शनिवार, २८ एप्रिल, २०१८

प्रकरण २१) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी



                             



    मागील प्रकरणात आपण संभाजीचे तुर्की गोटात जाणे व परत पळून येणे यामागील कारणपरंपरा पाहत नव्या सिद्धांताची मांडणी केली. आता या सिद्धांताची फलश्रुती व शिवाजीचे अखेरचे दिवस यासंबंधी प्रस्तुत प्रकरणी चर्चा करणार आहोत.

    राजकीय कट कारस्थानांना अन्तारंभ तसा नसतोच. त्यामुळे एखादं राजकारण फसलं म्हणून ते तिथेच सोडून दिलं जात नाही तर परिस्थितीनुसार त्यात बदल करून ते तसंच पुढं रेटलं जातं. यासंदर्भात शिवाजीने, संभाजीमार्फत घडवून आणलेल्या राजकीय खेळीकडे पाहता येऊ शकते.

    संभाजी - दिलेरखानातील पत्रव्यवहाराची शिवाजीला माहिती असूनही त्याने संभाजीला तो तसाच सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. कर्नाटक स्वारीतून परत येत असताना शक्य असूनही त्याने संभाजीच्या भेटीला जाणे वा त्याला भेटीकरता बोलावणे, दोन्ही गोष्टी टाळत दिलेरच्या मनात संभाजीप्रती विश्वास कसा निर्माण होईल याकडे लक्ष पुरवले. एकीकडे हे राजकारण सुरु असताना दुसरीकडे त्याच वेळेस त्याने विजापूर बहलोलखानाच्या पश्चात आपल्या ताब्यात घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला व तेथून तो रायगडी निघून गेला.

    स. १६७८ च्या ऑक्टोबर पर्यंत शिवाजीने राज्यातील इतर सर्व कामांकडे लक्ष पुरवले. पण दिलेर - संभाजी सूत्राकडे सहेतुक दुर्लक्ष केले. यामागे संभाजी मार्फत दिलेरखान अथवा तुर्की सामर्थ्याचा आपल्या फायद्याच्या दृष्टीने वापर करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. शहजादा मुअज्जमच्या दख्खन सुभेदारीवरील नियुक्तीने त्याच्या विचारांना गती प्राप्त झाली. मुअज्जम सोबत शिवाजीचे मित्रत्वाचे संबंध होते. तसेच संभाजी सोबतही मुअज्जमचा स्नेह होताच. त्यामुळे एकप्रकारे संभाजीच्या संरक्षणाची निश्चिती झाली. खेरीज संभाजीनेही दिलेरकडून संरक्षण संबंधी वचने घेऊनच त्याच्या छावणीत पाउल टाकले. अर्थात तो त्या काळचा प्रघातच होता. फक्त वचन पाळण्याबाबत समोरच्याचा लौकिक कसा आहे, हे पडताळून पहायचे असते. यादृष्टीने पाहता फुतुहाते आलमगिरीत दिलेरचं आलेलं वर्णन चिंतनीय आहे.

    दिलेरखान दाऊदझाई रोहिला असून त्या काळातील नामांकित शूर लढवय्या, प्रतिष्ठित सरदार होता. त्याचा बराचसा वेळ धर्मकृत्यांत जात असे. मात्र कित्येकदा या सर्व चांगल्या गोष्टी बाजूला राहून क्रौर्याच्या अधीन गेल्यावर त्याच्याकडून अनन्वित कृत्यं घडत असता. खेरीज दिलेरची पत्रे पाहिली असता, प्रचलित इतिहासातील त्याचे हिंदूद्वेष्टा हे चित्रण चुकीचं असल्याचे दिसून येते. त्याच्या सैन्यातील राजपूत शिपायांची तो तितकीच काळजी घेत असे, जितकी स्वधर्मीय शिपायांची. त्याने जे काही अत्याचार केले, ते धार्मिक भेदावर नसून केवळ शत्रू राज्यातील प्रजा, रयत या नात्याने केले होते. अर्थात, हि तत्कालीन परंपरा - युद्धपद्धतीचाच एक भाग असल्याने केवळ त्यावरून त्यास दूषणं देणं अयोग्य ठरेल. असो.
    
    दिलेरखान हा रोहिला असल्याने पठाण - अफगाणांविषयी त्याच्या मनी प्रेमभाव व तुर्कांविषयी अढी, द्वेष असणे स्वाभाविक होते. शिवाजीने याच गोष्टीचा फायदा उचलल्याचे दिसते. दिलेरखानाच्या व्यक्तिगत इमानावर, कौल - करारावर विसंबून त्याने संभाजीला त्याच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.

    संभाजीला दिलेरकडे जाणे सुलभ व्हावे याकरता शिवाजीने त्यास शृंगारपुराहून काढत परळीगडावर रवाना केले. तेथून अनुकूल संधी पाहून संभाजी दिलेरच्या गोटात गेला. पाठीमागून मुद्दाम देखावा केल्यासारखा पाठलाग झाला व पाठलागकर्ते विशिष्ट स्थळापासून मागेही आले.

    संभाजी तुर्कांच्या छावणीत गेल्यावर शिवाजीच्या मनातील एक राजकारणी डाव आकारास आला. ज्याच्या पूर्ततेत संभाजीच्या मदतीची वा त्याच्या तुर्की गोटात जाण्याची जरुरी नव्हती. किंबहुना, हि दोन्ही राजकारणं परस्परांहून भिन्न होती.
    शिवाजीच्या योजनेनुसार दिलेरने विजापूरवर हल्ला चढवताच मसूद मदतीची मागणी करेल व त्याला मदत करण्याच्या नावाखाली विजापुरात फौजा घुसवून त्या स्थळाचा ताबा घेता येईल. यापैकी बव्हंशी भाग पुरा झाला. शिवाजीचे सैन्य मुख्य शहराच्या खवासपूर आदी भागात घुसून लुटालूट करू लागल्याने मसूद सावध झाला व त्याने सर्व सामर्थ्यानिशी आपल्या मित्रांना पिटाळून बाहेर काढत दिलेरकडे मदतीचा हात केला. शिवाजीचा विजापूर जिंकून घेण्याचा डाव परत एकदा फसला. पुढच्या चालीची सूत्रे दिलेरकडे जाऊन त्याने मसूदशी मैत्री करत भूपाळगड जिंकून घेत शिवाजीला आपल्या वतीने तडाखा दिला.

    दिलेरकडे दुर्लक्ष करत शिवाजीने आपल्या दुसर्या डावाकरता जाळे विणायला सुरवात केली. त्याकरता मसूद - दिलेर मैत्री भंग होणे गरजेचे होते आणि झालेही तसेच. सर्जाखान मसूदच्या ईर्ष्येने किंवा शिवाजीच्या प्रेरणेमुळे दिलेरसोबत शिवाजीवरील मोहिमेस जायला तयार होईना.
    विजापुरी दख्खनी मुसलमानांचा नक्षा उतरवण्याची दिलेरची खुमखुमी होतीच. त्यात औरंगजेबाच्या आज्ञेची भर पडल्याने त्याने विजापूरकडे आपला मोर्चा वळवला.       
    दिलेरने विजापुरास वेढा घालताच अपेक्षेप्रमाणे मसूदने परत एकदा शिवाजीकडे मदतीसाठी हात पसरले. शिवाजीनेही आपल्या मित्राची उपेक्षा न करता विजापूरचा वेढा लढवण्यास उपयुक्त अशी सामग्री व काही सैन्य मसूदच्या मदतीस रवाना केले व स्वतः तुर्की प्रदेशात चढाईच्या उद्देशाने स्वारी केली.
    या चढाईमध्ये तुर्की प्रदेशातील धनिक, व्यापारी शहरं लुटण्यात आली. वरवर पाहता शिवाजीचा हा खटाटोप विजापूर भोवताल दिलेरखानाचा वेढा उठवण्यासाठी सुरु असला तरी यामध्ये शिवाजीचे एक अंतस्थ राजकारण होते.

    औरंगाबाद येथे दख्खन सुभेदार तुर्की शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलमचा मुक्काम होता. शिवाजीने तुर्की प्रदेशातील लुटीसाठी निवडलेली शहरं औरंगाबाद सभोवतालची होती. खुद्द शिवाजी औरंगाबाद नजीक जालन्यात लुटीनिमित्त चार दिवस तळ ठोकून बसला होता.
    निव्वळ सुडाची बाब असती तर औरंगाबादेवर झडप घालून शिवाजी मुअज्जमला पकडू शकत होता. कारण स्वसंरक्षणापुरती सोडली तर अतिरिक्त फौज यावेळी शहजाद्याकडे नव्हती. मुलखात पसरलेल्या तुर्की सेनानींना, विशेषतः दिलेरला शिवाजीच्या बंदोबस्ताकरता तातडीने मागे फिरण्याचे हुकुम सोडून तो स्वस्थ बसला होता.

    मुअज्जम - शिवाजीचे काही अंतस्थ राजकारण सांगणारे अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत. समकालीन इंग्रजी व्यापाऱ्यांनी केलेल्या नोंदी अफवेच्या स्वरूपातील असल्या तरी प्रत्यक्षातील घटनाक्रम पाहता त्यात थोडंफार तथ्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
    कारण, शहजाद्याकडे पुरेशी फौज नाही हे माहिती असूनही औरंगाबादेवर थेट चढाई करण्याऐवजी शिवाजीने चार दिवस जालन्यात व्यर्थ का दवडावेत ? दोन दिवस जरी शिवाजीने औरंगाबादेस कोंडून धरले असते तर दिलेरखानास विजापूरचा वेढा उठवून शहजाद्याच्या बचावासाठी मागे फिरणे भाग होते. परंतु शिवाजीने असे केलेले दिसत नाही. का ?         
    विजापूरचा वेढा उठवण्यापेक्षा शहजादा आपणहून चालत आपल्या गोटात कसा येईल याकडे शिवाजीचे अधिक लक्ष होते. त्याने शहजाद्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले असते तर ते केवळ शिवाजीचे बंड ठरून केवळ तुर्की साम्राज्यच नव्हे तर दख्खनमधील त्याचे मित्र देखील त्याच्या विरोधात गेले असते. परंतु खासा शहजादा जर स्वतःच्या पायांनी चालून मराठ्यांच्या छावणीत येत तर .. !

    बापाच्या विरोधात उघडपणे बंड पुकारण्याची मुअज्जमची तयारी नसल्याने शिवाजीचा डाव फासून त्याला जालन्याहुन पट्टागडाकडे माघार घ्यावी लागली.
    शिवाजी जालन्याहून निघाला त्याच सुमारास दिलेरखान शिवाजीच्या बंदोबस्तासाठी विजापूरचा वेढा उठवून निघाला. खानाचा हेतू शिवाजीला वाटेत गाठून त्याचा संहार करण्याचा असल्याने संभाजीला आपल्या बापाच्या बचावासाठी तुर्की मैत्रीचा बुरखा फेकून देणे भाग पडले व संधी पाहून तो अथणीच्या मुक्कामाहून पळून विजापुरास गेला. त्याच्यासोबत सर्जाखानही असल्याने दिलेरखानास एकंदर डावाची उमज पडून त्याने शिवाजीचा नाद सोडत विजापुराकडे आपली निशाणे वळवली. दिलेर फिरून विजापूरच्या वेढ्यास गुंतल्याने शिवाजीला स्वराज्यात परतण्याचा मोकळा रस्ता प्राप्त झाला व राज्यात परतून तो पन्हाळ्याकडे निघाला. तत्पूर्वीच दिलेरखान विजापूर नजीक येताच संभाजी विजापुरातून निघून पन्हाळ्यास पोहोचला होता.

    फार थोड्याच समकालीन धुरिणांना शिवाजी - संभाजी या पिता - पुत्राचे कारस्थान उमगले होते. शिवाजीच्या दरबारातील मंत्रीगण वा खुद्द कुटुंबीय यांपैकी कोणाला याची कल्पना होती असे दिसत नाही. शत्रू पक्षाकडे पाहिलं तर अखेरच्या टप्प्यावर दिलेरला या डावाची कुणकुण लागल्याचे दिसते. मुअज्जम तर यापासून सर्वथा अनभिज्ञच दिसतो. या राजकारणात दिलेरपासून शिवाजी, विजापूरकर यांचे संरक्षण करणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. मसूदला विजापूरचा बचाव यापलीकडे दुसरे काही सुचत नव्हते कि दिसते नव्हते. राहता राहिला औरंगजेब !
    संभाजी आपल्या बापावर रुसून दिलेरखानास सामील झाला यावर औरंगचा पूर्णपणे विश्वास बसल्याचे दिसून येत नाही. पिता - पुत्रातील दुरावा हा खरोखरचा कि नाटकी, याची उमग पडेपर्यंत त्याने संभाजीला मनसबदारी देण्यापलीकडे कसलीही हालचाल केली नाही वा त्यास अवास्तव महत्वही दिले नाही. उलट पूर्ववत आखलेल्या बेताप्रमाणे दिलेरने आपली दख्खन मोहीम पार पाडावी --- हर प्रयत्न प्रथम आदिलशाही नष्ट करावी यावरच त्याने भर दिला.            

    पुढे विजापूरचा वेढा उठवून दिलेरखान ज्यावेळी बादशहाच्या भेटीस गेला तेव्हा बादशाहने त्याच्याकडे फक्त विजापूरच्या अपयशाची चौकशी केली. संभाजी विषयी त्याने एक शब्दही विचारला नाही. यावरून औरंगने संभाजीला कैद करण्याचा निर्णय घेतल्याची सभासद बखरीची थाप परस्पर निकाली निघते.
    शिवाजी बद्दल मात्र औरंगच्या मनी संशय कायम होता व जेव्हा औरंगाबादेनजीक शिवाजीने चार दिवस मुक्काम ठोकून जालन्याची लुटालूट केली, त्या सुमारास शहजादा मुअज्जम - शिवाजी संबंधी उठलेल्या अफवांनी तो सावध झाला. परंतु उतावीळपणे कसलीच हालचाल वा आज्ञा न करता त्याने प्रथम शिवाजीच्या मोहिमांचे वादळ शांत होऊ दिले व नंतर त्याने मुअज्जम व दिलेरखानास आपल्यापाशी बोलावत खान जहान बहादूरखानास दख्खनची सुभेदारी दिली. ( स. १६८० मे )

    या सर्व घडामोडीत संभाजीला हाताशी धरून शिवाजीने नेमका कोणता कट आखला होता ? त्याला काय साध्य करायचे होते व पदरी काय पडले याची आपण चर्चा करू.

     दि. २४ नोव्हेंबर १६७२ रोजी अली आदिलशहाचा मृत्यू झाल्यापासून औरंग आणि शिवाजी आपापल्या परीने आदिलशाही बुडवण्यास झटत होते. तुर्कांनी विजापूर घेतल्यास स. १६३० - ३६ ची स्थिती पुन्हा निर्माण होण्याचा धोका होता. तेव्हा आपणच ते जिंकून घ्यावे असा शिवाजीचा या काळातील बेत दिसतो. यादृष्टीने त्याने मसूद सोबत कधी मैत्रीचे तर कधी शत्रुत्वाचे धोरण स्वीकारले. परंतु मसूदचे शौर्य आणि प्रसंगावधान यामुळे विजापूर घेण्याची शिवाजीची इच्छा अपुरीच राहिली. मात्र, यामुळे माघार न घेता शिवाजीने आपले दुसरे राजकारण संभाजी मार्फत पुढे रेटले.

    तुर्की मनसबदार बनलेल्या संभाजीला तुर्की मनसबदारांशी हस्ते - परहस्ते संधान जोडणे जितके सोपे होते तितके शिवाजीस शक्य नव्हते. यातूनच मग शहजादा मुअज्जमला औरंगाबादेतून उचलण्याचा डाव रचण्यात आला. शहजाद्याचा नावे बंडावा उभारल्यास हिंदुस्थानात राजपुतांवर जे औरंगचे लष्करी दडपण येऊन बसले होते, ते दूर होण्याचा संभव होता. शिवाय एकाच वेळी हिंदुस्थान, दख्खनमध्ये औरंगजेब विरुद्ध बंड सुरु झाल्यास तो एकटा किती ठिकाणी पुरा पडणार होता ?
सारांश, तुर्की दरबारातील मनसबदार आजवर जे शहजाद्यांना हाताशी धरून वारसा कलहाचा लाभ घेत आले ; तोच लाभ, फायदा राजपुतांच्या साथीने शिवाजी घेऊ इच्छित होता.

    आदिलशाही मोडकळीस आलेली. कुतुबशाहीला कोणत्या तरी बलदंडाच्या आश्रयाने दिवस कंठणे इतकेच माहीत. अशा स्थितीत दख्खनमधील राजकारणाचे प्रमुखपद आपणहून चालत शिवाजीकडे येत असल्यास तो त्याचा अव्हेर का बरं करेल ?

    मुअज्जमला हाताशी धरत शिवाजीने संधीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु मुअज्जमने आयत्या वेळी बाहेर पडण्यास नकार दिल्याने हि योजना बारगळली. परंतु राजकारण तसेच चालू राहिले. ज्याचा परिणाम म्हणजे स. १६८१ जाने. मध्ये हिंदुस्थानात शहजादा अकबर, राजपुतांच्या बरोबरीने औरंग विरुद्ध बंड करून उभा राहिला.

    अकबराच्या बंडाव्यात शिवाजीची भूमिका दख्खनमधील मदतनीसाची होती. परंतु त्याच्या मृत्यूमुळे हि जबाबदारी संभाजीवर येऊन पडली व ती त्याने सर्व सामर्थ्यानिशी पारही पाडली. यावेळी संभाजी -  राजपुतांचा जो पत्रव्यवहार झाला, त्यातही अशाच कट - कारस्थानांचा उल्लेख येतो.
तात्पर्य, संभाजीला हाताशी धरत शिवाजीने खेळवलेलं हे अखेरचं राजकारण म्हणजे औरंगच्या तुर्की साम्राज्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास होता.

    राजपुतान्यातील बंडाव्यात फसलेला अकबर जेव्हा पळून आश्रयासाठी दख्खनमध्ये धावला तेव्हा औरंगला या राजकारणाची ओळख पटून त्याने तेव्हाच संभाजी सहित समूळ मराठा राजवट उखडून काढण्याचा निर्णय घेतला !

    शिवाजी - संभाजीची भेट :- स. १६७७ च्या अखेरीस कर्नाटक स्वारीवर जाण्यापूर्वी शिवाजी - संभाजीची भेट झाली होती. त्यानंतर इतिहासात नमूद असलेली दुसरी व अखेरची भेट स. १६८० च्या जानेवारी महिन्यात घडून आली. या भेटी दरम्यान पिता - पुत्राची नेमकी काय, कोणत्या विषयांवर बोलणी झाली हे आज इतिहासकारांस अज्ञात आहे. बव्हंशी इतिहासकार या संदर्भात सभासद बखर काही अंशी प्रमाण मानतात. परंतु सभासद बखरीतील या भेटीचे व नंतर शिवाजीच्या मृत्यूसमयीचे वर्णन आले आहे, ते पाहता शिवाजी - संभाजी भेटीचा प्रसंग सभासदाने कल्पनेनेच रंगवल्याचे सिद्ध होते.

    पन्हाळ्यावरील भेटीत पिता - पुत्रांचा पुढील राजकीय उद्योगाच्या दृष्टीने बराच खल झाला असावा. राजपुतान्यातील औरंगची मोहीम लांबत चालली असली तरी ती संपुष्टात येण्यापूर्वी दख्खनमधून विजापूरचा काटा काढणे आवश्यक होते. कारण ढासळत चाललेल्या विजापूरला पुन्हा सामर्थ्याचे, वैभवाचे दिवस आणेल असा एकही मुत्सद्दी, वीर त्या दरबारी नव्हता. आणि शिवाजी ऐवजी औरंगने जर आदिलशाहीचा घास घेतला तर गोवळकोंडा - रायगड दरम्यान पाचर मारली जाऊन एकाकी पडलेला कुतुब स्वाभाविक तुर्की छ्त्राच्या आश्रयाखाली गेला असता व दख्खनच्या राजकारणात पूर्णतः एकाकी पडण्याची वेळ शिवाजीवर ओढवली असती. शिवाय कोकण किनारपट्टीने सिद्दी, युरोपियन व्यापारी, लहान - मोठे संस्थानिक यांचे उपद्रव होतेच. खेरीज कर्नाटकातही अजून म्हणावा तसा सुरळीत अंमल बसलेला नव्हता. हे सर्व लक्षात घेता, तसेच संभाव्य औरंगच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या साम्राज्याच्या रक्षणाची तसेच वृद्धीची योजना शिवाजीला आखणे भाग होते. याबद्दल प्रथम खल त्याने संभाजी सोबत केला व त्यास पन्हाळ्यावर अधिकारपदावर ठेवून तो रायगडी परतला.

    शिवाजीचे निधन :- रायगडी परतल्यावर शिवाजीने दि. ७ मार्च रोजी प्रथम राजारामची मुंज व दि. १५ मार्च  रोजी त्याचा विवाह सोहळा उरकून घेतला. मृत सेनापती प्रतापराव गुजरची कन्या सून म्हणून पसंत करण्यात आली.
दि. २० मार्च १६८० रोजी सूर्यग्रहण होते.   
दि. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजीचा मृत्यू झाला.

    धाकट्या भावाची मुंज तसेच विवाह प्रसंगी संभाजी हजर नसल्याने बखरकारांनी अनेक तर्क कुतर्क दिले आहेत. परंतु त्यात मला काही तथ्य दिसत नाही. मात्र इतिहासकारांनीही ते ग्राह्य धरावेत याचे आश्चर्य जरूर वाटते.

    मुळात रायगडी परतल्यापासून शिवाजी - संभाजीचा दैनंदिन पत्रव्यवहार उपलब्ध असायला हवा. तो कुठे गेला हा प्रश्न इतिहासकारांना पडत नाही. शिवाजी ज्वराने आजारी पडला व मरण पावला हि केवळ एका बखर - शकावलीतील नोंद. तिच्यावर आम्हाला विसंबावे लागते. मात्र शिवाजी हा स्वतंत्र अभिषिक्त राजा होता. देशी देशीचे व्यापारी, मांडलिकांचे हस्तक त्याच्या दरबारी हजर होते. त्यांनी आपापल्या मालकांना शिवाजीच्या प्रकृती विषयी कालवलेली वर्तमाने कुठे गेली ? याचा शोध घेण्याची बुद्धी होत नाही. ' परंतु ज्याअर्थी संभाजी राजारामाच्या मुंज वा विवाहास हजर राहू शकला नाही त्याअर्थी त्यास स्वतंत्र राज्य हवे होते,' या बखरींच्या शेऱ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावासा वाटतो. धन्य आहे डोळस इतिहास संशोधन - लेखनाची !!           

    पन्हाळ्यावर दाखल झाल्यापासून संभाजी आपल्या अधिकारपदावर रुजू झाला होता. राजापुरास आलेल्या फ्रेंच बोटींवर त्याने केलेल्या कारवाईत शिवाजीने बिलकुल हस्तक्षेप न केल्याचे दिसून येते. म्हणजे बाप - लेकात दुरावा आहे, हा जो समज तत्कालीन लोकांत प्रचलित असेल तर तो दूर करण्यास हि घटना पुरेशी आहे. संभाजीला अधिकारपदावर फिरून घेतल्याने मंत्री वा सरदार नाराज झाल्याचा उल्लेखही प्राप्त होत नाही, यावरून संभाजी दिलेरखानाच्या गोटात गेल्याबद्दल बखारींनी निर्माण केलेला गवगवा आपोआप निरर्थक ठरतो.

    शिवाजीच्या मृत्यूविषयी वेळोवेळी शंका उपस्थित केली गेली असून त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून शिवाजीचा खून करण्यात आला होता, अशा आशयाची विधानं केली जात आहेत. मात्र हा खून केला असल्यास त्याचे कटवाले कोण होते ? याविषयी नेहमी मौन बाळगलं जातं.
    यामागील महत्वाचं कारण म्हणजे शिवाजीच्या आजारपणापासून ते मृत्यूपर्यंतची सरकारी कागदपत्रांत उपलब्ध नसलेली नोंद. आधी म्हटल्याप्रमाणे रायगडाच्या दरबारातून इतर ठिकाणच्या वकिलांनी जे वृत्तांत पाठवले त्याचा आम्ही शोधच घेतलेला नाही. आमची येऊन जाऊन सारी मदार ती सभासद बखरीतील ज्वराच्या उल्लेखावर व पसासं ले. क्र. २२५३ ची नोंद. ज्यामध्ये ' शिवाजी राजा मेला अशी खात्रीलायक माहिती आम्हांला मिळाली आहे. १२ दिवस आजारी पडून रक्तातिसाराने तो मेला असे म्हणतात. त्याला मरून आज तेवीस दिवस झाले. यापुढे राजकारणाचा बनाव होईल तों कळवू. तूर्त सर्वत्र शांतता असून संभाजी राजा पन्हाळ्यावर आहे. ' म्हणजे रक्तातिसाराबाबत इंग्रजही ठाम नाहीत.

   शिवचरित्रातील सर्वात विश्वसनीय समकालीन साधनग्रंथ म्हणजे जेधे शकावली व करीना. या दोन्हीमध्ये शिवाजी आजारी पडल्याचा उल्लेख नसून तिथे थेट त्याच्या मृत्यूची बातमी दिली आहे.
मिळून तत्कालीन अव्वल समजल्या जाणाऱ्या पुराव्यांत निश्चितच विसंगती आहे. खेरीज शिवाजीच्या मृत्यू पश्चात संभाजीला बाजूला ठेवून राजारामास पुढे करत राज्यकारभार हाती घेण्याचा जो मंत्री - सरदारांनी प्रयत्न केला, तो पाहता हा कट शिवाजीच्या हयातीतच सिद्ध झाल्याचे स्पष्ट होते. परंतु येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो. कटाचे प्रेरक, उत्पादक, सूत्रधार नेमके कोण ?

    शिवाजीच्या अंतकाळातील दबारी कामकाजाची, घटनांची कसलीच नोंद आजमितीस उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे शिवाजीवर करण्यात आलेल्या औषधोपचारांची देखील माहिती मिळत नसल्याने शिवाजीच्या मृत्यू संबधी अधिक चर्चा करता येत नाही. फक्त या स्थळी सुचणारे एक दोन मुद्दे मांडून मी या प्रकरणाचा समारोप करतो.

(१) स. १६७८ - ७९ मध्ये दिलेरखानाने मराठेशाहीत चालवलेल्या फितुरीला बरेच सरदार - मंत्री बळी पडले होते.

(२) शिवाजीचा मृत्यू व त्यानंतरची कट कारस्थाने हि कोणा एका व्यक्ती वा गटाकडून झालेली नसून यात अनेक गट, विविध हेतूंनी प्रेरित माणसं कार्यरत होती. ज्याप्रमाणे पुढे पेशवाईत नारायणराव पेशव्याच्या खुनाचे कारस्थान घडले तसाच काहीसा प्रकार यावेळी झालेला दिसतो.
                                  
                                    
                                      उपसंहार

     सम्राट शिवाजी या लेखमालिकेचा अखेरचा भाग येथे प्रकाशित करत आहे. वास्तविक दोन तीन महिन्यांपूर्वीच हे काम व्हायला हवं होतं पण.. असो. इतिहास लेखनाच्या दृष्टीने पाहता हि लेखमालिका अत्यंत सदोष आहे. यात ऐतिहासिक घटनांच्या तारखा काही ठिकाणी चुकलेल्या आहेत. शिवाय ऐतिहासिक घटनांचे अन्वयार्थ सर्वच स्थळी अचूक लागले आहेत असेही नाही. काही काही ठिकाणी घटनांची मांडणी ज्या पद्धतीने व्हायला हवी होती, तशी झालेली नाही. उदाहरणार्थ सम्राट शिवाजी या लेखमालिकेचं शीर्षक असताना, ज्या कर्नाटक स्वारीमुळे शिवाजी सम्राट पदास पोहोचला त्या स्वारीचे यथार्थ वर्णन, विश्लेषण माझ्या हातून होऊ शकले नाही. असो.
सम्राट शिवाजीचं लेखन करताना शिवचरित्राचा जो काही अभ्यास झाला, त्यावरून शिवाजी संबंधी जे काही माझं मत बनलं आहे, ते मी यास्थळी मांडत आहे.

    एक राजकारणी व्यक्ती म्हणून शिवाजी आपल्या समकालीन धुरिणांइतकाच कुटील, पाताळयंत्री, खोल मनाचा व आतल्या गाठीचा इसम होता. संधीसाधुपणामध्ये याची बरोबरी क्वचितच कोणी करू शकेल. केवळ तुलनात्मक उदाहरण द्यायचं झाल्यास याबाबतीत नजीबखानाचाच निर्देश करता येईल.
शौर्य, मुत्सद्दीपणा, व्यवहार चतुराई बाबत एक हैदरअलीच त्याची थोडीफार बरोबरी करू शकतो असे म्हणता येईल.
    
     प्रजाहितादक्षतेच्या बाबतीत तो त्याच्या समकालीनांप्रमाणेच असून त्याबाबत त्याची थोरवी अद्यापि गायली जाते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जनतेला जाच होऊ नये याकरता तो काळजी घेत असे. वेळप्रसंगी अशा अधिकाऱ्यांना त्याने ताकीदपत्रे पाठवल्याचे जसे इतिहासात नमूद आहे तद्वत दिलेल्या शिक्षाही.
    
      लष्कराची शिस्त इतर समकालीनांप्रमाणेच शिवाजीचीही अत्यंत करडी होती. त्यात विशेष भर त्याच्या स्वतःच्या अलौकिक लष्करी ज्ञानाची पडली. शत्रू प्रदेशातील लुटीचे नियम, वर्तन आगाऊ निश्चित ठरवण्यात येऊ लागले. शत्रूशी सामना करताना जवळच्या मर्यादित साधन सामग्रीचा पुरेपूर वापर कसा होईल यावर भर देण्यात येऊ लागला. मोहीम जवळच्या प्रदेशात असो वा लांबच्या, छावणीकरता अत्यावश्यक तेवढेच सामान जवळ बाळगण्याचा दंडक होता.

     धार्मिक धोरणाच्या बाबतीत पाहिले असता शिवाजीचे धोरण अकबराप्रमाणे लवचिक दिसते. खासा शिवाजी हिंदू धर्मीय. शिव - शक्ती हे त्याचे दैवत. तसे पाहिले तर तो शाक्त पंथीय. त्याच्यामुळेच तांत्रिकांचा दरबारात वरचष्मा होऊन राज्याभिषेकामुळे पुढे वैदिकांशी झगडा जुंपला. पैकी, युवराजपदी बसलेल्या संभाजीने शाक्तांना अधिक महत्त्व दिल्याने वैदिकजन त्याच्या विरोधात जाऊन त्याची पुढील सर्व कारकीर्द अंतर्गत बंडाळीने ग्रासून गेली. मात्र शिवाजीच्या काळात वैदिकांना त्यास उघड विरोध करण्याचे धैर्य झाले नाही. शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात बव्हंशी भरणा वैदिक धर्मियांचा होता. शिवाजीच्या प्रथम वैदिक राज्याभिषेकामुळे ते सुखावले गेले असले तरी द्वितीय तांत्रिक अभिषेकाने त्यांच्यात खळबळ माजली.

     राज्याभिषेकासारखे निवांत समयी करायचे विधी त्यावेळच्या धावपळीत शिवाजीने दोनदा लागोपाठ उरकून घेतले. यावरून या दोन्हींचे महत्त्व समसमानच मानले पाहिजे. केवळ घरगुती धार्मिक कार्याप्रमाणे त्याकडे पाहता येत नाही.

    हिंदू, वैदिकांप्रमाणेच मुसलमान, ख्रिस्ती धर्मीयही शिवाजीचे नागरिक होत. परंतु लोकसंख्येच्या मानाने पाहता त्यांची संख्या हिंदूंपेक्षा कमी भरते. मात्र या धर्मियांच्या सत्ता शिवाजीच्या राज्यासभोवताली घेरून होत्या हे विसरता येत नाही व जरी त्या बलिष्ठ वा तुल्यबळ असल्या तरी शिवाजीच्या राज्यातील गैरहिंदूंनी शिवाजी विरुद्ध बंडावा, उठाव केल्याचे उदाहरण आढळत नाही. यावरून त्याचे धार्मिक धोरण लक्षात यावे.

    राज्याच्या आर्थिक बाबीकडे शिवाजीचे बरेच लक्ष होते. विना अर्थप्राप्ती राज्यकारभार चालवणे शक्य नाही याची शिवाजीला जाणीव होती. त्याच्या राज्याचे आरंभीचे एकूण क्षेत्रफळ व त्यातील मिळणारे उत्पन्न लक्षात घेता, निर्वाह तसेच वृद्धीकरता त्यास लुटीवर अवलंबून राहणे भाग होते व तोच पर्याय त्याने निवडला. याचेच रुपांतर पुढे चौथाई व त्यानिमित्ताने प्रदेशवृद्धी धोरणात झाले.
व्यापार वृद्धीकडे शिवाजीचे बरेच लक्ष असल्याचे दिसून येते. विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे भूमार्गापेक्षा जलमार्गाने होणारा व्यापार त्यास फायदेशीर ठरून त्यानिमिताने आरमाराचीही उभारणी झाली.

    तत्कालीन समाजजीवनाची समग्र माहिती देणारे साधन सध्या तरी आपणांस उपलब्ध नसल्याने तत्कालीन समाजजीवनातील प्रथा, परंपरा व त्यात शिवाजीने केलेले बदल, हस्तक्षेप आणि त्यांचे परिणाम यासंबंधी चर्चा करणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ राजकीय कर्तुत्वाच्या बळावरच आपणांस शिवाजीच्या कर्तबगारीचे मूल्यमापन करता येते व त्या आघाडीवर त्याचे असामान्यत्व, लोकोत्तर वगैरे गुण सर्वमान्य आहेतच.  
                                                                      ( समाप्त )                 

२ टिप्पण्या:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

संजयजी, आपल्याला या शिवचरित्र लेखनाबद्दल अभिनंदन... उपसंहार हा या कथनाचे सार दर्शवतो. आपणास कदाचित माहित असेल की आम्ही मिलिटरी कमांडर्स कंबाइन्ड म्हणून शिवकालीन लढ्यांचा विचार करून आजच्या मिलिटरी कमांडरांना तोच लढा प्लान करून तडीस नेण्यासाठी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहेत. यात आपल्या सहकार्याने काही भर घालता आली तर स्वागत करू. मी 9881901049 वर पुण्यात विमान नगर भागात वास्तवास आहे.

Unknown म्हणाले...

खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.