Monday, June 16, 2014

स्वराज्य ते साम्राज्य : स्थित्यंतराचा आढावा ( भाग - १ )


 
                 छ . शिवाजी महाराजांनी आपल्या असामान्य मुत्सद्देगिरी व पराक्रमाच्या बळावर स्वराज्याची उभारणी केली आणि त्यांच्या या स्वराज्याचे पेशव्यांनी साम्राज्यात रुपांतर केले अशी एक मराठी राज्याविषयीची सर्वसामान्य समजूत आहे. प्रस्तुत लेखात छत्रपतींचे स्वराज्य व पेशव्यांचे साम्राज्य यांतील तुलनात्मक फरक विशद करत मराठी राज्याचे सर्वसाधारण स्वरूप वाचकांच्या समोर मांडण्याचा हेतू हेतू आहे.
              
                   शिवछत्रपतीनिर्मित स्वराज्य म्हणजे मूर्तिमंत राजेशाही ! सर्व प्रकारचे अंतिम निर्णय घेण्याची / धोरण ठरवण्याची शक्ती हि छत्रपतींच्या हाती एकवटलेली होती. राज्याभिषेकानंतर राज्याचा वाढता विस्तार लक्षात घेता अष्टप्रधानांची निर्मिती करण्यात येऊन जाणीवपूर्वक प्रत्येकाची अधिकार व कार्यक्षेत्रे नेमून देण्यात आली आणि त्यावर छत्रपतींची हुकुमत अंतिम राहील याचीही दक्षता घेण्यात आली. परंतु या दक्षतेला बाळाजी आवजी चिटणीसाच्या रूपाने सुरुंग लागला. बाळाजीने चिटणीशीचा दरख वंशपरंपरागत घेऊन उर्वरित अधिकारी वर्गात खळबळ माजवली. याचे प्रत्यंतर शिवछत्रपतींच्या निधनानंतर लगेच दिसून आले. युवराज संभाजीला राज्याचा वारसा मिळू न देता अल्पवयीन राजारामास छत्रपती बनवून सत्ता हाती घेण्याचा मंत्र्यांनी डाव आखला. अर्थात, संभाजी व त्याच्या पक्षपात्यांनी मंत्र्यांचा हा डाव उधळून लावला खरा, परंतु औरंगजेबाच्या कैदेत तो जाईपर्यंत मंत्र्याच्या फितुरीचा त्यांस त्रास होतंच राहिला. इतकेच नव्हे तर संभाजीच्या कैदेमागे देखील स्वराज्यातील अधिकारी वर्गाचा बराचसा हात असल्याची शंका - कैदेचा एकूण घटनाक्रम पाहता - मनात येते. संभाजीच्या नंतर छत्रपती बनलेला राजाराम हा कर्तृत्वाने बापापेक्षा तसेच वडील बंधूपेक्षा अगदीच हीन होता. संभाजीच्या अखेरीस राज्याचा खजिना रिक्त झाला होता. सैन्याचा खर्च बेसुमार वाढला होता. औरंगजेबाशी युद्ध चालवणे मोठे जिकीरीचे बनले होते. त्यातच उभयपक्षांच्या लष्करी हालचालींनी स्वराज्य व आसपासचा मुलुख वैराण झालेला. मोगलांकडे वतनाच्या आशेने जाणाऱ्या फितुरींची संख्या वाढत चाललेली. अशा परिस्थितीत सरदारांना व मंत्र्यांना राजी राखून बापाने लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे संवर्धन करण्याचे बिकट कार्य राजारामास पार पाडायचे होते. राजारामाच्या कर्तबगारीविषयी बोलायचे झाले तर तो शिवाजी - संभाजीच्या पासंगालाही पुरणारा नव्हता पण आपल्या मर्यादा ओळखण्याचा गुण मात्र त्याला बापाकडून पुरेपूर मिळालेला होता व त्याच बळावर त्याने आपली धोरणे आखली. लष्कराची पूर्ण अखत्यारी धनाजी जाधव आणि संताजी घोरपड्यांस देऊन त्यांच्या डोक्यावर हुकुमतपन्हा म्हणून रामचंद्रपंत अमात्याची नेमणूक केली. रामचंद्रपंताकडे छत्रपतींचे सर्व अधिकार देण्यात आले आणि राजाराम बचावास्तव जिंजीला निघून गेला. छत्रपतींच्या हाती असलेली राजकीय सत्ता त्यांच्या नोकरांच्या हाती जाण्याचा हा आरंभकाळ होय. त्याचप्रमाणे हि सत्ता वा अधिकारसूत्रे ताब्यात घेण्यासाठी छत्रपतींच्या सेवकवर्गाची आपापसांत चुरस निर्माण होण्याचाही हाच समय होता. पंत अमात्य कितीही झाले तरी फडावरचे मुत्सद्दी. राज्याची मुख्य लष्करी शक्ती त्यावेळी जाधव - घोरपडे या दुकलीकडे होती. राजारामाच्या बेताच्या कर्तबगारीचा त्यांनीही मन मानेल तसा फायदा उठवण्यास मागे - पुढे पाहिले नाही. आपली परिस्थिती लक्षात घेऊन पंतअमात्य या दोघांना नरम - गरम गोष्टी सांगून आळ्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण कितीही झाले तरी हुकुमतपन्हा हा काही छत्रपती नव्हता. त्यामुळे त्याला जुमानण्याचा प्रश्नंच येत नव्हता !सारांश, राजारामाच्या काळात छत्रपतींचा अधिकारी वर्ग शक्य तितका छत्रपतींची सत्ता गुंडाळून आपापला स्वार्थ साधण्याच्या मार्गाला लागला. राजारामाच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच कालावधीत शिवछत्रपतींनी वतनांविषयी बनवलेला दंडक बाजूला ठेवण्यात आला.

                     औरंगजेब दक्षिणेत येण्यापूर्वी व खुद्द शिवाजी राजे हयात होते त्यावेळी वतनांची लालूच दाखवून अनेक अधिकाऱ्यांना आणि वतनदारांना फोडण्यास मोगल धडपडत होते व त्यांना त्यात यशही मिळत होते. संभाजी आणि राजारामाच्या काळात औरंगजेब स्वतः दख्खनेत उतरल्याने मोगलांच्या यशाचा टक्का थोडा अधिक वाढला. तेव्हा मोगलांच्या तोडीस तोड म्हणून राजारामानेही वतनांची उधळण करण्यास आरंभ केला. यामागील कारण स्पष्ट होते. मराठ्यांच्या या छत्रपतीकडे फक्त पित्याचा वारसा होता, वंशपरंपरागत आलेलं पद होतं पण ना हाताशी खजिना, ना सैन्य ! अशा स्थितीत वतनदारांना राजी राखून स्वातंत्र्यलढा चालू ठेवण्यासाठी राजारामास हा निर्णय घेणं भाग होतं. याही पुढे जाऊन राजारामाने स्वराज्यात जहागीरदार निर्माण करण्याचा - तत्कालीन परिस्थितीत उपयुक्त, पण भविष्यात अनर्थकारी ठरणारा असा - निर्णय घेऊन अंमलात आणला. मोगलांनी सर्व राज्य आक्रमिलेलं. फक्त किल्ले तेवढे राजारामाच्या ताब्यात होते. विजापूर व गोवळकोंड्याची राज्यं नष्ट झाली तरी तेथे अजून मोगलांचा अंमल पूर्णतः बसला नव्हता. त्याशिवाय कर्नाटकांत अनेक लहान - मोठी स्वतंत्र संस्थाने होती. अशा परिस्थितीत आदिल व कुतुबशाहित मोडणाऱ्या प्रदेशास आपल्या सरदारांना जहागीर म्हणून देण्याचा राजारामाने सपाटा लावला. फौजबंद सरदारांना आपल्या अंकित राखण्याचा त्याला हाच एक उपयुक्त पर्याय वाटला व त्याने त्याचा अवलंब केला. पर्यायाने मोगलांविरुद्धचा लढा आणखी जिद्दीने लढवण्यात येऊ लागला. कारण, तलवारीच्या बळावर मिळवलेल्या जहागिरी शेवटी स्वतंत्र राज्यंच असतात, याची तेव्हाच्या मुत्सद्द्यांना कल्पना होती. परिणामी, राजारामाच्या आकस्मिक निधनाने देखील मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्वरुपात / प्रखरतेत फारसा फरक पडला नाही. पुढे औरंगजेबाचे निधन होऊन संभाजी पुत्र शाहूची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली. कैदेतून सुटल्यावर त्याने राजारामपत्नी ताराबाईकडे राज्यकारभार आपल्या हाती सोपवण्याची सूचना / विनंती केली, पण ती तिने धुडकावून लावली. अशा स्थितीत राज्यासाठी चुलती सोबत लढण्याखेरीज शाहूपुढे इतर पर्याय उरला नाही. आपापला पक्ष बळकट करण्यासाठी उभयतांनी फौजबंद सरदारांना जहागीरींचे प्रदेश देऊन आपापल्या लगामी लावण्याचा यत्न केला. मिळून राजसत्तेसाठी या लष्करी केंद्रांच्या किंवा आपल्याच सेवकांच्या हाता - पाया पडण्याचा छत्रपतींच्या वारसांवर प्रसंग ओढवला. अखेर उभयतांचे युद्ध घडून शाहूचा विजय झाला व ताराबाईने कोल्हापुरास स्वतंत्र राज्याची उभारणी केली. अर्थात एका झुंजीने उभयतांचा कलह काही तुटला नाही परंतु प्रस्तुत लेखाचा तो विषय नसल्याने हा मुद्दा येथेच संपवलेला बरा. शाहू - ताराबाई झगड्यात दोन्ही बाजूच्या सरदारांनी अनेकदा पक्ष बदल केले. दरम्यान आपल्या सत्तेला सार्वभौम अशा मोगल शासनाने मान्यता द्यावी यासाठी दोघे झटू लागले. त्यात देखील बऱ्याच धडपडीनंतर शाहूच यशस्वी झाला व ताराबाईची हार झाली. मोगलांकडून कायदेशीररित्या शिवाजीच्या स्वराज्याचा वारस शाहू असल्याची मान्यता मिळाल्यावर शाहूचे आसन स्थिर करण्यासाठी त्याचा पेशवा बाळाजी विश्वनाथ झटू लागला. बाळाजीने शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराबाई यांची कारकीर्द पाहिली होती, अनुभवली होती. शिवकाल व सद्यस्थितील फरक त्यांस माहिती होता. स्वातंत्र्यलढ्यात निर्माण झालेले फौजबंद मराठा सरदार ठिकठिकाणी प्रदेश बळकावून स्वतंत्र संस्थानिकासारखे वावरत होते. यांच्याशी लढून शाहुच्या आधिपत्याखाली आणणे बाळाजीच्या कुवतीबाहेरचे होते. अशा स्थितीत त्याने उभयतांना मान्य होईल असा सन्मानजनक तोडगा काढला. शाहूने या प्रस्थापित सरदारांच्या सत्ताकेंद्रांना -- संस्थानांना मान्यता द्यायची व या सरदारांनी शाहूचे आधिपत्य मान्य करायचे. त्याला ठराविक एक वार्षिक रक्कम द्यायची. त्याबदल्यात हे सरदार जो काही नवनवीन प्रदेश जिंकतील तो त्यांना जहागीर -- सरंजामादाखल बहाल करायचा होता. याच धोरणातून भोसल्यांना बंगाल, बिहार, वऱ्हाड - नागपूर मिळाले ; दाभाड्यांना गुजरात तर आंगऱ्यांना कोकण किनारपट्टी. बाळाजीने भोसले, आंग्रे, दाभाडे इ. लष्करी केंद्रांना शाहुच्या केंद्रीय सत्तेखाली आणले खरे पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे साधन मात्र शाहू वा त्याच्या पेशव्याकडे त्यावेळी राहिले नव्हते. त्यातंच बाळाजी स. १७२० च्या सुमारास मरण पावला व त्याचा मुलगा बाजीराव हा पेशवा बनला.

4 comments:

Sahyadri said...

muddesud vivechan

संजय क्षिरसागर said...

Dhanyawad, Sahyadri !

Gamma Pailvan said...

नमस्कार संजय क्षीरसागर!

विवेचन आवडलं. बाळाजी विश्वनाथाने शिवाजीमहाराजांपासून शाहूपर्यंत सर्व राजवटी पहिल्या होत्या. ही बाब माहीत असली, तरी तिची महत्ता (significance) नव्याने जाणवली.

असो.

बाळाजी आऊजी यांच्या वंशपरंपरागत चिटणीशीचा उल्लेख वाचल्याचं आठवत नाही. शिवाजीमहाराजांचा मृत्यू अकस्मात झाल्याने संभाजीमहाराजांनी जुनी घडी मोडली नसावी. बाळाजी आऊजी पुढे दीडेक वर्ष संभाजी महाराजांच्या चाकरीस राहिला. नंतर काही कारणास्तव त्यास आणि त्याच्या तीन मुलांस हत्तीच्या पायी दिले गेले. येसूबाईंनी संभाजीराजांना यावरून बराच दोष दिला. मात्र यातून खंडोबल्लाळ हा एक मुलगा वाचला. इतके होऊनही तो संभाजीराजांशी एकनिष्ठ राहिला.पुढे संभाजीराजांनी त्यास चिटणीशीवर नेमले. यावरून बाळाजी आऊजी व त्याच्या वंशजांची भोसले राजघराण्यावरील निष्ठा प्रकट होते. मात्र यांनी भोसल्यांकडे वंशपरंपरागत चिटणीशी मागितल्याचे दिसून येत नाही. अर्थात हा संबंध पुढे छ. प्रतापसिंहांपर्यंत दहाबारा पिढ्या टिकला. या मध्यंतरीच्या काळात केव्हातरी चिटणीशी वंशपरंपरागत झाली असावी असा तर्क आहे. याबाबत चूकभूल देणेघेणे!

आपला नम्र,
-गामा पैलवान

संजय क्षिरसागर said...

गामा पैलवानजी, बाळाजी आवजीने चिटणीसपद वंशपरंपरागत करून घेतल्याचे
उल्लेख अनेक साधनांत आले आहेत. सध्या मी इतर विषयांवर काम करत असल्याने
तुम्हांला हवे ते संदर्भ देऊ शकत नाही. या बद्दल क्षमस्व !