सोमवार, ११ मार्च, २०१९

पानिपत ( भाग २ )








    बुराडीचा रणसंग्राम म्हणजे मराठी पक्षाच्या ढिसाळ लष्करी व राजकीय डावपेचांचा एक उत्कृष्ट नमुना होय. कोणत्याही लष्करी मोहिमेचं नियोजन करताना प्रथम राजकीय आघाडीवर त्याची पूर्वतयारी करावी लागते. याबाबतीत दत्ताजी शिंदे खूपच कमी पडला तर अब्दाली - नजीब शेर ठरले.

    अब्दालीने कुरुक्षेत्रावर दत्ताजीला बगल देत नजीब सोबत हातमिळवणी केली. याचे मुख्य कारण म्हणजे, स्वबळावर तो दत्ताजीचा पराभव करू शकत नव्हता हे होय. दिल्ली दरबारातील प्रमुख मुत्सद्दी - सरदारांचा अब्दालीला सक्रिय पाठींबा असल्याने हिंदुस्थान स्वारीकरता पंचवीस तीस हजारांहून अधिक सैन्य सोबत आणण्याची त्यांस कधीच गरज भासली नाही. त्यामुळे कुरुक्षेत्रावर दत्ताजी जवळपास तेवढ्याच सैन्यासह आडवा आल्यावर त्याने निर्णायक लढा टाळून आपल्या लष्करी सामर्थ्याचा बचाव साधला. त्यानंतर नजीबच्या रोहिल्यांची मदत घेऊन त्याने दत्ताजी शिंदे दिल्लीनजीक एकटा आहे तोच त्याचा निकाल लावण्याचे निश्चित केले.

    त्याउलट दत्ताजीचे वर्तन झाले. अब्दालीच्या बातम्या दत्ताजीला शुक्रताली थोड्या विलंबानेच मिळालेल्या दिसतात. त्यामुळेच प्रथमतः त्यास जेव्हा अब्दालीच्या आगमनाची वार्ता प्राप्त झाली तेव्हा त्याने होळकरास राजपुतान्यातून त्वरेने मदतीस येण्याकरता पत्रे पाठवली. त्यावेळी होळकर जयपूर नजीक माधोसिंगासोबत लढण्यात गुंतला होता. शिंद्यांची पत्रे येताच त्याने मोहीम आवरती घेण्याच्या उद्देशाने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून दिला तोच शिंद्यांचा निरोप आला कि, अब्दाली चालून येण्याची चिन्हं दिसत नाहीत. तेव्हा होळकराने रामपुऱ्याच्या वाटेस लावलेला आपला तोफखाना मागे परत बोलावून माधोसिंगवरील मोहीम तशीच जारी राखली. दरम्यान अब्दाली नेटाने पुढे पंजाबातून चालून येत असल्याच्या खात्रीशीर वार्ता दत्ताजीकडे आल्याने व पंजाबात ठिकठिकाणी तैनात केलेल्या मराठी सैन्याच्या तुकड्याही पाठोपाठ शुक्रताली निघून येऊ लागल्याने दत्ताजीला वस्तुस्थितीची जाणीव होऊन त्याने अब्दालीला वाटेत रोखण्याचा निर्णय घेत होळकरास मदतीकरता येण्यासाठी परत एकदा निरोप धाडला. दत्ताजीचे पत्र होळकरास दि. २७ डिसेंबर रोजी प्राप्त झाले. तेव्हा परत त्याने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून देत माधोसिंगावरील मोहीम आटोपती घेत दत्ताजीच्या मदतीसाठी प्रस्थान ठेवले.

    इकडे शत्रुपक्षाच्या सामर्थ्याचा अंदाज घेण्यात दत्ताजीकडून चूक झाल्याचे उघड आहे. त्याचप्रमाणे त्यांस शत्रूच्या डावपेचांचेही पुरेपूर आकलन न झाल्याचे दिसून येते. नजीब आणि अब्दाली एकत्र आल्यास आपला निभाव लागणार नाही, हे त्याने अचूक ताडले. परंतु त्यावर उपाय म्हणून दोघांना एक एकटं गाठून बुडवण्याचा डाव त्याच्या अंगाशी आला. कारण नजीब - सुजा एकत्र असल्याने त्यांचा अल्पावधीत पराभव करणे त्यास शक्य नव्हते व अब्दालीला तर शिंद्यासोबत मुळी निर्णायक लढाच द्यायचा नव्हता. शिवाय दत्ताजीने कितीही ठरवले असले तरी अब्दालीला गुडघ्यावर आणण्यासाठी आवश्यक असे तोफखान्याचे बळही त्याच्यापाशी नव्हते व चारी बाजूंनी घोडेस्वार फिरवून अब्दालीची रसद मारून याचा वाटेत कोंडमारा करण्याइतपतही त्याच्याकडे वेळ नव्हता. अशा स्थितीत शुक्रतालहुन थेट पंजाबात धाव घेण्याऐवजी रेवाडीकडे सरकून त्याने होळकरासोबत हातमिळवणी करायला हवी होती. नानासाहेब पेशव्याचेही तेच मत होते. परंतु दत्ताजीकडून ते झाले नाही.

     पुढे अब्दाली रोहिल्यांच्या प्रदेशात निघून गेल्यावर तरी त्याने होळकराकडे निघून जावे, तेही केले नाही. केवळ अभिमानास बळी पडून त्याने दिल्लीच्या रक्षणाचा निर्णय घेतला. स्वतःहून शत्रूच्या कचाट्यात आपली मान दिल्यावर त्याने सूरी फिरवली असता मागाहून बोंब करण्यात काय अर्थ !
होळकराने कितीही त्वरा केली तरी चार दोन दिवसांत तो दिल्लीला पोहोचू शकत नव्हता. अशा स्थितीत अफगाण, रोहिला, तुर्कांच्या संयुक्त सैन्याला तुलनेनं अल्प फौज रोखू शकेल हा दत्ताजीचा अतिआत्मविश्वास त्याच्या अंगलट आला.

    अब्दाली - नजीब दिल्ली घेण्याचा प्रयत्न करणार हे हेरून दत्ताजीने दिल्ली नजीकचे यमुनेचे पायउतार मजबूत लष्करी चौक्या नेमून बंदिस्त केले. शिंद्याला होळकराची मदत मिळाल्यास प्रकरण जड जाईल हे हेरून अब्दालीने दि. १० जानेवारी १७६० रोजी एकाच वेळी शिंद्याच्या नदी घाटावरील सर्व लष्करी चौक्यांवर हल्ला चढवला. यावेळी यमुनेचं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याने पात्रातील वाळूची बेटं उघडी पडून त्यावर बऱ्यापैकी उंच वनस्पती, झाडींची दाटी झाली होती. बंदूकधारी रोहिले - अफगाण या बेटांतील झाडीच्या आडोशाने मराठी सैन्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होते. खेरीज नदी किनाऱ्यावरून तोफांचा माराही केला जात होता.

     बुराडी घाटच्या संग्रामाचे भाऊ बखरीत जे वर्णन दिलंय त्यावरून असे दिसून येते कि, घाट रक्षणासाठी दत्ताजीने तोफांची योजना केली नव्हती. त्यामुळे मराठी सैन्याची बरीच हानी झाली. मात्र बुराडी घाटावर शिंद्यांची फौज केवळ तलवार, भाले, धनुष्यबाणांनी लढली या इतिहासकारांनी प्रसृत केलेल्या गैरसमजास काही अर्थ नाही. शिंदेशाही इतिहासाची साधनांत एका टीपेत संपादकांनी अस्सल कागद्पत्राधारे नमूद केलं आहे कि, पानिपतपूर्वीच होळकर - शिंद्यांच्या पदरी गारदी होते. अर्थात, पेशव्याइतकी गारद्यांची पलटणं सरदारांकडे नसली तरी निश्चितच काही प्रमाणात बंदूकधारी पायदळ त्यांच्याकडे होते असे बुराडीच्या संग्रामावरून दिसते. अन्यथा नदी पात्रातील बेटांवर लपलेले रोहिले - अफगाण तसेच पुढे गोळ्यांचा वर्षाव करत चालून आले असते. असो.

    रोहिला - अफगाणांनी नदी घाटांवर चढाई केली त्यावेळी दत्ताजी बुराडी पासून तीन मैलांवरील आपल्या मुख्य छावणीत होता. हल्ल्याची वार्ता येताच तो बुराडी घाटाकडे निवडक पथकांसह गेला व शत्रुसैन्याला प्रतिकार करणाऱ्या आपल्या फौजेला मार्गदर्शन करत असता, हिंमत देत असताना शत्रूकडील बंदुकीने त्याचा अचूक वेध घेतला. दत्ताजी घोड्यावरून खाली येण्यापूर्वी वा त्यानंतर जनकोजीही अशाच प्रकारे घायाळ होऊन पडला होता. मात्र जनकोजीला उजव्या दंडावर गोळी लागल्याने व सहकाऱ्यांनी त्वरित त्याला रणभूमीवरून मागे नेल्याने त्याचा बचाव झाला. आपले दोन्ही नेते दिसेनासे झाल्यावर शिंद्यांच्या फौजेने लढाई सोडून तळावरील सर्व सामानसुमान तसेच टाकून कोटपुतळीकडे माघार घेतली. तिथे त्यांना दिल्लीतील संग्रामाधी दत्ताजीने रवाना केलेले कबिले व बुणगे भेटले. तसेच होळकराचीही येथेच गाठ पडली. ( दि. १५ जानेवारी १७६० )

    इकडे नदी घाटावरील शिंद्यांच्या चौक्या उधळून लावल्यावर दत्ताजीच्या मृतदेहाची ओळख पटून त्याचे शीर कापून विजयाचे प्रतीक म्हणून अब्दालीकडे नेण्यात आले. खेरीज शिंद्यांच्या मुख्य छावणीतील सामान, शिंद्यांचा हत्ती जव्हेरगज व पंजाबातील बंदोबस्ताकरता रघुनाथरावाने नेमलेल्या आदिनाबेगचा कारभारी लक्ष्मीनारायण, सादिकबेगची मुले नजीबच्या हाती सापडली.

    बुराडी घाटच्या संग्रामात दत्ताजी जखमी अवस्थेत नजीबच्या हाती लागला असता दत्ताजीने काढलेले ' बचेंगे तो और भी लढेंगे ' उद्गार व त्यामुळे चिडून जाऊन नजीबने कुतुबशाह करावी त्याचा केलेला खून, या सर्व भाकडकथा होत. दत्ताजी सारखा बलवान सरदार जिवंत हाती लागला असता त्याला कैद करून नेण्यात जितका नजीब - अब्दालीचा फायदा होता, तितका ठार करण्यात नव्हता, हे बारकं पोरही सांगेल.

    बुराडी घाट प्रसंगी शिंद्याच्या फौजेची वाताहत झाली वा भरपूर मनुष्यहानी झाली अशातला भाग नाही. गोळीबारात आपले नेते पडताच शिंद्यांच्या सरदारांनी माघार घेतली व बुणग्यांसह ते सुरक्षितपणे शत्रूच्या कचाट्यातून बाहेर पडले. केवळ भाऊ बखर प्रमाण मानून लेखन करणाऱ्यांनी या प्रसंगास पदरचे तिखटमीठ लावत स्वतःची विकृत हौस भागवून घेत इतिहासाचेही विकृतीकरण केले.

    पुढील राजकारणाची चर्चा करण्यापूर्वी यास्थळी क्षणभर थांबून युद्धप्रसंगात शत्रूपक्षीयांच्या मनुष्यांची शिरे कापण्याच्या पद्धती संबंधी थोडं विवेचन करणं आवश्यक आहे. प्रतिपक्षावरील विजयाचं प्रतीक म्हणून शत्रुपक्षाकडील मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्याचा प्रघात आदिम आहे. यामध्ये गुलाम म्हणून मनुष्य, जनावरे, सोन्यासारखे मौल्यवान धातू, शस्त्रास्त्रे, सत्ता निदर्शक चिन्हे इ. सोबत विरुद्ध पक्षीय नेतृत्वाच्या शिराचाही समावेश होतो. अगदी आपल्या महाभारत वा पुराणांत तसेच प्राचीन इतिहासांतही याचे दाखले असून या गोष्टीचा कोण्या एका विशिष्ट धर्माशी अजिबात संबंध नाही. 


                                                                                                                                                           ( क्रमशः )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: