गोडसेंनी आपल्या पुस्तकात पुरंदरे रोजनिशीतला एक
उल्लेख दिला आहे. त्यात " राजश्री रायांची कलावंतीण, आपले हवेलीतून निघून
पाटसास रायाकडे गेली. तिच्या व रायाचा अतिसहवास जाला .... " असा
मस्तानीला उद्देशून उल्लेख आहे. नोंदीचा कालनिर्देश अर्थातच नाही, पण स. १७३९ च्या
अखेरीस बाजीराव पाटसला होता व कलावंतीण पाटसला निघून गेल्याचे पुरंदरे रोजनिशीत
दिलं आहे. त्यावरून तर्काने नोंदीच्या काळाची निश्चिती करता येते. परंतु, या
ठिकाणी काही शंकाही उद्भवतात.
बाजीरावास मस्तानी खेरीज आणखी एखादी उपस्त्री
होती का ? दुसरे असे कि, पेशवे कुटुंबीय मस्तानीचा कधी स्पष्ट नामोल्लेख करत तर
कधी ' पीडा ' म्हणत. परंतु त्यांनी तिला ' कलावंतीण ' कधी म्हटलेलं नाही. पुरंदरे
रोजनिशी जर कलावंतीण म्हणत आहे तर मग ब्रिग्जने बनवलेल्या वंशवर्णन पत्रिकेतला
मस्तानीच्या वंशजांचा मजकूर सत्याच्या जवळपास जाणारा दिसतो. कारण, तत्कालीन
प्रचलित अर्थानुसार कलावंतीण म्हणजे नाटकशाळा. अर्थात रक्षा वा उपस्त्री ! यांचा
दर्जा पत्नीपेक्षा दुय्यम असला तरी यांची गणना कुणबिनी किंवा दासी वर्गात होत नसे.
* या स्थळी आधीच्या भागातील चुकीची दुरुस्ती
नोंदवत आहे. नानासाहेबाच्या लग्नप्रसंगी मस्तान कलावंत विषयीचा मजकूर मागील भागात
लिहिला होता. तेव्हा कलावंताचे स्त्रीलिंगी रूप कलावंतीण वापरायला पाहिजे असे मत
मांडले होते. परंतु कलावंतीण शब्दाचा अर्थच मुळी निराळा असल्याने तसा तो शब्द
वापरला गेला नाही. अर्थात, समजून घेण्यामध्ये माझी चूक झाल्याचे मी येथे कबूल
करतो. परंतु त्यामुळे मूळ सिद्धांतास बाधा येत नाही, हे देखील नमूद करतो. कारण '
मिस्कीण मस्तान कलावंत यास ' असे जे वाक्य नोंदीत आहे त्यामध्ये जर मस्तान हि
स्त्री असेल ' मस्तान कलावंत इजला / हिला ' अशा शब्द प्रयोग केला असता. संदिग्ध
नोंदी कारणाशिवाय केल्या जात नसत. *
पेशवे कुटुंबीय मस्तानीला रक्षा वा नाटकशाळा मानत
होते / नव्हते समजायला मार्ग नाही. परंतु,, गोडसेंनी आपल्या पुस्तकांत जे उतारे
दिले आहेत त्यानुसार तिचा उल्लेख पीडा, मस्तानी, मकारीविसी, डावे बाजूचे लोक
असाच होताना दिसतो. यावरून इतकेच म्हणता येईल कि, बाजीरावाने मुस्लीम स्त्री
ठेवल्याचा त्यांना राग होता व त्याहून अधिक म्हणजे बाजीरावाचे मद्यमांस सेवन !
मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यात येईपर्यंत तो
मद्यमांस सेवन करत होता, नव्हता याची स्पष्टता करणारे कागदपत्र उपलब्ध नसल्याने याबाबतीत
मस्तानीला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही.
आता याहून अधिक महत्त्वाच्या मुद्द्याची आपण
चर्चा करू व तो म्हणजे बाजीरावाच्या आधी भट कुटुंबात, मुख्य प्रधानपद
मिळाल्यापासून उपस्त्री कोणी ठेवली होती वा नव्हती.
उपलब्ध माहितीनुसार बाजीरावाच्या बापाला ---
बाळाजी विश्वनाथास एक उपस्त्री असून तिच्यापासून बाळाजीस एक मुलगाही झाला होता.
त्याचे नाव भिकाजी शिंदे असून, बाळाजीने एक गाव त्याच्या पागेकरता सरंजामादाखल
लावून दिले होते. पुढील काळात हा भिकाजी बाजीरावाच्याच सैन्यात पागेदार म्हणून काम
करत होता. याचा अर्थ असा कि, उपस्त्री बाळगणारा बाजीराव हा काही पहिलाच पेशवा
नव्हता. ( हे विधान, भट कुटुंबियांस उद्देशून असल्याची नोंद घ्यावी. )
नाटकशाळांना शक्यतो दरमहा वेतन दिलं जात असे.
परंतु, नाटकशाळेकरता दोन दोन ठिकाणी वाडे - महाल बांधले जात होते का ?
बाजीरावाच्या कुटुंबापुरता विचार केला तर त्याचं हे वागणं त्याच्या घरच्यांच्या
पचनी पडण्यासारखं नव्हतं. परंतु, त्यासोबत हे देखील पाहिलं पाहिजे कि, बाजीराव
मस्तानीला निव्वळ कलावंतीण समजत होता कि पत्नी !
मस्तानीपासून
झालेल्या कृष्णसिंग उर्फ समशेरबहाद्दरची मुंज व्हावी, अशी बाजीरावाची इच्छा असल्याचे
बोलले जाते. सरदेसाई यांस आख्यायिका म्हणतात. कदाचित असू शकेल. कारण, बाजीराव ज्या
वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करत होता, त्या वैदिक धर्मानुसार अशा कृत्यास परवानगी
मिळणं अजिबात शक्य नव्हतं. या संदर्भातील मनुस्मृती अध्याय - १० मधील श्लोक पुरेसे
बोलके आहेत. वानगीदाखल इथे अध्याय १० मधील क्र. ६ श्लोकाचे विष्णुशास्त्री
बापटांनी केलेलं मराठी भाषांतर देतो.
" आपल्या
जातीच्या अगदी जवळच्या दुसऱ्या जातीच्या स्त्रियांचे ठायी द्विजातींकडून ( म्हणजे
ब्राम्हणाकडून क्षत्रियस्त्रीच्या ठायी, क्षत्रियाकडून वैश्यस्त्रीच्या ठायी
इत्यादी प्रकारे, ) जे पुत्र उत्पन्न केले जातात त्यांस मन्वादिक मातेची जाती
प्राप्त होत नसल्यामुळे निंद्य व पितृसदृश्य मानतात ( पण ते पित्याच्या समान
जातीचे आहेत असे समजत नाहीत तर मातेच्या जातीहून उत्कृष्ट व पित्याच्या जातीहून
निकृष्ट आहेत असे समजतात. ) "
यावरून कृष्णसिंगास ब्राम्हण
वर्ण प्राप्त होणे शक्य नव्हते. कारण मुंज म्हणजे अधिकृतरीत्या वैदिक धर्मात
प्रवेश होता. बाजीरावास याची कल्पना नसेल असं म्हणवत नाही. परंतु, बापाच्या मनाला
कदाचित भोळी आशा वाटून त्याने प्रयत्न केला असावा जो अख्यायिकांच्या रूपाने स्मरणात
राहिला आहे.
या आख्यायिकेच्या
अनुषंगाने आणखी एका मुद्द्याची चर्चा येथे करणे अप्रयोजक ठरणार नाही. समशेरचे
समवयस्क असलेल्या रघुनाथ - जनार्दनची मुंज स. १७४० च्या फेब्रु - मार्चमध्ये
करण्यात आली. या दोन्ही मुलांच्या मुंजीच्या वेळी बाजीराव पुण्यास हजर नसून
नासिरजंगावरील मोहिमेत गुंतला होता. तत्पूर्वी तो पुण्यात असूनही मुंजीचा
कार्यक्रम करण्यात आला नाही. यामागे मुहूर्तांची अनुपलब्धता मानावी कि समशेरच्या
मुंजीची आख्यायिका ?
मस्तानी
बाजीरावासोबत स. १७२९ पासून होती. परंतु तिच्या विरोधातला पेशवे कुटुंबियांचा
संताप, द्वेष हा स. १७३८ - ३९ च्या व नंतरच्या पत्रांत अधिक दिसून येतो. हे लक्षात
घेता, समशेरच्या मुंजीची आख्यायिका, हि आख्यायिका नसून त्यात थोडेबहुत तथ्य
असल्याचे लक्षात येते. बाजीराव पुण्यात हजर असताना त्याच्या मुलांची मुंज न होता,
गैरहजेरीत होणे याचा दुसरा अर्थ काही निघतच नाही. यावरून असे म्हणता येते कि,
बाजीरावाच्या लेखी मस्तानी हि नाटकशाळा नसून त्याची द्वितीय पत्नीच होती. तिच्याशी
विधीपूर्वक विवाह करणे त्यांस शक्य होते, नव्हते हा मुद्दा बाजूला ठेवू. परंतु
नाटकशाळेला अथवा उपस्त्रीला विवाहित स्त्रीचा दर्जा मिळणे, त्याकाळात शक्य होते का
? याचा आपण विचार करू.
बाजीरावाचा धनी ---
सातारकर शाहू छत्रपती ज्यावेळी मोगलांच्या नजरकैदेत होता, त्यावेळी औरंगजेब
बादशाहने पुढाकार घेऊन त्याचं लग्न रुस्तमराव जाधवाच्या मुलीसोबत --- अंबिकाबाई
--- लावून दिलं. या अंबिकाबाईची एक दासी होती. विरुबाई नावाची. तिच्यावर शाहूची
मर्जी बसली. पुढे काही काळाने अंबिकाबाई वारली पण विरुबाई शाहूजवळच राहिली.
इतिहासकारांच्या मते तिचं महत्त्व पुढे इतके वाढले कि, शाहुच्या विवाहित राण्याही
तिला थोडंफार वचकून राहत. खेरीज, पेशव्यासह सर्व प्रधान - सरदार शाहूची मर्जी
संपादण्यासाठी विरुबाई मार्फत वशिला लावत. विरुबाई हि शाहूची विवाहित स्त्री
नव्हती. रूढार्थाने तशी नाटकशाळाच . परंतु शाहुच्या लेखी ती नाटकशाळेहून अधिक
असल्याने तिचा दर्जा, मान विवाहित स्त्री पेक्षा कमी राखला जात नसे. शाहूचे प्रधान
विरुबाईला पत्र लिहित त्यावेळी मायन्यात ' सौभाग्यादि संपन्न वज्रचुडेमंडीत '
हे विशेशानाधी जोडून मग ' मातुश्री विरुबाई ' असा उल्लेख करीत. बरे,
छत्रपतींचे चाकरच असा व्यवहार कारत असे नसून शाहूचा प्रतिस्पर्धी कोल्हापूरचा
संभाजी देखील विरुबाईस ' सौभाग्यवती विरुबाई वोहिनी ' असे पत्रांतून
संबोधताना दिसतो. शाहूला विरुबाईपासून राजसबाई नावाची एक मुलगी झाली. ती प्रचलित
मान्यतेनुसार अनौरस आली तरी औरस संततीप्रमाणेच हिच्या संबधी रीतीरिवाज पाळले जात
असल्याचे इतिहासकार नमूद करतात.
जर खुद्द छत्रपतीच
आपल्या मर्जीतल्या स्त्रीला विवाहित स्त्रीचा दर्जा देऊन तिच्या संततीलाही औरस
वंशजाचा दर्जा देतो तर मग त्याच्या पेशव्यानेही तोच कित्त गिरवण्याचा प्रयत्न केला
असता, त्यांस विरोध का व्हावा ?
मस्तानीच्या आहारी
गेलेला बाजीराव कदाचित समशेरला आपल्या गादीचा वारस नियुक्त करेल अशी पेशवे
कुटुंबियांना भीती असावी, असाही एक बिनबुडाचा तर्क केला जातो. परंतु हे लक्षात
घेतले जात नाही कि, पेशव्याच्या मनात काहीही असलं तरी त्याला छत्रपतीची संमती हवी
ना ? शिवाय पेशवा किंवा छ्त्रपती लवकरचं मरतील असेही त्यावेळी काही कारण घडलं
नव्हतं वा शंकाही कोणाच्या मनी उद्भवली नव्हती. मग असे असूनही भट कुटुंबीय
मस्तानीचा एवढा राग राग कशाकरता करत होते ?
स. १७२८ - २९ पासून
स. १७४० पर्यंत एक जंजिरा स्वारीचा अपवाद वगळल्यास राज्यकारभार, लष्करी मोहिमांत
बाजीरावाने काही ढिलाई वा हेळसांड केल्याचे उदाहरण नाही. जंजिरा मोहिमेत जवळपास
सातार दरबारातील सर्व प्रधान हजर असल्याने प्रत्येकजण सेनापती बनून ती मोहीम
पूर्णतः फसली. पण त्याचा दोष शाहुकडे जातो. पेशव्याकडे नाही. तेव्हा मस्तानीच्या
नादात पेशव्याने राज्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येत नाही. मस्तानी खेरीज
त्याचं आपल्या पहिल्या पत्नीवर, मुलांवर तसेच इतर कुटुंबियांवरही पूर्ववत प्रेम
होतं. अगदी चिमाजीने आपली पायरी सोडून बाजीरावाच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करूनही
तो चिमाजीच्या प्रकृतीची काळजी घेताना दिसतो. हे सर्व लक्षात घेता, भट
कुटुंबियांचा आक्रस्ताळेपणाच अधिकाधिक निदर्शनास येतो. त्यांनी थोडं समजुतीनं
घेतलं असतं तर ... !
मस्तानीच्या
द्वेषापायी चिमाजीने एक विलक्षण कारस्थान रचलं. ज्यात लक्ष्य मस्तानी तर मोहरा
नानासाहेब ! बाजीरावाच्या गैरहजेरीत नानाने मस्तानीला भेटायचं. जेणेकरून मस्तानी
बाजीरावाच्या मनातून उतरेल ! चिमाजीच्या या कारस्थानाला राधाबाईची संमती होती वा
नव्हती, कळायला मार्ग नाही.
नानाचे मस्तानीकडे
येणे - जाणे वाढल्याने लोकांत चर्चा होणे स्वाभाविक होते व अशी चर्चा व्हावी हि
कारस्थानी इसमांचीच इच्छा होती. तेव्हा हे लोकवर्तमान तसेच मस्तानीशी असलेल्या
मित्रत्वाचे वर्तमान काशीबाईने बाजीरावास कळवावे असे, नानासाहेब एका पत्रात आपल्या
आईलाच सुचवतो. अर्थात, काशीबाईला या कटाची आधीच माहिती होती, नव्हती याची स्पष्टता
होत नाही परंतु, तिने यानुसार बाजीरावास पत्र पाठवल्याचे उल्लेख मिळत नसल्याचे
गोडसेंनी नमूद केलेलं आहे.
विशेष म्हणजे स.
१७३९ मधील एक नोंद महत्त्वाची आहे. या काळात काशीबाई बरीच आजारी होती. तसेच
सरदेसाई व गोडसेंनी दिलेल्या काही पत्रांनुसार बाजीरावास ' भ्रम '
झाल्याचेही उल्लेख मिळतात.
गोडसेंनी स. १७२८
मधील साताऱ्याच्या प्रसंगाचे एक पत्र दिले आहे. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे :- "
.. राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांच्या चित्तास क्षोभ करू नये. यैसा
प्रसंग येथील द्रिस्टीस पडिला तो लिहिला असे. " पत्राची तारीख नाही, पण
पत्र पेशव्याच्या सातार दरबारातील मुतालिकाने चिमाजीस लिहिले आहे.
मराठी रियासत खंड -
३ मध्ये, पृष्ठ क्र. ५९३ वर नानासाहेबाने महादोबा पुरंदरेला लिहिलेल्या पत्रांतील
काही ओळी दिल्या आहेत. त्यातील मजकूर असा, " तीर्थरूप राऊ उद्यां अगर
परवां येतील. त्यांस आतां कांही बरें वाटते, परंतु भ्रम गेला नाही. "
प्रस्तुत पत्राची तारीख सरदेसाईंनी दिलेली नाही.
यानंतर चिमाजीने
नानासाहेबास लिहिलेलं एक पत्र सरदेसाई - गोडसे दोघांनीही दिलेलं आहे. त्यातील
मजकूर पुढीलप्रमाणे :- " वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा
पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्याचे
प्रयोजन आहे. घेऊन येणे. काय बोलतो हा अर्थ चित्तात नाही. हे विचार मस्तानीजवळून
निर्माण झाले असेत. ती पीडा जाईल तेव्हा पुण्यच प्राप्त होईल. न होई ऐसे दिसत
नाही. यांच्या लष्कराभोवते राऊत चौकीस ठेवणे कार्याचे नाही. लटका लौकिक होईल.
"
पत्राची तारीख ६ - १
- १७४० असली तरी संशयास्पद असल्याचा उलेख पत्राच्या संपादकांनी केला आहे. ( पेशेवे
दप्तर, खंड ९, पत्र क्र. ३० )
नानासाहेब,
चिमाजीच्या पत्रांच्या जरी तारखा नसल्या तरी प्रसंगी बाजीरावास ' भ्रम ' होत
असल्याचे स्पष्ट होते. शिवाय स. १७२८ चे सातारचे पत्रही हेच सांगते. स. १७२८ मध्ये
मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यातच काय स्वप्नांतही नसल्याने या भ्रमाचा भोपळा कोणाच्या
माथी फोडायचा ?
बाजीरावाचा स्वभाव
मनमोकळा असला तरी उद्दाम व फटकळही होता. प्रसंगी सरदार / शिलेदारांनाही तो '
शिपाईगिरी कशास करता ? रांडा जाले असते तर कामास येते ' असे लिहिण्यास मागे -
पुढे पाहत नसे. असं बाजीराव हळव्या मनाचा असेल का ? मनुष्य स्वभाव पाहता निश्चित
काही सांगणे शक्य नसले तरी मनाविरुद्ध गोष्ट घडल्यास चिडचिड होऊन मनस्तापाने
भ्रमाचा प्रकार घडत असल्यास, त्यात अशक्यही काही नाही. हाच प्रकार पुढे थो.
माधवरावाच्याही काळात दिसतो. तत्पूर्वी नानासाहेब पेशव्याच्या अखेरच्या काळातील
वर्तनाच्या नोंदीही अशाच स्वरूपाच्या आहेत.
स. १७३८ - ३९ नंतर
कुटुंबातील मस्तानी द्वेषामुळे बाजीराव व्यथित झाला होता. स. १७३९ च्या
उत्तरार्धात तो पुणे सोडून पाटसला राहिला. इकडे बाजीरावाचे पाऊल पुण्यातून बाहेर
पडताच चिमाजीने राहत्या घरी मस्तानीला नजरकैदेत टाकले. तेथून ती निसटून दि. २४
नोव्हेंबर रोजी बाजीरावाकडे गेली. पाठोपाठ पुरंदरे वगैरे मंडळींनी बाजीरावाकडे
जाऊन मध्यस्थी केली. दरम्यान नासिरजंगाचे प्रकरण उद्भवल्याने बाजीरावाने मस्तानीला
पुण्यास पाठवले व तो मोहिमेवर गेला. चिमाजीही नेहमीप्रमाणे पाठपुराव्याकरता बाहेर
पडला. परंतु, तत्पूर्वी त्याने आणखी एक बेत आखला होता.
मस्तानीला
बाजीरावापासून अलग करणे शक्य नाही, हे त्याच्या लक्षात एव्हाना आले होते. तेव्हा
मस्तानीला बाजीरावाच्या गैरहजेरीत ठार करणे वा दूर कैदेत ठेवणे हे दोनच पर्याय
त्याच्या हाताशी होते. परंतु याकरता छत्रपतीची परवानगी आवश्यक होती. कारण चिमाजीने
स्वबळावर असे कृत्य केल्यास बाजीराव काय करेल वा काय करून बेल याचा नेम नव्हता. त्यानुसार
छत्रपतींच्या चिटणीसाकडे पत्र पाठवण्यात येऊन यासंबंधी छत्रपतींची मर्जी पाहून
आज्ञा मिळवण्याचा प्रयत्न झाला.
इकडे बाजीराव
नासिरजंगला कोंडीत पकडण्याकरता आपल्या अकलेची सार्थ करीत होता. उभयतांच्या चकमकी
होऊन अखेर दि. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरने हंड्या व खरगोण हे दोन परगणे
बाजीरावास देऊन परस्परांच्या मुलखांत स्वाऱ्या न करण्याच्या बोलीवर तह केला. तह
होताच पेशव्याने ३ मार्च रोजी पिंपळगाव जवळ वरखेडे येथे नासिरची भेट घेतली व नंतर
तो नर्मदेकडे फिरला. तहातील प्रदेश लागलीच ताब्यात घेण्याचा त्याचा विचार होता.
प्रवासात काही काळ चिमाजी त्याच्यासोबत होता. नंतर तो पुण्यास परतला. दरम्यान पुणे
- साताऱ्यात वेगळेच नाटक रंगले होते.
चिमाजीच्या
सांगण्यावरून नानासाहेबाने चिटणीसामार्फत मस्तानीला कैद वा ठार करण्याचा हुकुम
छत्रपतीकडून मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात साताऱ्याहून छत्रपतीच्या
चिटणीसाचे पत्र पुण्यास आले, ते खालीलप्रमाणे :-
" श्रीमंत
राजश्री नानास्वामींचे सेवेशी
गोविंद खंडेराव
कृतानेक साष्टांग दंडवत, प्रणम्य विनंती उपरि. येथील कुशल छ २ जिल्काद जाणोन
स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. यानंतर स्वामीनी राजश्री दादा यांस लिहिले कि
मकारीविसी राजश्री स्वामीची मर्जी कैसी काय आहे ते राजश्री यशवंतराव यांस व आम्हास
पुसोन पुरता शोध करऊन लेहून पाठवणे, त्याजवरून हे वर्तमान मानिलेनी आम्हास
सांगितले ऐशियास राजश्री स्वामीची मरजी पाहता ते वस्तू त्याजबराबर न द्यावी, ठेवून
घ्यावी, चौकी बसवावी, त्यामुळे राजश्री राऊ खटे जाले तऱ्ही करावे ऐसी नाही.
त्यांची वस्तू त्यांस द्यावी. त्यांचे समाधान करावे. दुर्वेसनाचा मजकूर त्या
वस्तूवर नाही. त्यांच्या चित्तास पश्चाताप होऊन टाकतील तेव्हाच जाईल. ऐसे असता या
वस्तूस अटकाव करून सला तोडू नये ऐसी मर्जी आहे. येथील अर्थांतर विदित व्हावे
याजकरिता लिहिले असे. बहुत काय लिहीने. कृपा असो दिल्ही पाहिजे, हे विनंती. "
उपरोक्त पत्राची
तारीख २१ - १ - १७४० अशी दिलेली आहे. हि तारीख पत्र लिहिल्या दिवसाची आहे कि
पोचल्याची त्याचा खुलासा होत नाही. मात्र छत्रपती आपणांस अनुकूल अशीच आज्ञा देतील
असा बहुधा चिमाजी - नानासाहेबास विश्वास होता. त्यामुळेच नासिरजांगावरच्या स्वारीत
बाजीरावाच्या मदतीस गेलेल्या चिमाजीचे पत्र येताच नानासाहेबाने दि. २६ जानेवारी
१७४० रोजी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. यासंदर्भात त्याने चिमाजीला
लिहिलेल्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे :- " .. स्वामींची आज्ञा व आमचा
तवकल ( धाडस ) करून येणेप्रमाणे आज संध्याकाळी जाहले. .. .. स्वामींचे
लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून, दहा माणसे बरोबर देऊन कोथळा, धनगड
येथे, भलते जागा पाठवू. मारीत नाही घरी ठेवू अथवा गडावर पाठवू. "
या मजकुरावरून
मस्तानीच्या नैसर्गिक नव्हे तर अनैसर्गिक मृत्यूची चिमाजीने व्यवस्थित आखणी
केल्याचे दिसून येते. परंतु छत्रपतींची आज्ञा विपरीत पडल्याने डाव सिद्धीस गेला
नाही. तरीही मस्तानीची ताबडतोब सुटका होऊन तिची रवानगी बाजीरावाकडे झाल्याचे दिसत
नाही.
दि. १९ मार्च १७४०
रोजी चिमाजीने नानासाहेबास लिहिलेल्या पत्रांत पुढील मजकूर आहे, " दोहो
तिही दिवसा पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्याजकडे करावी. आपले निमित्त वारावे.
त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे. "
चिमाजीचे आणखी एक
पत्र दि. २९ मार्च स. १७४० चे मराठी रियासतीत दिले आहे. त्यातील मजकूर
पुढीलप्रमाणे :- " चाले तो यत्न केला, परंतु ईश्वराचे चित्तास नये त्यास
आमचा उपाय काय ! त्यांचे प्राक्तनी असेल ते सुखरूप होऊ ; आपण निमित्त घ्यावे ऐसे
नाही. आम्ही पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्त वारावे,
त्यांचे प्राक्तन व ते ऐसा विचार केला आहे. त्यांचे शरीरी समाधान नाही, यास्तव
स्वारीस न जातां घरास यावयाचा विचार करावा म्हणोन त्यांस लिहोन पाठविले आहे.
त्यांचे विचारास येईल तसेंच करतील, त्यांस आमचे लिहिण्याचे पथ्य आहे असे नाही.
"
विशेष म्हणजे
बाजीराव आजारी आहे. त्याचा बराचसा आजार मानसिक त्रास आहे, हे चिमाजीला चांगलंच
माहित्येय व उपायही तो जाणतो. परंतु, पुण्यास गेल्यावर मस्तानीला बाजीरावाकडे
पाठवतो म्हणणारा चिमाजी, प्रत्यक्ष पुण्यास गेल्यावर मस्तानीची रवानगी करतो का ?
शिवाय, मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे नानासाहेब छत्रपतीपेक्षा चिमाजीच्या
आज्ञेत अधिक होता. अन्यथा छत्रपतींची आज्ञा येताच त्याने मस्तानीला कैदमुक्त केले
असते. तसेच, मस्तानीला बाजीरावाकडे पाठवण्यासाठी चिमाजी स्वारीतून पुण्यास
जाईपर्यंत का थांबावे ? चिमाजीची खरोखरच मस्तानीला बाजीरावाकडे पाठवण्याची इच्छा
असती तर त्याच्या एका पत्रावरून नानाने मस्तानीला बाजीरावाकडे रवाना केलं असतं.
परंतु, तसं केलं नाही. असो.
इकडे पुण्यात दि. २६
मार्च१७४० रोजी जनार्दनाची मुंज झाली. त्यानंतर जनार्दन व काशीबाईची बाजीरावाकडे
रवानगी करण्यात आली. काशीबाई बाजीरावाकडे गळ्यावर दि. २८ एप्रिल १७४० रोजी
बाजीरावाचा रावेरखेडीस मृत्यू झाला.
आजारपणाचे तपशील,
उपचार व मृत्यूची नोंद याबाबतीत बाजीराव सुदैवी. परंतु मस्तानीला तेही भाग्य लाभले
नाही. तिच्या मृत्यूचा दिनांक उपलब्ध नाही. शिवाय तिला मरण कसे आले याचीही माहिती
मिळत नाही. तिच्या मृत्यूविषयी दोन उल्लेख आढळतात ते पुढीलप्रमाणे :- (१)
काहींच्या मते ती पुण्याहून निघून बाजीरावकडे जात असताना पाबळ येथे तिला त्याच्या
मृत्यूची बातमी कळली व त्या धक्क्याने ती मेली. (२) तर पुणे गॅझेटीअरनुसार तिचा
मृत्यू शनिवारवाड्यात झाला व तिचे दफन पाबळ येथे करण्यात आले.
या दोन्ही नोंदी तशा
संशयास्पदच आहेत. पहिलीत शक्यता आहे तर दुसरी नोंद खूप उशिरा करण्यात आल्याने
माहितीच्या विश्वसनीयतेवर साहजिकच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
उपलब्ध नोंदी,
संदर्भ साधने व घटनाक्रम पाहता मस्तानीच्या मृत्यू बाजीरावाच्या निधन वार्तेच्या
धक्क्याने, अत्मघाताने किंवा खुनाने झालेला असण्याची शक्यता संभवते. या तिन्ही
शक्यतांपैकी कोणती खरी व कोणत्या खोट्या याचा निर्णय पुराव्यांखेरीज होऊ शकत नाही,
हे देखील मी इथे नमूद करू इच्छितो.
बाजीराव - मस्तानी
प्रकरणी भट कुटुंबियांनी जो नाहक आक्रस्ताळेपणा व असमजूतदारपणा दाखवला त्यामुळे
बाजीराव - मस्तानीचा मृत्यू ओढवला असं मत प्रदर्शित करणे योग्य होणार नाही. परंतु
जी गोष्ट कानाडोळा करून दुर्लक्षित करता येत होती, तिला भलतेच महत्त्व देऊन
त्यांनी प्रकरण विनाकारण चीडीस पेटवले. समशेरला आसपुत्राचा दर्जा देण्याची
बाजीरावाची इच्छा पुढे नानासाहेबाला पूर्ण करावी लागली. त्याने समशेरला सरदारकी
दिली. पेशवे घराण्यात कोणत्याही नाटकशाळेच्या पुत्राला हा बहुमान मिळाला नाही.
शिवाय स. १७८० नंतर स. माधवरावाच्या काळात नान फडणीसने बुंदेलखंडातील जहागिरीवर
समशेरच्या मुलाची --- अलीबहाद्दरची नियुक्ती केली. या दोन गोष्टींवरून हेच
निदर्शनास येते कि, बाजीरावाच्या लेखी मस्तानीचा जो दर्जा होता, तो त्याचे
कुटुंबीय वगळता सर्वांना मान्य होता. किंबहुना हाती सत्ता असलेल्या व्यक्ती रूढी,
परंपरा, धर्माज्ञांनाही अपवाद ठरवतात, याचंच हे एक प्रतीक आहे.
याबाबतीत पेशवे घराण्यातील
उदाहरणे काही कमी नाहीत. सदाशिवराव पानपती मेलाच नाही या समजुतीवर व तो कधीतरी परत
येईल या आशेवर पार्वतीबाई सदैव सौभाग्यचिन्हं बाळगून राहिली. नारायणरावाच्या खुनानंतर
गंगाबाईचे जे पुरंदरी डोहाळ जेवण झाले ते पार्वतीबाईनेच घडवून आणले होते.
नारायणाच्या खुनानंतर गंगाबाईचे वपन झाले नाही. मृत्यूपर्यंत ती सकेशाच होती. या
ज्या काही प्रमुख, ठळक नोंदी खुद्द पेशवे घराण्यातील आहेत, त्या लक्षात घेता
नियमालाही अपवाद करण्याची धमक पेशव्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मग हाच अपवाद,
हि सवलत बाजीरावास का नाकारण्यात आली ?
माझ्या मते, या
ठिकाणी बाजीरावाचा स्वभाव त्याच्या आड आला. स्वतःच्या मनाविरुद्ध झालेलं खपत नाही.
भावाचंही मन मोडायचं नाही. मस्तानीलाही सोडायचं नाही. अशा स्थितीत कोणत्या शहाण्या
माणसाची मानसिक स्थिती बिघडणार नाही ? बाजीराव - मस्तानी प्रकरणातील राधाबाईचा
प्रत्यक्ष सहभाग, भूमिका समजायला मार्ग नाही. परंतु चिमाजीने नानासाहेबास हाताशी धरून
मस्तानीला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला, त्याची तिला कल्पना नसेल असं म्हणवत
नाही.
चिमाजीला आपल्या मर्यादा
बिलकुलही ओळखता आल्या नाहीत. मोठ्या भावाच्या खासगी आयुष्यात नको इतकी ढवळाढवळ
करूनही, बाजीरावाने त्यांस क्षमाच केली, यावरून चिमाजीचे कनिष्ठत्वच अधिक प्रकर्षानं
उठून दिसतं.
या संपूर्ण प्रकरणात
काशीबाई असून नसल्यात जमा दिसते. मस्तानी विषयी कुटुंबातील कलह मर्यादित होता
तेव्हा बाजीरावाने दोन्ही बायकांकडे लक्ष दिले. परंतु, मस्तानीच्या कैदेकरता,
नाशाकरता प्रयत्न चालवण्यात आले तेव्हा बाजीराव दोघींनाही सोडून निघून गेला.
एकप्रकारे त्याने हा आपल्या उभय पत्नींवर अन्यायच केला.
या स्थळी शाहू -
बाजीरावाची तुलना केली असता आपल्या स्त्रीचा मान राखण्याकरता शाहूने घेतलेली
दक्षता बाजीराव दाखवू शकला नाही, हा दोष निश्चित त्याच्या पदरी बांधता येतो. एक
बाजीराव खंबीर राहता तर चिमाजीही निमुटपणे गप्प बसला असता. परंतु स्वभाव विशेष
लक्षात घेता ' जर - तर ' ला अर्थ राहत नाही.
या सर्व प्रकरणांत
अन्याय झालाच तर तो फक्त मस्तानीवर झाला असे म्हणता येईल. बाजीरावाच्या मर्जीत ती
बसली. बाजीराव तिच्या व ती त्याच्या प्रेमात पडली. बाजीरावाने आपल्यापुरता तिला
विवाहित स्त्रीचा दर्जा दिला. पण इतरांकडून देण्यात त्यांस यश आले नाही. बाजीरावाच्या
अखेरीस तिला कैदही भोगावी लागली. तत्पूर्वी, नात्याने केवळ मुलगा लागतो अशा
नानासाहेबाची फाजील व सहेतुक लगटही तिला सहन करावी लागली. तिचा मृत्यूही संदिग्ध.
शिवाय मरणोत्तर ज्या अफवा, दंतकथा प्रचलित झाल्या त्या निराळ्याच !
बाजीरावासारखा रणशूर
जिच्या प्रेमात पडतो, ती सामान्य कशी असेल ? म्हणून मग तिच्या गौर वर्णाला इतकं
गौर करण्यात आलं कि, ' विडा खाल्ल्यानंतर पिंक गिळताना तिच्या कातडीच्या
गोरेपणामुळे तो गळ्यातून उतरताना दिसायचा. ' आता, विडा खाताना पिंक कोणी गिळत
नाही. मस्तानीच कशी गिळत होती देव जाणे. शिवाय, कोणत्या शहाण्यानं मस्तानीला समोर
बसवून तिला विडा खाताना पाहून हे वर्णन करून ठेवलंय काय माहिती ! आणि लोकंही अशा
वर्णनाला भुलून जातात. किती हि निर्बुद्धता !! तीच कथा मस्तानीच्या चित्रांची. पण
याबाबतीत गोडसेंनी बरेच लेखन केल्याने मी अधिक काही लिहित नाही. फक्त एवढंच नमूद
करू इच्छितो कि, मस्तानीचं विश्वसनीय असं कोणतंच चित्र उपलब्ध नाही !
मस्तानीच्या नृत्य -
गायनाविषयीही थोडी चर्चा आवश्यक आहे. पेशवे व इतर मराठी सरदारांच्या बायका
करमणुकीकरता काय करत होत्या, याचे तपशील उपलब्ध आहेत का ? सण, व्रत - वैकल्य,
पुराण श्रवण, ब्राह्मणभोजन, हळदी कुंकू समारंभ वर्षभर, दररोज चालणारे नसतात. त्यात
त्यांचे नवरे - मुलेही वर्षातून पाच - सात महिने बाहेर. अशा काळात मन रिझवण्याकरता
काही खेळ त्या खेळतच असतील ना ? किंवा त्याही सण - उत्सवानिमित्त गाणी म्हणणे
वगैरे प्रकार करत नव्हत्या का ?
मस्तानी मुळची बुंदेलखंडातली.
तिची आई छत्रसालची उपस्त्री. आता उपस्त्रीची मुलगी असली तरी तिला तिच्या आवडीनुसार
काहीतरी शिक्षण मिळालंच असेल. कदाचित तिला गाण्याची आवड असेल. अशा शक्यता नाकारता
येत नाहीत. मस्तानी ज्या घरात आली, ते घर दरबारी प्रतिष्ठेत पडून पुरत्या दोन
पिढ्याही उलटल्या नव्हत्या. त्यांच्याकरता हे प्रकार विलक्षण असू शकतात. परंतु
इतरांनी, विशेषतः इतिहासकारांनी या गोष्टीचा विशेष गवगवा करण्याचे कारण नाही. मोगल
बादशाह औरंगजेबाच्या लाडक्या बेगमचा --- उदेपुरीचा पूर्वेतिहास काय होता ? दाराच्या
जनानखान्यातील एक गुलाम स्त्री, दासी, नर्तकी असेच तिचे उल्लेख आढळतात. पण
औरंगजेबची पत्नी बनल्यावर ती गुलाम, नर्तकीच राहिली ?
मराठी बखरकार
मस्तानीबाबत काय लिहितात यांस महत्त्व नाही. कारण कितीही झाले तरी ते जाती -
धर्माच्या प्रभावापासून मुक्त नसल्याने यवनीच्या नादाने ब्राम्हण बिघडला हेच सूत्र
मनाशी जपणारे होते. बरं, एखाद्याच्या आवडी - निवडीवर त्याचे चारित्र्य / पेशा
ठरवायचा झाला तर मग पेशवेही कधी कधी नाच्या पोरांचे तमाशे बघत. त्यांना काय
म्हणायचे ?
तात्पर्य, तत्कालीन
स्त्रीजीवनाविषयी कसलीही माहिती नसताना, उगाचच एखाद्याच्या चारित्र्यावर चिखलफेक
करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असो.
एकूण पाहता, '
मस्तानी ' या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याइतपत संदर्भ साधने आजही उपलब्ध नाहीत.
जी काही तुटपुंजी सामग्री हाताशी लागली त्यावरून फारतर मस्तानी प्रकरणाची फक्त एक
बाजू --- ती देखील काही अंशी स्पष्ट होते. अजूनही उजेडात न आलेल्या, अंधारात
असलेल्या अनेक बाजू आहेत. जसे :- राधाबाईची या प्रकरणी नेमकी काय भूमिका होती ?
काशीबाईच्या पायाचं दुखणं म्हणजे नेमकं काय होतं ? चिमाजी आपल्या मोठ्या भावाच्या
खासगी जीवनात नको तितकं हस्तक्षेप का करतो ? हे सर्व प्रकार बाजीरावही कसा खपवून
घेतो ? मस्तानीला बदनाम करण्यासाठी प्रसंगी नानाचाही बळी देण्यास चिमाजी तयार का व्हावा
? मस्तानीचा मृत्यू, समशेरचा जन्म इ. च्या तपशीलवार नोंदी का नसाव्यात ? पुण्यात
आल्यावर मस्तानीचा जीवनक्रम नेमका कसा होता ? काशीबाई - मस्तानीचे संबंध कसे होते
? प्रश्न अनेक आहेत. उत्तरं देण्यास सध्याची साधनं अपुरी आहेत. भविष्यात एखादा
सत्यप्रिय इतिहास संशोधक अज्ञात प्रेरणेने प्रेरित होऊन याविषयी संशोधन करेल व या
संदर्भातील उपलब्ध कागदपत्रांतून आवश्यक ती कागदपत्रे मिळून ती प्रकाशित झाली तरच
मस्तानीचं चित्र, चरित्र उजेडात येईल. तोवर तरी इतिहासाला व वाचकांना मस्तानी
म्हणजे एक आख्यायिकाच आहे. आख्यायिका !
( समाप्त )
संदर्भ ग्रंथ :-
(१) मराठी रियासत
खंड - ३ :- गो. स. सरदेसाई
(२) मस्तानी :- द.
ग. गोडसे
(३) राजसत्तेच्या
फटींमधून पेशवेकालीन स्त्रिया :- नीलिमा भावे
(४) पेशव्यांचे
विलासी जीवन :- डॉ. वर्षा शिरगांवकर
(५) काही अप्रसिद्ध
ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
(६) उत्तरकालीन मुघल
( खंड २ ) ( वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित Later Mughals च्या
दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद ) :- अनुवादक - प्र. गो. ठोंबरे
(७) श्रीमनुस्मृती (
संपूर्ण मराठी भाषांतर ) :- वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री बापट
३ टिप्पण्या:
अत्यंत समर्पक शब्दात घटनांबद्दल आढावा घेत बाजीराव आणि मस्तानी या प्रकरणाचे वर्णन सादर केल्याबद्दल धन्यवाद.
असेच एक प्रकरत तोतयाचे बंड म्हणून वाचायला आवडेल. आपण यावर प्रकाश टाकायची विनंती करतो.
अत्यंत समर्पक शब्दात घटनांबद्दल आढावा घेत बाजीराव आणि मस्तानी या प्रकरणाचे वर्णन सादर केल्याबद्दल धन्यवाद.
असेच एक प्रकरत तोतयाचे बंड म्हणून वाचायला आवडेल. आपण यावर प्रकाश टाकायची विनंती करतो.
Shashikant Oak सर,
प्रतिक्रियेबद्दल आभार ! तोतयाविषयी पुरेशी माहिती मिळाली कि जरूर त्यावर लेख लिहीन.
टिप्पणी पोस्ट करा