बुधवार, १ जानेवारी, २०१४

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - १० )

                                              


              मागील प्रकरणांत आपण स. माधवरावचा अपघात कसा झाला व त्यात त्याचे निधन कशा प्रकारे झाले याविषयी माहिती देणारी काही पत्रे आणि नोंदी पाहिल्या. त्या पत्रांच्या व अस्सल नोंदींच्या आधारे या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा आपण प्रयत्न करू. 

           वासुदेव खरेंनी पटवर्धन दप्तरातील संपादन केलेल्या पत्र क्र. ३६५७ मधील माहितीचा या ठिकाणी प्रथम विचार करणे आवश्यक आहे. ता. २६ नोव्हेंबर १७९५ रोजी परशुरामभाऊने मिरजेच्या बळवंतराव उर्फ बाळासाहेब पटवर्धनास लिहिलेल्या पत्रातील " श्रीमंतांनी माडीवरून पडावयाचे पूर्वी भाषण कोणाकोणाजवळ केलें तें व माडीवरून पडल्यानंतर बोलिले तें कोणीं कोणीं येउन सांगितले " हे वाक्य महत्त्वाचे आहे. या वाक्याला दुजोरा देणारे याच दिवशी लिहिले गेलेले नीलकंठ आपाजीचे पत्र खरेंनी आपल्या ऐतिहासिक लेखसंग्रहात प्रकाशित केले आहे. त्यातील मसुदा पुढीलप्रमाणे :- " श्रीमंतांनी आपला काल समीप आला असे जाणून श्रीमंत बाईसाहेबांस काही गोष्टी सांगितल्या, व आणखी कित्येकांजवळ कित्येक भाषणें जहाली, त्याची बखर होत आहे." एकाच दिवशी लिहिण्यात आलेल्या या दोन पत्रांतील मजकुरात साम्य आहे. अर्थात, पत्र पटवर्धनी दप्तरातील असल्याने माहितीमधील सारखेपणा विलक्षण आहे अशातला भाग नाही. उलट भाऊच्या पत्रातील मजकूर अधिक स्पष्ट आहे तर नीलकंठ आपाजीच्या पत्रातील माहिती संदिग्ध आहे. भाऊच्या पत्रातून हे तर स्पष्ट होते की, माडीवरून पडण्यापूर्वीच स. माधवराव हा निराशाग्रस्त झाला होता व त्या नैराश्यातून त्याने आपल्या पत्नीजवळ आणि इतरांजवळ काही उद्गार काढले होते. अर्थात, आजारपणात मनुष्य कधी - कधी जीवाला त्रासून काही गोष्टी बोलतो, त्यामुळे त्या कोणी मनावर घेत नाही हे खरे. पण, या प्रकरणात रुग्णाईताने निव्वळ बडबड न करता प्रत्यक्ष कृती केल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. परशुरामभाऊ हा नानाच्या खास वर्तुळातील असल्याने त्याच्या पत्रांवर विश्वास टाकण्यात काहीच हरकत नसावी. 

               ऐतिहासिक लेखसंग्रहात प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रांमधील माहितीचा विचार करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल व ती म्हणजे पेशव्याच्या शेवटच्या दिवसांत तो आपल्या पत्नीजवळ काही गोष्टी बोलला किंवा न बोलला असला तरी त्या माहितीस जास्त महत्त्व देता येत नाही. कारण, त्यांचा विवाहच मुळी स. १७९३ मध्ये झाला होता व तत्कालीन प्रघातानुसार यशोदाबाई हि बालिकाच होती. त्यामुळे तिच्याविषयीचा येणारा उल्लेख किंवा माहिती तारतम्यानेच घ्यावी लागते. हि महत्त्वाची गोष्ट याच विषयावर लिहिलेल्या एका लेखात मी विसरलो होतो व या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिलेले होते. अर्थात, त्यावेळी अतिउत्साहाच्या भरात माझ्या हातून ती चूक घडली पण मूर्खपणा तो शेवटी मूर्खपणाच असतो !

             स. माधवरावास ज्या दिवशी अपघात झाला, त्याच दिवशी तुकोजी होळकर त्याच्या भेटीस गेला होता. लाखेरीचे युद्ध होण्यापूर्वी कधीतरी तुकोजीस अर्धांगवायू झालेला होता याची वाचकांनी नोंद घ्यावी. अर्थात, पक्षाघातामुळे मनुष्य शारीरिकदृष्ट्या काहीसा हतबल झाला असला तरी त्या गोष्टीचा त्याच्या बुद्धीवर काही परिणाम होत नाही हे देखील लक्षात घ्यावे.  तुकोजीच्या पत्रानुसार अपघात झाला त्या दिवशी सकाळी पेशवा नित्याच्या वेळेवर किंवा जरा - पुढे मागे असा वेळेत बदल करून उठला. सकाळची आन्हिकं आटोपून तो गणपतीच्या दिवाणखान्यावरील मजल्यावर असलेल्या आपल्या दालनाच्या गच्चीत कठड्याला टेकून बसला होता. यावेळी सूर्योदय होऊन चार घटका ( जवळपास ९६ मिनिटे ) झाल्या होत्या किंवा पहिल्या प्रहराच्या चार घटका उलटून गेल्या होत्या. यावेळी त्याच्या सोबत गंगाबाईची आई -- म्हणजे पेशव्याची आजी आणि शागीर्द पेशाची मंडळी हजर होती. अचानक पेशव्याला उठून उभे राहण्याची इच्छा झाली व तो उठून उभा राहिला खरा पण उभं राहिल्यावर त्याला आपलाच तोल सावरता आला नाही आणि तो तसाच गच्चीवरून खाली कारंजी हौदात / हौदावर पडला. घटनेनंतर पेशवा पाऊण तास बेशुद्ध होता पण नंतर शुद्धीवर आला. पत्रातील मजकुरावरून असे अनुमान बांधता येते की, अपघाताची बातमी समजल्यावर तुकोजी पेशव्याच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी वाड्यावर आला तेव्हा त्यांस हि बातमी मिळाली. विशेष, म्हणजे या प्रसंगी तुकोजी वगळता इतर कोणताही महत्त्वाचा सरदार पुण्यात हजर नव्हता आणि तुकोजीस मिळालेली माहिती हि प्रत्यक्षदर्शी वा नानाकडूनचं प्राप्त झालेली आहे. कारण, पेशव्याचा पालक व संरक्षक नाना फडणीस असून घटना घडल्यावर पेशव्यावर औषधोपचार होत असताना तो तेथे हजर असणार हे उघड आहे. म्हणजे, तुकोजीची माहिती बरीचशी अव्वल दर्जाची आहे. 

      परंतु असे असले तरी, तुकोजी होळकराच्या माहितीला बऱ्यापैकी छेद देणारा तपशील ऐ. ले. सं. मधील पत्र क्र. ३६४४ मध्ये आढळतो. पत्रलेखक हा पटवर्धनांचा पुण्यातील वकील / कारकून असून त्याने घटना घडल्यावर दुसऱ्या दिवशी मिरजेस बळवंतराव पटवर्धनास घडल्या गोष्टीचा तपशीलवार वृत्तांत कळवला आहे. या ठिकाणी वाचकांना मी परत एकदा आठवण करून देतो की, पटवर्धन या सुमारास नानाच्या खास वर्तुळातील सरदार होते. त्यामुळे त्यांच्याकडे कळवली जाणारी बातमी हि नानाकडून वा त्याच्या विश्वसनीय व्यक्तींकडूनच कळवली जात होती. हे अनुसंधान मनाशी बाळगून धोंडो बापूजीच्या पत्राकडे पहावे लागते. या पत्रानुसार पेशवा आजारी असून त्यावर औषधोपचार चालू होते. पेशव्याच्या चित्ताची स्थिरता नव्हती. या काळात पेशव्याचा मुक्काम हा गणपतीच्या दिवाणखान्यावरील माडीवर --- म्हणजे वरच्या मजल्यावर होता. रविवार ता. २५ ऑक्टोबर रोजी सकाळ झाल्यावर दोन - तीन घटकांनी पेशव्याने स्वतः उठून त्या खोलीतला गच्चीकडे जाणारा दरवाजा उघडला आणि खाली उडी टाकली. या गच्चीच्या खाली कारंजाचा हौद असून त्यावर आपटी खाल्ल्याने पेशव्यास जबरदस्त दुखापत झाली. एका पायाचे हाड मांडीजवळ मोडले. दातांना, हातांना व चेहऱ्यालाही मार बसला. धोंडो बापूजीला जो तपशील उपलब्ध झाला, त्याचा उगम बहुधा बाळाजी सहस्त्रबुद्धे व विसाजी वाडदेकर यांच्याकडे आहे. पटवर्धनांचे पुण्यात जे कारकून हजर होते त्यांपैकी हे आणखी दोन गृहस्थ ! यांनी स्वतः वाड्यात जाऊन पेशव्याची भेट घेतल्याचा उल्लेख याच पत्रात आलेला आहे. धोंडो बापूजी बहुतेक पेशव्याच्या भेटीस गेला नसावा किंवा त्याची भेट झाली नसावी. नाहीतर तसा स्पष्ट उल्लेख या पत्रात आला असता. याचा अर्थ वाडदेकर व सहस्त्रबुद्धे यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून धोंडो बापूजीने हे पत्र मिरजेस लिहिले आहे. 

           अपघात होण्यापूर्वी पेशवा आजारी असल्याचे उल्लेख तसे सर्वत्र मिळतात. पण त्याच्या चित्ताची स्थिरता नसल्याचा स्पष्ट उल्लेख याच पत्रात मिळतो. आणि याच अस्थिर मानसिकतेत पेशव्याने स्वतःहून राहत्या खोलीतील गच्चीकडे जाणारा दरवाजा खोलून खाली उडी टाकली अशी माहिती प्राप्त होते. 

           होळकर आणि धोंडो बापूजी या  पत्रांतील मजकुराच्या सत्यतेविषयी शंका नाही. परंतु, या दोघांना ज्यांनी तपशील कळवला त्यांच्या हेतूंविषयी शंका आहे. ता. २५ ऑक्टोबर रोजी तुकोजी जेव्हा पेश्व्यास भेटला तेव्हा त्यास सांगण्यात आले कि, घटना घडते समयी पेशवा एकटा नसून त्याच्यासोबत त्याची आजी व सेवक मंडळी होती आणि तो गच्चीत कठड्याला टेकून बसला होता. आता या कठड्याची उंची किती असावी ? सर्वसाधारणपणे कोणत्याही पाच - साडेपाच फुट उंच व्यक्तीच्या कमरेएवढा तरी तो कठडा उंच असावा. तर अशा कठड्याला टेकून पेशवा बसला. आणि मध्येच त्याला उठून उभे राहावं असे वाटले. म्हणून तो उठला पण अशक्तपणामुळे त्याला स्वतःचा तोल सावरता न आल्याने तो गच्चीतून खाली पडतो. या ठिकाणी पेशव्याला सावरण्यास शागीर्द मंडळी का धावली नाहीत हा मुद्दा अगदीच गैरलागू नाही. पण तत्कालीन स्पर्शास्पर्श रिवाज लक्षात घेता आणि घटना अशा  घडली हे पाहता या मुद्द्यास अधिक महत्त्व देता येत नाही. 
           असो,आता पटवर्धन दप्तरातील पत्राचा तपशील व त्यातील विसंगत्या लक्षात घेऊ. या पत्रानुसार अपघाताच्या वेळी पेशवा त्याच्या खोलीत एकटाच होता. आजारी होता, मानसिकदृष्ट्या अस्थिर होता पण अशक्त नव्हता. सकाळी उठल्यावर काही वेळाने म्हणजे एक - दीड तासाने त्यास अचानक गच्चीत जाण्याची इच्छा झाली. स्वतः तो उठून खोलीला लागून असलेल्या गच्चीकडे निघाला. यावेळी गच्चीचा दरवाजा बंद होता. हा बंद दरवाजा बरंच काही सांगून जातो. काही शंका निर्माण करतो. (१) पेशवा उठून तास - दीड तास उलटला तरी सेवकांनी गच्ची बंद का ठेवला ? (२) पेशव्याची अस्थिर मानसिकता लक्षात घेत त्याच्या आसपास सेवकांनी सदैव हजर असणे आवश्यक होते. इतरवेळी पेशव्याकडे जाण्यास मुंगीलाही वाट मिळू नये असा कडेकोट बंदोबस्त व माणसांचा राबता असताना याच वेळी हि निर्मनुष्यता का ? (३) पेशव्याची मानसिक स्थिती अस्थिर आहे हे माहिती असूनही दरवाजाला कुलूप न घालता तो तसाच का ठेवण्यात आला ? मला कल्पना आहे की, प्रश्न क्र. १ व ३ यांचे खंडन - मंडन केले जाऊ शकते पण मुद्दा / प्रश्न क्र. २ ची वाट काय ?
         त्याहीपुढे जाऊन मी असे विचारतो कि, एकाच घटनेचा वेगवेगळा तपशील पटवर्धन व होळकर यांच्या पत्रांत का आढळतो ? यावरून हे स्पष्ट आहे की, एका पत्रातील मजकूर सजवण्यात आला आहे. मुद्दाम रचण्यात आला आहे तर दुसऱ्यातील काही प्रमाणात किंवा पूर्णतः विश्वसनीय आहे. मग प्रश्न असा आहे की, कोणते पत्र खरी माहिती सांगते. होळकरांचे कि धोंडो बापूजीचे ? 

                गोविंदराव काळेला जे पत्र पुण्याहून गेले त्यातील माहिती बरीचशी धोंडो बापूजीच्या पत्रातील मजकुराच्या वळणाची आहे. या पत्रातही पेशव्यास ज्वरांशात वायू झाल्याचा उल्लेख आहे. पण हा वायू द्वादशीला म्हणजे, अपघात झाला त्याच दिवशी झाला असे पत्रलेखकाचे म्हणणे आहे. यानंतरचा मजकूर थोडा वेगळा आहे. या पत्रानुसार पेशवा पलंगावरून उठून खिडकीकडे गेला तेव्हा सोबत खिजमतगार होता. त्याने पेशव्यास तिथे न उभे राहण्याची विनंती केली पण त्याच वेळी पेशव्याने खाली उडी टाकली. 
   
      याशिवाय पेशवे शकावलीतील मजकूर लक्षात घेता, त्यात गच्चीचा उल्लेखचं नाही. त्यामध्ये "… …. द्वादशीस दिवाणखान्यांत असतां अकस्मात मेघडंबरी बंगल्याचे पायरीवरून कारंजाचे नळीवरून खाली पडले." अशी स्पष्ट नोंद आहे. 

        यावरून पुढील विसंगत्या आढळतात :- 
(१) तुकोजीच्या माहितीनुसार अपघात प्रसंगी पेशव्याजवळ त्याची आजी आणि इतर सेवक मंडळी होती. 
(२) पटवर्धन दप्तरातील पत्रानुसार, अपघाताच्या वेळी पेशव्याच्या जवळ कोणीही नव्हते. 
(३) गोविंदराव काळेस लिहिलेल्या पत्रात, अपघाताच्या प्रसंगी एक खिजमतगार पेशव्याजवळ हजर होता. 
(४) पेशवे शकावलीनुसार घटनेच्या वेळी पेशवा एकटा असून तो बंगल्याच्या पायरीवरून पडला. 
                           पहिल्या तीन पत्रांमध्ये पेशवा गणपती महालाच्या वरील त्याच्या निवासस्थानात होता व त्याने गच्चीतून खाली उडी मारली / तो पडला. तर पेशवे शकावलीनुसार स. माधव मेघडंबरी बंगल्याच्या पायरीवरून खाली पडला. 

           पेशव्याचा अपघात ते त्याचा मृत्यू आणि त्यानंतरच्या घटना यांविषयी सलग अशी तपशीलवार माहिती पटवर्धन दप्तरात मिळते खरी, पण जेव्हा प्रत्यंतर पुरावा समोर येतो तेव्हा या दप्तरावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न उद्भवतो. प्रस्तुत थोडे विषयांतर करून सांगतो की, श्री. पांडुरंग रानडे यांनी आपल्या ' नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ' या ग्रंथात या घटनेचे संदर्भ ग्रंथांच्या व अस्सल पत्रांच्या आधारे विश्लेषण केले असून त्यांच्या मते, नाना फडणीसने स. माधवाच्या स्वभावाचा पूर्ण फायदा घेत त्यास आत्महत्या करण्यासाठी पूरक असे वातावरण / परिस्थिती निर्माण केली. अप्रत्यक्षपणे नाना फडणीसने स. माधवरावाचा खून केला असाच त्यांचा निष्कर्ष आहे. रानड्यांचा हा निष्कर्ष जसाच्या तसा स्वीकारणे योग्य होणार नाही. कारण, त्यांचा ग्रंथ हा स. १९४४ साली प्रकाशित झाला होता. त्यावेळी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांहून अधिक पत्रे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे रानडेंच्या निष्कर्षांस उचलून धरणे योग्य नाही. पण खुनाची -- मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष -- शक्यता डावलता येत नाही. 

       स. माधवरावाच्या खुनाविषयी शंका उपस्थित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या अपघाताच्या तपशिलांमध्ये असलेली विसंगती हे होय ! त्यामुळेचं स. माधवाच्या अपघाताविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात. या ठिकाणी स. माधवरावाच्या मृत्यूमुळे नेमके कोणाकोणाचे हित साधले जाणार होते ते पाहू :- 
(१) दुसरा बाजीराव :- स. माधवराव मरण पावल्यावर दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद मिळणार हे उघड होते. त्यामुळे त्यानेच मुद्दाम पेशव्याचा घात केला नसावा ना ? पण हि शंका जरी प्रबळ असली तरी वस्तुस्थिती पाहता ती गैरलागू / निरर्थक आहे. यावेळी बाजीराव नानाच्या नजरकैदेत होता. कट कारस्थानात त्याची मती व गती नानाच्या तोडीची असली तरी सत्ता आणि द्रव्य हाताशी नसल्याने एवढी मोठी मसलत त्याला उभारणे, तसेच ती शेवटास नेणे शक्य नव्हते. साधा त्याला पेशव्यासोबतचा पत्रव्यवहार गुप्त राखता आला नाही तर तो पेशव्याचा घात काय करणार ? 
(२) नाना फडणीस :- स. माधवाच्या मृत्यूने हित साधले जाणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नाना फडणीस ! सर्वप्रथम नानाचे यावेळी स्थान काय होते ते पाहू. नाना हा लौकिकात पेशव्यांचा फडणीस व कारभारी होता. मात्र व्यवहारात त्याच्या हाती पेशवे आणि छत्रपतीपदाची सत्ता होती. महादजी शिंदेचा मृत्यू व होळकरांच्या घरातील वारसा कलहाने या दोन्ही बलवान सरदाऱ्या त्याच्या मुठीत आल्या होत्या. हरिपंत फडके सारखा प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता जरी मरण पावला असला तरी त्याच्या पुत्रास त्याने सरदारकी देऊन फडक्यांना नानाने आपल्या लगामी लावले होते. हरिपंत फडके हा दुय्यम कारभारी होता याचीही वाचकांनी आपल्या मनाशी नोंद घ्यावी. पटवर्धन मंडळी आपसांत फटकून असली तरी नानासोबत एकनिष्ठ होती. निजामाचा दिवाण नानाच्या ताब्यात असल्याने हैद्राबाद दरबारही नानाच्या ऐकण्यात होता. व्यवहारात नाना पेशव्याची सत्ता वापरत असल्याने म्हैसूर व कलकत्ता येथेही त्याच्या शब्दांस वजन होते. म्हणजे तख्तावरील बदलण्याची इच्छा - शक्ती यावेळी फक्त नानाकडेचं होती असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. त्याशिवाय एकहाती सत्ता उपभोगण्याची त्यास चटक लागली होती, हे तर प्रसिद्धचं आहे. अशा परिस्थितीत स. माधवरावास अपघात घडवून आणला वा त्यास आत्मघातास प्रवृत्त केले किंवा तशी परिस्थिती निर्माण केली तर नानाचेचं हित साधले जाणार होते हे उघड आहे. राहता राहिला प्रश्न स. माधवाच्या वारसाचा तर, नारायणाच्या खुनानंतर आणि दादाच्या पदच्युतीनंतर केवळ गंगाबाई गर्भवती आहे या बळावर ज्यांनी सत्ता हाती घेतली त्या मुत्सद्द्यांना वारसाची काय अडचण पडणार होती ? 

           सारांश, बाजीराव रघुनाथ व बाळाजी जनार्दन हेच दोन प्रमुख इसम असे होते की, ज्यांना स. माधवाच्या मृत्यूने फायदा होणार होता. आता एक मुद्दा असाही उपस्थित होतो की, स. माधवराव हयात असतानाही नानाच्याच हाती सत्ता होती मग त्याच्या खुनासाठी नाना प्रयत्न का करेल ? उलट स. माधवराव जिवंत असणेचं त्याच्या हिताचे नव्हते काय ? प्रश्न रास्त आहे पण या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. घाशीराम प्रकरणी मानाजी फाकडेने जोर केल्याने स. माधवाने योग्य असा न्याय केला असला तरी लौकिकात त्याने नानाच्या विरोधात निकाल दिला होता. मात्र, तरीही नानाने तो विनातक्रार स्वीकारला कारण, महादजी शिंदे त्यावेळी पुण्याच्या वाटेवर होता. नानाने जर तेव्हा ताठरता दाखवली असती तर महादजीचा पाठिंबा मिळवून पेशव्याने नानालाच जाग्यावर बसवले असते आणि महादजी आपली गच्छंती करण्यासाठीच पुण्यास येत आहे असा नानाचा देखील दाट संशय होता. महादजीच्या मृत्यूने नानाचे धोक्यात आलेले स्थान सुरक्षित झाले आणि खर्ड्याच्या मोहिमेचे सर्व नेतृत्व नाना फडणीसने पार पाडले. युद्धाचे निर्णय, तहाचे निर्णय व अटी यांमध्ये कुठेही स. माधवाचा सक्रिय सहभाग नसून तो केवळ शिक्क्याचा धनी बनून राहिला. खर्ड्याच्या नंतर बाजीराव - माधवराव अशी युती बनण्याची चिन्हे दिसू लागली. सत्तेवर आल्यावर बाजीरावाने काय केले हा भाग आपण बाजूला ठेवू. स. १७९५ साली त्याचे गुण - दोष कोणालाच माहिती नव्हते. यावेळी तो २० वर्षांचा एक अननुभवी तरुण पण नात्याने स. माधवाचा चुलता होता. पुतण्याचा कारभार आपण करावा अशी इच्छा त्याच्या मनी असणे स्वाभाविक होते. त्यातचं आपल्या मुलास कारभारात स्थान मिळावे अशा आशयाचा करार रघुनाथराव - महादजी यांच्यात आधी झालेलाचं होता. त्याची बाजीरावास आनंदीबाईने आपल्या मृत्यूपूर्वी कल्पना दिलेली असणारचं. दौलतराव शिंद्याने असह्य असा उपद्रव देऊनही बाजीराव कायम त्याच्या लगामी का राहिला याचे रहस्य रघुनाथ - महादजी यांच्या करारात दडलेलं आहे. खुद्द महादजीनेही पुणे मुक्कामात बाजीरावास कारभारात घेण्याचा मुद्दा उकरून काढलाचं होता की ! तात्पर्य, स. माधवराव व दुसरा बाजीराव हे दोघे एकत्र येण्याची शक्यता नानाला दिसत होती आणि पेशवे परिवाराचे हे दोन्ही तरुण एकत्र आले तर आपले स्थान, अधिकार धोक्यात आहे, हे न समजण्याइतपत नाना राजकारणात नवखा नव्हता. त्यामुळे या दोघांची जोडी फोडण्याचे तो शक्य तितके प्रयत्न करणार हे उघड आहे व ते त्याने केलेही. बाजीराव - माधवराव यांचा पत्रव्यवहार खंडित केला. स. माधवावर आपले नियंत्रण परत एकदा बसवण्याचा शक्य तितका प्रयत्नही केला, हे दसऱ्याच्या समारंभावरून लक्षात येते. 
   
           आता प्रश्न असा पडतो कि, स. माधवाचा नेमका खून झाला की त्याने आत्महत्या केली अथवा त्यास अपघाती मरण आले. या प्रश्नाचे उतर शोधण्याचा आपण प्रयत्न करू. 

               प्रथम पटवर्धनी पत्रांच्या आधारे या गूढाची उकल होते का ते पाहू :- ता. २६ ऑक्टोबरच्या पत्रानुसार स. माधव आजारी होता. त्याच्या चित्ताची स्थिरता नव्हती. अशा परिस्थितीत त्याने राहत्या खोलीतला गच्चीचा दरवाजा स्वतःहून उघडून खाली उडी टाकली. या पत्रात अशक्तपणाचा किंवा तोल जाण्याचा उल्लेख नाही. ता. २७ ऑक्टोबर रोजी परशुरामभाऊने तासगावाहून मिरजेस बळवंतरावास कळवले की, पुण्यास तातडीने फौजेसह बोलावले आहे. तर दि. ३० ऑक्टोबरचे परशुरामभाऊने बळवंतरावास लिहिलेल्या पत्रात, नानाने पुढील विचारासाठी जलदीने पुण्यास येण्याचा उल्लेख आहे. तसेच या पत्रात गादीला वारस म्हणून बाजीरावास आणावे कि दत्तक घ्यावा याचाही उल्लेख आहे. ता. ५ नोव्हेंबरचे परशुरामभाऊचे पत्र आहे. त्यात नानाच्या भेटीचा वृत्तांत असून त्या भेटीत नानाने त्यांस सांगितले की, ' पेशवा शेवटच्या क्षणापर्यंत शुद्धीवर होता व त्याने आपण वाचत नसल्याचे जाणून आपल्या नावाचा दुसरा वारस नेमण्याची नानास आज्ञा केली. तसेच अशाच आशयाची भाषणे पेशव्याने इतरांजवळ / हरिपंत फडकेच्या मुलाजवळ केल्याचा ' उल्लेख आहे.  असो, यानंतर ता. २६ नोव्हेंबरचे नीलकंठ आपाजीचे पत्र आहे. त्यानुसार आपला शेवट जवळ आल्याचे जाणून पेशवा आपल्या पत्नी व इतरांजवळ काही गोष्टी बोलला होता. आता, या संभाषणाच्या गोष्टी अपघाता आधीच्या कि नंतरच्या यांचा खुलासा नाही. याच तारखेचे खुद्द परशुरामभाऊचे पत्रदेखील उपलब्ध असून, त्यानुसार पेशवा माडीवरून पडण्यापूर्वी व त्यानंतरही इतरांजवळ निरवानिरवीची बडबड करत होता हे स्पष्ट होते. तसेच याच पत्रात दत्तकाचा शोध सुरु असल्याचीही माहिती आहे. 
                पटवर्धनी दप्तरातील माहितीवरून पुढील गोष्टी तर स्पष्ट होतात :- (१) आपल्या नावाचा दुसरा वारस नेमणे असे मृत्युपूर्वी स. माधवाने सांगितल्याने नानाने दत्तकाचे राजकारण हाती घेतले. (२) जीवनाला वैतागून म्हणा किंवा इतर कारणांनी म्हणा माडीवरून पडण्याआधी पेशव्याने निरवानिरवीकी बडबड केली होती. 

             हैद्राबादेस गोविंदराव काळयास जे पत्र गेले त्यात पुढील माहिती मिळते :- अपघाताच्या दिवशी पेशव्यास तापात वायू झाला. वाताच्या भिरडीत तो पलंगावरून उठून खिडकीजवळ गेला. सोबत सेवक होता. त्याने त्यास तेथे न उभे राहावे असे सांगितले. तेव्हा पेशव्याने खाली उडी मारली. त्यामध्ये त्याच्या उजव्या मांडीचे हाड मोडले, दातांची कवळी बाहेर पडली, नाकातून रक्त आले. वैद्यांनी उपचार केले. चार घटकांनी तो शुद्धीवर आला, तेव्हाही वायूचा प्रभाव होताच. त्या भ्रमात तो बडबड करत होता. 
                पेशवे शकावलीनुसार रविवारी अकस्मातपणे पेशवा मेघडंबरी बंगल्याच्या पायरीवरून कारंजाचे नळीवर पडला. कोजागरीच्या दिवशी शुद्धीवर असताना कारभाऱ्यांना --- नानाला बोलावून आपण वाचत नाही तेव्हा दादाच्या मुलास राज्याचे वारस म्हणून नेमावे असे सांगून सायंकाळी जीव सोडला. 
                    काव्येतिहाससंग्रहातील नोंदीची माहिती पुढीलप्रमाणे :- आश्विन शु. १२ रोजी माडीवरून पडून अत्यवस्थ. शु. १५ रोजी कैलासवास. मृत्यूपूर्वी नानासाहेबाच्या वंशाचा शेवट झाला व ब्रम्हप्रलय होईल असे पेशव्याने उद्गार काढले. 
               
            खुद्द नाना फडणीसच्या पत्रातील माहिती पुढीलप्रमाणे :- " रावसाहेबांचे शरीरीं किंचित वायूची भावना पांचसात दिवस होऊन गणपतीचे दिवाणखान्याचे दुमजल्यावरून कारंजाचे अंगे संगी फरशावर जमिनीस आले. तिसरे दिवशी कैलासवास केला. " 
    नानाच्या पत्रानुसार अपघातापूर्वीच पेशव्यास वायू झाला होता. अपघात प्रसंगी पेशवा तोल जाउन पडला किंवा त्याने उडी टाकली तसेच त्याप्रसंगी त्याची आजी आणि सेवक मंडळी होते कि फक्त एक सेवक होता याचाही तो खुलासा करत नाही. फक्त पेशवा वरून खाली आला असाच मोघम उल्लेख आहे. 

     गोविंदराव काळेस गेलेले पत्र, पेशवे शकावली, काव्येतिहाससंग्रहातील नोंद यांचा  एकत्रित विचार केला असता पुढील निष्कर्ष निघतो :- पेशवा तापाने आजारी होता. त्यांस वायूचे झटके येत होते. पण तो अशक्त नव्हता हे काळ्याच्या पत्रावरून स्पष्ट होते. पेशव्याने स्वतः उडी मारली असेही त्याच पत्रात दिले आहे तर पेशव्यांची शकावली व काव्येतिहाससंग्रह त्याविषयी काहीही सांगत नाहीत. फक्त पेशवे शकावलीनुसार, मृत्यूपूर्वी स. माधवाने आपल्यामागे दादाच्या मुलास पेशवेपद देण्याची आज्ञा केल्याचा उल्लेख आहे. 

          निष्कर्ष :- सर्व उपलब्ध पुरावे, पत्रे, नोंदी व इतिहासकरांचे निष्कर्ष अभ्यासून माझे मत पुढीलप्रमाणे बनले आहे :- अपघाताच्यापूर्वी स. माधवराव तापाने आजारी होता हे तर उघड आहे. अपघात होण्याच्या आधी त्यांस वाताचे झटके येत होते असा उल्लेख पटवर्धन दप्तरातील पत्रे, गोविंदराव काळेला लिहिलेले पत्र तसेच नानाच्या पत्रातही येतो. पण तुकोजी होळकराच्या पत्रात याचा अजिबात उल्लेख नाही. ज्या पत्रांमध्ये पेशव्यास वायू झाल्याचे उल्लेख आहेत, त्या पत्रलेखकांस व तुकोजीलाही नानाच्याच गोटातून माहिती मिळाली आहे. परंतु, तुकोजी स्वतः शुद्धीवर आलेल्या पेशव्यास भेटला होता व त्यावेळी पेशवा भानावर असून भ्रमात नव्हता हे त्याच्या पत्रावरून उघड होते. याचा अर्थ असा होतो की, पेशव्यास वायू झाला होता हि मुद्दाम उठवण्यात आलेली कंडी आहे. 
     
         दुसरा मुद्दा असा आहे, पेशव्याने उडी मारली तेव्हा त्याच्यासोबत कोण होते का ? तुकोजीच्या माहितीनुसार त्यावेळी सेवकवर्ग व पेशव्याची आजी त्याच्या जवळ होते. पण उभे राहताना त्यास तोल सावरता न आल्याने तो गच्चीतून खाली पडला. परंतु, पटवर्धन दप्तरातील पत्र सांगते कि, अपघाताच्या प्रसंगी पेशवा एकटा होता व स्वतःहून त्याने गच्चीचा दरवाजा उघडून खाली उडी टाकली. तर गोविंदराव काळेस गेलेल्या पत्रात असे दिले आहे की, पेशव्याने जेव्हा खाली उडी मारली तेव्हा एक खिजमतगार जवळ होता. आता या तीन पत्रांमधील नेमके कोणते पत्र सत्य सांगत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. या तीन पत्रांपैकी फक्त तुकोजीचे पत्र सांगते की, पेशव्याचा अपघात झाला आहे तर इतर दोन पत्रांमधून पेशव्याने आत्महत्या केल्याचे ध्वनित होते. 
           प्रथम एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे व तो म्हणजे या तिन्ही पत्रलेखकांना शनिवारवाड्यात गेल्यावर घटनेचा तपशील मिळाला आहे. या तपशिलाचा मुख्य उगम नाना फडणीस असल्याचे उघड आहे. या ठिकाणी आणखी एका प्रश्नाची उकल होणे गरजेचे आहे व तो म्हणजे पेशवा खरोखर तोल जाऊन पडला कि त्याला ढकलण्यात आले वा त्याने स्वतःहून खाली उडी मारली ?

              पेशव्याला गच्चीतून खाली फेकण्याची शक्यता तशी निराधार आहे. कारण, तसे घडले असते तर तुकोजीला हे वर्तमान समजलेचं असते. अपघातानंतर पेशवा शुद्धीवर आल्यावर त्याची भेट तुकोजीने घेतली तेव्हा पेशव्याने घडला प्रकार जरूर सांगितला असता. त्यामुळे हा मुद्दा बाद होतो. राहता राहिल्या दिन शक्यता, तर त्यातील तोल जाऊन खाली पडण्याची शंका देखील निरर्थक आहे. कारण, खरोखरचं पेशव्याचा तोल गेला असता तर तसाच उल्लेख इतर पत्रांमध्ये आला असता पण तसे नाही. याचाच अर्थ असा की, पेशव्याने स्वतःहून गच्चीतून खाली उडी मारली !

       पेशव्याने स्वतःहून गच्चीतून उडी घेतली खरी पण त्यावेळी तो वायूच्या भ्रमात नव्हता हे देखील तितकेच सत्य आहे. माझ्या मते, आपल्या आजीच्या उपस्थितीतच स. माधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तुकोजीच्या पत्रातील बरीचशी माहिती या ठिकाणी विश्वसनीय मानता येते. फक्त तोल जाऊन खाली पडण्याचा भाग वगळता ! गंगाबाईची आई पेशव्याच्या भेटीस आल्याचा उल्लेख फक्त तुकोजीच्या पत्रात आहे व त्याचे स्थान लक्षात घेत त्यांस सर्वच काही खोटे रचून सांगणे नानाला शक्य नव्हते. त्यामुळे त्याने अर्धी खरी व अर्धी खोटी माहिती दिली. त्याउलट पटवर्धनांचे कारकून व गोविंदरावाचे हस्तक हि मंडळी तुलनेने नगण्य अशी असल्याने त्यांना वाटेल ती कथा रचून सांगणे नानास सहजशक्य होते. त्यामुळेचं पटवर्धन व काळेच्या पत्रांतील तपशीलात विसंगती आढळते. असो, पेशव्याची आजी यावेळी भल्या पहाटे नातवास कशी काय भेटायला आली हा देखील मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. माझ्यामते या ठिकाणी पांडुरंग रानडेंचे मत विचारात घेणे चुकीचे होणार नाही. नानाने पेशव्याच्या आजीस मुद्दाम बोलावले. तिच्या नातवाने आपल्या आज्ञेत / बंधनात राहणे कसे योग्य आहे हे सांगण्यास स. माधवास समजावून सांगण्यास भाग पाडले. बळवंतराव वामोरीकरास अटक झाल्यापासून पेशव्याच्या ' इगो ' ला धक्का बसलेला होताच. खर्ड्याच्या मोहिमेपासून आपले स्थान व आपली नेमकी किंमत काय आहे, हे तो पाहत होता. त्यात या प्रकरणाची भर पडली. हाती सर्वाधिकार असूनही आपण केवळ शोभेचे मालक आहोत याची त्याला जाणीव झालेली होती. त्यामुळे तो स्वतःवर अधिक चिडला होता हे उघड आहे. परिस्थिती प्रतिकूल असेल आणि मनुष्य त्यातून मार्ग काढण्यास हतबल असेल तर स्वतःवर चरफडण्याखेरीज वा निराशाग्रस्त अवस्थेत काहीतरी आततायी मार्ग स्वीकारण्याखेरीज काय करू शकतो ? पेशवा आत्महत्येपूर्वी जी बडबड करत होता ती वायूच्या प्रभावात नसून तो शुद्धीवर असताना हे सर्व करत होता. आपला संताप शब्दांतून व्यक्त करणे यापलीकडे त्याच्या हाती काही नव्हते. या सर्वांचा कडेलोट रविवारी झाला, जेव्हा त्याची आजी त्याला नानाच्याच बंधनात राहण्याचे सांगायला आली आणि वैतागलेल्या स. माधवाने गच्चीतून खाली उडी टाकून आपला संताप प्रकट केला व इहलोकीची यात्रा संपवली !

         आता प्रश्न असा निर्माण होतो कि, असे काही घडेल याची नानास पूर्वकल्पना होती काय ? माझ्या मते, नानाला याची पूर्वकल्पना होती. स. माधव बाजीरावाच्या साथीने आपल्यावर मात करण्यासाठी काही ना काही डाव रचणार किंवा असाच काहीतरी आततायी मार्ग स्वीकारणार हे सुमारे २० वर्षे स. माधवाचे पालन केलेल्या नानाला माहिती नसणार तर इतर कोणाला ? त्यामुळेचं त्याने पुढील सिद्धताही आधीच करून ठेवली होती. त्यानुसार परशुरामभाऊला नानाने सांगितले की, मृत्यूपूर्वी पेशव्याने आपणास दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पेशव्यांच्या शकावलीनुसार स. माधवाने आपल्या मागे दादाच्या पुत्रास पेशवेपद द्यायला सांगितले होते. या ठिकाणी शकावलीपेक्षा परशुरामभाऊचे पत्र अधिक विश्वसनीय मानता येईल. 

                पेशवे शकावलीतील नोंद कोणी व कधी केली याची मला माहिती नाही. मरणोन्मुख -- जिने जीवाला वैतागून शोभेच्या राज्याच्या मालकीचा व जीवनाचा त्याग केला आहे -- ती व्यक्ती आपल्या मागे राज्याचा वारसा कोणाला द्यायचा याची उठाठेव का करेल ? शकावलीकारास बाजीराव - माधवराव यांच्यातील संबंधांची माहिती होती आणि त्यास अनुसरूनचं याने शकावलीत नोंद दिलेली आहे. नाहीतर, नानाची माणसे पेशव्याच्या सभोवती असताना शकावलीकारास तेवढी वेगळी माहिती कशी मिळाली ? स. माधवाची जर अशीच इच्छा असती तर त्याने तुकोजीला तसे का सांगितले नाही ? असो, नानाने जे परशुरामभाऊस सांगितले ते देखील पूर्णतः सत्य आहे असे मानता येत नाही. दत्तकाच्या उठाठेवीस जोर यावा याकरिताच त्याने हे सर्व संवाद रचल्याचे उघड आहे. मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यास तसेही सर्व तत्पर असतात हे नाना ओळखून होता. त्यामुळेचं त्याने हा बनाव केला. परंतु, नानाचा हा डाव पूर्णतः सफल झाला नाही हे पटवर्धनांच्या पत्रांवरूनच स्पष्ट होते. शिंदे - होळकर आणि इतरांना रघुनाथाच्या वंशजाशिवाय इतरांस पेशवेपद मिळावे हे मंजूर नव्हते. औरस वंशाचा हक्क डावलणे हे त्यांना मान्य नव्हते. 

           तात्पर्य, दत्तकाविषयीची आपली पर्यायी योजना नानाने आधीचं आखलेली होती. नारायणाच्या खुनानंतरची स्थिती व आताची परिस्थिती यांत विलक्षण साम्य आहे. एकात हत्या तर दुसऱ्यात आत्महत्या ! फरक फक्त इतकाच आहे की, त्यावेळी बारभाई मंडळ अस्तित्वात असल्याने कार्य सिद्धीस गेले तर यावेळी सर्व अधिकार नानाने स्वतःच्या हाती राखल्याने त्याचा बेत सिद्धीस जाण्यास सुरवातीपासूनचं अडथळे उभे राहिले. असो, हा पुढील भाग झाला खरा, पण स. माधव नाहीसा झाला तर काय करायचे हे नानाने आधीच ठरवले होते हे अस्सल पत्रांवरून सिद्ध होते एवढे निश्चित ! 

          पेशव्यांच्या इतिहासातील सदाशिवरावभाऊच्या तोतयाचे  प्रकरण या ठिकाणी संदर्भांसाठी वाचकांनी लक्षात घ्यावे. त्या प्रकरणात ज्याप्रमाणे एकदा हाती सापडलेली व्यक्ती हि खरी सदाशिवराव आहे कि तोतया याविषयी जसे सहेतुक मौन बाळगून त्याच्या खरे - खोटेपणाविषयी ज्याप्रमाणे बातम्या उठवण्यात आल्या, तसाच काहीसा प्रकार स. माधवाच्या बाबतीत झाला आहे. त्याला वायू झाला, वाताच्या भिरडीत त्याने गच्चीतून खाली उडी टाकली अशी भूमिका एकदा उठवल्यावर पुढे तीच कायम ठेवण्यात आली आणि मरणोन्मुख व्यक्तीने ' आपल्या मागे दत्तक घ्या ' असे सांगितल्याचा प्रचार करण्यात आला. मात्र, हे सर्व करताना पेशव्याच्या आत्महत्येच्या तपशीलांत बऱ्यापैकी विसंगती निर्माण झाली व हि विसंगती मुद्दाम करण्यात आली किंवा अजाणता झाली असे नाही तर एक खोटं रचल्यावर त्याच्या समर्थनार्थ शंभर खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात, तद्वत पेशव्याने वाताच्या भिरडीत कसा आत्महत्येचा उपद्व्याप केला हे सांगताना, कधी तो एकटा होता तर कधी एक सेवक हजर होता तर कधी त्याचा सर्वांच्या उपस्थितीत तोल गेला अशा कथा रचण्यात आल्या. 

           या ठिकाणी मी हे देखील कबूल करतो की, श्री. पांडुरंग रानडे यांनी या घटनेचे विश्लेषण करताना, नानाने स. माधवरावास आत्महत्या करण्यास परिस्थिती निर्माण केल्याचा जो सिद्धांत मांडला आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होणार आहे याची नानास पुरेपूर कल्पना होती. स. माधवराव आत्मघात करण्याचा आततायीपणा देखील करू शकतो याचीही त्यास जाणीव होती. पण जी गोष्ट त्याच्या फायद्याची होती ती तो कशाला टाळेल ? 

          सारांश, उपलब्ध पुराव्यांवरून जरी स. माधवरावाने पूर्ण भानावर असताना स्वतःहून गच्चीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी त्यांस असे आततायी पाऊल उचलण्यास भाग पडावे अशी नाना फडणीसने परिस्थिती निर्माण केली होती हे विसरता येत नाही. ज्याप्रमाणे खुनी इसमास शस्त्र पुरवणारी व्यक्ती त्या खुनात, खुनी इसमाइतकीच दोषी असते ; त्याचप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त करणारी वा तशी परिस्थिती निर्माण करणारी व्यक्ती देखील प्रत्यक्ष खुनी इसमाइतकी -- निदान खुन्यास शस्त्र पुरवणाऱ्या एवढी व्यक्तीएवढीचं दोषी असते. तात्पर्य, अस्सल पत्रे स. माधवरावाने आत्महत्या केली असे सांगत असली तरी त्याने आत्महत्या करावी असे वातावरण व परिस्थिती नाना फडणीसने निर्माण केली होती हे विसरता येत नाही. त्यामुळेचं नाना फडणीस हा सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्यूस कारणीभूत आहे असे म्हणण्यापेक्षा बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसने स. माधवरावाचा खून केला असेच म्हणावे लागेल. 
                
                     


                                           

संदर्भ ग्रंथ :- 

१) मराठी रियासत ( खंड ५ ते ७ ) :- गो. स. सरदेसाई 
२) ऐतिहासिक लेखसंग्रह ( खंड ९ ) :- वा. वा. खरे 
३) नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ? :- पांडुरंग गोपाळ रानडे 
४) नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे 
५) मराठ्यांचा इतिहास ( साधन परिचय ) :- संपादक - प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक 
६) मराठ्यांचा इतिहास ( खंड - ३ ) :- संपादक - ग. ह. खरे, अ. रा. कुलकर्णी
७) मराठेशाहीतील वेचक वेधक :- य. न. केळकर 
८) भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :- य. न. केळकर   
                                         ( समाप्त )    
                                              

                  


       

३ टिप्पण्या:

Tolemama म्हणाले...

Aprateem Analysis

Tolemama म्हणाले...

Aprateem Analysis. You have put a lot of thought and analysis here and all seems to be correct and logical

Unknown म्हणाले...


एकंदरीत सर्व बाजूंनी विचार केला तरी नाना फडणीस खुन केला असे वाटत नाही.