मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - २ )

                              



                नारायणरावाने पेशवेपद मिळाल्यावर आपल्या भावाच्या वर्तनाचे अनुकरण करण्यास आरंभ केला. कोणासही टाकून बोलणे, शिवीगाळ करणे इ. कृत्ये त्याच्या हातून होऊ लागली. दरम्यान कर्नाटकात स्वारी करण्याचाही त्याचा विचार चालला होता. कारभार जरी तो बापूच्या सल्ल्याने करत असला तरी तो बापूच्या तंत्राने वागत नव्हता. चालू राज्यकारभारात आपणांस महत्त्व नाही हे ओळखून नाना फडणीस देखील कमालीचा तटस्थ बनला होता. दरबारात बापूचे व पटवर्धनांचे हिशेबाच्या भानगडीवरून खटके उडाले होते. पटवर्धन हे पूर्वीपासून माधवरावाचे पक्षपाती असल्याने त्यांत पक्षीय भावनेची भर पडली. अशा परिस्थितीत बापू व पटवर्धन मंडळींना सोबत घेऊन नारायण मार्च महिन्यात गोपिकाबाईच्या भेटीस गंगापुरास गेला. इकडे नारायण पुण्यातून दूर गेल्याचे पाहून रघुनाथाने पुण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हैदर, भोसले इ. सोबत त्याचे संधान आधीच जुळले होते परंतु, दादाचा प्रयत्न उघडकीस येऊन वर्तमान नारायणास कळवण्यात आले. तेव्हा गंगापुरातील आपला मुक्काम तातडीने गुंडाळून नारायण पुण्यास आला. हैदरअलीचा पुणे दरबारातील वकील आपाजीराम हा दादास सामील होता. त्यास बेड्या घालून पुरंदरी रवाना केले व दादाला कडक नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याला सूर्यदर्शनासाठी गच्चीवर देखील जाण्याची बंधने लादण्यात आली. त्याशिवाय चुलत्यास उद्देशून नारायणराव अपमानकारक भाषेत बोलू लागला. परिणामी, दादा त्राग्याने उपोषणे करू लागला. त्याच्यामुळे आनंदीबाईस देखील उपवास घडू लागले. दोघांच्या दरम्यान मध्यस्थी करण्याचे इतरांनी प्रयत्न केले पण ते सिद्धीस गेले नाहीत. याची परिणती, नारायणास कैद करून रघुनाथरावास पेशवा बनवण्याचा कट रचण्यात झाली. या कटांत दादापासून माधवरावाच्या सर्व पक्षपात्यांचा कमी - अधिक प्रमाणात सहभाग होता. यामध्ये दादाचे सर्वच पाठीराखे ज्याप्रमाणे सहभागी होते त्याचप्रमाणे माधवरावाच्या खास वर्तुळातील समजले जाणारे हरिपंत फडके, नाना फडणीस हे देखील सामील होते. नानाने पेशव्यास आपले पागोटं सांभाळण्याची केलेली सूचना किंवा कटाची माहिती मिळूनही बंदोबस्त करण्यात हरीपंताने केलेली दिरंगाई यावरून सर्व काही उघड होते. असो, ता. ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेल्या दंग्यात नारायणराव पेशव्याचा खून झाला व रघुनाथरावाची कैदेतून मुक्तता झाली. या ठिकाणी कट कोणी व कसा रचला आणि तो कशा प्रकारे सिद्धीस  नेला याच्या तपशीलात जाणे अप्रयोजक ठरेल. ज्यांना याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी श्री. पांडुरंग गोपाळ रानडे यांचा ‘ नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ?’ हा ग्रंथ अभ्यासावा.
           
                    नारायणाच्या खुनानंतर रघुनाथरावाने पेशवेपदाचा कारभार हाती घेतला. परंतु, घडल्या प्रकरामुळे बरेच दरबारी मुत्सद्दी व मानकरी नाराज झाले होते. अर्थात, हि नाराजी दोन प्रकारची होती. पहिला प्रकार म्हणजे, पेशव्याचा खून व्हावा अशी कटवाल्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण घडल्या प्रकाराविषयी आता हळहळ व्यक्त करण्यापलीकडे ते काय करू शकत होते ? दुसरा प्रकार म्हणजे, अननुभवी नारायणास हाती धरून कारभारात आपले वजन व प्रस्थ वाढवण्याचा त्यांचा हेतू जागच्या जागी जिरला होता. कारण, पेशवेपदी आता अनुभवी, प्रौढ असा रघुनाथराव विराजमान झाला होता ! अशा परिस्थितीत नारायणराव पेशव्याची पत्नी गरोदर असल्याची बातमी सर्वत्र झाली आणि असंतुष्ट दरबारी मुत्सद्द्यांनी रघुनाथरावास पदच्युत करण्याचा निर्णय घेतला. नाना फडणीसचे चरित्रकार श्री. वा. वा. खरे व रियासतकार सरदेसाई यांची बारभाई कारस्थानाविषयीची मते अभ्यासली असता असे लक्षात येते की, नारायणरावाच्या खुनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यचे स्वप्न फक्त बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसलाच पडले. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन संभाव्य राज्यक्रांती घडवून आणून त्यात मुख्य कारभार आपल्या हाती घेण्याचे नाना फडणीसने योजले. रघुनाथरावास पदच्युत करण्याच्या कामी जे बारभाई मंडळ उभारण्यात आले त्यामागील प्रमुख प्रेरणा नानाचीच होती परंतु, त्याने प्रत्यक्ष सहभाग न घेता पुढारपण सखारामबापूकडे दिले. बापूने प्रसंग पाहून दरबारी मुत्सद्द्यांना व सरदारांना आपल्या विश्वासात घेऊन दादाच्या विरोधात एक कारस्थानी मंडळ उभारले व दादा हैदरवर चालून गेल्याचे पाहून बापू व नानाने शनिवारवाड्यातून गंगाबाईस बाहेर काढले व तिला पुरंदरी रवाना केले. साताऱ्यास छत्रपतींना घडल्या प्रकाराची माहिती कळवून ता. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी रघुनाथरावास पेशवेपदावरून बडतर्फ करण्यात आल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. यांमुळे दादा बंडखोर ठरला तर बापू व नानाचे कारभारी मंडळ कायदेशीर बनले. हे दोघे गंगाबाईच्या नावाने कारभार करू लागले. यामागे नारायणरावाच्या अपराध्याला शिक्षा करण्याचा हेतू नसून जो जन्माला येईल त्या अल्पवयीन पेशव्यास मुठीत ठेवून सर्व राज्यकारभार आपल्या तंत्राने चालवण्याचा स्वार्थ होता, हे उघड आहे.
        
                        कारभारी मंडळाच्या या पवित्र्याने दादा आरंभी गडबडून गेला. परंतु, लवकरच त्यास परिस्थितीची सर्व उमज पडून त्याने कारभारी मंडळात भेद करण्याचा यत्न केला. त्याचप्रमाणे निजाम, भोसले, इंग्रज, हैदर यांच्याकडेही मदत मागितली. परंतु, निजाम व भोसले यांनी यापूर्वीच कारभाऱ्यांचा पक्ष स्वीकारला होता तर इंग्रज कोणीकडून काय मिळते याकडे लक्ष ठेवून होते. राहता राहिला हैदर, तर त्याने दादाला पाठिंबा दिला होता. असो, पुढे हा झगडा सुमारे ७ - ८ वर्षे चालला. दरम्यान या अवधीत अनेक घडामोडी घडून आल्या. पुरंदरावर गंगाबाई प्रसूत होऊन दि. १८ एप्रिल १७७४ रोजी तिला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे करण्यात येऊन त्याच्या नावे पेशवेपदाची वस्त्रे मागवण्यात आली. सवाई माधवरावाच्या जन्मामुळे कारभारी मंडळास जोर येऊन त्यांनी दादाच्या बंदोबस्ताकडे विशेष लक्ष दिले. त्यातूनचं पहिले इंग्रज - मराठा युद्ध घडून आले. स. १७८३ च्या सालबाईच्या तहाने इंग्रज - मराठा युद्धाचा व दादाचाही निकाल लागला. या तहान्वये दादाचे राजकीय महत्त्व साफ लयास जाऊन पेशवाईचा सर्व कारभार बालपेशव्याच्या वतीने नाना फडणीस पाहू लागला. स. १७७४ पासून स. १७८३ पर्यंत मराठी राज्यात अनेक घडामोडी घडून आल्या. त्या सर्वांची दखल येथे घेणे शक्य नाही. मात्र, या ठिकाणी बालपेशव्याच्या संबंधित काही घटनांची थोडक्यात माहिती घेऊ.

                    ता. १८ एप्रिल १७७४ रोजी स. माधवरावाचा जन्म झाला. जन्मानंतर अवघ्या ४० दिवसांनी त्यांस समारंभपूर्वक पेशवेपदाची वस्त्रे प्रदान करण्यात आली. ( दि. २८ मे १७७४ ) बालपेशव्यास व त्याच्या आईस दगाफटका करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातील खरे किती व खोटे किती हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मात्र, त्या सर्वातून त्याचा बचाव करण्यात सर्वच मुत्सद्द्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली हे नाकबूल करता येत नाही. जन्माच्या ४० व्या दिवशी पेशवाई लाभलेल्या स. माधवाच्या आयुष्यात स. १७९१ च्या ऑगस्टपर्यंत अनेक घडामोडी घडून आल्या. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांस मातृशोक घडून आला. ता. १२ जुलै १७७७ रोजी गंगाबाईचा पुरंदर येथे नवज्वराने मृत्यू झाला. त्यानंतर या पेशव्याचे संगोपन प्रामुख्याने पार्वतीबाईच्या देखरेखीखाली झाले. वस्तुतः, गोपिकाबाईने आपल्या नातवाच्या देखभालीसाठी यावेळी घरी परतणे योग्य होते पण करारी व निश्चयी आणि हेकट स्वभावाची माणसे सहसा आपल्या निश्चयापासून ढळत नाहीत. याप्रमाणे गोपिकाबाईचे वर्तन होते. थो. माधवराव मरणोन्मुख अवस्थेत होता तेव्हा ती आली नाही. नारायणाचा खून झाला तेव्हाही ती फिरकली नाही. पुढे स. माधवाचा जन्म झाला त्यावेळी देखील तिला नातवाचे तोंड पाहण्यासाठी का होईना पुण्यास यावेसे वाटले नाही. असो, पार्वतीबाईच्या देखरेखीखाली पेशव्याचे बालपण चालले होते खरे पण, आयुष्यभर ‘ आपण सधवा आहोत कि विधवा ?’ या प्रश्नात गुरफटून पडलेल्या पार्वतीकडून बालपेशव्याकडे संपूर्णतः लक्ष देणे फारसे  झालेलं दिसत नाही. त्यातच याच काळात भाऊच्या तोतयाचे प्रकरण अनिवार होऊन शेवटी तो तो तोतया असल्याचे सिद्ध करण्यात येऊन त्यास ठार करण्यात आले. मात्र, तरीही आपला पती अजूनही जिवंत आहे याच आशेवर ती बाई आला दिवस कंठत होती. अशा मनःस्थितीत असलेल्या व्यक्तीकडून बालपेशव्याचे संगोपन काय होणार ते दिसतंच होते.    

                        यावेळी कारभारी मंडळावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. त्यांनी आपणहून बालपेशव्याच्या संरक्षणाची जबाबदारी तर स्वीकारली होतीच  त्यानुषंगाने त्याच्या संगोपनाची / शिक्षणाची देखील व्यवस्था करणे त्यांना गरजेचे होते. लौकिकात ते बालपेशव्याला त्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते तरी प्रत्यक्षात पेशव्याच्या नावाने कारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली होती. बाल पेशवा जोवर जिवंत आहे तोवर या सत्तेचा आपणांस उपभोग घेत येईल याची त्यांस पूर्णतः जाणीव असल्याने स. माधवरावास ते आपल्या जीवाहून अधिक जपत असल्यास नवल नाही. स. माधवराव जसजसा मोठा होत होता, तसतशी घडून येत असलेल्या राज्यक्रांतीच्या फायद्याची मुत्सद्दी मंडळास कल्पना येऊ लागली होती. बाल पेशवा ज्याच्या हाती, त्याच्या ताब्यात राज्याची सर्व सूत्रे हे त्यांना समजू लागले होते. याचा परिणाम म्हणजे, कारभारी मंडळात सर्वचं कारभार आपल्या हाती घेण्याची स्पर्धा लागली. यांमध्ये नाना व बापू हे आघाडीवर असून त्यात नानाचा चुलत भाऊ मोरोबा हा तिसरा पण दुय्यम प्रतिस्पर्धी होता. कारभार व बाल पेशव्याचा ताबा घेण्यास हे तिघेही उत्सुक होते खरे पण तिघांची अनेक वैगुण्ये असल्याने त्यांना स्वबळावर हे कार्य सिद्धीस नेणे शक्य होत नव्हते. याचे प्रमुख कारण म्हणजे या तिघांकडेही लष्करी सामर्थ्य नव्हते. सखारामबापू हा जरी लढवय्या आणि कारस्थानी पुरुष असला तरी चार पाच हजारांच्या वर फौजफाटा बाळगणे व त्याबळावर एखादी मसलत सिद्धीस नेणे त्याच्या आवाक्याबाहेर होते. मोरोबा फडणीसची देखील तीच तऱ्हा होती आणि नानाकडे लष्करी नेतृत्वाचे गुण तर अजिबातच नव्हते. कागदावर जरी त्याच्या दिमतीला लष्करी पथक असले तरी त्याने त्याचे कधी नेतृत्व केलेलं नव्हते. अशा परिस्थितीत बालपेशव्याला बगलेत मारून राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेण्यासाठी या तिघांनी परस्परांच्या विरोधात बुद्धीबळाचा पटचं मांडला. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धास जी काही तात्कालिक कारणे आहेत, त्यांमागे या चतुरस्त्र राजकारण्यांची परस्परविरोधी राजकारणेही कारणीभूत आहेत. इंग्रज, निजाम, हैदर - टिपू, भोसले, गायकवाड इ. ची सूत्रे सांभाळत व त्यांच्या कारस्थानांना तोंड देत नाना फडणीसने महादजी शिंदे, हरिपंत फडके व पटवर्धन मंडळींच्या बळावर सखारामबापू, मोरोबा फडणीस यांना राजकीय गुन्ह्यांत अडकवून कैदेत टाकले. पैकी, बापूचे कैदेत असताना निधन झाले तर नाना फडणीस मरण पावल्यावर मोरोबाची सुटका झाली. याशिवाय पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाच्या समाप्ती सोबतच रघुनाथरावाचाही प्रश्न निकाली निघाला. तो नाना फडणीसच्या हवाली झाला. त्यांस उदरनिर्वाह व स्नानसंध्येपुरती नेमणूक देण्यात आली आणि राजकारणात सहभाग न घेण्याचे निर्बंध त्याच्यावर लादण्यात आले. मात्र, तत्पूर्वी महादजीकडे दादाने अंतस्थ खटपट करून आपल्या पुत्रास -- बाजीरावास --- राज्यकारभारात महत्त्व राहील अशी खबरदारी घेतली होती. दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंद्याच्या तथाकथित मैत्रसंबंधांचे हे आद्य कारण असून याकडे अजून इतिहास संशोधकांचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे.   

                रघुनाथाचा बंदोबस्त झाल्यावर नानास थोडी उसंत मिळाली. त्याच्या सुदैवाने सालबाईचा तह झाल्यावर लवकरचं म्हणजे स. १७८३ च्या ११ डिसेंबर रोजी दादाचे निधन झाले. दादा सारखा कारस्थानी पेशवा मरण पावल्याने नानाचा मार्ग बराचसा निष्कंटक झाला. दरबारातील त्याच्या एकाधिकारशाहीस आव्हान देण्याची शक्ती आता फक्त होळकर व शिंद्यांमध्ये होती. त्यापैकी महादजी दिल्लीच्या भानगडीत गुंतल्याने शिंद्यांचा धोका टळला होता. होळकरांच्या घरात अधिकार वाटणीवरून अहिल्याबाई व तुकोजीमध्ये तंटा निर्माण झाल्याने त्यांचेही लक्ष पुणे दरबारातील घडामोडींकडे फारसे नव्हते. असे असले तरीही नाना गाफील नव्हता. शिंदे - होळकर  हे परस्परांशी विभक्त असण्यातच आपला फायदा आहे हे पेशव्यांचे सूत्र नानाच्या मनावर पक्के ठसलेलं होतं. त्यानुसार त्याने आता तुकोजीला गोंजारण्यास आरंभ केला होता. मजेची बाब म्हणजे, पहिले इंग्रज - मराठा युद्ध संपेपर्यंत महादजी शिवाय नानाचे पान हलत नव्हते आणि त्यामुळे तुकोजीस दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. मात्र, आता नानाला आपली चूक उमगून त्याने तुकोजीला जवळ करून महादजीचे प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न चालवला. पुढे - मागे महादजी सोबत संघर्ष करण्याची वेळ आली तर त्याला अटकेपार जाणाऱ्या तुकोजी होळकर शिवाय दुसरा कोण त्राता होता ?
                                                                                                                                                                                                                              ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: