मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

पानिपत ( भाग १ )






    पानिपत मोहिमेतील किंबहुना एकूणच हिंदुस्थान स्वाऱ्यांतील अब्दालीचे राजकीय, लष्करी डावपेच विशेष अभ्यासनीय आहेत. रघुनाथरावाच्या अटक मोहिमे आधी अब्दाली जेव्हा चौथ्यांदा हिंदुस्थानात आला त्यावेळी त्याने राजपूत, रोहिल्यांसोबत दिल्लीच्या तुर्की बादशाहीचाही पाठींबा मिळवला होता. त्यामुळेच नजीक असतानाही मल्हारराव होळकराने रघुनाथरावास अब्दालीपासून दूर ठेवले व स्वतःही त्याच्या सामन्यास गेला नाही. अर्थात यामागे अपुरे सैन्य, द्रव्याची कमतरता, रसदपुरवठा इ. कारणांचीही परंपरा आहेच.

    कोणतीही लष्करी कारवाई यशस्वी होण्यासाठी राजकारणाची पूर्वतयारी आवश्यक असते. यावेळी आणि नंतरही -- पेशव्यांपेक्षा अब्दाली या क्षेत्रात भारी पडल्याने पेशव्यांना त्याच्याकडून फटके खाण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. अपवाद अटक स्वारीचा !

    अटक स्वारी समयी अब्दाली मायदेशी परतला होता. तुर्की बादशाहीचा वजीर गाजीउद्दीन पुन्हा एकदा पेशव्याकडे मैत्रीचा हात करत होता. सुरजमल जाटालाही अब्दालीचा तडाखा बसल्याने त्यानेही पेशव्याच्या पक्षास आपला पाठींबा दर्शवला. अशा स्थितीत दिल्लीच्या राजकारणाची सूत्रे पेशव्याच्या हाती येणे स्वाभाविक होते व तशी ती आलीही.
    तत्पूर्वी दिल्लीचा नजीबखानाकडून ताबा घेणे आवश्यक होते व विठ्ठल शिवदेवने तो घेतलाही. या प्रसंगी नजीबखान जिवंत रघुनाथरावाच्या हाती सापडल्याचा उल्लेख असलेली अस्सल कागदपत्रं प्रकाशित झाल्याचे माझ्या तरी वाचनात न आल्याने, त्या भाकडकथेवर विश्वास न ठेवलेलाच बरा.
खासा वजीर पेशव्याच्या पक्षास मिळाला म्हणजेच तुर्की बादशाह देखील त्याच बाजूला असल्याचे पाहून अहमदखान बंगश सारखे पठाण देखील रघुनाथरावास येऊन सामील झाले. राजपुतांपैकी माधोसिंगास नुकतेच होळकराने रगडल्याने तिकडून दिल्लीच्या मसलतीस धक्का बसण्याचे भय उरले नव्हते. अलासिंग जाटासारखे पंजाबातील जमीनदार ( देशी वतनदारांप्रमाणे ) संधीसाधू असल्याने त्यांनीही कल पाहून मराठी सरदारांचा पक्ष घेतला. परिणामी, रघुनाथरावणास अटक स्वारीच्या निमित्ताने अभूतपूर्व यश प्राप्त झाले.
    यावेळी अब्दाली त्याच्या राज्या शेजारील इराणी तसेच पंजाबातील शीख, तुर्क आणि पेशवे या शत्रूंनी असंघटितपणे, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यांनी व राज्यातील बंडाळ्यांनी ग्रासला होता. त्यामुळे रघुनाथरावाच्या स्वारीचा प्रतिकार त्याच्या हातून होऊ शकला नाही.

    अटकेचे पुण्य पदरी घेऊन रघुनाथराव - होळकर देशी परतले व पेशव्याने हिंदुस्थानची जबाबदारी दत्ताजी शिंद्यावर सोपवली. यावेळी पंजाबचा बंदोबस्त, गाजीउद्दीनकडून थकीत रकमेची वसुली करणे व ते न झाल्यास लखनऊचा नबाब सुजाउद्दौलाकडून वजिरीच्या बदल्यात रोख रक्कम घेणे, खेरीज सुजाकडून त्याच्या राज्यात मोडणाऱ्या तीर्थस्थळांचा कबजा घेणे, नजीबचा काटा काढणे व बंगाल - पाटणा प्रांती स्वारी करून पेशव्याचे कर्ज वापरण्यासाठी द्रव्य संपादणे इ. कामे त्याने शिंद्याच्या गळ्यात बांधली होती.
    शिंदेशाही इतिहासाची साधनं पाहिली तर हि सर्व कामे पार पाडण्याइतकी लष्करी ताकद दत्ताजी शिंद्याकडे निश्चितच होती. परंतु कुठेतरी तो राजकारणात कमी पडला. अर्थात याचा बराचसा दोष पेशवेबंधूं -- नानासाहेब व रघुनाथरावाकडे जातो. अटक मोहीम ज्यांनी पार पाडली ते सर्व सरदार, मुत्सद्दी मायदेशी परतून त्यांच्या बदली शिंद्याचे नवीन मुत्सद्दी, सरदार राजकारणात उतरल्याने आधीचा बसलेला जम बिघडणे स्वाभाविक होते व तसेच घडून आले.

    दत्ताजीने पंजाबात फेरी मारून तेथील बंदोबस्ताची पाहणी केली. अब्दालीच्या राज्यात अद्यापि बंडाळ्या व परक्या शत्रूचे आक्रमण असल्याने नजीकच्या काळात तरी त्याच्या स्वारीची धास्ती उरली नव्हती. तेव्हा दत्ताजीने नजीबचा काटा काढणे व बंगाल स्वारी हाती घेण्याचे योजले.
    पैकी नजीबचा बंदोबस्त करण्यासाठी सुजाला -- लखनौकर नबाबाला आपल्या पक्षास मिळवून घेणे गरजेचे होते. त्याकरता गाजीउद्दीनला वजिरीवरून हटवून सुजाला वजीर बनवणे आवश्यक होते. खेरीज सुजाच्या इतरही काही मागण्या असाव्यात... परंतु या राजकारणाचे फलित असे कि, वजिरी गाजीउद्दीनकडेच राहून बंगालसोबत सुजाच्या मुलखावर स्वारी करण्याचा बेत दत्ताजीने आखला. यामुळे नजीबचा बंदोबस्त बाजूला राहून उलट त्याच्याशीच मैत्री करणे भाग पडले.      
    भाऊ बखरकारास राजकारणातील हा तिढा माहिती होता. परंतु नजीब सोबत दत्ताजीचे राजकारण फसल्याने या अपयशाचे खापर त्याने होळकराच्या कपोलकल्पित धोतरबडवी सल्ल्यावर फोडले. जिथे माळव्याच्या पुढे स्वारी करताना मराठी सरदारांना धा वेळा विचार करावा लागत असे, तिथे हिंदुस्थान प्रांती नजीब तेवढी एक खळी राहिली अशा आशयाच्या बखर विधानावर विश्वास ठेवणाऱ्यांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे !

    नजीबचा एकूण वर्तनक्रम पाहता त्याच्या योग्यतेची, गुणांची खरी ओळख मल्हारराव होळकराखेरीज इतर मराठी मुत्सद्दी तथा पेशव्यांना झाली नाही असेच म्हणावे लागेल. नजीबखान हा हैदर प्रमाणेच लढवय्या, कारस्थानी, महत्त्वाकांक्षी पुरुष होता. कसलीही राजघराण्याची पूर्वपरंपरा नसताना केवळ अंगच्या कर्तबगारीवर त्याने रोहिलखंडात आपले स्वतंत्र बस्तान बसवले व अल्पावधीत दिल्ली दरबारातील वजनदार मुत्सद्दी - उमरावांत त्याचे नाव झळकू लागले. अहमदखान बंगश वा हाफिज रहमत सारखे पठाण - रोहिले आपापल्या प्रदेशात शेर राहिले. परंतु दिल्ली दरबारात त्यांना जी प्रतिष्ठा लाभली नाही, ती नजीबला मिळाली. परंतु व्यक्तीच्या कर्तबगारीला काळाचे, मर्यादांचे बंधन असते. कसलीही योग्यता नसलेला सुजा वजिरीसाठी कायम चर्चेत राहतो व नजीबखान केवळ मीरबक्षीपदावर समाधानी राहतो, हा विरोधाभास दिसला नसता.  
    
    गाजीउद्दीन हा कपट - कारस्थानांत, राजकारणात वाकबार होता. परंतु घेतला पक्ष शेवटास नेण्याची त्याची हिंमत, धडाडी नव्हती. पेशवा आला कि त्याच्यापुढे नाच, अब्दाली आला कि त्याच्यासमोर लोटांगण घाल अशी त्याची धरसोड कायम राहिली.
    तसं पाहिलं तर गाजीउद्दीनची कड घेऊन पेशव्यानेही फार काही साध्य केल्याचे दिसून येत नाही. केवळ दख्खनमधील निजामाला चेपण्यासाठी हाताशी एक डाव असावा म्हणून पेशव्याने त्यास जवळ केले म्हणावे तर हा डाव त्याने कधी अंमलात आणल्याचे दिसून येत नाही.
    गाजीउद्दीनचे घराणे औरंगजेबपासून बादशाही सेवेत असल्याने व खुद्द औरंगजेबाची या घराण्यावर कृपादृष्टी असल्याने मोठे मातबर समजले जाई. त्यामुळे गाजीउद्दीनला वजीर बनवल्याने दरबारातील जुने वजनदार, प्रतिष्ठित उमराव, मुत्सद्दी आपल्या पक्षास चिटकून राहतील हा पेशव्याचा जो अंदाज होता, तो देखील परिणामांवरून विफल झाल्याचे दिसून येते.  
    फॉल ऑफ मुघल एम्पायर मधील गाजीउद्दीनचे राजकीय चरित्र पाहता या व्यक्तीची अधिकार लालसा तीव्रतर असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे तुर्की बादशाहीचा अभिमानही त्यास अतिशय होता. यामुळेच एकप्रकारे पेशव्याचा तो स्थापित असूनही प्रसंगी पेशव्याच्या विरोधात जाण्यास तो मागे पुढे पाहत नसे. अशा या गाजीउद्दीनला आळ्यात ठेवण्यासाठी नजीबसारखा दमदार मुत्सद्दी अनुकूल असणे आवश्यक होते. परंतु या बाबतीत पेशव्याने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

    दिल्लीचा बंदोबस्त करताना अब्दालीलाही हाच प्रश्न पडला होता कि, नजीब वा गाजीउद्दीन ? त्याने गाजीउद्दीनला वजिरी व नजीबला मीरबक्षी देत या प्रश्नाचा निकाल लावला. माझ्या मते, पेशव्यालाही याच प्रकारे हा तंटा सोडवून प्रथम पंजाबकडे लक्ष देता आले असते. एकदा पंजाबातील सत्ता स्थिर झाली कि, आतल्या बाजूला असलेल्या नजीब सारख्यांचे उपद्व्याप जागीच बंद पडण्याचा संभव अधिक होता. परंतु ही दूरदृष्टी पेशवे बंधूंत अजिबात नव्हती असे परिणामावरून म्हणावे लागते.    
    नजीबखानाला हाताशी धरण्यात दत्ताजीने चूक केली असे जरी म्हटले जात असले तरी वस्तुस्थिती हि आहे कि, नजीबचा वापर करून घेणे त्यास शक्य झाले नाही. उलट नजीबनेच त्याच्यावर मात करत त्याला कोंडीत धरले. इथे नजीबच्या राजकीय चतुराईला निश्चित दाद दिली पाहिजे. पूर्वेतिहास पाहिला तर सुजा त्याचा वैरी. परंतु दत्ताजीसोबत मैत्रीचा देखावा करत त्याने शुक्रतालावर शिंद्याला रोखत सुजावरील संकट स्वतःवर ओढवून घेतलं. पर्यायाने सुजाला नजीबच्या मदतीस जाण्याखेरीज दुसरा मार्गच उरला नाही.
    अर्थात, हि राजकारणं आधीपासूनच खेळत असली तरी योग्य वेळी आकारास येणे आवश्यक होते व याबाबतीत दत्ताजीपेक्षा नजीबचे दैव जोरावर होते. कारण याच काळात गाजीउद्दीनने दिल्लीच्या तख्तावरील बादशाह आलमगीर दुसरा, याचा खून करून त्याजागी शहाजहान सानी यांस बसवले. अर्थात, गाजीउद्दीन पेशव्याचा स्थापित असल्याने या कृत्याचा ठपका लौकिकात शिंद्याच्या माथी येऊन नजीबखान बादशाही संरक्षक तर दत्ताजी विरोधक बनला. राजकारणाचे संदर्भ सोयीनुसार कसे बदलतात, त्याचं हे एक समर्पक उदाहरण आहे.

    नजीबचा नक्षा उतरवण्यासाठी दत्ताजीने शुक्रताली आपला मोर्चा कायम ठेवत हरिद्वारवरून सैन्याची एक टोळी गंगापार रोहिल्यांच्या मुलखांत पाठवून त्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात आरंभी यश आले असले तरी ऐनवेळी सुजा रणात उतरल्याने शिंद्याच्या सैन्याला हरिद्वारहुन माघार घ्यावी लागली. यानंतर किरकोळ झुंज झटापटी चालून तहाच्या निष्फळ वाटाघाटी झाल्या खऱ्या, परंतु हा सर्व वेळकाढूपणा होता. कारण याच काळात अब्दाली पंजाबात उतरला होता. दत्ताजीच्या फसगतीस इथे खरा आरंभ होतो.

    पंजाबातून अब्दाली एकदम पुढे आला नाही. दिल्लीच्या भानगडीत पडण्याची त्याची यावेळी इच्छा दिसत नव्हती. परंतु नजीब आणि इतर बादशाही उमराव तसेच खुद्द शाही परिवारातील सदस्यांच्या पत्रव्यवहाराने दिल्लीकडे आकृष्ट झाले. शिवाय त्याच्या खर्चाची, रसदेची तरतूदही परस्पर होणार असल्याने मन बदलण्यास फार वेळ लागला नाही.
    
    दरम्यान दत्ताजी, अब्दाली सोबत नजीबची हातमिळवणी न व्हावी यासाठी प्रयत्नशील होता. याकरता  त्याने दिल्लीकडे माघार घेत अब्दालीला कुरुक्षेत्रावर घेरण्याचा प्रयत्न केला. त्या संग्रामात त्याला यशही बऱ्यापैकी मिळाले. परंतु अब्दालीने मुख्य लढाई टाळून यमुनापार होत रोहिल्यांशी हातमिळवणी केली. तेव्हा दिल्लीकडे माघार घेणे दत्ताजीस भाग पडले.

                                                                    ( क्रमशः )

३ टिप्पण्या:

Harshad Vaidya म्हणाले...

egarly waiting for next blog of this series

Unknown म्हणाले...

येन केन प्रकारे सर्व अपयशाचा हार पेशव्याच्या गळ्यात घालण्याचा ऐक फसलेला प्रयत्न.

प्रतीक पाटील म्हणाले...

मल्हारराव होळकर हे नजीबला धर्मपुत्र मानायचे आणि त्यांच्या मध्यस्थी मुळेच राघोबादादानी नजीबला जिवंत सोडलं..