शाहू मोगली कैदेतून सुटून
दक्षिणेत परतला त्यावेळी भोसल्यांचे राज्य थोडेफार नावालाच अस्तित्वात होते.
ताराबाईने आपला मुलगा शिवाजी यांस राज्यपदी बसवून त्याच्या नावे राज्यकारभार
आपल्या हाती घेतला होता. जवळपास २० – २५ वर्षे चाललेल्या युद्ध – मोहिमांनी खजिना
संपुष्टात आलेला, बव्हंशी भूप्रदेश व किल्ले मोगलांकडे अथवा नाममात्र
स्वराज्यसेवेत दाखल असलेल्या सरदार – गडकऱ्यांकडे होते. ताराबाईच्या हाती थोडाफार
फौजफाटा, काही विश्वासू मंत्री – सरदार व महत्त्वाचे काही किल्ले राहिले होते
इतकेच. या बळावर तो मोगलांशी लढत होती. परंतु केवळ ती एकटी वा तिचे मुठभर सहाय्यकच
या लढ्यात सहभागी होते का ?
इतिहासकारांच्या मते शाहूचे
आसन दक्षिणेत स्थिर झाल्यावर तसेच सय्यदांच्या मार्फत त्यांस चौथाई, सरदेशमुखी
वगैरेंचे हक्क मिळाल्यावर बाळाजी विश्वनाथ व इतरांच्या सहाय्याने त्याने राज्याची
वाय्वस्था लावली. त्यांस पुढे मराठ्यांचा राज्यसंघ अथवा Maratha Confederacy हे नाव / संज्ञा
प्राप्त झाले. परंतु मराठा सरदारांचा संघ शाहू दक्षिणेत येण्यापूर्वीच निर्माण
झाल्याचे इतिहासकारांनी लक्षात घेतल्याचे दिसून येत नाही. मराठा सरदारांचा हा राज्यसंघ
थोडासा विस्कळीत असला तरी गादीवर कोणता छत्रपती बसवायचा हे ठरवण्याइतपत निश्चितच
प्रभावी होता व याची प्रचीती ताराबाई – शाहू झगड्याच्या निमित्ताने आली.
शिवाजीने निर्मिलेल्या
राज्यावर ताराबाई व शाहू दोघेही सारखाच हक्क सांगत होते. परंतु दोघांची भूमिका थोडी
वेगळी होती. शाहू आपला थेट वंशपरंपरागत हक्क मागत होता तर ताराबाईच्या मते शिवाजी
निर्मित राज्य संभाजीच्या सोबत नष्ट झाले. सध्या जे काही राज्य आहे ते तिच्या
पतीने --- राजारामाने कमावलेलं आहे. सबब शाहूचा यावर अधिकार पोहोचत नाही.
न्याय्यदृष्ट्या ताराबाईचे म्हणणे बरोबर होते परंतु, शाहूचा वारसा हक्कही अयोग्य
असल्याचे म्हणवत नव्हते. अशा स्थितीत, उभय पक्ष वर्दळीवर येणे स्वाभाविक असून या
लढ्यात जो विजयी होणार त्यालाच राज्याचा लाभ होणार हे स्पष्ट होते. ताराबाईच्या
तुलनेने शहूची सर्वच बाबतीत हलाखी असल्याने त्याने आपले बळ वाढवण्याकरता चुलत्याने
निर्माण केलेल्या सरदारांना आपल्या पक्षात वळवण्याची शिकस्त केली. औरंगजेबाशी
समर्थपणे लढा देता यावा म्हणून राजारामाने मराठी सरदारांना जहागीर, सरंजाम, वतनं
तोडून देण्यास आरंभ केलेलाच होता. व कित्येक सरदारांनी त्या त्या प्रांतातून
मोगलांना पिटून आपला हक्कही स्थापित केला होता. त्या सरदारांनी स्वपराक्रमाने
कब्जात घेतलेल्या प्रांताला राजा म्हणून शाहूने मान्यता देत त्या प्रदेशावरील
त्यांचे स्वामित्व मान्य केले. त्या बदल्यात या सरदारांनी शाहूला आपला राजा
मानायचे होते.
याबाबतीत शाहूला बऱ्यापैकी
यश आले आणि खेडच्या लढाईत त्यांस विजय प्राप्त होऊन ताराबाईच्या पक्षाचा पराभव
झाला. अशा प्रकारे शाहू हाच शिवाजीच्या राज्याचा वारस ठरून तो अभिषिक्त राजा बनला.
( ता. १२ जानेवारी १७०८ )
खेडच्या लढाईत व तत्पूर्वी
मराठी सरदारांनी ताराबाईचा जो विश्वासघात केला त्याची म्हणावी तशी अजून चर्चा
झालेली नाही. त्याचप्रमाणे आयत्या वेळी धनाजी जाधवाने जो पक्षबदल केला त्याचेही
कोडे उलगडलेले नाही. शाहू व ताराबाई यांची खेडच्या संग्रामापुरती तुलना करता मराठी
सरदारांनी शाहुचीच राजा म्हणून निवड का केली असा प्रश्न पडतोच.
शाहूचे कर्तुत्व अद्याप
कोणास माहिती नव्हते. फक्त राज्यसंस्थापक शिवाजीचा थोरला नातू व संभाजीचा पुत्र
याखेरीज त्याच्या पदरी पुण्य नव्हते. त्याउलट राजारामाच्या पश्चात पाच सात वर्षे
ताराबाईने औरंगजेबाशी युद्ध खेळून आपली कर्तबगारी सिद्ध केली होती. मग सरदारांनी शाहूचा
पक्ष का स्वीकारला ? सरदारांनी जिंकलेल्या प्रदेशांवरील त्यांचा ताबा शाहू मान्य करत
होता म्हणून ? मग तसा ताराबाईही करत होतीच कि. नाहीतर राजारामाच्या पश्चातच सर्व
खेळ आटोपला असता. त्यामुळे हे कारण संभवत नाही.
शाहू हाच राज्याचा खराखुरा
अधिकारी असल्याने सरदार त्याच्या पक्षास मिळाले असे म्हणावे तर खेडची लढाई तोंडावर
असताना सेनापती धनाजी जाधव शाहूच्या पक्षात प्रवेश करतो याला काय म्हणायचे ? अशी
कोणती जादू घडली कि लढाईच्या काही काळ आधी धनाजी जाधवाला साक्षात्कार होऊन त्याने
शाहूचा पक्ष स्वीकारला ?
ताराबाईचा मुलगा शिवाजी हा
अल्पवयीन असून शिवाय शारीरिकमर्यादांमुळे राज्यकारभार पाहण्यास, सांभाळण्यास तो
असमर्थ होता. अर्थात, ताराबाई आपल्या अखेरपर्यंत शिवाजीची पालक म्हणून राज्यकारभार
पाहणार होती हे उघड आहे. कदाचित याच कारणाने मराठी सरदार बिथरले नसावेत ? कि,
शाहूच्या पक्षाला असलेला मोगलांचा पाठिंबा त्यांनी लक्षात घेतला होता ? कारण,
छत्रपती कोणीही असले तरी मोगल सत्ता सार्वभौम असल्याने जिंकलेल्या प्रदेशावरील
अंमलास, वतनांस मोगल बादशाहची मान्यता मिळाल्याखेरीज ते कायदेशीर नसल्याचे
मानण्याचा तो काळ होता. ती समजूत होती. कारण काहीही असो, पण मराठी सरदारांच्या
संघाने ताराबाईऐवजी शाहूच्या पारड्यात आपले वजन टाकून शाहूला छत्रपती बनवले.
खेडचा पराभव व धनाजी जाधव
सहित प्रमुख मराठी सरदारांच्या फितुरीने ताराबाई डगमगली नाही. तिने पन्हाळा हाताशी
धरून कोल्हापुरास नवीन राज्याची उभारणी करून आपल्या कर्तुत्वाची स्वपक्षीयांना
चुणूक दाखवली.
राज्य हाती आल्यावर शाहूसमोर
तीन प्रश्न होते, कार्ये होती :- (१) मोगलांच्या ताबेदारीत राहून राज्य साधण्याचा
त्याचा मोगल शाहझादा आझमशी तोंडी करार झाला होता. ताराबाईशी झालेल्या
सत्तासंघर्षात विजय मिळाल्यावर प्रांतात आपला अंमल मोगलांशी लढून बसवणे वा
त्यांच्याशी वाटाघाट करून हा प्रश्न सोडवणे हे दोन पर्याय उपलब्ध होते. (२) फौजबंद
मराठी सरदारांवर नियंत्रण आणणे आणि (३) ताराबाईसोबतचा संघर्ष अल्पावधीत मिटवणे.
पैकी, मोगलांशी त्यांस कधी
लढून तर कधी वाटाघाटी करून आपला मुलुख सोडवावा लागला. याकामी नागपूरचे भोसले,
बाळाजी विश्वनाथ, दाभाडे सारखे निष्ठावंत अनुयायी त्यांस सहाय्यक बनले. फौजबंद
सरदारांचा प्रश्न त्याने थोड्याशा कामचलाऊ मुत्सद्देगिरीने सोडवला. प्रत्येकाने
जिंकलेला भूप्रदेश त्यांस बक्षीस म्हणून बहाल करत वर नव्याने भूप्रदेश संपादण्यास
त्याने प्रोत्साहन दिले. बदल्यात त्या सरदाराने शाहूच्या अंकित राहायचे होते.
उत्पन्नातील विशिष्ट एक भाग त्यांस शाहूला द्यायचा होता. या गोष्टीमुळे शाहू व
सरदारांचा परस्पर फायदाही झाला व तोटा देखील !
फायदा असा कि, सरंजाम –
जहागीर प्राप्तीसाठी मराठी सरदार प्रेरित होऊन त्यांनी आपल्या पराक्रमांनी झपाट्याने
राज्यविस्तार करण्यास आरंभ केला. उदा :- गुजरात प्रांत दाभाड्याकडे शाहूने दिला.
याचा अर्थ तो प्रदेश दाभाड्यांनी शाहुच्या वतीने कब्जात घ्यायचा होता व त्यापुढेही
शक्य झाल्यास आपल्या --- म्हणजेच पर्यायाने शाहूच्या --- सत्तेचा विस्तार करायचा
होता. मराठी राज्याचे साम्राज्यात जे अल्पावधीत रुपांतर झाले ते याच योजनेमुळे !
शाहूची ताबेदारी सरदारांनी
स्वीकारल्याने त्यांचाही थोडाबहुत फायदा झाला. शाहूला मोगलांचा थोडाफार पाठिंबा
असल्याने ते आता बंडखोर अजाचे चाकर राहिले नव्हते. तसेच पूर्वीप्रमाणे एकट्याने
संकटात उडी घेण्याचे प्रसंग बाजूला राहून बिकट समयी मदतीसाठी शाहू व इतर सरदारांवर
विसंबताही येत होते. एकूण परस्परांच्या फायद्याची हि स्थिती असली तरी तिचा तोटा
असा कि, जोवर पराक्रमासाठी अनिर्बंध क्षेत्र उपलब्ध आहे तोवर हे सरदार नियंत्रणात
राहणार होते. एकदा हे क्षेत्र संपले वा सत्ता विस्तारास अडथळा आला अथवा एकाच
क्षेत्रात दोन सरदारांचा संचार झाला तर काय, याविषयी फारसा विचार केल्याचे दिसून
येत नाही. पुढे – मागे मराठी सरदारांचे आपसांतच जे खटके उडाले त्यामागील
कारणांपैकी हे देखील एक कारण असल्याचे लक्षात घ्यावे.
मोगलांच्या आपसांतील
तंट्याचा --- वारसा युद्धाचा उपयोग करून घेत शाहूने शिवाजीच्या राज्याचे आपणच
कायदेशीर वारसा असल्याबद्दल त्यांच्याकडून लेखी मान्यता मिळवत दक्षिणच्या सहा
सुभ्यांतील चौथाई वसुली व सरदेशमुखी हक्काच्या सनदा मिळवून आपले आसन बळकट केले. तिकडे
ताराबाईच्या विरोधात तिच्या सवतीने --- राजसबाईने कट रचून तिला पुत्रासह कैदेत
घालून आपल्या मुलाला --- संभाजीला करवीरच्या तख्तावर बसवले. कोल्हापूरच्या या
राज्यक्रांतीमुळे काही काळ शाहूला निश्चिंती मिळून त्यांसही आपला जम बसवण्याची
संधी प्राप्त झाली. अर्थात, पुढे शाहू सोबत संभाजीने काही काळ तंटा चालवून पाहिले.
परंतु, मधल्या काळात शाहूने स्वीकारलेल्या धोरणांनी त्याचा पक्ष भलताच बळावल्याने
संभाजीने निरुपायाने दख्खन सुभेदार निजामाच्या पंखाखाली जाणे पसंत केले. अर्थात,
यावेळी कोल्हापूरकरांना आपले राज्य कर्नाटकांत वाढवण्याची अत्युत्तम संधी होती.
परंतु तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपले सर्व लक्ष सातारकडे केंद्रित केल्याने
त्यांच्या राज्यास विस्तारण्याची नंतर संधीच राहिली नाही !
बाळाजी विश्वनाथच्या हयातीत
शाहूने प्रत्येक सरदाराला, प्रधानाला विशिष्ट कार्यक्षेत्र नेमून दिल्याने या
काळात सर्वत्र मराठी सैन्याच्या चढाया झाल्याचे दिसून येतात. वर्षानुवर्षे जिथे
अस्थिरता होती, ज्या प्रदेशांत मोगलांनी नुकतेच आपले वर्चस्व स्थापित केले होते
त्या – त्या ठिकाणी मराठी सरदारांनी वेगाने मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण करत
मोगलांना हुसकून लावले. अपवाद दख्खनच्या निजामाचा !
स. १७२४ च्या उत्तरार्धात
साखरखेडल्याच्या लढाईत निजामाने बादशाही पक्षाच्या मुबारीझखानाचा नाश करून
दख्खनमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. दोन बलिष्ठ मोगल सरदारांच्या या लढ्यात
शाहूने आपले वजन निजामाच्या पारड्यात टाकल्याने त्यांस हि लढाई सुलभतेने जिंकता
आली. हि लढाई होण्यापूर्वी दक्षिणेत स्वतंत्र होण्याचा निजामाचा विचार असल्याचे
सर्वांनाच कळून चुकले होते. परंतु, असे असूनही काही एक धोरणाने शाहूने निजामाचा
पुरस्कार केला. मात्र पुढील घटनाक्रम व परिणाम पाहता शाहूने चुकीच्या पक्षाला आपला
पाठिंबा देऊ केला असेच म्हणावे वाटते. असो.
दक्षिणेतील आपल्या मोगल
प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढल्यावर निजामाने राज्यविस्ताराचे कार्य हाती घेतले.
शाहू – संभाजीच्या तुलनेने संभाजी दुर्बल असल्याने त्याने संभाजीस आपल्या बरोबर
घेत शाहूला विरोध करण्यास आरंभ केला. शाहूची सर्व शक्ती त्याच्या सरदारांत
असल्याने या सरदारांसही त्याने शाहूपासून फोडण्याचे प्रयत्न चालवले. यात त्यांस
थोडेफार यश आले तर काहींच्या विषयी शाहूच्या मनात संशय निर्माण करण्यात त्याने
अल्पकाळ यश मिळवले.
स. १७२८ मध्ये बाजीरावाने
निजामाला पालखेडास पराभूत करून त्याचे डाव हाणून पाडले. खेरीज शाहूला दक्षिणच्या
सहा सुभ्यांतून चौथाई – सरदेशमुखीचे हक्क वसूल करून घेण्याचा अधिकार असल्याचे
मान्य केले.
पालखेडच्या यशाने दक्षिणेत
शाहूच्या सत्तेला अनिर्बंध संचाराचे क्षेत्र मिळाले असले तरी मुलूखगिरीच्या
विशिष्ट तत्वांनी, कारणांनी याच काळात शाहूचे सरदार परस्परांच्या उरावर
व्बास्न्याचा योग जुळून आला होता.
पालखेड युद्धापूर्वी पेशवा
खानदेशात आपला जम बसवत तसाच पुढे माळव्यात निघून गेला होता. शाहुनेच त्यांस
खानदेशाचे कार्यक्षेत्र नेमून दिल्याने आपल्या टापूत आपली सत्ता बसवणे हे त्याचे
उद्दिष्ट होते. याकरता त्याने आपल्या पदरीचे काही सरदार त्या भागात नेमले होते तर
त्या प्रदेशांतील काही एकांड्या शिलेदारांना जवळ बाळगून त्यांना सरदारी दिली होती.
जे धोरण शाहूने आपल्या सरदारांच्या बाबत स्वीकारले होते तेच धोरण सरदारांनी ही
मुलूखगिरीसाठी अंमलात आणले. कारण, मोठमोठ्या फौजा पदरी बाळगून विविध ठिकाणी स्वतःच
मोहिमेवर जाणे हे त्याकाळी देखील एका माणसाचे काम नव्हते व आजही !
कदम बांडे, होळकर, शिंदे,
पवार, जाधव प्रभूती सरदार खानदेश भागात पेशव्याच्या वतीने अंमल बसवत तसेच पुढे
माळव्यात शिरले. माळवा बराच काळ जरी मोगलांच्या अंमलाखाली राहिला असला तरी तेथील
जनतेला या राजवटीविषयी फारशी आपुलकी नसल्याने, तसेच स्थानिक जमीनदार मंडळी
मोगलांना अनुकूल नसल्याने त्यांनी मोगलांशी संघर्ष पुकारत मदतीसाठी जयपूरच्या सवाई
जयसिंगाकडे धाव घेतली. यावेळी माळवा ताब्यात घेण्याची जयसिंगाची मोठी हाव होती
परंतु, दरबारातील विरोध व स्वबळ लक्षात घेऊन त्याने माळव्यातील जमीनदारांना मराठी
सरदारांचा आश्रय घेण्याची सूचना केली. पर्यायाने माळव्यातील लहान – मोठे जमीनदार
होळकर, जाधव, पवार प्रभूती सरदारांना अनुकूल झाल्याने त्यांच्या मदतीने चिमाजी
आपाने माळव्यावर स्वारी करून तिथे आपली सत्ता स्थापली.
माळव्यातील कित्येक
मंडळींना मोगलांऐवजी मराठी सरदारांची ताबेदारी मानवली तर कित्येकांना नाही.
अनेकांना तर स्वतंत्र सत्ता स्थापण्याची महत्त्वाकांक्षा होती. परिणामी, मराठी सरदारांना
त्या प्रदेशांत आपली सत्ता दृढ करण्यास बराच काळ जावा लागला.
इकडे बाजीरावाची घोडदौड
माळव्यात सुरु असताना दाभाड्याने गुजरातमध्ये आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास
सुरवात केली होती. गुजरातचे कार्यक्षेत्र खुद्द शाहुनेच दाभाड्याला नेमून दिले
असले तरी गुजरातमधील निम्मा मोकासा चिमाजी आपास व निम्मा दाभाड्यास शाहूने देऊ
केला. परिणामी, गुजरातमध्ये आपले हात – पाय पसरण्यास बाजीरावालाही निमित्त मिळाले.
वास्तविक हा हक्क ज्यावेळी चिमाजीस मिळाला तेव्हा माळवा पेशव्याच्या ताब्यात आला
नव्हता तसेच निजामाचाही बंदोबस्त घडून आला नव्हता. ( स. १७२६ ) अशा स्थितीत दाभाडे
– पेशवे काळगत होणे स्वाभाविक होते.
दरम्यान पालखेडावर
पेशव्याने निजामाला चेपून पाठोपाठ माळवाही ताब्यात घेतला होता तर तिकडे गुजरातवर दाभाड्यांनी
निम्म्याहून अधिक भागत आपला अंमल बसवत आणला होता. मधल्या काळात शाहूने आपली चूक
सुधारण्यासाठी चिमाजीकडील निम्मी गुजरात काढून सेनापती दाभाड्यास देत वादावर पडदा
टाकण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु हि गोष्ट उभय पक्षांच्या मनाला लागून राहिली ती
राहिलीच.
माळवा – गुजरातची नैसर्गिक
अशी काही हद्द नसल्याने उभयतांचे हस्तक परस्परांच्या मुलखावर ताव मारू लागले. अशा
चकमकींनी प्रकरण चिघळत जाऊन दाभाड्यांनी पेशव्याचा नाश करण्यासाठी निजामाची मदत
घेतली. यावेळी निजाम देखील पेशव्याच्या बंदोबस्तासाठी उत्सुक असल्याने त्यानेही दाभाड्यांना
मदतीचा हात देऊ केला. खेरीज याच सुमारास बुंदेलखंडात बाजीरावाने झोडपलेला महंमदखान
बंगश माळव्याच्या सुभेदारीवर नियुक्त होऊन आला होता. दख्खनचे मराठे व निजाम या दोघांच्या
बंदोबस्ताची बादशाहने बंगशला आज्ञा केली होती. परंतु, बंगश व निजामाचे अंतस्थ सख्य
असून बंगशच्या भेटीसाठी निजाम स्वतः नर्मदेजवळ आला. उभय मोगली उमरावांची भेट होत
असतानाच बाजीरावाने तातडीने गुजरातमध्ये जाऊन डभई येथे दाभाड्याशी झुंज घेतली. या
संग्रामात सेनापती त्रिंबकराव दाभाडे मारला गेला. त्याची फौज उधळली. यापलीकडे बाजीरावाच्या
हाती काही लागले नाही. शाहूने दाभाडे – पेशव्याचा समझोता घडवून आणत उभयतांच्या
हद्दी काटेकोरपणे ठरवून देत परस्परांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याची
ताकीद दिली.
यावेळी दाभाडे निजामाला
मिळून राज्यद्रोह करत असल्याची ओरड जरी पेशवे मंडळींनी केली असली तरी त्यात फारसे
काही तथ्य नाही. निजामाशीच काय पण कोणत्याही मोगल उमरावाशी पेशव्यांनीही अनेकदा
जवळीक केली आहे. तेव्हा मात्र ते राज्यद्रोही नाही बनले ?
डभईच्या लढाईने दाभाड्यांचा
गुजरातमधील प्रभाव ओसरला पण त्यांच्या पदरी असलेल्या पिलाजी गायकवाडाने आपल्या
पक्षाचा जम बसवण्याची अतोनात धडपड केली. या समयी त्याचा झगडा मारवाडच्या
अभयसिंगाशी जुंपला. मोगल बादशाहने त्यांस गुजरातचा सुभेदार म्हणून नेमले होते.
अभयसिंगाने हरतऱ्हेने गायकवाडास वेसन घालण्याचा प्रयत्न करून पाहिले मात्र, अंती
विश्वासघाताने खून करण्यावरच त्यांस समाधान मानावे लागले. मात्र यामुळे त्याचे
गुजरातमध्ये आसन स्थिर न होता दाभाडे तसेच पिलाजीच्या कुटुंबियांशी मिळते – जुळते घेऊन
त्याने आपल्या राज्यात प्रयाण केले. यानंतर गुजरातमध्ये दाभाड्यांच्या वतीने गायकवाड
सर्व व्यवहार उलगडू लागले.
स. १७२९ आरंभी चिमाजी
माळव्यात आपला अंमल स्थापित करत होता त्याच वेळी छत्रसालच्या मदतीसाठी बाजीराव
बुंदेलखंडात गेला होता. महंमदखान बंगशपासून त्याने छत्रसालचा बचाव केला. बदल्यात
छत्रसालाने काही एक उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याला जहागीर म्हणून बहाल केला. ( स.
१७३१ ३३ दरम्यान ) अशा प्रकारे माळव्यासोबत पेशव्याला बुंदेलखंडाचे कार्यक्षेत्र उपलब्ध
झाले. या दोन्ही प्रदेशांत त्याचे वर्चस्व लगोलग स्थापित झाले नाही. याचे कारण, स्थानिक
महत्त्वाकांक्षी मंडळी होय !
ज्याप्रमाणे दख्खनचे मराठे
हे येथील भूमिपुत्र व मोगल परकीय तद्वत माळवा – बुंदेलखंडात तेथील लोक भूमीपुत्र
तर मराठे परकीय. त्यामुळे असे होणे स्वाभाविक होते. खेरीज माळवा – बुंदेलखंड हा जो
प्रदेश आता पेशव्याला आपल्या राज्यविस्तारासाठी उपलब्ध झाला होता, तो बहुसंख्य
हिंदू संस्थानिकांचा असल्याने आता हा परधर्मियांशी नाही तर स्वधार्मियांशीच झगडा
होणार होता. व भविष्यात झालेही तेच !
इकडे वऱ्हाड, नागपूर प्रांत
आपल्या ताब्यात घेत नागपूरकर भोसलेही आता उत्तरेकडे वळला होता व बाजीरावाच्या
बुंदेलखंडातील प्रवेशामुळे उभयतांचे संचारक्षेत्र एकच बनल्याने त्यांचाही झगडा
जुंपण्याचा संभव दिसू लागला होता. परंतु, दोघांनीही आपसांतील संघर्ष हस्तकांमार्फतच
चालवून होता होई तो परस्परांशी उघड लढा टाळला.
उत्तरेत पेशव्याचे वर्तन
असे होते तर दक्षिणेत थोडे वेगळे. मुलूखगिरीसाठी प्रदेश वाटून देताना कोकण आंग्रेकडे,
कर्नाटक फत्तेसिंग भोसले – प्रतीनिधीनाकडे शाहूने नेमले होते. परंतु, कर्नाटकांत
जेव्हा प्रथम त्याने आपले सैन्य धाडले तेव्हा बाजीरावासही त्याने सैन्याची सोबत
करण्याचे आदेश दिले. अर्थात, कर्नाटक प्रतिनिधीचा प्रदेश असल्याने तसेच अधिकारात
प्रतिनिधीचा दर्जा पेशव्याहून मोठा असल्याने उभयतांचे या स्वारीत फारसे पटलेही
नाही व मोहीमही म्हणावी तशी यशस्वी झाली नाही. तरीही फिरून परत एकदा शाहूने आंग्रे,
पेशवे, प्रतिनिधी इ. अष्टप्रधान मंडळी तसेच कित्येक सरदारांना जंजिऱ्याच्या
मोहिमेवर धाडले. याही मोहिमेत सर्वच प्रधान – सरदारांनी परस्परांच्या चुरशीने
अंगचोरपणा करून मोहीम रेंगाळत ठेवण्यात धन्यता मानली. बाजीरावाने संधी मिळताच जंजिरा प्रकरणातून आपले
अंग काढून घेतले. तेव्हा इतरांच्या साथीने शाहूने जंजिऱ्याचे प्रकरण जसे – तसे सिद्धीस
नेले.
जंजिरा मोहिमेतील मर्यादित
यश – अपयशास मुख्य कारण म्हणजे शाहूची युद्धस्थळावरील अनुपस्थिती ! वास्तविक धनी
शाहू असता व तो साताऱ्यास नुसताच बसून राहिला असता जवळपास पद – प्रतिष्ठेने सारख्याच
असणाऱ्या प्रधानांचा असा झगडा जुंपणे स्वाभाविक होते. खासा छत्रपती या मोहिमेत
सहभागी झाला असता तर हि चुरस बंद पडली असती. परंतु शाहूच्या शाहूच्या
निष्क्रियतेने प्रधानांनी परस्परांचे पाय खेचण्यात धन्यता मानली. सुदैव इतकेच कि,
मोगलांच्या सारखा त्यांनी गळेकापूपणा केला नाही !
प्रतिनिधी, फत्तेसिंग व
पेशव्याला कर्नाटकांत म्हणावे तसे यश न आल्याने शाहूने पुढे कर्नाटकांत पेशव्याचा नातलग
बाबूजी नाईक यांस व नागपूरच्या रघुजी भोसल्यास रवाना केले. या दोघांनी कर्नाटकांत
बऱ्यापैकी मुसंडी मारली खरी पण दरम्यान बाजीरावाचे निधन झाल्याने पेशवेपदावर
कोणाला नेमायचे हा प्रश्न उद्भवल्याने रघुजी मोहीम अर्धवट सोडून मागे फिरला.
बाळाजी विश्वनाथ मेल्यावर
पेशवेपदी कोणाला नेमायचे हा प्रश्न शाहुपुढे उभा राहिला नव्हता. पूर्वपरंपरेनुसार
पदाधिकारी व्यक्तीचा मुलगा / नातलग वयातीत असल्यास त्याची नियुक्ती करणे व त्यांस
कर्तुत्व दाखवण्याची संधी देणे या नियमास स्मरून शाहूने बाजीरावास पेशवाई दिली
होती. परंतु आताची स्थिती निराळी होती.
स. १७०७ मध्ये शाहूच्या राज्याचा
विस्तार फार मोठा नव्हता. किंवा असेही म्हणता येईल कि, पेशव्याच्या सत्तेचा फैलाव
झाला नव्हता. परंतु, स. १७४० चे चित्र वेगळे होते. पेशव्याची सत्ता गुजरात आणि
वऱ्हाड दरम्यान माळवा – बुंदेलखंडांत विस्तारली होती. पेशव्याचे कित्येक मोठमोठे फौजबंद
सरदार या प्रदेशांत वावरत होते. पेशवेपद म्हणजे हे सरदार, सत्तेचा ताबा मिळवण्यासारखे
होते. रघुजी भोसल्याने पेशवेपदासाठी बाबूजी नायकाचे नाव सुचवून पेशव्याची सत्ता,
राज्य ताब्यात घेण्याची धडपड करून पाहिली. परंतु, मृत बाजीराव पेशव्याची अमर्याद
लष्करी ताकद यावेळी चिमाजी आपाच्या हाती असल्याने नायकास पेशवाई दिल्यास राज्यात
दुही माजण्याचा प्रसंग उद्भवेल व पूर्वपरंपरेचा भाग म्हणून शाहूने बाजीरावपुत्र
बाळाजी बाजीरावास पेशवाई दिली.
( क्रमशः )
संदर्भ ग्रंथ :-
१)
छत्रपती शिवरायांची अस्सल
पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)
ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स.
सरदेसाई
३)
काव्येतिहास संग्रहांत
प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या.
मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)
मराठी रियासत ( खंड १ ते ८
) :- गो. स. सरदेसाई
५)
मराठ्यांची लष्करी व्यवस्था
:- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)
मराठेशाहीतील वेचक – वेधक
:- य. न. केळकर
७)
भूतावर भ्रमण : ऐतिहासिक
लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)
काही अप्रसिद्ध ऐतिहासिक
चरित्रे :- य. न. केळकर
९)
नाना फडनवीस यांचे चरित्र
:- वा. वा. खरे
१०)
मराठ्यांच्या इतिहासाची
साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)
मराठी दफ्तर रुमाल पहिला
(१) :- वि. ल. भावे
१२)
मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :-
वि. ल. भावे
१३)
फार्शी – मराठी कोश :-
प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)
मराठ्यांच्या इतिहासाची
साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)
दिल्लीच्या शहाजहानचा
इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)
छत्रपती शिवाजी :- सेतू
माधवराव पगडी
१७)
ताराबाई – संभाजी ( १७३८ –
१७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)
ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर
( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)
पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :-
कृ. वा. पुरंदरे
२०)
नागपूर प्रांताचा इतिहास :-
या. मा. काळे
२१)
सरदेसाई स्मारक ग्रंथ :-
श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)
मराठी सत्तेचा उत्कर्ष :-
न्या. महादेव गोविंद रानडे
२३)
शिंदेशाही इतिहासाची साधने,
भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके
1 टिप्पणी:
पानीपत प्रमाणे येथे पन वेगळा पहान्याचा दृष्टिकोन दिसतो
मागे बोल्या प्रमाणे 1680 ते 1761 किवा 1818 पर्यन्त एक पुस्तक लिहिन्याचा जरूर विचार करा
टिप्पणी पोस्ट करा