बुधवार, ६ जानेवारी, २०१६

अहिल्याबाई होळकर ( स. १७७९ - ८४ )



 
महेश्वरच्या राजवाड्यातील अहिल्याबाईचे स्मारक 

    नुकताच . . पारसनीस संपादित ' महेश्वर दरबारची बातमीपत्रे ' भाग पहिला, वाचून झाला. प्रस्तुत भागात पुणे दरबारतर्फे . १७७९ ते ८३ पर्यंत अहिल्याबाईच्या महेश्वर येथील दरबारात नियुक्त केलेल्या विठ्ठल शामराज केसो भिकाजी या दोन वकिलांनी पुण्यास पाठवलेली पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने विठ्ठल शामराजच्याच पत्रांचा भरणा अधिक असून . १७८३ नंतर तो पुण्यास परतला . १७९४ पर्यंत केसो भिकाजी महेश्वरी राहिला. या कालखंडातील पत्रे पारसनीसांनी दुसऱ्या भागात छापली आहेत.


    प्रस्तुत लेखांत आपण . १७७९ ते १७८४ काळातील काही घटनांचा अहिल्याबाईच्या कारकीर्दीचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत.

आजवर सर्वसाधारण इतिहास वाचकाला अहिल्याबाईची , ती बऱ्यापैकी धार्मिक, श्रद्धाळू, दानधर्मात मग्न असणारी होळकरी दौलत सांभाळणारी मर्यादित राजकारणी स्त्री अशीच ओळख आहे. अर्थात अहिल्याबाईची हि ओळख / प्रतिमा बनवण्यात आलेली आहे, असं आमचं पारसनीसांचा प्रस्तुत पत्रसंग्रह वाचल्यावर मत बनलं आहे.


    स. १७७९ ते ८३ हा काल पेशवाई तसेच मराठी साम्राजाच्या अंतर्बाह्य स्थित्यंतराचा काळ होता. या काळात पेशवाईतील बारभाईंचे महत्त्व कमी होऊन नाना फडणीसकडे सर्व सूत्रे आली होती. बालपेशव्याचा तो पालक ( संरक्षक या अर्थाने ) असल्याने एकप्रकारे पेशव्याची अमर्याद सत्ता त्याच्या हाती होती. परंतु दृष्टी कारकुनाची असल्याने पेशवाईचा ऱ्हास याच काळात सुरु झाल्याचे आपणांस दिसून येते. या संदर्भात प्रस्तुत खंडातील तसेच पुणे अखबार ( भाग , ) मधील पत्रव्यवहार बराच बोलका आहे.


    शिंदे - होळकरांचा कलह या काळात मर्यादित दिसत असला तरी होळकरी दौलतीवर आपलं वर्चस्व लादण्याचा महादजीचा प्रयत्न देखील ठळकपणे लक्षात येतो. कधी तुकोजीला हाती धरून तर कधी अहिल्याबाईशी अंतस्थ सूत्र राखून त्याने हे राजकारण चालवलं होतं. त्याचवेळी पुणे दरबारालाही मुठीत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. रघुनाथरावाच्या प्रकरणात तसेच इंग्रजांशी चाललेल्या युद्ध - तहाच्या बाबतीत त्यालाच पुढारपण मिळालं. कारण, लष्करी बाबतीत पुणे दरबारचा जोर कमी होता. तुकोजीला लष्करी चाकरीबाहेर स्वतंत्र राजकीय बुद्धी नव्हती तर अहिल्याबाई बैठ्या राजकारणात कितीही प्रवीण असली तरी ती स्वतः लष्करी मोहिमांत फारसा सहभाग घेत नव्हती. बडोदेकर गायकवाड स्वखुशीने इंग्रजांच्या कुशीत शिरले होते. नागपूरकर भोसल्यांना सातारच्या गादीचा अभिमान असला तरी संघराज्यातील पुणे दरबारचं महत्त्व परस्पर घटत असेल तर ते त्यांना नको होतं, अशातला भाग नाही. अशा स्थितीत सगळी अनुसंधानं सांभाळून एकाच वेळी दिल्ली, महेश्वर, पुणे, कलकत्ता, लखनौ, राजपुताना, शीख, हैदर, निजाम, नागपूरकर, बडोदा . दरबारातील राजकारणं खेळवणाऱ्या पाटीलबावा तथा महादजी शिंद्याला महत्त्व येणं स्वाभाविक होतं.


    अशा परिस्थितीत नाना फडणीस अहिल्याबाई या दोन समकालीन राजकीय मुत्सद्द्यांची या काळातील कामगिरी आपण संक्षेपात पाहू.


    स. १७७९ मध्ये नाना फडणीसला बालपेशव्याचा सांभाळ करून पेशवाईचा दबदबा, राज्य कायम राखायचं होतं. पैकी, बालपेशव्याचा सांभाळ करण्यात तो यशस्वी झाला पण राज्य तसेच पेशवाईचा दरारा कायम राखणं त्याला जमलं नाही. अर्थात नानाच्या पक्षपात्यांना भक्तांना माझं हे विधान धाडसी तसंच अवास्तव वाटेल पण याच काळातील मराठी राज्याचे समकालीन नवजात प्रतिस्पर्धी ज्या पद्धतीने वर्तत होते, ते पाहता माझ्या विधानाची सत्यता, प्रचीती येणं अशक्य नाही.


    मराठी राज्याचे सर्वात जुने प्रतिस्पर्धी म्हणजे इंग्रज. इंग्रजांनी स्वराज्यसंस्थापक शिवाजीपासून ते पहिल्या इंग्रज - मराठा युद्धापर्यंत प्रथम मराठेशाही नंतर पेशवाईशी वारंवार झगडे करून पाहिले. परंतु प्रस्तुत युद्धांत त्यांना जे यश मिळालं आगामी यशाची जी चावी प्राप्त झाली तसं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाचे प्रामुख्याने दोन टप्पे पडतात. पहिल्या भागात इंग्रजांचा हेतू रघुनाथाला पेशवेपदी बसवून पेशवाईची सर्व सूत्रे, राज्य आपल्या हाती घ्यायचं होतं. अर्थात, लढाईचे मुख्य क्षेत्र मुंबई - पुण्या दरम्यान राहिल्यानं यावेळी साम्राज्यातील बव्हंशी सरदार पुण्यास गोळा झाल्यानं इंग्रजांना हार खावी लागली. पण इंग्रजांचे आक्रमक चढाईचे धोरण मराठी सरदारांचे बचावाचे, दग्धभू धोरण हा युद्धपद्धतीतला, डावपेचांतील महत्त्वाचा फरक मुद्दाम लक्षात घेण्यासारखा आहे.   


    युद्धाचा दुसरा टप्पा वडगावच्या तहानंतर सुरु होतो. या टप्प्यात इंग्रजांची रणनीती विशाल होती. तिचं आकलन थोडंफार अहिल्याबाईला झालेलं या पत्रव्यवहारावरून दिसते. नाना वा महादजीच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. इंग्रजांनी एकाचवेळी दक्षिणोत्तर चढाईचे धोरण अवलंबल्याने पुणे दरबार सरदार गडबडून गेले. गॉडर्ड बरोबर गुजरात प्रांती महादजी - तुकोजी, हरिपंत फडक्यासोबत गनिमी काव्याने लढत होते खरे, पण गॉडर्डला हैराण करण्यापलीकडे त्यांच्याकडून विशेष कामगिरी झाली नाही. उलट याच काळात बंगालच्या पलटणी भूमार्गाने दक्षिणेत येऊ लागल्याने महादजी - तुकोजी पावसाळी छावणीच्या निमित्ताने माळव्यात परतले.


    युद्धाचे स्वरूप असं बदलल्याने नानानेही आपल्या क्षमतेनुसार राजकारणी चाली खेळण्यास आरंभ केला. इंग्रजांच्या विरोधात पेशवे, निजाम हैदर भोसले यांचे चौकडीचे कारस्थान रचण्याची मूळ कल्पना निजामाची, असा एक मतप्रवाह आहे. या कल्पनेला नाना फडणीसने मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पैकी, नागपूरकरांनी बंगालस्वारीचा देखावा करत इंग्रजांकडून अंतस्थ पैसे खाल्ले. निजामही कागदोपत्री राजकारण करत स्वस्थ बसून राहिला. मात्र हैदर तेवढा पुणे दरबारला येउन मिळाला.

वास्तविक, चौकडीच्या राजकारणाचे निमित्त करून निजामाला इंग्रजी गोटात जाऊन पेशव्याचे हिशेब चुकते करायचे होते. परंतु यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी गादीचा वारसदार धाकटा गाजीउद्दिन * ( अटक - बुराडी प्रसंगी पेशव्यांचा स्थापित मोगल वजीर ) दक्षिणेत असून निजामाच्या गादीवर बसवण्याकरता सुरतकर इंग्रजांच्या पाठी लागला होता. गाजीउद्दिन इंग्रजी छावणीत बसून राहिल्यामुळे निजामाने पुणे दरबारविरुद्ध उघड कारवाया करण्याचे टाळले.


    पुणे दरबारचा पहिल्या इंग्रज - मराठा युद्धातील मुख्य मदतनीस मित्र म्हणजे म्हैसुरकर हैदरअली. त्याने पुणेकरांच्या मदतीने दक्षिणेत इंग्रजांची रुजू पाहणारी सत्ता उखडून काढण्याचा प्रयत्न केला खरा पण याच काळात त्याला दक्षिणेतील सत्तांच्या --- विशेषतः निजाम पेशवे --- बलाबलाची यथायोग्य कल्पना येऊन त्याने युद्धाच्या अखेरच्या टप्प्यांत दख्खनच्या सहा सुभ्यांची सुभेदारी दिल्लीच्या बादशाहकडून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या काळात युद्ध सुरु होते. दक्षिणेत पुणेकरांपेक्षा हैदरचाच इंग्रजांना अधिक जाच होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे युद्धाकरता मनुष्यबळ कमी पडू लागल्याने हैदरने मराठी राज्यातून लष्कर भरतीची परवानगीही पुणे दरबारकडे मागून पाहिली. वर्षानुवर्षं युद्धं खेळून, प्रसंगी पराभूत होऊन खंडण्या देऊनही अधिक सैन्यभरतीकरता हैदरकडे पैसा होता तर पुणे दरबारकडे यावेळी लष्कराचा नियमित तनखा देण्याची बोंब होती. जी तऱ्हा पुणेकरांची तीच सरदारांचीही ! हा विरोधाभास मननीय आहे.


    हैदरची चाल विफल करण्याकरता नानाने बंगालस्वारीचा पर्याय काढून त्या मोहिमेकरता हैदरकडे पैशांची मागणी करण्याची तोड काढली. बंगाल प्रकरणी भोसल्यांनी विश्वासघात केल्याने पुणेकरांनीच याबाबतीत पुढाकार घ्यावा, अशी हैदरचीही मागणी होती. पण या गोष्टी वाटाघाटी पलीकडे गेल्या नाहीत. मात्र यामुळे पुणे दरबारचे आर्थिक दौर्बल्य उघड झाले.


    पहिल्या इंग्रज मराठा युद्धांत पेशव्याच्या वतीने कसून लढणारे दोनच बलिष्ठ सरदार होते. शिंदे होळकर. पैकी महादजीच्या धोरणांची चर्चा आधी केलीच आहे. आता आपण होळकरांची बाजू पाहू.


    काव्येतिहास संग्रह, पुणे अखबार, मराठी रियासत महेश्वर दरबारची बातमीपत्रे पाहता या  होळकरी दौलतीतील तंटे - बखेड्याचे रूप लक्षात येते. अहिल्याबाईचा मुलगा होळकरी दौलतीचा वारस मालेराव मरण पावल्यावर होळकरांची सरदारी कोणाला द्यायची हा प्रश्न थो. माधवरावाच्या काळात उद्भवला होता. या प्रकरणी गंगोबा तात्याच्या सल्ल्याने रघुनाथानेही थोडीफार ढवळाढवळ केली होती. त्या प्रसंगी अहिल्याबाईने तुकोजीला हाताशी धरून होळकरांची सरदारी राखली.

मल्हारराव होळकराच्या सोबत युद्ध - मोहिमांत भाग घेतलेल्या तुकोजीला तिने सरदारीची वस्त्रे दिली असली तरी होळकरी दौलतीची सूत्रे अहिल्याबाईच्याच हाती राहिली. या व्यवस्थेला थो. माधवराव पेशव्याची मंजुरी होती. अर्थात, होळकरी दौलतीची मालक अहिल्याबाई ठरून तुकोजी हा फक्त लष्करी चाकरी करणारा नोकर बनला होता. प्रत्यक्षात वास्तव रूप हेच होते. परंतु पुढे या द्विमुखी कारभारात जे घोटाळे उडणे स्वाभाविक होते, ते उडू लागले. अहिल्याबाईचा कारभार हिशोबी तर तुकोजीचा मनमानी. पेशव्याने मोहिमा पार पाडण्याची तुकोजीला आज्ञा करावी तर तो खर्चास पैसा नसल्याची रडकथा सांगायचा. त्याच्या स्वाऱ्या - शिकाऱ्यांचे हिशोब व्यवस्थित नसल्याने अहिल्याबाईही त्यांस खजिना पुरवण्यास हात आखडता घ्यायची. याचा परिणाम असा झाला कि, लष्करीदृष्ट्या होळकरांचे महत्त्व कमी होऊ लागले. अहिल्याबाईला हा धोका दिसत होता. परंतु तुकोजीच्या मनातला भाव, अहिल्याबाईस पोटापुरती जागीर देऊन समस्त होळकरशाही हाताखाली घालण्याचा होता. याबाबतीत महादजीचा आदर्श त्याच्यापुढे असून आरंभी महादजीनेही त्यांस चिथावणी दिलेलीच होती. शिवाय तुकोजीचा कारभारी --- नरो गणेश देखील धन्याला याबाबतीत भर देतच होता. विशेष म्हणजे नारो गणेशला कारभारी म्हणून अहिल्याबाईनेच तुकोजीच्या हाताखाली नेमले होते. तत्पूर्वी तो तिच्याच पदरी कामाला होता.


    तुकोजी लढवय्या असला तरी असल्या राजकारणात मुरलेला नसल्याने अहिल्याबाईपुढे त्याचा निभाव लागणे शक्य नव्हते. महादजीनेही तुकोजीच्या मर्यादा ओळखून पक्ष बदलत अहिल्याबाईस पाठिंबा दिला.


    होळकरी दौलतीच्या या राजकारणात पुणे दरबारही संधी पाहून भाग घेत होता. ज्यावेळी तुकोजी - महादजी एकविचारे वर्तत होते तेव्हा नानाने अहिल्याबाईचा पक्ष सावरला. पण अहिल्याबाई - महादजी एकत्र येताच नानाच्या वतीने हरिपंत फडक्याने तुकोजीला लगामी लावले. परिणामी, होळकरी दौलतीतला बखेडा तसाच कायम राहिला.


    नाना - हरिपंताच्या या धोरणाचे दूरगामी परिणाम पेशवाई तसेच मराठी राज्याला हानिकारक झाले असले तरी त्यांच्या या धोरणामागील कारणपरंपरा लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे.


    दक्षिणेत नानाच्या हाताखाली हरिपंत फडके सारखा पराक्रमी सरदार होता. तसाच त्याला आणखी एक बळकट मदतनीस हवा होता. याकरता त्याने प्रथम महादजीशी मिळते जुळते घेऊन पाहिले. परंतु नानाप्रमाणेच महादजीही महत्त्वकांक्षी असल्याने उभयतांचे फार काळ पटणे शक्यच नव्हते. त्यात महादजी उत्तरेत गुंतून पडल्याने नानाला तुकोजीला जवळ करणे भाग पडले.


    तुकोजी सेनानी असला तरी स्वतंत्र बुद्धीचा राजकारणी नव्हता व अशाच मदतनीसाची नानाला गरज होती. तुकोजीला त्याने हरिपंताच्या तर्फे आपल्या बाजूस वळवून अहिल्याबाईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, बाई मोठी दमाधीराची निघाली. या समयी तिने काढलेले उद्गार खालीलप्रमाणे आहेत :-





    यानिमित्ताने महेश्वर दरबारच्या बातमीपत्रांतील काही प्रसंगांचा येथे उल्लेख करणे अप्रयोजक ठरणार नाही.


(१) गॉडर्ड बरोबर गुजरातमधील लढाई पावसाळ्यामुळे अर्धवट ठेवून तुकोजी - महादजी माळव्यात परतले. त्यासमयी आरंभी तरी पावसाळा होताच तुकोजीसह दक्षिणेत जाण्याचा महादजीचा बेत होता. पुणेकरांचाही असाच आग्रह होता. परंतु बंगालची पलटणे माळव्याकडे येऊ लागताच महादजीने दक्षिणेत जाण्याचे रद्द केले व पुणेकरांच्या मदतीकरता तुकोजीने जावे असा आग्रह त्याने धरला. पुणे दरबारला इंग्रजाविरुद्धची  स्वबळावर रेटणे शक्य नसल्याने त्यांना शिंदे - होळकर दोघेही अथवा दोघांपैकी एकाची दक्षिणेत मदत हवीच होती. त्यांनीही तुकोजीला दक्षिणेत येण्याची पत्रे पाठवली. हा प्रकार अहिल्याबाईला अजिबात आवडला नाही. तिने महादजीला भेटीस बोलावले. त्यावेळी झालेल्या भेटीतील काही भाग खालीलप्रमाणे :-




    ज्या काळात महादजी शिंदे सारखा बलिष्ठ सरदार अशी भाषा बोलण्यात काय पत्रातही लिहिण्यात कचवचत होता, त्या काळातील अहिल्याबाईचे हे शब्द आहेत. याबाबतीत तिची हिंमत, तडफ, ईर्ष्या एकट्या हैदरअलीच्या तोडीचीच मानली पाहिजे.
 
(२) दुसरी घटना याच काळातील आहे. पावसाळी छावणीनिमित्त माळव्यात आल्यावर अहिल्याबाईला तैनात तोडून देऊन, समग्र होळकरशाही आपल्या ताब्यात घेण्याचा तुकोजीचा विचार चालला होता. याकरता आरंभी तरी त्याला महादजीचा अंतस्थ पाठिंबा होता. शिवाय पुणेकरही मनातून अनुकूल होतेच. बाईला याची कुणकुण लागताच तिने राजकीय व लष्करी आघाडीवर तयारी चालवली. तुकोजी अहिल्याबाईशी प्रसंगी युद्ध करणार असल्याची वार्ता त्याच्या छावणीत पसरायला वेळ लागला नाही. तुकोजीच्या छावणीतील चलबिचल पेशव्याच्या महेश्वरातील वकिलाने पुढीलप्रमाणे पुण्यास लिहून कळवली :-

(३) तिसरी घटना याहून थोडी वेगळी आहे. ज्यातून एका साम्राज्याच्या सरदाराचा बाणेदारपणा व स्वाभिमानही नजरेस पडतो.


    हैदरने दख्खनची सुभेदारी मिळवण्यासाठी आपला वकील बाळमुकुंददास दिल्लीला पाठवला होता. तो जेव्हा दक्षिणेत परत निघाला त्यावेळी मार्गी अडथळा न होता प्रवासात मदत करण्याकरता बादशाही ताकीदपत्रे त्याने सोबत आणली होती. इतर राजे रजवाड्यांप्रमाणे अहिल्याबाईच्याही नावे बादशाही खलिता होता. रिवाजानुसार बादशाही पत्रे पुढे जाऊन, उभा राहून घेणे भाग होते. पण बाईनं यांस नकार देताना काढलेले उद्गार स्मरणीय आहेत :-

    एकूण पाहता, एक राज्यकर्ती व्यक्ती म्हणून अहिल्याबाईचे धोरण चुकीचे होते असं म्हणताच येत नाही. परंतु आपली नेहमीची रडकथा. पुरुषी विचारसरणीतून वारंवार लादण्यात आलेली प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष बंधने. यांमुळे अहिल्याबाईला आपला हेका चालवता आला नाही. परंतु तिच्या बाणेदारपणामुळे पुणे दरबार तसेच तुकोजीलाही एका मर्यादेपलीकडे तिचं महत्त्व डावलता आलं नाही. पुढे हा घोळ तसाच कायम राहिला. अंती तुकोजीने तिच्या आज्ञेत राहण्याचे कबूल केले पण तोवर राजकारणाची दिशाच साफ बदलली होती. शिंद्यांपुढे होळकर काहीसे झाकोळले गेले होते. दिल्ली दरबारची सूत्रे महादजीच्या हाती गेल्याने तो पुणेकरांनाही डोईजड बनला होता. शिंदे - होळकर बरोबरीचे असता पुढे त्यांना दुय्यमत्व प्राप्त झाले. घरच्या दुहीचे हे दुष्परिणाम अहिल्याबाई तसेच तुकोजीलाही कळत होते. पण करता काहीच येत नव्हते. तुकोजीने याबाबतीत प्रसंगानुसार आपली मतं पत्रांद्वारे पुणेकरांना लिहून कळवताना असाही आरोप केला कि, आपणांस दक्षिणेत नाहक गुंतवून ठेवल्याने उत्तर शिंद्याला मोकळी मिळून तिकडे त्याचं प्रस्थ माजलं.


    पण या नंतरच्या काळातील गोष्टी झाल्या. प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत आपण विचार केला असता असे दिसून येते कि, स. १७७९ ते ८४ या हिंदुस्थानातील राज्यक्रांतीच्या काळात पुणे दरबार, शिंदे मंडळी तसेच होळकरी दौलतीतील असंतुष्ट मंडळी व प्रकट शत्रूंपासून होळकरी दौलत रक्षण्याचे व शक्य तितकी पेशव्याची चाकरी निष्ठेने बजावण्याचे अहिल्याबाईने जे कार्य केलं ते कौतुकास्पद आहे !


संदर्भ ग्रंथ :-
(१) महेश्वर दरबारची बातमीपत्रे :- संपादक - द. ब. पारसनीस
(२) मराठी रियासत :- गो. स. सरदेसाई
(३) निजाम - पेशवे संबंध ( १८ वे शतक ) :- त्र्यं. शं. शेजवलकर
(४) पुणे अखबार ( भाग - १ , २ ) :- प्रकाशक - मध्यवर्ती अभिलेख कार्यालय, हैद्राबाद सरकार
(५) काव्येतिहास - संग्रहात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक - गो. स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: