सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू? आत्महत्या की खून? ( भाग – १ )

            
                  स. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतरचा मराठी साम्राज्याचा इतिहास हा तसा संमिश्र स्वरूपाचा आहे. स. १७६१ नंतर मराठेशाहीचे ब्राम्हणी पेशवाईत रुपांतर होत गेले. वस्तुतः याचा आरंभ स. १७४९ च्या अखेरीस सातारच्या शाहू छत्रपतीच्या निधनानंतर झाला होताचं. पण त्याचे बऱ्यापैकी दृश्य परिणाम पानिपत नंतरच्या कालखंडात दिसून येतात. शाहू छत्रपतीच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या व पर्यायाने मराठी राज्याच्या राजकारणाचे केंद्र साताऱ्याहून पुण्यास आले. परंतु, राज्यक्रांतीच चक्र एवढ्यावरचं थांबले नाही. छत्रपतींची अमर्याद सत्ता पेशव्यांच्या हाती येताच पेशवे कुटुंबात कलह निर्माण झाले. पानिपत घडून येईपर्यंत पेशवे घराण्यातील हि अंतर्गत धुसफूस म्हणजे रिकामटेकड्या लोकांचा तोंडी लावण्याचा विषय बनला होता. परंतु, पानिपतचा बसलेला फटका, विश्वासरावाचे धारातीर्थी पडणे, सदाशिवरावाचे गायब होणे आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर घडून आलेला नानासाहेब पेशव्याचा मृत्यू ! लागोपाठ घडलेल्या या घटनांनी भट कुटुंबीयचं काय पण उभे मराठी साम्राज्य आंतून  हादरून गेले. अनुभवी व संधीसाधू राजनीतीतज्ञांना राज्यक्रांतीच्या पावलांचा पदरव ऐकू येऊ लागला. त्यांना हवी असलेली संधी लगेचचं चालून आली आणि माधवराव व रघुनाथराव या पुतण्या – चुलत्यामध्ये राज्याच्या अधिकारावरून व वाटणीवरून कलागत लागली. या भांडणाचा शेवट स. १७६८ च्या धोडप युद्धांत होऊन थोरल्या माधवरावाने आपल्या चुलत्यास नजरकैदेत टाकले व आपल्या हाती राज्याची सूत्रे घेतली. परंतु अनियंत्रित राजसत्ता उपभोगणे या कर्तबगार पेशव्याच्या नशिबी नव्हते. स. १७७२ च्या ता. १८ नोव्हेंबर रोजी क्षयरोगाने त्याचे निधन झाले.
                      
                     स. १७६१ ते ७२ अशी तब्बल १० – ११ वर्षे घरच्या व बाहेरच्या शत्रूंना तोंड देत थो. माधवरावाने सत्ता उपभोगली. पानिपतनंतर राज्याची विस्कटलेली घडी फिरून बसवण्याचा त्याने यत्न केला खरा पण त्याच्या मृत्यूने त्याची धडपड बंद पाडली. माधवराव जिवंत असेपर्यंत अनेक महत्त्वकांक्षी व्यक्तींना योग्य संधीची वाट पाहण्याखेरीज इतर पर्याय उरला नव्हता. शेवटच्या ३ – ४ वर्षांत तर पेशवा कधी मरतो याकडेच बव्हंशी लोकांचे नेत्र लागून राहिले होते. मुत्सद्यांचा पुढील डाव उघड होता. माधवाच्या निधनानंतर पेशवेपदासाठी भट घराण्याचे फक्त दोनचं औरस वंशज त्यावेळी हयात होते. एक म्हणजे बाजीरावपुत्र आणि माधवरावाचा चुलता रघुनाथराव उर्फ दादासाहेब आणि दुसरा माधवराव पेशव्याचा धाकटा भाऊ नारायणराव ! जो यावेळी १७ वर्षांचा होता.

                    आधुनिक काळातील राज्यतंत्राप्रमाणे त्या काळी लिखित राज्यघटना नव्हती. जी होती ती अलिखित राज्यघटना ! आणि अशी राज्यघटना म्हणजे रूढी व परंपरा हेच होय. प्रचलित रूढी आणि परंपरेनुसार नानासाहेब पेशव्याच्या वंशाकडेच पेशवेपदाचा कारभार देणे योग्य होते. इथे लायकी वा नालायकी पाहण्याचा प्रश्नचं येत नाही. अशा स्थितीत १७ वर्षांचा नारायण पेशवा बनणार हे उघड होते. परंतु, रघुनाथरावाचा प्रश्न वेगळा आणि बिकट होता. थो. माधवरावाने आपल्या मृत्यूपूर्वी ९ कलमांची यादी केली आहे त्यानुसार रघुनाथरावास ५ लाख रुपये उत्पन्नाची जहागीर लावून द्यावी असे कलम घातले होते. परंतु, त्याने राज्यकारभारात ढवळाढवळ करून नये किंवा उघड शब्दांत बोलायचे झाल्यास त्याने राज्यावरील आपला हक्क सोडून द्यावा असे काही बंधन घातले नव्हते. याचा परिणाम म्हणजे, नारायणराव पेशव्याने कोणाच्या तंत्राने कारभार करावा या वादाचा जन्म झाला.

                 ता. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणरावास पेशवेपदाची, सखारामबापूस मुख्य कारभाऱ्याची व नाना फडणीसास फडणिशीची वस्त्रे प्राप्त झाली. नारायणाचा कारभार आरंभी बापू व दादाच्या सल्ल्याने चालला होता. काही काळ चुलते – पुतण्याचे उत्तम सख्य जुळले होते. दादाच्या मुलीच्या लग्नात नारायणरावाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. पुण्यांत मातबरांच्या घरी स्वतः जाऊन पेशव्याने निमंत्रणपत्रिका वाटल्या. याच सुमारास पानिपतावर गायब झालेल्या सदाशिवरावाच्या पत्नीचे — पार्वतीबाईचे वपन करावे असा दादाचा मनोदय होता. पानिपतावर सदोबा मारला गेला अशी सर्वांची समजूत असली तरी पार्वतीबाईची अजूनही खात्री पटली नव्हती आणि या गोष्टीवर तिचा विश्वास बसू नये असे प्रकारही घडत होते. पानिपत होऊन वर्ष दीड वर्ष उलटायच्या आतचं ठिकठिकाणी सदाशिवराव प्रकट होऊ लागले होते.  यांपैकी तीन इतिहासात प्रसिद्ध असून या सदोबा त्रयीमुळे खरा भाऊ पानिपती गेला कि या तिघांपैकी एक होता यावर अजूनही इतिहास संशोधकांत एकमत नाही. असो, पार्वतीबाईच्या इच्छेविरुद्ध जाण्याची नारायणाची  तयारी नसल्याने तिचा विधी यावेळी करण्यात आला नाही. विशेष म्हणजे, आपल्या मृत्यूपूर्वी केलेल्या नऊ कलमी यादीत माधवाने सदाशिवरावाची माघ मासात क्रिया करण्याची आपली इच्छा / आज्ञा नमूद केली आहे. मात्र यात पार्वतीबाईचा विधी करण्याविषयीचा उल्लेख नाही. भाऊची क्रिया करताना तिने सती जावे अथवा मागे राहावे हा निर्णय पार्वतीबाईने घ्यावा पण भाऊची क्रिया तेवढी उरकून टाकावी असा पेशव्याने आपला मनोदय व्यक्त केला होता हे नक्की !

                  रघुनाथरावाच्या मुलीचे — दुर्गाबाईचे लग्न झाल्यावर रघुनाथ व नारायणात वितुष्ट येण्यास आरंभ झाला. उपलब्ध माहिती पाहता, नारायण अल्पवयी असला तरी निर्बुद्ध नव्हता. या ठिकाणी नारायणाच्या पूर्वायुष्याची थोडी माहिती घेणे आवश्यक आहे. दि. १० ऑगस्ट १७५५ रोजी त्याचा जन्म झाला. पानिपतच्या अनर्थातून वाचून आलेल्या पार्वतीबाईचे मन रमवण्यासाठी आपल्या ५ – ६ वर्षांच्या नारायणास गोपिकाबाईने तिच्या स्वाधीन केले. पुढे स. १७६४ मध्ये माधवरावाशी न पटल्यामुळे गोपिकाबाई शनिवारवाडा व पुणे सोडून नाशिकला गंगापुरी स्थायिक झाली. गोपिकाबाई पुण्यातून बाहेर गेल्याने व माधवराव मोहिमा, प्रकृती आणि राज्यकारभारात गुंतल्यामुळे नारायणावर अंकुश असा फारसा कोणाचा राहिला नाही. गोपिकाबाईने जरी नारायणास पार्वतीच्या ओट्यात घातला असला तरी ती दुर्दैवी स्त्री सौभाग्य – वैधव्याच्या सीमारेषेवर उभी असल्याने नारायणाकडे लक्ष देण्यास तिला कितपत वेळ मिळाला असेल याविषयी शंकाच आहे. त्याशिवाय अधून – मधून सदाशिवरावाच्या तोतयांच्या निमित्ताने जे वादळ उठे त्यात तिच्या मनाची जी काही ससेहोलपट होत असेल याविषयी कल्पना करणे देखील शक्य नाही. असो, घरातील परिस्थिती अशी असताना नारायणाचा स्वभाव एककल्ली, हट्टी बनणे व जास्त हूड, वात्रट किंवा आगाऊ असणे स्वाभाविक होते. लहान मुले शक्य तो आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचे वा लकबींचे अनुकरण करतात. नारायणाचा देखील यास अपवाद नाही. माधवरावाच्या तापटपणाचे तो जरुरीपेक्षा जास्त अनुकरण करत असे. चारचौघांत, भरदरबारात माधवराव आपल्या मुत्सद्यांचा अपमान करी वा प्रसंगी त्यांच्यावर हात उचली किंवा शिवीगाळ करी. नारायणाच्या समक्ष हे प्रकार घडत असल्याने तो देखील आपल्या मोठ्या भावाचा आदर्श समोर ठेवू लागला होता. याचे प्रत्यंतर माधवरावाच्या अखेरच्या दिवसांत येऊ लागले होते.

                   आपण आता फार काळ वाचत नाही व आपल्यामागे मुत्सद्दी नारायणालाच पेशवा बनवण्याचा प्रयत्न करणार हे माधवराव ओळखून होता. तेव्हा आपण आहोत तोवर नारायण राज्यकारभारात तयार व्हावा या हिशेबाने स. १७७० च्या ऑगस्टमध्ये त्याने नारायणाला दिवाणगिरी देऊन सखारामबापूस त्याचा दुय्यम म्हणून नेमले. बापूने नारायाणास राज्यकारभार समजावून सांगावा अशी माधवाची इच्छा होती. परंतु, पुढच्याच वर्षी — स. १७७१ च्या ऑगस्टमध्ये — त्यास नारायणरावास ९ कलमी उपदेश करण्याची वेळ आली. त्यातील प्रत्येक कलम काळजीपूर्वक वाचले असता असे लक्षात येते कि, आपल्या मागे नारायणाचा निभाव लागणे शक्य नाही हे माधवाने ओळखले होते. त्यासाठीचं त्याने मुद्दाम नाना फडणीस सोबत सख्य ठेवण्याची व दादाची कृपा संपादन करण्याची नारायणाला आज्ञा केली होती. परिणाम पाहता व पेशवा बनल्यावर नारायणाचे झालेले वर्तन लक्षात घेता माधवाचे सर्व उपदेश फुकट गेल्यात जमा होते.
                                                                                           ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: