गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

पुन्हा एकदा कोरेगाव - भीमा !



    १) खडकी आणि येरवड्याच्या अनिर्णीत संग्रामांनंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने धावपळीच्या युद्धाचा मार्ग स्वीकारत जनरल स्मिथला अगदी रडकुंडीस आणले.

    २) स. १८१७ च्या डिसेंबर महिन्यात बाजीराव नाशिकच्या दिशेने गेल्याचे समजताच स्मिथ प्रथम शिरूरला गेला. त्याठिकाणी अनावश्यक जड सामान टाकून सड्या फौजांसह त्याने नाशिकचा रस्ता धरला पण प्रवरा नदीच्या काठी संगमनेर मुक्कामी त्यांस कळाले कि पेशवा ओझरच्या घाटाने पुण्याला निघून गेला आहे. तेव्हा त्याने फिरून ओझर मार्गे पुण्याचा रस्ता धरला. यावेळी पेशव्याच्या पिछाडीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्रिंबकजी डेंगळ्यावर असून त्याच्या पथकांनी स्मिथला शक्य तितके ओझरच्या घाटात अडवून धरले. परिणामी स्मिथ वेगाने पेशव्याच्या पाठीवर येऊ शकला नाही.

    ३) दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पेशवा चाकण मुक्कामी दाखल झाला.

    ४) पुण्यात यावेळी इंग्रजांची फौज अगदीच कमी असल्याने कर्नल बरने शिरूरच्या फौजेस आपल्या मदतीकरता बोलावले.

    ५) पुण्याहून मदतीचा संदेश येताच ता. ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री ८ च्या सुमारास कॅप्टन स्टाँटन पहिल्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीची दुसरी बटालियन, २ तोफा, २० - २५ गोरे गोलंदाज, २५० - ३०० मराठी घोडेस्वार घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला.

    ६) जनरल स्मिथ पाठीवर असल्याने चाकणला फार काळ मुक्काम न करता बाजीराव भीमेच्या काठाने साताऱ्याकडे निघाला. त्याची बरीचशी फौज टोळ्या टोळ्यांनी पुढे सरकत असताना ता. १ जानेवारी १८१८ रोजी सकळी ८ वाजता नदीपलीकडील कोरेगावच्या मैदानात इंग्रजी फौज नजरेस पडली.   

    ७) कोरेगाव जवळ मराठी सैन्य पाहताच स्टाँटनला थोडासा धक्का बसला. या ठिकाणी बाजीरावाशी लढण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्याने गडबडीने आपली पुढे आलेली फौज कोरेगावात मागे घेऊन गावच्या तटबंदीचा आश्रय घेतला.

    ८) जनरल स्मिथ केव्हाही पाठीमागून येण्याची शक्यता असल्याने पेशव्यालाही या स्थळी युद्धात गुंतणे परवडण्यासारखे नव्हते. त्याने बापू गोखल्यावर शत्रूशी लढण्याची जबाबदारी सोपवून सातारचा रस्ता धरला.

    ९) कोरेगावातील इंग्लिश फौजेचा पुरता संहार करण्याचे बापू व त्याच्या अरब पायदळाने शक्य तितके प्रयत्न केले. परंतु इंग्रजांच्या भक्कम बचावापुढे त्यांचे काही एक चालले नाही. अखेर रात्री ९ नंतर बापूने कोरेगावला भिडलेली आपली फौज मागे घेत जेजुरीमार्गे सातारची वाट धरली. मात्र काही तुकड्या त्याने जवळच लोणीकंद आणि वाघोली मुक्कामी ठेवल्या होत्या.

    १०) शिरूर ते कोरेगाव पर्यंतची सुमारे १२ तासांची वाटचाल आणि त्यानंतर लगेच रात्री ९ पर्यंत कराव्या लागलेल्या लढाईने स्टाँटनच्या फौजेची चांगलीच दमछाक झाली होती. त्यात भरीस भर म्हणजे मराठी सेना नदी पाठीशी घेऊन पुढे आल्याने त्यांना दिवसभर पाणीही मिळाले नव्हते.

    ११) ता. २ जानेवारी १८१८ रोजी जनरल स्मिथ चाकणला येऊन दाखल झाला. तेव्हा त्याच दिवशी रात्री स्टाँटनने शिरूरचा रस्ता धरला.

    १२) भीमा - कोरेगाव येथील लढाईत इंग्रजांनी आरंभापासूनच बचावाचा पवित्रा स्वीकारून गावच्या तटबंदीचा आसरा घेतल्याने मराठी फौजेला त्यांच्यावर थेट आक्रमण करणे शक्य झाले नाही.

    १३)  भीमा - कोरेगावची लढाई अनिर्णीत ठरण्यामागील प्रमुख कारणे म्हणजे, उभय पक्षांकडे असलेला बंदुकधारी पायदळाचा भरणा तसेच इंग्रजी सैन्याने गावातील घरांचा आश्रय घेऊन लढा देणे हि होय. स्टाँटनची फौज जर खुल्या मैदानात बापूच्या तावडीत सापडली असती तर कदाचित त्यांची सरसकट कत्तल उडाली असती. पण प्रथम गावची तटबंदी आणि नंतर गावातील घरांचा आसरा घेऊन स्टाँटनने मोठ्या शिकस्तीने आपला बचाव साधला.  



संदर्भ ग्रंथ :-
(१) मराठी रियासत खंड - ८ :- गो. स. सरदेसाई
(२) सरदार बापू गोखले :- सदाशिव आठवले
(३)  मराठ्यांची बखर :- ग्रांट डफ ( मराठी अनुवादित ६ वी आवृत्ती )
(४) मराठ्यांच्या लढायांचा इतिहास :- शि. म. परांजपे


* प्रस्तुत विषयावर यापूर्वी लिहिलेल्या दोन लेखांची लिंक देखील सोबत देत आहे.

 (१) भीमा - कोरेगावची अनिर्णीत लढाई ( १ जानेवारी १८१८ ) 

http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/06/blog-post.html

 (२)  भीमा - कोरेगावची लढाई अनिर्णीत असल्याचा ब्रिटीशलिखित अस्सल पुरावा !

 http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/07/blog-post_5729.html

३ टिप्पण्या:

आर्यधर्म म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
sanjay kshirsagar म्हणाले...


vinod marathe,
तुमच्या प्रतिक्रियेवर काय मत व्यक्त करावं हेच मला समजत नाही. परशुराम, शंकराचार्य, हिंदू राष्ट्र, ब्राम्हण एकीकरण …. एकापेक्षा एक विनोदी तारे तुम्ही तोडले आहेत कि परस्परविरोधी संकल्पना तुम्ही मांडत आहात हेच कळत नाही. त्यातही कमेंट विषयाला अगदीच धरूनही नाही. असो, वाचकाचं मत स्वातंत्र्य अबाधित ठेवत आहे. इतकेच !

आर्यधर्म म्हणाले...

विषयास अप्रस्तुत कमेंट लिहिली .त्याची आवश्यकता नव्हती .असो,आपण खूप वास्तव व अभ्यास पुर्ण लिहिता ,आपल्या विचाराशी मी सहमत आहे.मी अध्यात्मिक अंगाने विचार करतोय त्यामुळे असं होतं आज ब्राह्मण विरोधात खुप काही लिहिले जाते व सरसकट सर्वच ब्राह्मणांना दोष देणे अयोग्य आहे .आपण स्पष्ट व चांगले लिहिता त्याबद्दल धन्यवाद !