शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ८ )


      लाखेरीची लढाई :-   स. १७९२ च्या ऑक्टोबर मध्ये होळकर - शिंद्यांची एक झुंज घडून त्यात होळकर पराभूत झाले. तेव्हापासून महादजी व तुकोजी वरकरणी पुणे दरबारास ' आमच्यात समेट करून द्या ' असे म्हणत असले तरी उभयता लढाईची कसून तयारी करत होते. खुद्द नाना व हरिपंत वरवर या दोन सरदारांत गोडी निर्माण होण्यासाठी मध्यस्थी करण्याचा देखावा करत होते. अखेर होता - होता मे महिन्यात लाखेरीच्या आसमंतात शिंदे - होळकरांच्या सेना समोरासमोर आल्या. तुकोजी जवळ पाराजीपंतासारखे होळकरशाहीतील अनुभवी मुत्सद्दी होते. त्यांनी तुकोजीला संग्राम टाळण्याची विनंती केली, पण याच सुमारास तुकोजीचा मुलगा मल्हारराव हा इंदूरहून बापाच्या मदतीस आला. त्यास पाराजीपंताचे सामंजस्याचे धोरण पटले नाही. त्याने बापाला युद्धाचा सल्ला दिला. तेव्हा ता. २८ मे १७९३ रोजी लाखेरीजवळ उभय फौजांचा  सामना जुंपला. दोन्ही पक्षात घोडदळ व पायदळ पलटणांचा भरणा होता. त्याशिवाय जोडीला अद्ययावत तोफखानाही असून, विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दोघांच्याही कवायती पलटणींचे सेनापती फ्रेंच होते. शिंद्यांचा डीबॉईन तर होळकरांचा ड्युड्रनेक ! आरंभी किरकोळ चकमकी घडून ता. १ जून रोजी लाखेरीची मुख्य लढाई घडून आली. युद्ध मोठे निकराचे होऊन अखेर होळकरी सैन्य पराभूत होऊन मागे हटले. खासा मल्हारराव बंदुकीच्या गोळीने जखमी झाला. लढाईच्या वेळी तुकोजी रणभूमीपासून बराच दूर होता. त्यास पराभवाचे वर्तमान समजताच त्याने रागाच्या भरात शिंद्यांची उज्जैन लुटून घेतली. 

               लाखेरीच्या संग्रामाची बातमीपत्रे पुण्यास येऊन पोहोचल्यावर नाना व महादजीच्या गोटात बरीच खळबळ माजली. आता शिंद्यांशी नरमाईचे धोरण स्वीकारल्याखेरीज नानासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता. इकडे शिंद्यांचीही काही चांगली परिस्थिती नव्हती. होळकर पराभूत झाले असले तरी त्यांची फौज मोडली नव्हती. स्वतः अहिल्याबाई तुकोजीसोबतचे मतभेद विसरून सैन्याची जमवाजमव करू लागली होती. लाखेरीच्या युद्धानंतर होळकरांची पराभूत फौज खेचीवाड्यात सरकू लागली होती तर त्यांच्या पाठी शिंद्यांची पथके लागली होती. इकडे पुण्यात पेशवा, नाना व हरिपंत यांनी महादजीसोबत बोलणी करून होळकरांशी मिटते घेण्याची सूचना केली. महादजीने देखील त्यास वरवर मंजुरी दिली. उत्तरेत होळकरांच्या समजुतीकरता सरकारचे हुजरे व बळवंतराव काशी कात्रे यांना पाठवण्याची तजवीज सुरु झाली. पाठोपाठ पेशव्यांचे विश्वासू वकील हिंगणे होळकरांकडे शिष्टाईसाठी जाणार होते. याच सुमारास बेदरला तळ ठोकून बसलेल्या निजामाने सैन्य भरतीस आरंभ केला असून त्याचे काही हस्तक पुण्यात येऊन मराठी फौजांत द्रव्य वाटप करून फितुरीचे कार्य करत असताना हस्तगत झाले. या सर्व पार्श्वभूमीवर केव्हातरी नाना - महादजी यांच्यात सख्य घडून आले खरे, पण यानंतर लवकरच महादजी तापाने आजारी पडला. यानंतरचा  त्याचा बहुतेक काळ आजारपणातच गेला. इकडे लाखेरीवर पराभूत झालेल्या होळकरी सैन्याने कोट्याजवळ शिंद्यांच्या पाच हजार फौजेचा व दोन कवायती पलटणांचा पराभव केल्याची वार्ता जुलै १७९३ मध्ये पुण्यास आली. कोट्याच्या लढाईनंतर महादजीने देखील नरमाई स्वीकारत पुणे दरबार सोबत मिळते - जुळते घेतले. सोबत्यांचा दम चमत्कार तो पुरेपूर ओळखून होता. आपल्या गैरहजेरीत आपले सरदार होळकरांचा संघटीतपणे तितकासा मुकाबला करू शकत नाहीत हे तो जाणून होता. तशात होळकरांना नानाचा --- म्हणजेच पर्यायाने पुणे दरबारचा पाठिंबा असल्याने त्याने आपला हात आवरता घेतला. यापुढे म्हणजे ता. १२ फेब्रु. १७९४ रोजी पर्यंत त्याच्या हातून विशेष असे काही कार्य घडून आले नाही. नानाने त्याच्यावर हिशेबाची बाकी दाखवली होती त्याचीही तडजोडीने वासलात लागली. शिंद्याने उत्तरेत कमावलेला प्रदेश त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याच्याकडेच राहावा असे ठरवण्यात आले. हिशेबाचा घोळ मिटताच महादजीच्या तक्रारी जवळपास संपुष्टात आल्या. या दरम्यान श्रावणमासाचा समारंभ होऊन त्यातही महादजीने सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे.

               खर्ड्याच्या मोहिमेची पूर्वतयारी :- पुणे दरबारातील वादळ शांत होत असताना इकडे निजामाची मात्र मोठी धामधूम सुरु झाली होती. नाना - महादजीची युती झाल्याने पुणे दरबारने निजामाकडे चौथाई व सरदेशमुखीच्या थकबाकीबद्दल तगादा लावण्यास आरंभ केला. अर्थात, पत्रोपत्री हा व्यवहार आधीच सुरु झाला असला तरी महादजी नानाच्या पक्षास मिळाल्याने पुणे दरबारची भाषा आता चढाईची बनली. पुणे दरबारच्या या चालीस तोड म्हणून निजामाने इंग्रजांना मध्यस्थीची विनंती केली. परंतु याच काळात हिंदुस्थानच्या इंग्रजी अधिकार मंडळात एक फेरबदल घडून आला होता. टिपूला लोळवणाऱ्या लॉर्ड कॉर्नवॉलिसची मुदत संपून सर जॉन शोअर हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बनला होता. इंग्लंडमधून त्यास कंपनी चालकांची स्पष्ट शब्दांत ऑर्डर होती की, एतद्देशीय राजकारणात गुंतून युद्धाच्या भानगडीत पडू नये. कॉर्नवॉलिसने अलीकडे टिपूसोबत केलेल्या युद्धात कंपनीला विजय मिळाला असला तरी त्यांचे आर्थिक नुकसान बरेच झाले होते. त्यामुळे शोअरने वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे ठरवून त्यानुसार पुणे व हैद्राबाद येथील आपल्या वकिलांना सूचना दिल्या. वस्तुतः, निजाम - पेशवे तंट्यात प्रत्यक्ष सहभाग न घेणेच इंग्रजांच्या हिताचे होते. इंग्रजांनी निजामाची मदत केली असती तर टिपू पुणे दरबारला मिळाला असता असे म्हटले जाते खरे, पण नुकत्याच झालेल्या इंग्रज - पेशवे - निजाम या त्रिवर्गाच्या चढाईत त्याचे बरेचसे लष्करी व आर्थिक नुकसान झाल्याने आपल्या राज्याच्या बाहेर पडून त्याने पुणे दरबारची  अशी किती मदत केली असती याचा विचार करणे गरजेचे आहे. निजाम - पेशवे यांच्या संघर्षात दोघांपैकी एकाने धुळीस मिळणे हे इंग्रजांच्या पथ्यावरचं पडणार होते. '  दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ' अशातील हि गत होती. 

            पुणे - हैद्राबाद - कलकत्ता अशी राजकीय पत्रे फिरत असताना ता. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे मरण पावला तर दि. २० जून १७९४ रोजी हरिपंत फडकेचे निधन झाले. पुणे दरबारचे हे दोन अनुभवी व लढवय्ये सेनानी अल्पावधीत मरण पावल्याने निजामाला जोर चढला  आणि त्याने इंग्रजांच्या मदतीची पर्वा न करता पुणे दरबारसोबतचा तंटा वर्दळीवर आणण्याचा निश्चय केला. अर्थात, याबाबतीत निजामापेक्षा  दिवाण गुलाम सय्यदखान यास अधिक खुमखुमी होती. गुलाम सय्यदखान यास मुशीरुन्मुल्क अशी पदवी असून याच नावाने तो इतिहासात प्रसिद्ध आहे. खर्ड्याची लढाई म्हणजे नाना व या मशीरचा तंटा असून दोघेही आपापल्या राज्याचे कट्टे अभिमानी असले तरी त्याबाबतीत मशीर हा नानापेक्षा सरस असल्याचे दिसून येते. असो, मशीरने निजामाला लढाईची भर दिली. पुणे दरबारला सालोसाल चौथाई व सरदेशमुखी देण्याऐवजी तोच पैसा लष्कर उभारणीस लावला असता पुण्यावर आपले नियंत्रण बसवता येईल अशी स्वप्ने त्याने निजामाला दाखवली. तेव्हा निजामाने हे प्रकरण वर्दळीवर आणण्याचे ठरवले पण अखेरपर्यंत त्याचे मन दोलायमान राहिले. त्याला वाटत होते की, इंग्रजांनी यात मध्यस्थी करून सन्मानजनक तोडगा काढावा. पण नानाला इंग्रजांची मध्यस्थी बिलकुल नको होती. टिपूचा शक्तिपात झाल्यावर नानाला दक्षिणेतील राजकीय सत्तासमतोल बिघडल्याची जाणीव झाली. अशा स्थितीत निजामाच्या तंट्यात इंग्रजांना मध्यस्थ करून त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान मिळावे हे त्यांस खपण्यासारखे नव्हते. त्यामुळे इंग्रजांना या प्रकरणांत हस्तक्षेप करणे अवघड झाले. त्यातच ब्रिटीश गव्हर्नर जनरल शोअरने या वादात अलिप्तपणाचे धोरण स्वीकारल्याने नानाला एकप्रकारे हायसे वाटले. वस्तुतः इंग्रजांना यावेळी निजाम व पेशवे यांच्यात मध्यस्थी करून आपले महत्त्व वाढवण्याची तीव्र इच्छा झाली होती. निजामाचे राज्य मोडकळीस आल्याचे त्यांना माहिती होते. आता फक्त पुणे दरबारास त्यांना गुडघ्यावर आणायचे होते. 

                   शिंदे - होळकरांच्या रक्तरंजित लढाया, महादजी - हरिपंत यांचे मृत्यू यांमुळे मराठी राज्य कमकुवत झाल्यासारखे भासत असले तरी अजून ते आपल्या पायावर समर्थपणे उभे होते. मराठी राज्याचा चालक सवाई माधवराव हा प्रचलित राजकारणात क्वचित लक्ष घालत असला तरी त्याच्यावर सरदारांची काही प्रमाणात निष्ठा होती. छत्रपती पेशव्यांच्या नजर कैदेत असले तरी पेशव्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची शक्ती नव्हती. पुणे दरबारची सर्व सूत्रे यावेळी नानाच्या हाती असून पेशवा त्याच्या मुठीत होता. शिंद्यांची बलवान सरदारकी महादजीच्या निधनाने नानाच्या अंकित झाली होती. शिंद्यांच्या नव्या वारसास -- दौलतरावास नानाची मनधरणी केल्याशिवाय पर्याय नव्हता. होळकरांच्या दौलतीत तुकोजी हयात असतानाच वारसा हक्कासाठी कलह लागल्याने ते घराणे देखील नानाच्या कह्यात गेले होते. अशा परिस्थितीमध्ये नानाला खुश ठेवण्यात आपले हित असल्याचे ताडून इंग्रजांनी नानाच्या मर्जीविरोधात निजामाच्या तंट्यात हस्तक्षेप करण्याचे नाकारले. इंग्रजांची हि दूरदृष्टी खर्ड्याच्या संग्रामानंतर त्यांच्या मदतीस आल्याचे दिसून येते. असो, इंग्रजांनी निजामाच्या प्रकरणी तटस्थता स्वीकारल्याने नानाने आपल्या मागण्या निजामास कळवल्या. त्यांचा प्रमुख आशय असा की, ' निजामाने आजवरची थकलेली चौथाई व सरदेशमुखीची बाकी एकदम चुकती करावी आणि इतउत्तर आपल्या सल्ल्याने कारभार करावा. ' पैकी यातील पहिली मागणी निजामाला मान्य होती, पण नारायणरावच्या खुनापासून ते पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात आपण पुणे दरबारला मदत केली तर त्याबदल्यात त्यांनी हा हक्क सोडून द्यावा अशी त्याची अपेक्षा होती. बाकी, पुणे दरबारच्या तंत्राने आपला कारभार चालवण्यास तो तयार नव्हता. कारण, असे केल्यास त्याचे स्वातंत्र्य ते काय राहिले ? या वादाचा निकाल समक्ष भेटीगाठीने व्हावा अशीही निजामाने इच्छा व्यक्त केली. इंग्रजांनीही  हि गोष्ट नानाने मनावर घेतली नाही. त्यातच निजामाच्या दिवाणाने भर दरबारात नाना व पेशव्याची सोंगे घेतलेल्या लोकांचा तमाशा घडवून आणला आणि पुण्यावर स्वारी करून पेशव्यांना हाती भिक्षापात्र घेऊन देशोधडीला पाठवण्याची वल्गना केली. हैद्राबाद दरबारातील मराठी वकील गोविंदराव काळेने घडला प्रकार नानास कळवल्यावर त्याने झटून युद्धाची तयारी चालवली. महादजी सोबत आलेली शिंद्याची पथके पुण्यात हजर होतीच. त्याशिवाय दौलतरावाने उत्तरेतील आणखी कवायती पलटणे व सैन्य दक्षिणेत आणले. तुकोजी होळकरास पुण्याला येण्याची पत्रे रवाना झाली. तसेच नागपूरकर भोसल्यांनाही मोहिमेत हजर राहण्याविषयी खलिते रवाना झाले. नाना फडणीसची पत्रे अहिल्याबाईस मिळाली तेव्हा तिने शिंद्याच्या बंदोबस्तासाठी नव्याने उभारलेली पथके व जुनी फौज तुकोजीसोबत देऊन त्यास दक्षिणेत रवाना केले. लाखेरीच्या युद्धात थोरल्या मल्हारराव होळकराच्या निशाणास जो डाग लागला आहे तो शिंद्याचा पराभव करून वा सरकारकाम करून धुवून टाकावा असे अहिल्याबाईचे मत होते. त्यामुळे पुणे दरबारच्या पत्रावरून तिने जय्यत तयारी केली. याव्यतिरिक्त दक्षिणेतील सर्व लहान - मोठ्या सरदारांना नानाने या स्वारीत सहभागी होण्याची आज्ञापत्रे काढली.

               खर्ड्याची लढाई व तह :- स. १७९४ - ९५ च्या नोव्हेंबर मध्ये बेदरहून पुढे येऊ लागल्याची बातमी येताच नाना फडणीस पेशव्यासह डिसेंबरात पुण्यातून बाहेर निघाला. विशेष खबरदारी म्हणून रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना नोव्हेंबर महिन्यातच आनंदवल्लीहून जुन्नरला आणून ठेवले. बेदरहून निघालेला निजाम पुण्याच्या रोखाने येत असल्याचे लक्षात येताच त्या अनुषंगाने मराठी फौजांची हालचाल होऊ लागली. नेहमीच्या प्रघातानुसार सर्व मराठी फौजा एकवटून न चालता आपापल्या मर्जीनुसार शत्रू जवळ करत होत्या. निजामाशी लढा जुंपणार हे आता उघड असले तरी नानाने या मोहिमेचे अधिकृतरित्या सेनापतीपद अजून कोणालाच दिलेलं नव्हतं. पुढे उभयतांच्या फौजा खर्ड्याजवळ समोरासमोर आल्या. या मोहिमेत उभयतांचे बलाबल सामान्यतः पुढीलप्रमाणे होते :- 
      पेशवे :- ८४ हजार घोडदळ, ३८ हजार पायदळ, १९२ तोफा 
      निजाम :- ४५ हजार घोडदळ, ४४ हजार पायदळ, १०८ तोफा

                   अर्थात, उभय  फौजांची हि आकडेवारी अगदी अचूक अशी नाही. परंतु, या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मराठी सैन्याची आकडेवारी व सरदारांची खानेसुमारी पाहता मराठी राज्याच्या इतिहासात पानिपत खालोखाल या स्वारीचा क्रमांक लागतो हे निश्चित ! पानिपत नंतर प्रथमच आणि शेवटचेच मराठी सरदार शत्रूविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले होते. काही दिवसांपूर्वी एकमेकांचे गळे कापण्यास आतुर झालेले शिंदे - होळकर आता निजामाच्या विरोधात लढण्यासाठी एकजूटीने उभे राहिले होते. मराठी सरदारांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांचे तटस्थपणे निरीक्षण करत इंग्रज वकील मॅलेट हा आपल्या भावी शत्रूचे गुण - दोष टिपून घेत होता. नानाने इंग्रजांना आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी मॅलेटला सोबत घेतले खरे, पण मॅलेटला पुणे दरबारची मजबुती न दिसता छिद्रे मात्र नजरेस पडली !  
                       असो, खर्ड्याच्या रणांगणात निजामाच्या फौजेची व मराठी सैन्याची ता. ११ मार्च १७९५ रोजी गाठ पडली. तत्पूर्वी केव्हातरी नानाने आपल्या अत्यंत विश्वासातील परशुरामभाऊ पटवर्धनास मोहिमेचे सरसेनापतीपद दिले. तसेच सैन्याची आघाडी देखील त्याने पटवर्धनांवर सोपवली. नानाच्या या युद्धनीतीचे अत्यंत मार्मिक शब्दांत वाभाडे काढण्याचे कार्य श्री. रानडे यांनी आपल्या नारायणराव पेशव्यांविषयी ग्रंथात केलेलं असल्याने याविषयी अधिक काही न लिहिलेलं बरे ! असो, खर्ड्याच्या लढाईत सरसेनापतीपद परशुरामभाऊला देण्याचा नानाचा निर्णय योग्य होता पण, खुद्द पेशवा स्वारीत हजर असताना त्यास मोहिमेचा सरसेनापती मानून परशुरामभाऊला दुय्यम पद दिले असते तर अधिक चांगले झाले असते. त्यामुळे मोहिमेच्या निकालावर काही फार पडणार नव्हता परंतु पेशव्याला काही प्रमाणात उमेद येऊन सैन्यावर देखील त्याची छाप पडली असती.  या गोष्टीचा नानाने विचार केल्याचे दिसून येत नाही. पानिपत मोहिमेत जसा विश्वासराव नामधारी सरसेनानी होता तसाच स. माधवराव या मोहिमेत राहिला असता. परंतु, नानाने हि गोष्ट शक्य असूनही घडून दिली नाही. अर्थात, हे त्याने हेतुपुरस्सर केले कि अजाणतेपणी त्याच्याकडून हि चूक झाली हे समजायला मार्ग नाही. याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सरसेनानी परशुरामभाऊच्या हाताखाली खासे भोसले, शिंदे, होळकर रणात उतरले नाहीत तर त्यांनी आपल्या वतीने पुढील अधिकारी भाऊच्या हाताखाली नेमले ते असे :- शिंदे - जिवबादादा व लखबाबा नाना ;  भोसले - विठ्ठलपंत सुभेदार ; होळकर - काशिराव व बापूराव होळकर. 
          खर्ड्याच्या युद्धाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये कवायती पलटणींचे नेतृत्व फ्रेंच अधिकाऱ्यांकडे होते.  निजामाचा रेमंड , शिंद्यांचा पेराँ तर होळकरांचा ड्यूड्रनेक ! उभय पक्षांचा प्रमुख लढा हा कवायती पलटणी व तोफखान्याच्या बळावर झाल्याने  गनिमी काव्याची लढाई  मराठी सैन्यावर आला नाही. 

                   खर्ड्याच्या लढाईविषयी जी अस्सल पत्रे मला उपलब्ध झाली, त्यातील माहितीवरून असे दिसून येते की, ता. ११ मार्च रोजी शत्रूची टेहळणी करण्यासाठी मोहीमप्रमुख परशुरामभाऊ हा आपल्या एका लहानशा पथकासह मुख्य सैन्यापासून खूप पुढे निघून गेला. दुसऱ्या बाजूला शत्रूही आपल्या फौजांची मांडणी करत होता. त्याने मराठी सैन्यसागरातून फुटून बरीच लांब आलेली हि लहानशी तुकडी पाहून तिच्यावर चाल केली. यावेळी भाऊचा पुतण्या विठ्ठलराव मारला गेला व त्याचे पथक उधळून मागे आले. या लहानशा चकमकीत खासा भाऊच्या कपाळावर देखील एक वार झाला होता. पटवर्धनांना माघार घ्यावी लागल्याचे पाहताच शिंद्यांनी आपला तोफखाना सुरु केला. तेव्हा पटवर्धनांवर चालून आलेली निजामाची पथके शिंद्यांकडे वळली. शिंदे - निजाम यांची झंगडपक्कड जुंपेपर्यंत होळकर, भोसले, हुजुरात यांनीही शत्रूवर हल्ला चढवला. दरम्यान, परशुरामभाऊने आपल्या पथकास सावरून परत एकदा रणात उतरवले. दिवसभर हातघाईचे व तोफांचे युद्ध होऊन अखेर सूर्यास्तास दोन - अडीच तास बाकी असताना निजामाची सेना पराभूत होऊन माघार घेऊ लागली. खासा निजाम खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रयास गेला. या संग्रामात शत्रूचे कित्येक लहान - मोठे सरदार व हजार - पंधराशे सैनिक मृत वा जखमी झाले. निजामाची फौज रणातून निघून गेल्यावर मराठी सैन्यातील पेंढाऱ्यांनी रात्र पडताच शत्रूच्या छावणीत प्रवेश करून हुल्लड माजवत काही तोफा व दारुगोळा लांबवला. इकडे रात्र पडल्यावर शिंद्यांनी आपला तोफखाना सुरु करून निजामाच्या सैन्याची बरीच दमछाक केली. या प्रसंगी स्वतः निजामाने दोनवेळा निरोप पाठवून तोफांचा मारा बंद करण्याची विनंती केली असे नानाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. पुढे दुसऱ्या दिवशी, म्हणजेच दि. १२ मार्च १७९५ रोजी दोन्ही बाजूंनी प्रामुख्याने तोफांची लढाई झाली. तेव्हा ता. १३ मार्च रोजी निजामाने प्रातःकाळी भाऊकडे जासूद पाठवून युद्ध थांबवण्याची विनंती करून तहाची वाटाघाट सुरु केली. यानंतर उभयपक्षी युद्ध तहकूब होऊन सलुखाची जी चर्चा सुरु झाली ती ता. १० एप्रिल १७९५ रोजी शेवटास गेली. 

                   खर्ड्याच्या तहाविषयी अनेक इतिहासकारांनी आपापली मते आजवर मांडली आहेत. त्यामुळे याविषयी प्रस्तुत ठिकाणी अधिक काही लिहिणे अनावश्यक आहे असे नाही, परंतु प्रस्तुत विषयास धरून ते होणार नाही. या तहाच्या बनावाविषयी काही गोष्टींची चर्चा मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. तहाच्या बोलाचाली सुरु झाल्या तेव्हा निजामाने पेशव्याच्या प्रत्यक्ष भेटीचा आग्रह धरला. पेशव्याची मुलाखत घेऊन त्यातल्या त्यात सौम्य अटींवर तहाचे प्रकरण निकाली काढण्याचा निजामाचा बेत होता. तर त्याचा फ्रेंच सरदार रेमंड यास मात्र तहापेक्षा युद्धाची अधिक खुमखुमी होती. त्याने निजामाकडे लढाईची परवानगी मागितली पण, निजामाने त्यास साफ नकार दिला आणि तहाचेच घोडे पुढे दामटले. यावेळी खर्ड्यावर गोळा झालेल्या मराठी सरदारांना निजामासोबत तह करण्यापेक्षा त्यांस साफ बुडवण्याची अधिक उत्कंठा होती. याविषयीचा उल्लेख खुद्द नाना फडणीसने बाबूराव आपट्यास लिहिलेल्या पत्रात आहे. परंतु असे असले तरी, नानाने सरदारांचे मानस बाजूला ठेवून वेगळीच वाट अवलंबली. निजामावर पूर्ण शह बसवण्याची हि संधी होती, अशा परिस्थितीत नानाने त्याच्याकडे पुढील प्रमुख मागण्या कळवल्या :- (१) मशीर यास दिवाण पदावरून दूर करणे. (२) चौथाई, सरदेशमुखीच्या बाकी बद्दल व सदर मोहिमेचा खर्च मिळून सुमारे ५ कोटी रुपये द्यावेत. (३) दौलताबादचा किल्ला दरबारास द्यावा. (४) भोसल्यांचे जे महाल निजामाने दाबले होते ते त्यांस परत देणे आणि त्यांच्या ऐवजाचा भरणा करणे.   हो, ना करत निजामाने या सर्व अटी मान्य केल्या. त्याचा दिवाण नानाहून अधिक धोरणी निघाला. तो स्वतःहून नानाच्या कैदेत जाण्यास तयार झाला. दौलताबादचा किल्ला व ३० लाखांचा मुलुख देण्याचे मान्य करण्यात आले आणि पाच कोट रुपयांपैकी ३० लाखांचा भरणा ताबडतोब करण्यात येऊन उर्वरीत रकमेच्या बंदोबस्तासाठी ३ वर्षांची मुदत मागितली. 

                      महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहाची हि वाटाघाट नानाने एकप्रकारे स्वबळावर व स्वस्वार्थावर नजर ठेवून केली. या तहात मराठी राज्याचे आणि पेशव्याचे कसलेही हित पाहण्यात आले नाही. तसेच ज्या पेशव्याच्या नावे नाना राज्यकारभार करत होता त्यास या तहात बिलकुलही सहभाग घेता आला नाही. तो फक्त शिक्क्याचा धनी राहिला ! उदगीरला ज्याप्रमाणे निजामाने आपले सैन्य रक्षून स्वतःचा बचाव केला होता तद्वतचं त्याने खर्ड्यालाही केले ! निजामाच्या सैन्याचा कणाटा मोडला असता तर निजाम एक संस्थानिक बनून राहिला असता किंवा नसताही !  समस्त मराठी सरदारांनाही निजामाचा हा काटा मुळापासून उखडून काढायचा होता हे नानाच्याच पत्रावरून स्पष्ट होते. मग असे असताना नानाने आपल्या सरदारांना सबुरीचे धोरण घेण्यास का भाग पाडले असावे ? या गूढाची उकल होणे अत्यावश्यक आहे.  

                   असो, स. माधवरावाने प्रत्यक्ष भाग घेतलेली हि पहिली आणि अखेरचीच स्वारी आहे. या मोहिमेत त्यास अभूतपूर्व असे म्हणता येत नसले तरी बऱ्यापैकी यश मिळाले असेच म्हणावे लागेल. निजामाचा दिवाण आपणहून मराठी शिबिरात दाखल झाल्याने कागदोपत्री तह होण्यास फार वेळ लागला नाही आणि विजयी सैन्य व शाही कैद्यासह सवाई माधवराव ता. १ मे १७९५ रोजी पुण्यास दाखल झाला. बाकी, खर्ड्याच्या युद्धात पुणे दरबारला फक्त ३० लाख रुपये आणि मशीरला काही काळ कैदी म्हणून पोसणे एवढेचं प्राप्त झाले. याउपर खर्ड्याच्या उठाठेवीचा मराठी राज्याला वा पुणे दरबारास कसलाही फायदा झाला नाही. 
                                                                          ( क्रमशः )            

   

    

                      

                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: