रविवार, १२ मे, २०१३

थो. माधवराव पेशवा

                        पानिपतच्या संहाराने मराठी राज्याचे नुकसान झाले नाही इतके माधवरावाच्या अकाली मृत्यूने झाले.         ---   ग्रांट डफ 
       प्रसिद्ध इंग्रज इतिहाकार ग्रांट डफने वरील शब्दांत माधवराव पेशव्याची योग्यता वर्णिली आहे. अनेक देशी व विदेशी इतिहासकारांनी देखील या पेशव्याचा विविध विशेषणांनी गौरव केला आहे. अशा या पेशव्याच्या राजकीय कारकीर्दीचा एक धावता आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. 
                 दिनांक १ फेब्रुवारी १७४५  रोजी माधवरावाचा जन्म झाला. नानासाहेब पेशव्याचा हा द्वितीय पुत्र. स. १७६१ हे वर्ष मराठी राज्याला -- विशेषतः पेशवे घराण्याला -- त्यातही नानासाहेब पेशव्याच्या वंशाला विशेष हानिकारक ठरले. मराठी राज्याच्या दृष्टीने पाहता पानिपतच्या पराभवामुळे दिल्लीच्या राजकारणात त्यांची तात्पुरती पीछेहाट झाली. नानासाहेब पेशव्याचा चुलत भाऊ आणि मोठा मुलगा विश्वासराव हे दोघे या लढाईत मारले गेले. त्यामुळे आधीच प्रकृतीने घाईला आलेला पेशवा मनाने काहीसा खचला व त्यातचं त्याचा अंत ओढवला. मुख्य पेशवा मृत पावलेला. भावी पेशवा विश्वासराव तत्पूर्वीच पानिपतावर गारद झालेला. पेशवे घराण्यात यावेळी पेशव्यांच्या मसनदीवर हक्क सांगणारे दोनच वारसदार हयात होते. एक म्हणजे नानासाहेब पेशव्याचा धाकटा भाऊ रघुनाथराव आणि दुसरा म्हणजे नानासाहेब पेशव्याचा द्वितीय पुत्र माधवराव !
                    दोघा भावांनी एकविचाराने राज्याचा गाडा चालवण्याची प्रथा बाजीराव - चिमाजीच्या काळात घडून आली. परंतु, नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीत मात्र पेशवे बंधूंमध्ये तंटे निर्माण होऊ लागले होते. त्याची अप्रत्यक्ष झळ अशी मराठी राज्याला पानिपतपर्यंत तरी लागली नाही. परंतु, नानासाहेब पेशवा मरण पावताच पेशवे घराण्यातील कलह उफाळून आला. भट घराण्याची परंपरा पाहता पेशवाईवर माधवरावाचा अधिकार होता परंतु रघुनाथरावास हे मान्य नव्हते. ज्याअर्थी माधवराव अज्ञान आहे त्याअर्थी या संकटकाळात मराठी राज्याला सावरण्यास माझ्यापेक्षा दुसरा कोणी अधिक लायक नाही अशी त्याची प्रामाणिक समजूत होती व ती तशीच अखेरपर्यंत राहिली
                       २० जुलै १७६१ रोजी माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. माधवरावास आपल्या मुठीत ठेऊन कारभार हाती घेण्याची रघुनाथराव उर्फ दादासाहेबाची तीव्र इच्छा होती, परंतु माधवराव त्याला जुमानत नव्हता. याचा परिणाम म्हणजे उभयतांमध्ये हळूहळू वितुष्ट येऊ लागले. दरम्यान नानासाहेब पेशव्याचा मृत्यू व अननुभवी माधवराव राज्यकारभारावर आल्याचे पाहून निजामाने उचल खाल्ली व उदगीरचा तह त्याने धुडकावून लावला. वस्तुतः उदगीरच्या तहात निजामाने जो प्रदेश पेशव्यांना दिला होता त्यावर अजून पेशव्यांचा संपूर्ण ताबा बसला नव्हता. हि संधी साधून निजामाने पेशव्यांची ठाणी उडवू थेट पुण्याचा रोख धरला. 
                  निजामाच्या या कृत्याची उपेक्षा करणे माधवराव व दादास शक्यच नव्हते. त्यांनी लगोलग फौजा जमवून निजामाला रोखण्यासाठी प्रस्थान ठेवले. दोन्ही पक्षांच्या अनेक चकमकी घडून आल्या. निजामाने प्रवरासंगम कायगांव टोके इ. क्षेत्रांचा विध्वंस केल्याने मराठी पक्षास विशेष त्वेष चढला. किरकोळ संग्रामात मराठी सैन्याने निजामाला चांगलाच हात दाखवला. आता एक मोठी लढाई घेऊन निजामाचा बंदोबस्त करावा असा मराठी मुत्सद्यांचा बेत चालला असता निजामाने तहाची वाटाघाट आरंभली व चाळीस लाखांचा मुलुख देऊन युद्ध आटोपले. ( ५ जानेवारी १७६२ -- उरळीचा तह ) 
              अर्थात हा काही कायमस्वरूपाचा तह नव्हता. दादासाहेबाला मागे - पुढे निजामाच्या मदतीची आवश्यकता वाटत होति. त्यामुळे निजामाला दुखवण्यास तो तयार नव्हता. इकडे सदाशिवरावाचा तोतया उद्भवल्यामुळे माधवरावास आणखी एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला. त्याशिवाय कर्नाटकात हैदरअलीने देखील उचल खाल्ली होति. त्यामुळे तात्पुरता निजामाशी तह करून पेशव्याने आपला बोज राखला. निजामाची स्वारी उरकून पेशवा कर्नाटकात गेल. रघुनाथराव राजकारणातून निवृत्ती घेऊन पुण्यास स्वस्थ बसला. सखारामबापूनेही कारभारातून अंग काढले. तेव्हा पेशव्याने त्रिंबकराव पेठ्यास कारभारात घेतले. यामुळे पेशवे घराण्यात दोन तट उघड उघड निर्माण झाले. गोपिकाबाई व माधवराव विरुद्ध रघुनाथराव व त्याचा सल्लागार सखारामबापू ! आता या गटांमधील मुलभूत फरक असा कि, एका मर्यादेपर्यंत माधवराव आपल्या आईच्या आज्ञेत जरी असला तरी सर्वच बाबतीत तो तिच्या सल्ल्याला महत्व देत नसे. त्याउलट रघुनाथरावाची बाजू होती. सल्लागारांचा सल्ला घेऊन वरवर तो एक बेत रचत असे व आपल्याच साथीदारांच्या नकळत दुसराच मनसुबा आखून स्वतःही तोंडघशी पडत असे व आपल्या मदतनीसांनाही तोंडावर आपटत असे. 
                          माधवरावाने स. १७६२ च्या पावसाळ्यापर्यंत मुराराव घोरपड्याच्या मदतीने हैदरला बऱ्यापैकी रगडत आणले. परंतु, पावसाळा तोंडावर आल्याने व रघुनाथराव पुण्यात बसून नवीन काही उपद्व्याप करील या भीतीने माधवरावास पुण्यास परत फिरणे भाग पडले. स. १७६२ च्या पावसाळ्यात माधवराव - रघुनाथराव यांच्यात समेट करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. परंतु दादासाहेबाची समजूत न पडून सप्टेंबर महिन्यात त्याने फौजांची जमवाजमव आरंभली. त्याने निजामालाही मदतीस आणले व नागपूरकर भोसल्यांना देखील आपल्या मदतीस येण्याविषयी पत्रे पाठवली. माधवरावाने देखील आपल्या पक्षाचे सरदार जमवून युद्धाची तयारी केली. पेशव्याचा यावेळी मुख्य आधार म्हणजे मल्हारराव होळकर असून इतर सरदार मंडळी तुलनेने नगण्य अशीच होती.  
                  ७ व १२ नोव्हेंबर रोजी दादा व माधवरावाच्यात दोन संग्राम घडून आले. दोन्ही संग्राम तसे निकाली निघाले नाहीत पण माधवरावाच्या सहाय्यकांत चुळबुळ माजल्याने होळकराच्या मध्यस्थीने आळेगाव येथे माधवराव दादास शरण गेला. त्यामुळे काही काळ पेशवा दादाचा कैदी बनून व्यवहारात रघुनाथरावास महत्त्व आले. दरम्यान निजामाने दादाची भेट घेऊन उदगीर तहात दिलेला प्रदेश व दौलताबादचा किल्ला परत मागितला व दादाने तो स्वखुशीने देऊन टाकला. त्यानंतर माधवरावाच्या सहाय्यकांविरुद्ध त्याने एक मोहीम आखली. मात्र, याच काळात निजाम व भोसल्यांनी एक गुप्त करार करून पेशवेविरोधी आघाडी निर्माण केली. इकडे माधवरावाचे सहाय्यक आपापल्या बचावासाठी निजामाला शरण गेले. त्यामुळे अल्पकाळ पुणे दरबार कमकुवत झाल्याचे चित्र दिसू लागले. आपल्या पक्षाची स्थिती दादास अजिबात माहिती नसल्याने त्याने कर्नाटक मोहीम आखली व तिकडे तो निघाला. परंतु. स. १७६३ मध्ये निजाम - भोसले एकत्र येऊन निजामाने रघुनाथरावास पुढील मागण्या कळवल्या. (१) भीमेपलीकडील सर्व मुलुख आम्हांला द्या (२) आमचे महत्त्वाचे किल्ले व स्थळे आम्हांस परत द्यावी (३) आमच्या सल्ल्याने पेशव्यांनी आपला राज्यकारभार करावा. 
                 निजामाच्या या मागण्यांनी दादाची नशा उतरली. सत्तेच्या धुंदीत आपण काय करून बसलो याची त्याला हळूहळू जाण येऊ लागली. एकट्या निजामाच्या स्वारीला कोणी भीक घालीत नव्हते पण दादाने ज्या ज्या पुणेकर मराठी सरदारांना दुखावले होते ते सर्व या ना त्या निमित्ताने निजामाला सामील झाले होते. त्याखेरीज सातारचे छत्रपतीपद प्राप्त करण्याच्या लालसेने नागपूरचा जानोजी भोसलेही निजामाच्या गळाला लागला होता. एवढ्या मोठ्या जमावाला तोंड देणे सद्य स्थितीत तरी पेशव्याच्या आवाक्याबाहेर होते. या क्षणी पेशव्याचे तीन प्रमुख आधार होते. पहिला म्हणजे रघुनाथरावाचे निजामाविषयी झालेले मत परिवर्तन. दुसरा आधार म्हणजे मल्हारराव होळकराचे पेशव्याच्या पक्षात असणे व तिसरा आधार म्हणजे पेशव्याचा आत्मविश्वास ! 
                       रघुनाथरावाच्या मनात निजामाविषयी तात्पुरता का होईना राग निर्माण झाल्याने पेशव्याची ती एक बाजू काही काळ का होईना निश्चिंत झाली. मल्हारराव होळकर या काळात दक्षिणेत असल्यामुळे व तो पेशव्याच्या पक्षाला  राहिल्यामुळे लष्करी आघाडीवर आपण निजामाच्या बरोबरीचे आहोत याची पेशव्याला जाणीव होती. त्याखेरीज चुलता मनापासून आपल्या पाठीशी उभा राहिल्यास निजामाला आपण सहजी वेसण घालू अशी माधवरावास उमेद होती. रघुनाथराव कसाही असला तरी एक लढवय्या सेनानी होता व अब्दालीच्या अफगाणांचा देखील त्याच्यासमोर निभाव लागला नाही हे तमाम हिंदुस्थानात मशहूर होते. दादाचा हा पूर्वलौकिकच त्याचे खरे बळ होते. बाकी राजकारणाच्या बाबतीत दादाची तमा फारशी कोणी बाळगणारे नव्हते. त्या आघाडीवरील दादाचे अपयश सर्वश्रुत होते. 
                  पेशवा - निजाम संघर्षात पुणे व हैद्राबाद प्रांताची आहुती पडली. निजामाने पुणे धुवून काढले. त्यामुळे पेशव्यांची अब्रू धुळीस मिळाल्याप्रमाणे झाले. इकडे माधवरावाने निजामाला मिळालेल्या आपल्या पटवर्धनादी सरदारांना आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न चालवले होते. जानोजी भोसले देखील निजामापासून फुटण्याच्या बेतात होता. अशा स्थितीत १० ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठी फौजांनी निजामी सैन्याचा धुव्वा उडवला. खास निजाम युद्धाला तोंड लागण्यापूर्वीच गोदावरी नदी पार करून गेला होता. त्यामुळे तो बचावला मात्र त्याचा दिवाण विठ्ठल सुंदर हा लढाईत मारला गेला. राक्षसभुवनचा फटका बसताच जानोजी भोसल्याने उघडपणे पेशव्याची भेट घेऊन निजामाची साथ सोडली. इकडे राक्षसभुवनवर पराभूत होऊन देखील निजामाचे बळ संपले नव्हते. त्याने औरंगाबादचा आसरा घेऊन लढा चालू ठेवला. तेव्हा ३ सप्टेंबर रोजी पेशव्याने निकराची लढाई करून निजामाला गुडघ्यावर आणले. उदगीर प्रसंगी कबूल केलेला साठ लक्षांचा मुलुख व आणखी वर २२ लाखाचा प्रांत मिळून सुमारे ८२ लक्ष उत्पन्नाचा प्रांत त्याने पेशव्याला देऊन आपला जीव वाचवला. ( २५ सप्टेंबर १७६३ )
                    राक्षसभुवनच्या संग्रामास मराठी इतिहासात तर महत्त्व आहेच पण प्रस्तुतचा प्रसंग माधवराव पेशव्याच्या राजकीय जीवनातील  उदयकालाचे प्रतीक बनला. या संग्रामातील यशामुळे माधवरावास नजरकैदेत ठेवणे दादासाहेबास शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे निजाम - भोसले हे दादाचे बेभरवशी हस्तक पेशव्याच्या समोर लीन झाल्याने दादाचा जोर संपला. राक्षसभुवन पाठोपाठ औरंगाबादच्या संग्रामात निजामाची बरीच लष्करी हानी झाल्यामुळे यापूर्वी कधी नव्हे ती त्याला मराठी सत्तेची जबरदस्त दहशत बसली. जे कार्य बाजीराव अगर दादा - भाऊ यांना करता आले नाही ते या युवकाने केल्यामुळे त्याचे राजकीय महत्त्व अचानक वाढले. माधवरावाच्या या एका स्वारीने दादाच्या अटक मोहिमेचे पुण्य देखील सरले. सारांश, आळेगाव ते राक्षसभुवन हा दादाच्या अस्ताचा तर माधवरावाच्या उदयाचा काल मानला पाहिजे. 
                       निजामाचे प्रकरण निकाली काढून स. १७६४ मध्ये हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी माधवरावाने कर्नाटक मोहीम आखली. निव्वळ भूदलाच्या सहाय्याने हैदरला वठणीवर आणणे शक्य नाही याची पेशव्याला कल्पना असल्याने त्याने आपला आरमार प्रमुख रुद्राजी धुळप यांस हैदरच्या ताब्यातील नाविक तळांवर हल्ले चढवण्याची आज्ञा केली. त्यानुसार मराठी आरमाराने हैदरच्या ताब्यातील होनावर बंदर जिंकून घेतले. यामुळे हैदरला काही प्रमाणात आळा बसला. 
                      स. १७६४ मध्ये माधवराव कर्नाटकात उतरल्यावर ता. ३ मे १७६४ रोजी रट्टेळळी जवळ त्याची व हैदरची एक मोठी लढाई घडून आली. या लढाईत उभयपक्षांची मिळून सुमारे दोनशे माणसे ठार झाली तर पाच - सातशे जखमी झाली. तुलनेने हैदरचे नुकसान अधिक होऊन त्याने माघार घेतली. या संग्रमातील विजयाचे खरे शिल्पकार गोपाळराव पटवर्धन व विठ्ठल विंचूरकर हे दोघे आहेत. गनिमी काव्याच्या बळावर त्यांनी हैदरला खुल्या मैदानात ओढले व मग माधवराव पेशव्याने मुख्य सैन्यासह त्याच्यावर हल्ला चढवला. असो, या लढाईनंतर पेशव्याने धारवाड वेढा घालून जिंकून घेतले. ( ६ नोव्हेंबर १७६४ ) या स्वारीत माधवरावाने राजकीय परिपक्वता दाखवत कर्नाटकात मराठी राज्याचा एक जोरदार हस्तक उभा केला. त्याचे नाव मुराराव घोरपडे ! विख्यात मराठी सेनापती संताजी घोरपडेचा हा पराक्रमी पुतण्या. स्वबळावर त्याने कर्नाटकात आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. घोरपड्यासारख्या पराक्रमी पुरुषाची साथ असल्याखेरीज कर्नाटकांत आपला निभाव लागणार नाही याची माधवरावास पुरेपूर जाणीव होती. याचा अर्थ असा होत नाही की, नानासाहेब पेशव्यास मुराररावाच्या योग्यतेची कल्पना नव्हती. परंतु, नानासाहेब पेशव्याच्या प्रादेशिक लोभामुळे त्यास घोरपडेला आपल्या पक्षात वळवता आले नाही. बापाची चूक मुलाने सुधारली. सातारच्या छत्रपतींना विनंती करून सातार दरबारचे प्रमुख सेनापतीपद त्याने मुरारराव घोरपडेच्या नावे करून दिले. ( स. १७६४ ) संताजी घोरपडेच्या पुतण्याला आणखी काय हवे होते ? केवळ याच सेनापतीपदाच्या बळावर तो पुढे सातार दरबारशी एकनिष्ठ राहिला व प्रसंग पडला तेव्हा त्याने हैदरची कैद व मृत्यू स्वीकारला पण निष्ठा बदलली नाही ! 
                          धारवाड ताब्यात येताच पेशव्याने ता. १ डिसेंबर १७६४ रोजी अनवडी येथील हैदरच्या तळावर हल्ला चढवला. या प्रसंगी हैदरचे हजारभर गारदी मारले गेले तर सुमारे पाचशे कैदी झाले. त्याशिवाय त्याचा तोफखानाही लुटला गेला. या पराभवामुळे हैदरचे बळ खचले. पुढे हैदरच्या छावणीला घेरून त्याचा कोंडमारा करण्याचा पेशव्याने प्रयत्न केला पण शेकडो लोकांचे बळी देत स. १७६५ च्या जानेवारीत हैदर मराठी सैन्याच्या तावडीतून सहीसलामत सुटला. तेव्हा हैदरला पकडण्यासाठी फिरून पेशव्याला नवीन डावपेचांची आखणी करणे भाग पडले. परंतु इतक्यात हैदरच्या मदतीस खुद्द दादासाहेब अवतीर्ण झाले. माधवरावाने मनात काही एक बेत योजून मुद्दाम रघुनाथरावास कर्नाटकांत बोलावले होते. परंतु रघुनाथ त्याचा काका निघाला ! त्याने माधवरावास हैदरसोबत तह करण्यास भाग पाडले. परिणामी पेशव्याला माघार घ्यावी लागून ३० मार्च १७६५ रोजी त्याने हैदरसोबत तह केला. हा तह अनंतपूरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहाने जरी मराठी राज्याचा आर्थिक व प्रादेशिक फायदा झाला असला तरी हैदरसारखा शत्रू कर्नाटकांत कायम राहिला. 
                  कर्नाटक स्वारी आटोपल्यावर पेशवा पुण्यास परत फिरला. मात्र परत आल्यावर त्यास काही स्वस्थता लाभली नाही. रघुनाथरावाने त्याच्याकडे राज्याची वाटणी करण्याची मागणी केली. त्यामुळे उभयतांत काही काळ तेढ निर्माण झाली. मात्र बोलाचालीने हा प्रश्न तात्पुरता निकाली निघून रघुनाथरावाची उत्तरेत रवानगी करण्याचे ठरले. यावेळी उत्तर हिंदुस्थानातील राजकारणात मराठी सत्तेचे पाऊल मागेचं पडत चालले होते. इंग्रजांनी मोगल बादशहा शहाआलम सोबत करार करून बंगालची दिवाणी पदरात पाडून घेतली होती. आजवर मराठी सरदारांच्या मदतीवर बादशाही भोगणारे मोगल आता इंग्रजांच्या कह्यात जाऊ लागले होते. यावेळी उत्तरेत वावरणारे दोनचं प्रमुख मराठी सरदार होते व ते म्हणजे मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे. पैकी मल्हारराव आता वृद्ध झाला होता तर महादजीची सरदारकी अजून कायम नसल्याने त्यास मुखत्यारीने काही करणे शक्य नव्हते. माधवरावास उत्तरेतील राजकारणाची बातमी होतीचं पण दादा, निजाम, हैदर, भोसले इ. कटकटींमुळे त्याला स. १७६१ पासून ६५ पर्यंत उत्तरेकडे लक्ष देण्यास उसंत अशी मिळालीच नाही. तेव्हा संधी मिळताच त्याने दादाची उत्तरेत रवानगी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, यामागे दादाला उत्तरेत स्वतंत्र कार्यक्षेत्र नेमून देण्याचा त्याचा मानस नसेलचं असे म्हणवत नाही. कारण, आजवर दादाच्या उत्तर स्वाऱ्यांवर नानासाहेब पेशव्याचे नियंत्रण असे व पेशवा सांगेल तेव्हा त्यास मागे फिरून येणे भाग पडे. त्यामुळे दादाच्या तलवारबहाद्दरीस मर्यादा येत. पण आता स्थिती बदलली होती व पूर्णतः निर्णयस्वातंत्र्य देऊन माधवरावाने त्यास उत्तरेत पाठवण्याचे निश्चित केले. पण ठरल्याप्रमाणे दादास ताबडतोब उत्तरेत जाता आले नाही. कारण नागपूरकर भोसल्यांचे प्रकरण उद्भवून प्रथम त्यांचा बंदोबस्त करणे भाग पडले. 
                                 निजामासोबत भोसल्यांनी हातमिळवणी केल्याचा राग पेशव्याच्या मनातून गेला नव्हता. त्याचप्रमाणे हैदरवरील स्वारीत देखील भोसल्यांनी कबूल केल्याप्रमाणे सहभाग न घेतल्याचा घुस्सा माधवरावास होताचं. अशा स्थितीत निजाम - भोसले यांच्यात तंटा निर्माण होऊन निजामाने स. १७६५ मध्ये माधवरावाकडे मदत मागितली. आपल्या मनातील बेत उघड न करता माधवराव फौजेसह व चुलत्यासह वऱ्हाड प्रांती निघाला. प्रथम त्याने भोसल्यांसोबत तडजोड आरंभली पण जानोजी भोसले ऐकत नाही हे लक्षात येताच त्याने भोसल्यांवर शस्त्र उपसले. भोसल्यांना फार काळ संघर्ष करणे शक्य न झाल्याने त्यांनी १८ जानेवारी १७६६ रोजी पेशव्याची भेट घेऊन तह केला. त्यानुसार २४ लाख उत्पन्नाचा प्रांत पेशव्यास मिळाला. त्यापैकी १५ लाखांचा प्रदेश त्याने मराठी राज्याला जोडून उर्वरीत ९ लक्ष उत्पन्नाचा प्रांत निजामाला दिला. पेशव्याच्या या चालीने निजाम - भोसले युतीची शक्यता आता बरीचशी मावळली. त्याशिवाय पुढे - मागे रघुनाथरावाने कलह केल्यास त्याला या दोघांचीही मदत मिळणार नाही असा त्याने बंदोबस्त करून ठेवला. अर्थात, राजकारणात कोणी कायमचे शत्रू वा मित्र नसते हे सूत्र लक्षात घेतले असता पेशव्याच्या या डावाचे कौतुक वाटते. भोसल्यांसोबत तह झाल्यावर दादा उत्तरेत निघून गेला तर पुण्यास परतताना स. १७६६ च्या फेब्रुवारीमध्ये पेशव्याने निजामाची भेट घेऊन त्याच्याशी स्नेहसंबंध जोडला. 
                 स. १७६६ मध्ये काही संमिश्र घटना घडून आल्या. ज्यामुळे पेशव्याचा बराचसा फायदा व काहीसा तोटा देखील झाला. उदाहरणार्थ :- निजाम - भोसलेवर त्याने आपला शह बसवला.  मात्र याच वर्षी २० मे रोजी मल्हारराव होळकराचा मृत्यू झाला तर नोव्हेंबर महिन्यात निजाम इंग्रजांच्या गोतावळ्यात सामील झाला. तसेच या वर्षारंभी उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर गेलेला दादा याच वर्षाअखेर गोहदपर्यंतचं पोहोचू शकला होता. मिळून पेशव्याला आपली कर्तबगारी शत्रू - मित्रांना दाखवण्याची संधी या वर्षात अनेकदा चालून आली व ती त्याने कित्येकदा साधली. मल्हाररावाच्या मृत्यूने त्याची एक बाजू खचली असली तरी हा डोईजड सरदार मरण पावल्याने पेशव्यावरील एक शहदेखील नाहीसा झाला. कारण, होळकर हा दादाचा पक्षपाती मानला जात असे. त्यामुळे मल्हाररावाच्या मृत्यूने पेशवा काहीसा निर्धास्त झाला व नवा वारस नेमण्याची सत्ता पेशव्याच्या हाती असल्याने होळकर आपल्या विरोधात जाणार नाहीत हि एक त्याला खात्री होती. सारांश, माधवराव निरंकुश होण्याची सुरवात या वर्षाने झाली असे म्हणता येईल. 
                        स. १७६५ मध्ये हैदरचा बंदोबस्त करण्याचे अपुरे राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी स. १७६६ च्या ऑक्टोबरमध्ये माधवराव परत एकदा कर्नाटक प्रांती रवाना झाला. मार्गातील मांडलिकांकडून खंडण्या वसूल करण्याकडे जसे पेशव्याचे लक्ष होते त्याचप्रमाणे लष्करातील सरदार करारानुसार सैन्य न बाळगता खोटी हजेरी दाखवतात म्हणून स्वतःच्या विश्वासू माणसांकडून तो सरदारांच्या सैन्याची गणती घेऊ लागला. परिणामी सरदारांना पेशव्याची बऱ्यापैकी दहशत बसून सैन्यातील बेशिस्तीला काही प्रमाणात आळा बसला. पेशवा स्वतः चालून येत आहे हे पाहून हैदरने वरकरणी तहाची वाटाघाट चालवत युद्धाची तयारी केली. परंतु, मुरारराव घोरपडे, गोपाळराव पटवर्धन व माधवराव अशा रणधुरंधरांसमोर हैदरचा निभाव लागला नाही. मार्च १७६७ पर्यंत पेशव्याने हैदरच्या ताब्यातील बव्हंशी प्रदेश गुंडाळून टाकला. आता हैदरकडे फक्त श्रीरंगपट्टण व बेद्नुर हे दोनचं प्रांत राहिले होते परंतु,  तरीही तो तहास तयार होईना.  इतक्यात पेशव्याच्या सुचनेनुसार खासा निजाम हैदरवर चालून येऊ लागला. या बातमीने हैदरने हाय खाल्ली व निमूटपणे तहाची बोलणी सुरु केली. अखेर, नानासाहेब पेशव्याच्या काळी मराठी राज्याच्या ताब्यात जितका मुलुख होता तितका परत देण्याचे हैदरने मान्य केले. त्याउपर हैदरचा जो प्रांत माधवरावाने जिंकला होता तो त्यास परत करावा लागला. मात्र हैदरने पेशव्याला ३३ लक्ष रुपये खंडणी दाखल देण्याचे मान्य केले. ( ७ मे १७६७ ) वस्तुतः स. १७६७ मध्ये कर्नाटकात पावसाळी छावणी ठोकून हैदरचा पुरता बंदोबस्त करण्याचा पेशव्याचा विचार होता व मुरारराव घोरपडे यासाठी आग्रही होता. परंतु, रघुनाथराव उत्तर हिंदुस्थानातून परतला होता. अशा परिस्थितीत पुण्यापासून लांब राहणे पेशव्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्याने आपला हात आवरता घेतला. इकडे हैदरचे इंग्रजांशी जास्तचं फाटल्यामुळे त्याला एकाच वेळी दोन ते तीन आघाड्यांवर युद्ध करणे परवडण्यासारखे नसल्याने त्याने माधवरावाची मनधरणी करून तह पदरात पाडून घेतला. बाकी, कागदी तहांना कितपत किंमत द्यायची असते हे हैदर जाणून होता. अर्थात, हैदरची हि वृत्ती माधवराव देखील चांगलाच ओळखून होता पण दादाचा भरवसा नसल्याने त्याने तात्पुरती पड खाल्ली. 
                            इकडे उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीत नामुष्की पदरात घेऊन व अहिल्याबाई होळकरकडून मार खाउन लालबुंद झालेली दादाची स्वारी पुण्यास आली होती. आपल्या अपयशास पेशवाचं जबाबदार असल्याची त्याने बोंब उठवली असली तरी खरा प्रकार सर्वांना माहिती होता. मराठी राज्याच्या शत्रूंशी हातमिळवणी करून भावी वारसा युद्धांत त्यांची आपणांस कितपत मदत होईल याची चाचपणी दादाने केली होती व एक इंग्रज वगळता इतरांनी त्यास तोंडी आश्वासने मात्र भरपूर दिली. अर्थात, शत्रूंशी मित्रता करण्याचा दादाचा अंतस्थ हेतू असल्याने उत्तरेतील मोहीम अपयशी ठरणार होतीचं. त्याशिवाय मल्हारराव होळकराचा मृत्यू झाल्यावर होळकरांवर आपले वर्चस्व बसवण्याचाही त्याने एक प्रयत्न केला. दादा व मल्हारराव यांच्यात कितीही प्रेमभाव असला तरी तो राजकीय होता. मल्हारराव मरण पावताच होळकर हे दादाला परके झाले. होळकरी गादीचे दोन वारस यावेळी होते. एक अहिल्याबाईचा मुलगा मालेराव व दुसरा तुकोजी होळकर ! पैकी तुकोजी व अहिल्याबाई एकविचाराने वर्तत असून होळकरांची सरदारकी रक्षून होते. भावी वारसा युद्धांत हे दोघे आपल्या पक्षाला चिकटून राहतील कि काय हे पाहण्याच्या हेतूने दादा ३० मार्च १७६७ रोजी इंदूरास धडकला. यावेळी नुकताच म्हणजे २७ मार्च १७६७ रोजी अहिल्याबाईस पुत्रशोक झाला होता. होळकरी दौलतीचा वारसा मालेराव मरण पावला होता. अशा परिस्थितीत दादा इंदूरला आला. होळकरांचा प्रसिद्ध कारभारी गंगोबातात्या, याप्रसंगी दादाला खेळवत होता असे म्हटले जाते. परंतु त्यात फारसे तथ्य नाही. दादा हा काही अगदीच निर्बुद्ध प्राणी नव्हता. उलट गंगोबाला हाताशी धरून त्याने होळकरशाहीत हातपाय पसरण्याचा उपक्रम चालवला. मात्र त्याच्या दुर्दैवाने अहिल्याबाई भलतीच खंबीर निघाली. तिने सैन्याची जमवाजमव करून दादाच्या कागाळ्या थेट माधवरावास करून लढाईची सिद्धता चालवली. माधवरावाकडून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत दादाच्या पथक्यांची व अहिल्याबाईच्या सरदारांची झुंज घडून आली व दादाची फौज पराभूत झाली. दादाचे पथके वगळले तर इतर सरदार होळकरांशी लढण्यास नाखूष होते. परिणामी दादाला इंदुरातील मुक्काम हलवणे भाग होते. इतक्यात माधवरावाने अहिल्याबाईचा पक्ष उचलल्याचे समजल्यावर दादाला निमुटपणे मागे फिरावंच लागलं.  महाराष्ट्रात परतल्यावर दादाने पेशव्याशी बिघाड करण्याचा निर्णय घेतला. माधवराव देखील यावेळी प्रकरणाचा निकाल लावण्यास आतुर झाला होता. त्यानेही संग्रामाची तयारी करून दादाला स्पष्टपणे सांगितले कि, ' राज्यकारभार करणार असाल तर मी सांगेन तसेच वागावे लागेल. नाहीतर निर्वाहापुरती जहागीर तुम्हाला लावून देऊ. पण अन्य काही प्रकार केल्यास खपवून घेतले जाणार नाही.' प्रसंग पाहून दादाने जहागीर घेऊन स्वस्थ बसण्याचे ठरवले. पेशव्याने त्याच्या कर्जाची व खर्चाची हमी घेतली. तसेच दादाच्या ताब्यात असलेले सातारा, शिवनेरी, नगर व अशीरगड असे चार किल्ले त्याने मागून घेतले. हो नाही करत दादाने ते देऊन टाकले. स. १७६६ मध्ये हा समेट झाला पण दादाने तो मनापासून केला नव्हता. त्याची अंतस्थ कारस्थाने सुरुचं होती. 
    
          याच सुमारास इंग्रजांचे वकील हैदरविरुद्ध पेशव्याची मदत मागण्यासा पुण्यास येउन ठेपले. पैकी मॉस्टीन हा माधवरावाकडे तर ब्रोम हा दादाकडे रुजू झाला. माधवरावाकडे मॉस्टीनची डाळ शिजली नाही.  मात्र चुलते - पुतण्यातील बेबनाव त्याने पाहून घेतला. ब्रोमने नाशिकला जाउन दादाची भेट घेतली. दादाने त्यास पुतण्याविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्याची सरळ मागणी केली. अर्थात इंग्रज वकिलास हे अपेक्षित असले तरी याचवेळी पेशव्याच्या विरोधात उभे राहण्याची त्यांची ताकद नसल्याने ब्रोमाने दादाला पोकळ आश्वासने मात्र दिली. सारांश, इंग्रज वकिलातीने फारसे काही साध्य झाले नसले तरी परत एकदा दादा - माधवाचा झगडा जुंपणार हे स्पष्ट झाले. माधवरावाने आता लढाईची तयारी चालवली. दादानेही शक्य तितका फौजफाटा गोळा केला व दौलतीच्या वाटणीच्या मागणीला जोर यावा यासाठी गोविंदपंत भुस्कुटे यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा नाशिक येथे १९ एप्रिल १७६८ रोजी दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले. माधवरावास त्याने दत्तकाची साखर व वस्त्रे पाठवली पण त्याने ती स्वीकारली नाहीत. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड इ. सरदारांकडे दोन्ही पक्षांचे वकील गेले. पैकी महादजी शिंदे माधवरावाच्या बाजूला गेला तर त्याचा पुतण्या केदारजी शिंदे दादाच्या पक्षाला मिळाला. गायकवाडाने उघडपणे दादाची बाजू उचलली. तुकोजी होळकराने तटस्थता स्वीकारली पण त्याची फौज गंगोबातात्याच्या नेतृत्वाखाली दादाच्या बाजूने लढली. ता. १८ जून १७६८ रोजी धोडप किल्ल्याखाली लढाई होउन दादाची फौज पराभूत झाली. खासा दादा यावेळी युद्धात उतरला नाही. तो स्वतः धोडप किल्ल्यावर होता. गंगोबा, केदारजी शिंदे, सदाशिव रामचंद्र इ. सरदारांनी युद्धाचे काम पाहिले. लढाईनंतर दादा पुतण्याच्या स्वाधीन झाला. त्याचे सहाय्यक देखील कैदेत पडले. सखारामबापूला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. गंगोबाला नगरच्या किल्ल्यात डांबले. केदारजीला महादजीच्या ताब्यात देण्यात आले. खुद्द दादा आता शनिवारवाड्यात पेशव्यांचा नजरबंदी बनला तर इतरांची काय कथा ! 
                      शनिवारवाड्यातील नजरकैदेत माधवरावाने चुलत्याची बडदास्त उत्तम ठेवली. खर्चासाठी त्याला साडेपाच लाखांची जहागीर देखील दिली. फक्त त्याने राजकारणात भाग घेऊ नये एवढे बंधन मात्र त्याजवर लादले. अर्थात हि स्थिती दादाला मानवली नाही. त्याचे लहान - मोठे फितूर चालूचं राहिले आणि मरेपर्यंत पेशव्याला त्याचा कायम त्रास राहिला. दादा ठिकाणी बसताच इतर राजकीय कामे पेशव्याने तातडीने हाती घेतली. महादजीला शिंदे घराण्याची सरदारकी कायमस्वरूपी बहाल करण्यात आली. दमाजी गायकवाडाने धोडप प्रसंगी दादाच्या मदतीसाठी आपला मुलगा सयाजी राव यास पाठवले होते. यामुळे गायकवाडावर माधवरावाची वक्रदृष्टी झाली. दरम्यान १८ ऑगस्ट १७६८ रोजी दमाजी मरण पावला. त्यामुळे वारसाचा प्रश्न उद्भवला. दमाजीला चार मुले होती. परंतु पेशव्याने सरळसरळ वारसाची नियुक्ती न करता प्रथम गायकवाडांच्या सरंजामाची जप्ती केली. नंतर वारस नियुक्त करून दादाला मदत केल्याबद्दल साठ लक्ष रुपयांचा दंड बसवला. यामुळे गायकवाद तर नरम आलेचं पण इतर सरदार देखील चपापून गेले. घरची कटकट मिटताच माधवरावाने उत्तरेत फौजा पाठवण्याचा निर्णय घेतला. स. १७६८ च्या उत्तरार्धात शिंदे, होळकरांच्या मदतीला पेशव्यांचे सरदार उत्तरेत जाणार होते. पण इतक्यात नागपूरचे प्रकरण उद्भवले. धोडप प्रसंगी नागपूरची फौज दादाच्या मदतीला येऊ शकली नाही. परंतु त्यानंतरदेखील त्याची व दादाची अंतस्थ कारस्थाने खेळत होतीच. जानोजीचे हे उपद्व्याप बंद कारणासाठी माधवरावाने जानोजी भोसलेला भेटीस बोलावले. वास्तविक यावेळी खुद्द माधवरावाचा उत्तरेत स्वतः जाण्याचा विचार चालला होता. मोगल बादशहा इंग्रजांच्या आश्रयाला जातो याची दाखल घेणे त्यास भागचं होते. परंतु, भोसल्यांनी इंग्रजांचा पदर न धरावा यासाठी त्याला जानोजीला वळवून घेणे प्रथम आवश्यक वाटले. 
              पेशव्याने सांगितल्यानुसार जानोजी भेटीस आला नाही त्याचा योग्य तोच अर्थ घेऊन उत्तर हिंदुस्थानात निघालेल्या फौजांचा रोख पेशव्याने नागपूरकडे वळवला. स. १७६८ च्या सप्टेंबरमध्ये पेशवे - भोसले यांचा सामना जुंपला. अखेर २३ मार्च १७६९ रोजी भोसले - पेशे यांच्यात कनकापूरचा तह घडून आला व त्या तहाने भोसले पेशव्यांचे अंकित झाले. भोसल्याचे प्रकरण आटोपताच पेशव्याने रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांना शिंदे - होळकरांच्या मदतीसाठी उत्तरेत रवाना केले. उत्तरेत फौज पाठवून पेशवा पुण्यास परतला. पावसाळा उरकून नोव्हेंबर १७६९ मध्ये माधवरावाने परत एकदा कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी हैदरचा पूर्ण निःपात करण्याचा त्याचा बेत होता. या स्वारीत माधवरावाने कर्नाटकात खोलवर मुसंडी मारून हैदरचा सुमारे १ कोट रुपये उत्पन्नाचा मुलुख लुटून फस्त केला. निजगल सारखा मजबूत किल्ला ताब्यात घेतला. हैदरची रयत परागंदा होऊ लागली. खुद्द हैदर माधवरावाशी मुकाबला करण्यास खुल्या मैदानात येण्याचे टाळू लागला. अशात स. १७७० चा पावसाळा तोंडावर आला. या वर्षी पावसाळी छावणी कर्नाटकात करावी लागणार अशी चिन्हे दिसू लागली. मात्र पेशव्याची प्रकृती बिघडल्याने त्याने मागे फिरण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्य फौज त्रिंबकराव पेठ्याच्या हुकुमतीखाली देऊन गोपाळराव पटवर्धन व मुरारराव घोरपडे यांना त्याच्यासोबत देऊन पेशवा पुण्याला परतला. प्रकृतीला उतार पडताच परत कर्नाटकात येण्याचा त्याचा विचार होता. पुण्यास परतल्यावर राजकीय कामे नेटाने उरकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा पोटाचा विकार एव्हाना  गेल्याने त्याच्या हातून कामे रेटेनात. तेव्हा त्याने आपला धाकटा भाऊ नारायणराव यास दिवाणगिरीची वस्त्रे देऊन सखारामबापूस त्याची मुतालिकी दिली. परंतु, नारायणराव अजून पोरकट होता तर बापूचे कारभारात लक्ष नव्हते. अशाही स्थितीत पेशव्याने स. १७७० मधील सप्टेंबर महिन्यात कर्नाटकात जाण्याचे निश्चित केले. एवढ्यात जानोजी भोसले भेटीस आल्याने त्याची कर्नाटक मोहीम लांबणीवर पडली. दरम्यान उभयतांच्या भेटी होऊन सौरस्य घडून आले व भोसल्यांना नागपूरच्या वाटेला लावून पेशवा कर्नाटकच्या मार्गाला लागला.  पण लवकरचं त्याच्या लक्षात आले कि, आपला आता निभाव लागणार नाही. प्रकृतीसाठी एकाच ठिकाणी कायम राहून औषधोपचार करणे भाग आहे. तेव्हा त्याने आप्पा बळवंतच्या नेतृत्वाखाली दहा हजार फौज त्रिंबकराव पेठ्याच्या मदतीसाठी कर्नाटकात रवाना केली. 
                 माधवरावाच्या अनुपस्थितीत पेठे, पटवर्धन, घोरपडे, मेहेंदळे इ. सरदारांनी बंगळूर, श्रीरंगपट्टण व बिदनूर हे तीन जिल्हे वगळता हैदरचे सर्व राज्य जिंकून घेतले. स. १७७२ मध्ये हैदरच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र उत्तर हिंदुस्थान व कर्नाटकातील मोहिमा दीर्घकाळ चालल्याने पेशव्याच्या खजिन्यावर मोठा ताण पडत होता. दोन्हीकडच्या फौजांचा खर्च चालवण्याची आर्थिक ताकद मराठी राज्याच्या तिजोरीत नव्हती. त्यातचं पेशवा मृत्यूपंथास लागलेला. त्यामुळे त्याने त्रिंबकरावास हैदरसोबत तह करून मागे फिरण्याची आज्ञा केली. त्यानुसार ५० लक्ष रुपये व शिरे, मदगिरी, गुर्रमकोंडा, दोड्डबाळापूर, चेनरायदुर्ग, कोलार, होसकोट इ. ठाणी व त्याअंमलाखालील मुलुख पेशव्याला देण्याचे हैदरने मान्य केले. तह घडून आल्यावर पेठे मागे फिरला व १० सप्टेंबर १७७२ रोजी थेऊर येथे पेशव्याला भेटला. पेठ्याने दोन वर्षे कर्नाटक मोहीम सांभाळली. त्यात १ कोटी ३९ लाखांचा खर्च होऊन मोहीम संपल्यावर त्याने सरकारी खजिन्यात खंडणीदाखल हैदरकडून मिळवलेले ३० लक्ष रुपये जमा केले. 
                      कर्नाटक मोहीम जशी तशी पार पडली. परंतु उत्तर हिंदुस्थानची मोहीम मात्र पेशव्याच्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाली नाही. पूर्वसंप्रदायाप्रमाणे शिंदे - होळकरांचे आपसांत बनत नव्हते. त्याखेरीज रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण या पुणेरी जोडगोळीचे देखील आपसांत जमत नव्हते. आणि मोहिमेची सर्व जबाबदारी तर या चौघांवर ! त्यामुळे हरएक बाबतीत मतभेद उद्भवून पुण्याहून पेशव्याचा हुकुम मागवणे भाग पडे. जाटांचा बंदोबस्त करून मराठी फौजा पुढे निघाल्या. दिल्लीच्या राजकारणात १० वर्षांमागे नजीबचे असलेले तेज साफ मावळले होते. त्याने मराठी सरदारांशी वाटाघाट चालवली. शिंद्याचे मत होते कि एकदम दिल्ली ताब्यात घ्यावी व पेशव्याची देखील तीच इच्छा होती. पण तुकोजीने यास विरोध दर्शविला. ग्वाल्हेरपासून दिल्लीपर्यंतचा आपला पाया मजबूत करून मग दिल्ली हाताखाली घालावी असे त्याचे मत पडले. त्यातचं अंतर्वेदीत मराठी सरदारांची ठाणी बसवून देण्याचे नजीबने मान्य केल्याने नजीबचा वापर करण्याचे मराठी सरदारांनी ठरवले. अंतर्वेदीत नजीब, अहमंदखान बंगष, सुजा व इंग्रज अशा चौघांनी मराठी फौजांना घेरण्याचा  डाव रचला होता. त्यामुळे स. १७७० च्या पावसाळ्यात पुण्यात चिंतेचे वातावरण पसरून पेशव्याने अधिक फौज उत्तरेत रवाना करण्याचे ठरवले. मात्र रामचंद्र गणेशने सावधपणे माघार घेत शत्रूचा डाव हाणून पाडला. पुढे पावसाळयानंतर रोहिल्यांचा मराठी सरदारांनी चांगलाच समाचार घेतला. त्याशिवाय मोगल बादशहाला इंग्रजांचा आश्रय सोडून आपल्या गोटात येण्यास भाग पाडले. दिल्ली ताब्यात घेऊन तिथे मोगल बादशहाचा राज्यारोहण समारंभ पार पाडण्यात आला. ( फेब्रुवारी १७७१ ) दरम्यान रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांच्यातील बेबनाव विकोपास जाऊन पेशव्याने रामचंद्र गणेशला माघारी बोलावले. 
                 मराठी सरदारांनी मोगल बादशहाला तख्तावर बसवले खरे पण अर्थप्राप्ती काही त्यांना फारशी झाली नाही. उलट लष्कराचा आणि बादशहाचा खर्च त्यांच्या अंगावर पडला. याबाबतीत पेशव्याने सरदारांना खरमरीत भाषेत पत्र लिहून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. गेली दहा वर्षे शहा आलम इंग्रजांची मनधरणी करत होता कि, मला दिल्लीला नेऊन तख्तावर बसवा पण इंग्रजांनी या बिनफायद्याच्या कामात लक्ष घातले नाही. त्यातच त्यांचा पाया कलकत्त्यात असल्याने दिल्लीचे जोखीम त्यांना पेलवण्यासारखे नव्हते. अशा स्थितीत मराठी सरदारांनी हि कामगिरी पार पाडली असली तरी वैयक्तिक अर्थलाभ पदरात पाडून घेण्यापलीकडे त्यांनी सरकार कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अर्थात, याबाबतीत सरदारांना फारसा दोष देता येत नाही. कानडे वा बिनीवाले हे कितीही झाले तरी पेशव्यांचे सरदार होते व शिंदे - होळकर या बड्या सरदारांना रगडून त्यांच्याकडून काम करून घेणे या पुणेरी सरदारांच्या कुवतीबाहेरचे होते. त्यामुळे जितके यश त्यांच्या पदरी पडले तेच खूप झाले असेच म्हणावे लागते. माधवराव पेशव्याचा मृत्यू झाल्याची बातमी आल्यामुळे विसाजी कृष्णास मागे परतावे लागले. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष देण्यास मराठी मुत्सद्द्यांना सवडचं प्राप्त न झाल्याने इंग्रजांचा दिलीच्या राजकारणात व हिंदुस्थानात प्रभाव वाढत गेला. 
              स. १७७० च्या उत्तरार्धात पेशव्याने प्रकृतीसाठी पुणे व आसपासच्या प्रदेशात राहाणे पसंत केले. शरीर घाईला आल्याने त्याचा नाईलाज झाला. हवाफेरासाठी  आसपास राहिला असला तरी त्याचा बराचसा काळ पुणे व थेऊर येथेच गेला. पोटाच्या क्षयरोगाने माधवराव ग्रस्त होता. आरंभी त्याला होणारा त्रास कमी झाल्यामुळे काही काळ परिवारात आनंदाचे वातावरण पसरले पण लवकरचं त्याचा विकार बळावत जाउन त्यास वेदना असह्य होऊ लागल्या. परिणामी पुढील व्यवस्थेची सोय लावून ठेवणे त्याला भाग पडले. दरम्यान आजारपणामुळे त्याचा मुळचा रागीट स्वभाव अधिकचं वाढत गेला. नाना फडणीस, हरिपंत फडके सारखे त्याचे पक्षपाती देखील त्याच्यासमोर असताना मनातून धास्तावलेले असत. कधी कोणाला तो काय बोलेल याचा नेम राहिला नव्हता. अर्थात यामुळे कारभारात पेशव्याची जरब बसून सेवक वर्गावर त्याचे वजन कायम राहिले. अखेरच्या दिवसांत तर त्याला स्वतःहून शरीराची हालचाल करता येत नव्हती पण तरीही त्याचा दरारा कायम होता. इतकी माधवरावाची जरब त्यावेळी नोकर व मुत्सद्दी वर्गावर बसलेली होती. इकडे शनिवारवाड्यात नजरबंदी असलेल्या दादाची नानाप्रकारची व्रत वैकल्ये व अनुष्ठाने सुरु होती. त्यामागील हेतूंची स्पष्टता होत नसली तरी माधवरावास अपाय व्हावा हा हेतू त्यामागे नव्हता असे माझे ठाम मत आहे. माधवरावाने आपल्या अखेरच्या दिवसांत दादावरील निर्बंध दूर केले. प्रकृतीला उतार पडावा म्हणून त्याने आपला मुक्काम थेऊरला हलवला. याच ठिकाणी त्याचे दिनांक १८ नोव्हेंबर १७७२ रोजी देहावसान झाले. पत्नी रमाबाई हिने सहगमन केले. अर्थात अशी माधवरावाचीच इच्छा होती. 
                        स्थूलमानाने पाहता माधवरावाची पेशवाई जरी ११ वर्षे चालली असली तरी त्यापैकी आरंभीची दोन व अखेरची दोन वर्षे वजा केल्यास अवघ्या ७ वर्षांचीच त्याची राजकीय कारकीर्द आहे. या ७ वर्षांमध्ये पानिपत नंतर जी काही मराठी साम्राज्याची घडी विस्कटली होती ती बसवण्याचा प्रयत्न माधवरावाने केला. डोईजड सरदारांना वठणीवर आणत त्याने निजामासारख्या परंपरागत शत्रूला आपला मित्र कमी व अंकीत जास्त बनवले. इंग्रजांच्या आक्रमणाला शक्य तितका पायबंद घालण्याचा त्याने प्रयत्न चालवला पण तो फारसा सिद्धीस गेला नाही. हैदरवर त्याने वारंवार मोहिम आखल्या पण काही ना काही कारणांनी त्या पूर्णतः यशस्वी झाल्या नाहीत. नानासाहेब पेशव्याच्या काळात पेशवेबंधूंमध्ये दुरावा असला तरी त्यांची एकमेकांना साथ होती. परंतु माधवरावास घरातून अशी साथ कोणाची मिळालीचं नाही. त्यामुळे प्रत्येक कामात, स्वारीत त्यास जातीने लक्ष घालणे भाग पडे. त्याच्या लष्करी मोहिमा विफल होण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. पेशवे घराण्यातील भांडणात महादजी शिंदेचे बस्तान बसण्यास तब्बल ६ - ७ वर्षे जावी लागली. त्यामुळे उत्तरेतील सर्व कारभार होळकरांच्या अंगावर पडला. परंतु, मल्हाररावाच्या मृत्यूने त्यांच्याही घरात काही काळ अशांतता माजल्यामुळे उत्तरेत मराठी सत्तेचा जोर काहीसा मंदावला. 
                   तात्पर्य, माधवराव पेशव्याची राजकीय कारकीर्द हि काहीशी संमिश्र स्वरूपाची आहे व तो काय करू शकत होता हे पाहण्यापेक्षा त्याने काय साध्य केले हे पाहिले असता नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर मराठी साम्राज्याला तडे जाण्याचा जो धोका निर्माण झाला होता तो,  काही  काळापुरता टाळण्याचा पेशव्याचा प्रयत्न यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. अर्थात, हा निष्कर्ष काहीसा रुक्ष वा अधिक कटू वाटेल पण केवळ ७ वर्षांची राजकीय कारकीर्द लाभलेल्या पेशव्याला इतकेचं साध्य करता आले असे तटस्थ इतिहासकाराच्या भूमिकेतून नमूद करावेसे वाटते. या पेशव्याचे वय मृत्यूसमयी २७  वर्षांचे होते. इतक्या कमी वयात त्याने ज्या प्रसंगांना तोंड दिले त्यावरून त्याचे कौतुक करावे तितके थोडेचं आहे असे म्हणावेसे वाटते पण त्यावेळचा प्रघात लक्षात घेता यात कौतुक करण्यासारखे काही नाही असे लक्षात येते. असो, पेशव्यांच्या तीन पिढ्यांनी खपून जे मराठी राज्य कमावले होते ते कायम राखण्यात माधवराव यशस्वी झाला इतके मात्र निश्चित !
                                                              
                                                                               
                 
   

११ टिप्पण्या:

deom म्हणाले...

युद्ध नेतृत्व, न्याय, शिस्त, दूरदृष्टी, स्वराज्याप्रती एकनिष्ठता या सर्व निकषांवर उजवा ठरणारा एकमेव "पेशवा" असे माधवराव पेशवे यांचे वर्णन करावे लागेल. इतर कोणताही पेशवा इथे निष्पभ्र ठरतो. इथे आपण एक सैन्यातील भ्रष्टाचार प्रकरण मांडलेय जिथे सैनिकांची संख्या वाढवून दाखवून मलिदा खाणे. हल्ली शाळा पात पडताळणी प्रकरणाशी याचे साधर्म्य आहे. माधवराव पेशवे याबद्दल नव्याने आपण लिहिलात त्यासाठी अभिनंदन. जय महाराष्ट्र !!

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद, deom !

Sahyadri म्हणाले...

chan ani abyaspurna artile ahe

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद, Sahyadri !

Kaustubh Ponkshe म्हणाले...

माधवराव पेशव्याच्या कारकीर्दीचा थोडक्यात , पण सर्वंकष आढावा घेणारा सुंदर लेख . पण शेवटातील परीच्चेदाशी मी थोडा असहमत. रघुनाथ राव , जानोजी , निजाम असे सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या प्रतीस्पर्धी असताना माधव रावाने जे साध्य केले ते निश्चीतच कौतुकास्पद आहे असे माझे मत आहे .माधवरावाच्या मुस्द्देगिरी पुढे नानासाहेब पण डावा ठरतो असे मला वाटते .

sanjay kshirsagar म्हणाले...

Kaustubh Ponkshe,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
शेवटच्या परिच्छेदाशी आपण असहमत असल्याचे नमूद केले आहे. अर्थात, याविषयी प्रत्येकाचे आपापले मत असू शकते. पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो कि, हा लेख लिहिल्यानंतर बरीच नव्याने माहिती हाताशी लागल्याने यातील कित्येक भाग आणि निष्कर्ष मला स्वतःला टाकाऊ वाटतात.

Kaustubh Ponkshe म्हणाले...

ओके …. आपण याची सुधारित आवृत्ती काढावी ही विनंती .

sanjay kshirsagar म्हणाले...

नक्की प्रयत्न करेन !

Unknown म्हणाले...

छान माहिती.

thakare48 म्हणाले...

खुप छान लेख परंतु शेवटच्या लेखाशी असहमत

Rahul Kalegaonkar म्हणाले...

आजकालच्या 25 वर्षे वय असलेल्या पोरांना साधा फॉर्म भरता येत नाही....माधवरावाने घरातून कुणाचीच साथ नसताना हिंदुस्थानावर मराठी सत्तेचा अंकुश कायम ठेवला.....