रविवार, २९ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ९ )

   

       बाजीरावाची धडपड :- खर्ड्याची मोहीम आटोपून स. माधव पुण्यास परतला. तेव्हा एक नवीन वादळ त्याची वाट पाहत थांबले होते. जुन्नर मुक्कामी रघुनाथरावाचे तिन्ही पुत्र नानाच्या नजरकैदेत होते. त्यांच्या बंदोबस्तास्तव असलेल्या बळवंतराव नागनाथ वामोरीकर या नानानेच नियुक्त केलेल्या सरदारास बाजीरावाने आपल्या पक्षास वळवून घेतले. रघुनाथपुत्र  बाजीरावाचा जन्म दि. १० जानेवारी १७७५ चा असून या समयी तो २० वर्षांचा होता आणि आपण कोण आहोत व आपले महत्त्व काय आहे याची त्यास पुरेपूर जाण होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजीरावाची आई आनंदीबाई हिचे नुकतेच -- ता. १२ मार्च १७९४ रोजी निधन झाले होते. सालबाईच्या तहापासून रघुनाथराव व त्याचा परिवार नानाच्या नजरकैदेत होता. इतक्या दीर्घ कालावधीत रघुनाथरावाच्या परिवाराचे नानाविषयीचे मत किती कलुषित झाले असेल याची आपण कल्पना केलेली बरी ! असो, या पार्श्वभूमीवर बाजीरावाच्या कारवायांकडे आपणांस पहावयाचे आहे. महादजी शिंदे जेव्हा पुण्यास आला तेव्हा त्याने पेशवे घराण्याच्या चालीनुसार तख्तनशीन पेशव्याचा कारभार पेशवे घराण्यातील व्यक्ती करत असे, या प्रथेचा उल्लेख करून बाजीरावास कारभारात घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. किंबहुना, रघुनाथराव - महादजी यांच्यात  याविषयी जो करार झाला होता, त्याला अनुसरूनच महादजीने हि बोलाचाल आरंभली होती. या सर्व घटनांची कल्पना बाजीरावास कितपत होती याची माहिती मिळत नसली तरी यापासून तो सर्वथा अनभिज्ञ होता असे म्हणता येत नाही. इकडे वारंवार बाजीरावाचे नाव चर्चेत येऊ लागल्याने स. माधवास आपल्या चुलत्याविषयी एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले. त्याशिवाय जे काही घडले ते मागील पिढीत झाले. त्यामध्ये बाजीराव आणि  त्याच्या बंधूंचा काय दोष असाही पेशव्याच्या मनी विचार आला असावा. इकडे दरबारात व पुणे शहरात वेळप्रसंगानुसार रघुनाथरावाचे समर्थक बाजीरावाचे गुणविशेष प्रसिद्ध करत होतेच. या सर्वांचा असा परिणाम झाला कि, स. माधवास बाजीरावाशी पत्रोपत्री संधान जुळवण्याचा मोह पडला व त्याने बळवंतराव वामोरीकराच्या मार्फत तो प्रयत्न केला. परंतु, एक - दोन चिठ्ठ्यांची देवाण - घेवाण होते न होते तोच याची बातमी नानास लागली व त्याने बळवंतरावास कैदेत टाकून एकांतात पेशव्यास चार शब्द सुनावले. या घटनांच्या तारखा अजून तरी मला उपलब्ध न झाल्याने याविषयी अधिक काही लिहिणे या ठिकाणी शक्य नाही.

            स. माधवरावाची अखेर :- उपलब्ध माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पेशव्याची प्रकृती व वर्तन दोन्ही सुरळीत होते. खर्ड्याच्या मोहिमेत सहभागी झालेला रघुजी भोसले यावेळी पुण्यात होता व दसऱ्याआधी तो नागपुरास रवाना झाला होता. नवरात्राच्या सुमारास पेशव्यास ताप येऊ लागला होता, इथपर्यंत वासुदेव खरे लिखित नाना फडणवीस चरित्रातील माहितीवर विश्वास ठेवता येतो. पण त्यांनी दिलेली पुढील माहिती मात्र काहीशी विवादास्पद आहे. "  नवरात्रात श्रीमंतांस ज्वर येऊ लागला व  त्या ज्वरानंतर त्यांस वेडाचे झटके येऊ लागले. वाताच्या लहरीत त्यांच्या हातून भलतेच काही न घडावे म्हणून रात्रंदिवस त्याच्याभोवती पहारा असे."   हे अवतरण किंवा हि माहिती स्वीकारता येत नाही. कारण, स. माधवास ताप आल्यावर तो काही बडबडत असे वा त्यांस वाताचे झटके येत असा पूर्वीचा दाखला कोणताही इतिहासकार देत नाही. तसेच वाताचे झटके आणि वेडाचे झटके यांत जमीन - अस्मान इतका फरक असतो. असो, सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत खंड - ७ मध्ये अशी माहिती दिली आहे की, भाद्रपद महिन्यापासून पेशवा आजारीच होता. त्यांस वारंवार ताप येत होता. ता. २३ ऑक्टोबर १७९५ रोजी विजयादशमी होती. त्या दिवशीही पेशवा आजारी असून त्याची प्रकृती क्षीण झाल्याने त्यास बऱ्यापैकी अशक्तपणाही आलेला होता. तरीही दसऱ्याच्या दरबारास त्याने हजेरी लावली. तसेच संध्याकाळी हत्तीवरून शमीपूजनास तो निघाला असताना त्यांस अंबारीत धडपणे बसताही येत नव्हते. तेव्हा आपा बळवंतने त्यास शेल्याने अंबारीस बांधले व वाड्यात परत आणले.

                         स. माधवरावाची शरीरप्रकृती नेमकी कशी होती याविषयी  स्पष्ट आणि निश्चित अशी माहिती मिळत नाही. मैदानी खेळांची त्यांस आवड असली तरी लांबवरचे प्रवास त्यास झेपत होते कि नाही हा प्रश्न उद्भवतोचं ! त्याच्या हयातीत त्याने खर्ड्याला लावलेली हजेरी हा त्याचा सर्वात मोठा दूरचा प्रवास होता. हवा - पाण्याचा बदल त्यास त्यामुळे मानवला कि नाही हा प्रश्न म्हणूनचं उद्भवतो. कारण, त्याला या मोहिमेनंतरच ताप येऊ लागला हे स्पष्ट आहे. मात्र, यापूर्वी किंवा त्यास ताप येत असताना बाजीरावाचे प्रकरण घडून गेले असावे हे विसरून चालता येत नाही. पण त्यास कितपत महत्त्व द्यावे हा देखील एक प्रश्नचं आहे ! अर्थात, एक गोष्ट स्पष्ट आहे की, पेशवा याच काळात जबरदस्त निराशाग्रस्त झाला होता. तापातून आलेला अशक्तपणा हा मनस्तापाचा देखील अप्रत्यक्ष परिणाम असू शकतो ! सरदेसाई यांनी दिलेली माहिती पाहता, दसऱ्याच्या दिवशी दरबारास पेशव्याची हजेरी जरी अत्यावश्यक असली तरी शमीपूजनाचा कार्यक्रम नानाने टाळायला हवा होता असे माझे मत आहे. पेशव्याच्या प्रकृतीची नाना इतकी जास्त कल्पना इतर कोणाला असणे शक्य नाही. अशा परिस्थितीत स्वतःचा तोलही सावरता न येण्याइतपत अशक्त झालेल्या पेशव्यास दिवसभर दरबारी कामकाजात थांबवून घेणे आणि मग शमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे हि नानाची एकप्रकारे जबरदस्तीचं म्हटली पाहिजे. दसऱ्याचा समारंभ जसातसा पार पडला आणि ता. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी सकाळच्या पहिल्या प्रहरी शनिवारवाड्यातील गणपतीच्या दिवाणखान्याच्या माडीवरील राहत्या खोलीतून पूर्वेकडील कवाड उघडून त्याने खाली उडी टाकली. 

                   इथपर्यंतची माहिती खरे, सरदेसाई, य. न. केळकर यांच्या लेखांमधून घेतली आहे. यापुढे आता उपरोक्त त्रिकुटाच्या माहितीवर विसंबून राहणे धोक्याचे आहे. ते का व कसे हे पुढील भागात स्पष्ट होईलंच. स. माधवाचा हा अपघात व त्याचे निधन याविषयी तत्कालीन अस्सल पत्रांत व लेखांत माहिती मिळते तीच या ठिकाणी देत आहे. 

             ऐतिहासिक लेखसंग्रह खंड - ९ :-   प्रथम एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करणे योग्य होईल कि, सदर लेखसंग्रहातील पत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव खरे यांनी संपादित केली असून ती सर्व पटवर्धन दप्तरातील आहेत. 

१} नं. ३६४४                      २६ ऑक्टोबर १७९५

                        श्री
              श्रीमंत राजश्री बाळासाहेब स्वामींचे सेवेशी.
   विनंती सेवक धोंडो बापूजी जोशी. दोन्ही कर जोडून त्रिकाळ चरणांवर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना तागायत आश्विन शु. १३ तिसरा प्रहरपावेतों सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील सविस्तर पेशजी चंदा सांडणीस्वार याजबरोबर लिहून पाठविले होते. दसऱ्याच्या सुमारे येऊन पावला असेल. श्रीमंत राजश्री रावसाहेब यांजला शरीरी समाधान नव्हते. औषधी उपाय चालत होते. चित्ताची स्थिरता अलीकडे नव्हती. आश्विन शु. १२ रविवारी दोन तीन घटका दिवस सुमारे. श्रीगणपतीचे दिवाणखान्यावर माडीवर राव निजत होते तेथून पूर्वेचे अंगचे कवाड उघडून खाली उडी टाकिली. खाली कारंज्याचा हौद होता त्यांत पडले. दातांस व हातांस व गालास व पाय इतके लागले. परंतु पाय भारी दुखावला. आंतील हाड मांडीजवळ मोडले. कांबी लावून बांधिले. फार पायाचे दुःख आहे. हे सर्व मजकूर राजश्री बाळाजी विष्णु सहस्त्रबुद्धे व विसाजी नारायण  वाडदेकर याणी वाड्यांत जाऊन रुबरु राव याजला पाहून वडिलांकडे वर्तमान कच्चे लिहून पाठविले असेल. राव यांची प्रकृति ठीक नाही. देवी मानवी उपाय बहुत होत आहेत. श्रीहरी आरोग्य करील. बहुत काय लिहिणे सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. 
==============================================

२]  नं. ३६४५           आश्विन शु. १४ -- २७ ऑक्टोबर १७९५   
  परशुरामभाऊंकडून बाळसाहेबांस पत्र. रवाना छ. १५ रविलाखर सीत तिसैन ---
“ सरकारचे पत्र फौजेची तयारी करून जलदी निघून यावे म्हणून आले आहे. आपलेही नांवे लखोटा आहे.”
==============================================

३] नं. ३६४६                        २९ ऑक्टोबर १७९५
 
               धोंडो बापूजी जोशी यांचे बाळासाहेबांस पत्र पुण्याहून आश्विन व।। २ चे ------
  “ आपण जिन्नस खरेदी करून पाठविण्याविषयी लिहिले, त्यास कैलासवासी रावसाहेब आश्विन शु।। १४ मंगळवारी गजराचे वेळेस देवाज्ञा जाहले. चौकी पहारे बंदोबस्त पत्री काय लिहूं ? शेटी पवार व संताजी जासूद यांणी पाहिला आहे. दुकाने बंद. रस्त्यांतून कार्यकारण मनुष्य फिरते. यास्तव जिन्नस घेण्याचे तूर्त राहिले. “ 
==============================================
 
४] नं. ३६५०              आश्विन व. ९ ---- ५ नोव्हेंबर १७९५

                         श्री 
 
          चिरंजीव राजश्री बळवंतराव यांसी प्रती परशुराम रामचंद्र. आशीर्वाद. ……… ……… ……… ते बुधवारच्या सकाळच्या सहासात घटका दिवसास शिवऱ्याजवळ आलो. तेथे स्नानसंध्या करून अस्तमानी शहरानजीक पोंचलों. आवशीच्या नऊ घटका रात्रीस सुवेळ होती. त्या समयीं राजश्री नाना यांजकडे जाऊन मग आपल्या ठिकाणास वाड्यांत आलों. चिरंजीव राजश्री हरिपंत बाबा यांस लोकांसुद्धां वसंतबागेजवळ उतरविले आहे. चिरंजीव राजश्री रघुनाथराव दादा अद्यापि आले नाहींत. येतील. श्रीमंत आमरणांत बोलत होते. बोलून चालून राजश्री नानांस सांगितले, “ आमची वेळ जवळ आली. आम्हांस राज्याची इच्छा नाही. तुम्ही आमचे नांवाचा दुसरा करणे. आपण सूर्यमंडळ भेद करून जातो ” अशी अनेक प्रकारची अन्यांजवळ # भाषणे केली. ते समयी कोणास खरी वाटली नाहींत. आता सर्वांस वाटते ! असो. त्यांनी आपला अवतार समाप्त केला. आतां पुढे हे विवंचना करितात ! आमचे दर्शन ## मात्र जाहले. पुढे काय लिहिणे लोभ कीजे हे आशीर्वाद.

चिन्हांचा खुलासा :- (१) # - अन्यांजवळ चा अर्थ इतरांजवळ असाही होतो आणि हरीपण फडकेचा मुलगा मोरोपंत याचे टोपण नाव ‘ अन्या ‘ होते, कदाचित हा उल्लेख त्यास उद्देशून असावा. (२) ## - दर्शन नानाचे. [टीप - खुलासा खरे यांचा.]
==============================================


५] नं. ३६५६                कार्तिक शु. १५ --- २६ नोव्हें. १७९५
      
                         श्री      
        पै।। छ. १३ जमादिलावल. सीत तिसैन. कार्तिक पौर्णिमा.
सेवेशी नीलकंठ आपाजी. विज्ञापना. स्वामींनीं स्वदस्तूरचे पत्र पाठविलें ते पावले. मजकूर समजला. …… …… …… …… श्रीमंतांनी आपला काल समीप आला असे जाणून श्रीमंत बाईसाहेबांस काही गोष्टी सांगितल्या, व आणखी कित्येकांजवळ कित्येक भाषणें जहाली, त्याची बखर होत आहे. एक दोन रोजांत स्वामींजवळ येईल. किती लिहिले असतां गोष्टी संपावयाच्या नाहींत. त्यांतील हांसील कलमवार तयार करण्याकरितां श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांनी आज्ञा केली आहे. लवकरच येईल. प्रस्तुतचा मजकूर दत्त आणावा अशी गोष्ट ठरली. येविशीचे परवां लिहिले आहे त्याजवरून समजेल. विदित होय हे विज्ञापना.
==============================================

६] नं. ३६५७         श्रीगणपति  ( कार्तिक शु. १५ -- २६ नोव्हें. १७९५ )
          पै।। छ. १७ जमादिलावल. सन सीत तिसैन.
  चिरंजीव राजश्री बळवंतराव यांसी प्रती परशुराम रामचंद्र आशीर्वाद उपरी. पुढे कर्तव्यतेचा मजकूर ठरावांत आला तो परवां लिहिला आहे. मुलाचा शोध श्रीवर्धन व केळसी व वरसई व वसई येथे करविला. त्यास दहा मुले तीन घराण्यांत आहेत, त्यांपैकी सहा जणांच्या मुंजी जाहल्या आहेत. चौघांच्या मुंजी जाहल्या नाहींत, अशी बातमी आली आहे. मुलांस आणावयाकरितां पालख्या व घोडी वगैरे सामान सरकारांतून रवाना जाहले आहे. येथें आल्यावर त्यांतून कोणाचा निश्चय होतो पहावें. ठरेल ते लिहून पाठवितो. श्रीमंतांनी माडीवरून पडावयाचे पूर्वी भाषण कोणाकोणाजवळ केलें तें व माडीवरून पडल्यानंतर बोलिले तें कोणीं कोणीं येउन सांगितले तें अलाहिदा कलमवार लिहिलें आहे. त्यावरून कळेल. त्याची नक्कल करून चिरंजीव राजश्री रामचंद्रपंत आपा यांजकडे पाठवावी. गोष्ट चमत्कारिक आहे. कृष्णावतारसमाप्तीसारखे केले ! परम आश्चर्य आहे ! रवाना. छ. १३. जमादिलावल. बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती. 
==============================================
==============================================
  
  मराठी रियासत खंड - ७ :-  १]   ता. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी स. माधवास अपघात झाल्यावर तुकोजी होळकर त्याच्या भेटीस गेला होता. त्याने या भेटीचे वृत्त आपल्या मुलास -- काशिराव होळकरास पत्राद्वारे लिहून कळवले ते पत्र खालीलप्रमाणे :- 
  
    आज शुद्ध १२ रविवारी श्रीमंत मुखमार्जन करून गणपतीचे दिवाणखान्यावरील माडीवर प्रातःकाळचा चार घटका दिवस आला ते समयीं कठड्याशी टेकून बसले होते. समीप त्यांची आजी ताईसाठीं, शागीर्द व खिजमतगार वगैरे मंडळी असतां, श्रीमंत उठून उभे ठाकले, तों भोंड येऊन सावर न धरितां, खाली दक्षिणेकडे कारंजी हौद आहेत, तेथें येऊन पडले. दोन घटका बेहोष होते. नंतर सावध होऊन बोलूं लागले. ईश्वरे कृपा केली, बचाव जाला.  
==============================================

 २] पेशवे शकावलीमधील नोंद मराठी रियासतमध्ये देण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे :- 

 खर्ड्याहून आल्यावर श्रीमंत पर्वतीखाली रमण्यांत जाऊन घोडी फेरू लागले व हत्तीच्या वगैरे लढाया लावूं लागले. भाले, बोथाट्या खेळून हरणामागे शिकारीस जात होते. कारभारी नाना यांनी नवी पेठ वसवून हनमंत पेठ ठेविले, ( तिचे नाव हल्ली नानाची पेठ चालते.*) विजयादशमीचा उत्सव करून आल्यानंतर द्वादशीस दिवाणखान्यांत असतां अकस्मात मेघडंबरी बंगल्याचे पायरीवरून कारंजाचे नळीवरून खाली पडले. कोजागरीचे दिवशी सावध असतां कारभारी यांस बोलावून म्हणो लागले की, आमचे शरीराचा भरंवसा नाही, दादासाहेबांचे पुत्रास आणवावे, तों सायंकाळी अवतार समाप्त जाला. 
==============================================

३] बाळाजी रघुनाथ व केशवराव कोंडाजी यांनी हैद्राबाद दरबारातील पुणे दरबारच्या वकिलास --- गोविंदराव काळे यांस प्रस्तुत घटनेची माहिती पत्राद्वारे कळवली. ते पत्र खालीलप्रमाणे :- 

 द्वादशीचे दिवशी श्रीमंतांस ज्वरांशांत वायू झाला होता. प्रातःकाळी गणपतीचे दिवाणखान्यावर रंगमहाल आहे, तेथें निद्रेचे स्थान, तेथें गेले. पलंगावर बसले होते. वायूचे भिरडीत, काय मनास वाटले न कळे, पलंगावरून उठून दक्षिणेकडील खिडकीत उभे राहिले. खिजामतगार याने शालेस हात लाविला की, येथे उभे राहणे ठीक नाही. तों एकाएकीं तेथून उडी टाकिली. खाली दीड भाला खोल कारंजी हौद आहे, तेथें कांठावर पडून आंत पडले. उजवी मांडी मोडून हाड बाहेर निघालें. दांताची कवळी पडली. नाकावाटे रक्त निघाले. तेथून उचलून नानांनी ऐने महालांत नेले. तबीब आणून हाड बसवून, टाके देऊन शेक केला. चहूं घटकेनंतर शुद्धीवर येऊन डोळे उघडले. वायूचा प्रकोप होताच. कांही सावध होऊन बोलत. कांही वेळ भ्रंश होऊन बोलत, आश्विन शुद्ध १४, सात घटकांनंतर पौर्णिमा मंगळवार, ते दिवशीं प्रथम घटका रात्रौ कैलासवासी जाले. म्हणोन बाळाजी रघुनाथ व केशवराव कोंडाजी यांचे पत्र मुक्काम हैदराबाद येथें आले. 
==============================================


भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :-  श्री. य. न. केळकर लिखित या ग्रंथात काव्येतिहाससंग्रहातील ले. ३३२ मधील सवाई माधवरावच्या अपघाताविषयी नोंद देण्यात आली आहे ती येथे देत आहे :- 
          सन सीत तिस्सैन. खासा आश्विन शु. १२ माडीवरून पडून अत्यस्वस्थ झाले. ते शु. १५ कैलासवास केला. राज्याचा शेवट नानासाहेबांचे वंशाचा झाला. ब्रह्मप्रळय होईल रावसाहेब बोलले. त्याप्रमाणे पुढे निदर्शनास आले. 
==============================================

   येथून पुढील भाग म्हणजे किचकट विश्लेषणाचा असून अनेक वाचकांना तो कंटाळवाणा भासणार आहे पण ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेताना किंवा त्यांचे विश्लेषण अभ्यासताना कधी - कधी हा किचकट आणि कंटाळवाणा वाटणारा भाग देखील वाचावा / अभ्यासावा लागतो याची त्यांनी आपल्या मनाशी नोंद घ्यावी हि विनंती !
                                      ( क्रमशः )   
  
   


            

     

    

 

 

 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: