बुधवार, ३ एप्रिल, २०१९

पानिपत ( भाग ४ )




    दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर मारला गेल्याची बातमी दख्खनमध्ये पेशव्याला समजली त्यावेळी निजामासोबतचा उदगीरचा संग्राम संपून तहाच्या वाटाघाटीही संपुष्टात आल्या होत्या. तह होताच रघुनाथरावास हिंदुस्थानच्या मोहिमेस पाठवण्याचे यापूर्वीच निश्चित झाले होते, परंतु दत्ताजीच्या वर्तमानाने राजकारण बदलले.
    पेशव्याने आपल्या दोन्ही भावांशी -- रघुनाथ व सदाशिव -- तसेच इतर सरदार, मुत्सद्द्यांशी सल्लामसलत करून हिंदुस्थानची मोहीम सदाशिवरावाचा हाती सोपवली.
    पानिपत मोहिमेच्या गूढ रहस्यास खरा आरंभ इथूनच होतो. नेमकं असं काय घडलं कि, ज्यामुळे रघुनाथरावास हिंदुस्थानच्या मोहिमेस पाठवण्याचे दि. १९ फेब्रुवारी १७६० रोजी पर्यंत निश्चित असताना, ता. १४ मार्च रोजी त्याजागी सदाशिवरावाची नेमणूक व्हावी ?

    भाऊची कैफियत, बखर वगैरे प्रकार रघुनाथाच्या अटक स्वारीतील कर्जाकडे निर्देश करतात. परंतु असं कर्ज झाल्याचं क्षणभर मान्य जरी केलं तरी दि. १९ फेब्रुवारी पर्यंत नाना - भाऊ दादालाच हिंदुस्थानात पाठवणार असल्याचे म्हणतात त्याची वाट काय ? म्हणजेच येथे मुलूखगिरीतील कर्ज हा मुळात मुद्दाच नाही.
    बखरकारांना कदाचित सत्य कारणांचे ज्ञान असावे अथवा असूनही त्यांना ते उघड करता येत नव्हते किंवा मग मुळातच त्यांना याबाबतीत काहीच माहिती नव्हते असेच म्हणावे लागते.
    ' पानिपत : १७६१ ' कर्ते शेजवलकरांनी, आपल्या ग्रंथात आलमगीर दुसरा याचा भाऊच्या नावे पाठवलेल्या खलित्याच्या मराठी सारांश दिला आहे. त्यानुसार खासा बादशाह पेशव्यास आपला मुख्य कारभारी म्हणून नेमण्यास उत्सुक असून वजीर गाजीउद्दीन विषयीची आपली नाराजी त्याने त्यात स्पष्ट दर्शवली आहे.
     दि. ८ ऑगस्ट १७५९ चा हा खलिता तत्कालीन दिल्ली दरबारच्या अंतर्गत राजकारणाचे पदर उलगडून दाखवणारा असला तरी हा खलिता पुण्यास नेमका केव्हा पोहोचला याची स्पष्टता होत नाही. त्याचप्रमाणे फर्मान पाठवणाऱ्या आलमगीरास गाजीउद्दीनने केव्हाच ढगात पाठवल्याने या फर्मानास काडीचीही किंमत उरली नव्हती.
    दि. १५ मार्च १७६० रोजी भाऊने गोविंदपंतास लिहिलेल्या पत्रात ' त्यास चिरजीव राजश्री दादानी यावे, परंतु तीर्थरुपांची आज्ञा आह्मीच जावे ही जाहाली. ' असे वाक्य आहे. यावरून पानिपत स्वारीस भाऊनेच जावे अशी पेशव्याचीच इच्छा असल्याचे स्पष्ट होते. मात्र यामुळे पेशव्याने रघुनाथाऐवजी सदाशिवाच्या हाती हिंदुस्थानच्या मोहिमेची सूत्रे का सोपवली याचा उलगडा होत नाही. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपणांस वेगळ्या मार्गाने शोधणे भाग आहे.

    पानिपत मोहिमेचे नेमके उद्दिष्ट काय होते ? या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाल्यास दादा ऐवजी भाऊची निवड का झाली, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते असे माझे मत आहे. तेव्हा प्रथम आपण पानिपत मोहिमेच्या उद्दिष्टांची चर्चा करू. 
    आजपर्यंत, पानिपत मोहीम अब्दालीच्या बंदोबस्ताकरता आखण्यात आली होती, हा इतिहासकारांनी प्रचलित केलेला गैरसमज आपण पानिपत मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणून मानत होतो. परंतु प्रत्यक्ष मोहिमेतील सदाशिवरावाचे वर्तन व त्याने पाठवलेली, त्याला आलेली उपलब्ध पत्रे पाहता पानिपत मोहिमेची मुख्य उद्दिष्टं म्हणजे (१) दिल्ली दरबारच्या मुख्य कारभाराची सूत्रे हाती घेणे, (२) रघुनाथरावाने आधीच्या स्वाऱ्यांत जी जी राजकारणं बिघडवली होती, ती दुरुस्त करणे, (३) शक्य झाल्यास बंगाल - बिहार प्रांती स्वारी करणे वा तशी तरतूद करून ठेवणे. यामध्ये कुठेही अब्दालीच्या बंदोबस्ताचा -- जरी अस्सल पत्रांत उल्लेख असला तरीही -- हेतू अजिबात नव्हता. याची साक्ष स्वारीतील भाऊच्या वर्तनातून मिळते.
     मोहिमेस निघाल्यापासून दिल्ली तसेच कुंजपुरा गाठेपर्यंत कुठेही त्याने आपल्या हालचालीत तडफ दाखवली नाही. उलट ज्या ढिलाईने तो दिल्ली तसेच कुंजपुऱ्यापर्यंत गेला ती पाहता अब्दालीच काय, दख्खनचा निजाम जरी असता तरी त्याने पानिपतावर भाऊला तसाच कोंडला असता, याबाबतीत माझ्या मनी अजिबात शंका नाही.

    हिंदुस्थान स्वारीस निघाल्यापासून भाऊने गोविंदपंताप्रमाणेच हिंदुस्थानात ठिकठिकाणी तैनात असलेल्या आपल्या कमावीसदारांना प्रस्तावित मोहिमेकरता रसद पुरवण्यासाठी आज्ञापत्रे पाठवण्याचा सपाटा लावला. पैकी, गोविंदपंताच्या नावची तेवढी इतिहास संशोधकांस प्राप्त झाली असून त्यावरून निघणारे मुख्य निष्कर्ष म्हणजे :- (१) भाऊसोबत पुरसे पायदळ नव्हते. त्याचप्रमाणे दारूगोळाही म्हणावा तितका नव्हता असे दिसते. (२) अब्दालीच्या गोटातील माहिती तो मागवतो, त्याच्याशी तहाच्या वाटाघाटी करतो, त्याच्यासोबत युद्ध करायची भाषा करतो परंतु याकरता मोहिमेचा वेग वाढवणे आवश्यक होते, ते मात्र प्रत्यक्षात दिसून येत नाही. (३) गोविंदपंताला त्याने इटाव्याजवळ नवा गोळा करून ठेवायला सांगितले. परंतु स्वतः वेगाने त्या प्रांताकडे तो कूच करताना दिसत नाही. (४) पावसाळा आरंभ होण्याची, तत्पूर्वी अब्दाली मायदेशी परतण्याची वाट बघत शक्य तितकी मोहीम रेंगाळत चालवण्याची तो खटपट करतो.
    तात्पर्य, स. १७५७ मध्ये रघुनाथाने अब्दालीसंबंधी स्वबुद्धीने म्हणा वा होळकराच्या शिकवणुकीने, जे धोरण स्वीकारलं होतं, त्याच धोरणाचा सदशिवाने यावेळी अंगीकार केला होता.

    भाऊच्या या वर्तनाची कारणमीमांसा नानासाहेब पेशव्याच्या राजकीय धोरणात मिळते. छ. शाहूच्या हयातीत नानासाहेब एकदा बंगालमध्ये फेरी मारून आला होता व त्याच वेळी बंगालची संपन्न, सुपीकता त्याच्या मनात भरली होती. परंतु बंगालचा प्रांत नागपूरकर रघुजी भोसल्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने व याच काळात रघुजीच्या त्या भागात मोहिमा सुरु असल्याने पेशव्याला आपला हात आवरावा लागला होता.
    पुढे शाहू व रघुजीच्या निधनानंतर बंगालमध्ये हात घालण्याची पेशव्यास संधी प्राप्त झाली. शिवाय, त्याच्या माथी जो राज्याच्या कर्जाचा बोजा होता, तो हलका करण्यासाठी अमाप द्रव्याची आवश्यकता असून याक्षणी बंगालकडून याची जितकी प्राप्ती होईल तितकी अन्य ठिकाणांहून होणार नाही, याची त्यांस कल्पना होती. यामुळेच स. १७५० नंतर तो दरवर्षी शिंदे, होळकर व रघुनाथास बंगाल्यात उतरण्याची आज्ञा करताना दिसून येतो.
    राजकीयदृष्ट्या पाहता पेशव्याच्या बेतांना अनुकूल अशीच तेथील परिस्थिती होती.
याच काळात इंग्रजांनी व्यापार सांभाळत राज्य कमावण्यास आरंभ केला होता. त्यांच्या व स्थानिक बादशाही अंमलदारांचा तंटा माजला होता. बादशाही अंमलदारांना यापूर्वीच नागपूरकरांनी वारंवार स्वाऱ्या करून खिळखिळे करत चौथाईच्या कक्षेत आणले होते. परंतु रघुजीच्या पश्चात त्याच्या मुलांमध्ये वारसा हक्क संघर्ष उद्भवल्याने त्यांना बंगालकडे लक्ष देण्यास फुरसत नव्हती. अशा स्थितीत एक मोठी फौज, प्रशासकीय कामकाजात मुरलेला अधिकारी व प्रसंगी इंग्रजांशी लढू शकेल अशी कवायती फौज.. हा सर्व जामानिमा बंगालकरता होता, नाहीतर आणिक कशासाठी !
     शिंदे - होळकरांनी केलेला बादशाही संरक्षक करार, होळकर - रघुनाथने केलेली पंजाब स्वारी या गोष्टी पेशव्याच्या मनाविरुद्ध घडून आल्या होत्या. त्याचा जीव बंगाल, काशी, प्रयागसाठी जितका झुरत होता तितका पंजाबसाठी नाही. यामुळेच त्याने सदाशिवाची या मोहिमेकरता निवड केली होती. अब्दालीसोबत झुंजण्याची खुद्द पेशव्याचीही इच्छा नव्हती.

    काही वर्षांपूर्वी नादीरशहा कदाचित दख्खनमध्ये उतरेल या भीतीने बाजीराव मोठी फौज घेऊन नर्मदेपर्यंत गेला होता. परंतु नानासाहेब बापाइतका उतावीळ, मूर्ख नव्हता. अब्दालीचे हितसंबंध पंजाबपुरतेच मर्यादित असल्याने त्याने त्या भागाकडे थोडेबहुत दुर्लक्षच केले. याबाबतीत त्याने सर्व जबाबदारी परस्पर सरदारांवरच सोपवलेली दिसते. दिल्ली दरबारातील घडामोडींकडेही त्याचे म्हणावे तसे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. अन्यथा स. १७८४ मध्ये महादजी शिंद्याने मिळवलेली वकील इ मुतलकी त्याला रघुनाथाच्या अटक स्वारीत किंवा तत्पूर्वीच प्राप्त झाली असती व त्यायोगे हिंदुस्थानातील समस्त सत्तांवर त्याचा शहही बसली असता. असो.
                                                                  ( क्रमशः )       

1 टिप्पणी:

D-hox-x म्हणाले...

तुमचे अनुमान पटत नाही. निनाद बेडेकर सर. यांचे पानीपत बद्दलचे अनुमान जास्त वास्तविक वाटतात