सोमवार, ७ जानेवारी, २०१३

सतीप्रथेच्या नावाखाली मारून टाकलेल्या अभागी जीवांस समर्पित !



 ऐ. हि. भा. २ ले. २२                     सप्टेंबर १८१९
  
                                             
श्री
          
वेदशास्त्रसंपन्न समस्त शास्त्री यांचे मसलतीत कयॉपटन हेनरी डंडास राबर्टसन साहेब बहादूर म्याजिस्ट्रेट सुभा पुणे यांचे बोलणे की  :
     जी सती भाद्रपद ||. ८ शनिवारी गेली, त्या सतीचे हाल झाले ते हाल ह्या मजलसीत ( मजालस – सभा ) तितके आहेत त्यांनी पाहिले असते तरी त्यांचे मनांत येते की, असे पुन्हा कोणासही होऊ नये. येविषयी ते आम्हास मदत करते. त्यास हल्ली आमचे दिलात येतें कीं, सती जावयाचा दस्तूर फार खराब ; आणि तुमचे शास्त्रात असें लिहिलें नाहीं. कीं, सती मुकर जावी, असेही नाहीं. यास्तव शास्त्रात जी रीत लिहिली आहे, त्या रीतीने जावें.
   हल्लीं शास्त्राची उलट रीत करून जातात. त्यास आम्ही गैर रीतीने जाऊ देणार नाही. याजकरिता येविशी आम्ही सरकारातून लिहून बंदोबस्त करू. यात तुम्हांस वाईट लागू नये. तुमचे मनात येईल की, सरकार मना करू लागल्यास निरुपाया. त्यास येविशी सरकार बंदोबस्त करू लागल्यास त्यास का अवघड नाही ? परंतु सरकार असे मनात आणतें कीं ज्या जातीचा जो धर्म आहे ; तो मना करण्याचे कारण नाही. परंतु सती जाते, तिचे असे हाल होतात हे काहीं चांगलें नाही. हल्ली या मजलसीत वृद्ध आहेत, त्यांच्याही दिलात आले असेल की, ऐसा अलौकिक होतो, त्यापेक्षा बंद जाहल्यास बहुत चांगले, ऐसें आलें असेल. ऐसीयास या गोष्टीचा बंदोबस्त सरकारातून जाहल्यास आम्हांस काही वाईट लागणार नाहीं, ऐसी सल्ला तुम्ही सगळ्यांनी दिल्यास तुमची अब्रू सारें हिंदुस्थानांत बहुत होईल, आणि ब्राम्हण धर्म वरकड सारें गोष्टीत दया धर्म आहे, आणि सती जाण्याविषयीच मात्र बहुत सक्ति आहे, ऐसें ईतर जातीचे लोक यांचे दिलात येते ; आणि तुमचे शास्त्रात असे लिहिलें नाहीं कीं सती गेली नाही तरी तिची बेअब्रू आहे. व बेदस्तूर ( रूढी वेगळे ) होतो असेंही नाही ; व हल्ली लोकांतही सती गेली नाही तरी तिची अब्रू गेली असे कोणी बोलत नाही.
    असें असतां हल्लीं बायका सती जातें याची सबब तीन प्रकारची आहे एक, त्या बायकोचा भ्रतार मृत्यू पावतो, त्यावेळेस त्या स्त्रीस अत्यंत दुःख होऊन तिचा दिल बहुत कठिण होऊन जाते. व दुसरी सबब कीं, घरामध्यें तिचा भ्रतार नित्य म्हणत असतो की, माझी मातुश्री सती गेली, तिची बहुत अब्रू आणि लौकिक फार चांगला जाला, असे म्हणत असतो. तेणे करून त्या स्त्रीच्या मनात येते की कदाचित मी अशीच गेले, तरी माझाही आसाच लौकिक व अब्रू फार होईल. असे चितांत येऊन ती सती जाते. तिसरी सबब की, आपला पती मृत्यू पावला, आता आपणास काही आधार नाही, सती जावे तरी धैर्य नाही. परंतु चिंता नाही. मांडव अथवा खोप करून वरती लाकडे बहुत घालतात तो मांडव तोडल्यानंतर जीव काही रहावयाचा नाही, व कदाचित मन फिरल्यास बाहेर निघू सकत नाही. मग काही तरी होवो. ऐशा तीन सबबेने बायका आपला दिल सक्त करून जातात.
     ऐसीयास सती जाते वेळेस तिजला मांडव करून त्याजवर फार लांकडे मोठी मोठी घालून, तो मांडव तिच्या अंगावर एकदा तोडून पाडावा, असे तुमचे कोणतेही शास्त्रात निघणार नाही. शास्त्रात इतकेच की, तृणांची पर्णकुटिका करून त्यात प्रवेश करावा. असे असेल आणि कदाचित त्यातून बाहेर निघाली असता, त्यास थोडे प्रायश्चित देऊन पुन्हा शुद्ध करून जातीत घ्यावी असेही शास्त्रात आहे. हल्ली राधाबाई सती गेली. तिने आपले पतीचे लोभाने त्याजबरोबर सती जावे म्हणून निश्चयेकरून सती गेली. ते वेळेस आपल्या हाताने आत जाऊन अग्नि लावून घेतला. तेव्हा अग्निज्वाळा अंगास लागू लागल्या. ती आच सोसवेना, सबब बाहेर निघाली. ते वेळेस तिने पुन्हा हिंमत बांधून पुन्हा त्या अग्निजवळ आली. परंतु आत जाण्याची हिंमत जाहली नाही. असे समजून त्या बाईचे दीर जवळ होते, त्यांनी तिला जबरदस्तीने पुन्हा आत टाकली. त्यास तुमचे शास्त्रात असे काही लिहिले नाही की, सती बाहेर निघाली तरी पुन्हा जबरदस्तीने टाकावी असे नसता ते केले हे शास्त्राच्या उलटे होते.
      याजकरिता आमच्या दिलात असे मुकरर ( निश्चित ) येते की, हा दस्तूर बहुत खराब आहे. तेव्हा अशी गोष्ट पुन्हा होऊ नये व आम्हास मंजूर आहे की, अशी खराब चाल पुन्हा होऊ देऊ नये. यास्तव पुन्हा आम्ही असे होऊ देणार नाही. राधाबाईस तिचे दिराने अग्नित लोटल्यावर पुन्हाही निघाली. ते वेळेस तिचे ( हाल ) असे झाले की, तिचे अंगाची कातडी जळून मांसाचे गोळे बाहेर निघून, पायांतूनही रक्त चालले, हे तुमचे पाहिल्यात आले असते, तरी तुमचे ही दिलात येते की, ब्राह्मणाचा दयाधर्म आहे, त्याचा हा फार उलटा प्रकार होतो. असे समजून तेच वेळेस तुम्ही सर्वत्रांनी म्हटले असते की हे झाले असे कदापि होऊ नये. आता हल्ली जे मजलसीत बसले आहेत. त्यांनी तिचे हाल पाहून व ऐकून दिलात आणीत असतील की जर करिता आपली बायको तिची माया आपल्यावर जरी बहुत आहे, तत्राप मुलां – लेकरांची आई ती, असे हाल करून घेऊन सती जावयाची हिंमत तिला होईल असे क्षणभर देखील कोणाचे दिलात येणार नाही. राधाबाईस जळते वेळेस तिजला हिंमत जाली. तशी हिंमत या पाठीमागे कोणासही जाहली नसेल व पुढेही कोणास होणार नाही. कारण की, अर्धी जळाली असता पुन्हां अग्नी जवळ कापत कापत आली. यास हल्ली या मजलसींत कोण शक्य आहे की इतकी हिंमत करू शकेल !    
      सारांश हाच की, शास्त्रामध्ये सती मुकरर जावी असे निघणार नाही व सती जाऊन माघारी पुन्हा निघाली असता, तिजला जबरदस्तीने आत टाकून द्यावी अगर तोडून टाकावी असे नाही. तुम्ही म्हणाल की शास्त्र नाही परंतु आचार बहुता दिवसी आहे, की पुन्हा माघारी निघू देऊ नये. त्यास हा आचार बहुत खराब आहे. कारण की तुमचे शास्त्रात दुसरे आचार किती सांगितले आहेत ? ते आचार हल्ली सोडून देऊन मनस्वी अनाचार करितात, त्यास कोणी पाहात नाही ; व त्याचा बंदोबस्त करावा या विषयी फिकीर कोणीही करीत नाही. सती विषयी शास्त्रार्थ असता त्याप्रमाणे वहिवाट करीत नाही. दुसरे सती गेल्याने स्वर्ग प्राप्ती आहे, असे शास्त्रात लिहिले आहे, असे तुम्ही म्हणाल तरी निश्चये करून जी सती जाते आणि इमान शाबूत राखते ती स्वर्गात जाते. परंतु अशी कोणी नाही की, अग्नीचा स्पर्श अंगास जाहलियावर तेच इमान शाबूत राहावे असे नाही. तेव्हा अग्निस्पर्शसमयी बुद्धीस भंग होऊन अंतर इहलोकही नाही व परलोकही नाही असे होते. ऐशीयास कोणतेही माणसाचे दिलात नाही की, आपले खुशीने अग्नीत ठरवून जळून घ्यावे असे कदापि कोणतेही काळी घडणार नाही. कोणतेही दयावंत माणसास जळण्याचे दुःख खुद्दास अनुभव आल्याशिवाय विचार करू शकत नाही. ऐशीयास तुमचे दिलात या गोष्टीचा विचार काय आला असेल ?
       आम्हांवर मेहरबानी करून, तुम्ही सर्वांनी मिळून असा बंदोबस्त करावा की अशी गोष्ट पुन्हा आमचे दृष्टीस पडू नये. त्या बायकोस पुन्हा ज्याने टाकिली, त्यास दया आहे असे कोणी बोलणार नाही व शास्त्रांत ही टाकावी असे नाही. त्यास ज्या शकसाने हे काम केले त्यास मुकरर सजा व्हावी व आम्हास मंजूर आहे की त्यास सजा द्यावी. शास्त्रकर्तें मोठे मोठे होऊन गेले, त्यात बहुत दया होती. त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून त्यात असा बंदोबस्त केला असेल की सतीच्या मनात बाहेर निघावयाचे जाहल्यास तिला बाहेर निघण्याविषयी पुरसत असावी कारण की, जिचे इमान शाबूत राहत नाही तिने बाहेर निघावे हे चांगले, असे जाणून तृणाच्या पर्णकुटिकेचा कायदा त्यांनी केला. परंतु तुम्ही आता शास्त्राची आज्ञा उलट करून, आपले मगरूरीने दया सोडून देऊन त्या सतीस मारता त्यास तुमचे शास्त्रांत असेही आहे की, सती एकवेळ बाहेर निघाली असता, तिला जो वाचवील त्यास बहुत पुण्य आहे. हा शास्त्रार्थ तुम्हास माहीत आहे काय ? आम्हास ठाऊक नाही व आम्हास मंजूर नाही की, आम्ही तुम्हास समजावे. परंतु आम्हास मुनासब ( मुनासिब – योग्य ) आहे की, हा खराब दस्तूर मना केल्याने तुमचे शास्त्रात उलट होत नाही. तेव्हा आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही. पण तुम्ही क्षमावंत आहा, आणि साऱ्यांचे दिलातही आहे की, दस्तूर बहुत खराब आहे, हा मोडावा. परंतु तुम्हास या गोष्टीची शरम आहे याजकरिता तुम्ही आमची अर्जी ऐकून घेऊन हा दस्तूर खराब आहे, हा मोडल्यास आम्हास वाईट लागणार नाही अशी खातरी करावी. म्हणजे येविषयीचे बंदोबस्तविषयी सरकारात लिहून पाठवू अशी खातरी तुम्ही केली यास तुमची अब्रू, दया व धर्माविषयी फार होईल परंतु सती कोणतेही तऱ्हेने न जावी या विषयीची खातरी करणेही तुमचे मर्जीची गोष्ट आहे. आता इतके तुम्ही समजावे की, आजपासून ती सती जाणार, तिने शास्त्राचा जो कायदा तृणाची पर्णकुटिका करून जावे असे आहे, त्याप्रमाणे जावे ते न होता शास्त्राच्या उलट होऊ लागल्यास आम्ही होऊ देणार नाही. कदाचित शास्त्र मार्गाप्रमाणे एखादी सती गेली आणि पुन्हा अग्नीतून बाहेर निघाली, तर तिला जो कोणी जबरदस्ती करून आत टाकील किंवा तोडून टाकील त्या शास्त्रास आम्ही सुशी (?)  असा जाणून त्याचे पारिपत्य मुनासब आहे त्याप्रमाणे केले जाईल.    

संदर्भ ग्रंथ :-
१)  मराठ्यांचा इतिहास साधन परीचय
संपादक :- प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: