मंगळवार, १७ मार्च, २०१५

इतिहास लेखनाविषयी चार शब्द ....! ( भाग – २ )






    प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं नाहीत. किंबहुना उत्तरे आहेत पण सांगण्याची तयारी नाही असेच साधारण चित्र आहे. उदाहरणार्थ, पेशवाईच्या इतिहासात ज्याप्रमाणे खलपुरुषांची चित्रं रंगवलेली आहेत तद्वत खलनायिकाही त्यात आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आनंदीबाई ! नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूपर्यंत आनंदीबाईचा राजकारणात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सक्रीय सहभाग नाही. तिचं नाव राजकारणी कागदांत येतं तेच मुळी नारायणरावाच्या खून प्रकरणात ! त्यानंतर बारभाई मंडळ व दादाच्या लढाया, इंग्रजांचा मराठी राज्यात प्रवेश या सर्व वावटळीत आनंदीबाईही सक्रीय सहभाग घेते. एकीकडे पुणेकरांचा उच्छेद करत असताना दुसरीकडे, घरच्या भांडणामुळे ‘ ब्राम्हणी दौलतीत ‘ इंग्रजांचा प्रवेश होत असल्याचा ती दावाही करते. आता आनंदीबाईने ‘ ब्राम्हणी दौलत ‘म्हणून ज्याचा उल्लेख केला ती पेशवाईची दौलत. पेशव्यांचे राज्य. परंतु असे मत मांडण्याचा अवकाश कि, विरोधक लगेच चवताळून येतात. केवळ आनंदीबाई म्हणते म्हणून पेशव्यांचे राज्य ब्राम्हणी दौलत बनत नाही असे म्हणतात. मला एक समजत नाही, नारायणरावाच्या खुनाच्या व त्यानंतरच्या भानगडींत तिचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हणत तिच्या राजकीय कारस्थानी बुद्धीची तारीफ करायची व तिच्याच पत्रातील फक्त एक शब्द, तो अमान्य करायचा हि कोणती नीती ?

    वास्तविक, पेशव्याच्या राज्याला उद्देशून आनंदीबाईने ‘ ब्राम्हणी दौलत ‘ हा योजलेला शब्द अगदी योग्य आणि बरोबर आहे. कारण, थो. शाहूच्या कारकिर्दीतील उत्तरार्धात मराठी राज्य वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विघटीत होत गेले होते. उदाहरणार्थ :- नागपुरकर भोसले, गुजरातचे प्रथम दाभाडे आणि नंतर गायकवाड, कोकणात आंग्रे इ. फार लांब कशाला. खुद्द पेशव्याचेच सरदार शिंदे – होळकरांचे उदाहरण देखील याच मासल्याचे आहे. उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी या दोघांच्या  शिरावर असून पेशव्याच्या अनुपस्थितीत वा त्याच्या वतीने परदरबारांशी तह – युद्ध करण्याचा अधिकार पेशव्याने त्यांना दिला होता. याबाबतीत पेशव्याची मुतालकी शिंद्याकडे होती. मात्र यांमुळे होळकरास वैषम्य वाटू नये म्हणून शिंदे – होळकरांनी आपसांत विचार विनिमय करून अशी तोड काढली असावी कि, स्वारी व मुक्कामात निशाणाच्या उजीकडे राहण्याचा मान होळकरांचा तर डाव्या बाजूचा शिंद्यांचा ! खेरीज, शिंदे – होळकरांना स्वतंत्रपणे तह – युद्ध कारणाचेही अधिकार होते. त्याशिवाय तत्कालीन पत्रांमधून यांचा उल्लेख ‘ श्रीमंत ‘, ‘ राव ‘, ‘ महाराज ‘ इ. विशेषणांनी केल्याचे दिसून येते. ( प्रस्तुत मुद्दा ‘ शिंदेशाही इतिहासाची साधने ‘ चे संपादक आनंदराव फाळके यांनी मांडला आहे. ) या संदर्भातील महत्त्वाचे आणि अपरिचित उदाहरण म्हणजे वसईच्या तहावरील दौलतराव शिंद्याचा आक्षेप ! सालबाईचा तह शिंद्याच्या मध्यस्थीने झालेला असल्याने वसईचा तह करताना इंग्रज आणि पेशव्याने त्यांस साधी विचारणाही न केल्याने त्यांस हा आपला अपमान वाटला व त्याने या संदर्भात आपला निषेध इंग्रजांकडे नोंदवला. अर्थात, इंग्रजांनी त्याचा आक्षेप फेटाळून लावला खरा, पण यातून इतिहास अभ्यासकांनी योग्य तो बोध घ्यावा.

    या सर्व उदाहरणांचा अर्थ असा कि, आजही आम्ही इतिहासकार मंडळी व संशोधक तत्कालीन मराठी राज्याचे स्वरूप, परस्परसंबंध समजावून घेण्यात साफ अपयशी ठरलो आहोत. आम्ही आमच्या मनातील भावनांना संक्ल्पनांचे स्वरूप देऊन तत्कालीन संबंधांवर शिक्कामोर्तब करत कोणाला श्रेष्ठ मुत्सद्दी – योद्धा तर कोणाला स्वार्थी – राज्यद्रोही म्हणण्यात धन्यता मानली. या दोषापासून प्रस्तुत लेखकही मुक्त नाही ! आमचा आंधळेपणा इतका वाढला, आमच्या बुद्धीला इतके मांद्य आले कि, क्वचित खरे बोलणाऱ्या इंग्रजांनी तत्कालीन मराठी साम्रज्याचे वर्णन करताना योजलेल्या ‘ Maratha Confederacy ‘ म्हणजेच ‘ मराठा राज्यांचा संघ ‘ शब्दाचा अर्थही उमगला नाही. काय म्हणावे या दळभद्रीपणास ?

    सातारकर – कोल्हापूरकर छत्रपती, सातारकर छत्रपती – पेशव्याचे नाते, पेशवा – कोल्हापूरकर, पेशवा आणि राजमंडळातील सरदार, पेशवा व त्याचे सरदार, पेशव्याच्या सरदारांची पेशवे दरबारप्रती असलेली निष्ठा व स्वसंस्थानांची आसक्ती इ. गोष्टी आम्ही आजही पुरेपूर समजावून घेतलेल्या नाहीत. उदाहरणार्थ :- वारणेच्या तहाने कोल्हापूरचा संभाजी हा तांत्रिकदृष्ट्या शाहूचा मांडलिक झाला. पुढे शाहूच्या पश्चात सातारकर छत्रपती पेशव्याच्या छत्रछायेत आल्याने स्वाभाविक काही बाबतीत करवीरकरही पेशव्याचे अंकित बनले. यांमुळे कोल्हापूरकर संभाजीच्या निधनानंतरचा वारसा प्रश्न काही प्रमाणात चिघळला. या व अशा कित्येक बाबींसाठी शाहूने नानासाहेब पेशव्याला दिलेल्या सनदांचा पुनर्विचार होणे, नव्याने अन्वयार्थ लावणे अत्यावश्यक ठरते. 
       
    इथवरच्या विवेचनावरून इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता का व कशी भासते याचा काहीसा उलगडा होतो पण इतिहासाचे पुनर्लेखन नेमकं कसं करायचं हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. आजवर जे काही इतिहासलेखन झालं आहे त्याचा आपण संक्षिप्तपणे आढवा घेतला आहे. आजवरच्या इतिहासलेखनाने आपली हानीही झाली आहे व फायदाही ! 

    आपल्या पूर्वजांच्या प्रसिद्ध / अप्रसिद्ध पराक्रमांच्या वर्णनांनी आपण भारावून जातो. इंग्लिश मनुष्य ज्याप्रमाणे ‘कधी काळी आमच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता ‘ असे प्रौढीने सांगतो – समजतो त्याचप्रमाणे, एके काळी आम्हीही ज्ञात – अज्ञात टापू – प्रदेशांत आपल्या समशेरीनं व रक्ताने इतिहास घडवला आहे. रंगवला आहे. याची जाणीव मनाला सुखद स्पर्शाचा व अभिमानाचा आनंद प्राप्त करून देते. परंतु त्याचबरोबर विकृत, एकांगी इतिहासलेखनाने कित्येकांची चरित्रे काळवंडली गेली. खऱ्या – खोट्याचा विधिनिषेध न बाळगल्याने कित्येकांवर मरणोत्तर अन्याय घडले. अन्यायी, अनिष्ट प्रथांना जन्म दिला गेला तर कित्येक प्रथा – परंपरा, घटना योग्य ती दखल न घेतल्याने लुप्त झाल्या. आजवरच्या इतिहासलेखनाची किंमत हि ना नफा, ना तोटा अशीच आहे !

    इतिहास लेखनाचा एक दंडक असा आहे कि, उपलब्ध माहितीचा पुरेपूर वापर करत तटस्थवृत्तीने, निर्लेप मनाने इतिहास लेखन करावे. यांतील दोन्ही मार्गांचे – नियमांचे पालन फारच कमी इतिहासकारांनी केलेलं आहे. तसेच जसजशी नवीन संदर्भ साधने उजेडांत येतील --- ज्यामुळे आधीच्या सिद्धांतांना धक्का बसत असेल वा त्यांना चुकीचा ठरवत असेल तर त्यांचा स्वीकार करून जुन्या सिद्धांतांची नव्याने पुनर्मांडणी करणे अत्यावश्यक असते. परंतु हा विवेक सर्वचजण पाळतात असे नाही.

    इतिहास लेखन नेमके कसे असावे ? विशिष्ट हेतूंनी वा गटांना अनुकूल म्हणजेच लोकानुरंजन करणारे इतिहास लेखन असावे असा एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे इतिहासाची मांडणी अशी असावी कि ज्यातून चालू व भावी पिढीला मार्गदर्शन – बोध घेता यावा. प्रेरणा घेता यावी. मागील पिढीत घडलेल्या चुकांची जाणीव होऊन वर्तमान व भविष्यात ती चूक टाळण्याची वृत्ती निर्माण व्हावी अशीही एक अपेक्षा असते. उपरोक्त दोन मतप्रवाहांचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सावरकर लिखित ‘ १८५७ चे स्वातंत्र्य समर ‘ हा ग्रंथ होय. सावरकरांनी मनाशी विशिष्ट हेतू बाळगत या ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथाच्या वाचनाने – अभ्यासाने एका पिढीचे मत बनले पण जेव्हा सावरकरी विचारांचे अनुयायी प्रा. शेषराव मोरे लिखित ‘ १८५७ चा जिहाद ‘ हा ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा सावरकरांच्या इतिहासावर – विचारांवर पोसलेल्या एका पिढीच्या समजुतींना भयंकर हादरा बसला. सावरकरांनी स. १८५७ च्या बंडाकडे हिंदू – मुस्लिमांचे इंग्रज राजवटी – पारतंत्र्याविरूद्धचा स्वातंत्र्यलढा म्हणून पाहिले. एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले तर सावरकरांची हि मतं वस्तुस्थिती व उपलब्ध पुराव्यांशी विसंगत असल्याचे मोऱ्यांनी साधार सिद्ध केले. यातून काय बोध घ्यायचा ?     
    अशा प्रकारच्या इतिहासलेखनाचा धोका लक्षात घेता तटस्थ व निःपक्षपाती इतिहासलेखनाची महती व आवश्यकता आपणांस पटते. वास्तविक इतिहासलेखन हे तटस्थवृत्तीने, निःपक्षपातीपणेच करावे असा दंडक असला तरी त्याचे १००% पालन करणे हे कोणत्याही इतिहासकारास शक्य नाही. हि महत्त्वाची उणीव – दोष जरी लक्षात घेतला तरी किमान ८० ते ९०% तरी इतिहासकाराने तटस्थपणे लेखन करण्याची अपेक्षा बाळगणे गैर ठरणार नाही. असे लेखन आपल्याकडे यापूर्वी झाले नाही वा अशी परंपरा आपल्याकडे नाही अशातलाही भाग नाही. उदाहरणार्थ, पेशवाईतील युद्ध – मोहिमांविषयीची पत्रे अभ्यासली असता मराठी सत्ताधीशांखेरीज इतर संस्थानिकांच्या पत्रांत कित्येकदा वस्तुस्थितीचा विपर्यास वा अतिरंजितपणा असल्याचे दिसून येते तर त्याउलट मराठी पत्रांत समतोल दृष्टीने – वृत्तीने लेखन केले आहे. उदाहरणार्थ, भाऊची कैफियत व बखर. यांमध्ये उभयपक्षांच्या बलाबलाचा, चुकांचा जवळपास जसाच्या तसा वृत्तांत दिला आहे. याचाच अर्थ असा कि, तटस्थ वृत्तीने लेखन करण्याची आपली परंपरा बरीच जुनी आहे. मग जे तेव्हा शक्य झाले, साध्य झाले ते आत्ताच्या पिढीला का असाध्य व्हावे ?  

इतिहास लेखनास आवश्यक गोष्टी :- इतिहासकाराला विविध भाषांचे, लिप्यांचे ज्ञान असायला पाहिजे अशी एक समजूत आहे. अर्थात, इतिहासकारास या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे याविषयी दुमत नाही परंतु, असायलाच पाहिजे याविषयी मात्र माझा आक्षेप आहे. कारण, विविध भाषा – लिप्यांचे ज्ञान असूनही त्या व्यक्तीला उपलब्ध झालेल्या माहितीचे सुसंबंद्ध, तर्कशुद्ध व निरपेक्ष इतिहासलेखनात रुपांतर करता येईलच असे नाही. या विषयीची कित्येक उदाहरणे देता येतील. तात्पर्य काय कि, उपलब्ध माहितीचा योग्य तो --- संबंधित पुराव्यांच्या आधारे --- तर्कशुद्ध व निःपक्षपातीपणे अर्थ लावणे, त्याची मांडणी करणे हेच इतिहासकाराचे प्रमुख वैशिष्ट्य मानले पाहिजे. 

    आज या घडीला किती जणांना मोडी लिपी येते ? बरे, निव्वळ मोडीचे ज्ञान असून भागत नाही. फारसी भाषा व लिपीही अवगत असायला हवी. त्याखेरीज इंग्रजी, पोतुगीज, डच, फ्रेंच, अरबी इ. भाषाही आल्या पाहिजेत. खेरीज, देशी प्रचलित भाषांची मूळ रुपेही अवगत हवीत. सारांश, एवढ्या समग्र भाषा व लिप्या शिकलेल्या माणसानेच इतिहासलेखन करावे मगच आम्ही ते प्रमाण मानू अशी हट्टी व आग्रही भूमिका धरणे योग्य ठरेल का ?

    गेल्या शतकातील कित्येक इतिहास संशोधकांनी काळाची पावलं व आपापल्या मर्यादा ओळखून या प्रश्नाचे उतर शोधले होते. प्रत्येकाने स्वतःला ज्ञात असलेल्या भाषेतील – लिपीतील कागदपत्रांचे भाषांतर – लिप्यंतर करून व शक्य तिथे संदर्भ, तळटीपा व संपादकीय लेख लिहून भावी इतिहासकारांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरतील अशा संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन केले. त्यामागील हेतूंचा विसर आपणांस इतक्यातच का पडावा ? काळाच्या ओघात, जगरहाटीत कोण एका व्यक्तीला विविध भाषा – लिप्या शिकून व मिळवलेल्या माहितीचा योग्य तो अन्वयार्थ लावून इतिहासलेखन करणे सहजासहजी शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती. खुद्द त्यांच्या काळी तरी इतिहासलेखकांची अर्थप्राप्ती अशी कितीशी होती ? घरच्या जबाबदाऱ्या, इतिहास लेखनासाठी आवश्यक ती सामग्री जमवणे, माहितीचे लेखनात रुपांतर करून मग पुस्तक निर्मिती, प्रकाशन, वितरण इ. आर्थिक बाबी पेलणे तेव्हाही आवाक्याबाहेरचे होते व आजही !

    यातूनच टीमवर्कची अघोषित कल्पना उदयास आली. राजवाडे, सरदेसाई, खरे, पुरंदरे प्रभूतींनी त्यासाठीच विविध ठिकाणची दप्तरे धुंडाळून निवडक कागदपत्रे प्रकाशित केली. यामागील त्यांचा उद्देश, हेतू स्पष्ट होते. या इतिहाससंशोधकांनी व त्यांच्या नंतरच्या काळातील व्यक्तींनी अथक प्रयत्न केले तरीही अजून लक्षावधी कागदपत्रे संशोधकांच्या हस्तस्पर्शाची वाट बघत आहेत. त्यात अजूनही आपला अव्यक्त असा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक इतिहास दडलेला आहे. आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच इतिहास संशोधकांनी या कागदपत्रांचे संशोधन केले आणि इतिहासप्रेमी संघटना तसेच सरकारने या संशोधकांना योग्य ते आर्थिक बळ पुरवले तर हि कागदपत्रे नष्ट होण्यापूर्वीच त्यातील अमुल्य माहितीचा खजिना इतिहास वाचकांना, अभ्यासकांना व भावी इतिहासलेखकांस उपलब्ध होईल ! अन्यथा उपलब्ध तुटपुंज्या सामग्रीवरील इतिहासाचे केलेलं पुनर्लेखन हा काळाचा, वेळेचा, पैशांचा व इतिहास अभ्यासक - वाचकांच्या बुद्धीचा अपव्यय ठरेलचं पण त्यातून इतिहासाचं वाढत जाणारं विकृतीकरणही थांबवता येणार नाही !
                                                                     ( समाप्त )  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: