गुरुवार, १९ जून, २०१४

स्वराज्य ते साम्राज्य :- स्थित्यंतराचा आढावा ( भाग - २ )



                थोरल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत स्वराज्याचे स्वरूप बदलून ते साम्राज्यात परावर्तीत झाले खरे पण, याच काळात इतरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. येऊ लागले. मोगलांचे प्रांतिक अंमलदार ठिकठिकाणी स्वतंत्र वृत्तीने वावरू लागले. मोगल बादशाही मोडकळीस येऊ लागली तर प्रसंगानुसार शाहूचे सरदार शत्रूशी मिलाफ करून शाहूला अडचणीत आणू लागले. तेव्हा शाहूची बाजू सांभाळण्याच्या मिषाने बाजीरावाने या विरोधकांना जाग्यावर बसवण्याचा धडाका लावला. डभईला त्रिंबकराव दाभाडे मारला गेल्याने पेशवा व शाहूचे सातार दरबारातील विरोधक गर्भगळीत झाले. यानंतर सातार दरबाराची सर्व सूत्रे हळूहळू पेशव्याच्या हाती जाऊ लागली. या सुमारास ' मराठी सरदारांच्या राज्यांचा संघ ' असे जे मराठी राज्याचे स्वरूप होते ते बदलण्याचा प्रयत्न पेशवा करू लागला. त्याच्या बापाने ज्या फौजबंद सरदारांना शाहूच्या आधिपत्याखाली आणले होते, त्यांच्यावर शाहूच्या नावाखाली आपला शह बसवण्याचा प्रयत्न पेशवा करू लागला. यातूनच त्याचा रघुजी भोसल्यासोबत तंटा निर्माण झाला पण प्रकरण वर्दळीवर आले नाही एवढेचं. बाजीरावाच्या काळात पेशव्यांची छत्रपतीला गुंडाळून सर्व सत्ता आपल्याच हाती घेण्याची भट बंधूंची धडपड इतरांच्या लक्षात आली नाही अशातला भाग नव्हता. परंतु, यावेळी प्रत्येकाला आपापला सवता सुभा सांभाळायचा असल्याने व स्वतः पेशवा अन त्याचे सरदार भल्या मोठ्या फौजा बाळगून वावरत असल्याने त्याच्या विरोधकांनी मूग गिळून बसण्याचे धोरण अवलंबले. मात्र, तरीही प्रसंगोत्पात कलह उत्पन्न होत होते वा केले जात होते. उदा :- वसईचा पाडाव झाल्यावर पेशवेबंधूंनी इंग्रज - पोर्तुगीजांकडे आंगऱ्यांच्या विरोधात मदत मागणे.
                     
                     नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीत पेशव्यांचा लोभ व हिंमत अधिकच वाढली. पेशवा बिनदिक्कतपणे मराठा राज्यसंघातील इतर सरदारांवर आपला अंकुश बसवू लागला. यासाठी वेळप्रसंगी शाहू छत्रपतीची आज्ञा गुंडाळली जात होती तर कधी मोगल बादशाहासोबत परस्पर करार करून कार्यसिद्धी साधली जात होती. बंगाल - बिहारात रघुजी भोसले आपला अंमल बसवत होता, पण पेशव्याला त्या प्रांताचा मोह सुटून त्याने मोगलांशी हातमिळवणी करत रघुजीचे पाय खेचण्याचा उद्योग केला. परंतु, रघुजीनेच पेशव्याशी मिळते - जुळते घेत प्रकरण हातघाईवर येऊन दिले नाही. शाहूनेदेखील यासाठी आपले उर्वरित पुण्य खर्च केले. यानंतर शाहूचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळी त्याने पेशव्याला काही कारणांनी बडतर्फ केले खरे पण, पंतप्रधानाने लष्करी बळाच्या धाकावर आपले पद परत मिळवले. यानंतर लवकरच शाहूचे निधन होऊन पेशव्याचा मार्ग निष्कंटक झाला. त्यातच ताराबाईने रामराजाचे बाहुले उभं करून सातारच्या छत्रपतीला कैदेत टाकण्याचा पराक्रम करून पेशव्याच्या मार्गातील एक मोठी धोंड स्वतःच बाजूला केली. तिच्या या कृत्याने छत्रपतीच्या गादीविषयी जो काही आदर आणि धाक सरदार मंडळावर / मराठा राज्यसंघात उरला होता तो मात्र नाहीसा होऊन हे सर्व घटक -- आंग्रे, भोसले, दाभाडे - गायकवाड इ. -- आपापला स्वतंत्र पंथ पाहू लागले. यावेळी पेशवा निरंकुश सत्तेचा धनी असून शिंदे - होळकरांसारखे पराक्रमी व फौजबंद सरदार त्याच्या हाताशी होते. त्यांच्या बळावर मराठा राज्यसंघातील सरदारांवर आपला शह बसवण्याचा त्याचा मानस होता. मात्र, जसे ' पेरावे तसे उगवते ' हा सृष्टीचा नियम पेशवा साफ विसरून गेला. त्याच्या हाताखालील शिंदे - होळकर हे आपल्या धन्याच्याच हातावर हात मारत उत्तरेत स्वतंत्र होऊ लागले होते. बाजीरावाने या उभयतांना उत्तरेतील आपले हस्तक म्हणून नेमले व शिंद्याला आपली मुतालकी दिली खरी पण, त्याचा त्यांनी ' योग्य ' तोच वापर करून आपली सत्ता वाढवली. परिणामी, पेशव्याला कित्येकदा या उभय सरदारांची आर्जवे करावी लागली. तात्पर्य काय तर, नानासाहेब पेशव्याची कारकीर्द म्हणजे राजकीयदृष्ट्या नुसता सावळागोंधळ असल्याचे दिसून येते. पेशव्याला निजाम नको पण आणि पाहिजे सुद्धा ; गुजरात, कर्नाटक, माळवा, बुंदेलखंड, बिहार, बंगाल, प्रयाग इ. प्रांत हवे ; भोसले, गायकवाड, आंग्रे प्रभूती सरदारांचा समूळ नाश वा त्यांना आपले मांडलिक बनवायचे आहे ; शिंदे - होळकरांवर फारसा विश्वास नाही ; प्रसंगी स्वतःच्या भावांविषयी पेशवा साशंक. सारांश, पेशव्याचा लोभ, स्वार्थ व स्वकीयांविषयीचा अविश्वास यांमुळे नानासाहेबाच्या काळात मराठी राज्य साम्राज्यपदास पोहोचले तरी त्याच्या उपरोक्त गुणांनी पानिपतचा ठेचगा लागून साम्राज्यविस्ताराचे वारु अडखळले. त्यातंच त्याच्या निधनाने पेशवेकुटुंबातील हेवेदावे जगजाहीर होऊन खुद्द पेशव्यांच्याच घरात कलहाग्नी पेटला.
          रघुनाथ - माधवराव या चुलत - पुतण्यांच्या भांडणात दरबारी मुत्सद्द्यांनी व सरदारांनी आपापले हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला खरा पण, खुद्द माधवराव पेशवा खंबीर असल्याने त्याच्यापुढे इतरांचे काही चालले नाही. मात्र त्याचवेळी पेशव्याचा क्षयाचा आजार पाहता त्याच्या मृत्युनंतर पेशवेपदी बसणारा इसम जर स्वयंप्रकाशित नसेल तर त्याला कोणा ना कोणाच्या ओंजळीनेच पाणी प्यावे लागणार हे उघड होते. परंतु, हि क्रांती तशी सहजासहजी घडून आली नाही. रघुनाथरावाच्या सत्तालालसेस खतपाणी घालून मुत्सद्द्यांनी नारायणराव पेशव्यास कैद करण्याचा वा मारून टाकण्याचा कट करून सिद्धीस नेला. गादीनशीन पेशवा मारला गेल्यावर रघुनाथ पेशवा झाला खरा पण मुत्सद्यांचा खेळ काय असतो याची त्या बापड्याला काय कल्पना ? नारायणराव पेशव्याची पत्नी गंगाबाई गर्भवती असल्याची कुणकुण लागताच मुत्सद्द्यांनी बारभाई मंडळ उभारून रघुनाथास पदच्युत केले व पेशवाई प्रथम गंगाबाईच्या व नंतर तिच्या मुलाच्या -- सवाई माधवरावाच्या -- नावे घेऊन कारभार हाती घेतला. पुढे या बारभाईंचे आपसांत तंटे लागून अखेर नाना फडणीसने काही प्रमुख लष्करी सरदारांच्या बळावर बालपेशव्याचा ताबा अन प्रमुख कारभारीपद मिळवले. एकूण, एक चक्र पूर्ण झाले. पेशव्यांनी राज्य सांभाळण्याच्या नावाखाली छत्रपतीला ताब्यात घेतले तर पेशव्यांच्याच एका कारकुनाने -- नाना फडणीसने -- बालपेशव्याच्या व मराठी राज्याच्या रक्षणाच्या नावाखाली आपल्या विरोधकांचा नायनाट करून सत्ता हाती घेतली.
सर्व काही सुरळीत सुरु असताना स. १७९० नंतर नानाला महादजी शिंद्याच्या रूपाने प्रतिस्पर्धी निर्माण झाला. आपल्या लष्करी सत्तेच्या बळावर महादजी पेशवा आणि पेशवाईचा कारभार हाती घेऊ इच्छित होता पण या गोष्टीस बव्हंशी सरदारांचा विरोध असल्याचे पाहून त्याने आपला हात आवरता घेतला. तसेच खुद्द पेशवाही नानाच्या पाठीशी उभा राहिल्याने महादजीचा नाईलाज झाला. पुढे लवकरंच महादजी मरण पावल्याने नानाची सुटका झाली खरी, पण पाठोपाठ स. माधवाचा अपघाती मृत्यू झाल्याने नानाच्या राजकारणाचा पायाच नष्ट झाला. विना पेशव्याची पेशवाई ताब्यात घेण्यास पुणे दरबारची मंडळी धडपडू लागली. नानाकडे यावेळी मुख्य भांडवल म्हणजे अमाप पैसा व बुद्धिबळ तसेच परराज्य दरबारात असलेले वजन. या बळावर त्याने पेशवेपदावर आणखी एक बाहुले बसवून सत्ता आपल्या हाती राखण्याचा प्रयत्न केला खरा पण, तो त्याच्याच पक्षाच्या मंडळींनी उधळून लावला. यात अनेक भानगडी होऊन शेवटी नानाने आपली सर्व अक्कल व संपत्ती पणास लावून रघुनाथरावपुत्र द्वितीय बाजीरावास सत्तेवर आणले. पण नानाला बाजीराव आणि रावबाजीस नाना मनापासून अप्रिय होते. पण करतात काय ? काही काळ त्यांनी असाच ढकलला. दरम्यान बाजीरावाने नानाच्या वरचष्म्यातून मुक्त होण्यासाठी दौलतराव शिंद्याचा पदर धरला व नानाच्या तालावर नाचायचे सोडून तो शिंद्याच्या ठेक्यावर डोलू लागला. दौलतरावाने यावेळी संधी साधली. त्याने सरळ बाजीरावास मुठीत घेऊन उत्तरेत त्याच्या उरात सलणारा होळकरांचा काटा काढण्यास आरंभ केला. परंतु हा खेळ त्याच्यावर उलटला अन यशवंतराव होळकराने समस्त शिंदेशाही धुळीस मिळण्याइतपत तिची वाट लावून टाकली. बाजीरावाने होळकराचा आवेश पाहून सरळसरळ इंग्रजांच्या कुशीत दडी मारून स्वतःचे हात - पाय बांधून घेणारा वसईचा तह केला.

               वसईच्या तहाविषयी चर्चा अनेकदा केली जाते. परंतु त्या तहाबद्दल इंग्रज मुत्सद्दी व बाजीरावास शिव्या घालण्यापलीकडे फारसे काही केले जात नाही. वसईचा तह करताना इंग्रजांनी मराठ्यांचा राज्यसंघ डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार करारातील अटींची रचना केली. अर्थात, व्यवहारात जी पेशव्यांची सत्ता इतर मराठी सरदारांच्या सत्तेप्रमाणे स्वतंत्र होती, तीस कागदावर मान्यता मिळवून देत शिंदे, होळकर, भोसले आदींपासून पेशव्यांचे सर्व संबंध तोडून टाकले. याचे प्रत्यंतर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाच्या निमित्ताने सर्वांच्याच प्रत्ययास आले. बाजीराव आपल्या पाठींब्याने पेशवा बनला असल्याने आपणांस बंधनकारक असा तह तो परस्पर करू शकत नाही या भ्रमात दौलतराव शिंद्याने तहास आक्षेप घेतला. त्यांस ' तुम्ही पेशव्याचे चाकर आहात ' असे इंग्रजांनी ठणकावून सांगताच दौलतरावाची बोलतीच बंद झाली. यानंतर इंग्रजांनी पेशव्याच्या सरदारांना लढाईत लोळवून त्यांच्या व्यवहारात स्वतंत्र असलेल्या सत्तेस कागदोपत्री तहाच्या रूपाने मान्यता देत पेशव्यापासून साफ तोडले. येथून पुढचा इतिहास म्हणजे मराठी राज्याच्या संघाचे एकत्रीकरणाचा पेशवा प्रभूतींचा यत्न व ते उधळून लावण्याचे इंग्रजांचे डावपेच यांची हकीकत. प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत ती येत नसल्याने त्याची चर्चा येथे करत नाही.

                    छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक केल्यापासून त्यांच्या नोकरांची छत्रपतींवर आपापला पगडा बसवण्याची धडपड सुरु झाली होती. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक केल्यापासून त्यांच्या नोकरांची छत्रपतींवर आपापला पगडा बसवण्याची धडपड सुरु झाली होती. संभाजीच्या कारकीर्दीच्या आरंभापासून हे प्रयत्न खुपचं जोराने सुरु झाले. पुढे शाहूच्या अमदानीत पेशव्यांनी छत्रपतीला तर त्यानंतर फडणीस, शिंद्याने पेशव्याला गुंडाळून ठेवले. स्थूलमानाने या घटनांकडे पाहता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते व ती म्हणजे ब्राम्हण अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने बुद्धिबळावर तसेच प्रसंगी सैन्याच्या जोरावर तर ब्राम्हणेतर मुत्सद्यांनी फक्त लष्करी बळावर छत्रपतींची सत्ता - अधिकार बळकावण्याचा प्रयत्न केला. शिवकाळात ब्राम्हण मंत्र्यांनी अल्पवयीन राजारामास हाती धरून सत्ता हातात घेण्याचा उपद्व्याप केला खरा पण यासाठी आवश्यक लष्करी जोर पाठीशी नसल्याने त्यांचा बेत फसला. संभाजीच्या नंतर अमात्य, जाधव प्रभूतींच्या हाती छत्रपतींची दोरी गेली खरी पण ताराबाई समोर यांचे फारसे काही चालल्याचे दिसून येत नाही. पुढे शाहूच्या आगमनाने ताराराणीचे तेज मावळले आणि मुत्सद्यांना बाळसे चढले. बाळाजी विश्वनाथाच्या वंशजांनी छत्रपतीला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. भट घराण्याचा हा डाव उधळण्यासाठी दाभाडे पुढे सरसावला पण मारला गेला. त्यानंतर हा उपद्व्याप करण्यास कोणी धजावले नाही. पेशव्यांनी नेहमी ' आपण छत्रपतीनिष्ठ असून तख्ताशी हरामखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करत आहोत ' असा आव आणत दरबारी विरोधकांचे खच्चीकरण केले. शाहूच्या मृत्यूनंतर ताराराणीने पेशव्याचे वर्चस्व झुगारून देण्याचा खटाटोप केला पण तो अपयशी ठरल्याने तिलाच पेशव्यासोबत मिळते - जुळते घ्यावे लागले. या निमित्ताने पेशव्याने ताराबाईचे समर्थक -- गायकवाड, आंगऱ्यांना नरम करण्याची संधी मात्र साधून घेतली. थोरल्या माधवरावाच्या निधनानंतर पेशवे घराण्यात दुफळी माजून पेशव्यांच्या शेंड्या कारभाऱ्यांच्या व शेवटी नाना फडणीसच्या हाती आल्या. मिळून छत्रपती - पेशवेपदाची अनियंत्रित सत्ता फडणीस नानाकडे आली खरी पण त्याची धोरणे भट कुटुंबीयांपेक्षा वेगळी होती. भट कुटुंबीय समस्त मराठी राज्यसंघावर आपली सत्ता लादू पाहत होते तर त्याउलट नानाने फक्त पेशव्यांची दौलत सांभाळण्याची भूमिका स्वीकारली. याची प्रमुख कारणे म्हणजे नानाकडील लष्करी कौशल्याचा अभाव व त्याचा संशयी स्वभाव. त्यामुळे झाले असे की, पेशव्यांची हुजुरात तर मोडीत निघालीच पण नानाही आपली स्वतंत्र अशी फौज उभारू शकला नाही. पर्यायाने पटवर्धन, फडके प्रभूतींवर त्याची भिस्त राहिली खरी परंतु फडके इतका पटवर्धनांवर त्याचा अखेरच्या काळात विश्वास न उरल्याने पैसा व राजकीय डावपेचाच्या बळावर त्याने आपली जशी तशी निभावणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजीरावाला शिंद्याचा आधार मिळाल्याने फडणीसाची सत्ता निकाली निघाली. दुसरा बाजीराव शिंद्यांच्या मेहेरबानीने पेशवा बनला खरा पण हातात आलेली सत्ता टिकवून ठेवण्याचे अन राबवण्याचे धोरण त्यांस नव्हते. त्यामुळेच पेशव्याची सत्ता इंग्रजांच्या हाती गेली.

                      या ठिकाणी आणखी एक भेद प्रकर्षाने जाणवतो कि ब्राम्हण मुत्सद्दी पैसा, बुद्धी व लष्करी बळावर अधिकारी पुरुषास -- छत्रपती / पेशव्यास -- आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करत. त्याउलट ब्राम्हणेतर मुत्सद्द्यांचे होते. अधिकारी पुरुष जरी त्यांच्या हाती आले तरी त्यापासून फायदा कसा उचलायचा हेच त्यांना कधी जमले नाही. उदा :- सवाई माधवाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसने सातारकर छत्रपतींना नजरकैदेतून बाहेर काढले खरे पण त्यांना पूर्णतः स्वातंत्र्य मात्र दिले नाही. त्याउलट दौलतराव शिंद्याने बाजीरावास परंतु, पेशव्याची सत्ता आपल्या हाती घेऊन स्वतःचे महत्त्व वाढवत मराठा राज्यसंघावर छाप बसवण्याचे सोडून तो आपलीच दौलत वाढवण्याच्या मार्गाला लागला. त्यातही त्याने होळकरांशी उघड वैर घेऊन शिंदेशाहीची कबरच खोदून घेतली.

                    सारांश, शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा व छत्रपतींच्या सत्तेचा प्रवास पेशवे - फडणीस - शिंदे ते इंग्रज असा घडून आला. पेशव्यांच्या काळातील मराठी राज्याचे / साम्राज्याचे वर्णन करावयाचे झाल्यास त्याला आजच्या भारतीय संघराज्याची उपमा देता येईल. भारतातील राज्यं जशी स्वायत्त असून विशिष्ट बाबतीत केंद्राला विशेषाधिकार आहेत तद्वत शाहूच्या काळातील मराठा सरदारांचे होते. मात्र, भारतातील राज्यांना परराष्ट्र, संरक्षण इ. बाबतीत स्वतंत्र धोरण आखण्याचा अधिकार नाही, तो मात्र शाहूच्या - पेशव्यांच्या काळात मराठा सरदारांना होता. त्यामुळे मराठी साम्राज्याचे पुढे भवितव्य काय होणार होते ते स्पष्टंच दिसत होते.
                                                                   ( समाप्त )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: