन संदर्भांपैकी छत्रप्रकाश काव्याचा खी भाग कॅप्टन पॉगसनने स. १८२८ मध्ये इंग्रजीत भाषांतरित केल्याचा उल्लेख गोडसे करतात परंतु, त्यांनी संदर्भांकरता इंग्रजी अनुवाद वापरला कि, मूळ काव्यग्रंथ याचाही ते निर्देश करत नाहीत. त्यामुळे कालानुक्रमानुसार यांची संगती लावण्यात थोड्या अडचणी व मर्यादा पडत असल्या तरी सध्यापुरता त्यांस इलाज नाही.

    छत्रप्रकाश कर्ता, मस्तानीचा उल्लेख मुसलमान युवती असा करतो. तिचा संबंध छत्रसालशी असल्याचे तो देत नाही. त्याचप्रमाणे ती कंचनी होती / नव्हती याविषयीही काही लिहित नाही. परंतु, कवी समकालीन असल्याने मस्तानी बाजीरावास बुंदेलखंडात भेटली, एवढं तरी निश्चित होतं. 

    बांदेवाल्या नवाबांच्या वंशावळीतला मजकूर लक्षात घेता, त्यात छत्रसालने पेशव्याला राज्याचा एक हिस्सा, व महालापासून झालेली औरत / स्त्री दिल्याचे नमूद केलंय. 

    इथे ' महालसे ' हा शब्द प्रयोग आपणांस काळजीपूर्वक अभ्यासावा लागेल. ' महालसे मस्तानी औरत ' यामध्ये नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे ? महालापासून झालेली मुलगी असा तर नाही ना ?

    या संदर्भात प्रो. मा. त्रिं. पटवर्धन यांचा ' फारशी - मराठी - कोश ' पाहिला असता, त्यात त्यांनी ' महाल ' शब्दाचे जे अनेक अर्थ दिलेत त्यांपैकी एक म्हणजे राजस्त्री !  

    सातारकर शाहू छत्रपतीच्या दोन्ही राण्यांचा पत्रांत उल्लेख करताना बऱ्याचदा ' उभयतां महाल, थोरला वाडा ' असा केला जायचा. उत्तरेतील मोगल, राजपूत, बुंदेल्यांची स्थिती फारशी वेगळी नाही. कदाचित मोगल राजवटीच्या दीर्घकालीन सानिध्याचा हा परिणाम असावा.

    ऐतिहासिक पत्रं वरवर जरी चाळली तरी महाल, वाडा इ. शब्द विवाहित स्त्रियांना उद्देशूनच लावलेले आढळतात. हे जर जमेस धरले तर बांदेवाल्या नवाबांच्या वंशावळीतील मजकुरानुसार छत्रसालने आपल्या ' महालसे मस्तानी औरत ' अर्थात, विवाहित स्त्री पासून झालेली मुलगी दिल्याचे स्पष्ट होते. परंतु, ती मुसलमान असल्याचा यात उल्लेख नाही. निदान गोडसेंनी दिलेल्या अवतरणात तरी नाही !
    
    स. १८२१ मध्ये साताऱ्यास छत्रपतींच्या दरबारी असलेल्या ब्रिग्जने बांद्याच्या नवाबांकडून, मस्तानीचे वंशज व पेशव्यांचे सरदार म्हणून जी माहिती मिळवली, त्यातील तपशीलात थोडा फरक आहे. या वृत्तांतानुसार, मस्तानी हि छत्रसालची अनौरस मुलगी असल्याचा उल्लेख आहे.

    लालकवीचा छत्रप्रकाश, बांदेवल्या नवाबांची वंशावळ आणि ब्रिग्जने बनवलेली वंशवर्णन पत्रिका यांतील माहिती लक्षात घेता, बाजीरावाच्या बुंदेलखंड स्वारीत त्यांस मस्तानीची प्राप्ती झाली हे स्पष्ट होते. परंतु, मस्तानी हि छत्रसालची औरस वा अनौरस कन्या, यासंबंधी मस्तानीच्या वंशजांनी दोन वेगवेगळे उल्लेख दिलेले आहेत. गोडसेंनी यांपैकी बांदावाल्या नवाबांची वंशावळ ग्राह्य धरत आपल्या पुस्तकांत मस्तानी हि राजकन्याच असल्याचे ठासून लिहिलं आहे. वास्तविक, बांदेवाल्या नवाबांनी आपली वंशावळ कधी बनवली याचा त्यांनी कालनिर्देश केला असता तर इतरांनाही आपापली अनुमानं तपासून पाहता आली असती. खैर, लालकवी व ब्रिग्जने बनवलेल्या वंशवर्णन पत्रिकेवरून मस्तानी हि छत्रसालची मुस्लीम स्त्री पासून झालेली अनौरस कन्या असल्याचेच सध्या तरी मानावे लागते. कारण, पुढील घटनाक्रम पाहता मस्तानी जर खरोखर औरस राजकन्या असती तर तिच्या नशिबी अटकेचे सोहळे कधीच आले नसते.

    आता दुसरा मुद्दा असा आहे कि, बाजीरावास मस्तानी नेमकी कशी प्राप्त झाली ? अर्थात, या स्थळी आपणांस पूर्णतः लालकवी वा इतर वंशकथांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

    स. १७२१ मध्ये मुहम्मद बंगशला अलाहाबाद सुभ्याचा कारभार मिळाला. छत्रसालचे बुंदेलखंडातील राज्य या सुभ्याअंतर्गतच मोडत असल्याने व बंगशला मोगल बादशाहीकडून मिळालेले परगणे बुंदेलखंडातच असल्याने उभयतांचा झगडा जुंपणे अनिवार्य होते. स. १७२६ अखेर बंगश - छत्रसाल संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले. छत्रसालचे राज्य काबीज करण्याकरता बंगशने त्या वर्षाअखेर मोठी स्वारी काढली. या मोहिमेत यशापयशाचा सामना करत अखेर त्याने छत्रसालला शरण येण्यास भाग पाडले. ( डिसेंबर, १७२८ )

    याच काळात माळव्यामध्ये दि. २९ नोव्हेंबर रोजी चिमाजीने आमझेऱ्याच्या लढाईत दया बहादूर व गिरीधर बहादूरचा संहार केला. माळव्यातील घडामोडींवर नजर ठेवून बंगश बुंदेलखंडातील प्रदेशांवर ताबा बसवण्याचे कार्य करत होता. यावेळी बाजीराव पेशवा चांदा, देवगड मार्गाने पुढे सरकत होता. माळव्याची लढाई मारून चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला. छत्रसाल व त्याची मुलं जरी बंगशच्या कैदेत असली तरी त्यांचं बाह्य जगाशी पत्रव्यवहार सुरूच होता. छत्रसालला पराभूत करून बंगशने जरी मोठी बाजी मारली असली तरी त्याच्या या विजयाकडे साशंकतेने पाहणारी मंडळी दिल्ली दरबारात काही कमी नव्हती. त्यांनी फिरून छत्रसालला बंडखोरीकरता उत्तेजन दिले. इकडे बुंदेलखंडाची मोहीम प्रदीर्घकाळ चालवूनही दिल्ली दरबारकडून आवश्यक तो पाठपुरावा न झाल्याने बंगशही थोडा हलका झालेलाच होता. 

    अशात माळव्यातील बातमी छत्रसालला समजून त्याने गढामंडळ येथे असलेल्या बाजीरावाकडे मदतीस येण्याची पत्रे पाठवली व या करता दुर्गादास नावाच्या व्यक्तीलाही सोबत रवाना केले. दुर्गादास हा छत्रसालच्या घरचा माणूस असल्याचा उल्लेख सरदेसाईंनी केला आहे. परंतु, दुर्गादास व छत्रसालची पत्रे फेब्रुवारीत बाजीरावास मिळाली असं त्यांचं म्हणणं असून तत्पूर्वी स. १७२९ च्या जानेवारीतच बाजीरावाने चिमाजीस पत्र पाठवून उज्जैनचा वेढा सोडून इतरत्र जाण्याची सूचना केली व अतिरिक्त कुमकेची गरज असल्यास तसे त्वरित कळवण्यास सांगितले. शिवाय याच पत्रात आपण लवकरच बुंदेल खंडात जाणार असल्याचंही त्याने नमूद केलंय. यावरून छत्रसाल व पेशव्याचा यापूर्वीच पत्रव्यवहार झाला असावा किंवा बुंदेलखंड अथवा इतरत्र जाण्याचा बाजीरावाचा मानस असावा, अशा दोन शक्यता संभवतात. परंतु प्रस्तुत स्थळी आपण दुर्गादासाची हकीकत ग्राह्य धरू. कारण, अस्सल पुराव्याचे आधारे केलेले विधान असताना तर्कांच्या जंगलात शिरणे योग्य नाही. 

    बाजीरावाशी संधान पक्कं बांधल्यावर छत्रसाल होळीच्या सणाचे निमित्त करून बंगशच्या छावणीतून बाहेर पडला व आठ - दहा मैलांवर त्याने आपला तळ ठोकला. बाजीराव फिमागून येत असल्याची तोवर बंगशला कल्पना नसल्याने तोही बिनधास्त होता. 

    बाजीराव बंगशच्या अगदी नजीक आल्यावर बंगशची झोप उडाली. यावेळपर्यंत त्याची बरीचशी फौज वेगवेगळ्या कामगिऱ्यांवर पांगल्यामुळे त्याच्याकडे फौजफाटाही अल्प होता. उलट प्रांतातील कित्येक जमीनदार पेशव्याच्या गोटात गेल्याने त्याच्या लष्कराची भरती साठ - सत्तर हजारांच्या आसपास होती.

    दि. १२ मार्च १७२९ रोजी महोबा येथे बाजीराव छत्रसालची भेट होऊन त्यांनी बंगशविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. बंगशने जैतपूरचा आश्रय घेऊन मदतीकरता मुलाकडे व दिल्ली दरबारी खलिते रवाना केले. पैकी, दिल्लीकरांनी उपेक्षा केली तर बंगशचा मुलगा काईमखान बापाच्या मदतीकरता येत असता त्यांस पिलाजी जाधव, अंताजी माणकेश्वर, दावलजी सोमवंशी सरलष्कर यांनी सुप्याजवळ पराभूत करून पिटाळून लावले.

    काईमखान पळून गेल्यावर व जैतपूरातील सामग्री संपुष्टात आल्यावर बंगशने बाजीरावाशी तह करून बुंदेलखंड सोडल्याचं सरदेसाई लिहितात. परंतु इर्विनकृत व जदुनाथ सरकार संपादित ' उत्तर कालीन मुघल ( खंड २ ) ' नुसार, पावसाळा तोंडावर आल्याने व लष्करात रोगराई पसरू लागल्याने बाजीराव जैतपूरचा वेढा उठवून मे महिन्यात माघारी फिरला. तेव्हा छत्रसालने स्वबळावर तो वेढा तसाच चिकाटीने चालवला. अखेर बंगशचा निरुपाय झाल्याने व काईमखान बापाच्या मदतीकरता सैन्य गोळा करून परत एकदा यमुना पार करून येऊ लागल्याने छत्रसालने बंगशबरोबर तह केला. त्यानुसार परत छत्रसालच्या राज्यावर चालून न येण्याच्या बोलीवर बंगशला जैतपूराहून जाऊ देण्यात आले  ( ऑगस्ट, १७२९ )

    इकडे २३ मे रोजी जैतपूराहून निघालेला पेशवा १६ जुलैला पुण्यास पोहोचला. बाजीरावाने केलेल्या मदतीखातर छत्रसालने त्यांस आपल्या राज्यातील काही भाग जहागिरीदाखल देण्याचे ठरवले. याकरता त्याचे वकील हरिदास पुरोहित व आशाराम पुण्यास आले. मधल्या काळात दि. १४ डिसेंबर १७३१ रोजी राजा छत्रसाल मरण पावला. पुढे त्याच्या मुलांनी --- हिरदेसा व जगतराज यांनी पेशव्याला जहागीर लावून दिली. स. १७३२ - ३३ च्या चिमाजी आपाच्या उत्तर स्वारीत त्याने या जहागिरीचा ताबा घेऊन तिची व्यवस्था लावण्याकरता गोविंदपंत खेरची ( बुंदेले ) नियुक्ती केली.

    ज्या प्रसिद्ध बुंदेलखंड स्वारीत बाजीरावास मस्तानी प्राप्त झाली, त्या स्वारीचा वृत्तांत संक्षेपात वरीलप्रमाणे आहे. आता प्रश्न असा उद्भवतो कि, बाजीराव - मस्तानी यांचा छत्रसालने विवाह लावून दिला होता का ?

    गोडसेंच्या मते, छत्रसालने बाजीराव - मस्तानीचा विवाह लावून दिला. परंतु त्याचे पुरावे ते देत नाहीत. उलट छत्रसाल, प्रणामी पंथ वगैरे घटकांचा सांधा जुळवून ते वेगळीच कथा बनवून मस्तानी छत्रसालची मुलगी --- अर्थात बुंदेल्यांची राजकन्याच असल्याचे वारंवार फिरून लिहितात.

    बांदा नवाबांची वंशावळ, वंशवर्णन पत्रिका, लालकवीचा वृत्तांत लक्षात घेता बाजीराव - मस्तानीचा विवाह झाला नाही, हे उघड आहे. छत्रसालला खरंच बाजीरावाशी सोयरिक करायची असती तर हा समारंभ मोठ्या थाटामाटाने पार पडला असता व त्याविषयी पत्रव्यवहार वा नोंदीही उपलब्ध झाल्या असत्या. परंतु, या संदर्भात अजून एका अक्षराचाही पुरावा माझ्या अवलोकनात आलेला नाही.

    बुंदेलखंडची स्वारी आटोपल्यावर बाजीराव पुण्यास परतला. त्यावेळी मस्तानीही त्याच्यासोबत आली कि मागाहून, याची स्पष्टता होत नाही. तसेच या काळात पेशव्याचे निवासस्थान त्यावेळी पुण्यातील शनिवारवाडा नसून, तो धडफळ्यांच्या वाड्यात राहायला होता. शनिवारवाड्याच्या बांधकामास स. १७३० मध्ये आरंभ होऊन स. १७३१ मध्ये तो पूर्ण झाला. तेव्हा शनिवारवाडा बांधून होईतो मस्तानीच्या राहण्याची सोय कुठे करण्यात आली होती, हे कळायला मार्ग नाही.

    बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाच्या लग्नसमारंभात ' मस्तान कलावंत ' हिला व तिच्या साजिंद्यांना पोषाख दिल्याचा खर्च दाखल असल्याचे सरदेसाई सांगतात. परंतु, गोदासेंनी आपल्या पुस्तकांत ती समग्र नोंद दिली असून त्यानुसार मस्तान म्हणजे मस्तानी हा गैरसमज असल्याचे जे मत मांडलं आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. कारण, मूळ नोंदीत ' मिस्कीण मस्तान कलावंत यास ' असा उल्लेख तर आहेच पण नुसते मस्तान म्हणून उल्लेख न करता ' मिस्कीन मस्तान, मिस्कीण मस्तान, मिस्की मस्तान ' असे तीन वेगवेगळे उल्लेख दिले आहेत. जरी हे उल्लेख एकाच व्यक्तीचे असले तरी ' कलावंत ' हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. जर ' मस्तान ' स्त्री असेल तर ' कलावंतीण ' हाच शब्दप्रयोग करण्यात आला असता, या गोडसेंच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तात्पर्य, पेशवे दप्तर भाग - ३ मधील नानासाहेबाच्या लग्नखर्चातील नोंदीनुसार मस्तानी नाचल्याचे निर्विवाद सिद्ध होत नाही.

    मस्तानी संदर्भातील दोन महत्त्वाचे उल्लेख म्हणजे स. १७३३ / ३४ मध्ये बाजीरावापासून तिला पुत्रप्राप्ती होऊन त्याचे नाव कृष्णसिंग उर्फ समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले तर मस्तानीच्या निवासाकरता शनिवारवाड्यालगत स्वतंत्र महाल बांधण्यात आला. ( स. १७३४ )

    खेरीज मस्तानीला पाबळ, लोणी, केंदूर हि तीन गावं इनाम म्हणून देण्यात तर आलीच पण शिवाय पाबळ येथे गढीवजा आठबुरुजी वाडाही बांधून देण्यात आला. मात्र, यांचे कालनिर्देश गोडसे वा सरदेसाई किंवा इतर उपलब्ध साधनांत मिळत नाहीत.

    या स्थळी आपण बाजीरावाच्या मस्तनीपूर्व व नंतरच्या वैवाहिक जीवनाची थोडक्यात माहिती घेऊ. बाजीरावाचा विवाह महादजी कृष्ण जोशीची मलगी काशीबाई, हिच्यासोबत झाला. विवाहाच्या काळाची नोंद मिळत नाही परंतु काशीबाईपासून बाजीरावास बाळाजी, रामचंद्र, रघुनाथ, जनार्दन अशा चार पुत्रांची प्राप्ती झाली. पैकी बाळाजी उर्फ नानासाहेबाचा जन्म दि. ६ डिसेंबर १७२१ चा तर रामचंद्रचा स. १७२३ ( मृत्यू स. १७३३ ) स. १७३३ मध्ये आणखी एक मुलगा झाल्याचे सरदेसाई सांगतात पण त्यासोबत तो फार काळ जगला नसल्याचेही नमूद करतात. ता. १ ऑगस्ट १७३४ रोजी रघुनाथाचा तर दि. १० जुलै १७३५ रोजी जनार्दनाचा जन्म झाला.

    काशीबाईला बाजीरावापासून झालेल्या मुलांचा उल्लेख व जन्मतारखांच्या नोंदी पाहता, मस्तानी बाजीरावास प्राप्त झाल्यानंतरही स. १७२९ - २५ दरम्यान काशीबाईला ३ मुलं झाल्याचा उल्लेख मिळतो. यावरून मस्तानीच्या नादाने वा पायाच्या दुखण्याने बाजीरावाचे काशीबाईकडे अगदीच दुर्लक्ष झाले असं म्हणता येत नाही.                     
                                      ( क्रमशः )

संदर्भ ग्रंथ :-
(१) मराठी रियासत खंड - ३ :- गो. स. सरदेसाई
(२) मस्तानी :- द. ग. गोडसे
(३) राजसत्तेच्या फटींमधून पेशवेकालीन स्त्रिया :- नीलिमा भावे
(४) पेशव्यांचे विलासी जीवन :- डॉ. वर्षा शिरगांवकर
(५) काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
(६) उत्तरकालीन मुघल ( खंड २ ) ( वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित Later Mughals च्या दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद ) :- अनुवादक - प्र. गो. ठोंबरे 
(७) श्रीमनुस्मृती ( संपूर्ण मराठी भाषांतर ) :- वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री बापट    

२ टिप्पण्या:

miit म्हणाले...

खूप छान माहितीपूर्ण लेख लिहिलाय सर

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद, miit !