Wednesday, May 9, 2012

"पानिपत असे घडले..." - जाहीर प्रकाशन समारंभ १७ मे २०१२


नमस्कार वाचनप्रेमी मित्र-मैत्रिणींनो,

इतिहासाचे सत्य अवलोकन वर्तमानात स्थितप्रज्ञता देते आणि भविष्यातील अभिमानाचा पाया बळकट करते असे मला वाटते. सत्याच्या पायावर आधारित असे अभिमान राष्ट्रनिर्मितीचे बळ सर्वसामान्यांना देतात. इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून अवघे एक शतकही पूर्ण झाले नाही तोच जगभरात भारतीयांच्या सर्व क्षेत्रातील पराक्रमाने अवघे विश्व स्तिमित झालेले आहे. तत्पूर्वी अवघा भारतवर्ष मराठ्यांच्या पराक्रमाने दबून होता. मराठ्यांचा हा अगदी अलिकडचा इतिहास पाहिला तर 'पानिपत झाले' हा वाक्प्रचार महाराष्ट्राच्या मान-सन्मानाला एका अश्वत्थाम्याच्या चिरकाल भळभळणार्‍या जखमेसारखा चिकटून बसला आहे. या 'पानिपत युद्धाचे' सत्य-असत्य मराठी म्हणून अभिमान बाळगणार्‍या सर्वांनीच माहिती करुन घेणे गरजेचे आहे. १७६१ सालच्या या महत्त्वाच्या पानिपत संग्रामावर लाखो मराठी पुस्तकांच्या गर्दीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच संशोधनग्रंथ उपलब्ध आहेत.

या पार्श्वभूमीवर माझे एक तरुण मित्र श्री. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धावर उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व साधनांच्या साहाय्याने मराठ्यांचे 'पानिपत का झाले याची चिकित्सा केली आहे. या विश्लेषणाचे सार म्हणजे जवळपास पावणे सहाशे पृष्ठांचा "पानिपत असे घडले..." हा विश्लेषणात्मक संशोधनग्रंथ आकारास आला. या ग्रंथामध्ये शेकडो मूळ संदर्भ जसेच्या तसे दिलेले आहेत. व त्या अनुषंगाने या तरुण लेखकाने त्याचे तटस्थ दृष्टीकोनातून विश्लेषणही केले आहे. यामुळे केवळ पानिपत युद्धावरचे सत्याच्या जवळ जाणारे विश्लेषण एवढ्यापुरताच हा ग्रंथ मर्यादित न राहता 'पानिपत युद्धाचे ' सर्वांगीण ऐतिहासिक दस्तावेजांचे संदर्भ एकत्रितरित्या तपासून पाहण्यासाठी देखील एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे. या ग्रंथाच्या शेवटी जोडलेले परिशिष्ट माहितीत मोलाची भर टाकतेच. शिवाय सर्वात शेवटी दिलेल्या नकाशांतून पानिपत युद्धाचे सत्य उलगडण्यास सोपे पडते. अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांपासून ते थोर विचारवंतांपर्यंत सर्व थरांतील वाचकांना हा ग्रंथ आकलनास अतिशय सोपा आहे. आणि मला वाटते हेच लेखकाचे नि:संशय यश आहे
इतिहास या विषयांत मला रस असल्यामुळे व पानिपत युद्धावरील कित्येक ऐतिहासिक साधने मी स्वतः वाचलेली आहेत, त्यामुळे लवकरच या संशोधन ग्रंथावर मी एक परिक्षण लिहीणार आहे. पण तूर्तास या पुस्तकाच्या स्वागत सोहळ्यास आपल्यासारख्या प्रत्येक वाचनप्रेमींनी सज्ज व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.

"पानिपत असे घडले..." या ग्रंथाचा जाहीर प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२, गुरुवार या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता 'दैनिक नवशक्ती'चे संपादक श्री.सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धी हॉल, ठाणे येथे होणार आहे. तरी 'पानिपत युद्धाच्या अनुषंगाने ऐतिहासिक संशोधनग्रंथांत महत्त्वाचे स्थान प्राप्त करु शकणार्‍या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण आपली हजेरी लावावी ही आग्रहाची विनंती. सोबत या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका जोडलेली आहे.

धन्यवाद,
सागर भंडारे

पुस्तकाचे नावः "पानिपत असे घडले..."
लेखक : संजय क्षीरसागर
प्रकाशन : पुष्प प्रकाशन
किंमत : ५०० रुपये.
प्रकाशन सवलत मूल्य : ३५० रुपये

No comments: