विशेष सूचना :- वास्तविक हे समग्र लेखन पुस्तकरूपानेच प्रसिद्ध करण्याचा विचार होता परंतु अलीकडच्या काळातील प्रकृतीच्या वाढत्या कटकटी लक्षात घेता प्रास्ताविक मल्हारराव होळकर चरित्र माझ्या हातून कितपत पूर्ण होईल याविषयी शंकाच आहे. तेव्हा जेवढं लेखन माझ्या हातून झालं आहे, होईल ते येथे प्रसिद्ध करण्यात येईल. वाचकांना एकच नम्र विनंती आहे. संकल्पित मल्हार चरित्राचा हा कच्चा खर्डा असल्याने त्यातील त्रुटींवर हवे तर संदर्भासह दुरुस्ती सुचवा परंतु नाहक वाद उत्पन्न करू नका. कळावे.
प्रास्ताविक
एक
धनगर समाजातील तरुण. ज्याचे वडील, तो
बाल्यावस्थेत असतानाच मरण पावले. पश्चात भाऊबंदकीस कंटाळून त्याची आई, दूर देशात आपल्या भावाकडे निर्वासित शरणार्थीप्रमाणे
जाते. स्थलांतराची प्रवृत्ती घराण्यात मूळचीच असली तरी एका वतनदाराचे अशा प्रकारे
स्थलांतर होत निर्वासित वा तत्कालीन परिभाषेत बोलायचे झाल्यास आश्रिताचे जीवन जगणे
त्या तरुणास निश्चितच खुपत असावे. परंतु मनातील उर्मींना आवर घालून योग्य संधीची वाट
पाहण्याची, त्या तरुणाची उपजतच वृत्ती होती. आणि
या वृत्तीस अनुसरून त्याने चालून आलेल्या संधीचा फायदा घेतला. नशिबाला कौल लावला.
दैवाचे फासे नेहमीच अनुकूल पडले असेही नाही. प्रसंगी सर्व वैभव, कीर्ती, संपत्ती बाजूला राहून स्वकीयांहाती कैद होण्याची वेळही येऊन ठेपली.
परंतु हा तरुण डगमगला नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाचा निधड्या छातीने सामना करत
त्याने आपल्या कर्तबगारीचा एक असा आदर्श घालून दिला कि, आजतागायत त्या तोडीचा, योग्यतेचा एकही लढवय्या, रणझुंजार, कल्पक सेनानी व चतुर राजकारणी केवळ
धनगरच नव्हे तर तमाम मराठी समुदायात निपजला नाही !
मल्हारराव
होळकर. एक अद्वितीय पुरुष. जो, कसलीही
राजकीय पार्श्वभूमी नसतानाही केवळ स्वकर्तुत्वाच्या बळावर, नामतः मराठी साम्राज्याचा एक बलदंड
सरदार परंतु प्रत्यक्षतः एका स्वतंत्र संस्थानाचा अधिपती बनला.
मल्हारराव
त्या काळाचे अपत्य असल्याने आपल्या समकालीनांप्रमाणेच तो देखील गुण - दोषांचा एक
पुतळा होता. त्यातही व्यक्तिशः सरदारांचे हितसंबंध व मुख्य दरबारचे ( पुणे नव्हे, सातारा ) राजकीय धोरण यांत कसलाच मेळ
नसल्याने सरदारांनी परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांची
अशी काही गुंतागुंत झालीए कि, त्याची
निरगाठ उकलून प्रत्येक प्रकरण स्वतंत्रतः उलगडून सांगणे शक्य नाही व त्यामुळेच त्या
त्या प्रकरणी अमुक एक व्यक्ती अंतिमतः निश्चित दोषी वा निर्दोषी आहे, असं म्हणणं शक्य नाही. तरीही मराठी
भाषेत इतिहास लेखनास आरंभ होताच ठोकळमानाने चांगल्या आणि वाईट, या दोन विभागांत ऐतिहासिक व्यक्तींची
विभागणी करत कोणाला चढवायचं न कोणाला ठोकायचं याची एक मार्गदर्शकपर वर्तनरेखाच
आखून दिलेली.
यामुळॆच
ऐतिहासिक ग्रंथांत थोरल्या बाजीरावाच्या काळात इमानी, शूर असणारा मल्हारराव होळकर नानासाहेब
पेशव्याच्या कारकिर्दीत मात्र -- ते देखील प्रामुख्याने स. १७५० नंतर -- लबाड, कपटी, विश्वासघातकी व राज्यद्रोही का बनतो, असा विचार इतिहास अभ्यासक तसेच वाचकांच्या मनाला शिवत नाही. बरं, हा प्रकार एकट्या मल्हाररावाच्या
बाबतीत आहे म्हणावं तर तसंही नाही. सखारामबापू सारखा धोरणी मुत्सद्दीही यातून
सुटला नाही. फार काय, रघुनाथरावासारख्या कर्तबगार सेनानींच्या पदरीदेखील या
पंक्तिप्रपंचाने राघोभरारी सोबत कलिपुरुष, भोळासांब सारख्या शेलक्या विशेषणांचा
वाटा आला. आणि याच पंक्तिप्रपंचामुळे नाना फडणवीससारख्या साधारण मुत्सद्द्याची
अद्वितीय अशी प्रतिमा बनवण्यात आली. या पार्श्वभूमीवर मल्हारराव होळकर व
त्याचे वंशज इतिहासकारांच्या या वैशिष्ट्यपूर्ण, तर्कहीन पंक्तिप्रपंचाने इतिहासात, समाजमनात बदनाम झाले त्यात आश्चर्य ते
काय !
इथवरच्या
विवेचनावरून प्रस्तुत चरित्रात मल्हारराव होळकराच्या जनमानसातील मलीन प्रतिमेस उजळ
करण्याचा प्रयत्न केलाय असा जर कोणाचा समज होणार असेल तर त्याने या भ्रमात राहू
नये. आमचा फक्त इतिहासातील मल्हाररावाच्या मूळ इतिहासाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा
-- सत्यचरित्र कथनाचा मानस आहे.
मुळात
कोणाची भलामण करणे वा त्याची काळीकुट्ट प्रतिमा उजळवून दाखवणे अथवा उगाचच
एखाद्याची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ पद्धतीने सादर करणे हा चरित्रलेखनामागील मुख्य
हेतूच नसतो. ज्यावेळी चरित्रकारास एखाद्या हयात / मृत व्यक्तीविषयी आंतरिक ओढ
वाटते वा त्याचे सबंध कर्तृत्व, आयुष्य त्यांस मोहून टाकते, त्यावेळेस ती व्यक्ती चरित्रकाराच्या
दृष्टीने चरित्राचा विषय ठरते.
हि
झाली सर्वसाधारणपणे चरित्रलेखनाची बाब. ऐतिहासिक चरित्रं जरी जवळपास याच धर्तीवर
लिहिली जात असली तरी तिथे मात्र चरित्रलेखकास चरित्र नायक / नायिकेपेक्षा ऐतिहासिक
सत्याशी अधिक प्रामाणिक राहावे लागते व खरी फसगत इथेच होते. अद्यापि आपल्याकडे
शास्त्रशुद्ध ऐतिहासिक चरित्रलेखनाची परंपरा अस्तित्वात नाही. जी काही आजवर
ऐतिहासिक चरित्रं प्रसिद्धच झालीत त्यातली बव्हंशी पाहिली तर एका निश्चित
उद्देशाने -- अन्यायग्रस्त वा असामान्य दाखवण्याच्या हेतूनेच -- रचलेली आहेत.
उदाहरणार्थ, शिवाजी - संभाजीपासून ते अखेरच्या
पेशव्यावर बेतलेलं कोणतंही चरित्र घ्या. ते उपरोक्त दोषांपासून क्वचितच अलिप्त
असल्याचे दिसून येईल. तीच कथा जदुनाथ सरकारांच्या बहुचर्चित औरंगजेबाची !
औरंगजेबावर
साधार असलेलं व चरित्रलेखकाच्या मनोविकारांपासून बऱ्यापैकी अलिप्त असलेल्या या
चरित्रात औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाची, इतिहासाची
खरंच सर्व बाजू आली आहे काय ? त्याच्या
कुप्रसिद्ध धोरणांची व्हावी तशी चिकित्सक चर्चा यात झाली आहे का ? या व अशा इतर प्रश्नांची उत्तरं
नकारार्थीच मिळतील. परंतु यामुळे सरकारांच्या इतिहासलेखनाचे वा त्यांनी लिहिलेल्या
औरंगजेब चरित्राचे अवमूल्यन होते अशातला भाग नाही. उलट त्यांचं हे कार्य आपण
जोमाने पुढे नेऊ शकलो नाही -- ते देखील काळाच्या मानाने साधन प्राप्तीची सुलभता
असूनही -- हा आपला दोष आहे.
सरकारांनी लिहिलेलं एक औरंगजेब चरित्र व इथे मराठी
- इंग्रजीत मिळून खरडलेली पाचपंचवीस शिवचरित्रं. बस्स.. एवढ्याने समस्त
शिवशाहीच्या इतिहासाचे लेखन झाल्याच्या भ्रमात आम्ही वावरतो. या भ्रमाचाच परिणाम
म्हणजे इतिहासकारांची अशी एक पिढी जन्मास आली जी, आधीच्या शिवकालीन इतिहासावर आधारित ग्रंथांमधील उतारेच्या उतारे
आपापल्या शैलीत नकलून घेत खाली निष्कर्ष म्हणून ' अमुक इतिहासकारांच्या मतास आमचा दुजोरा आहे, मत मान्य आहे ' अशी बोटभर ओळीची पुस्ती जोडून विद्वान
शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक, संशोधक
म्हणवून घेऊ लागले.
यामुळे
सध्याच्या इतिहासकारांची आधीच्या पिढीतील इतिहासकारांनी रचलेली शिवचरित्रं त्यातील
गुण - दोषांसह आपापल्या शैलीत जशीच्या तशी मांडली व प्रत्येक ठिकाणी, पूर्वसुरींच्या मतास आपला दुजोरा आहे, अशी पुस्ती जोडली म्हणजे झाले ऐतिहासिक
चरित्र वा इतिहासलेखन अशी आपली धारणा बनलीय.
प्रस्तुत
चरित्रलेखनात आपणांस या प्रचलित मार्गाचा अजिबात त्याग करायचा आहे. त्याउलट जिथे
आधीच्या पिढीतील इतिहासकारांची विधानं चुकली आहेत वा त्यांना त्या घटनांचे व्हावे
तसे आकलन न झाल्याने त्यांचे गृहीतक -- पर्यायाने इतिहासलेखन विकृत बनले आहे, ते दुरुस्त करण्याचा आपला प्रयत्न
राहील. या कार्यात मनुष्यस्वभानुरूप माझ्या हातून काही चुका होण्याचाही संभव आहे व
तसे झाल्यास यातील संभाव्य दोषांची जबाबदारी व्यक्तिशः माझी असेल.
1 टिप्पणी:
प्रकृतीच्या वाढत्या कटकटी कमी झाल्या असतील तर सुभेदार मल्हारराव होळकर यांचेवरील चरित्र येण्यास वाव असेल अशी अपेक्षा आहे...
लवकर चरित्र वाचकांच्या हाती यावे ही अपेक्षा/विनंती.
टिप्पणी पोस्ट करा