शनिवार, १६ मार्च, २०१९

मल्हारराव होळकर : आक्षेप निरसन







    पानिपत म्हणजे मराठी मनातील एक सल. ज्याला इतिहासात अजिबात रस नाही अशा व्यक्तीच्या ऐकण्या - बोलण्यातही हा शब्द येऊन राहिलाय. मग ते कधी पानिपत झालं या शब्दप्रयोगाद्वारे तर कधी सतराशे साठ भानगडी, या लाक्षणिक म्हणीद्वारे. खेरीज कथा - कादंबऱ्यांवर पोसलेला एक असाही वर्ग आहे -- ज्याचे प्रमाण पानिपत अनभिज्ञ व तज्ञांहून अधिक आहे -- त्याच्या लेखी पानिपतच्या अरिष्टाचे दोन खलनायक ठरलेले असतात. एक मल्हारराव होळकर तर दुसरा नजीबखान. किंबहुना होळकर आणि नजीबखान या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. अर्थात, यामागे त्यांचीही चूक नाही. कारण त्यांचा तसा समज करून देण्यात आमचे तज्ञ इतिहास संशोधकच अधिकाधिक जबाबदार आहेत. उदाहरणार्थ :- पानिपत संबंधी मल्हारराव होळकरावर इतिहासकारांनी प्रामुख्याने केलेले दोन आरोप म्हणजे (१) हाती जिवंत सापडलेल्या नजीबखानास सोडून देण्याकरता रघुनाथरावास भाग पाडणे व (२) बुराडी घाटच्या लढाईत दत्ताजी शिंद्याच्या मदतीस न जाणे. या लेखामध्ये या दोन आरोपांचा आपणांस समाचार घ्यायचा आहे.


  १]  मल्हारराव होळकरावरील प्रथम आरोप म्हणजे त्याने हाती जिवंत सापडलेल्या नजीबखानास जीवनदान देण्यासाठी, कैदमुक्त करून त्याच्या जहागिरीच्या प्रदेशात परत जाऊ देण्यासाठी रघुनाथराव उर्फ दादासाहेबास गळ घातली व यामुळेच पानिपतचे अरिष्ट उद्भवले. जर नजीब जिवंत सुटलाच नसता तर पानिपत घडलेच नसते.


    या आरोपाचे समर्थक अगदी इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते अलीकडच्या नवजात इतिहासकारांपर्यंत अनेकजण असून या आरोपाच्या निश्चितीकरता पुराव्यादाखल ते भाऊसाहेबांच्या बखरीतील पृष्ठ क्र. ५० - ५१ वरील मजकूर उद्धृत करतात. खेरीज राजवाड्यांसारखे पुराव्याखेरीज न बोलणारे साक्षेपी, सत्यवचनी इतिहासकार आपल्या ' मराठ्यांच्या इतिहासाची साधने : १७५० पासून १७६१ पर्यंत ' यामधील ले. क्र. ४८  च्या आधारे " मल्हाररावाने नजीबखानाचे साधन करून ठेविले. " असे प्रास्ताविकात बेधडकपणे बोलून मोकळे होतात. परंतु वास्तविकता काय आहे ?


    प्रस्तुत चर्चेतील प्रसंग हा रघुनाथरावाच्या दुसऱ्या हिंदुस्थान मोहिमेतील ( हिलाच अटक स्वारी असेही म्हणतात. ) असून दादाची हि स्वारी स. १७५७ - ५८ मध्ये घडून आली.


    स. १७५७ च्या जून - सप्टेंबर दरम्यान रघुनाथरावाच्या नेतृत्वाखालील मराठी सरदारांनी दिल्लीभोवती फास आवळत सप्टेंबर मध्ये दिल्लीचा ताबा नजीबखानाकडून घेतला. यावेळी दिल्ली जिंकण्याच्या कामी रघुनाथरावाने जे सरदार योजले होते त्यामध्ये होळकरासोबत विठ्ठल शिवदेव विंचूरकराचाही समावेश होता व याच विंचूरकराने दिल्लीतून नजीबखानाला हुसकून लावण्याच्या कमी विशेष पराक्रम गाजवल्याबद्दल दिल्लीच्या तुर्की बादशहाने त्याला उंची पोशाख, अलंकार, ' राजे उमदेतुल्मुल्क बाहादर ' हा किताब, तलवार आणि नऊ गावं इनामादाखल दिल्याचे ' विंचूरकर घराण्याचा इतिहास ' मध्ये श्री. हरी रघुनाथ गाडगीळ यांनी नमूद केलं आहे. विशेष म्हणजे नजीबखानाला विंचूरकराने जिवंत पकडल्याची उल्लेख गाडगीळ करत नाहीत.


    श्री. यदुनाथ सरकारांनी आपल्या ' फॉल ऑफ मुघल  एम्पायर Vol. 2 '  मध्ये या प्रकरणाची अस्सल संदर्भ साधनांद्वारे विस्तृत चर्चा केली असून त्यामध्ये रघुनाथरावासोबत नजीबखानाने तहाच्या वाटाघाटी करून दिल्लीचा ताबा सोडल्याचे त्यांनी नमूद केलं असून या वाटाघाटी मल्हारराव होळकराच्या मार्फत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. परंतु युद्ध प्रसंगी नजीबखान जिवंत मराठी सैन्याच्या हाती लागला व कैद झाल्याचा प्रसंग घडल्याचे त्यांनी दिलेलं नाही.


     तहाची वाटाघाट होण्यास मध्यस्थ होणं वेगळं व शत्रू जिवंत हाती लागला असता त्यांस मोकळं सोडण्यास भाग पाडणं वेगळं हे सरदेसाई, राजवाडे सारख्या इतिहासकारांस माहिती नव्हतं काय ? तरीही यांनी हरामखोरी करत खुशाल वाटेल तशी विधानं ठोकत होळकरास खलनायक ठरवण्याचा निंदनीय प्रयत्न केला. मग याच न्यायाने कुंभेर प्रसंगी सुरजमल जाटाच्या वतीने जयाजी शिंद्याने केलेल्या कृत्यास हे विद्वान स्वामीद्रोह का म्हणाले नाहीत ? किंवा यांचे सध्याचे बगलबच्चे कुंभेरी प्रसंगी शिंद्याच्या वर्तनावर मूग गिळून का बसतात ?


     तह घडवून आणताना मध्यस्थास पैसे देण्याची प्रथा तेव्हा होती व असे पैसे सर्वच अंतस्थ घेत होते. अगदी पेशव्यांपासून नाना फडणवीसापर्यंत सर्वांनी आपले खासगी खजाने याद्वारे भरून घेतले मग होळकराने केलेली मध्यस्थी तेवढी यांना का खुपावी ? आणि स. १७५७ मध्ये होळकरास काय स्वप्न पडले होते कि, चार वर्षांनी याच नजीब - अब्दालीकडून आपल्या सत्तेचे बारा वाजणार आहेत म्हणून ! माणसाने आरोप करावेत परंतु ते इतकेही बेछूट नसावेत कि. जेणेकरून भविष्यात आपल्याच अकलेचे दिवाळे निघाल्याचे सिद्ध व्हावे.


  २]  मल्हारराव होळकरावरील दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे, तो मुद्दामहून दत्ताजी शिंद्याच्या मदतीस दिल्लीला गेला नाही. त्यामुळे दत्ताजीला नजीब - अब्दाली सोबत एकाकी लढा देणे भाग पडून त्यातच त्याचा अंत झाला.


     या आक्षेपास बळकटी देणारा एकही अस्सल कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही. तरीही इतिहासाचार्य राजवाड्यांसारखे निःपक्षपाती इतिहासकार आपल्या ' मइसा : १७५० ते ६१ ' मधील ले. १५७ या नानासाहेब पेशव्याच्या पत्रांतील "... मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला " या वाक्यांवरून होळकरास मराठी राज्याचा गृहशत्रू संबोधतात व साक्षात इतिहासाचार्यांच्या निष्कर्षास ब्रम्हवाक्य समजून इतरजण त्यांस प्रमाण मानतात. परंतु वस्तुस्थिती इथेही वेगळीच आहे.

प्रस्तुत प्रसंग डिसें. १७५९ ते जाने. १७६० दरम्यानचा असून डिसेंबरच्या पूर्वार्धापर्यंत दत्ताजी शिंदे शुक्रताल जवळ नजीबखान - सुजाउद्दौला सोबत लढत होता तर मल्हारराव होळकराने पेशव्याच्या आज्ञेने खंडण्यांच्या वसुलीकरता राजपुतान्यातील मोहिमा हाती घेतल्या होत्या.


    विशेष म्हणजे स. १७५९ च्या नोव्हेंबरात लाहोरास असलेला साबाजी शिंदे अब्दालीकडून पराभूत होऊन त्याच महिन्याच्या अखेरीस शुक्रताली दत्ताजीस रुजू झाला होता. पाठोपाठ पंजाबात ठिकठिकाणी प्रथमतः रघुनाथराव व मागाहून दत्ताजीने तैनात केलेली मराठी सरदारांची पथके अब्दालीकडून पराभूत होऊन वा त्याच्या दहशतीने माघार घेत दत्ताजी शिंदेच्या छावणीत गोळा होऊ लागली होती. तेव्हा दि. ११ डिसेंबरच्या सुमारास अब्दालीला रोखण्याच्या इराद्याने दत्ताजी दिल्लीकडे निघून गेला.


    यासंबंधी श्री. सरकारांनी आपल्या फॉल ऑफ मुघल एम्पायर Vol. 2  मध्ये अस्सल संदर्भ साधनांद्वारे हे स्पष्ट केलं आहे कि, अब्दालीच्या आगमनाची वार्ता येताच दत्ताजीने प्रथम होळकरास आपल्या मदतीला येण्याकरता पत्र रवाना केली होती. त्यानुसार मल्हाररावाने राजपूत युद्ध आटोपतं घेण्याच्या उद्देशाने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून दिला व तो स्वतः दिल्लीकडे निघणार तोच शिंद्याची पत्रे आली कि, अब्दाली येण्याचा संभव नाही. तूर्तास नजीबला उखडून काढत आहोत. तेव्हा होळकराने दिल्लीकडे जाण्याचा निर्णय रद्द करून रामपुऱ्यास पाठवलेला तोफखाना परत बोलावला व बलवड्यास मोर्चे लावले. परंतु दि. २७ डिसेंबर रोजी दत्ताजीची कुमकेकरता तातडीने निघून येण्याची पत्रे येताच मल्हाररावाने पुन्हा राजपूत युद्ध आवरतं घेत दि. २ जाने. १७६० रोजी झिलाडा येथून दिल्लीकडे प्रस्थान ठेवले.


    सरकारांच्या विधानांना श्री. त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या ' पानिपत : १७६१ ' ग्रंथांत दुजोरा दिला आहे. म्हणजेच बुराडी घाटावर शत्रूसोबत एकाकी लढण्याचा जो प्रसंग दत्ताजी शिंद्यावर ओढवला, तो समजुतीच्या घोटाळ्यातून उद्भवला असला तरी राजवाड्यांसारखे लबाड, ढोंगी इतिहासकार ले. क्र. १५७ च्या आधारे दत्ताजीच्या मृत्यूचे माप होळकराच्या पदरात घालतात.


    बरं, त्या ले. क्र. १५७ मधील नानासाहेब पेशव्याची विधानं तरी त्यांनी सरळपणानं मांडावीत. तिथेही या मुजोर इसमाने चलाखी केली आहे. मूळ पत्रात वाक्यांचा क्रम " .. ऐशास अबदाली आला याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्याचा कारभार ठेऊन गेले तेच समयी राजश्री मल्हारजी होळकर यासहि सामील करून जावयाचे होते ते न केले  मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला ..." असा आहे. त्यातील ' ऐशास अबदाली आला याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्याचा कारभार ठेऊन गेले तेच समयी राजश्री मल्हारजी होळकर यासहि सामील करून जावयाचे होते ते न केले ' हा भाग त्यांनी चर्चेत घेतलाच नाही व ' मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला.. ' यावर आपल्या आरोपांची इमारत रचली आहे. परंतु जिथे पेशव्याला शिंदे - होळकरांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराची, किंबहुना बुराडी घाटचे युद्ध घडून गेल्याची मुळातच वार्ता नाही, तिथे या विधानांची किंमत ती काय ? ( ले. क्र. १५७ ची तारीख २९ जाने. १७६० अशी राजवाड्यांनीच निश्चित केलीय. )


     रियासतकार सरदेसाई तर याबाबतीत राजवाड्यांचे बाप ! त्यांना राजवाडे मंजूर व सरकार, शेजवलकरही !!

    त्यामुळेच मराठी रियासतीच्या एका पानावर होळकराने शिंद्याच्या मदतीला जाण्यास कुचराई केली म्हणायचं व दुसरीकडे तो निर्दोष असल्याचा खुलासा करत आपण मात्र नामनिराळं राहायचं. वर रियासतीच्या एका प्रास्ताविकात एक इतिहासकार म्हणून आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे याचे स्वमुखेंच गुणगान करण्यास रावबहादूर मोकळे !


     इतिहासकाराने इतिहासलेखन तटस्थ वृत्तीनबे करावे अशी जरी अपेक्षा असली तरी शंभर टक्के अशी तटस्थ वृत्ती कोणासही साध्य होत नाही. मात्र, पुरयांच्या मर्यादेत राहून इतिहासलेखन करणे तर तर शक्य आहे ना ? मग तरीही हे नामवंत, प्रतिष्ठित इतिहासकार असे वाहवत कसे गेले ? ज्यांनी आधुनिक इतिहास लेखनाचा पाया रचला त्यांनीच हा असत्य इतिहास लेखनाचा पायंडा का पाडावा ? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इतिहासकारांच्या मनावर जातीधर्माचे असलेले प्राबल्य. यामुळेच राजवाडे, सरदेसाई, शेजवलकर सारख्या वैदिक धर्मीय इतिहास्कारास पानिपतच्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी हिंदू धर्मातील एक बळीचा बकरा हवा होता, जो त्यांना मल्हारराव होळकराच्या रूपाने प्राप्त झाला. परंतु एकट्या होळकरास टार्गेट करणे सोयीस्कर जात नाही. म्हणून मग त्याच्या डोक्यावर रघुनाथरावास बसवत थोडे दोष त्याच्या पदरी बांधा. जरासे दत्ताजीच्या अभिमानी, अहंकारी वृत्तीचे उदात्तीकरण करा व नसलेल्या पुराव्यांच्या आधारे होळकरास बडवा असे बहुमुखी कार्यच या इतिहासकारांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी अवलंबिले आहे. अन्यथा ज्या भाऊ बखरीचा कर्ता अज्ञात आहे, ज्या बखरीत बव्हंशी मजकूर कल्पित आहे, घटना विपर्यस्त मांडल्या आहेत, ती तेवढी अधिक विश्वसनीय व ज्या बखरीचा कर्ता ज्ञात आहे, समकालीन कागदपत्रांचा आधार घेऊन ज्याने लेखन केलं आहे त्या रघुनाथ यादवची पाणिपतची बखर मात्र अधिक अविश्वसनीय हा पंक्तिप्रपंच राजवाड्यांनी आपल्या ' मइसा १७५० ते १७६१ ' च्या प्रास्ताविकात केला नसता. असो. कोळसा उगाळावा तितका काळाच असला तरी इतिहासाचे काही अंशी का होईना शुद्ध स्वरूप लोकांसमोर यावं यासाठी हे अप्रिय कार्य करणे तुम्हां - आम्हांला भाग आहे व ते आपणांस करावेच लागणार !


संदर्भ ग्रंथ :-

१) मराठी रियासत ( खंड ४ ) :- गो. स. सरदेसाई

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( १७५० पासून ते १७६१ ) :- वि. का. राजवाडे

३) Fall of the mughal empire vol. 2 :- Sir Jadunath Sarkar

४) विंचूरकर घराण्याचा इतिहास :- हरी रघुनाथ  गाडगीळ

५) पानिपत असे घडले :- संजय क्षीरसागर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: