सोमवार, २ एप्रिल, २०१२

पानिपत मोहीम :- काही गैरसमज


               
      पानिपत प्रकरणाचा अभ्यास करत असताना मला असे आढळून आले कि, पानिपत स्वारीमध्ये मराठी सैन्याच्या सोबत जे काही कबिले, बाजार – बुणगे व यात्रेकरू होते यांच्याविषयी इतिहास लेखक, अभ्यासक आणि वाचकांच्या मनात प्रचंड गैरसमज आहे. पानिपतच्या पराभवाचे कारण म्हणून लष्कराच्या सोबत असलेल्या बुणगे, कबिले व यात्रेकरूंकडे बोट दाखवले जाते. पण यात कितपत तथ्य आहे याचा कोणी विचार केला आहे का ?
               मराठी सैन्यात बायका – मुले जवळ बाळगण्यास शिवकाळात बंदी होती हे सर्वांनाच माहिती आहे. पुढे संभाजी, राजाराम व ताराबाई काळापर्यंत हा नियम जसा – तसा पाळण्यात आला. याचे कारण म्हणजे तेव्हाची परिस्थिती हे होय ! त्यापुढील काळात, म्हणजे शाहू छत्रपतीच्या काळात आरंभी तरी हा नियम पाळला जात असे पण पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळापासून हा नियम सर्वासी गुंडाळून ठेवण्यात आला. हे वाक्य मस्तानीला उद्देशून आहे असा वाचकांचा ग्रह होण्याची दाट शक्यता आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. स. १७२८ मध्ये बाजीराव आणि चिमाजी जेव्हा उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर गेले होते त्यावेळी उभयतांच्या बायका सोबत असल्याचा उल्लेख आढळतो. याविषयी रियासतकार सरदेसाई असे लिहितात कि, ‘ बाळाजी विश्वनाथ प्रथम दिल्लीस गेला, तेव्हां त्याची बायको राधाबाई बरोबर होती कीं काय याचा थांग लागत नाहीं. पण पुढें या राधाबाईनेंच आपल्या तरुण पुत्रांबरोबर बायका पाठविण्याचा रिवाज घातला.’ यावरून हे तर स्पष्ट होते कि, लष्करात स्त्रिया बाळगण्याची पद्धत पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात देखील होती किंवा ती त्याच काळात सुरु झाली असावी. यानंतर पेशवे घराण्यातून जे कोणी मोहिमेवर बाहेर गेले ते सोबत आपली कुटुंबे घेऊनचं गेले हे उघड आहे. मग ती बाजीरावची प्रसिद्ध दिल्ली स्वारी असो कि रघुनाथरावाची अटकस्वारी ! तसेच, खुद्द पेशवेचं आपल्या स्त्रिया सोबत घेऊन मोहिमेवर बाहेर पडू लागल्यामुळे त्यांच्या सरदारांनी देखील त्याचे अनुकरण केले आणि मग सामान्य सैनिकांनी सुद्धा हि प्रथा पाळण्यात धन्यता मानली असल्यास नवल नाही. यावरून असे म्हणता येते कि, पानिपत मोहिमेत कबिले सोबत नेल्यामुळे मराठी सैन्याचा पानिपतावर पराभव झाला हे साफ चुकीचे आहे, खोटे आहे. या ठिकाणी आणखी एक बाब नमूद करणे गरजेचे आहे व ती म्हणजे, पानिपतावर विजयी झालेल्या अफगाण लष्करात देखील अब्दाली, त्याच्या सरदारांच्या व सैनिकांच्या स्त्रिया होत्या. अब्दालीच्या सैन्यात बायका – मुले नव्हती असे आमचे इतिहासकार सांगतात. आपल्या इतिहासकारांच्या अकलेची तारीफ करावी तितकी कमीचं आहे. माझ्या मते, त्यांचा असा समज झाला असावा कि, अब्दाली व त्याचे अनुयायी हे सर्व रामदासी पंथीय होते !
          अब्दाली व त्याचे सरदार, सैनिक सुमारे वर्ष – दीड वर्ष हिंदुस्थानात तळ ठोकून राहिले होते. पानिपतावर जेव्हा भाऊ व अब्दालीचा सुमारे दोन – अडीच महिने मुक्काम होता तेव्हा, भाऊने सोबत असलेल्या स्त्रिया व बुणग्यांच्या रक्षणासाठी किंवा बचावासाठी ज्याप्रमाणे अब्दालीवर चालून जायचे टाळले, त्याचप्रमाणे अब्दालीने देखील आपल्या लष्करात असलेल्या कबिले – बुणग्यांमुळे मराठी सैन्यावर चालून जायचे टाळले. अब्दाली मराठ्यांच्या किंवा इब्राहिमच्या तोफखान्याला भीत होता म्हणून त्याने पानिपतावर चालून जायचे टाळले हा जो समज आहे तो साफ चुकीचा आहे. पानिपत गावाच्या पूर्वेला, जवळपास १५ – १६ किलोमीटर्स अंतरावर यमुना नदी आहे. बापौली गावी जेव्हा अब्दालीचा तळ होता, तेव्हा तो तसाच काठाकाठाने वर सरकत पानिपतला डाव्या बाजूला टाकून पुढे निघून जाऊ शकत होता. पण त्याने तसे केले नाही. याचे कारण म्हणजे, कबिले – बुणगे सोबत घेऊन लढाई देत मार्ग कापणे अतिशय कठीण कार्य असते याची त्याला कल्पना होती. त्यामुळेचं तो स्वस्थ बसून राहिला होता. परंतु, हे आमच्या इतिहासकरांनी कधी लक्षात घेतेलचं नाही. दुदैवाने माझी देखील जवळपास अशीच समजूत होती पण अधिक विचाराअंती सत्य काय आहे याची मला जाणीव झाली.
         पानिपत मोहिमेत मराठी फौजेसोबत यात्रेकरू मोठ्या संख्येने असल्यामुळे लष्कराला वेगाने हालचाली करता आल्या नाहीत किंवा यात्रेकरू सोबत बाळगल्यामुळे मराठी सैन्याचा घात झाला असेही एक बालिश विधान केले जाते. या विधानात अजिबात तथ्य नाही. मुळात, पानिपतच्या स्वरित जेव्हा मराठी फौजा उत्तर हिंदुस्थानच्या रोखाने निघाल्या, त्यावेळी त्या काही प्रथमचं उत्तर हिंदुस्थानात निघाल्या होत्या असे नाही. त्यापूर्वीदेखील कितीतरी वेळा महाराष्ट्रातून कितीतरी वेळा खुद्द पेशवे अथवा मराठी सरदार उत्तरेत रवाना झाले होते. त्यांच्यासोबत काही प्रमाणात यात्रेकरू उत्तर हिंदुस्थानात गेले होतेचं कि ! तसेच रघुनाथरावाच्या प्रसिद्ध अटक स्वारीत देखील मराठी सैन्यात यात्रेकरुंचे तांडे होते. हे लक्षात घेता, पानिपत मोहिम प्रसंगी महाराष्ट्रातून किती हजार यात्रेकरू लष्करासोबत गेले होते याचा विचार करणे गरजेचे आहे. माझ्या मते, पंधरा ते वीस हजारांच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त नसवी. काही लेखक हा आकडा तीस – चाळीस हजार, क्वचित पन्नास हजार असाही सांगतात. पण त्यात काही अर्थ नाही. कारण, भाऊसोबत तीस ते पन्नास हजार यात्रेकरू होते असे जर गृहीत धरले तर मग महाराष्ट्रातील लोकांना तीर्थ यात्रेशिवाय दुसरा काही उद्योगचं नव्हता असेच म्हणावे लागेल. कारण मग रघुनाथरावाच्या अटक स्वारीत पण मग पन्नास हजार यात्रेकरू असतील असे म्हणावे लागते. तसेच पानिपतनंतर नानासाहेब पेशवा उत्तर हिंदुस्थानात गेला तेव्हा त्याच्यासोबत देखील तीस – चाळीस हजार यात्रेकरू होते असे म्हणावे लागेल. याचा अर्थ असाही होतो कि, महाराष्ट्राची लोकसंख्या त्यावेळी प्रचंड होती. कारण, एकाच सुमारास मराठी लोकं पेशवे व त्यांच्या सरदारांच्या सैन्यात आणि प्रशासनात सहभागी होती. त्याशिवाय काही कोल्हापूर व इतर किरकोळ संस्थानात कार्यरत होती. उर्वरीत निजामाकडे नोकरीला होती. यातून ज्यांना सरकारी नोकरी नव्हती ते शेती करत होत आणि या सर्वांपेक्षा वेगळा असा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता जो दरवर्षी पुण्यातून उत्तर हिंदुस्थानात रवाना होणाऱ्या सैन्यासोबत तीर्थयात्रा करत होता !
                पानिपत मोहिमेत भाऊने बाजार – बुणगे सोबत बाळगून खूप मोठी चूक केली असे कित्येक विद्वानांचे मत आहे. मुळात या तथाकथित विद्वान लेखकांना लष्करातील बाजार – बुणगे म्हणजे कोण व सैन्यात यांची आवश्यकता तरी काय याची थोडीफार देखील माहिती नसते. प्राचीन काळापासूनचा जर लष्करी किंवा युद्धेतिहास आपण अभ्यासू लागलो तर आपल्या लक्षात येईल कि, सैन्यासोबत बाजार – बुणगे बाळगण्याची प्रथा हि खूप प्राचीन आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्करासोबत बाजार – बुणग्यांची नितांत आवश्यकता असे. अगदी आजच्या आधुनिक सैन्यदलांत देखील बाजार – बुणगे असतात !
   मराठी सैन्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास शिवकालीन मराठी सैन्य व पेशवेकालीन मराठी सैन्य अशी विभागणी करणे गरजेचे आहे. तसेच बाजार – बुणगे म्हणजे नेमके काय हे देखील समजावून घेणे गरजेचे आहे.
बाजार – बुणगे :- लोहार, सुतार,चांभार, लष्करातील लोकांना व जनावरांना पाणी पुरवणारे भिस्ती, गाडीवान, मोतदार ( घोड्याला खरारा व मालीश करणारे ), माहुत,वाजंत्री, मशालची, चारा, सरपण – लाकूड फाटा गोळा करणारे, धान्य दळणारे स्त्री – पुरुष, पालख्या – मेणे वाहून नेणारे भोई, लढाईतील जखमींना उचलून आणणारे, जखमींची शुश्रूषा करणारे इ.

 शिवाजीच्या मोहिमा या बव्हंशी महाराष्ट्रातचं घडून आल्या. सुरत, दक्षिण हिंदुस्थानातील दिग्विजय  या त्याच्या लांब पल्ल्याच्या मोहिमा म्हणता येतील. महाराष्ट्रातील किंवा सुरत तसेच दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जी मराठी फौज शिवाजीच्या सोबत होती, त्या फौजेत बाजार – बुणगे होते. कारण वर जी बाजार – बुणग्यांची यादी दिली आहे, ते लोकं जर सैन्यासोबत नसतील तर त्यांच्याविना कोणतीही लष्करी मोहीम पार यशस्वीपणे पार पाडली जाणे अशक्य असेच आहे. पुढे पेशवेकाळात या बुणग्यांच्या यादीत भर पडत गेली. व तसे होणे अपरिहार्यचं होते. या ठिकाणी मी फक्त इतकेच सांगू इच्छितो कि, त्यावेळी जवळपास सर्व संस्थानिकांच्या फौजांमध्ये ज्या ज्या प्रकारचे बुणगे होते त्याच प्रकारचे पेशव्यांच्या सैन्यात होते. त्याहून अधिक असे काही त्यांनी सोबत बाळगले देखील नाही. शिवाजीच्या व पेशवे काळातील बुणग्यांच्या मध्ये फारतर एक मोठा भेद हा आहे कि, शिवाजीच्या बुणग्यांमध्ये स्त्रियांचा समावेश नव्हता ! अर्थात, शिवाजीच्या काळातील लष्करी मोहिमा या नजीकच्या प्रदेशात होत असल्यामुळे व अल्पावधीत संपुष्टात येत असल्यामुळे लष्करात किंवा बुणगयांत स्त्रियांची आवश्यकता भासली नाही. परंतु पेशवे काळात मराठी राज्य स्वराज्यातून साम्राज्यात रुपांतरीत होऊ लागल्यामुळे लष्करांत / बुणग्यांत स्त्रियांचा समावेश होणे अपरिहार्य होते. पानिपतची लढाई ज्याने जिंकली त्या अब्दालीच्या लष्करात देखील बाजार – बुणग्यांचा मोठा ताफा होता हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. एकूण, लष्करासोबत बुणगे बाळगून सदाशिवरावाने काही जगावेगळे कार्य केले अशातला भाग नाही.  
    सारांश, मराठी सैन्यासोबत बाजार – बुणगे, कबिले व यात्रेकरू असल्यामुळे त्यांचा पराभव झाला किंवा त्यांच्यामुळे मराठी सैन्याला वेगवान हालचाली करता आल्या नाहीत असा जो समज आहे तो साफ चुकीचा असल्याचे सिद्ध होते.

९ टिप्पण्या:

Sahyadri म्हणाले...

chan mahiti ahe pustak kadhi yet ahe

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

खूप छान

Shrinivas Tilak म्हणाले...

श्री उदय कुलकर्णी यांचे हे पुस्तक उपलब्ध आहे त्याचा आपण परामर्श घ्यावा ही विनंति

श्रीनिवास टिळक

Atul म्हणाले...

Changli mahiti aahe.

अनामित म्हणाले...

लष्करासोबत बुणगे बाळगणे(लोहार, सुतार,चांभार, लाकूड फाटा गोळा करणारे, धान्य दळणारे स्त्री)हे मान्य केले जाऊ शकते. पण पानिपत स्वारीमध्ये मराठी सैन्याच्या सोबत यात्रेकरूची संख्या ही जवळपास बुणग्यांच्या ऐकून संखेपेक्ष्या जास्त होती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याउलट यात्रेकारुंच्या देवदर्शनामुळे सैन्याची चाल मंदावली होती...

अनामित म्हणाले...

Apan ya pudhe Shatrapati Shivaji Maharajancha Aadararthi uchhar karal ashi apeksha karto

कौस्तुभ कस्तुरे म्हणाले...

संजयराव, आपण दिलेली माहिती तंतोतंत खरी आहे. कारण यापूर्वीच्या अब्दालीच्या मोहीमा मराठी सैन्याने उधळून लावलेल्या शिवाय १७३७-३८ च्या दिल्लीस्वारीत बाजीरावसाहेबांनी कबिला नेला असतानाही भोपाळसारखी लढाई जिंकली. ब्लॉग खरंच सुंदर आहे..

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद कौस्तुभ !

अनामित म्हणाले...

are murkhano... ugich chukiche samarthan karu naka...