बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ६ )

 
                 घाशीरामाचे प्रकरण घडून गेल्यावर काही महिन्यांनी महादजी शिंदे पुण्यास येणार हे एकदाचे निश्चित झाले. नानाची या बातमीने मोठी धांदल उडाली होती. इंग्रज - निजाम - पेशवे या त्रिकुटांची फौज यावेळी टिपूचा बंदोबस्त करण्यात गुंतली होती. महादजी दक्षिणेत येणार या वार्तेने केवळ नानाच नाही तर इंग्रज व निजाम देखील काहीसे भयचकित झाले होते. दिल्ली दरबारी पेशव्याच्या वतीने जो बहुमान महादजीने मिळवला होता --- अर्थात वकील - इ - मुतलकीचे पद ---- तो यापूर्वी मोगल बादशहाने निजामअलीचा पूर्वज निजामुल्मुल्कास दिला होता. आपल्या पूर्वजाने भूषविलेले पद पेशव्याच्या पदरच्या एका सरदाराने मिळवावे हे निजामाला सहन होण्यासारखे नव्हते. अर्थात, हि  बाब तशी दुय्यम होती. निजामाच्या पोटातील मुख्य भीती वेगळीच असून त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ झाला होता. मोगल बादशहाच्या वतीने कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महादजीकडे -- पर्यायाने पुणे दरबारकडे आला होता. या अधिकाराच्या बळावर निजामाची सत्ता ते चुटकीसरशी -- निदान कागदावर तरी -- संपुष्टात आणू शकत होते. त्यामुळे निजामाला महादजीच्या पुणे आगमनाच्या वार्तेने थोडी दहशत बसली होती. त्याशिवाय पुणे दरबारला निजामावर शह बसवण्यासाठी खंडणी, चौथाई सारखी कित्येक कारणे उपलब्ध होती. यांपैकी एखाद्या कारणाच्या निमित्ताने निजामाच्या विरोधात राजकीय व लष्करी कारवाई पुणे दरबार जरूर करू शकत होता. इंग्रजांच्या दृष्टीने पाहिल्यास महादजीचे पुणे आगमन हा फार मोठ्या चिंतेचा विषय होता !

                स. १७८३ मध्ये महादजीच्या मध्यस्थीने त्यांनी पुणे दरबारशी तह करून पहिले इंग्रज - मराठा युद्ध आटोपते घेतले. इंग्रजांनी मनात स्वार्थ बाळगून महादजीला मोठेपणा दिला होता, त्या बाह्य डौलावर नाना व महादजी काही काळ भाळले हे उघड आहे. नानाला वाटले की, महादजी आता इंग्रजांचा मित्र झाला तर महादजीच्या मते इंग्रज आपले सच्चे दोस्त बनले. वस्तुतः, हा तह घडवून आणण्यासाठीच इंग्रजांनी महादजीला मोठेपणा दिला होता. तह बनून आल्यावर महादजीच्या स्पर्धेने त्यांनी दिल्ली दरबारात अंतस्थरित्या हस्तक्षेप करण्यास आरंभ केला. यावेळी मोगल बादशाहीतील सर्वोच्च असे वकील - इ - मुतलकीचे पद मिळवण्यासाठी महादजी व ब्रिटीश गव्हर्नर जनरल हेस्टिंग्स यांच्यात स्पर्धा लागली होती. पैकी, स. १७८४ च्या नोव्हेंबरमध्ये महादजीने हेस्टिंग्सला मात देऊन हे पद आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून महादजी हा इंग्रजांचा अव्वल क्रमांकाचा शत्रू बनला. इंग्रजांची त्यावेळी आर्थिक हलाखी असल्याने व दक्षिणेत टिपूचे प्रस्थ वाढल्याने त्यांनी महादजीकडे तात्पुरते दुर्लक्ष केले. स. १७९० पर्यंत इंग्रजांनी महादजीला उत्तरेत एकप्रकारे मोकळा हात दिला. मात्र, त्याच्या मार्गात शक्य तितके अडथळे निर्माण करण्यासही ते चुकले नाहीत.

          महादजी व इंग्रज यांच्यात सालबाईच्या तहापासून एकप्रकारे शीतयुद्ध सुरु झाले. पुढे लवकरचं इंग्रजांचे दुटप्पी वर्तन लक्षात आल्यावर महादजीनेही आपले राजकारण खेळण्यास आरंभ केला. स. १७६५ मध्ये इंग्रजांना मोगल बादशहाने सालीना २६ लक्ष रुपये भरण्याच्या बोलीवर बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क प्राप्त झाले होते. मोगल बादशहा व इंग्रज यांच्यात हा करार होण्यापूर्वीच बंगाल प्रांतावर रघुजी भोसल्याने आपली चौथाई बसवलेली होती. म्हणजे, इंग्रजांना दिल्ली दरबारी सालीना २६ लक्ष व नागपुरच्या भोसल्यांना वार्षिक खंडणी देणे भाग होते. परंतु, त्यांनी रकमेचा भरणा कधी केलाच नाही. इंग्रजांकडून द्रव्य उपटण्याची शक्ती मोगलांमध्ये नव्हती आणि पुणे दरबारच्या स्पर्धेमुळे नागपूरकरांना इंग्रजांशी गोडीगुलाबीने राहण्यात आपले हित वाटत होते. महादजीला या सर्व गोष्टींची पूर्ण माहिती होती. इंग्रजांना आजमवण्यासाठी त्याने स. १७८५ मध्ये मोगल बादशहाच्या वतीने आजवर थकित राहिलेल्या बंगालच्या खंडणीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच भोसल्यांच्या वतीने चौथाई मागण्याचाही प्रयत्न केला. इंग्रजांनी महादजीच्या या मागण्या तेव्हाच उडवून लावल्या. ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसने तर महादजीला युद्धाची अप्रत्यक्ष धमकी दिली. हि घटना स. १७८५ ची असून तेव्हापासून इंग्रज व महादजी परस्परांचे पक्के वैरी बनले होते. सालबाईच्या तहाच्या वेळी महादजीने हैदरचा विश्वासघात करून परस्पर इंग्रजांशी तह करण्यास पुणे दरबारला भाग पाडले होते. पण तोच महादजी आता टिपूला इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी गोंजारू लागला होता. स. १७९० मध्ये कॉर्नवॉलिसने निजाम व पुणे दरबारच्या मदतीने टिपूविरुद्ध मोहीम आखली. त्यावेळी त्याने महादजीकडे मदत मागितली पण त्याने नकार दिला. वस्तुतः, इंग्रजांच्या मदतीने टिपूचा बंदोबस्त करणे शिंद्याला नामंजूर होते. याबाबतीत त्याचे नानासोबत मतभेद होते. टिपूविरुद्ध इंग्रजांना मदत करून नानाने मोठी चूक केली असे नानाच्या विरोधकांचे मत आहे तर नानाने यावेळी टिपूच्या बंदोबस्तास प्राधान्य देऊन मोठीच कामगिरी बजावली असे नानाच्या समर्थकांचे मत आहे. प्रस्तुत विषयाशी हि चर्चा वरकरणी विसंगत वाटत असली तरी, तत्कालीन राजकारण समजून घेण्यासाठी हि अप्रयोजक चर्चा अत्यावश्यक आहे.

       स. १७९० पर्यंत हिंदुस्थानचे राजकीय चित्र पुढीलप्रमाणे होते :--- बंगाल, बिहार मध्ये आपला पाय घट्ट रोवून इंग्रज सत्ता यमुनेपर्यंत येऊन थडकली होती. यमुनेच्या पलीकडे शिंदे - होळकर अजून पक्के पाय रोवून उभे असल्याने इंग्रजांना दिल्लीमध्ये प्रवेश करता येत नव्हता. पेशव्याच्या वाढत्या सामर्थ्याने भयभीत झालेल्या नागपूरकर भोसले व निजामाच्या मदतीने बंगालपासून इंग्रज तसेच किनाऱ्याने खाली मद्रासपर्यंत आले होते. मधल्या पट्ट्यात फ्रेंच, डच इ. ची ठाणी असली तरी त्यांचे राजकीय महत्त्व साफ ओसरले होते. हिंदुस्थानचा पूर्व किनारा या प्रकारे इंग्रजांचा अंकित बनला होता तर पश्चिम किनाऱ्यावर मुंबई व सुरत येथे त्यांचे बस्तान बसले होते. पश्चिम किनाऱ्यावर त्यांना त्रास देणारे आंग्रे दुर्बल झाले होते तर पेशव्यांचे आरमार फारसे प्रभावी नव्हते. जंजिऱ्याचा सिद्दी त्यांचा अंकित बनला होता. गुजरातमध्ये गायकवाडास त्यांनी बगलेत मारले होते. तेथून माळवा - राजपुताना त्यांच्या दृष्टीपथात होता. येऊन - जाऊन त्यांना अडसर आता पुणे व म्हैसूर दरबारचा होता. म्हैसूरचा वाघ जर त्यांचा अंकित झाला वा तो थंड पडला तर निजाम त्यांच्या लगामी लागलेला असल्याने पुणे दरबारवर आपले वर्चस्व लादणे इंग्रजांच्या शक्तीबाहेर नव्हते. इंग्रजांना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली होती की, आपला अखेरचा मुकाबला हा मराठी राज्याशी आहे. मराठी सरदार सर्व देशभर पसरलेले असल्याने त्यांचा अल्पावधीत पाडाव करणे तूर्तास तरी त्यांच्या कुवतीबाहेरचे होते. टिपूचे सामर्थ्य त्यांना माहिती होते. कर्नाटक प्रांत सोडल्यास बाहेर येण्याची त्याची हिंमत नव्हती व दूरवरील फ्रान्स देशातील मुठभर मुत्सद्द्यांची त्यास असलेली सहानुभूती वजा केल्यास त्यास कोणाचा पाठिंबाही नव्हता. टिपू व इंग्रज हे अल्पकाळासाठी एकत्र आले असते तर पुणे दरबारला भारी पडले असते असे सामान्यतः म्हटले जाते. परंतु, या मतात अजिबात तथ्य नाही. समजा, निजाम - इंग्रज व टिपू यांनी पुणे दरबारविरुद्ध मोहीम आखली असती तर काय झाले असते ? लष्करीदृष्ट्या निजामाची सत्ता यावेळी जवळपास मोडीत निघाली होती. त्यामुळे त्याचे भय मराठी सरदारांनी बाळगण्याचे काही कारण नव्हते. राहता राहिले टिपू व इंग्रज तर, इंग्रजांना एकाच वेळी उत्तरेत व दक्षिणेत मराठी सरदारांशी लढणे अजिबात परवडण्यासारखे नव्हते. फारतर टिपू एकटाच पुणे दरबार विरुद्ध लढला असता. इंग्रजांनी त्याला रसद, दारुगोळा फारतर पुरवला असता किंवा तोही त्यांना पुरवता आला नसता. कारण, दक्षिणेत इंग्रजांनी आक्रमक धोरण स्वीकारल्यावर उत्तरेत वावरणारे मराठी सरदार अजिबात गप्प बसले नसते. इंग्रजांना एकाच वेळी उत्तरेत व दक्षिणेत मोहीम चालवणे शक्य नाही हे महादजी ओळखून होता. त्याउलट नानाला याची जाणीव नव्हती असेच म्हणावे लागेल. यावरून असे दिसून येते की, नानाने निजाम - इंग्रज यांच्या टिपूविरुद्ध युतीत जाऊन एक मोठीच राजकीय चूक केली. आपल्या तिघांच्या सामर्थ्यापुढे टिपूचा निभाव लागणार नाही याची नानास जाणीव होती कि नव्हती हे समजायला मार्ग नाही. होती म्हणावी तर दक्षिणेतील राजकीय सत्ता समतोल साधण्यासाठी त्याने तटस्थ राहणे आवश्यक होते. आणि नव्हती म्हणावी तर सारा खेळचं संपला !

          असो, हिंदुस्थानची राजकीय परिस्थिती अशी होती की, या देशाचे सार्वभौमत्व ताब्यात घेण्यास मराठी व इंग्रजी सत्तेत अखेरचा सामना जुंपला जाणार हे निश्चित होते. सालबाईच्या तहानंतर महादजीला याची जाणीव झाली. इंग्रजांशी लढण्याकरता त्यानेही फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज इ. युरोपियन लष्करी अंमलदारांना आपल्या सैन्यात दाखल करून त्यांच्याकरवी कवायती प्रशिक्षित सैन्यदल बनवण्यास आरंभ केला. शस्त्रास्त्रांचे कारखाने काढले. महादजीच्या अनुकरणाने / स्पर्धेने इतर मराठी सरदारांनीही हाच उपक्रम स्वीकारला. परंतु, महादजी काय व इतर मराठी सरदार काय, त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले व ते म्हणजे आपल्या कवायती सैन्याचे नेतृत्व त्यांनी पोटभरू पाश्चात्त्यांच्या हवाली केले. या युरोपियन लोकांना या देशात फक्त पैसा कमवायचा होता. त्यांची निष्ठा त्यांच्या राष्ट्राप्रती होती, ना इथल्या स्थानिक सत्त्ताधीश वा सरदाराशी ! त्यामुळे ऐन प्रसंगी तसाच प्रसंग उद्भवला तर ते आपल्या मालकाचा विश्वासघात करण्यास मागे - पुढे पहात नसत. खुद्द महादजीला देखील लालसोट प्रसंगी याचा चांगलाच अनुभव आला होता पण त्यातून त्याने योग्य तो धडा घेतला नाही.

        स. १७९१ च्या ऑगस्टमध्ये घाशीराम प्रकरण निकाली काढल्यावर स. माधवरावाने राज्यकारभारात लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. नानाच्या विविध प्रयत्नांना / अडथळ्यांना न जुमानता महादजी मोठ्या निर्धाराने दक्षिणेत येण्यास निघाला. याच काळात होळकरांचे शिंद्यांच्यासोबतचे अंतर्गत वैमनस्य यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. आजवर अहिल्याबाई व महादजी दोघे एकविचाराने वागत असून तुकोजी नाना फडणीसच्या तंत्राने चालत होता. परंतु, आता नाना, तुकोजी व अहिल्याबाई असे त्रिवर्ग एकत्र आले आणि महादजी एकाकी पडला. वास्तविक, या दोन बलवान सरदारांतील तेढ मिटवण्याचे सोडून नानाने त्यांच्या द्वेषाला खतपाणी घालण्याचा उद्योग केला. याविषयी नानाचे चरित्रकार वा. वा. खरे यांनी नानाची बाजू सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी उपलब्ध पत्रे पाहता नानाने आपल्याच सरदारांना दुर्बल करण्याचे पेशव्यांचे धोरण पुढे चालू ठेवल्याचे दिसून येते. नाना व होळकरांचे हे उद्योग पेशव्याच्या कानी घालून त्याच्याकडून न्याय मागण्यासाठी महादजी पुण्यास यायला निघाला. यावेळी टिपूची मोहीम संपत आली होती. इंग्रजी पलटणांच्या सहाय्याने मराठी सरदारांना जे यश या मोहिमेत मिळाले होते ते लक्षात घेऊन नानाने परशुराम पटवर्धनास पत्र लिहून कळवले की, कॅप्टन लिटलच्या हाताखालील मुंबईची पलटणे घेऊन पुण्यास यावे. महादजी आपल्या फौजेच्या बळावर पेशव्याचा ताबा घेऊन आपणांस कैद करेल वा कारभारातून काढेल अशी नानाला भीती वाटत होती. दरबारात अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना पेशव्यास त्याची खबर नव्हती.

                            आपण सैन्यासह येत आहोत हे समजल्यावर नाना इंग्रजांची फौज मदतीस आणण्याच्या खटपटीत आहे, हे समजताच महादजी जरुरीपुरते सैन्य घेऊन पुण्याकडे निघाला. पण त्याने नेहमीचा मार्ग सोडून बीड, तुळजापूर असे मुक्काम करत आरामात तो स. १७९२ च्या जूनमध्ये पुण्यास दाखल झाला. तोपर्यंत टिपूवर चालून गेलेले पुणे दरबारचे सरदार मोहीम आटोपून पुण्यास दाखल झाले होते. महादजीच्या पुणे आगमनाविषयी कित्येकांच्या मनात अनेक तर्क - कुतर्क होते. परंतु, या सर्वांपेक्षा नानाच्या मनात महादजीविषयी नेमकी काय भावना होती किंवा महादजीच्या पुणे आगमनाविषयी त्याचा काय ग्रह होता हे लक्षात घेणे योग्य ठरेल. आपणांस कारभारातून दूर करून पेशव्याचे प्रमुख कारभारीपद आपल्या ताब्यात घेण्यासाठी महादजी पुण्यास येत आहे अशी नानाची ठाम समजूत होती. हे कृत्य घडवून आणण्यासाठी महादजीकडे लष्करी बळ, बादशाही पदांचा अधिकार व योग्य अशी कारणेही होती. महादजीचा पुण्यास येण्याचा नेमका काय हेतु होता हे पाहणे देखील याच स्थळी योग्य ठरेल.

        वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा वाद व समारंभ :-    सालबाईच्या तहानंतर पुणे दरबारात नानाचे वाढलेले प्रस्थ महादजीच्या लक्षात आलेलं होतं. मराठी राज्याचा निश्चित अशी राज्यघटना वगैरे काही नसल्याने सालबाईच्या तहानंतर मराठी राज्यात --- विशेषतः पुणे दरबारात कित्येक महत्त्वाच्या पण गोंधळून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या. मूळात मराठी राज्याचे धनी सातारकर छत्रपती असून, ते एकप्रकारे आपला सर्वाधिकार पेशव्यांना सोपवून साताऱ्यास स्वस्थ बसून राहिले होते. अर्थात, हि स्वस्थता त्यांच्यावर लादण्यात आली हा भाग निराळा. पेशवे जोवर समर्थ होते तोवर त्यांनी हा अधिकार सांभाळला पण नारायणाच्या खुनानंतर पेशव्यांचे अधिकार, पेशव्यांच्या दिमतीस असलेल्या फडणीसाकडे आले. लौकिकात, छत्रपती धनी असलेल्या राज्याचा सांभाळ पेशव्यांच्या वतीने त्यांचा नोकर नाना फडणीस करत होता, तर व्यवहारात नाना हा छत्रपती व पेशव्यांची सत्ता वापरत होता. याच कारणांमुळे शिंदे - होळकर प्रभूती सरदार नानाविषयी मनात थोडंस वैषम्य बाळगून होते. कारण हे पेशव्यांचे सरदार असून त्यांच्यावर पेशव्यांच्या कारकुनाने -- म्हणजे आपल्याच बरोबरीच्या नोकराने आपणांवर हुकुमत गाजवावी हे त्यांना खटकत होते. तसेच राज्यकारभारात पेशव्याच्या वतीने नाना जो काही निर्णय घेत असे तो त्या सरदारांना बंधनकारक असल्याने राजकारणात एकसुत्रता अशी फारशी राहत नव्हती. याचा महादजीला चांगलाच अनुभव आला होता. तेव्हा राज्यकारभाराच्या एकप्रकारे दुरुस्तीसाठी म्हणा किंवा कारभारी मंडळाच्या पुनर्रचनेसाठी महादजी पुण्यास येत होता हे उघड आहे. याविषयीची उपलब्ध पत्रे आहेत , त्यातून त्यांस पेशव्यांचे प्रमुख कारभारीपद मिळवण्याचीही सुप्त इच्छा असल्याचे उघड होते. एकूणचं, महादजी विषयी नानाला वाटणारी भीती अगदीच अनाठायी नव्हती पण लष्करी बळावर मह्दाजी हे धाडस करील हि नानाची अटकळ चुकीची होती हे निश्चित !

      टिपूवरील मोहिमेत अडकलेले मराठी सरदार पुण्यास येऊन दाखल होताच महादजी देखील पुण्यास आला. रिवाजानुसार त्याची व पेशव्याची भेट घडून आली. भेटीच्या प्रसंगी महादजीने पेशव्याच्या पायावर डोकं ठेवलं तर पेशव्याने आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ महादजीच्या गळ्यात घातली. या भेटीनंतर महादजीने दिल्ली दरबारातून पेशव्यांच्या नावे आणलेल्या वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा पेशव्यांनी स्वीकार करावा असा आग्रह धरला. वास्तविक स. १७८४ च्या नोव्हेंबर मध्येच महादजीने पेशव्याच्या नावाने दिल्ली दरबारातून वकील - इ - मुतलकीची वस्त्रे मिळवली होती व ती पेशव्याने स्वीकारावीत यासाठी पाठवूनही दिली होती, परंतु नानाने त्यावेळीही या वस्त्रांच्या स्वीकृतीसाठी आपला विरोध दर्शविला होता. त्यामुळे ती वस्त्रे उज्जैन येथेच पडून होती. तेव्हा महादजीने स्वतःच ती वस्त्रे पेशव्यास प्रदान करण्याचा निर्णय घेतला. स. १७८४ पासून नानाचा या गोष्टीला विरोध होता. त्याविषयी उभयतांचे पत्रोपत्री मोठे युद्ध घडून आले होते. पुढे महादजी पुण्यास आल्यावर व पेशव्यांची औपचारिक भेट झाल्यावर त्याने परत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी नानाने त्यास असा आक्षेप घेतला की, पेशवे हे छत्रपतींचे नोकर असल्याने मोगल बादशाहाने त्यांना दिलेली बहुमान व ‘ महाराजाधिराज ‘ या पदवीचा स्वीकार करणे योग्य नाही. त्यासाठी छत्रपतींच्या परवानगीची आवश्यकता आहे. नानाला पूर्णतः खात्री होती की, महादजीला अशी परवानगी मिळणे शक्य नाही तर तिकडे महादजीला नानाच्या या चालीचा आगाऊ अंदाज असल्याने त्याने छत्रपतींची परवानगी काढण्यासाठी आपले हस्तक रवाना केले होते.  

             या ठिकाणी पेशव्यास बादशहाने दिलेले बहुमान स्वीकारण्यात नानाने जो विरोध दर्शविला त्याच्या कारणाची चर्चा न करता असा बहुमान पेशव्याने स्वीकारणे योग्य होते का हे पाहणे आवश्यक आहे. छ. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे तेज पेशव्यांच्या स्वराज्यात अजिबात उरले नव्हते हे स्पष्ट आहे. संभाजीपुत्र शाहूने मोगलांचे रीतसर मांडलिकत्व स्वीकारले होते. परिणामी, स्वराज्य हे स्वतंत्र राज्य न राहता मोगलांचे अंकित राज्य बनले. अर्थात, हे फक्त कागदावर जरी असले तरी कागदावरील शब्द सर्वच्या सर्व कधी व्यर्थ जात नसतात. आपण मोगल बादशहाचे नोकर ही भावना जशी शाहूची तशीच शेवटपर्यंत पेशव्यांचीही राहिली. असे असताना, मोगल बादशहाने पेशव्यांना ‘ महाराजाधिराज ‘ हि पदवी देऊन एकप्रकारे घटनात्मक पेच उभा केला. लौकिकात व व्यवहारात पेशवा हा छत्रपतीचा नोकर असून छत्रपती हा मोगल बादशहाचा ताबेदार ! आपल्या हाताखालच्या नोकरांना कोणते बहुमान वा पदव्या द्यायच्या याचा अंतिम निर्णय जरी बादशहाच्या मर्जीवर अवलंबून असला तरी आपल्या कृत्यामुळे होणाऱ्या राजकीय उलाढालींची त्याला काय कल्पना असणार ? त्याने पेशव्यास ‘ महाराजाधिराज ‘ म्हणून पदवी दिल्याने पेशवा आता छत्रपतींच्या बरोबरीचा किंवा वरच्या दर्जाचा अधिकारी बनला. हि राजकीय गुंतागुंत ना बादशहाच्या ध्यानी आली ना महादजीच्या ! या पदवीचा स्वीकार केल्यास राजमंडळातील व इतर मराठा सरदार निश्चितपणे दुखावले जाणार अशी नानाची अटकळ होती व थोडेबहुत झालेही तसेच. कार्यक्रम झाल्यावर पेशव्यांना नजरा करण्याचा कार्यक्रम झाला त्यावर मराठा सरदारांनी बहिष्कार टाकला.

        असो, विवेचनाच्या भरात आपण बरेच पुढे आलो. तर, अखेर नानाचा सर्व विरोध  बाजूला ठेवून ता. २२ जून १७९२ रोजी गारपीर येथे फर्मानबाडीचा समारंभ करण्यात येऊन त्यावेळी बादशाही पदे स्वीकारण्यात आली. याच वेळी महादजीने रीतसर पेशव्यांचे दुय्यम पद ---- म्हणजे वकील - इ - मुतलकीचे नायब मुनाबीची वस्त्रे स्वीकारली. आपल्या या कृत्याने किंवा राजकीय चालीने विरोधकांची तोंडे बंद केली. या समारंभाचे वृत्त निजामाच्या दरबारातील मराठी राज्याचा वकील गोविंदराव काळे यांस समजले. त्यावेळी ता. २ जुलै १७९२ रोजी त्याने नाना फडणीसला पत्र पाठवले, ते येथे समग्र देत आहे.

इ. सं. ऐ. टि. मा. १ ले. ९                                       दि. २ जुलै १७९२

   विनंती ऐसीजे
               राजश्री पाटील बावा जांबगांवीहून निघोन ज्येष्ठ व. अष्टमीस पुण्यानजीक खडकीच्या पुलावर येऊन मुक्काम केला. नवमी सह दशमी सायंकाळचे पाच घटका दिवस राहता श्रीमंतांचे दर्शन घ्यावयाचा मुहूर्त निश्चयात आला. इकडून श्रीमंत गणेशखिंडी पावेतो सामोरे गेले तिकडून पाटील बावा आपले बराबरील सरदार घेऊन आले. इकडील मुत्सद्दी मंडळी व सरदार मंडळींच्या व यांच्या भेटी झाल्या. नंतर पाटीलबावा येऊन श्रीमंतांचे पायावर डोई ठेऊन भेटले. श्रीमंतांनी आपले गळ्यातील मोत्यांची माळ पाटीलबाबांचे गळ्यात घातली. येणे प्रमाणे समारंभाने भेट बहुत चांगली झाली. या पूर्वी भेट झाल्याचे सरासरी लिहिले, तपशील समजावा सबब लिहिले असे म्हणोन आज्ञा.
                       त्यास श्रीमंतांचे ताले ( ग्रह ) विचित्र की असे बराबरीचे सरदार दिग्विजयी होऊन येऊन पायावर डोई ठेवून भेटतात. यांच्या आखबारा रुमशामपावेतो ( पूर्व रोमन बादशाही, इस्तंबूल व पश्चिम आशिया ) मिरवतात. या पुण्याईस जोडा नाही. वर्णन करावे ! याचा संतोष मोठा झाला. येथील मंडळीत आम्हास सांगावयास आर्त तेज बंदेगान अल्ली व मध्यस्थीस सांगितले. त्यासही खुषी झाली. जसे व्हावे तसे झाले. उचित ते घडले. आम्ही येथे पूसावयाचे स्थळ म्हणोन उमदे लहान थोर वर्तमान पुसतात सांगितले पाहिजे. यास्तव पुढे होईल त्याची वरचेवर लिहिण्यास आज्ञा होत जावी. रवाना चंद्र ११ जिल्काद हे विनंती.
                   …………… श्री मुबारक करो याहून पदव्या अधिक प्राप्त होतील.

                                                    श्री         
         विनंती ऐसीजे बादशाहाकडून वकील मुतलकी व अमीर उल उमराव म्हणजे मीरबक्षीगिरी यांचा बहुमान आणिला आहे तो घेण्याविषयी राजश्री पाटील बाबांनी विनंती केली. त्यावरून घ्यावयाचा निश्चय झाला. डेरा देऊन फर्मानवाडी ( दरबार डेरा, वस्त्रे स्वीकारताना भरवलेला तंबूतील दरबार ) वरून, आषाढ शुद्ध तृतीया शुक्रवारी तिसरे प्रहरीं श्रीमंतांची स्वारी डेरादाखल झाली. प्रथम पातशाही फर्मान मस्तकी वंदून मुनशीजवळ दिला. त्यांनी भर दरबारात वाचला. सर्वांनी श्रवण केला. यात गुलाम कादर याने बेअदबी केली. त्याचे परिपत्य बादशाही नोकर बहुत होते. परंतु कोणी केले नाही. श्रीमंतांचे सरदार महादजीराव शिंदे यांनी करून बंदोबस्त केला. याजकरिता हे पद पुस्त दर पुस्त ( वंश परंपरा ) दिले असे ये विषयी फार विस्तारे लिहिले. ते सर्वांनी ऐकिल्यावर वकीलमुतलकी व अमीर उल उमराची खिलत ( मानाचा पोशाक ) चारकुबा / चाकुबा ( बीन बाह्यांचे लांब जाकीट ) व जिगा ( एक दागिना ) शिरपेंच व परिंदा कलगीमय लटकन व माळा मरवारींद व कलमदान ढालतरवार व मोरचेल, नालकी ( कळस असलेला हौदा, दोन आडव्या दंडावर ठेवलेला ), पालखी झालदार, शिक्के करार, व माही मरातब ( मत्स्य सोन्याचे दोन गोल मिळून होणारे ) तमनतोग हत्ती, घोडा समेत, बहुत आदरे करून घेतली. श्रीमंतांनी एकशे एक मोहोर पादशाहास नजर ठेविली. पाटीलबावांनी श्रीमंतांस एक्कावन्न मोहरा नजर डेऱ्यातच केली. तोफा व गाडद्याच्या सिलका ( सलाग्या,  बंदुकीचे बार ) झाल्या त्याजवर सरकार वाड्यात घेऊन सर्वांनी नजरा केल्या. राजश्री कल्याणराव कवडे व बाबाराव व कृष्णाजी देवाजी व आनंदराव रघोत्तमराव याजकडील यांनी नजरा केल्या व सर्वांनी आदाब ( नमस्कार ) बजाविली. समारंभ चांगला झाला. तुम्हास कळावयाकरिता लिहिले म्हणोन आज्ञा. ऐशिवाय पत्रे पाहून अति संतोष झाला आनंद कोठे माईना. पत्री विस्तारक किती ल्याहावा ? श्रीमंत वैभव झाली विचित्र पुण्याई कधी झाल्या नाहीत त्या रकमा चालून आल्या. श्री मुबारक करो व याहून पदव्या अधिक प्राप्त होतील, फर्माना येतील. गुलाम कादराचे पारपत्य कोणाच्याने जाले नाही, ते राजश्री माधवराव शिंदे यांनी केले. हे रक्कम आम्ही येथे बोलण्यात आणिली नाही. वाईट वाटावयाची कारणे पाटीलबाबांनी एक्कावन्न मोहरा नजर करून आदाब बजाविली येणेकरून येकनिष्ठपणाचे त्यांचे महात्म्य दिगंतरास गेले. खानदानास उचित ते त्यांनी केले. आपण व पाटीलबाबांनी आदाब बजाविली, मग राजश्री कल्याणराव व बाबाराव व कृष्णाजी देवाजी यांचा गुंता काय ? मार्ग पदाच्या स्वरूपाप्रमाणे घातला इतके न होते तर तितकेच उणे दिसते. पृथ्वीपति व इतर यवन व मराठे राजे यास आदाब कराव्या. त्यापरीस हे ब्राह्मण प्रभु सहस्त्र वाटे प्रशस्त पदास अदाब बजवावी लागती ठीक झाले. हाच मार्ग शेवटपर्यंत चालावा. आपले व पाटीलबाबांचे कारकीर्दीत ह्या गोष्टी भारी झाल्या. कीर्तीचे ध्वज झाले. हे आपल्यास व पाटील बावांस मुबारक असो. रवाना चंद्र २२ जिलकाद हे विनंती.

 विश्लेषण :-  या पत्रावर विश्लेषण करण्यासारखे फारसे काही नाही. फक्त या ठिकाणी एक - दोन गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत. बादशाही फर्मानात गुलाम कादरच्या अत्याचारांचा उल्लेख आहे, व त्याच्या अत्याचारांपासून बादशहा व परिवारास वाचवण्यासाठी कोणीही मोगल उमराव पुढे आला नाही याचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. हा उल्लेख आपल्यास अनुलक्षून असल्याचा निजामाचा ग्रह झाला नसल्यास नवल ! खर्ड्याच्या लढाईमागील हे एक कारण आहे. असो, यापुढील भागात आपण महादजी व नाना यांच्यातील वाद, महादजीचा मृत्यू, खर्ड्याची लढाई इ. मुद्द्यांची चर्चा करणार आहोत.    

                                                                            ( क्रमशः ) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: