इतिहासलेखन हे तटस्थ, निःपक्षपाती वृत्तीने केलेले असावे असा एक दंडक आहे. परंतु याचेच उल्लंघन सर्वाधिक केले जाते. कारण कोणतीही व्यक्ती शंभर टक्के निर्विकार, तटस्थ राहूच शकत नाही. किंबहुना इतिहास हाच मुळी मानवी मनोविकारांचा गतकाळात घडलेला एक वृत्तांत आहे व इतिहासकार देखील एक मनुष्यच असल्याने या मनोविकारांपासून अलिप्त राहूच शकत नाही. विशेषकरून आपल्या देशात तर इतिहासकारांवर मनोविकारांचा अत्याधिक पगडा असल्याचे दिसून येते. त्यामुळे होतं काय कि, उपलब्ध पुरावे समोर असूनही केवळ स्वतःच्या दुराग्रहापायी ऐतिहासिक सत्य दुर्लक्षून व प्रसंगी विकृत करणारी विधानं केली जाऊन इतिहासाचा व पर्यायाने देशाच्या वर्तमान, भविष्याचा सत्यानाश केला जातो.
शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची ओळख आपणांस पाश्चात्त्यांकडून --- विशेषतः इंग्रजांच्या दीर्घ सहवासातून झाली. तत्पूर्वीचं आपलं इतिहासलेखन काव्य, बखरी, पुराणे इ. पुरते मर्यादित असून त्यामागील मुख्य हेतू म्हणजे सत्ताधारी वा ज्यास उद्देशून साहित्यरचना केली आहे, त्याकडून आर्थिक लाभ पदरात पाडून घेणे. यामुळे प्रसंगी सत्यकथनास आडफाटा दिला जात असला तरी जे काही असत्यकथन केले जाई,
त्यातून तत्कालीन समाजीवनाचे एक धुरकट चित्र निर्माण होते. परंतु हे चित्र पुराव्यांची भर घालून स्पष्ट करण्याऐवजी विकृत केलं गेलं तर ?
यात अशक्य ते काहीच नाही. संत तुकारामांच्या एका अभंगातील ' भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।। ' या सुप्रसिद्ध वचनाचे उदाहरण येथे देणे चुकीचे ठरणार नाही. मूळ अभंगात हेच वचन ' भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां ' असे असताना गाथा शुद्धीच्या नावाखाली संशोधक महोदयांनी गांडीची तेथे कासेची योजना करत ' नाठ्याळा चि गांठी देऊं माथां ' ऐवजी ' नाठाळाचे माथी हाणू काठी ' असा बदल करत, एका ऐतिहासिक रचनेस विकृत करून टाकले. या कृतीचा दुसरा परिणाम असा कि, संशोधकांनी केवळ शुद्धीकरणाच्या नावाखाली गाथांमध्ये शाब्दिक फेरफार तर केलेच पण त्याऐवजी बनावट अभंग बनवून देखील घुसडले नाहीत कशावरून, या शंकेस देखील जन्म दिला.
हिंदू धर्मातील जातीयता तसेच स्पृश्य - अस्पृश्यतेचा इतिहास शोधण्याकरता संत साहित्याचा उपयोग होऊ शकत होता, परंतु प्रक्षिप्तांमुळे ते साहित्य इतकं बदनाम व अविश्वसनीय झालंय कि सांगता सोय नाही. उदा
:- नामदेवांच्या कथांमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बडवे असल्याचा उल्लेख येत नाही. परंतु चोखोबांच्या अभंगात मात्र, चोखोबांनी मंदिर प्रवेश केल्याबद्दल बडवे त्यांना मारत असल्याचा उल्लेख येतो. आता चोखोबा व नामदेव तसे समकालीन. बरे, अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशबंदी केव्हापासून झाली याचाही कोठे समाधानकारक खुलासा नाही. कारण पेशवा सवाई माधवराव रोजनिशी ले. क्र.
११२९ नुसार देवालयाच्या बाहेर उत्तरेच्या बाजूस चोखोबांचा दगड आहे तिथे अतिशूद्र दर्शनास येत,
परंतु त्यांचा ब्राह्मणांस स्पर्श होत असल्याने अतिशुद्रांनी चोखोबांच्या दीपमाळ किंवा महारवाड्यातील स्थळाहून पूजा करावी असा पुणे दरबारने स. १७८३ - ८४ दरम्यान आदेश काढला. परंतु याच रोजनिशीत स. १७७४ - ७५ च्या ले. ९५६ नुसार पैठणच्या महादेव मंदिराच्या रक्षणार्थ ज्या चार पायदळ शिपायांची योजना झालीय त्यात दोन महार आणि दोन मराठ्यांचा समावेश आहे. याचा मेळ कसा घालावा ?
या ठिकाणी आणखी एका गोष्टीची नोंद करणे अप्रस्तुत ठरणार नाही. स. १४७५ मध्ये बहामनी बादशहाने अंबरनाक याच्या नावे संपूर्ण महार समाजास ५२ हक्कांची सनद दिली. याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी कि,
मंगळवेढ्यास बहमनींचा दामाजीपंत हा कमावीसदार असून त्याने त्यावर्षीच्या दुष्काळात सरकारी कोठारातील धान्य गोरगरीब जनतेत वाटून टाकले. त्याची चुगली बादशहाकडे होताच, बादशाहने दामाजीवर आर्थिक दंड बसवला, जो देण्याची दामाजीची ऐपत नव्हती. तेव्हा विठाजी / विठू नावाच्या महार व्यक्तीने आपल्याजवळील संपत्तीतून हा दंड भरून दामाजीची सुटका केली. बहामनी काळापासून जेवढ्या सत्ता महाराष्ट्रात होऊन गेल्या, त्या प्रत्येक सत्तेच्या कार्यकाळात या सनदेची उजळणी झाली असून त्याची एक नक्कल सातारकर छत्रपतींच्या दप्तरात सापडल्याचे इतिहास संशोधक श्री. वि.
का.
राजवाड्यांनी नमूद केलं आहे.
तात्पर्य, अस्पृश्यता व अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींची सामाजिक गुलामगिरी याचा खरा इतिहास अद्यापही उजेडात येणे बाकी आहे.
मूळ ऐतिहासिक संदर्भ साधने संपादून ती प्रसिद्ध करताना भाषा व शब्दरचना मूळ स्वरूपानुसार जशीच्या तशी छापणे बंधनकारक असते. मग पाहिजे तर त्यावर शुद्ध - अशुद्धतेच्या तळटीपा वा स्वतंत्र प्रकरणे लिहिली जाऊ शकतात. परंतु आपल्या इतिहास संशोधकांनी या नियमासही कित्येकदा गुंडाळून ठेवलं आहे.
श्री. वासुदेव कृ. भावे
लिखित '
मुसलमानपूर्व महाराष्ट्र ( खंड
१ ला ) ' या ग्रंथात त्यांनी शिलालेखांत मूळ शब्दांचे कृत्रिम संस्करण काही ठिकाणी दिले आहे. जसे - नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसे
लेख १ ला ). परंतु श्री. शांताराम
भालचंद्र देव संपादित '
महाराष्ट्र व
गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ
सूची ' नुसार वास्तविक नामवाचक शब्द आहे पूसणक. अर्थात, त्याविषयीही साशंकता आहे. कारण
संशोधकांनी कित्येक ठिकाणी मूळ शब्दोच्चार जसेच्या तसे न ठेवता
त्याचे संस्कृतकरण केले आहे.
उदा :- ' महाराष्ट्र
व गोवे
शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ
सूची ' मध्ये कार्ल्यातील एका लेखावर ' गृहस्थ महादेवणक ' नाव असल्याचे दिले आहे तर भाव्यांच्या '
मुसलमानपूर्व महाराष्ट्र ' मध्ये ' गृहपति महादेव नाक ' असे रूप दिलं आहे. प्रश्न
असा आहे कि यातील मूळ रूप कोणते ? शिलालेख
अनेक कारणांनी काळ उलटेल तसे वाचण्यास अवघड होऊन जातात. अशा
स्थितीत त्यांचे वाचन केल्यावर मूळ रूपे जशीच्या तशी ग्रंथीत करून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे ? आणि
याचे पालन कसे केले जाते याचा हा एक नमुना आहे.
मूळ प्राकृत शब्दांचे निष्कारण संस्कृतकरण केल्याने अर्थाचा अनर्थ होऊन इतिहासाची हानी होते. कारण, यामुळे प्राकृत या अभिजात भाषा असून संस्कृत हि कृत्रिम व अलीकडच्या
काळातील भाषा असल्याचे ऐतिहासिक सत्य एकीकडे दडवीत असताना दुसरीकडे संस्कृतच्या साहाय्याने शब्दांचे वाटेल तसे अर्थ फिरवून आपल्याला सोयीस्कर अशी इतिहासाची मांडणी करता येते.
उदा :- वैदिक धर्मियांच्या ग्रंथांत येणारा ' शूद्र ' हा वर्णवाचक शब्द. याची
व्युत्पत्ती, अर्थ संस्कृत भाषेत शोधूनही सापडणार नाही. मूळ
प्राकृत शब्दाचा पत्ता मुद्दा काही राखला नाही. येऊन
जाऊन ग्रीक इतिहासकारांच्या कृपेने शूद्र नामक टोळ्या पश्चिमोत्तर हिंदुस्थानात -- सिंध प्रांतात राज्य करत असल्याचे उल्लेख मिळतात. तसेच
महाभारतातही या टोळ्यांच्या राजवटीचे उल्लेख आहेत.
येथे आपण नमुन्यादाखल मनुस्मृतीचे उदाहरण पाहू. मुळात
या स्मृत्या रचल्या गेल्या स्थानिक प्राकृत भाषांत. ज्याचे
पुढे संस्कृत रूपांतर झाले. परंतु
या दरम्यानच्या काळात व त्यानंतरही
या स्मृत्यांचे संरक्षण - संवर्धन
वैदिकांनीच केले. परंतु
हे करत असताना मूळ नियम जसेच्या तसे ठेवल्याने त्यात परस्परविरुद्ध वचनांचा गोंधळ दिसून येतो. तसेच
स्मृतींचा अमुक अध्याय अमुक विषयापुरता मर्यादित आहे अशातलाही भाग नाही. कोणत्या
अध्यायात कोणते श्लोक यावेत याचाही धरबंद नाही. त्यामुळे
त्यात विस्कळीतपणा पुष्कळ आहे. परंतु
हा विस्कळीतपणा दूर करण्याऐवजी वैदिक धर्मियांची '
आर्य समाज ' संस्था विशुद्धीकरणाच्या नावाखाली स्वतःला अडचणीचे भासणारे मूळ मनुस्मृतीतील श्लोक उडवू लागले आहेत. उदा :- अध्याय क्र. ५
मधील श्लोक क्र. ३० - ५६ हा वैदिकांत प्रचलित मांसाहाराची पुष्टी करणाऱ्या वचनांचा जसा संग्रह आहे तद्वत मांसाहार वर्ज्य मानण्यास आरंभ झालेल्या काळाचाही प्रतिनिधी आहे. मनुष्यजीवन
आरंभ झाले तेव्हापासून तो मांसाहारी आहे. त्यामुळे
वैदिक धर्मात मांसाहार निषिद्ध होता अशातला भाग नाही व अद्यापही
त्यांच्यात त्याविषयी काही अपवाद वगळता काटेकोर नियम पाळले जातात असे नाही. तरीही
आमच्या वैदिक धर्मीय मित्रांनी विशुद्धीकरणाच्या नावाखाली स्वहस्ते स्वधर्माचा प्राचीन इतिहासच पुसून टाकण्याची मोहीम आखल्याचे येथे खेदपूर्वक नमूद करावे लागते.
उपलब्ध असलेले ऐतिहासिक पुरावे नष्ट करणे, विकृत
करणे हा खेळ कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे व यामुळे
आपला इतिहास कमालीचा दूषित बनला आहे. उदा :- आमच्या इतिहास संशोधकांवर आपापल्या धर्माचा जबरदस्त प्रभाव आहे. आपापल्या धर्मास अनुलक्षून गौरवार्थ एखादा उल्लेख आढळला कि त्या राजवटीस, राजास
आपल्या धर्माचे लेबल लावून टाकायचे. यातूनच
मग कनिष्क बौद्ध होतो, सातवाहन
वगैरे वैदिक ठरतात. बरं
होतं काय कि, यांचे
ग्रंथ संदर्भ साधनांच्या आधारे सजलेले असतात व कालानुरूप
ते सर्व संदर्भ नंतरच्या अभ्यासकांस उपलब्ध होतातच असे नाही. तेव्हा
आधीच्या संशोधकांची मते प्रत्यंतर पुराव्याच्या अनुपलब्धतेमुळे, केवळ त्यांच्या संशोधन कार्याकडे बघून स्वीकारावी लागतात. त्यामुळे
अंधानुकरणाची एक न संपणारी
मलिकाच बनून त्यावर समाजमन पोसले जाते.
उदा :- संस्कृत हि प्राचीन अभिजात भाषा असल्याचे इतकी वर्षे ठामपणे सांगत समाजमनावर ठसवले. परंतु
वस्तुस्थिती काय आहे ? संस्कृत
हि पाली प्रमाणेच निर्माण केलेली भाषा आहे. या
भाषेला स्वतःची लिपी नाही. संस्कृत
भाषेतील सर्वात जुना शिलालेख गिरनार येथे प्राप्त झाला असून त्याचा काळ इ. स. १५० नंतरचा ठरवण्यात आला आहे. तसेच
हा लेखही संस्कृत + प्राकृत
असा मिश्र स्वरूपात असून लिपी ब्राह्मी आहे. यापूर्वीचा
संस्कृत भाषेतील एकही लेख अद्याप प्राप्त झाला नाही. तसेच
हि वैदिकांची भाषा आहे, या
समजाला कसलाही आधार नाही. या
भाषेत सर्वांचा -- हिंदू, बौद्ध, जैन, वैदिक इ. चा
समावेश आहे व सर्वधर्मियांनी
प्रसंगी या भाषेत विपुल लेखनही केलेलं आहे. याचा
कसूर अर्थ असा होतो कि, आपल्या
प्राचीन इतिहासाचे पुरावे संस्कृत ऐवजी पुराप्राकृत भाषांत लिहिलेल्या शिलालेख, ताम्रपट, दस्तऐवजांत सर्वाधिक असून त्यातील बरेचसे कालौघात नष्ट झाले वा केले गेले, तर
उर्वरित केवळ आपल्या उदासीनतेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
स्वतःला अडचणीचे भासणारे अस्सल ऐतिहासिक पुरावे नष्ट करण्याची देखील आपल्या संशोधकांत एक महान परंपरा आहे. या
संदर्भात आचार्य अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात (
कऱ्हेचे पाणी ) दिलेला नाना फडणवीसच्या रक्षांच्या नावाची यादी खाऊन टाकणाऱ्या इतिहास संशोधकाचा किस्सा वाचकांच्या समरणात असेलच. अशा
प्रकारे कित्येक कागद या दिव्य संशोधकांनी गायब केले असतील याचा आजघडीला पत्ता नाही. याच
संदर्भात प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या '
ग्रामण्यांचा इतिहास ' या ग्रंथातील पुढील दोन उल्लेख महत्त्वाचे आहेत :- (१) या ग्रंथाचे प्रकाशक आपल्या प्रास्ताविकात लिहितात -- ' ... सावित्रीबाई ठाणेदारणीला कोणी कायस्थ ज्ञातींतून चित्पावन ज्ञातीत ढजलीत आहेत. कोणी तिला कादंबरीतील नायिका म्हणत आहेत, कोणी नाना फडणीसांच्या अंत:करणाच्या खाणीतून कोहीनुरांचे ढीगच्या ढीग बाहेर काढीत आहेत, कोणी त्यांच्या मनोमय भूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरविण्याच्या गडबडीत आहेत, कोणी गोपीनाथ पंत बोकीलाला शिवाजीची चिटणीशी वतन बहाल देण्याच्या धामधूमीत आहेत, कोणी हेमाडपंतालाही ब्राह्मणी पोशाख चढविण्याच्या तजविजीत आहेत; तर कोणी मराठया आठवल्याला चित्पावनी बाप्तिस्या देण्याच्या खटपटीत आहेत. असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलोला आहे. ' स. १९१९
च्या काळातील हि स्थिती आहे.
(२) शिवकालीन
कागदपत्रे का उपलब्ध होत नाहीत याविषयी चर्चा करताना प्र. ठाकरे
लिहितात -- ' ... या कोडयाचा उलगडा व्हावा म्हणून शोध करीत असतांना छत्रपतीच्या चिटणीसाच्या एका पत्राची नक्कल उपलब्ध झाली, त्यांत चिटणीसांनी स्पष्ट लिहिलं आहे कीं आम्हांला तुरुंगात टाकल्यावर चिंतामणराव पटवर्धाच्या चिथावणीवरुन बाळाजीपंत नातूनें आमचें घरदार लुटविलें आणि अठरा उंट भरुन घरांतील सर्व कागद पत्र नेऊन जाळून फस्त केले. '
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे विकृत करण्याची उदाहरणेही काही थोडी थोडकी नाहीत. उदा :- वि. का. राजवाड्यांच्या '
मराठ्यांच्या इतिहासाची
साधने ( १७५०
पासून १७६१
पर्यंत ) ' मधील ले. क्र. १.
हा लेखांक म्हणजे दिल्लीच्या तुर्की बादशहा सोबत पेशव्यातर्फे होळकर - शिंद्याने
केलेल्या मूळ संरक्षक कराराची मराठी नक्कल असून यात प्रामुख्याने फार्सी शब्दांचा वापर केलेला आहे. याचा
सारांशरुपी मराठी अनुवाद राजवाड्यांनी तळटिपेत देताना आपल्या वैदिक धर्माची कारण नसताना मेख मारून ठेवली आहे.
करारातील
मूळ वाक्यरचना --- श्री महादेव व खडेराव व धर्म व आईन आपले दरमीयान व जामीन आहेत.
राजवाडे कृत अनुवाद --- श्रीमहादेवाची व खडेरावाची व धर्माची व स्मृतीची शपथ व साक्ष तुह्मा आह्मास आहे.
मूळ करारात स्मृती हा शब्दच नसताना राजवाड्यांनी आईन या फार्सी शब्दाचा मराठी अनुवाद स्मृती केला. वास्तविक
आईन या शब्दाचे कायदा, विधान, पद्धती, नियम, रीत, प्रथा, परंपरा, रिवाज
इ. अर्थ
होत असतानाही राजवाड्यांनी मुद्दाम सहेतुक स्मृती या वैदिक धर्मविशेष शब्दाची योजना करत एकप्रकारे तत्कालीन वैदिक धर्मास नसलेली महत्ता कागदोपत्री देण्याचे, वाचक
व अभ्यासकांची
दिशाभूल करण्याचे पाप गाठीस जोडले आहे.
इतिहासकाराने
इतिहास लेखन करताना आपल्या मनोविकारांना बाजूला ठेवून इतिहासलेखन करायचे असते. एकप्रकारे
न्यायाधीशाच्या भूमिकेतच त्यास जावे लागते. परंतु
मराठी इतिहासकारांनी या तत्त्वास पूर्णतः हरताळ फासला आहे. पेशवाईचा
इतिहास याचे समर्पक उदाहरण आहे.
राजवाड्यांपासून
शेजवलकरांपर्यंत ज्या ज्या इतिहासकाराने पेशवाईतील पानिपत प्रकरण हाती घेतलं. त्याने
पानिपतच्या पराभवास मल्हारराव होळकरास जबाबदार धरले. वास्तविक
उपलब्ध कागदपत्रे, तत्कालीन
दरबारी राजकारण पाहिले तर पानिपतच्या अरिष्टास खुद्द त्रिवर्ग पेशवे बंधू -- नानासाहेब, रघुनाथराव आणि सदाशिवराव कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येते. पण
होतं काय ? तर
होळकराने रघुनाथरावास अब्दालीच्या मुकाबल्यास जाऊ दिले नाही, होळकराने
पंजाबच्या बंदोबस्तात मन घातले नाही, होळकराने
दत्ताजीला धोतर बडवी सल्ला दिला, होळकर
इब्राहिमखान गारदीचा द्वेष करत होता इ. इ. यातील एकही बाब कागदोपत्री सिद्ध होत नाही.
अस्सल कागदपत्रे जे सांगतात त्याविपरीत अनुमान काढून ते ओघवत्या भाषेत मांडल्यावर, सर्वसामान्य वाचकांच्या उड्या त्या अनुमानरचित इतिहासावर पडणे स्वाभाविक आहे व तसे
घडतेही. उदा :- मराठी रियासतीच्या निग्राहक
माधवराव
या खंडात स. १७६५
मध्ये झालेल्या होळकर - इंग्रजांच्या
दरम्यान काल्पी येथे झालेल्या लढाईची अस्सल पत्राधारे रियासतकार सरदेसाईंनी चर्चा केली असून त्या पत्रामध्ये आप्पाजीरामाने स्पष्टपणे लिहिलंय कि, ".. इंग्रज काल्पीत ठाणे बसवून माघारे गेले. आम्ही उलटोन त्यांचे ठाणे काढून आपले ठाणे बसविले. तेथून उमरगडचा बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांती चाललो आहों. " तरीही रियासतकार लिहितात -- याप्रमाणे होळकरास इंग्रजांपुढे माघार घ्यावी लागली. त्यांस हुसकून देणे तर दूरच, परंतु उलट त्यांनी मल्हाररावासही टिकू दिले नाही.
होळकरांच्याच
संबंधाने लक्षात आलेली आणखी एक बाब म्हणजे, दुसऱ्या
बाजीरावाच्या काळात यशवंतराव होळकराने पुणे शहराची लूट, जाळपोळ
केली असा एक इतिहासकारांनी त्याच्यवर बिनबुडाचा आरोप केला आहे. वस्तुतः
पुणे शहरातून खंडणी वसुलीचे काम अमृतराव पेशव्याच्या आज्ञेने त्याचा सरदार हरिपंत भावे करत होता व त्याने
मदतीसाठी यशवंतरावाची काही पथके सोबत घेतली होती. खेरीज
होळकर पुणे सोडून गेल्यावर अमृतरावाने शक्य तितकी शहरात लूटमार केली. परंतु
सर्व खापर फुटले ते यशवंतराव होळकरावर !
कृत्रिम, बनावट पुरावे निर्माण करून त्याआधारे इतिहासलेखन करणे हाही प्रकार आपल्या संशोधकांनी केलेला आहे. उदा :- सिंधू संस्कृती अज्ञात होती त्यावेळी आर्य आक्रमण सिद्धांताच्या आहारी गेलेले वैदिक धर्मीय, सिंधू
संस्कृती उजेडात येताच आपणच तिचे निर्माणकर्ते अशा कोलांटउड्या मारू लागले. आपल्या
धर्मग्रंथात -- ऋग्वेदात यासंबंधी काही पूरक पुरावे आढळतात का, याचा
ते शोध घेऊ लागले. त्याशिवाय
काही वैदिक विद्वानांनी असत्याचा आश्रय घेत सिंधू संस्कृतीच्या लिपीचे वाचन केल्याचा व ती
लिपी वैदिक संस्कृत असल्याचाही दावा करत जगभर खळबळ माजवली होती. तसेच
एन. एस. राजाराम व एन. झा यांनी सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच, हे
सिद्ध करण्यासाठी सिंधू संस्कृतीतील एका अर्धवट तुटलेल्या मुद्रेला -- ज्यावर
एकशिंगी बैलाची प्रतिमा होती -- संगणकीय
आधाराने पूर्ण करत बैलाचा घोडा करून टाकला. कारण, वैदिक आर्यांच्या जीवनात घोड्याला अनन्यसाधारण महत्त्व असून सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा मिळत नव्हता. परंतु
हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी एन. एस. राजाराम व एन. झा यांचा उपरोक्त पोकळ दावा म्हणजे चक्क भूलथाप असल्याचे साधार सिद्ध केले.
मनुस्मृती
अध्याय २, श्लोक
क्र. १७ - २२ नुसार वैदिकांचे मूळस्थान म्हणजे सरस्वती व दृषद्वती
या दोन नद्यां दरम्यानचा ब्रम्हावर्त होय. भौगोलिकदृष्ट्या
हे स्थान दक्षिण अफगाणिस्तानात येते व सरस्वती
नदी आजही तिथे हेल्मन्ड नावाने प्रवाही आहे. परंतु
हे सत्य जाणूनबुजून दुर्लक्षून हरियाणातील मोसमी नदीला -- घग्गर
हाक्रा नदीला सरस्वती नदी ठरवण्याचा खटाटोप सध्या सुरु आहे. या
नदीच्या खोऱ्यातच आपला धर्म - संस्कृती
निर्माण झाल्याचे सांगत सिंधू संस्कृतीच्या निर्मितीचे व त्यासोबत
हिंदू धर्माच्या पितृत्वाचेही श्रेय संपादण्याचा खेळ वैदिकांनी आरंभला आहे. यासंबंधी
विस्तृत व साधार
विवेचन श्री. संजय
सोनवणींनी आपल्या '
हिंदू धर्म
आणि वैदिक
धर्माचा इतिहास ' या ग्रंथात केले असून जिज्ञासूंनी तो अवश्य वाचून पाहावा अशी मी शिफारस करतो.
वैदिकांच्या
वर्चस्ववादाची हाव एवढी कि, त्यांनी
हिंदूंच्या शिवलिंगाचा भ्रामक आधार घेत काबा या स्थळावरही आपला दावा सांगत ख्रिस्ताचेही कृष्ण रूप करून टाकले.
अशा या थापेबाजीच्या इतिहासाची तितकीच जोरदार प्रतिक्रिया होणे स्वाभाविक होते व ती
तशी झालीही. आरंभी
ब्राह्मण - ब्राह्मणेतर
ते नंतर बहुजन, मूलनिवासी, आर्य - द्रविड
अशी साहित्य संघर्षाची मांडणी झाली.
प्रथम नांदी म. फुल्यांनी केली. त्यानंतर यात भरच पडत गेली. वैदिकांचेच साहित्य वापरून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं कार्य या आघाडीवर झालं खरं, परंतु त्यामुळे भारताच्या इतिहासात कितपत मोलाची भर पडली ? हा खरा प्रश्न आहे. भारतावरील इंग्रजी राजवटीचे अनेक भले बुरे परिणाम असले तरी त्यातील एक चांगला परिणाम म्हणजे इंग्रजांमुळेच वैदिकांची लबाडी प्रथमतः उघडकीस आली. येथील भाषा, संस्कृती, इतिहास जाणून घेण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला --
ज्यास वैदिकच सहाय्य्यभूत झाले --
त्याद्वारे भ्रष्ट स्वरूपात का होईना वैदिकाळलेला इतिहास हिंदूंच्या समोर आला व आत्मचिंतनातून त्यांना त्यातील विकृत भागाचे दर्शन घडून शुद्ध स्वरूपाचे थोडेबहुत ज्ञान झाले. अर्थात शतकानुशतकांचे समज, मनातील न्यूनगंड एक दोन पिढ्यांत दूर होणारे नसले तरी त्या दिशेने झालेली सुरवात नक्कीच स्वागतार्ह आहे
!
1 टिप्पणी:
छान
टिप्पणी पोस्ट करा