शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ५ )


           स. माधवराव पेशव्याच्या कारकिर्दीत गाजलेली प्रमुख प्रकरणे म्हणजे घाशीराम कोतवाल, महादजी शिंदेने दिल्ली दरबारकडून मिळवलेली वकील - इ - मुतलकीची वस्त्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम, नाना - महादजी वाद व सख्य, खर्ड्याची लढाई, दुसऱ्या बाजीरावाशी चोरून ठेवलेले संधान इ. यांशिवाय आणखीही कित्येक घडामोडी आहेत पण त्यांचा व पेशव्याचा तसा थेट संबंध येत नसल्याने व त्या प्रकरणांत पेशवा निव्वळ नामधारी प्रमुख असल्याने त्या बाबींचा या ठिकाणी उल्लेख करणे अप्रस्तुत आहे.
 
           घाशीराम कोतवाल :-  घाशीराम कोतवाल विषयीचे एक विस्तृत पत्र ‘ मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय ‘ या ग्रंथात प्रकाशित करण्यात आले असून तेच या ठिकाणी समग्र देत आहे.
  
ऐ. टि. मा. १ ले. ४०                                        २ नोव्हेंबर १७९१

  वडिलांचे सेवेसी सा। नमस्कार
  विज्ञापना ऐसीजे. पुण्याहून पस्तीस असामी तैलंग ब्राह्मण आपले देशास जाण्याकरिता निघोन घासीराम कोतवाल याचे तळ्यावर गेले आणि सायंकाळचे चार घटका दिवसास स्वयंपाक करावयास लागून अस्तमान दोन घटका रात्रीस भोजन केले. नंतर चार घटका आटपाआटप करावयास लागली तो इतक्यात कोतवालाचे प्यादे त्यांचे पेठेतून पाचसात प्यादे जाऊन तितक्या ब्राह्मणास भवानी पेठेतील चावडीस आणून एका खणाचे भुयार आहे त्यात पस्तीस आसामी कोंडिल्या त्यात वारा जावयास जागा नाही. सबब, ब्राह्मण आत कोंडमारा होऊन एकवीस आसामी मृत्यू पावले. घातल्या पासोन तिसरे रोजी रा. मानाजी फाकडे चावडीजवळ राहतात. त्यास त्या भुयारात गलबा ( गडबड ) होऊ लागला हा कशाचा म्हणोन, आपणा खुद त्या भुयाराजवळ जाऊन कुलूप तोडवून पाहिले, आणि श्रीमंतास ब्राह्मण मेल्याचे वर्तमान सांगून पाठविले. नंतर श्रीमंतांनी चार प्यादे व एक कारकून चौकसीस पाठविला. तो इतक्यात घासीराम याणे वाड्यात येऊन विनंती केली जे कोमटी पंचवीस तीस आसामी माझे तळ्यावर येवून राहात आणि शहरात चोऱ्या करीत होते. त्यास धरून आणून ठेविले.
                त्यांणी अफू खाल्ली तेणें करून मृत्यू पावले आज्ञा जाहल्यास मूठमाती देतो. उत्तर जाहले जे चौकशीस कारकून गेला आहे. तो आल्यानंतर सांगे ते सांगू. असे बोलून चिंचवडचे देवास पुलापलीकडे सामोरे गेले. तेथून स्वारी फिरोन बेलबागेत आल्यावर घासीरामाने गाठ घालून गैरवाका समजावून मूठमातींची परवानगी घेतली. आणि आपले घरास गेला. इतक्यात श्रीमंत राजश्री रावसाहेब ( स. मा. पेशवे ) यांनी श्रीमंतास ( नाना फडणीस ) बोलावू पाठविले.  वाड्यात गेले तेव्हा रावसाहेब यांणी विचारले जे घासीरामाने ब्राह्मण मारिले, त्यास त्याची चौकी होऊन घासीरामाचे पारपत्याचे काय ठरविले ? उपरात आज्ञा होईल तसे करू म्हणोन बोलून घासीरामास बोलावू पाठविले. तो आला तो श्रीमंतही सरकार वाड्यातून आपले घरास आले, आणि वेदमूर्ती  भटजीतात्यास चौकशी सांगितली त्यांणी कोतवाल मजकूर यास ब्राह्मण कशाकरिता कोंडिले व मरावयाचे कारण काय ? जे खरे असेल ते सांग, असा प्रश्न केला. तेव्हा त्याणे उत्तर केले, जे चोर म्हणोन कोंडिले. ते अफू खाऊन मेले. यात माझे काही कृत्रिम नाही. असे म्हणत आहे तो रावसाहेबांचा निरोप आला जे त्याचे पारपत्य चांगले करावयाचे. याचे म्हणणे तो या प्रकारचे व श्रीमंत राजश्री नानांचे वाड्यापासी हजार पंधरासे ब्राह्मण मिळोन नाना प्रकारच्या वल्गना करू लागले.
      तेव्हा सर्वमजकूर भटजींनी श्रीमंताचे कानावर घालून कोतवालांच्या मुसक्या बांधून गाडद्यांचे पहाऱ्यात ठेविला. तरी तेलंगी ब्राह्म आतताईपणास न चुकत. हत्तीचे पायास बांधल्याशिवाय आम्हास आपले बिराडी जावयाचे नाही. नंतर वे।। राजश्री अय्याशात्री यांस ब्राह्मणाचे मध्यस्थीस घातले जे उदईक तुमचे म्हटल्याप्रमाणे याचे पारपत्य करतो. तरी ब्राह्मण न ऐकत शास्त्री यांचे आंगावरील वस्त्रे, धोतर नेसावयाचे सुद्धा झोंबून फाडिले, व श्रीमंताचाही निग्रह पाहून, प्रथम प्रहर रात्रीस हत्ती आणवून वर्ता ( वरती ) त्यास घालून बांधिला आणि सर्व शहर फिरवून पर्वतीजवळील रमण्यात नेऊन पायात बेडी घालून ठेविला. शहरातून फिरते वेळेस ब्राह्मणांनी कोतवालास पाच सात दगड मारिले. तेणेकरून काही डोकी फुटली होती व शंभर गाडदी चौकीस होते. नंतर दुसरे रोजी, भाद्रपद शुद्ध द्वितीय बुधवार प्रातःकाली, ब्राह्मण मागती दोन हजार पावेतो आजमासे जमा होऊन, श्रीमंतांचे वाड्यापुढे बहुतच गरगशा ( गोंधळ ) करू लागले. आणि बोलत जे त्यास जिवे मारल्या शिवाय आम्ही ऐकत नाही. व श्रीमंतांचेही म्हणणे त्यास जिंवे मारावयाचा त्याजवरून राजश्री बाळाजीपंत केळकर निसबत ( अधिकारात )  राघोपंत गोडबोले यांस रमण्यात पाठवून, त्याची बेडी तोडवून, उंटावर उंटाचे शेपटीकडे तोंड करून बांधून, कोतवाल चावडीस आणिला आणि पाच पाट काढून ( डोईचे केस पाच ठिकाणी कापणे ), शेंदूर डोकीत घालून पुन्हा उंटावर पूर्ववतप्रमाणे घालून आठी पेठा फिरवला, आणि गारपिरावर नेऊन सोडिला. आणि ब्राह्मणास सांगितले जे, तुम्हास पाहिजे तर सोडा किंवा मारा असे सांगून हवाली केला. त्याजवर दोन घटका दिवसात सायंकाळच्या राहता ब्राह्मणांनी धोंडे घालून मारिला. त्यास दहन करावयाची देखील परवानगी नाही, व कोतवाल मजकूर ( उपरोक्त ) याचा दिवाण बापूजीपंत व गोपाळपंत व केसोपंत भावे यांचे घरी चौक्या बसवून बेड्या घालून ठेविले आहेत. त्यांचेही पारपत्य यथास्थित चांगले करणार, व त्या देव माणसे ब्राह्मणास धरून आणावयास व कोंडून ठेवावयास जे होते त्यांची पारपत्ये शिरच्छेदाची करावी, असा श्रीमंतांचा मनोदय आहे. पुढे काय घडेल ते पाहावे, व कोतवाल मजकूर याचे घरची जप्ती मुलांमाणसांसुद्धा करून चौक्या बसविल्या आहेत. व दोघां लेकांस बेड्या घातल्या. याप्रमाणे येथे जाहले ते स्वामींस कळावया करिता लिहिले आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.  

          प्रसिद्ध इतिहास संशोधक वा. वा. खरे यांनी आपल्या ‘ नाना फडणवीसांचे चरित्र ‘ या ग्रंथात घाशीराम कोतवाल विषयी जी माहिती दिली आहे ती येथे देतो :-
 “ पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशास जाण्याकरिता निघोन असामी पसतीस श्रावण वद्य १४ रविवारी प्रहर दिवसास सायंकाळी घाशीराम कोतवाल यांचे बागात जाऊन उतरले. तेथे ब्राह्मणांनी कणसेमळ्यातील मक्याची दहा कणसे तोडली. त्यावरून माळ्याचा व त्यांचा कजिया जाहला. माळ्याने शिवीगाळ केली. त्यावरून ब्राह्मणांनी त्यास मारिले. त्याजवरून माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांजकडे आला आणि सांगितले की, फितवेखोर चोर कोमटी वगैरे आहेत, मळ्यात दंगा करतात, मला मारिले, त्यांचे पारिपत्य केले पाहिजे, असे सांगितले. त्याजवरून कोतवाल याने पंचवीस प्यादे पाठवून ब्राह्मणास मारामार करोन बांधोन भवानी पेठेत त्याचा वाडा आहे तेथे भुयारामध्ये रविवारी प्रहर रात्रीस घातले. आता ( आत किंवा जाता ? ) जात ना, तेव्हा मारून घातले. रविवारची रात्र, सोमवारचा दिवस - रात्र, मंगळवारी भाद्रपद शु. १ प्रातःकाळी मानाजी फाकडे याजला वर्तमान कळले. ( ३० ऑगस्ट १७९१ ) त्यांनी तेथे जाऊन जबरदस्तीने कुलपे तोडून भुयार उघडून ब्राह्मण ओढून बाहेर काढले त्यात अठरा ब्राह्मण मेलेले ! तीन ब्राह्मणांस जीव मात्र होता. तेही वरती काढल्यावर सायंकाळी मेले, सहा ब्राह्मण मात्र वाचले. हे वर्तमान फाकडे यांनी श्री. राजश्री रावसाहेब ( पेशवे ) यांस सांगोन पाठविले. त्यांजवरून कोतवाल याजला बोलावून आणून पुसिले. त्याने सांगितले की, कोमटी वगैरे जातीचे फितव्यामध्ये काही होते व चोरीही करीत होते. ते बातमी पक्की लावून त्याजला पेठेत ठेविले. त्यांनी काही जणांनी अफू व सोमल खाउन मेले. असे कोतवाल याने नानांस समजाविले. नानांनी मेलेल्यास जाळण्याची परवानगी दिली. कोतवाल याने कारकून मुर्दे जाळावयास पाठविला. तो मुर्द्यांजवळ गेला. तेथे फाकडे बसले होते ते त्यास मुर्दे नेऊ देईनात. की, ‘ रावसाहेब यांची परवानगी आल्याशिवाय जाळू देत नाही. कोतवालाचे ऐकत नाही.’ साफ सांगोन कारकून याजला पाठविले आणि फाकडे यांनी आपला कारकून रावसाहेबांकडे पाठविला की, ‘ एकवीस ब्राह्मण मृत्यू पावले. कोतवाल जाळावयास नेतो त्यांस तूर्त मी नेऊ दिले नाही. याची चवकशी करावी.’ असे सांगोन पाठविले. त्याजवरून कोतवाल याला बोलावून आणून नानांनी पुसिले तेव्हा त्याने पहिल्यासाखे सांगितले. त्यावरून नानांनी त्याला चौकीमध्ये बसविले आणि चौकशीस कारकून पाठविला. तो मंगळवार चार घटका दिवसपावेतो हा मजकूर जाहला. तो हजार ब्राह्मण तेलंग मिळोन एकच आकांत केला ! नानांनी दरवाजा लाविला ! सहा घटका रात्र झाली. वे ११ (?) राजश्री अय्याशास्त्री यांस बोलावून आणिले. ते नानांचे वाड्यापुढे येताच ब्राह्मणांनी मारमार करून शास्त्रीबोवांची शालजोडी व पागोटे फाडिले ! नंतर वाड्यात गेले. नानांचे त्यांचे बोलणे झाले. याला पारिपत्य देहांत असे शास्त्रीबोवांनी साफ सांगितले. ब्राह्मणांचा कट बहुत ‘ कोतवाल याजला जीवे मारावे.’ तेव्हा मग रात्रीस हत्ती आणून त्याचे पाठीवर उपडा बांधोन चार पेठे फिरवून रात्रीस रमण्यामध्ये बेडी घालून चौकी देऊन ठेविला. तेथेही ब्राह्मण दोनशेपावेतो चौकीस राहिले ! बुधवारी प्रातःकाळी ब्राह्मण जमा झाले. रावसाहेबांचा नेट भारी की, यांचे पारिपत्य करून डोके मारावे. निकर्ष फार, तेव्हा मग बुधवारी दोन प्रहरी चावडीवर कोतवाल याजला आणून उंटावर बसवून अवघे शहर फिरवून सायंकाळी दोन घटका दिवसास भवानी पेठेच्या पलीकडे अदकोसावर नेऊन सोडला. बसला राहिला. हातास काढणी लावून म्हारांनी धरली होती. तो समागमे द्रविड ब्राह्मण होते. त्यांनी दगड उचलून मस्तकावर घालून जिवे मारिला. भृगुवारी कोतवालीकडील कारकुनास बेड्या फडणीस मजमदार ( मुजुमदार ? जमादार ?) यावेगळे सगळ्यांस घातल्या. दोघा लोकांसही ( लेकांस ? ) बेडी घातली. घराचीही जप्ती जाहली. कुंटणी कोतवाल याने ठेवल्या होत्या त्यांचे व माणसे कोतवालीकडील यांचे. हात, पाय, नाक, कान काढावे ऐशी बोलवा आहे. कोतवालाचे शरीरास आग नाही. अद्यापि पडले आहे. नदीत टाकले नाही.” ( संदर्भ :- ऐ. ले. सं. नं. ३३७४ )

         विश्लेषण :-  घाशीराम सावळादास प्रकरणी आजवर विपुल लेखन झाले आहे. त्यात नानाचे विरोधक व समर्थक यांनी आपल्याला जो हवा तो अर्थ ओढून ताणून काढलेला आहे. प्रस्तुत ठिकाणी आपणांस पेशव्याच्या सहभागापुरताच या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे हि घटना श्रावण मासाचा दक्षिणा समारंभ घडल्यानंतर घडून आली. दुसरे असे की, मानाजी फाकडेने हे प्रकरण धरून लावल्यामुळे स्वतः पेशव्यास यामध्ये दखल देणे भाग पडले. या ठिकाणी मानाजी शिंद्याची थोडक्यात माहिती देतो.
          
            मानाजी शिंदे उर्फ फाकडे हा महादजी शिंदेचा नातलग असून त्याचा आजोबा साबाजी शिंदे हा सरकारस्वारीसोबत नेहमी स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभागी असे. पानिपतनंतर शिंदे घराण्याची सरदारी आपणांस मिळावी यासाठी मानाजीने प्रयत्न केला. महादजीला शिंद्यांचा वारस म्हणून मान्यता देणे दादाला गैर वाटत असल्याने त्याने मानाजीचा पक्ष उचलून धरला. तेव्हापासून मानाजी हा दादाचा पक्षपाती बनला. पराक्रमाच्या बाबतीत हा महादजीच्याच तोडीचा असून त्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ त्यास ‘ फाकडे ‘ हा गौरवपर किताब देण्यात आला होता. बारभाई, विशेषतः महादजी व नानाच्या विरोधात मानाजीने कैक कारवाया केल्या, पण सालबाईच्या तहाने दादा जाग्यावर बसला तेव्हा मानाजीचे उपद्व्याप बंद झाले. त्यानंतर त्याने नानासोबत जुळवून घेऊन पुण्यातच आपला तळ ठोकला. मानाजीची हि हकीकत काहीजणांना अप्रस्तुत वाटेल पण त्या शंकेचे निरसन योग्य स्थळी करण्यात येईल.
     
          घाशीरामाने मेलेल्या ब्राह्मणांची माहिती मनाजीला कोणी कळवली वा कळली या तपशिलापेक्षा त्यास ती समजताच त्याने बेधडकपणे कोतवालाच्या वाड्यात शिरून त्या ब्राम्हणांची सुटका केली हे महत्त्वाचे आहे. घाशीरामाचा दरारा एवढा होता कि, मानाजी वा तत्सम इसमाशिवाय त्याने कोणाला जुमानलेही नसते. असो, घडला प्रकार समजताच मानाजीने थेट पेशव्याकडे निरोप पाठवून घडल्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. पेशव्याने हि बाब नानाकडे सोपवली. तोवर सर्व बातमी घाशीरामास समजून तो आपला जीव वाचवण्यासाठी नानाकडे निघालाच होता. त्याने घडला प्रकार जसाच्या तसा न सांगता विपर्यास्त मजकूर पेश केला. तेव्हा नानाने मृतदेहांचे दहन करण्याची कोतवालास आज्ञा केली. त्यानुसार कोतवालाचे कारकून मृत ब्राम्हणांचे देह ताब्यात घेण्यास गेले असता मानाजी आडवा पडला व जोवर पेशवे स्वतः या प्रकरणी लक्ष घालत नाहीत तोवर आपण मृतदेह ताब्यात देणार नाही असा उलट निरोप पाठविला. मानाजी फाकडे मध्ये पडल्याने नानाने परत एकदा घाशीरामाची चौकशी केली. परंतु, तो आपल्या जबाबावर ठाम राहिला. तेव्हा नानाने त्यास कैद करून चौकशीसाठी आपले कारकून रवाना केले. दरम्यान घडला प्रकार स. माधवाच्या कानी पडला. त्याने आपल्या अधिकारात चौकशी केली कि नाही याचा स्पष्ट उल्लेख खरे वा सरदेसाई करत नाहीत परंतु, घाशीराम हा गुन्हेगार असल्याची त्याची खात्री पटली असल्याने त्यास शिक्षा करण्याचा त्याचा निश्चय ठरला होता हे स्पष्ट आहे. अर्थात, या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे व त्या म्हणजे ---- (१) मानाजी फाकडेने पेश्व्यास या प्रकरणी निर्णय घेण्यास एक प्रकारे जबरदस्तीने भाग पडले व (२) नाना फडणीसचा सल्ला न घेता पेशव्याने स्वतंत्र वृत्तीने निर्णय घेण्याचे कृत्य केले.

           पेशव्याने घाशीरामास दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी झाली व प्रकरण तिथेच संपले. याविषयी खुद्द नाना फडणीसने ता. ११ ऑक्टोबर १७९१ रोजी साताऱ्यास बाबूराव आपट्यास लिहिलेल्या पत्रात पुढील मजकूर आहे :- “ कोतवालाचे पारिपत्याचा वगैरे मजकूर विस्तारे लिहिला त्यास कोतवालाच्या अपराध पातकांची पराकाष्ठा जाली, सबब पारिपत्य केलें. वरकड मजकूर सर्व लटके. लबाड व द्वेषी आहेत ते मनस्वी गोष्टी उठवितात. ही पुण्यांतील लोकांची रीत चाललीच आहे. “ नानाच्या या पत्रावरून असे दिसून येते कि, घाशीराम हा अन्यायी होता हे नानास माहिती होते पण काही कारणांस्तव त्याने त्याच्या अपराधांकडे दुर्लक्ष केले होते. अर्थात, पुण्यासारख्या राजधानीच्या शहरात कोतवालीचे काम करायचे म्हटल्यावर काही प्रमाणात गैर प्रकार हा चालणारचं. असो, या प्रकरणाने आजपर्यंत कित्येक लेखकांना एक प्रकारे विलक्षण असे वेड लावले आहे. मात्र, त्यातून नेमके असे तथ्य बाहेर न येता भलत्याच विषयांना / वादांना तोंड फुटले. असो, त्या वादात न शिरता प्रस्तुत ठिकाणी आपणांस उपरोक्त दोन गोष्टींची चर्चा करायची आहे. जर मानाजी शिंदे उर्फ फाकडेने नेट लावला नसता तर स. माधवाने या प्रकरणात जातीने लक्ष घातले असते का ? याचे उत्तर नकारार्थी मिळते. मानाजी मध्ये पडला नसता तर त्या ब्राम्हणांची कोतवालाने केव्हाच वासलात लावली असती. जरी नानाच्या कानी हि बाब गेली असती तरी कोतवालाच्या विपर्यास्त जाबाबाने तो समाधानी झाला असता व त्यानेही यात लक्ष घातले नसते. घाशीराम प्रकरणी नानाचे काही समर्थक असाही युक्तिवाद करतात की, मानाजी हा नानाच्या शत्रूपक्षातील -- रघुनाथरावाच्या गोतावळ्यातील -- असल्याने त्याने मुद्दामहून नानाला उणे पाडण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग केला. यासाठीच मानाजीचे पूर्वचरित्र आधी देण्यात आले होते. जरी मानाजी दादाचा पक्षपाती असला तरी सालबाईच्या तहानंतर तो नानाचाच आश्रय घेऊन राहिला होता हे विसरून चालत नाही. मानाजी हा स्वतंत्र वृत्तीचा होता. त्याच्या सहवासात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्येही त्याच्याविषयी एक प्रकारचा भयमिश्रित आदर होता. घाशीरामाचे कृत्य त्याच्या कानी आले तेव्हा नानाला सांगण्यापेक्षा पेशव्याला त्याने यात लक्ष घालण्यास भाग पडून काही गोष्टी निश्चित साधून घेतल्या. (१) पेशव्याला आपल्या धनीपणाची जाणीव करून दिली. (२) पुणेकर व सर्वत्रांस पेशवा हा मुखत्यारीने कारभार पाहण्यास लायक आहे कि नाही हे दाखवून दिले. (३) यानिमित्ताने त्याने स्वतःला पेशव्याच्या नजरेत आणण्याचाही प्रयत्न केला. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मानाजीने यानिमित्ताने जो पायंडा पाडला त्याचा उपयोग पुढे दरबारी चर्चेत महादजीने नाना विरुद्ध केला.

           या प्रकरणातून पुढे आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स. माधवाने नाना फडणीसच्या विरोधात जाऊन स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे दाखवलेलं धाडस होय ! प्रथम जेव्हा त्यांस या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्याने नेहमीच्या पद्धतीनुसार हे प्रकरण नानाकडे सोपवले. नानाने या प्रकरणी जो निवडा केला तो मानाजीस पटला नाही व त्याने स. माधवास परत एकदा निरोप पाठवून या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. तेव्हा एकप्रकारे पेशव्याचा निरुपाय झाला म्हणा किंवा त्याची उपजत चिकित्सक वा शोधकवृत्ती जागृत झाली आणि त्याने या प्रकरणी लक्ष घातले. त्यातून जे काही बाहेर आले वा घडले तो इतिहास आहे. पेशव्याच्या निवाड्याविरोधात जाण्याचे नानाने साहस केले नाही. कारण, असे काही करण्याची त्यास काही गरजही नव्हती. नानाच्या लेखी घाशीरामास तसेही फारसे महत्त्व नव्हते आणि त्याच्या बदली कामगार नाना जवळ मौजूद होते. दुसरे असे कि, पेशव्याला निर्णय फिरवण्यास लावण्याचे त्याचे सामर्थ्य निश्चित होते, नाही असे नाही, पण त्यानिमित्ताने त्यास आणखी एका राज्यक्रांतीस आमंत्रण नव्हती. नाना, तुकोजी व अलीबहाद्दर या त्रिकुटाच्या कारवायांनी त्रस्त झालेला महादजी शिंदे आता महारष्ट्रात सैन्यासह येणार होता. अशा वेळी पेशव्याची मर्जी रक्षण्यातच नानाचा निभाव होता. कारण, महादजीसारख्या जबरदस्ताचा पेशव्यास आधार मिळाला तर आपले दरबारातील स्थान धोक्यात येईल याची नानास पूर्णतः जाणीव होती. तेव्हा प्रसंग पाहून त्याने गम खाण्याचे धोरण स्वीकारले. पुढील इतिहास पाहता नानाचे हे धोरण कमालीचे यशस्वी झाल्याचे दिसून येते.
                                                                       
                                                                     ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: