शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ६ )


    बाजीराव - दौलतरावाने नानाला कैद केले खरे पण त्याची शहरात असलेली अरबांची पलटण हे एक भयंकर प्रकरण होते. नानाच्या अरबांनी थकित पगाराच्या निमित्ताने शहरातच ठाण मांडले. बाजीरावाला या अरबांचा मोठा धोका वाटत होता. शिंंद्यांकरवी त्यांना शहरातून बाहेर काढायचा प्रयत्न केला खरा पण पाच सात हजार अरब विना लढाई सुखासुखी शहर रिकामे करणार नाहीत असा रंग दिसताच त्याने अरबांचा थकित पैसा देऊन मार्गस्थ केले. इकडे नानाला दौलतरावाने आपल्या छावणीत तीन महिने अटकावून त्याच्याकडील पैसा उकळण्याचा प्रयत्न केला पण नाना त्याला काही दाद लागून देत नव्हता. तेव्हा दि. ६ एप्रिल १७९८ रोजी दौलतरावाने त्यांस नगरच्या किल्ल्यात पाठवले. तिथे यापूर्वीच कैदेत पडलेली बाळोबातात्या वगैरे शेणवी मंडळी होती. त्यांच्या जोडीला फडणीस नानांची रवानगी करण्यात आली. याच दरम्यान म्हणजे मार्च महिन्यात दौलतरावाने आपला विवाह सोहळा मोठ्या समारंभाने पुणे मुक्कामी उरकून घेतला. सखाराम घाटग्याची मुलगी बायजाबाई दौलतरावाची पत्नी झाली व सखाराम उर्फ सर्जेराव घाटगे आता शिंद्यांचे कारभारी बनले. शिंद्यांचे कारभारीपद प्राप्त होताच सर्जेरावाने धडाक्याने प्रलंबित कामं निकाली काढण्यास आरंभ केला. कारभाराच्या सोईसाठी त्याने नानाच्याच वाड्यात तळ ठोकून शिंदे व पेशवे या दोघांनाही गुंडाळण्याचा उपक्रम आरंभला. 

    शहरातील नानाच्या पक्षपात्यांना धरून त्यांना मारझोड करून द्रव्य उकळण्याची मोहीम सर्जेरावाने आरंभली. पुणे दरबारात आता कोणत्या मुत्सद्दयाला पकडून त्याचे घर धुवून काढायचे यावर मसलती झडू लागल्या. दरबारात पेशव्याची उपस्थिती आता नावालाच उरली होती. भर दरबारी सर्जेराव पेशव्याच्या समक्ष नानाच्या पक्षपात्यांना शिवीगाळ करत असॆ. नानाच्या समर्थकांना मारझोड करून, गरम तोफेवर निर्वस्त्र बसवले जाई, हाता - पायांस दगड बांधून शारीरिक यातना दिल्या जात. अशाच यातना असह्य होऊन नानाचा चुलतभाऊ गंगाधरपंत मरण पावला. नानाच्या पक्षपात्यांकडून आपणांस मोठा द्रव्यलाभ होईल अशी बाजीराव - दौलतरावाची आरंभी कल्पना होती. परंतु , त्यातून जो काही अर्थलाभ झाला त्यांपैकी बराच मोठा हिस्सा शिंद्याने घेतला व तो देखील त्यांस पुरेसा वाटेना. तेव्हा त्याने पुण्यातूनच वसुली करण्याची पेशव्याची लेखी आज्ञा मागितली व दौलतरायाची मर्जी राखण्यास्तव बाजीरायाने ती देऊनी टाकली ! 

    यानंतर सर्जेरावाने स. १७९८ च्या जुलै महिन्यापर्यंत जो पुण्यात धुमाकूळ घातला त्याचे वर्णन काय करावे ? प्रख्यात इतिहासकार वा. वा. खरे यांच्या मते, या काळात सर्जेरावाने दोन - तीन कोटींचा ऐवज पुणे शहरातून जमा केला असावा. पानिपतनंतर निजामाच्या पुणे स्वारीत जितकी दुर्दशा पुणेकरांची झाली नाही तितकी सर्जेरावाने केली. आणि पुण्यात इतका नंगानाच घालूनही पुण्याची दैना उडवण्याचा मान इतिहासकारांनी कारण नसताना यशवंतराव होळकराच्या पदरी बांधला !
सर्जेरावाने पुण्यातून स. १७९८ साली दोन ते तीन कोटींची वसुली केल्यावर स. १८०२ मध्ये यशवंतरावास पुण्यामध्ये लुटण्यासारखे काय शिल्लक राहिले होते ? बरे, सर्जेरावाचा पुण्यात मुक्काम हा ऑक्टोबर १८०१ पर्यंत होता तर यशवंतराव पुण्यात आला स. १८०२ मध्ये. म्हणजे सर्जेराव पुण्यातून बाहेर पडल्यावर एक वर्षाने यशवंताचे पुण्य नगरी आगमन झाले. दुसरे असे कि, सर्जेराव पुण्यात असेपर्यंत शिंद्याच्या सैनिकांचा शहराला उपद्रव देण्याचा उपक्रम तुरळक प्रमाणात का होईना सुरुच होता. मग अशा स्थितीत केवळ एका वर्षात बाजीरावाने व पुणेकरांनी अशी कोणती ' दिव्य उलाढाल ' केली कि, यशवंतरावाने लुटण्याइतपत संपत्ती त्यांना प्राप्त झाली ? कि झटपट श्रीमंत होण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे बाजीराव व पुणेकरांनी काय शेअर्स विकत घेतले होते का ? कशाचा कशाला पत्ता नाही व पांढऱ्यावर काळे करून एखाद्याच्या चारित्र्याला, कारकिर्दीला कलंक लावायचा हि काही खऱ्या निःपक्षपाती इतिहासकारांची लक्षणे नव्हेत. हे तर दरबारी भाटांचे वंशज !    

    सर्जेराव पुणे शहर दिवसाढवळ्या लुटत होता. मग बाजीराव पेशवा गप्प का बसला होता ? आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी त्याने काहीच कशी पावलं उचलली नाहीत ? कि भट - भिक्षुकांना दानधर्म करण्यात व बायका - नाच्या पोरं नाचवण्यात तो मग्न झाला होता ? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याइतपत पुरेसे पुरावे माझ्याकडे नाहीत. ज्यावेळी उपलब्ध होतील तेव्हा ते जरूर मी वाचकांसमोर मांडेन. कारण, ज्याने नानाच्या राज्यघातकी धोरणास आळा घालण्याचा प्रयत्न केला तो यावेळी स्वस्थ बसला असेल असे मला तरी वाटत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही कि, या दृष्टकृत्यात त्याचा अजिबात सहभाग नव्हता. सर्जेरावाच्या या दरोडेखोरीत त्याचाही वाटा होताच. त्याने शिंद्यांना लेखी अधिकार दिल्यानेच सर्जेरावाला एवढे अवसान आले. मग त्याला गुन्हेगार का म्हणायचे नाही ? मान्य आहे कि, त्याने फक्त नानाच्या पक्षपात्यांना भरडून काढण्यापुरताच या गोंधळात सक्रीय सहभाग घेतला पण त्यामुळे त्याची जबाबदारी वा गुन्ह्याची तीव्रता काही कमी होत नाही. राजकीय बंदीवासात सारी हयात गेल्याने राज्यकारभार वा राज्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबींविषयी त्यांस माहिती नसावी हे समजून घेता येते पण, प्रजाहितदक्षता काही शिकवावी लागत नाही. ती तर साधी व्यावहारिक गोष्ट आहे व याबाबतीत बाजीरावाने एवढा मूर्खपणा दाखवावा याचेच आश्चर्य वाटते. असो. 

     नाना फडणीस कैद होताच बाजीरावाने राज्यातील प्रमुख सरदारांना व राज्याचे मालक --- सातारकर छत्रपतींना घडल्या प्रकाराची कल्पना दिली व सातारकर छत्रपतींना विनंती केली कि, त्यांनी त्यांच्याभोवती नानाने जे पहारेकरी व सरदार नेमले होते त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या बदली कामगार मागाहून पाठवण्यात येतील. यावेळी साताऱ्यास दुसरा शाहू छत्रपतीपदावर होता. राजकीय अज्ञानातून पाठवलेल्या या निरोपाचा योग्य तो अर्थ घेण्याची या छत्रपतीला अक्कल जरूर होती. त्याने राजमंडळातील सरदार गोळा करून सातारचा नानाचा किल्लेदार बाबूराव आपटे यांस कैद केले व फिरून पेशव्याच्या नजरकैदेत पडण्याचा प्रसंग न यावा, यासाठी त्याने लष्कर भरती आरंभली.  

    इकडे पुण्यात यावेळी बऱ्याच घटना वेगाने घडत होत्या. नाना कैद झाल्यावर बाजीरावाने शनिवारवाड्याभोवती पहाऱ्यासाठी तैनात असलेली शिंद्याची पलटणे दूर करून तिथे आता आपले पहारेकरी नेमले. नव्याने सैन्य भरती आरंभली. मोरोबा फडणीसला कैदमुक्त करून कारभारावर घेण्याचा बाजीरावाने प्रयत्न केला पण त्याकरता शिंद्याने तीस लाखांची मागणी मोरोबाकडे केल्याने हे प्रकरण तूर्त इथेच संपुष्टात आले. मात्र, बाजीरावाने आपल्या बापाच्या पक्षातील मुत्सद्द्यांना शक्य तितक्या मानाच्या व अधिकाराच्या जागा देण्याचा प्रयत्न केला. तसेच स. माधवास बाजीरावाचे गुप्त पत्र पोहोचवून त्या बदल्यात कैद भोगणाऱ्या बळवंत नागनाथास देखील वस्त्रे देऊन सन्मानित केले. बाजीराव या कार्यात मग्न असताना दुसरीकडे शहरात सर्जेरावाची लुटालूट जोरात सुरु होती. सर्जेरावाच्या मनमानी कारभाराने प्रजेची होणारी दैना पाहून अमृतरावाने थेट शिंद्यालाच अटकेत टाकण्याचा पर्याय बाजीरावासमोर मांडला. परंतु तो पर्याय बाजीरावाने अवलंबला नाही. कारण, शिंद्याला पकडण्याचे सामर्थ्य कोणात होते ? पेशव्याच्या गादीचा - पदवीचा धाक व दरारा अलीकडे साफ मावळला होता. त्यास बाजीराव कारणीभूत असला तरी या सामर्थ्याला उतरती कळा फार पूर्वीच लागली होती. त्याशिवाय सरदारांना दाबात ठेवण्यासाठी खुद्द पेशव्याकडे प्रबळ असे सैन्य तरी कुठे होते ? खेरीज शिंद्याला राजी राखण्यात त्याची पेशवाई कायम राहण्याचा फायदा तो कसा दृष्टीआड करेल ? त्याशिवाय अमृतरावाच्या मसलतीनुसार दौलतरावास कैद जरी केले तरी त्यानंतर अमृतराव बाजीरावास गुंडाळणार नाही कशावरून ? सारांश, संशयपिशाच्चाने पछाडलेल्या अननुभवी बाजीरावाने या काळात एका पाठोपाठ एक इतक्या मोठ्या घोडचुका करून ठेवल्या कि त्यामुळे पेशवाईचा अस्त जवळ येउन ठेपल्याची चाणाक्ष मुत्सद्द्यांना होऊ लागली. अशा स्थितीत राज्य सावरण्याऐवजी प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नास लागल्यास त्यांना दोष का द्यावा ?   

    खुद्द अमृतराव देखील याच वेळी बाजीरावापासून विभक्त होऊन बाहेर पडला. याच सुमारास महादजीच्या स्त्रियांचे प्रकरण अनावर झाले. कारभारी सर्जेरावाने तिथेही आपली अरेरावी गाजवण्याचा उपक्रम केला. आपल्या जावयाला शिंद्याच्या दौलतीवरून बाजूला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अद्दल घडवण्यासाठी सर्जेरावाने त्यांना कैद करून नगरच्या किल्ल्यात डांबण्याचे योजले. त्यानुसार दि. १६ मे १७९८ रोजी त्यांना जबरदस्तीने मारझोड करून पालख्यांत बसवून बंदोबस्तात नगरला घालवण्यात आले खरे पण, शिंद्यांच्या जुन्या सरदारांना हे कृत्य पसंत न पडून नारायणराव बक्षी, यशवंतराव शिवाजी, देवजी गवळी इ. नी नगरच्या वाटेवर या बायांची सुटका केली. सरदारांचे हे कृत्य म्हणजे दौलतरावविरुद्ध बंडच होते. सर्जेरावाने लगेच पलटणांची युद्धासाठी तयारी सुरु केली. महादजीच्या स्त्रियांचा पक्ष घेऊन शेणवी सरदार आपापल्या फौजांनिशी सिद्ध झाले. 

    सर्जेरावाने लगेच पलटणांची युद्धासाठी तयारी चालवली. शिंद्यांचा हा गृहकलह दक्षिणेपुरता मर्यादित न राहता उत्तरेतही पसरला. लखबादादा लाड हा आपल्या सैन्यासह बायकांच्या पक्षास मिळण्यासाठी दक्षिणेत येऊ लागला असता दौलतरावाच्या आज्ञेवरून अंबुजी इंगळ्याने त्यांस रोखून धरले. मिळून, उभ्या हिंदुस्थानाशी लढणारे शिंदेशाही सैन्य आता आपसातच लढू लागले होते. शेणवी सरदारांच्या हाताखालील पारंपारिक पद्धतीच्या फौजा मदतीस आल्याने सर्जेरावाच्या कैदेतून सुटलेल्या बायका वाटेने गावं लुटत, खंडण्या गोळा करत पुण्याकडे येऊ लागल्या. दौलतरावाच्या विरोधकांना एकत्र करण्याचे काम करणाऱ्या अमृतरावाने ताबडतोब बायांचा पक्ष स्वीकारून शिंंद्याला शह देण्याचा प्रयत्न केला. इकडे बाजीरावही आता सर्जेरावीस उबगला होता. त्यानेही महादजीच्या स्त्रियांना चिथावणी देण्यास आरंभ केला. परिणामी, ठिकठीकाणी बायांच्या सैन्याचा पलटणांच्या बरोबर संग्राम घडून सर्जेरावाची पलटणे मार खात पुण्याकडे निघून आली व त्यांच्या पाठोपाठ अमृतरावासह महादजीच्या स्त्रिया पुण्यास येऊन तळ ठोकून राहिल्या. 

    बाजीरावाच्या दुटप्पीपणाने व पलटणांच्या पराभवांनी सर्जेराव चिडून गेला. बाजीरावाचे नाक दाबण्यासाठी त्याने सातारकर छत्रपतींना निरोप पाठवला कि, ' पेशव्याच्या सरदारांना तुम्ही धुडकावून लावा. तुमच्यात व करवीरकरांत मी तह जुळवून देतो व जर पेशव्याने तुमच्यावर आक्रमण केले तर पलटणे घेऊन मी तुमच्या बचावास येतो. ' शिंद्याचे मदतीचे आश्वासन मिळताच छत्रपतींच्या कारवायांना जोर आला. आपल्यापरीने त्यांनी कोल्हापूरकरांशी हात मिळवणी करून त्यांची फौज मदतीस बोलावली. छ्त्रपतींचे वाढते प्रस्थ लक्षात येताच बाजीरावाने सरदार रास्त्यांना सातारवर रवाना केले. परंतु सातारकरांनी रास्त्यालाच लुटून घेतल्याने बाजीराव गडबडून गेला. सातारकरांचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य शिंद्यांकडे होतं पण तेच सातारकरांना सामील असल्याने हा बंडावा कसा निस्तारावा हा बाजीरावापुढे प्रश्न पडला. दरबारच्या जुन्या मुत्सद्द्यांच्या व सरदार रास्त्यांंच्या सल्ला पडला कि, हे कार्य फक्त परशुरामभाऊच पार पाडू शकतो. तेव्हा त्यांस पेशव्यांनी बंधमुक्त करावे. पण सहजासहजी भाऊला सोडण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती. २० लाख रुपये दंड भरायच्या बोलीवर त्याने भाऊला कैदेतून मोकळे केले व त्याच्यावर सातारची मोहीम सॊपवली. इकडे पुण्यात सर्जेरावाने एक नवाच उपद्व्याप करून बाजीरावाला डिवचले तर दौलतरावास तोंड लपवायची वेळ आणली !

     अमृतराव व महादजीच्या स्त्रिया पुण्यात तळ ठोकून राहिले होते. त्यांच्या फौजेसोबत सर्जेरावाच्या पलटणांची अधून मधून चकमक झडत होतीच पण, दि. २५ जून रोजी रात्री सर्जेरावाने बायांच्या व अमृतरावाच्या गोटावर हल्ला चढवून त्यांना उधळून लावले. या वेळी बायांचा व अमृतराव बचावले खरे पण, धन्यावर शस्त्र उपासल्यामुळे दौलतरावाची दरबारात नाचक्की झाली. या कृत्यासाठी त्याला प्रथम बाजीरावाची व त्याच्या मार्फत अमृतरावाची माफी मागावी लागली. 

    बाजीरावाने दौलतरावास माफ केले खरे पण शिंद्यांचा बंदोबस्त करण्याचे त्याने मनावर घेतले व त्याकरिता निजामाबरोबर बोलणी आरंभली. यावेळी निजामासोबत झालेल्या करारानुसार (१) महाड कारस्थान प्रकरणी नानाने केलेला निजामाबरोबरचा तह जसाच्या तसा अंमलात यावा (२) बेदरची चौथाई सोडून देणे या अटी बाजीरावाने मान्य केल्या. बदल्यात (३) शिंद्यांच्या बंदोबस्तासाठी निजामाने पेशव्याला लष्करी मदत करायची. या फौजेच्या खर्चाकरिता पेशव्याने त्यांस दोन लक्ष उत्पन्नाचा मुलुख द्यायचा. (४) नाना कैदेतून सुटल्यावर राज्यकारभार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याची बंदोबस्त निजामाने करावा. (५) शिंद्याने नानाला कैदेतून सोडले तर नानाला पेशव्याने एक लाख रुपये पोटगीदाखल द्यावे. [ संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र.  लेखक :- वा. वा. खरे ]  
 
    बाजीरावाच्या उपद्व्यापाची कल्पना सर्जेराव - दौलतराव या सासऱ्या - जावयास लागताच त्यांनी नानालाच कैदेतून मोकळे करण्याचा निर्णय घेतला. कारण निजाम, बाजीराव, अमृतराव व महादजीच्या स्त्रिया या सर्वांना एकाच वेळी तोंड देणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते. त्याशिवाय या लढ्यात इंग्रजही सामील होण्याची शक्यता होती. त्यापेक्षा काही दंड घेऊन नानाला मोकळे करून कारभारी बनवावे. त्याच्या मार्फत बायांचा दंगा मिटवावा असा त्यांचा हेतू होता. खेरीज, आपल्या मदतीने कारभारीपद मिळाल्याने नाना आपल्या पाठीशी राहील. त्यामुळे इंग्रज - निजामाची भीती बाळगण्याचे कारण उरणार नाही असा त्यांनी व्यवहारी हिशेब केला. सर्जेरावाची चाल ओळखून महादजीच्या स्त्रियांनीही नानाच्या सुटकेसाठी नगरला आपली माणसं धाडली. परंतु आरंभी नाना कोणत्याच पक्षाला मिळेना व नंतर त्याचा कल दौलतरावाकडे झुकतोय म्हटल्यावर महादजीच्या स्त्रियांचे हस्तक मागे फिरले. शिंद्याचा सरदार फकिरजी गाढवे याच्या मार्फत दहा लक्ष रुपये देण्याच्या बोलीवर नानाची सुटका करण्याचे शिंद्याने मान्य केले.

    यावेळी उभयतांमध्ये एक करारही झाला. त्यानुसार (१) दौलतरावाने नानाला कैदेतून मुक्त करावे. बदल्यात नानाने त्यांस दहा लक्ष रुपये द्यावे. (२) बाजीराव पेशव्याची निजामाबरोबर चाललेली वाटाघाट नानाने बंद करावी. (३) दौलतराव व महादजीच्या स्त्रियांच्या दरम्यान सन्मानजनक तोडगा नानाने काढावा. (४) नानाला कारभारीपद मिळावे. त्यासाठी शिंद्यांना १५ लाख रुपये देण्यात येतील. नानाचा कारभार सुरळीत चालू झाल्यावर मग शिंद्याने उत्तरेत जावे. करार होताच दि. १५ जुलै १७९८ रोजी नाना बंधमुक्त होऊन ता. १७ जुलै रोजी वानवडीस दौलतरावच्या तळावर दाखल झाला. पाठोपाठ नानाचे साथीदारही आपापल्या पथकांसह तिकडे येऊन धडकले. 

    नानाने सुटका होताच तहाची अंमलबजावणी लगोलग आरंभली. शिंद्याला त्याने दहा लाख रुपये दिले. नाना कैदेतून मोकळा झाल्याचे कळताच निजामाने बाजीरावाचा पक्ष सोडला. दौलतराव व महादजीच्या स्त्रियांचा वाद विकोपाला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्जेराव ! हे हेरून नानाने सर्जेरावास दौलतरावामार्फत कैद केले. महादजीच्या स्त्रियांचा मुख्य आधार म्हणजे अमृतराव पेशवा. त्यालाच सात लाखांची जहागीर देण्याचे मान्य करून नाना - दौलतरावाने आपल्या बाजूला वळवले. नंतर नानाने स्वतः महादजीच्या स्त्रियांना आश्वासन दिले कि, ' तुमच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. दौलतराव तुमच्या सल्याने कारभार करेल. तुमच्या मागण्यांचा सरकारांत विचार केला जाईल. तुम्ही संंघर्षाची भूमिका सोडून जांबगावी स्वस्थ राहावे. ' नानाच्या या निरोपाने महादजीच्या स्त्रियांची तात्पुरती समजुत पडून त्या जांबगावाकडे निघाल्या. 

    नाना दौलतरावाच्या अडचणी दूर करत असतानाच दौलतरावाने बाजीरावावर दबाव आणून नानाला कारभारीपद देण्यास भाग पाडले. दौलतरावाची विनंती अमान्य करणे बाजीरावास शक्य नव्हते. त्याने नानाला कारभारीपद देऊ केले पण, बाजीरावाने आपल्याला कैदेत टाकल्याच्या अपमानाचा सूड घेण्याची संधी नाना सोडणार नव्हता. त्याने कारभारीपद तर घेण्याचे आरंभी साफ नाकारले व नंतर असे सांगितले कि, ' माझ्या प्राणास वा अब्रूस धक्का लागणार नाही याविषयी निजाम - इंग्रज हमीदार होणार असतील तर मी तुमचे कारभारीपद घेईन. ' नानाच्या या मागणीने बाजीराव काय समजायचं ते समजून गेला. 

    या बाबतीत प्रख्यात इतिहासकार वा. वा. खरे व गो. स. सरदेसाई यांनी जे विवेचन केले आहे ते अतिशय हास्यास्पद आहे. नामवंत इतिहासकारांनी या प्रकरणाविषयी इतकी बालिश विधानं करावीत ? काय तर म्हणे, ' इंग्रज - निजामाकडून अशी हमी मिळवणे श्रीमंतांच्या इभ्रतीस बट्टा आणणारे व नुकसानीचे होते. एवढेच नव्हे, तर ते अशक्यही होते.' या वाक्यांचा अर्थ असा कि, बाजीराव हा नालायक असल्याने त्याच्या शब्दावर भरवसा ठेवून कारभारीपद हाती घेऊन  आपला जीव धोक्यात घालण्यास नाना तयार नव्हता. परंतु जर नानाच्या जीविताची हमी इंग्रज - निजामाने घेतली तर मात्र तो या कामास तयार होता. वरकरणी सरळ वाटणारी हि मागणी अतिशय विचित्र होती. बाजीरावास अशा प्रकारचे हमीपत्र मिळाले नसते असे समजणे चुकीचे होईल. निजाम - इंग्रजांनी अशी हमीपत्रे मोठ्या आनंदाने दिली असती. कारण, त्यायोगे निजाम - इंग्रजांना बाजीराव पेशव्यावर --- पर्यायाने समस्त मराठी राज्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित करता येणार होते. सारांश, अधिकारपदाच्या लालसेपोटी या काळात एक बाजीरावच नव्हे तर नाना फडणीस देखील राज्यहितास तिलांजली देण्यास प्रवृत्त झाल्याचे दिसून येते. 

    दरम्यान बंधमुक्त केलेला परशुरामभाऊ तडफेने साताऱ्यावर चालून गेला व ऑगस्ट पर्यंत त्याने साताऱ्यावर पेशव्याची सत्ता परत एकदा प्रस्थापित करून दिली. तिकडे उत्तर हिंदुस्थानात यावेळी एक बदलाचे वारे वाहू लागले होते. त्याची दखल ना फडणीस नानाने घेतली, ना अलिजाबहाद्दर शिंद्याने, ना बाजीराव पेशव्याने ! 
                                                                                                                                                                                 ( क्रमशः )

२ टिप्पण्या:

deom म्हणाले...

मराठी इतिहासातील चढा-ओढीच्या राजकारणाचे खरेतर शरमून टाकणारे विविध अंग तुम्ही समोर ठेवले त्याबद्दल आभार. खरेतर हिंदुस्तानावर इंग्रजांचे राज्य होण्यास सर्वथा आपणच कारणीभूत आहोत हे ठळक सत्य समोर येते. महाराजा यशवंतराव यासारखा तेजस्वी तारा चमकून जातो पण तोही आम्हाला पाहता येत नाही

तुमच्या पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतोय.

sanjay kshirsagar म्हणाले...

अभिप्रयाबद्दल धन्यवाद deom !
ज्या मोजक्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहत असतो, त्यांपैकी तुम्ही एक आहात ! तुमच्या कमेंट्समुळे लेखनास जोम येतो. बळ येते. असाच लोभ ठेवावा हि विनंती !!