Sunday, January 5, 2014

इतिहास विश्लेषण :- एक अनुभव यात्रा


           कोणीतरी म्हटले आहे कि, नावात काय आहे ?  ते खरेच आहे. निदान या लेखाच्या बाबतीत तरी ! या लेखाचे शीर्षक आणि मजकूर यांचा काही संबंध असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत नाही पण स्वतःच्या कल्पना दारिद्र्याची जाणीव मनात ठेवून मी प्रकटपणे सांगू इच्छितो कि, या लेखासाठी मला दुसरे शीर्षक काही सुचले नाही. असो, इतिहासाचा अभ्यास करणारा व त्यावर लेखन करणारा असा दोन महाभागांचा वर्ग आहे. त्यातील पहिला म्हणजे संशोधकांचा व दुसरा कथा - कादंबरीकारांचा ! यातील पहिल्या वर्गाचे प्रवासी मोजके, ध्येयवेडे, घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे असतात. तर दुसऱ्या वर्गात मोडणारे देखील जवळपास असेच --- पण घरचे खाऊन गावच्या भाकऱ्या बडवणारे नसतात ! कारण अशी वेळच त्यांच्यावर सहसा येत नाही. कोणतीही ऐतिहासिक कथा - कादंबरी व संशोधनपर पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या खपाची आकडेवारी मिळवून बघा. संशोधनपर पुस्तकांपेक्षा कथा - कादंबऱ्यांचा खप चांगला असतो. असे का व्हावे ?

              वानगीदाखल आपण तानाजीचे उदाहरण पाहू. सिंहगड ताब्यात घेताना तानाजीने घोरपडीला दोर बांधून तो कडा सर केल्याची कथा प्रसिद्ध आहे. आता शिवभक्तीचा जमाना असल्याने तो घोरपड देखील स्वराज्यनिष्ठ असल्यास नवल नाही. पण त्यावेळची माणसे आणि आत्ताची ग्रामीण भागातील गुराखी मंडळी --- हि कसलीही आधुनिक गिर्यारोहणाची साधने उपलब्ध नसताना इतरांना दुर्गम भासणारे कडे - कपाऱ्या सहज चढून जातात. पण आपल्या माणसांचे गुण हेरण्यापेक्षा कपोलकल्पित आणि अद्भुत कथा रचण्यात व त्यात रमण्यातच आम्हांला आनंद मिळतो. 

                आता हे अपयश नेमके कोणाचे ?  संशोधकांचे कि वाचकांचे ? माझ्या मते, दोघांचेही ! संशोधकांनी आपले संशोधन पक्षीय दृष्टीकोन व अंधभक्ती बाजूला ठेवून आपले कार्य पार पाडले तर या परिस्थितीत बराच बदल घडून येईल. त्याचप्रमाणे वाचकांनीही आता आपल्या बुद्धीचे वय वर्ष १२ - १६ च्या पेक्षा अधिक वाढवायला हवे. ' हे असे असे घडले ' एवढेच ऐकून / वाचून गप्प न राहता ' हे असेच का घडले ? ' अशा प्रकारचे प्रश्न विचारायला आरंभ केला पाहिजे. 

                    इतिहाससंशोधक व ऐतिहासिक कादंबरीकार यांच्या दरम्यानचा एक वर्ग आहे व तो म्हणजे इतिहास विश्लेषकांचा ! भारतीय -- विशेषतः  मराठी इतिहास अभ्यासकांत या गटात मोडणाऱ्या महाभागांचा ! या विभागात मोडणारे  जे अभ्यासक आहेत ते स्वतःला विश्लेषक म्हणवून घेण्यास कचवचतात. कारण ; इतिहास अभ्यासकांचे वर उल्लेखलेल्या दोन गटांखेरीज तिसरा वर्ग असू शकतो यावर वाचकांप्रमाणेच या इतिहास विश्लेषकांचा देखील विश्वास नाही. माझ्यापुरते म्हणाल, तर मी स्वतःला इतिहास विश्लेषकच म्हणवतो. इतिहास संशोधक बनायचे म्हटले म्हणजे मराठी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, उर्दू, फारशी, अरबी, तुर्की, पुश्तु, डच, जर्मन, हिंदी, राजस्थानी, गुजराती, तेलगु, तमिळ इ. देशी - विदेशी भाषा आणि त्यांचे उपप्रकार सामान्यतः अवगत हवेत. त्याखेरीज मोडी वाचन - लेखन कला देखील आली पाहिजे. आता एवढे सर्व शिकून त्यात निपुण झाल्यावर इतिहासाचे संशोधन करण्यास माणसाला जोम तो काय राहणार ? आणि आजवर भारतात निदान असा एकतरी इतिहास संशोधक झाल्याचे मी ऐकले नाही,  ज्याने एकाच घटनेविषयी उपलब्ध विविध भाषांतील सर्व माहिती गोळा करून त्यावर आधारित आपला संशोधनपर निबंध प्रसिद्ध केला असेल ! इतिहास संशोधक बनण्यासाठी जी प्राथमिक तयारी करावी लागते, त्या धास्तीनेच सर्वसामान्य इतिहास अभ्यासक संशोधनाच्या वाटेवरून बाजूला होतात आणि त्यास जर कल्पनाशक्ती व प्रतिभेची देणगी असेल तर मग,  ' मरो ती भाषा - लिपी शिकण्याची, काल मोजण्याची दगदग ! त्यापेक्षा आपली कथा - कादंबरी लिहिलेली बरी ' असाच विचार करून तो कल्पित इतिहास लेखनाच्या वाटेला लागतो. 

                  आता आजवर जे इतिहास संशोधक झाले आहेत, त्यांनी भरपूर मेहनत घेऊन जरी इतिहास लेखन केले असले तरी, कित्येकदा पक्षीय वा जातीय दृष्टीकोन त्यांच्या कार्याआड येऊन त्यांनी इतिहासाचे बऱ्यापैकी विकृतीकरण केले आहे. उदाहरणार्थ :- राजवाडे - शेजवलकर यांचा पानिपत विषयीचा कऱ्हाडे - चित्पावन ब्राम्हण वाद हा वाचकांच्या परिचयाचा आहे. त्याचप्रमाणे सरदेसाई - य.न. केळकर यांचाही एक वाद आहेच. वादाचे कारण म्हणजे घाशीराम प्रकरणी नानाच्या प्रीतीपात्राचा -- ललितागौरीचा सरदेसायांनी केलेला उल्लेख ! केळकर साहेब म्हणतात,  पुराव्याखेरीज. पण नानाच्या नाटकशाळांची नावे असलेला कागद यांच्या सारख्याच एका इतिहास संशोधकाने चवीने वाचून मग मिटक्या मारत खाल्ल्याने सरदेसाई कसला पुरावा देणार ? याच य. न. केळकरांनी ' केसरी ' ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विजय तेंडूलकर लिखित ' घाशीराम कोतवाल हि एक कलाकृती नसून विषवल्ली आहे ' अशा आशयाचे उद्गार  काढले होते. त्याच मुलाखतीमध्ये मुलाखतकर्त्याने नानांना नाटकशाळा होत्या का असा थेट प्रश्न विचारला असता, सरळ उत्तर देण्याचे टाळून त्यांनी तशी त्या काळाची प्रथा होती असे मोघम उत्तर दिले. असो, असे वाद अनेक आहेत. काही महत्त्वाचे तर काही बिनमहत्त्वाचे ! पण यामुळे इतिहास हा विकृत होत जातो याकडे या विद्वानांचे लक्षच जात नाही. संशोधनाच्या भरात कधी - कधी इतिहास संशोधक निष्कर्ष काढण्यात किंवा एखादी घटना ' अशीच घडली ' असे सांगणारा एखादा पुरावा आढळल्यास तर्क व चिकित्सक बुद्धी बाजूला ठेवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेजवलकरांचे पानिपत ! शेजवलकरांना पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे संशोधन करताना एक पोवाडा प्राप्त झाला. त्या कवनामध्ये पानिपतावर अखेरच्या दिवसांमध्ये मराठी सैन्याला पाण्याचा तुटवडा पडून घागरीमागे अव्वाच्या सव्वा दमड्या मोजून पाणी विकत घेण्याची वेळ आल्याचा उल्लेख आहे. शेजवलकरांनी हा उल्लेख खरा मानून, अब्दालीने मराठी सैन्याच्या छावणीजवळून जाणारा बादशाही कालवा फोडल्याने मराठी सैन्याला पाण्याची टंचाई जाणवू लागली अशा आशयाचे विधान केले. या ठिकाणी त्यांनी पुरावाही पारखला नाही. त्याचप्रमाणे तर्कबुद्धीलाही फाटा दिला. दुसरे म्हणजे, प्रत्यक्ष पानिपत परिसरात फिरून देखील त्यांना आपल्या निष्कर्षातील फोलपणा लक्षात आला नाही. पानिपतपासून यमुना नदी बरीच दूर आहे. भाऊ व अब्दालीची छावणी समोरासमोर असून पानिपत गावाबाहेरीच्या विहिरी भाऊ घेतल्या होत्या. यमुना नदीवर बांधलेला बादशाही कालवा हा मराठी तळाजवळून पुढे तसाच अब्दालीच्या छावणीच्या बाजूने वाहत होता. आता हा कालवा फोडला तर सर्वात जास्त नुकसान अब्दालीचे होणार होते  हे उघड आहे. पण शेजवलकरांनी याविषयी जास्त विचार न करता पोवाडा प्रमाण मानून आपला निष्कर्ष काढला आणि  इतरांनी अधिक डोकं न लावता तो जसाच्या तसा स्वीकारला ! 

                      सनदा, इनामपत्रे, वतनांचे तंटे, घरगुती समारंभांची माहिती असलेल्या नोंदी यांची इतिहास लेखनास मोठी मदत मिळते असे सांगणारे इतिहासकार, जेव्हा महत्त्वाचे संग्राम वा तह सामान्य इतिहास वाचकांपासून दडवतात तेव्हा त्यांच्या निःपक्षपातीपणाविषयी काय बोलावे ? उदाहरणार्थ :- बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे मारला गेल्यावर मल्हारराव होळकराने अब्दालीच्या विरोधात युद्ध आरंभले. होळकराच्या गनिमी काव्याने टेकीस येऊन त्याने ता. १३ मार्च १७६० रोजी होळकरासोबत तह केला. परंतु, दि. १४ मार्च १७६० रोजी भाऊ उत्तरेत  रवाना झाल्याने हा तह फिस्कटला. या तहाने नेमके काय साधले जाणार होते हा प्रश्न महत्त्वाचा नसून हा तह का बनला ? कसा बनला ? याचा शोध घेणे, विचार करणे महत्त्वाचे आहे. रियासतकारांनी या तहाची फक्त नोंद दिली पण तपशील नाही. इतरांना तर त्याची दखल घेण्याची गरजच वाटली नाही ! याचा परिणाम म्हणजे आम्ही हिंदू , अफगाण मुसलमानांकडून सतत मार खाण्यासाठीच जन्माला आलो आहोत अशी भावना पानिपत वाचणाऱ्याची होते ! आपल्याच लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा अजाणतेपणी का होईना, पण केलेला गुन्हा कितपत क्षम्य आहे ? सुदैवाने, श्री. संजय सोनवणी यांनी ता. १३ मार्चच्या तहाकडे पानिपत अभ्यासकांचे लक्ष वेधण्याचे कार्य केले खरे, पण ते सोनवणी आहेत -- जोशी, खरे, कुलकर्णी किंवा गेला बाजार पवार, पाटील नसल्याने त्यांच्या संशोधनासह ते बाजूला फेकले गेले !

             जी गोष्ट १३ मार्चच्या तहाची, तीच १४ जानेवारीच्या युद्धाची ! म्हणे,'  मराठी सरदारांनी गोल फोडल्याने त्यांचा पराभव झाला !' अए, पण गोल म्हणजे काय हे तरी तुम्हांला माहिती आहे का ? त्याशिवाय भाऊचा कैफियतकार किंवा तत्कालीन पत्रांतही याचा उल्लेख नाही. गोलातून बाहेर पडणे, अंगावर येणाऱ्या शत्रूशी तात्पुरते लढून त्यास दूर पिटाळूणे हेच त्या दिवशीचे मराठी सैन्याचे युद्धविषयक धोरण होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखाली मराठी फौज गोलातून बाहेर पडली होती त्याचे काय ? पण विंचूरकर, गायकवाड हे कसे अजागळ होते व त्यांनी गोल फोडून मराठी सैन्याचा कसा घात केला यावरच चऱ्हाट वळत आमचे संशोधक बसले. असाच प्रकार मल्हाररावाच्या बाबतीत केलेला दिसून येतो. मल्हारराव पानिपत युद्धातून बाहेर पडला यात शंका नाही, पण त्याच्याही आधी विंचूरकर, गायकवाड रणभूमीतून बाहेर पडू लागले होते. भाऊचा बालमित्र म्हणवला जाणारा नाना पुरंदरे देखील हुजुरतीजवळच्या मोर्च्यातून बाहेर पडला होता त्याचे काय ? त्यांच्याविषयी कोणी का बोलत नाही ? खुद्द नानासाहेब पेशवा किंवा पानिपतचा ' आय विटनेस ' नाना फडणीस देखील मल्हारराव होळकर पानिपतच्या लढाईतून पळाला असे म्हणत / लिहित नाहीत, पण आमचे ' तथाकथित ' इतिहास संशोधक आपला निष्कर्ष काढून मोकळे ! जणू काय नाना फडणीसच्या ऐवजी तेच रणभूमीवर हजर होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या जागी भाऊचे प्रेत सापडले, जवळपास त्याच ठिकाणी होळकरांचा सरदार संताजी वाघाचा मृतदेह आढळला. याविषयी कोणी काही चर्चा करत नाही. आता  आपल्या धन्यासोबत जायचं सोडून संताजी भाऊकडे मरायला कशाला गेला याचा कोणी विचार केला आहे ? 

                अलीकडे  एका विद्वान इतिहास संशोधकाने पानिपत प्रकरणी नव्याने शोध लावला आहे की, पानिपतावर मराठी सेना शत्रूच्या कचाट्यात अडकत चालली तेव्हा नानासाहेब पेशवा स्वतःचे लग्न लावण्यात मग्न होता हि गोष्ट खोटी आहे. याविषयीची अस्सल पत्रे आपण आपल्या पानिपत विषयी ग्रंथात प्रसिद्ध करत आहोत. पानिपतावर नव्याने काही माहिती मिळेल म्हणून उत्सुकतेने मी तो ग्रंथ वाचला खरा, पण मला काही त्यात ती ' अस्सल पत्रे ' आढळली नाहीत. वाचकांची दिशाभूल करून त्यांनी काय मिळवले ते त्यांनाच माहित ! आणखी एका विद्वान गृहस्थाने शोध लावला की, मराठ्यांचा सर्वनाश करण्यासाठी ब्राम्हण पेशव्यांनी पानिपत घडवून आणले ! त्या हिशेबाने, कल्पित नॉर्डिक आर्यन वंशाचा ऱ्हास घडवून आणायला इंग्लंड, अमेरिका, रशिया व जर्मन नेत्यांनी दुसरे महायुद्ध घडवून आणले असेच म्हणावे लागेल. 

                    शिवाजी - अफझलखान भेटीची चर्चा करताना शिवाजीने अफझलखानास कसा योजनाबद्ध काटा काढला हे शोधायचे सोडून शिवाजीवर पहिला वार ब्राम्हणाने कसा केला इथपासून ते  कृष्णाजी भास्कर एक कि तीन असले निरर्थक वाद आज होत आहेत. समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, संत तुकाराम अशी तीन मंडळी आलटून पालटून शिवाजीचे गुरुपद भूषवित आहेत. त्यापेक्षा शिवाजीचे मंदिर बनवून त्याला विष्णूचा दहावा / अकरावा अवतार बनवा ! म्हणजे सर्वजण त्यातून सुटतील. विशेषतः विद्यार्थीवर्ग. कारण ; अशा अस्थिर व पूर्वग्रहदुषित संशोधनावर रुजलेले धडे अभ्यासून त्यांची एक मानसिकता बनत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. 

               इतिहास संशोधकांची आजची परिस्थिती अशी आहे तर ऐतिहासिक कथा - कादंबरीकारांची त्यापासून वेगळी नाही. हल्ली एक नवीन फॅशन उदयास आली आहे. इतिहासातील एक अद्भुत अशी घटना घ्यायची व त्यावर कथा - कादंबरी रचायची. इथपर्यंत ठीक आहे, पण आपण लिहित असलेल्या कथेला - कादंबरीला संदर्भ ग्रंथांची यादी का म्हणून जोडायची ? जर तुम्ही एखादी घटना कल्पनाशक्ती व प्रतिभेच्या बळावर रंगवली आहे तर उगाचच संदर्भग्रंथांची नावे ठोकून आपले ' वजन ' वाढवण्याची नसती उठाठेव का करावी ? यांमुळे वाचकांची मात्र दिशाभूल होते. संदर्भग्रंथांची सूची पाहून कथा - कादंबरी जरी असली तरी ती ' पुराव्यावर ' आधारित आहे असे समजून ते वाचत बसतात आणि त्यातील घटना खऱ्याच असल्याचे समजतात. उदाहरणार्थ :- शिवाजी - संभाजी या पिता - पुत्रांतील बेबनाव ! असा काहीसा प्रकार बाप - लेकात घडला हि गोष्ट खरी. कथा - कादंबरी रचण्यासाठी जर तुम्ही खरोखर संदर्भग्रंथ वाचता तर त्यातून या घटनेमागील कारणेही तुम्हांला माहिती असायला हवीत. पण ती बाजूला ठेवून एखादी गोदावरी किंवा असेच कोणतेतरी काल्पनिक स्त्री पात्र निर्माण केले जाते व तिला संभाजीने विषयवासना पुरवण्यासाठी कशी पळवली इथपासून तिचा आणि संभाजीचा बादरायण संबंध जोडण्याचा सोयराबाईचा कसा डाव होता इथपर्यंतच्या कथा जन्माला येतात !  

                     असाच काहीसा प्रकार पेशवेकाळावर आधारित कादंबऱ्यांमध्ये आढळून येतो. नानासाहेब पेशव्यास शाहूने बडतर्फ केले तेव्हा लष्करी बळाच्या धाकावर नानासाहेबाने पेशवेपद परत मिळवले हे अस्सल पत्रांमधून उघड होते. पण हीच घटना कथा - कादंबरीमध्ये विकृत स्वरूपात येते. अर्थात, याची पायाभरणी बखरींनी केल्याने आजच्या लेखकांना दोष का द्यावा ? पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दल तर बोलायलाच नको ! मराठी सैन्याची उपासमार झाली म्हटल्यावर त्यांनी मृत जनावरांची हाडे दळून खाणे, झाडांच्या मुळ्या - डहाळ्या चघळणे, वाळू खाणे इ. गोष्टी रचण्यात आल्या. सध्या, आमचे संजय सोनवणी साहेब, जनावरांची हाडे दळणारी पेशवेकालीन जात्यांच्या शोधात आहेत. कोणाला माहिती असल्यास कळवावे !

                   सारांश, इतिहास संशोधकांनी जी काही दिव्य संशोधने केली, त्यावर कथा - कादंबरीकारांनी आपल्या कल्पनांचे इमले रचले. एका प्रसिद्ध हिंदी सिनेदिग्दर्शकाच्या आणि अभिनेत्याच्या मते, भारतीय प्रेक्षकांचे बौद्धिक वय १२ वर्षे असल्याचे गृहीत धरूनच चित्रपट बनवले जातात. आपले ऐतहासिक कथा - कादंबरीकार देखील जवळपास त्याच पद्धतीने कार्यरत आहेत. 

                      इतिहास संशोधक व ऐतिहासिक कथा - कादंबरीकारांपेक्षा इतिहास विश्लेषकांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. वा. वा. खरे, गो. स. सरदेसाई, बाबासाहेब पुरंदरे  इ. इतिहास संशोधकांनी कित्येकदा इतिहास विश्लेषकाच्या भूमिकेतून लेखन केले आहे. उदाहरणार्थ :- खऱ्यांनी लिहिलेलं नाना फडणीसचे चरित्र, तर सरदेसायांच्या रियासती ! शिवशाहीर पुरंदऱ्यांचे ' राजा शिवछत्रपती ' देखील याच परंपरेतील तर शिवराम परांजप्यांचा ' मराठयांच्या लढायांचा इतिहास ' देखील याच मालिकेतील आहे. यांपैकी सरदेसाई व खरे यांनी त्यातल्या त्यात निःपक्षपातीपणे विश्लेषणाचे कार्य केले पण परांजपे, पुरंदरे यांचे तसे नाही. ब्रिटीश अंमलातील आपल्या बांधवांना स्वसामर्थ्याचा आत्मप्रत्यय यावा या हेतूंनी परांजप्यांनी लेखन केले तर तर पुरंदरे हे ' शिवशाहीर ' असल्याने त्यांच्यविषयी अधिक काय बोलणार ? यांच्याशिवाय डॉ. आंबेडकर, बॅ. सावरकर यांनी देखील बरेचसे इतिहास लेखन हे इतिहास विश्लेषकाच्या भूमिकेतूनच केले आहे. पण मनाशी काही एक विशिष्ट हेतू बाळगून. पैकी, आंबेडकरांनी भीमा - कोरेगावचा उद्योग केला तर सावरकरांचे समग्र इतिहास लेखन एका विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन झाल्याचे उघड आहे. मात्र, समाजमनाला आकृष्ट करून घेण्यात हे दोघेही कल्पनातीत यशस्वी झाल्याचे अमान्य करता येत नाही. हि सर्व उदाहरणे पाहताना वाचकांचा असा समज होईल की, खरे अथवा सरदेसाई प्रभूती लेखक हे त्यातल्या त्यात निर्दोष व निर्लेप वृत्तीने लेखन करणारे आहेत. तर तसे नाही. कामाच्या व्यापामुळे, कधी मनोविकारांच्या दबावामुळे उपरोक्त इतिहास लेखकांनी देखील पक्षपाती भूमिका स्वीकारली आहे. पैकी, सरदेसायांच्या रियासतींमधील गोंधळ तर सुप्रसिद्धच आहे. उदाहरणार्थ :- मराठी रियासतीमध्ये पेशवे - इंग्रज युतीने तुळाजी आंग्रेच्या विरोधात जे युद्ध केले त्यावरील सरदेसायांनी परस्परविरोधी मते मांडून वाचकांचा गोंधळ उडवून दिला आहे. तसेच, थोरल्या माधवरावच्या कारकिर्दीत मल्हारराव होळकराने कुरा - काल्पी येथे इंग्रजांचा सडकून पराभव केल्याचा वृत्तांत सांगणारे पत्र प्रसिद्ध करून त्याखाली इंग्रजांनी मल्हाररावास पराभूत केल्याचा निष्कर्ष काढला आहे. अर्थात, हजारो पृष्ठांचे लेखन करणाऱ्या या इतिहासकरांच्या चुका, त्यांचे कार्य पाहता क्षुल्लक अशा दिसत असल्या तरी Nobody's Perfect हे सांगण्यास पुरेशा आहेत. 

        अलीकडच्या काळात ब्रिगेडियर पित्रे यांनी ' मराठ्यांचा युद्धेतिहास ' लिहून प्रसिद्ध केला आहे. परंतु, त्यांचे लेखन बरेचसे सदोष आहे. पूर्वग्रहांचा पगडा बाजूला सारून लेखन करणे त्यांना जमले नाही. त्यामुळे पानिपतपासूनचा भाग वाचताना विविध रणक्षेत्रात मराठी सैन्याने फक्त मारच खाण्याची भूमिका बजावली अशी भावना निर्माण होते. विशेषतः तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाची माहिती वाचताना ! लेखक स्वतः लष्करी अधिकारी असले तरी उपलब्ध पुरावे व आपला लष्करी सेवेचा अनुभव यांची त्यांना योग्य अशी सांगड घालता आली नाही. प्रतिभा व कल्पनाशक्तीची देणगी तसेच इतिहास संशोधनाचा अनुभव गाठीशी असूनही निव्वळ संकुचित दृष्टीकोनातून केलेले लेखन कसे असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे न. चिं. केळकरांचा ' मराठे व इंग्रज ' हा ग्रंथ होय ! यामध्ये पेशवाई व समस्त मराठी राज्याचा अस्त का झाला याचा विश्लेषणात्मक आढावा घेत असताना कित्येक कारणांचा त्यांनी अपुरा समाचार घेतला आहे. त्यामुळे समग्र ग्रंथ हा एक प्रश्नावली बनून राहिला असल्यास नवल नाही. 

                  सरदेसाई, खरे, परांजपे, आंबेडकर, सावरकर, केळकर, पुरंदरे,  पित्रे  इ. ची उदाहरणे देताना त्यांच्या दोषांचा जरी या  मी उल्लेख केला असला तरी त्यांचे गुण व महत्त्व मी नाकारत नाही. आजही मला इतिहास लेखन करायचे म्हटल्यास यांच्याच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो हे मी नाकारू शकत नाही. मला फक्त एवढेच स्पष्ट करायचे आहे की, इतिहास संशोधन, ऐतिहासिक कथा - कादंबरी लेखनाप्रमाणेच इतिहास विश्लेषणाचा  तिसरा वर्ग अस्तित्वात असून त्याची परंपरा देखील बरीच मोठी आहे. परंतु, असे असले तरी या प्रकाराकडे पाहण्याचा अभ्यासक व वाचकांचा दृष्टीकोन काहीसा उदासीनतेच आहे. याचे प्रमुख कारण माझ्या मते, इतिहास विश्लेषण हे संशोधनपर निबंधासारखे वाचनास रटाळ आणि कंटाळवाणे जरी नसले तरी ऐतिहासिक कथा - कादंबरीप्रमाणे मनोरंजन करणारे देखील नसते. परंतु, असे असले तरी यात संशोधन व मनोरंजनात्मक लेखनाचा सुवर्णमध्य साधला जातो हे देखील नाकारता येत नाही. इतिहास संशोधक तसेच ऐतिहासिक कथा - कादंबरीकार बनण्यास जे गुण लागतात त्यांपैकी प्रत्येकी थोडे - थोडे गुण जर इतिहास  अभ्यासकाच्या अंगी असतील तर तो उत्तम इतिहास विश्लेषक बनू शकतो.

            

            

8 comments:

swapnil sable said...

Asta nahi udayach Ahe phar molacha vichar Mandalay tumhi

संजय क्षिरसागर said...

धन्यवाद, स्वप्नीलजी !

Abhay Datar said...

अत्यंत उत्तम लेख. भाषा-लिपी यांच्या ज्ञानांच्या संदर्भात काहीसे विषयांतर. हा दोष आपल्या शिक्षण व्यवस्थेतला आहे. कोणतेही भाषिक कौशल्य प्राप्त न करता आपल्याकडे इतिहासातील पदवी प्राप्त करता येते. त्यामुळे विविध भाषांमधील साधने वापरुन संशोधने आपल्याकडे होताना मोठ्या प्रमाणात दिसत नसावीत. प्रगत पाश्चात्य देशीत ही परिस्थिती नसावी. ज्या विषयावर संशोधन करायचे आहे त्या काळातील किंवा प्रदेशातील भाषा अवगत असणे अनिवार्य आहे.

Sahyadri said...

chan lekh ahe

संजय क्षिरसागर said...

सह्याद्री, अभय दातारजी, अभिप्रायाबद्दल आभारी आहे !

Shivraj Dangat said...

Tumcha kde 12mavlachya patlanchi v Deshmukhanchimahiti ahe ka

Shivraj Dangat said...

Tumcha kde 12mavlachya patlanchi v Deshmukhanchimahiti ahe ka

Sanjay Kshirsagar said...

Shivraj Dangat जी,
यासंदर्भात मला फारशी माहिती नाही.