शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ४ )

            रियासतकार सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत खंड ६ मध्ये सवाई माधवराव पेशव्याच्या दिनचर्येच्या काही नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी स. १७८६ ते १७८८ च्या दरम्यानच्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या नोंदी खालीलप्रमाणे :-

   (१) ता. २८-६-१७८६ ची नोंद -  ‘ वानरासारखे एक कबू जनावर श्रीमंतांनी पाळलेले होते. ते मोकळे करून बकुळीच्या झाडावर सोडले. त्याजला हुसकूं लागले, तेव्हां तिसऱ्या मजल्यावरून खाली फरसावर पडला. वांचला. फारच खेळ चालला. गणेशपंत पेठ्याचा पुतण्या नमस्कारास येतो. त्याचे शरीर अत्यंत स्थूल वायुबद्ध आहे. त्याला दोन दिवस चौसोपीत किती एक प्रदक्षिणा घालवितात. श्रीमंतांचे पायास दरद झाला आहे,  त्यास इंग्रज पाद्री येऊन मलमपट्टी लावितो. गुरुवारी केशवभट तामसी याला इंग्रजाचे सोंग दिले. भटजी अनमान करुं लागला. त्याला रागें भरून शिव्या दिल्या. मग टोपी कुडती आणवून दोन घटका सोंग देऊन बसविले. भोजनसमयी केशवभटास मनस्वी बोलों लागले. श्रीमंत म्हणाले याला झुलपे, कल्ले, दाढी राखा.’

   (२) दुसरी एक नोंद - ‘ शिव्या मनस्वी देतात. उपाध्ये, जोशी व जवळची मंडळी यांस आईबहिणीवरून शिव्या, तोंडावर मारावे असे होत असते. भोजनसमयी मुसलमानी शब्द बोलतात. शिंदे, पोरगे यांच्या वज्रमुष्टीच्या लढाया लावितात. थकोन पडला तरी ढालाइताकडून सोटे मारवावे, बळेंच उभा करून लढवावे, नाकातोंडांतून रक्तें आली, तरी सोडूं देत नाहींत. दोनचार मुले दुखण्यास पडली आहेत. चौकी पाहऱ्यावरील लोकांस शिव्या द्याव्या, तोंडावर मारवावे. माणसे दिलगीर आहेत. कांही रुसूनही गेले. शिष्ट ब्राम्हण दर्शनास आला तर शिव्या द्याव्या. चिंचवडच्या देवास शिव्या दिल्या. स्नानसंध्येसमयीं आशीर्वादास व नमस्कारास लोक येतात, त्यांस दर्शन होत नाहीं. कोणी चांगले सांगितले तर ऐकत नाहींत, चांगले सांगेल त्याचा राग करावा, त्यास पेचांत आणावे. हलक्या गोष्टी सांगेल त्याजवर ममता करावी. दोनप्रहरी मुले घेऊन मनस्वी खेळ करावे. ओरडत असावे. दरबारास बसावयास कंटाळा. मुत्सद्दी मंडळीच्या थट्टा कराव्या. दरबारास झगा पोषाख करून येत नाहींत. लिहिणे, पढणे सोडून दिले. तिरंदाजी टाकिली. दौलतीच्या उपयोगी नीति किंवा प्राचीन गोष्टी ऐकत नाहींत. बाहेर लोक आपणाबद्दल चांगले वाईट काय म्हणतात त्याचा शोध करीत नाहींत. जवळ राहणारे झाडून दिलगीर आहेत. चित्तास येईल तें करितात. चांगले सांगेल तो लबाड.’

    (३) ‘ प्रातःकाळीं घोडे फिरावयास गेले होते. श्रीमंतांचा काळवीट सुटून पळाला व पर्वतीचे हरणांत जाऊन मिसळला. त्यास धरण्यासाठी सर्व हरणे दाणा खावयासाठी रमण्यांत जमविली. मागें स्वार उभे करून कोंडिली. झाडून गार्दी व चौकबंदीचे लोक प्रातःकालीं पुढे पाठवून आपण व तात्या हिराबागेंत भोजनास गेले. लोक पर्वतीवर चढूं लागलेले पाहून हरणें सर्व पहाड चढून पळून गेली. श्रीमंतांस वर्तमान समजतांच रागें भरून माघारे आले.’

              याव्यतिरिक्त पेशव्याच्या खासगी व सार्वजनिक जीवनाविषयी काही नोंदी सरदेसाई यांनी मराठी रियासत मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :-  

  (१) ता. १६-३-१७८६  ‘ हुताशनीचे दिवशी श्रीमंत दोन घटका रात्रीं दिल्ली दरवाजाचे बाहेर होळीजवळ येऊन, दर्शन घेऊन दरवाजाचे वर ते एक क्षण बसून तमाशा पाहून आंत गेले. दुसरे दिवशी प्रातःकाळीं चार घटका दिवसांत भोजन करून, तिरंदाजीचे दिवाणखान्यांत बसले. जवळचे बसणारे घरची मुले घेऊन आले होते. खेळ, तमाशे, बीन चार पांचशे पर्यंत होते. अगोदर वाघ बकरीचा खेळ जाहला. नंतर श्रीमंत पाणी प्यावयास उठोन गेले. समागमे मल्हारपंत भडभडे होते. मागती येऊन बसले. जेठींची लढाई लाविली. दोन घटका समतुल्य जाले. मग राहविले. दहा घटका दिवसपर्यंत खेळ जाहला. मग श्रीमंत उठले व मंडळी घरास गेली. खेळांत पुढाईत बाळाजीपंत ठोसर व बाळाजीपंत केळकर हे होते. रात्री डफगाणे, चार फड आणिले होते. पांच जण पोरे होते. त्यांत एक चांगला होता. श्रीमंत भोजन करुन तिसरे घटकेस चांफेखणांत आले. अमृतराव पेठे, बाळाजीपंत लेले, मोरोबा फडके, खंडेराव त्रिंबक, खंडो अनंत, शिदोबा नाईक थत्ते, जनार्दन राम वगैरे मंडळी होती. पांच सात सोंगे प्रहररात्रपर्यंत जाहली. श्रीमंत उठोन निद्रेस गेले. वरकड मंडळी सवेंच गेली. होळीचे अगोदर गांवांत कोणी खटखट न करी अशी ताकीद पेठोपेठी केली. वद्य तृतीयेस रात्री भवानीपंताचा खेळ वाड्यांत जाहला. दोनतीन पोरे नाचणार व मागे डफगाणे. सोंगे कांही चमत्कारिक नव्हती. काल सकाळचे पोरांचे खेळांत दोन ठिकाणी कजिया झाला. बुधवारचे हौदाजवळ द्राविड ब्राह्मण जात होते त्यांचे अंगावर पोरांनी शेण टाकिले. ते शिव्या देत. पोरें अनिवार, अधिक धूळ टाकिली. एक दोघांस धोंडे लागले. रडत निघाले. कोतवालांनी समजूत घालून वाटेस लाविले. जोगेश्वरीजवळ तेलंगी ब्राह्मणांस धक्काबुक्की केली.’

  (२) काल रंगपंचमीचे दिवशी श्रीमंत सासुरवाडीस बाळाजी नाईक थत्ते यांजकडे भोजनास गेले. सौ. रमाबाई अगोदरच गेली. नंतर श्रीमंत प्रहर दिवसा घोड्यावर बसून दिल्ली दरवाजाने समागमे मंडळी घेऊन गेले. भोजन होऊन थत्ते यांनी श्रीमंतांस पोषाख दिला. परत घोड्यावर बसून गणेश दरवाजाने आंत आले. तिसरा प्रहरां रंग केला. मजलस गणपतीचे दिवाणखान्यांत. कलावंतिणीचे दोन तीन ताफे होते. मंडळीस अगोदर बोलावणी केली तेही आले. चार घटका नाच होऊन मग रंगास प्रारंभ केला. श्रीमंतांनी आपले हातें चिरकांडीने कार्याकरण मंडळीचे अंगांवर घातला. नंतर रंगाची व गुलालाची रेल जाली. अंग व पोषाख भिजून चिंब झाली, येथपर्यंत रंग खेळले. रात्री खेळ करावयास सांगितले. रास्तेखेरीज अवघे गुरुजीबावा सुद्धां आले होते. खेळ, डफगाणे, पोरांचा नाच, गोविंदांची सोंगे सहा घटकांपर्यंत जाली. मग श्रीमंत निद्रेस गेले. असा पांच दिवस खेळ जाला. महादु सुताराने लांकडांची बाहुली कळासूत्री व सूर्याचा रथ केला तो दिल्लीचे कळासूत्री मजालसीचा चांगला जाला. शाहीरही गाणारे चांगले आले होते. सोंगांत भवानीपंताचे सोंग, एक दाईचे व दुसरे मोगलाचे हीं सरस जालीं. गोविंदांपैकी एक गणपतीचे व दुसरे मुरळीचे. राणूपैकी तपकिरीची नक्कल व सुतारापैकी सूर्याचे, याप्रमाणे पांच दिवस तमाशा जाला.’

     विवेचन :- वर जे काही उतारे दिले आहेत ते आणि या लेखमालिकेच्या गेल्या भागात गोपिकाबाईचे जे उपदेशपर पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यांचे मनन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते कि, एक ब्राम्हण घराण्यातील मुलगा या दृष्टीने आवश्यक ते सर्व शिक्षण माधवास मिळेल याकडे नानाने लक्ष पुरवले असले तरी एक पेशवा म्हणून जी त्याची जडण - घडण होण्याकडे नानाने जशी देखरेख पुरवायला हवी होती तशी पुरवली नाही. गोपिकाबाई बाल पेशव्यास आपले वर्तन कसे आखीव - रेखीव हवे हे पत्राद्वारे कळवते तर नाना फडणीस, बाल पेशव्याच्या स्वैर वर्तनास दुर्लक्ष करून एकप्रकारे प्रोत्साहन देत होता. याचा अर्थ काय होतो ?

       मराठी रियासत - खंड ७ मधील पुढील उल्लेख या पार्श्वभूमीवर मननीय आहे :-
“ या पेशव्यास घरकोंबडा करून हलक्यांच्या संगतींत कडक बंदोबस्ताने ठेविले हा प्रकार खुद्द गोपिकाबाईसही आवडला नाही. ‘ स. १७८८ मध्ये माधवराव मातुःश्री बाईसाहेबांस भेटण्यास हरिपंताबरोबर गेला, तेव्हां बाई हरिपंतास म्हणाली, याच्याजवळ कारकून वगैरे लहान माणसें ठेवून बंदोबस्त करितां, तुमचे परवानगीशिवाय कोणीं येऊं नये, भेटूं नये, असें करितां, त्यास यांणीं शहाणें कधीं व्हावें ? नाना किंवा किंवा तुम्ही एकजणाने, अगर दुसरा कोणी मातबर रास्ते यांजसारिखा यांजवळ नेहमी असावा,’ असे बोलणें बहुत प्रकारें घडलें. दोन महिने राहवें असें असतां तात्यांनी सारे बोलणे समेटून पुण्यास घेऊन आले.”

    विश्लेषण :-  वरील परिच्छेदातून काय ध्वनित होते ? गोपिकाबाईने स. माधवरावास जे उपदेशपर पत्र पाठविले होते ते, वास्तविक कारभाऱ्यांना -- म्हणजे हरिपंत फडके व नाना फडणीस या दोघांना उद्देशून होते. जरी त्या पत्राचा मुख्य रोख स. माधवाने कसे वागावे असा असला तरी त्यास त्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे अशीच गोपिकाबाईने सूचना केली होती. मात्र, म्हातारीची हि सूचना मनावर घेण्याची नाना व हरीपंतास फारशी गरज भासली नाही. याचे प्रत्यंतर स. १७८८ च्या स. माधवराव व गोपिकाबाईच्या भेटीत आले. कारभाऱ्यांनी व आपल्या नातवाने आपल्या सर्व उपदेशाची, सूचनांची पायमल्ली केल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिच्या समोर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे, स्वतः पुण्यास येउन पेशव्याच्या स्वच्छंदी वर्तनावर दाब ठेवून तसेच कारभाऱ्यांना आळ्यात ठेवून स. माधवरावामध्ये धनीपणा निर्माण करणे. किंवा दुसरा, जे चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे. माझ्या मते, गोपिकाबाईने पूर्ण विचारांती दुसरा पर्याय निवडला. नारायणरावच्या खुनानंतर झालेल्या राज्यक्रांतीची -- परिवर्तनाची जाणीव तिला झाली होती. सत्तेच्या वारूवर जरी स. माधव आरूढ झाला असला तरी त्याचा लगाम आता नानाच्या हाती होता हे तिला कळून चुकले होते. लौकिकात जरी गोपिकाबाई हि पेशव्याची आजी असली तरी व्यवहारात तिला आता कवडीचेही स्थान नव्हते. ती पुण्यात परतली असती तर तिची अवस्था पार्वतीबाईपेक्षा वेगळी झाली नसती हे तिने ओळखले.

      सवाई माधवराव राज्यकारभार करण्यास शक्य तितका उशीरा तयार होईल याकडे नानाचे विशेष लक्ष असले तरी इतर बाबतीत मात्र त्याने पेशव्यास मुक्त सोडले होते. व्यायाम, शिकार किंवा दरबारी उठण्या - बसण्यात कधी अडवले नाही. मात्र त्यास दरबारी कामकाजात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. याचे कारण म्हणजे, त्या त्याबाबतीचे शिक्षणचं देण्यात आले नाही. स. माधवरावाला सरकारी कागदपत्रांवर मखलासी करण्याचा आरंभ करण्यास मुळी स. १७९२ चा मे महिना उगवावा लागला. यावेळी पेशवा १८ वर्षांचा होता. थो. माधवरावाशी तुलना केली असता थोरला माधवराव याच वयात थोड्याफार स्वतंत्र वृत्तीने राज्यकारभार व स्वाऱ्या - शिकाऱ्या करू लागला होता.
     
        पेशव्याचा व इंग्रज वकिलांचा फार निकटचा संबंध आला. विशेषतः म्यालेट स. १७८६ पासून स. १७९६ पर्यंत दहा वर्षे पुण्यात तळ ठोकून बसला होता. त्याची व पेशव्याची प्रसंगोत्पात भेट होत असे. त्याची नोंद त्याने आपल्या रोजनिशीत केली असून त्यातील काही भाग सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत मध्ये प्रसिद्ध केला आहे तो या ठिकाणी देत आहे :-

       (१) पेशव्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचे म्यालेट लिखित वर्णन - ‘ आम्ही ७ मार्च १७८६ रोजी सायंकाळी पाच वाजता वाड्याजवळ आलो. आमच्या सन्मानार्थ घोडेस्वार व पायदळाच्या रांगा उभ्या केल्या होत्या. बहिरोपंताने पुढे येऊन आम्हांस दिवाणखान्यांत नेले. आंत पाऊल टाकतांच कित्येक अधिकारी पुढे सामोरे आले. आम्ही क्षणभर उभे असतांच पेशव्यांची स्वारी आंत आली. मी त्यांस सलाम केल्यावर त्यांनी छातीस छाती लावून भेट दिली. नंतर ते गादीवर बसले. मी बरोबरच्या मंडळीसह खाली गालिच्यावर बसलो. एकमेकांचे कुशल प्रश्न झाल्यावर मी गव्हर्नर जनरल कडून आणलेली थैली त्यांचे हाती दिली ; आणि त्यांचे स्नेहभावाचे निरोप तोंडी सांगितले. माझे म्हणणे त्यांनी आदराने ऐकून ग. ज. ची खुशाली विचारली, आणि ‘ आपल्या येण्याने आम्हांस मोठा आनंद झाला,’ अशी भाषणे केली. हे भाषण संपल्यावर मी त्यांस माझ्या नेमणुकीचा हुकूम दाखविला, तो त्यांनी कारभारी गणेशराव यांजकडून वाचून घेतला. नंतर मी पेशव्यांस देण्याच्या वस्तू आणल्या होत्या त्या मागवून पुढे ठेविल्या. त्यांतले घोडे व गाडी त्यांस फार आवडली. हे नजराणे गुदरल्यावर भेट संपली. हा बालपेशवा अंगाने सडपातळ आणि अकरा वर्षांचे वयास लहानच दिसतो. चेहरा विशेष सुंदर किंवा पाणीदार नाही, तथापि तरतरीत व बुद्धिमान दिसतो.’

      (२) मराठी कागद पत्रांत वरील घटनेचा तपशील दिला आहे तो पुढीलप्रमाणे :- ‘ फाल्गुन शु. ८ सोमवारी सायंकाळचे ६ घटका दिवसास म्यालेट श्रीमंतांचे भेटीस आला. बरोबर दहा असामी होते. तिरंदाजीचे दिवाणखान्यांत बैठक केली. ताजीम देण्याचा पेंच पडूं नये म्हणून वकील अगोदर दिवाणखान्यांत आले, आणि अमृतराव पेठे यास भेटत आहेत तोंच श्रीमंत आंत गेले. श्रीमंतांस एकजण मुख्य तो मात्र भेटला. दोन घटका बसले. बारगीर व गाडदी हजार पांचशे उभे करून बंदोबस्त चांगला केला होता. श्रीमंतांनी मालेटास हिंदुस्थानी बोलीने पुसिलें, तुम्हांस कलत्त्याहून यावयास किती दिवस लागले. उ० पंचविसावे दिवशी मुंबईस आलों. त्यानें अर्ज केला, दया असावी. कागद थैल्या तीन होत्या, त्यांतील एक फोडून कागद पारसनीसांकडून वाचविला. मग विडे दिले आणि प्रथम श्रीमंत उठोन गेले. नंतर वकील गेला.’           
                                   
   *      सवाई माधवरावास मर्दानी खेळांची व प्राणी पाळण्याची देखील हौस होती. पेशव्याने स्वतः शिकारखान्याच्या कामदारास लिहिलेल पत्र पुढीलप्रमाणे :-
 ‘  हरणाचा मजकूर आपाजीपंत गोडबोले यांचे पत्रांत लिहिलाच आहे. स्वारीपूर्वी धरऊन फत्तेचे वर्तमान व मर्दनेचे माप लवकर पाठवा. कालापहाडची गांठ कशी आहे. वरकड हरणे आजारी होतीं तीं नांवनिशीवार लिहून पाठवा. अकडबाज रोड आहे कीं ताजा आहे, आणि काळा आहे तितकाच आहे कीं अधिक उणा जाला तें लिहा. रात्रीस हरण सोडीत असतात, त्याचे बरगडीवर गांठ आहे ती बरी झाली कीं नाहीं, इत्यादि सर्वांचे आजार नांवनिसीवार लिहा. माणीक हरणाचीं हाडें गणेश खिंडीत ठेविली आहेत, तीं कोणास न कळतां काढऊन शिकारखान्याचे गड्याबरोबर येथें पाठवावी. चिरगुटांत पक्की बांधून गुप्त पाठवावीं. अकडबाज थोडासा रोड जाला म्हणून लिहिले त्यास मुढी चारितात, त्यांत वेलदोडे थोडेसे अधिक टाकावे, व थोडेंसें लोणीही खावयास देत जावे. बेडक्या ताटकीसिंगाचे गांठीवर सयदअलीस पुसोन डाग द्यावा. थोरला लक्ष्मी चिपाटा आजारी आहे त्यास होईल तो उपाय करावा. मग ईश्वरसत्ता. पागेंत हरण फिरतात, त्यांतून एकानें उडी टाकिली, त्याचे पायबीय नीट पहा. काला पहाड व अकडबाज ताजे राखावे. पोलेचुबा व हरण गंजीवर येऊन दाणा खातो, त्यास त्याला हुसकून लावावा, हरण्यांत दाणा खावयास देऊं नये.’

       *      मेजर प्राइसने पेशव्याची हि पशुशाला  स. १७९१ मध्ये पाहून तिचे वर्णन लिहिले आहे ते पुढीलप्रमाणे :- ‘ या ठिकाणी उत्तमोत्तम नमुने मुद्दाम आणून पाळलेले होते. एक सिंह व एक गेंडा मला इतके आवडले कीं जणूं काय ते आपल्या रानांतच विहार करीत आहेत असें दिसलें. तो पशुराज तर अत्यंत तेजस्वी व स्वच्छ दिसत होता. उघड्या जागेंत खांबास सांखळीनें बांधून त्यास ठेवलेलें होतें. त्याचें खाणें व निगा अत्यंत दक्षतेनें ठेवलेली मला आढळली. गेंड्याची तरतरी पाहून तर मला जास्तच अचंबा वाटला. वाघ वगैरे दुसरीं अनेक जनावरें तेथें होतीं, पण या दोघांच्या पुढें तीं तुच्छ वाटत. या बागेंत हरणें व काळवीट यांचे कळप बाळगलेले होते. त्यांस वाद्यांच्या नादावर झोंपाळ्यावर बसून झोके घेण्यास शिकविलेले होते.’                 

               *            स. १७९२ मध्ये सर चार्लस म्यालेट याला पेशव्याने मुद्दाम एकदां हा हरणांचा खेळ दाखविला होता. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे :- ‘ आम्ही दोन वाजतां तंबूंत येऊन बसलों. समोर दोन झोंपाळे बांधलेले होते, त्यांजवर तीन काळवीट वाद्यांचे सुरावर पावले टाकीत पुढें आले. दोन त्या झोंपाळ्यावर बसले व एक खाली सत्रंजीवर निजला. नंतर वाद्यें बंद झालीं आणि कांहीं नाचणारणी मंजूळ आवाजाने नाचत त्या काळविटांपुढे आल्या. नंतर चवथा काळवीट मागें लाजून बसला होता, तो पुढे आला. पुढे एका नोकराने झोंकें देण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने त्या म्होरक्या काळविटाचे शिंगांवर माळ घालण्यांत आली. तेव्हां ते सर्व निघून परत गेले. पेशव्याने मला सांगितले, ‘ हा खेळ आज सात महिने या जनावरांस शिकविण्यांत येत आहे.’

                        *          स. १७९४ मध्ये रॉबर्ट मेबोनने स. माधवाच्या मर्दानी खेळातील कौशल्याचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :-   ‘ परशुरामभाऊशीं बोथाटी खेळतांना या तरुण पेशव्याचे कौशल्य पाहून मला मोठे कौतुक वाटले. पर्वतीच्या खालील विस्तीर्ण पटांगणांत हा खेळ चालत असे. सभोवार शिबंदीची व इतर लोकांची मोठी गर्दी जमली होती. मध्यभागी लहान दगडांची एक उंच रास करीत. पेशवा हातांत भाला घेऊन घोड्यावर दोनतीन चकर भरधाव करून भाल्याच्या टोंकानें ती रास कोसळून पाडी. भाल्याच्या टोंकास लाल फडक्याचा एक लहानसा चेंडू बसविलेला असे. पेशव्यानंतर परशुरामभाऊने तसाच भरधाव घोडा फेकून दगडाच्या राशीवर चाल केली, पण त्याच्याने दगड पाडवले नाहींत. दुसऱ्या कित्येकांनी प्रयत्न केला, पण त्यांसही तें साधले नाही. नंतर पेशवा व दुसरा एक यांची घोड्यावरूनच पकडापकड सुरु झाली. पेशव्याने प्रतिपक्षास भाल्याने घोड्यावरून पाडण्याचा प्रयत्न केला ; आणि थोड्याच अवकाशांत त्याने त्यांस खालीं आणिलें. हें त्याचे घोड्यावरचे नैपुण्य अप्रतिम होते. ‘
            
                विश्लेषण :-    शिकार, मैदानी खेळ, सण - समारंभ इ. गोष्टी या पेशव्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत असल्याने त्यांना या स्थळी फारसे महत्त्व देता येत नाही. वस्तुतः या नोंदी या ठिकाणी देण्याचेही विशेष असे काही प्रयोजन नव्हते. पण या नोंदी एका महत्त्वाच्या गोष्टीचा पुरावा आहेत व तो गोष्ट म्हणजे नाना फडणीसने पेशव्याच्या राजकीय शिक्षणाकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष हे होय ! नानाचे समर्थक काहीही म्हणोत, पण स. माधवराव हा राज्यकारभार करण्यास लायक होऊ नये याची नानाने विशेष खबरदारी घेतली होती असेच सिद्ध होते. परराष्ट्र दरबारातील वकिलांच्या भेटीच्या वेळी नाना सांगेल त्यानुसार हा पेशवा वकिलांच्या भेटी घेत असे. पेशव्याच्या सर्व हालचालींवर नानांचे नियंत्रण असल्याचे साफ दिसून येते. राज्यकारभार हाती नसल्याने स. माधवराव शिकारखान्यातील आपल्या प्राण्यांना प्रजा समजून त्यांचे संगोपन करत बसला तर त्यात नवल काय ? ज्याने प्रजेची काळजी करावी तो कोणत्या हरणाला काय खायला घालावे आणि काय नाही याची सूचना देत बसला आहे. कोणत्याही इतिहास अभ्यासकाने जर वरील नोंदी वाचल्या तर तो स. माधवरावास सरळसरळ नादान असेच म्हणेल. पण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे कि, या पेशव्यास निष्क्रिय बनवण्यात नाना फडणीस कारणीभूत होता. असो, मैदानी खेळातील पेशव्याचे प्रभुत्व पाहता आणि शिकारखान्यावरील त्याचे बारीक लक्ष पाहता असे लक्षात येते कि, जर त्यास योग्य व्यक्तींचा सहवास आणि साथ लाभली असती तर हा नक्कीच एक कर्तबगार पेशवा बनला असता. याविषयीचा पुरावा महादजी शिंदेच्या पुणे मुक्कामातील दरबारी नोंदीत मिळतो. महादजीने स्वतःहून पेशव्यास नानाची बंधने झुगारण्यास भाग पाडल्याचे दिसून येते. पण दुर्दैवाने महादजीच्या निधनानंतर पेशवा परत नानाच्या जाळ्यात अडकला आणि त्यातच गुरफटून गेला.

                  अडचणीच्या वेळी नाना पेशव्याच्या आडून आपला बचाव कसा करून घेत असे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्राम्हण - प्रभू वाद होय ! वास्तविक नारायणराव पेशव्याच्या कारकिर्दीत नारायणाने या वादात ब्राम्हणांची बाजू घेऊन प्रभूंना शुद्र ठरवले होते. परंतु, त्यामुळे हा वाद निकाली निघाला नाही. स. १७८८ मध्ये प्रभूंनी या विषयी नाना फडणीसकडे दाद मागितली. नाना फडणीसने त्यांना पेशव्याकडे फिर्याद करण्याचा सल्ला दिला. वस्तुतः यावेळी रामशास्त्री, अय्याशास्त्री सारखे विद्वान पंडित पुणे दरबारी होते. रामशास्त्री तर न्यायाधीश होता. त्याशिवाय ब्राम्हण - प्रभू वादाची जेवढी माहिती रामशास्त्री व नानाला होती तेवढी १४ वर्षांच्या स. माधवास कोठून असणार ? ज्या स. माधवरावास महालांच्या जमाखर्चाच्या नोंदी पाहून त्यावर मखलाशी करण्याचे माहिती नाही तो ब्राम्हण - परभू वादावर काय निर्णय देणार ? यातून एकच निष्कर्ष निघतो की, पेशवा राज्यकारभारास कसा नालायक आहे व आपण असलो तरचं राज्याचा निभाव लागेल हि भावना जनसामान्यांची व्हावी असाच नानाचा प्रयत्न चालला होता. नाहीतर या काळात राजकीय आघाडीवर कित्येक मोठ - मोठी प्रकरणे चालली होती. त्यांमध्ये निवडा करण्याची जबाबदारी नानाने पेशव्यावर का सोपवली नाही ? तुकोजी व अलीबहाद्दर याच काळात महादजीसोबत फटकून वागत होते. दिल्लीच्या राजकारणातून शिंद्याला माघार घ्यावी लागली होती. याचे राजकीय परिणाम काय होतील हे न समजण्याइतका नाना काही नवखा मुत्सद्दी नव्हता. लांब उत्तरेत कशाला, दक्षिणेत टिपूचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी निजामाच्या जोडीला इंग्रजांच्या गळ्यात गळे घालताना नानाने पेशव्याला काही सल्ला विचारला होता का ? किंवा याविषयी त्याचे मत काय आहे याची चाचपणी केली होती का ? सारांश, राज्यात इतक्या मोठमोठ्या घडामोडी सुरु असताना नानाने पेशव्याला लक्ष घालण्यासाठी ब्राम्हण - प्रभू वादाचे प्रकरण उपलब्ध करून दिले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा ? अहिल्याबाई व तुकोजी हे होळकरी दौलतीचे अनुक्रमे मालक व सेवक ! या दोघांमध्ये चाललेल्या शीतयुद्धास मिटवण्यासाठी स्वतः नाना स. माधवास घेऊन नर्मदापार माळव्यात गेला असता तर होळकरांचे घरचे भांडण मिटून राज्यालाही फायदा झाला असता आणि महाराष्ट्राबाहेर पेशव्याचे पाऊल पडून बाह्य जगाचे त्यास प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. राज्यकारभार करण्यासाठी पेशवा पुण्यात जाग्यावर असलाच पाहिजे असा काही दंडक नव्हता. किंवा नाना ऐवजी हरिपंत वा पटवर्धन मंडळी स. माधवासोबत उत्तरेत जाऊ शकत नव्हती अशातलाही भाग नव्हता. मग नानाने हे का टाळले असावे ? प्रवासांत फितूर वा दगा फटका होण्याचा धोका होता असे म्हणावे तर राज्यकर्त्यास असा धोका कधी नसतो ? पुण्यात -- शनिवारवाड्यात अजिबात फितूर होत नव्हते असे कोणी म्हणू शकते का ? तात्पर्य, स. माधवराव हा राज्यकारभारास लायक बनूच नये अशाच तऱ्हेची काळजी नानाने घेतली होती असे मोठ्या खेदाने नमूद करावे लागते.
                                                                                        ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: