Monday, January 13, 2014

पानिपतचे तिसरे युद्ध :- एक धावता आढवा

                                     


                दि. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठी व अफगाण सैन्यात पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. या संग्रामात मराठी सैन्याचे दोन तरुण सेनापती, शेकडो अनुभवी व उमदे सरदार, हजारो रणशूर शिपाई मारले गेले. परंतु, पराभव पदरी पाडून घेताना देखील त्यांनी शत्रूला असा निर्णायक भीमटोला हाणला की, पुढे काही वर्षे हिंदुस्थानच्या राजकारणात अफगाण पक्षाने हस्तक्षेप करण्याचे धाडस केलं नाही. 

                  पानिपत विषयावर आजपर्यंत अनेक -- अगदी देशी - परदेशी इतिहासकारांनी लेखन केलं आहे व करत आहेत. याच विषयावर आधारित सुमारे साडेपाच - पावणेसहाशे पृष्ठांचा ' पानिपत असे घडले ' हा माझा ग्रंथ दीड वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे. परंतु, असे असले तरी या विषयाची मनावरील मोहिनी मात्र  अजून कायम आहे. ' पानिपत असे घडले ' लिहिताना व त्या विषयावर आजवर चिंतन - मनन करत असताना लष्करी डावपेचांच्या दृष्टीकोनातून पाहता दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतावर नेमके असे काय घडले कि, ज्याचा फटका मराठी  पक्षाला बसला याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांपैकी मला जी उत्तरं गवसली ती येथे मी मांडत आहे. अर्थात, वाचक त्या सर्व मुद्द्यांशी सहमत होतील असे नाही, पण असहमतीतूनच नव्या संशोधनास आणि संशोधकांस प्रेरणा मिळतील याची मला पूर्णतः जाणीव आहे. 

                    ता. १४ जानेवारीचा संग्राम घडण्यापूर्वीचे मराठी सैन्यप्रमुख सदाशिवरावभाऊ व अफगाण पक्षप्रमुख अहमदशहा अब्दाली यांचे लष्करी डावपेच अभ्यासता दोघांनीही बळकटपणे बचावाचे आणि थोडे - फार आक्रमणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षांची तयारी जबरदस्त असल्याने परस्परांवर चालून भयंकर अशा युद्धाला तोंड फोडण्याची हिंमत दोघांनाही झाली नाही. लष्करीदृष्ट्या दोघांनी परस्परांना कैचीत पकडले होते. भाऊची छावणी अब्दालीच्या परतीच्या वाटेवर होती तर अब्दालीने भाऊचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग रोखला होता. १ नोव्हेंबर ते १३ जानेवारीपर्यंत दोन्ही पक्ष समोरासमोर असे पानिपतावर तळ ठोकून राहिले. पैकी, नोव्हेंबर - डिसेंबर पर्यंत मराठी पक्षाची चलती होती तर जानेवारीपासून अब्दालीचे पारडे जड होऊ लागले. 

                  अब्दालीने भाऊचा दिल्लीकडचा मार्ग रोखला असला तरी लष्करीदृष्ट्या तो एका फार मोठ्या कात्रीत सापडला होता. दिल्लीतील मराठी सैन्याचे ठाणे तसेच शाबूत राखले होते. तेथील पथक्यांनी आसपासच्या परिसरातील मराठी मामलेदारांच्या साथीने अब्दालीची पिछाडी झोडपून काढली असती तर त्याला विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते. भाऊलाही हेच हवे होते. परंतु, दिल्लीतील मराठी सैन्य अगदीच निष्क्रिय राहिल्याने अब्दालीची पिछाडी सुरक्षित राहिली. तरीही सावधगिरी म्हणून पठ्ठ्याने डिसेंबरमध्ये आपली छावणी यमुनाकिनारी नेऊन तिथे नावांचा पूल उभारून रोहील्यांच्या प्रदेशाशी आपले दळण - वळण कायम राखले. इकडे भाऊचा दक्षिणेशी संबंध तुटला असला तरी पंजाबातील शिखांशी त्याचे संधान जुळलेले होते. परंतु, त्यांच्याकडून अन्नधान्य वगळता इतर कसलीही भरीव मदत होऊ शकली नाही. नोव्हेंबर - डिसेंबर असे दोन महिने उलटून गेल्यावर अब्दालीने हळूहळू आपले जाळे विणायला आरंभ केला. त्याच्या पाठीशी जसे दिल्लीला मराठी सैन्याचे ठाणे होते, तसेच त्याने भाऊच्या पाठीवर कुंजपुरा येथे दिलेरखानाच्या रूपाने एक लष्करी केंद्र निर्माण केले. 

                     हा दिलेरखान कुंजपुऱ्याचा किल्लेदार नजाबतखान याचा मुलगा. भाऊने कुंजपुरा घेतला त्यावेळी किल्ला लढवताना प्राणांतिक जखमा झाल्याने नजाबतखानाचा मृत्यू झाला होता. दिलेरखान  बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तसेच कुंजपुऱ्याची आपली सत्ता परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी झटत होताच. त्याला अब्दालीची साथ लाभल्याने त्याने कुंजपुऱ्याचे ठाणे आपल्या ताब्यात घेऊन भाऊचा पंजाबशी असलेला संपर्क साफ तोडला. ' जे इच्छी परा तेयेई घरा ' अशी भाऊची स्थिती झाल्याने त्याने ता. ११ जानेवारी रोजी सर्व सरदारांच्या विचाराने दि. १४ जानेवारी रोजी पानिपतची छावणी सोडून पूर्व दिशेस सुमारे १५ - १६ किलोमीटर्स अंतरावरील यमुना नदीच्या किनारी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत लष्कराची रचना गोलाकार करण्याचे ठरले. तसे शत्रू अंगावर आला तर तेवढ्यापुरता त्याचा सामना करून पुढचा मार्ग तुडवायचा असे ठरले. या ठिकाणी वाचकांनी लक्षात घ्यावे की, शत्रू अंगावर आला असता त्यास सडकून काढण्यासाठी गोलातून बाहेर पडणे अत्यावश्यक होते व तशी मुभा खुद्द भाऊने आपल्या सरदारांना दिलेली होती.   

                      लष्कराचा गोल हा पोकळ असून चारी बाजूंनी लढाऊ पथके व तोफा पेरून मध्यभागी बुणगे, कबिले व जखमी - आजारी सैनिक अशी त्याची ढोबळ रचना होती. शत्रूचा गोलावर जो हल्ला होणार होता तो प्रामुख्याने तीन बाजूंनी. हे लक्षात घेऊन या तिन्ही बाजूंवर बळकट लष्करी पथके नेमण्याचे भाऊने ठरवले. त्यानुसार आघाडी इब्राहीम व त्याची गारदी पलटणे, मध्यभाग स्वतः भाऊच्या हुकुमतीखाली  पिछाडीचे रक्षण त्याने होळकरांवर सोपवले. जोवर हा गोल पूर्वेकडे चालत होता तोवरच या स्वरुपाची रचना -- म्हणजे गोलाची आघाडी - पिछाडी होती. परंतु, जेव्हा युद्धाला तोंड फुटून गोलाचे तोंड पूर्वेकडून दक्षिणेकडे वळले, तेव्हा आघाडी व पिछाडी म्हणजे मराठी सैन्याची डावी आणि उजवी बगल बनले ! पानिपतची छावणी सोडताना मराठी लष्करी परंपरेनुसार निसर्गाच्या मदतीचाही आधार घेण्यात आला होता. नोव्हेंबरपासून उत्तरोत्तर उत्तर हिंदुस्थानात अतिशय कडाक्याची थंडी पडते. कित्येकदा दुपारपर्यंत थंडीच्या प्रभावाने धुक्याचा दाट असा पडदा राहत असे तर कधी सकाळी सूर्य उगवल्यावर काही काळाने धुके गायब होत असे. भाऊने या धुक्याचा आश्रय घेऊन भल्या पहाटे -- म्हणजे सुर्योदयापूर्वीच पानिपतचा तळ उठवून यमुनेकडे जायचे ठरवले. शत्रूच्या नकळत जितके अंतर कापता येईल तितके कापण्याचा त्याचा बेत होता. परंतु, त्याच्या दुर्दैवाने धुक्याची हवी तशी साथ त्याला लाभली नाही आणि अब्दालीच्या टेहळणी पथकांनी शत्रू खंदकाबाहेर पडत असल्याची बातमी त्यास वेळेवर आणून दिल्याने अफगाण सेना युद्धासाठी सज्ज झाली. 

            दिनांक १४ जानेवारी १७६१ रोजी युद्धाला तोंड लागण्याआधी व युद्ध संपेपर्यंत मराठी फौजांचा रोख दिल्लीकडे नसून यमुनेकडे असल्याचे ताडण्यात अब्दालीला साफ अपयश आले. त्याला शेवटपर्यंत शत्रूच्या उद्देशाचा अंदाज काही आलाच नाही. त्याच्या मते, मराठी फौजा फक्त दिल्लीकडेच जाणार व मार्गात आपल्या छावणीचा अडथळा असल्याने ते आपल्यावर हल्ला चढवणार.  या दृष्टीने त्याने आपल्या लष्कराची रचना केली. उजव्या बाजूला अमीरबेग व बरकुरदारखान हे त्याचे अफगाण सरदार. त्यांना लागून डाव्या हाताला हाफिज रहमत, दुंदेखान इ. रोहिला सरदार उभे राहिले. मध्यभाग अफगाण वजीर शहावलीकडे सोपवण्यात आला. त्याच्या डाव्या बाजूला सुजा, जहानखान व नजीब असून नजीबच्याही डावीकडे शहापसंदखान हा अब्दालीचा सरदार होता. हि झाली संरक्षणाची पहिली फळी. यांच्या मागे अब्दालीने दुसरी फळी उभारली. अमीरबेग व रोहिला सरदारांच्या पाठी त्याने हाजी जमालखान यास तर शहापसंद - नजीबच्या मागे मुल्ला सरदार रोहिला यांना नेमले व तो स्वतः वजिराच्या मागे राखीव सैन्य घेऊन उभा राहिला. पानिपतच्या युद्धात अब्दालीने आक्रमक भूमिका स्वीकारली ती दुपारनंतर. पण तत्पूर्वी तो देखील बचावाच्याच दृष्टीने युद्धास ठाकला होता हे लक्षात घ्यावे. 

              पानिपतच्या संग्रामात सहभागी असलेल्या या दोन्ही पक्षांची शस्त्रास्त्रे  काय होती याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. धनुष्य - बाण, भाले, तलवारी, सुरे, उंटावरील तोफा अर्थात जंबुरके, जेजाला, लांब व कमी पल्ल्याच्या तोफा, धुराचा पडदा निर्माण करणारे बाण इ. बाबतीत उभय पक्ष समसमान होते. बंदुकांच्या बाबतीत बोलायचे तर मराठी सैन्यात गारद्यांची बंदूकधारी पायदळ पलटणे होती तर तशीच पलटणे नजीबखानाकडेही होती. अर्थात, गारद्यांच्या तुलनेने त्यांचा दर्जा निम्न होता. गारद्यांच्या तोफा आधुनिक अशा फ्रेंच पद्धतीच्या होत्या तर हुजुरातीच्या व अब्दालीच्या तोफा काहीशा जुनाट पण परिणामकारक मारा करणाऱ्या होत्या. अफगाण स्वार जसे बंदूक बाळगून असत तसेच मराठी सैन्यात देखील काही स्वार होते. पण घोडेस्वारांची बंदूकधारी पथके उभय पक्षात नव्हती. 

                                     युद्धातील ठळक घटना 

                                    

१) अब्दालीची सैन्यरचना बचावाची असल्याने व त्याला आपल्या छावणीचे रक्षण करायचे असल्यामुळे त्याची सैन्यदले एकमेकांशी काही अंतर राखून समांतर असे उभे राहून फळी धरण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु, घाई - घाईत त्याच्या उजव्या बाजूवरील पथकांत व मध्यभागीच्या तुकडीत जास्त अंतर पडल्याने रोहील्यांचे सैन्य गारद्यांच्या कुशीवर आले. शत्रू नजीक आल्याचे पाहताच गारद्यांनी तोफांना बत्ती दिली. परंतु, रोहिले गारद्यांच्या तोफांना न जुमानता पुढे येत असल्याचे पाहताच विंचूरकर, गायकवाड प्रभूती सरदार गोलातून बाहेर पडले व शत्रूवर तुटून पडले. रोहिला फौज गोलात येऊन थेट भिडली असती तर गोलातच युद्ध पेटले असते, ते टाळण्यासाठी मराठी सरदार बाहेर पडले. अडाणीपणातून गोल फोडायला किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने नव्हे ! आरंभी सरदारांना चांगले यश आले पण अपुऱ्या सैन्यबळामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. मराठी सरदार मागे वळताच रोहील्यांनी शिस्त बांधून गारद्यांवर हल्ला चढवला. तोवर गारद्यांची बंदुकधारी पलटणे गोळीबाराच्या तयारीने पुढे सरसावली होतीच. या ठिकाणी रोहील्यांच्या उजव्या बगलेवर असलेल्या अमीरबेग व बरकुरदार यांनीही गारद्यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ स्पष्ट होता. मराठी सैन्याचा रोख हा दक्षिणेकडेच असल्याचा अब्दालीचा ठाम ग्रह असल्याने त्याला शत्रूची बगल उध्वस्त करणे गरजेचे वाटत होते. एकदा का शत्रूची बगल उध्वस्त झाली कि, मग त्याला गुंडाळणे तितकेसे अवघड पडत नाही असा त्याचा अनुभव होता. आपल्या सेनानीच्या आदेशानुसार अफगाण - रोहील्यांनी प्रयत्नांची शर्थ केली पण शेवटी त्यांना गारद्यांकडून सपाटून मार खाऊन माघार घ्यावी लागली. परंतु, या पराजयातच त्यांच्या विजयाचे बीज रुजले होते. गारद्यांची यावेळी निम्म्याहून अधिक पलटणे निकामी झाल्याने मराठी सैन्याची डावी बाजू दुर्बल झाली होती !

२) गारदी व रोहिले - अफगाणांची झुंज चालू असताना भाऊच्या नेतृत्वाखाली हुजुरात व शहावलीच्या खास दुराणी फौजेची लढाई जुंपली होती. ज्याप्रमाणे रोहिले शहावलीच्या सैन्यदलापासून लांब पुढे गेले होते त्याचप्रमाणे शहावलीदेखील सुजा व नजीबपासून पुढे निघून आला होता. त्यामुळे रणभूमीवर या एकाकी शत्रूदलास झोडपून काढण्याची संधी साधण्याचा भाऊने निर्णय घेतला. युद्धाचा आरंभ तोफांनी होऊन मग काही वेळांतच हुजुरात व इतर मानकरी गोलातून बाहेर शहावलीच्या दुराणी सैन्यावर तुटून पडले. या वेळी झालेल्या संघर्षात अफगाणांचे बरेचसे नुकसान झाले. खासा अताईखान -- वजीर शहावलीचा पुतण्या यात मारला गेला. बव्हंशी अफगाण पथके लढाई सोडून जीव वाचवण्यासाठी अब्दालीकडे धावली. एवढं यश पदरी पाडून हुजुरात मागे परतली. कारण ; त्यांचे युद्धाचे धोरण याआधीच ठरलेलं होतं की, बचावापुरते आक्रमण करायचे ! बस्स. निर्णायक युद्ध यमुना नदी गाठल्यावर. भाऊचा हाच निर्णय त्या दिवशी महागात पडला. युद्धाआधीचे डावपेच काहीही असले तरी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी त्यात परिस्थितीनुसार बदल करण्याची लवचिकता भाऊकडे नव्हती. अर्थात, याबाबतीत त्याचा अनुभव कमी होता तर त्याचा प्रतिस्पर्धी तुलनेने अधिक हुशार होता. 

३) दुपार पर्यंत गारदी व हुजुरातीच्या मोर्च्यातील युद्ध थंडावले होते. गारद्यांची पथके श्रमाने दमलेली असल्याने त्यांना पुढे यमुनेकडे चाल करणे शक्य नव्हते. हुजुरातीची देखील जवळपास अशीच स्थिती होती. तुलनेने मराठी सैन्याची उजवी बाजू --- शिंदे व होळकर ताज्या दमात होते. इकडे शत्रूपक्षाची देखील निराळी स्थिती नव्हती. परंतु, अब्दालीने आधी उभ्या केलेल्या बचाव फळ्या त्यांच्या उपयोगी आल्या. मुख्य आघाडीच्या मागे उभी केलेली पथके त्याने पुढे पाठवली. तसेच पळून आलेल्या सैन्याला दरडावून राखीव सैन्यासह त्यांना शहावलीच्या मदतीला पाठवले व तिन्ही आघाड्यांना एकाचवेळी शत्रूवर चाल करण्याचा हुकुम सोडला. अब्दालीची इतिहासकारांनी गौरवलेली लष्कराच्या चंद्रकोरीची रचना हि अशी अपघाताने व ती देखील उत्तरार्धात बनून आली ! आगाऊ ठरवून नव्हे !! 

४) शहावलीचा पराभव केल्यानंतर मिळालेल्या फुरसतीचा भाऊला सदुपयोग करून घेता आला नाही. निर्णायक युद्धाला या ठिकाणीच तोंड लागल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्याच्या मते, अजूनही आपणांस शत्रूशी झुंज देत सहज यमुना गाठणे शक्य आहे. परंतु, आपल्या गोलाची आघाडीच आता दुबळी झाल्याची वस्तुस्थिती त्याने लक्षात घेतली नाही. तसेच, शत्रूची या ठिकाणीच मुख्य लढाई घेण्याची आतुरता पाहता गोलाच्या पिछाडीला पेरलेली लष्करी पथके पुढे आघाडीवर आणण्याची बुद्धी काही त्याला झाली नाही. त्यामुळे पिछाडीच्या पथकांना लढाईत भाग घेण्याची संधीच मिळाली नाही, तर आघाडीवरील सैन्यावर त्या दिवशी कल्पनातीत ताण पडला. 

५) दुपारनंतर शत्रूसैन्याने मराठी लष्करावर निर्णायक हल्ला चढवला. एकाच वेळी गारदी, हुजुरात व होळकर या तिन्ही मोर्च्यांवर शत्रूसैन्याचा लोंढा येऊन आदळू लागल्याने कोणाचीच कोणाला साथ मिळाली नाही. गारद्यांनी सकाळच्या प्रमाणेच याहीवेळी पराक्रमाची शर्थ केली परंतु, त्यांचा यावेळी निर्णायक पराभव झाला. अफगाण - रोहिल्यांनी मराठी सैन्याची डावी बाजू साफ उध्वस्त केली ! युद्धाचे पारडे त्याचक्षणी अब्दालीच्या बाजूला फिरले !! गारद्यांना लागून उभे असलेले विंचूरकर, पवार, गायकवाड प्रभूती सरदार यावेळी हुजुरातीच्या मदतीला गेल्याने गारद्यांना कोणी वाली राहिला नव्हता. 

६) सकाळी पराभूत झालेला शहावली पुन्हा एकदा बळ बांधून चालून आल्यावर भाऊने यावेळी गोलाच्या जवळच लढाई खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शत्रूसेना पुढे वाढून आल्यावर मराठी स्वार त्यावर तुटून पडले. या संघर्षातही हुजुरात विजयी होऊ लागली होती. याचवेळेस आघाडीवर असलेला विश्वासराव पेशवा मारला गेला. मात्र, त्यामुळे कसलाही फरक न पडता हुजुरातीने अफगाणांना पुन्हा एकदा पिटाळून लावले. 

७) नजीब, सुजा व जहानखान आणि शहापसंद यांनी सर्व जोर एकवटून शिंदे - होळकरांवर चाल केली पण त्या अनुभवी सैन्याने शत्रूला सडकून मार दिला. 

८) हुजुरात शहावलीसोबत लढत असतानाच इकडे गारद्यांचा संहार झाला. त्यावेळी कुंजपुरा येथे मराठी सैन्यात बुणग्यांचे काम करण्याच्या निमित्ताने दाखल झालेले रोहिले उलटले. त्यांनी उघडपणे मराठी गोलात हुल्लड माजवायला आरंभ केला. गारद्यांचा निःपात झाल्याने व विंचूरकर प्रभूती सरदार शहावलीशी लढण्यात गुंतल्याने त्यांना हि उसंत लाभली. तोवर अमीरबेग व हाफिज रहमतचे अफगाण - रोहिले गोलात शिरले होतेच. याचा परिणाम म्हणजे, मराठी सैन्याच्या गोलात व पिछाडीवर घबराटीचे वातावरण निर्माण झाले अन तशात विश्वासराव मरण पावल्याची बातमी कर्णोपकर्णी पसरून या घबराटीचे रुपांतर पळात झाले. मराठी सैन्याचा निर्णायक पराभव या क्षणी झाला ! सकाळपासून पिछाडीचे काम करणाऱ्या मराठी पथकांना पुढे चाललंय याचा पत्ताच नव्हता. आघाडीची जी काही त्यांना बातमी मिळाली ती पळणाऱ्या लोकांकडून. तेव्हा त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

९) शहावलीच्या अफगाणांना बडवून विंचूरकर, पवार मंडळी माघारी गोलात आली तेव्हा हा गोंधळ त्यांच्या नजरेस पडला. त्याचवेळी अमीरबेग व हाफिज रहमतच्या सैन्याशी लगोलग लढण्याची वेळ देखील त्यांच्यावर उद्भवली. आल्या प्रसंगाला त्यांनी कसेबसे तोंड दिले, परंतु यशवंतराव पवार मरून पडल्यावर त्याचे पथक उधळताच या सरदारांनीही बाजू सोडून काढता पाय घेतला. युद्धाचा निकाल आता सर्वांनाच कळून चुकला होता. सुरक्षित माघार घेणे हाच एक पर्याय होता व तो त्यांनी अवलंबला. 

१०) हुजुरातीवर दोन हल्ले चढवूनही शत्रूची फळी फोडण्यात आपले सैन्य साफ अपयशी झाल्याचे पाहून खासा अब्दाली चवताळून गेला. त्याने आपले खास अंगरक्षक दल शहावलीच्या मदतीस देऊन परत एकदा तिसऱ्यांदा हुजुरातीवर हल्ला चढवण्याचा आदेश दिला. त्याच्या सुदैवाने यावेळी हुजुरातीची फळी फुटली. सकाळपासून लढणारी पथके आता पार दमली होती. तरीही पिढ्यानपिढ्याची रक्तात सळसळणारी शौर्यपरंपरा हातातील शस्त्र खाली ठेवू देत नव्हती की रणातून काढता पाय घेण्याचा विचार मनात येऊ देत नव्हती. मात्र याही परिस्थितीत ज्यांची डोकी शांत होती, त्यांनी प्रसंग पाहून माघार घेण्यास आरंभ केला. गायकवाड, विंचूरकर निघाल्याचे पाहून नाना पुरंदरे देखील निघाला. यावेळी शिंदे - होळकर शत्रूशी लढत असल्याने, त्यांच्या मोर्च्याच्या आश्रयाने निघून जाण्याचा व्यवहारी निर्णय सरदारांनी घेतला. 

११) डाव्या बाजूचे सरदार आपल्या मोर्च्याकडे येत असल्याचे पाहून शिंदे - होळकरांचे अनुभवी सरदार काय समजायचं ते समजून गेले. त्यांनीही आता काढता पाय घेण्यास आरंभ केला. जनकोजी शिंदे हा आपल्या चुलत्यासह -- तुकोजी शिंदे सोबत भाऊकडे निघाला. मल्हाररावाने आपला सरदार संताजी वाघ यास भाऊकडे पाठवले. पराभव जरी झाला असला तरी मुख्य सेनापतीला आता सुखरूपपणे रणातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायची होती. संताजीला पाठवून होळकर इतर सरदारांच्या पाठोपाठ शहापसंदखानास बगल देऊन व मुल्ला सरदार रोहील्यासोबत झुंज देत दिल्लीच्या वाटेला लागला. 

१२) लढाईचे पारडे शत्रूच्या बाजूने फिरल्याचे भाऊच्या लक्षात आले होते. पण माघार घेण्याचे भान त्याला राहिले नाही. जनकोजी - तुकोजी शिंदे, संताजी वाघ आणि हुजुरातीचे खासे सरदार यांनी आपल्या बेभान सेनापतीला रणभूमीवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठी सैन्याची घडी विस्कळीत झाल्याने हुजुराती भोवती शत्रूसैन्याचा वेढा पडू लागला होता. या क्षणी आता फक्त उत्तरेची वाट मोकळी होती. ती बंद होण्यापूर्वीच भाऊ व त्याच्या सरदारांनी निर्णय घेतला. त्यानुसार झुंज देत ते मागे - मागे सरकू लागले. परंतु, तिकडूनही शत्रूची पथके येऊन त्यांच्यावर आदळल्याने आता त्यांचा मार्ग खुंटला ! सूर्यास्ताच्या वेळी शेवटी जी काही झटापट झाली त्यातून समशेरबहाद्दर कसाबसा बाहेर पडला. पण हे भाग्य सर्वांनाच लाभले नाही. जनकोजी जिवंत शत्रूच्या हाती लागला तर तुकोजी शिंदे मारला गेला. संताजीला शरीरावर नवा घाव घेण्यास जागा राहिली नाही. अखेर भाऊ व त्याचे सोबती शेवटच्या झुंजीत मारले गेले व पानिपतचे रण अब्दालीच्या ताब्यात आले ! 
                                            

 ' पानिपत असे घडले ' हे पुस्तक ऑन लाइन विक्रीसाठी उपलब्ध असून त्याचे ई बुक मध्ये ' बुकगंगा ' मार्फत रूपांतरण करण्यात आले आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक हवे आहे त्यांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी. 


 http://www.sahyadribooks.org/books/PanipatAseGhadle.aspx?bid=829


 http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4900400902881415755                             


पानिपत असे घडले...         ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन

प्रुष्ठ्संख्या: ५८८

मुल्य: रु. ५००/- मात्रयेथे उपलब्ध :-  भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०

फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६   

                           

2 comments:

deom said...

पानिपत बद्दलचे सारे समज गैर समज तुम्ही दूर केलेत. आम्ही तुमच्या पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतोय.

संजय क्षिरसागर said...

धन्यवाद deom !