सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ३ )


                    परकीय व स्वकीय शत्रूंना तोंड देण्यात नाना गुंतला असला तरी बाल पेशव्याच्या संरक्षणाकडे त्याचे अजिबात दुर्लक्ष झाले नव्हते. शेवटी पेशव्याच्या जीवावरच त्याच्या सर्व उड्या होत्या ना ! स. १७७६ मध्ये इंग्रजांसोबत पुरंदर येथे तहाची वाटाघाट चालली त्यावेळी इंग्रज वकील व पेशव्याच्या भेटीचा प्रसंग उद्भवला. यावेळी पेशवा सुमारे पावणेदोन वर्षांचा होता. अपरिचित वस्त्रांतील माणसे पाहून तो घाबरेल म्हणून प्रत्यक्ष भेटीआधी इंग्रजी पोषाखातील लोकांचा वावर मुद्दाम त्याच्याभोवती ठेवण्यात आला होता. यांमुळे इंग्रज वकील अप्टनच्या भेटीचा प्रसंग निभावून गेला. स. १७७७ मध्ये सवाई माधवाची आई -- गंगाबाई -- हिचे निधन झाले. तिचा मृत्यू तसा अकस्मात असाच होता. गंगाबाई जरी नवज्वराने मरण पावली असे अस्सल कागदपत्रांच्या आधारे सांगितले जात असले तरी ती नवज्वराने न मरता तिने आत्मघात केला वा तसे करण्यास तिला भाग पाडण्यात आले असेही अस्सल कागद पत्रांतून आढळून येते. असो, ३ वर्षाच्या मुलास हा मातृवियोग सहन करावा लागला. अर्थात, आईच्या भेटीची इच्छा त्याने व्यक्त केली असता  काहीतरी कारण सांगून त्यांस गंगाबाईचा विसर पाडला जात असे. कारण ; तीन वर्षांच्या बालकास ‘ मनुष्य मरतो म्हणजे नेमके  काय होते ‘ हे थोडी समजणार ? गंगाबाईच्या निधनानंतर इंग्रजांचे पुण्यावर आक्रमण होण्याचे चिन्ह दिसू लागले परंतु, स. १७७९ च्या आरंभी तळेगाव - वडगाव येथे इंग्रजांची कोंडी झाल्याने त्यांनी माघार घेतली. यावेळी मराठी सत्तेचे राजकीय महत्त्व व लष्करी बळ इतर सत्ताधीशांच्या नजरेस आणून देण्यासाठी नानाने स. १७७९ च्या २१ एप्रिल रोजी पर्वती येथे मोठ्या समारंभाने बाल पेशव्याच्या मुंजीचा कार्यक्रम घडवून आणला. इकडे राजकीय आघाडीवर धामधूम सुरु असली तरी बाल पेशव्याच्या शिक्षणाकडे नानाचे दुर्लक्ष झाले नाही. तत्कालीन प्रघातानुरूप भावी पेशव्यास आवश्यक ते सर्व लिखापढीचे शिक्षण त्यास देण्यात आलेचं.  त्याशिवाय व्यायामाचीही त्यास हळूहळू तालीम देण्यात येऊ लागली.
                 स. १७८२ सालच्या अखेरीस सालबाईच्या तहाची वाटाघाट सुरु होऊन पहिले इंग्रज - मराठा युद्ध बंद झाले. तेव्हा नानाने पेशव्याच्या विवाहाकडे लक्ष पुरवले. दरम्यान याच सुमारास बहुतेक नानाच्या किंवा इतर कोणा मुत्सद्द्याच्या सल्ल्यावरून स. माधवरावाने आपल्या आजीसाठी पत्र लिहिले. त्यात वर्तणूकीसंबंधी उपदेश करण्याची त्याने विनंती केली. तेव्हा त्या पत्रास उलट उत्तर म्हणून म्हणा किंवा आपल्या राज्यकारभार करणाऱ्या नातवास उपदेश करण्यासाठी म्हणा, गोपिकाबाईने सुमारे १३ कलमी उपदेशपर पत्र लिहिले, ते खालीलप्रमाणे :-
काव्येतिहास पत्रे व यादी व लेख ३९३ (५९)            
                                                                              ८ जाने. १७८३
        श्रियासह चिरंजीव राजश्री माधवराव प्रधान यांसि प्रति गोपिकाबाई मुक्काम नाशिक आशीर्वाद  उपरी येथील कुल तागायत छ. ४ माहे सफर जाणून सकीय [ स्वकीय ] कुशल वर्तमान यथास्थित असे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले.
            “ मी लहान, वडिली ( आजीने ) सर्व त्याग करून श्रीक्षेत्री वास केला आहे. त्यास सर्व माहित वडिलांस, यास्तव कोणे रीतीने चालावे हे सर्व ल्याहावयास आज्ञा व्हावी.” म्हणोन लिहिले त्यास सूर्यग्रहण संधि अन्वये कृष्णपक्ष होऊन लोप जाहला होता ( सर्वोतोपरी वाईट दिवस होते.) तो हल्ली पुण्योदये करून दुष्टांचा संहार व सुष्टांचे पालग्रहणार्थ तुम्ही ( स. मा. ) या कुळात जन्म घेऊन पुरंदर येथे उदयास आला. त्यापक्षी इकडून लिहावयाचे कारण दिसत नाही. परंतु मानवी देह आणि तुम्ही लिहिले, त्यापेक्षा तूर्त चालावयाचे जे सुचले ते लिहिले आहे.
१  प्रातःकालचे घटका रात्रौ उठोन दिशेस जाऊन पादप्रक्षालन मुखप्रक्षालन करून दिवाणखान्यातील श्रीमृत्तिका गणपतीचे ( मातीचा गणपती ) दर्शन घेऊन प्रातः स्मरणाचे श्लोक म्हणावे. नंतर सूर्योदयाबरोबर वैद्यांनी येऊन हात पाहावा.
    प्रकृति अन्वयें औषध घ्यावें. नंतर लिहावयास बसावे. कित्त्यात हात फिरवून मग ज्या कागदावर निशाणे ( शेवटली अक्षरे ) व्हावयाची असतील ते लिखितान्वयेंच वाचावे. ते समयीं जवळ गुरुजी [ महादजी बल्लाळ गुरुजी ?] व आणखी एक दोघे संभावित योग्य असतील ते असावे. जास्त असो नये. येणेप्रमाणे घटिका तीन येकूण घटिका …. कलम १
१ तालीमखान्यात जाऊन दंड काढावे. दिवसेंदिवस शक्ति अन्वयें चढते दंड असावे ; बरोबर समवयी मुलें पांच चार संभावितांचीं असावी ; व जेठी ( मल्ल ) येक दोघे व नेहमी विश्वासु ग्रहस्थ बरोबर असावयाचे ते असावे. खिजमतगार कार्यकारण असावे. जेठी यांनी कुस्तीचे डाव शिकवावे. नंतर समवयी मुलांसुद्धा प्रकृतीस जो खुराक मानेल तो नेमें - करून घेत जावा. येणेप्रमाणे घटिका दीड. येकूण घटि साडेचार …. कलम २
१ स्नान करावयाचे समयीं पंचांग जोशी वाचून संकल्प सांगावा. नंतर गंगाष्टक म्हणावें ; संध्या थोंडकी परंतु न बोलतां करावी, तर्पण करावें. उपाध्ये यांणीं पूजा करावी. ते समयी पुराण देवघरात व बाहेर गायन होत असावे. आपण तुळशी फुलें माळा वहावीं. नंतर नित्य दाने देऊन क्षणभर बसावें. ते समयी शास्त्री व वैदिक महान शिष्ट आल्यास नमस्कार करून योग्यतेनुरूप उत्थापन देऊन काही भाषण करावें. नंतर उपहार करावयास जावें. येणेप्रमाणे घटी साडेतीन. येकूण घटी आठ …. कलम ३
१ कचेरी यावे ते समयीं सर्वाक्ष देऊन योग्यतेनुरूप नेत्रलाभ व भाषण होत असावें. कचेरीत लघु बोलूं नये व गैर नि ही ( ! ) बोलू नये. मनुष्य परीक्षा असावी. गैर वाका एखाद्याने समजाविलेस पक्केपणी विचार करून अपराध ठरल्यास दुसऱ्याकडून त्यास निषिद्ध करवावें. आपण नेत्रकटाक्ष करून पाहावें. अपराधानुरूप पारपत्य करावें, परंतु संभावित गृहस्थ बहुत दिवस पदरीचा प्रामाणिक. अशाने रद बदली केली असतां क्षमा करावी. दुसऱ्याचे क्षूद्र कांढू नये. येणे करून त्यांचा अपमान होतो, आणि तो त्याचे मनात दंश राहतो, साधल्यानुरूप नाश करील. आणि आपल्यास लघुपणा येईल. संन्निधानीं लोभात लघु मनुष्य राखल्यास जें केलें त्यास ते रुकार होतात, परंतु जन लोक वाईट म्हणतात, थोरपणास हानि होती. येणेप्रमाणे घटी तीन. येकूण घटी अकरा …. कलम ४
१ भोजनाचे पूर्वी सोंवळें जाहले नंतर थोरल्या देवघरात जाऊन फुले घालून, नमस्कार करून. ब्राह्मणास उदके सोडून भोजनास बसावें. ते समयीं भाषण करावें तें राजसूय यज्ञांतील ब्राह्मणभोजन प्रकरणी वगैरे योग्य सर्वांस दिसेल ते बोलावें. पाक करणार व शिष्टमंडळी सुशिक्षित विश्वासुक असतील ते बाळगावे. घटी २ येणे प्रमाणें घटी १३ …. कलम ५
१ भोजनोत्तर आचमन करून शतपदी करून तांबूल घ्यावा. नंतर दोन घटिका राजविलास खेळ खेळावे. एखादे दिवशी निद्रा आल्यास घटी अर्ध घटिका निजावे. येणे प्रमाणें घटी २ येकूण घटी पंधरा …. कलम ६
१ शास्त्री यांजवळ विराटपर्वापासून भारतातील चिंतनिका करीत असावी ; व वृद्ध मनुष्यें पदरची बहुत दिवशीं व अन्य शहाणे असतील त्यांशी दिल्ली प्रकरणी गोष्टी कशा जाहल्या त्या ऐकण्यात असाव्या. आपले वडिलांच्या गोष्टी कारभारी यांसी एकांत स्थळी विचारीत असावे ; व तसबिरा व नकाशे अनेक पहात असावे. ते समयीं शाहाणे बुद्धिमान असतील ते जवळ असावे. येणेप्रमाणें घटिका चार एकूण घटिका १९ …. कलम ७
१ खर्डे लिहावयास बसलें, तें समयीं  मुलें संभावित गृहस्थीची बुद्धिमान पहावयासी असावी. करदन बस्तन, गुणाकार भागाकार करावयाचा सराव बहुत असावा. गुरुजी यांनी विद्याभ्यासाकरिता बोलणे प्राप्त आहे. परंतु लिहावयाचे जागीच बोलणे तेथे विशेष कोणी असो नये. घरी चार येऊन घटिका तेवीस …. कलम ८
१ लिहिणे जाहले नंतर काही उपहार थोडासा मर्जी असल्यास मुला समवेत घेऊन करावा. नंतर तांबूल घ्यावा. घटी एक एकूण घटिका चोवीस …. कलम ९
१ घोडी फेरावयास चार रोजांनी जात जावे. ते समयी बरोबर पटवर्धन मंडळी व अन्यत्र सरदार असावे. त्यांशी भाषण करणे ते संतोषवृत्तीने करावे. परंतु अत्यंत लोभही नसावा व विरुद्ध ही न दाखवावे. काही जाहल्यास क्षमा होणार नाही असे भय असावे. योग्यता बघून त्यांची भाषण संतोषे करून करावे आणि दिवशी बाग पहावयास गेल्यास जिन्नस तेथे फुले व फळे जी आणून पुढे ठेवतील ती यथायोग्य बघून त्यास देववावी व आपण द्यावयाची असतील त्यास आपण देऊन मग यावे. ज्या दिवशी स्वारी जावयाची नाही, त्या दिवशी कागदपत्र दवलत प्रकरणी असतील ते कारभारी याणी समजावीत असावे ते समयी कोणी असो नये व गंगाभागीरथी ताईसाठी यांची भेट चार रोजी एक वेळ घेत असावी. त्यासच वाड्यात यावयाचा बेत व्हावा. नंतर त्यास बहुत संतोषेकरून बोलावे व मूल पणाने बोलण्याचा डौल दाखवावा. वाड्यातच आज रहावे. असा आग्रह करून ठेऊन घेत जावी. दिवाण यांणी राजकारणाचे वर्तमान व पुढील योजना करावयाचा विचार करून विनंती करीत असावी. त्या समयी अन्यत्र कोणी असो नये व त्यातील अभिप्राय दुसऱ्यांपाशी निघो नये. म्हणजे मसलती असाध्य होत नाहीत. बातमी हरतऱ्हेची राखावी, म्हणजे मसलतीस बल बहुत आहे. एकूण घटिका अठ्ठावीस …. कलम १०
१ तिरंदाजी करावयास जावे. तेथे बरोबर सरदार व पागे व मानकरी बरोबर असल्यास तीर कोण कसे मारता हे ध्यानात असावे. व हरएक खेळ पहावयाचे ते सर्वत्र समवेत पहावे. येणेप्रमाणे घटिका दोन एकूण घटिका इ. …. कलम ११
१ दीप दर्शन जाहल्यानंतर संध्येस वस्त्रांतर करून बसावे. संध्या जाहलेनंतर स्तोत्रपाठ म्हणावा. नंतर पुरुष सुक्त अथवा पवमानातील अध्याय म्हणावे ते समयी अधिज्ञांनी जवळ असावे. नंतर भोजनास जावे. भोजन होऊन उठेपर्यंत घटी चार …. कलम १२
१ भोजनोत्तर तांबूल खावयास दिवाणखान्यात क्षणभर बसून तांबूल घ्यावे. नंतर कार्याकारण मंडळी जवळ असावी. ते समयी बातमीदार यांणी वर्तमान गुप्त सांगत असावे ; व हरयेक बातमीची पत्रे विश्वासु मनुष्य कोण असेल त्याजकडे काम योजावे, त्याणी सांगावे व त्यावर ही बातमी प्रमाण अथवा सप्रमाण सांगतात याची चौकशी कसावी. नंतर निद्रेस जावे. येणे प्रमाणे घटी तीन एकूण घटिका सात.
    
     एकूण कलमे तेरा लिहिली आहेत, ती ध्यांनी आणोन चालल्यास उपयोगी पडतील. बहुत काय लिहिणे हे आशीर्वाद.   
              या ठिकाणी प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे व ती म्हणजे यावेळी सवाई माधवरावाचे वय अवघे ९ वर्षांचे होते.  हि बाब लक्षात घेऊनच या उपदेशपर कलमांकडे पहावे लागते. गोपिकाबाईच्या या पत्रात एकूण १३ कलमे असून त्यातून प्रथमदर्शनी लक्षात येणारी बाब म्हणजे यात नाना फडणीसला अजिबात विशेष असे महत्त्व दिलेलं नाही. स. माधवाचा संरक्षक व एकप्रकारे पालक म्हणून नाना कार्यरत असताना देखील गोपिकाबाईने त्यास या पत्रात फारसे महत्त्व का दिले नाही हे  समजायला मार्ग नाही. दुसरे म्हणजे गुरुजी म्हणून जो उल्लेख या पत्रात येतो, तो महादजी बल्लाळ गुरुजी यास अनुलक्षून असावा. हा थोरल्या माधवरावाच्या काळात त्याच्या निकटवर्तीयांपैकी एक होता. तिसरी गोष्ट म्हणजे, पटवर्धनांच्या विषयी गोपिकाबाईने केलेली सूचना चिंत्य आहे. नानासाहेब पेशव्याच्या काळापासून पटवर्धनांवर पेशव्यांची खास मर्जी होती. थो. माधवराव व नारायणरावच्या काळातही पटवर्धन नानासाहेबाच्या वंशजांची मर्जी रक्षून होते. त्यांच्याशी कशा प्रकारे वर्तन ठेवायचे याविषयी गोपिकाबाईने आपल्या नातवास जो उपदेश केला आहे त्यामुळेच मननीय आहे. त्याव्यतिरिक्त इतर जो काही उपदेश गोपिकाबाईने माधवास केला आहे तो सहेतुक आहे आणि तसा असायलाच हवा ! गोपिकाबाईचे पत्र समग्र वाचले असता असे लक्षात येते कि, येत्या काही वर्षांत आपला हा नातू स्वतःहून राज्यकारभार पाहण्यास तयार व्हावा या हेतूने तिने त्यांस जसे सुचेल त्याप्रमाणे लिहिले आहे.
           ता. १० फेब्रुवारी १७८३ रोजी केशव नाईक थत्ते यांच्या कन्येशी -- रमाबाईसोबत स. माधवरावाचा विवाह झाला. या लग्नासाठी राज्यातील सर्व प्रमुख मुत्सद्द्यांना व सरदारांना बोलावण्यात आले होते. सालबाईच्या तहाची पूर्तता याच सुमारास पुण्यास व्हावी यासाठी नानाने महादजीला इंग्रज वकिलासह पुण्यात येण्याची सूचना केली होती पण ते जमू शकले नाही. उत्तरेतील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे महादजीला लग्न सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. जवळपास याच कारणांनी अहिल्याबाई देखील समारंभास अनुपस्थित होती. पण तिच्या वतीने तुकोजी होळकर या कार्यक्रमास हजर होता. रघुनाथराव आणि इंग्रजांच्या विरोधातील लढायांमध्ये पुणे दरबारची मदत करणाऱ्या निजामास देखील विवाह सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होते. त्याने आपला मुलगा पोलादजंग यांस पाठवले. परंतु, तो विवाहानंतर येऊन दाखल झाला. तेव्हा त्याच्या सन्मानार्थ नानाने फिरून एक मेजवानी समारंभ आयोजित केला. या लग्नाच्या निमित्ताने नाना व पुणे दरबारने आपल्या सर्व शत्रू - मित्रांना स्वसामर्थ्याचे एकप्रकारे दर्शन घडवले असेच म्हणावे लागेल.
           
                    विवाहानंतर स. १७८४ मध्ये स. माधवरावास घेऊन नाना व हरिपंत फडके गंगापुरास गोपिकाबाईच्या भेटीस गेले. गंगापूर येथे गोपिकाबाईने बाळकृष्णाचे मंदिर स्थापले होते. त्याच्या सालीना खर्चासाठी पेशव्याच्या नावाने एक लक्ष रुपयांची सनद करून देण्यात आली. काही दिवस आजी जवळ राहून स. माधवराव पुण्यास परतला. दरम्यान या काळात नानाच्या मनात निश्चित एक धोरण आकारास येत होते असे दिसून येते. वर गोपिकाबाईचे  जे उपदेशपर पत्र देण्यात आले आहे, त्यानुसार पेशव्याच्या शिक्षणाची व्यवस्था न ठेवता नानाने उलटा क्रम स्वीकारला.    
                                                                             ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: