बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ७ )

 
                 मागील भागात आपण नाना - महादजी यांच्या वादाची पार्श्वभूमी थोडक्यात पाहिली. वस्तुतः नाना - महादजीच्या अखेरच्या शीतयुद्धाचा तो पहिला अंक होता. याच्या दुसऱ्या अंकात नाना - महादजी यांचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दरबारी सामना जुंपला. मात्र या वादात होळकरांचा काहीसा निष्कारण बळी गेला. स. १७८० मध्ये महादजीने जे माळव्यात प्रयाण केले, त्यानंतर तो स. १७९२ मध्येच पुण्यास आला. मात्र, तुकोजी होळकर काही ना काही निमित्ताने स. १७८७ पर्यंत पुणे दरबारशी संबंधित होता. याच काळात व यानंतरही काही वर्षे तुकोजी आणि अहिल्याबाईचा राज्यकारभारावरील हक्काच्या मुद्द्यावरून कागदोपत्री तंटा जुंपला होता. या तंट्यात आरंभी नाना कधी तुकोजी तर कधी अहिल्याबाईची बाजू घ्यायचा, पण नंतर महादजीचे वर्चस्व वाढत चालल्याचे ध्यानी येताच त्याने तुकोजीचा पक्ष स्वीकारला. होळकरांच्या घरगुती भांडणात पुणे दरबारच्या सांगण्यावरून आणि पूर्वापार स्नेहसंबंध लक्षात घेऊन महादजीने भाग घेतला आणि अहिल्याबाईचा पक्ष घेतला. तुकोजी व महादजीच्या चुरशीचे हे प्रमुख कारण होय !

       नानाला याची कल्पना असल्याने त्याने शिंदे - होळकरांच्या वादात तुकोजीचा पक्ष घेतला. परिणामी स. १७८७ मध्ये लालसोट प्रकरणी महादजीच्या मदतीस रवाना केलेले तुकोजी होळकर व समशेरबहाद्दरपुत्र अलीबहाद्दर हे मुद्दाम उशीरा उत्तरेत गेले. आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी महादजीच्या विरोधात राजकारण चालवले. त्याच्या विरोधात राजपुतांना भर देण्याचे कार्य त्यांनी केले. महादजीने स्वबळावर शत्रूचा पराभव केला खरा, पण यामुळे शिंदे - होळकरांतील दरी आणखीन रुंदावली. उत्तरेतील राजकारण आपल्या सरदारांवर व होळकरांवर सोपवून महादजी पुण्यास आला. बादशाही फर्मानांचा स्वीकार झाल्यावर त्याचे व नानाचे दरबारी भांडण सुरु झाले. त्यावेळी नानाने तुकोजीला शिंद्यांच्या उत्तरेतील सरदारांचा समाचार घेण्याची भर दिली. अर्थात, नाना व होळकर अशी काही चाल करणार याची महादजीला आगाऊ अटकळ होतीच. नानाची फूस मिळाल्याने होळकरांचे उत्तरेतील वर्तन चढेलपणाचे बनले. तेव्हा महादजीच्या परवानगीने शिंद्यांच्या सरदारांनी आक्रमणाचा बेत आखला. ता. ८ ऑक्टोबर १७९२ रोजी सवाई माधोपुर जवळ बनास नदीच्या दक्षिणेस सुरवली येथे शिंद्यांचा विश्वासू सरदार गोपाळराव भाऊ याने तुकोजी होळकरवर हल्ला चढवला. लढाई निकराची झाली पण होळकरांना शेवटी पराभूत व्हावे लागले. याविषयी स. १७९३ च्या १३ जानेवारी रोजी यशवंत गंगाधर यांस लिहिलेल्या पत्रात तुकोजी लिहितो की, “ आम्ही आजपावेतो सरकारची आज्ञा उलघन केली नाही. त्याजकडून ( शिंदे ) दगा जाला असता, उतावली करू नये, आसी पत्रे येत गेली. त्यावरून तीन मास येथेच दम खाऊन चिरंजीव बापूंसही इकडे बोलावून घेतले.” यावरून स्पष्ट होते की, शिंद्याने प्रथम चाल करून होळकरांना दुखावले. अर्थात, हे प्रकरण एखाद - दुसऱ्या चकमकीने निकाली निघायचे नव्हते. या  पुण्यास पोहोचली त्यावेळी नाना - महादजीचा दरबारी वाद हळूहळू रंगात येऊ लागला होता. नानाने शिंद्यांकडे आजवर केलेल्या मोहिमांचा व मिळालेल्या जहागिरीचा हिशेब मागितला. तेव्हा शिंद्याने उलटे सरकारवरच सात कोटींचे कर्ज येणे दाखवले. यावरच न थांबता महादजीने, मोरोबा फडणीसला कैदेतून मुक्त करून त्याला पुन्हा कारभारात घेण्याची पेशव्याला विनंती केली. याशिवाय स्वराज्य व परराज्यातून ' दरबारखर्चासाठी ' जी रक्कम नाना फडणीसला मिळत होती, त्यातील निम्म्या भागावर मोरोबाचा अधिकार असल्याचे सांगत गेल्या १४ वर्षांतील जी काही संपत्ती नानाने दरबारखर्च म्हणून गोळा केली होती, त्यातील निम्मा वाटाही मोरोबाला मिळावा असाही महादजीने सूर आळवला. शिंद्यांच्या या जबरदस्तीच्या राजकारणाला तोड म्हणून नानाने होळकरांना आपले हात मोकळे सोडण्यास सांगितले. नाना - महादजीचा वाद अशा प्रकारे मराठी राज्याच्या नाशास कारणीभूत ठरत असताना धनी म्हणून आपले कार्य बजावण्याची वेळ स. माधवरावावर अशी आलीच नाही. या घटना त्याला माहिती होत्या कि नाही हे समजायला मार्ग नाही पण जोवर दोघांपैकी एकजण उघडपणे त्याच्याजवळ आपल्या न्याय्य बाजूची मांडणी करत नव्हता तोवर त्याने या बाबतीत सरळसरळ दुर्लक्षच केले. अर्थात, त्याने स्वतःहून लक्ष घातले असते तरी नाना वा महादजीने त्यास किती किंमत दिली असती हा भाग वेगळा !

          असो, नाना - महादजीच्या या शीतयुद्धादरम्यान उत्तरेत शिंदे - होळकरांच्या फौजा शत्रूच्या नरडीचा घोट घेण्याऐवजी परस्परांचे गळे घोटण्यास सज्ज झाल्या होत्या. याच सुमारास म्हणजे स. १७९३ च्या जानेवारी महिन्यात स. माधवरावाची पत्नी -- रमाबाईचे निधन झाले. तेव्हा ता. ३ मार्च १७९३ रोजी पेशव्याचा विजयदुर्ग येथील गोखल्यांच्या कन्येशी --- यशोदाबाईसोबत द्वितीय विवाह संपन्न झाला. याच सुमारास पुणे दरबारच्या चौथाईच्या वरवंट्याखालून स्वतःची सुटका करून घेण्याचा निजामाने उपक्रम चालवला होता. त्यासाठी त्याचे वकील महादजीच्या गोटात दाखल झाले होते. निजामाचे वकील शिंद्याकडे आल्याने नानास दहशत बसली. त्याने या ना त्या निमित्ताने पुणे दरबारच्या पटवर्धन प्रभूती सरदारांना मुद्दाम पुण्यातच अडकवून ठेवले. महादजीला याची जाणीव होती पण त्याचीही बरीच कुचंबणा झाली होती. गेल्या दहा - बारा वर्षात पार पाडलेल्या मोहिमा व पदरी बाळगलेल्या फौजांचा खर्च त्याच्या डोक्यावर कर्जरूपाने वावरत होता. त्याचा निकाल लावायचे सोडून नानाने उलट त्याच्याकडेच मागील हिशेबाची थकबाकी मागितल्याने त्याने नानाच्या नाकात काड्या घालण्यास आरंभ केला. त्यातच उत्तरेत होळकरास आपल्या विरोधात नाना चिथावणी देत असल्याची त्याची जी भावना होती, ती अनाठायी नसल्याचे त्यास पुणे मुक्कामात आढळून आले. त्यामुळे तो आणखीनच बिथरून गेला. परिणामी त्याची व निजामाची घसट अधिक वाढून तो आणि निजाम मिळून नानाला कारभारातून काढून टाकणार अशा अफवा उठू लागल्या. अर्थात, हा सर्व बनाव किंवा अफवा ऑक्टोबर १७९२ मध्येच उठल्या असल्या तरी त्यात तथ्यांश कितपत होता हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. नानाच्या ऐवजी प्रमुख कारभारीपद आपल्या हाती यावं अशी महादजीची मुख्य इच्छा होती. ती ओळखून नानाने आपणहून राज्यकारभार सोडून काशीयात्रेस जाण्याची तयारी आरंभली. अर्थात हा सर्व वरवरचा देखावा होता. परंतु या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणजे, दरबारी मुत्सद्दी नाना - महादजीमध्ये समझौता घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान पेशव्याचा लग्न समारंभ उरकला गेला. पेशव्याच्या लग्नाला हजर राहण्याचे निमित्त करून निजाम ससैन्य बेदरला येऊन ठेपला. मधल्या काळात पेशव्याचे लग्न होऊनही गेले तेव्हा आपल्या समाधानास्तव पेशव्यांनी आपल्या उपस्थितीत तृतीय विवाह करावा अशी निजामाने बतावणी सुरु केली. याचा योग्य तो अर्थ घेऊन पुणे दरबारने कागदावर तरी युद्धाची तयारी चालवली. ( स. १७९३, एप्रिल )

     याच सुमारास म्हणजे, स. १७९३ च्या १३ मार्च रोजी रंगपंचमीचा मोठा समारंभ महादजी शिंद्याने घडवून आणला. वरकरणी तरी नाना या समारंभात हजर असला तरी त्याचे सर्व लक्ष यावेळी उत्तरेत लागून राहिले होते. तुकोजीने एकदा महादजीच्या सैन्याचा मोड केला म्हणजे आपली सुटका होईल अशी त्याची भावना होती. इकडे महादजीला नानाचे कारभारीपद आपल्या हाती घेण्याची मोठी उत्सुकता लागली होतीच. त्याने नानाला अडचणीत आणण्यासाठी मोरोबा, बाजीराव इ. प्रकरणे दरबारात काढण्यास सुरवात केली. रघुनाथरावाच्या मुलांना कैदेत किती काळ ठेवणार ?  राजघराण्यातील आहेत. आपल्या कर्माची फळे भोगत दादा परलोकवासी झाला पण त्याच्या मुलांना अजून नजर कैदेत ठेवण्याचे कारण काय ? असे नानाविध प्रश्न उपस्थित करत बाजीरावास कारभारात प्रवेश मिळावा अशी भूमिका महादजीने घेतली. गायकवाडांच्या दौलतीवर फत्तेसिंग मरण पावल्यामुळे गोविंदराव आणि मानाजी यांनी आपापला हक्क दर्शविला होता. महादजीने त्या वादात देखील हस्तक्षेप केला. यामुळे नानाची दरबारी कामकाजात कोंडी होऊ लागली. त्यातचं सचिव प्रकरणाची भर पडल्याने नानाची पुरती नाचक्की  होण्याची वेळ आली. 

          रघुनाथ चिमणाजी सचिव ता. ११ एप्रिल १७९१ रोजी वारला. पश्चात सचिवपद त्याचा मुलगा शंकराजी उर्फ अत्यापंत यांस मिळाले. शंकराजीला तीन बायका असून पैकी प्रथम पत्नी हि सखारामबापूची कन्या होती. सचिवाचे प्रकरण महादजीने उचलून धरण्यामागील हे प्रमुख कारण आहे. शंकराजीस सचिवपद मिळाले आणि पेशवे सरकारातून बाजीराव मोरेश्वर यास त्याची दिवाणगिरी प्राप्त झाली. या बाजीरावाचे शंकराजी सचिवाच्या सावत्र मातेशी जरुरीपेक्षा अधिकचं जवळचे संबंध प्रस्थापित झाले. सचिवास हे समजताच त्याने मातेच्या केशवपनाचा आग्रह धरला आणि जबरदस्तीने तिचे वपन करण्यात आले. हि घटना घडल्यावर किंवा तत्पूर्वी सचिवाने आपल्याला बाजीरावाच्या ऐवजी दुसरा कारभारी नेमून द्यावा अशी नानाकडे मागणी केली. मात्र, नानाने त्यास नकार दिला. हि गोष्ट बाजीरावास समजताच त्याने उघडपणे सचिवाविरोधात कारवाया सुरु केल्या आणि नानास कळवले की, सचिव वेडसर आहे. महादजी शिंद्याच्या कारकुनाचे ' मराठी रियासत खंड - ७ '  मध्ये छापलेले या संदर्भातील पत्र महत्त्वाचे आहे. त्यानुसार असे दिसून येते कि, सचिवाच्या बापाचे व नानाचे पूर्वीपासूनचं वाकडे होते. अर्थात, नानाच्या मनात पूर्वीची अढी कायम नव्हतीच असे ठासून सांगणे त्यामुळे अवघड आहे. असो, बाजीरावाची कड नाना घेतो हे पाहून सचिवाने घर सोडले व तो सहपरिवार जेजुरीस जाऊन राहिला. तेव्हा बाजी मोरेश्वराने नानास विपरीत समजावून सचिवाच्या बंदोबस्ताची परवानगी मिळवून जेजुरीस गारदी पाठवले. त्यावेळी झालेल्या झटापटीत सचिवाची काही माणसे मारली गेली. खुद्द सचिवास काही किरकोळ जखमा झाल्या तर सखारामबापूच्या मुलीच्या बोटावर वार झाला. सचिवाचे सर्व वित्त लुटून घेण्यात आले. घडला प्रकार महादजीला समजताच त्याने पेशव्यास याची कल्पना दिली आणि पेशव्याची माणसे सचिवाकडे जाण्यापूर्वीच आपली माणसे पाठवून त्याने सचिवास स्वतःच्या गोटात आणले. घडल्या घटनेची महादजीने भर दरबारात चौकशी आरंभून नाना फडणीस हा कारभार करण्यास कसा अयोग्य आहे, हे पेशव्याच्या व इतरांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला. कारण ; सातार दरबारातील छत्रपतींसह सर्वांचे वजन व तेज मावळले असले तरी लौकिकात सचिव हा पेशव्याहून वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता. त्यामुळे या प्रकरणात नानाची चांगलीच कोंडी झाली होती. नानाचा सहाय्यक हरिपंत फडके याने सदरहु प्रकरण वर्दळीस येण्यापूर्वीच बाजी मोरेश्वरास सचिवाच्या विनंतीनुसार कारभारातून काढण्याची सूचना केली होती. परंतु, नानाने हरिपंतास धुडकावून लावले होते. भर दरबारात या सर्व घटना उघडकीस येऊ लागल्या तेव्हा नानाची बरीच तारांबळ उडाली. अखेर स. माधवरावाने नानाची बाजू कशीबशी सावरून सचिव प्रकरणातील अपराध्यांना शिक्षा ठोठावल्या. घडल्या प्रकाराने नाना - महादजीचे वैर चव्हाट्यावर आले. सचिवाचे प्रकरण जसे तसे उलगडले आणि एकदा संधी साधून महादजीने पेशव्याकडे नानाच्या ऐवजी आपणास कारभारीपद देण्याची विनंती केली. यावेळी पेशव्याने त्याची समजूत काढून त्या दोघांच्या एकीतचं राज्याचे हित असल्याचे त्यांस सांगितले. इकडे हरिपंत प्रभूती मुत्सद्दी देखील नाना - महादजीच्या दरम्यान सौरस्य व्हावे यासाठी झटत होतेच !

                      मात्र, आधी सांगितल्यानुसार नानाने होळकरांना शिंद्यांची खोड मोडण्याची सूचना केलेली होती. महादजीला याची कल्पना होतीच. त्यामुळे उभयताही उत्तरेत काय होते याची वाट बघू लागले. याविषयी मराठी रियासत खंड - ७ मध्ये छापलेले कोटेकर पंडित दप्तरातील दि. १५ मे १७९३ चे पत्र विशेष महत्त्वाचे असल्याने ते येथे देत आहे. 
         " कारभाऱ्यांची [ नाना फडणीस ] व बावांची [ महादजी शिंदे ] कुन्हा परस्परे वाढत चालली. तूर्तच बखेडा माजावयाच्या रंगास गोष्ट आली. इतक्यांत हरिपंतांनी पांच चार वेळां येऊन स्वच्छतेची बोलणी घातली. पुन्हा ते व नाना उभयतां येऊन खुशामतीच्या गोष्टी सांगोन समाधान केले. परंतु उभय पक्षीं खातरजमा नाहीं. दोघेही आपले जागां सावध आहेत. होळकराकडील मसलतीचा फडशा जाला म्हणजे बलाबल पाहून सल्ला करणे ती करतील. जर स्वच्छतेवर आले तर उत्तम जाले, नाहीं तर बखेडा आहे. होळकराची सरशी जाली तर हे सर्व टाकोन उठोन बऱ्हाणपुरचे रोखे जातील. आपली सरशी जाली तर हे कंपू सुद्धां झाडून फौजा बऱ्हाणपुरचे सुमारे बोलावतील. नंतर कारभाऱ्यांशी काय बोलणे तें बोलतील. होळकराची सरशी जाली म्हणजे अलीबहादरांस व जागजागां रजवाडे यांस लिहून दंगा माजवावा, आणि इकडे मोगल, भोसले, इंग्रज सुद्धां आणून जमाव पाडवा असें कारभारी यांचे मानस आहे. पाटीलबावांस इकडे गोंवून तिकडील फौज तिकडे गोंववावी, असा सगळा जाबसाल होळकराचे लढाईवर येऊन ठेपला आहे. होळकराचा पराभव जाल्यावर कारभारी यांस जड पडेल. श्रीहरीची इच्छा असेल तसे घडेल."  

         या पत्रावरून रावबाजीच्या कुप्रसिद्ध वसईच्या तहाच्या आधीच मराठी राज्य विनाशाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसून येते.          

                                                                           ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: