शुक्रवार, १९ जून, २०१५

असेही एक ( संक्षिप्त ) शिवचरित्र !



                                                                 
पुराणकथाकारांनी जर स्वराज्यसंस्थापक छ. शिवाजी महराजांवर आधारित पुराणकथा रचली असती तर कशी लिहिली असती अशी कल्पना मनाशी बाळगून केलेला हा एक प्रयत्न.


  

                  ।। श्री ।।
               ओम नमः शिवाय
     
    भगवान श्रीविष्णूच्या दशावतारांप्रमाणेच भगवान श्रीशिवशंकराच्या शिवावताराचे वर्णन करण्यास्तव प्रस्तुत बखरीची रचना करीत आहे. श्रीशंभूमहादेवाने स्वप्नांत येऊन आपल्या शिवलीलांचे वर्णन करण्याची आज्ञा मजला दिल्याने प्रभू श्रीशिवशंकराचे नामस्मरण करून लेखनास आरंभ करीत आहे.

    रामावतारात भगवान श्रीशिवशंकराने मारुतीच्या रूपाने भगवान विष्णूची सेवा करून आपली वैष्णवभक्तीची कामना पुरी केली. अवतारकार्यानंतर श्रीविष्णू आपल्या लोकी परतले असता महर्षी नारदांनी त्यांचे दर्शन घेऊन पुढील अवताराविषयी पृच्छा केली असता श्रीविष्णूंनी त्यांना कैलासस्थित भगवान श्रीशिवशंकरांकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा महर्षी नारदमुनी कैलासी अवतीर्ण झाले. ते समयी भगवान श्री शिवशंकर आपल्या भक्ती - भांगेत मग्न झालेल्या शिवगणांच्या लीला पाहण्यात दंग होते. नारदमुनींनी नारायणाचा जयघोष करून भगवान श्री शिवशंकरांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतले असता श्री शिवशंकरांनी नारदमुनीस आपल्या समीप बोलावून म्हटले, " वत्सा नारदा, तू येथे का आला आहेस हे मी जाणतो. भगवान विष्णूंच्या अवतारांची आता समाप्ती झाली असून भूलोकीवर अवतार घेण्याची आता आमची वेळ आहे. परंतु आधीच्या शिवलीलांपेक्षा हि शिवलीला फारच वेगळी अन रंजक असणार आहे. आजवर आम्ही फक्त एकच देह धारण करत होतो परंतु, प्रथमच यावेळी आम्ही दोन देह धारण करणार आहोत. " भगवान श्रीशिवशंकरांचे हे बोल ऐकताच नारदमुनींना प्रथम धक्का बसला. कारण, आजवर कोणत्याच देवतेने एकाच अवतारकृत्यात एकाहून अधिक देह धारण केल्याचे ऐकिवात नव्हते. परंतु भगवान श्रीशिवशंकर हे सत्यभाषी अन सरळमार्गी असल्याने त्यांच्या बोलावर अविश्वास दाखवणेही मुनींना शक्य नव्हते. भगवान श्रीशिवशंकरांनी नारदमुनींच्या मनातील चलबिचल अंतर्ज्ञानाने जाणली. परंतु, त्यांच्या शंकेचे निरसन न करिता ते तेथून अंतर्धान पावले. भगवंताचे असे अकस्मातपणे गुप्त होणे महर्षी नारदांना बुचकळ्यात टाकून गेले परंतु, नारायणाचे स्मरण करत त्यांनी डोळे मिटले असता भगवान श्री शिवशंकरांनी पृथ्वीलोकी एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्याची सूचना प्राप्त झाली. एकूण शिवलीलेस आरंभ झाल्याचे महर्षी नारदांनी ओळखले व ते आपला तंबोरा घेऊन समग्र शिवलीलेचे अवलोकन करण्यास्तव विष्णुलोकी रवाना झाले

    इकडे पृथ्वीवर भगवंत श्री शिवशंभू हिंदुस्थान नामक स्वर्गस्थ देवतांच्या प्रिय अवतार भूमीत परत एकदा अंशरूपाने अवतीर्ण झाले. एका गरिब दरिद्री परंतु वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. हिंदुस्थानस्थित दख्खनवर ते समयी सृष्टीदेवतेचा कोप झाला होता. लोकांची पापाचरणे इतकी वाढली कि, पृथ्वीला भार असह्य होऊन ती भगवान इंद्राच्या दरबारी ढसाढसा रडत गेली. तेव्हा आपल्या प्रिय पृथ्वीचा भार हलका करण्यास्तव देवेंद्राने पर्जन्यदेवतेस हिंदुस्थान व दख्खन सोडून इतरत्र आपली कृपा वर्षावण्याची आज्ञा केली. पापी लोकांना अंतसमयीही पाण्याचा थेंब न मिळावा अशी इंद्राचीच इच्छा होती. असो, इकडे दख्खनच्या जांब गावी भगवंत नारायण ठोसर नावाने वाढत होते. देशातील परिस्थितीचा अनुभव घेण्यास्तव तसेच ठरलेलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी नारायणाने --- त्याच्या घरच्यांनी विवाहनिश्चिती केली असता आपल्या मारुती अवताराचे स्मरण करून लग्नमंडपातून उड्डाण केले ते थेट हिमालयात तो अवतीर्ण झाला. तेथे पुढील कार्यसिद्धीस्तव तपोबळ जमवण्याकरता नारायण समाधिस्त झाला

    इकडे नारायणाच्या अनुपस्थितीत दख्खन देशात दुष्काळाने हैदोस चालूच ठेवला होता. तेव्हा त्रस्त लोकांनी पश्चाताप वृत्तीने भगवान श्री शिवशंकराची आराधना केली असता ब्रम्हदेवांनी यापूर्वीच ठरवून दिल्याप्रमाणे भगवान श्री शंभूमहादेवाने एके दिवशी दख्खनस्थित एका उंच पर्वतशिखरावरील शिवनेरीनामक गडावरील जिजाबाई भोसली इच्या पोटी जन्म घेतला. भगवंतांनी दृष्टांताद्वारे जिजाबाई व तिचा पती शहाजी यांस आपल्या अवताराची पूर्वकल्पना दिलेली असल्याने उभयतांनी आपल्या नवजात बालकाचे नाव श्री शंभूमहादेवाच्या नावावर शिवाजी ऐसे ठेविले. बाल शिवाजीचा जन्म झाला त्यावेळी त्याच्या वडिलांवर तुर्क, निजाम, आदिलशाही रूपाने कराल काळाचे आक्रमण झाले होते. परंतु, या शिवलीलेत पितृवियोग उशिरा असल्याने अनेकदा संकटे येऊनही शहाजीचे जीवरक्षण भगवंतांनी केले. असो, शिवाजीच्या रूपाने भगवान श्री शिवशंकरांनी अंशतः अवतार घेतल्याची वार्ता अंतर्ज्ञानाने नारायण तथा रामदासास समजली तेव्हा आपल्या अंशतः अवतारबंधूस भेटण्याच्या अतीव इच्छेपोटी रामदासाने हिमालयातून दख्खनकडे प्रस्थान ठेविले. नारायण तथा रामदासरुपी अवतारात रामावतारातील अर्धवट राहिलेली रामभक्ती पूर्ण करण्यासाठी भगवान श्री शिवशंकरांनी पुन्हा एकदा रामाची उपासना आरंभून स्वतःला रामाचा तथा विष्णुचा दास म्हणवून घेतले. धन्य ते प्रभू व धन्य तो भक्तीभाव

    इकडे शिवाजीच्या रूपाने शिवाचा अंश वाढत असताना पिता शहाजीला आपल्या मुलाचे बालपण स्वस्थचित्ताने पाहण्याची संधीच मिळत नव्हती. सततच्या लढायांनी शहाजी अगदीच टेकीस आला तेव्हा त्याने तुर्क व आदिलशाहकडे शरणागती पत्करून पुणे आणि बंगळूरला जहागीर मिळवून कबिल्यासह कर्नाटकी प्रस्थान केले. कर्नाटकांत भोसले कुटुंब आल्यावर स्थिरस्थावर होण्यास बराच अवधी लागला. ते समयी शिवाजी बारा वर्षांचा झाला असून सततच्या धावपळींनी त्याच्या शिक्षणाकडे शहाजीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. तेव्हा आपल्या पुत्राच्या शिक्षणाच्या काळजीने शहाजी व्यथित झाला. रात्रंदिवस त्यांस पुत्राच्या शिक्षणाची चिंता छळत होती. तेव्हा एके रात्री निद्रितावस्थेत असता भगवान श्री शिवशंकराने त्यांस दृष्टांत दिला कि, ' आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता तू खंती होऊ नकोस. तुझ्या पुणे जहागिरीत दादो कोंडदेव नामक एक ब्राह्मण आहे. त्याकडे तुझ्या मुलांस पाठव.' इतके बोलून देव अंतर्धान पावले अन शहाजीस जाग आली.
दुसऱ्या दिवशीच भल्या पहाटे शहाजीने पुण्यास जासूद रवाना करून दादो कोंडदेवची माहिती काढली असता हा वृद्ध ब्राह्मण तपस्वी असून तीन वेद, पाच शास्त्रे, पंधरा पुराणे व ज्योतिष व मंत्रशास्त्रांत प्रवीण असल्याचे शहाजीस समजले. तेव्हा मोठ्या अनिच्छेने पण पुत्राच्या कल्याणास्तव शहाजीने शिवाजीस पुण्यास रवाना केले. पित्याविना मूल राहू शकते पण मातेविण कैसे राहील म्हणून सोबत जिजाबाईस देखील पाठवण्यात आले. खेरीज कित्येक नोकर - चाकर, विश्वासू इमानी सरदार - मंत्री अन भरपूर खजिना आणि शिबंदी देण्यात आली

    पुण्यांस शिवबाचे आगमन झाले ते समयी दादो कोंडदेव विजापूर तर्फेने आपली आश्रमशाळा चालवीत होता. खासगीरित्या शिवबाला शिकवणे आरंभी त्यांस मंजूर नव्हते परंतु शहाजीचा आग्रह अधिक पडल्याने दादोजीने शिवाजीला शिक्षण देण्याचे मान्य केले. शिवबा पुण्यास शिक्षण घेत असताना शहाजी विजापूर दरबारची नोकरी करण्याच्या नावाखाली आपले लष्करी सामर्थ्य व राज्य वाढवत होता. पुण्यातील राज्य शिवाजीस व कर्नाटकाचे वडील पुत्र संभाजीस देण्याचे त्याने मनोमन निश्चित केले होते. त्यातच जिजाबाईचा विरह अधिक झाल्याने शहाजीने द्वितीय विवाह करून आणखी एका पुत्ररत्नाची प्राप्ती करून घेतल्याने तिसऱ्या अपत्याकरिताही राज्य कमाविण्याचे कार्य त्यांस करणे भाग पडले. असो, इकडे दादोजीच्या आश्रमात शिवाजीची अध्ययनातील प्रगती उत्तरोत्तर चांगलीच होत चालली. आरंभी आश्रमातील इतर मुलांपेक्षा वयाने मोठा व अभ्यासात मागे असलेल्या शिवबाने अल्पावधीतच इतरांहून अधिक प्रगती केल्याने आचार्य दादोजीही आपल्या शिष्यावर प्रसन्न होते. परंतु, त्यांना शिवबाची एक गोष्ट मात्र आवडत नव्हती. राजपुत्र व पुणे प्रांताचा भावी राजा असूनही शिवबा राजकार्याऐवजी लोकोद्धार व तपश्चर्येत सदासर्वकाळ निमग्न असे. गुरुवर्य दादोजींनी आपल्या उदरातील चिंता शिवबाच्या मातुःश्री जिजाबाई व कर्नाटकस्थित शहाजीला कळवली असता उभय पती - पत्नीनी आपल्या मुलाला संसारात गोवण्याचा तोडगा काढीला. त्यानुसार वधु संशोधन करून शिवबाचे विवाह करण्यात आले. मधल्या काळात शिवबाचे गुरुकुलातील शिक्षण संपून जहागिरीचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्याचे कार्य त्याजकडे आले. तत्पूर्वी गुरुकुल सोडताना गुरुवर्यांनी गुरुदक्षिणा म्हणून शिवबाला कोंढाणा किल्ला जिंकून देण्याची आज्ञा केली. मनातील भाव हा कि, यायोगे तरी शिवबा राज्यकार्य मनावर घेईल. परंतु शिवबा आपल्या तपश्चर्येच्या बळावर सर्वकाही जाणून गेला. त्याने गुरूंच्या आज्ञेनुसार तडक कोंढाण्यास जाऊन तेथील किल्लेदाराचे मनपरिवर्तन करून तो किल्ला गुरूंच्या चरणी वाहिला. आपल्या शिष्याच्या या अलौकिक कृत्याने गुरुदेव कोंडदेवांच्या उरातील आनंद मावेनासा झाला. उतारवयातील अतीव हर्षाने त्यांस तेचक्षणी मृत्यू आला खरा, परंतु त्यांचा आत्मा शिवदूतांनी शिवलोकी नेऊन त्यांच्या कार्याचे सार्थक केले.

    इकडे विजापुरी शिवबाने कोंढाणा आपल्या ताब्यात घेऊन व तेथे शंकराचे मंदिर बांधून व तो किल्ला दादो कोंडदेवास दिल्याचे समजताच आदिलशाह संतापला. आपल्याच राज्यात, आपल्याच देणगीवर आश्रमशाळा चालवणाऱ्या दादो कोंडदेवाने खासगीरित्या शहाजीच्या पुत्रास शिक्षण देऊन आपल्याच ताब्यातील किल्ला गुरुदक्षिणा मागितल्याचे ऐकून त्याने दादो व शहाजीला शिक्षा करण्याचे मनावर घेतले. प्रथम त्याने शहाजीला कैद केले व नंतर शिवाजीला पकडण्यासाठी सैन्य रवाना केले. ते समयी दादोजी कोंडदेवचा एक यवन शिष्य --- शाहझादा मुराद दख्खनेत होता. त्यांस विजापुरच्या शाहची बातमी कळताच त्याने तातडीने विजापुरी खलिता पाठवून शहाजी व शिवाजीस पकडण्यासाठी मनाई हुकुम केला. जर विजापुरकारांनी भोसले पिता - पुत्रांस इजा केली तर मोगल सेना विजापुरी चालून येण्याचा धाक घातला. येणेकरून शहाजीची कैदेतून तर शिवबाची युद्धकर्मातून सुटका झाली. विजापूरचा धोका मावळताच शिवबा राज्यकारभार, संसार बघत आपले शिवभक्तीचे व लोकोद्धाराचे कार्य करीत होता. उजाड डोंगरांवर नवनवीन शिवमंदिरे बांधण्याचे त्यांस वेडच लागले होते. प्रभूची लीला दुसरे काय ? प्रभूचा एक अंश विष्णुभक्तीत तर दुसरा स्वतःच्याच भक्तीत गुंतला होता. अशाने शिवलीला पुरी कशी होईल हि शंका उद्भवल्याने रामदासांनी शिवबाच्या भेटीस जाण्याचे योजले. त्यानुसार त्यांनी आपण येत असल्याचा निरोप शिवबास पाठवला. परंतु ते समयी विजापुरीहून अफझुलखान नामक थोर ईश्वरभक्त शिवबाच्या भेटीस आलेला असल्याने रामदासाची भेट घेण्याचे शिवाजीने लांबणीवर टाकिले.

    विजापुरी यवनास अलीकडे कित्येक वर्षे उदराच्या व्याधीने ग्रासिले होते. यावर त्याने कितेक मानवी तसेच दैवी उपचार केले खरे परंतु रोग काही साध्य होईना. तेव्हा महाबळेश्वरच्या जंगलांत तपश्चर्येस बसलेल्या थोर शिवभक्त भगवान श्री शंभूमहादेवाचे अंशतः अवतारी पुरुष शिवाजीराजेची ख्याती ऐकून अफझुलखान शिवाजीच्या दर्शनास्तव महाबळेश्वरी आला. तेथील एका डोंगरावर शिवबाने त्यांस दर्शन दिले. ते समयी शिवप्रभूस भक्तिभावाने आलिंगन देत असतां अफझुलच्या उदरांत चमक आल्याने वेदनेने कळवळलेल्या खानाने शिवबास आपल्या बाहुंत जखडून धरिले. तेव्हां शिवप्रभूंनी कृपावंत होऊन खानाच्या पोटावर हात फिरवताच खानाची वेदना दूर झाली. शिवबाच्या हस्तस्पर्शाने व्याधी दूर होताच खानाची मिठी सैलावली व तो दूर झाला. पाहतो तो काय …. ?
…. साक्षात श्री शिवशंकर जटाधारी, मस्तकी चंद्रगंगा धारण करून उभे होते. तेव्हा प्रभूच्या दर्शनाने पावन झालेल्या खानाने प्रभूंच्या चरणी लोटांगण घालून मोक्षप्राप्तीची याचना केली असता प्रभूंनी कृपाळू होऊन त्याच्या पुण्यात्म्यास मनुष्यदेहातून तात्काळ मुक्ती दिली व त्याच्या देहाचे सार्थक करून तिथे प्रतापगड नामक वास्तू उभारून शिवमंदीर बांधिले. तसेच काही अंतरावर खानाची समाधीही उभारली. जैसा मंदिरी शिवलिंगासमोर नंदी, तैसा प्रतापगडी खान ऐसी योजना केली.

    अफझुलखानास सद्गती देऊन शिवबा शिवापुरास येऊन राहू लागला. असेच एके दिवशी शिवापूरच्या आमराईत शिवबा शिवचिंतनात बसलेला असतां एक लंगोटधारी तेजस्वी ब्राह्मण त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. उभयतांची नजरानजर होऊन अंतर्यामी ओळखीची खूण पटली. परंतु, आसपासच्या लोकांस त्याची जाणीव करून देण्यासाठी उभयतांनी एक छोटीशी लीला केली. लंगोटधारी ब्राह्मणाने आपल्या चार अंगुली पुच्छाने शिवबा ज्या आंब्याच्या झाडाखाली बसला होता त्या वृक्षावरील एक आम्र तोडिला. हा चमत्कार पाहून आसपासच्या लोकांनी त्या ब्राह्मणास साष्टांग नमस्कार घातला. परंतु शिवबा मात्र जागचा उठला नाही. उलट त्या ब्राह्मणाने तोडलेल्या आंब्यावर स्वहस्ते शिक्का उमटविला अन काय …. त्या संपूर्ण आम्रवृक्षावरील फळांवर शिवबाच्या शिक्क्याची अक्षरे उमटली. ब्राह्मणापाठोपाठ आपल्या राजाचा हा चमत्कार पाहून सेवकवर्ग आश्चर्यचकीत झाला. अशा प्रकारे अज्ञ जनांस आपापल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून शिवबा व रामदासाने परस्परांची भेट घेतली. यावेळी शिवापूरच्या आमराईत शिवलीलेविषयी उभयतांची एकांतात बरीच चर्चा होऊन परस्परांच्या अनुज्ञेने दोघेही आपापल्या कार्यास रवाना झाले.

    दख्खनमध्ये श्री शिवशंकराचा अंशतः अवतार असलेले दोन पुरुष कार्यरत असताना उत्तरेत एक यवन मात्र आपल्या गतजन्मातील पाप - पुण्याने या जन्मी रात्रंदिवस ईश्वरचरणी लीन झाला होता. गतजन्मी एका ब्राह्मणाने आपल्या शिवभक्तीने प्रत्यक्ष श्री शिवशंकरास प्रसन्न करून मृत्यू नंतर मोक्षप्राप्तीचे वरदान प्राप्त करून घेतले होते. परंतु, त्या ब्राह्मणास आपल्या तपश्चर्येचा, भक्तीचा अतिशय गर्व होऊन त्याने एके दिवशी वाटेत वाईट जिन्नस हुंगणाऱ्या गाईस लाथ मारली असता तेच समयी ती गोमाता त्यांस शाप देती झाली कि, ' माझ्या उदरी तेहतीस कोटी देवांचा निवास असता तू ब्राह्मण असून तपश्चर्येने उन्मत्त होऊन मजला लाथ मारलीस. तेव्हा तुझ्या पुण्याचा क्षय होऊन तुजला मोक्ष न मिळता पुढील जन्मी तू देवा - ब्राह्मणांचा उच्छेदक होशील. ' गोमातेच्या शापाने ब्राह्मण घाबरला. त्याचा सर्व अहंकार, गर्व गळून पडला व त्याने तात्काल गोमातेचे पाय धरून तिची क्षमायाचना केली. तेव्हा गोमातेस दया येऊन तिने त्यांस उःशाप दिला कि, ' पुढील जन्मी तू यवन होशील खरा पण, तेव्हाही आपल्या अलोट ईश्वरभक्तीने तू परमेश्वराचा प्रिय होशील. परंतु केलेल्या पापाचे फळ म्हणून तुजला या जन्माचे स्मरण असूनही यवनधर्माचे पालन करावेच लागेल. परंतु, साक्षात प्रभू श्री शिवशंकर या भूलोकी अवतार घेऊन तुजला दर्शन देतील. त्यानंतर एका तपस्वी ब्राह्मणाच्या करवी तुला तुझ्या जीवितकार्याची माहिती दिली जाईल. दिलेले कर्तव्य तू जर योग्यरीतीने पार पाडलेस तरच तुला मोक्ष मिळेल. ' इतके बोलून ती गोमाता गुप्त झाली. दुःखी ब्राह्मणाने पश्चातापदग्ध अंतःकरणाने जवळच्या विहिरीत उडी घेऊन देहत्याग केला. प्रभूच्या इच्छेने त्या ब्राह्मणाचा तुर्क वंशीय राजघराण्यात जन्म होऊन त्यांस अवरंगजेब हे नाम प्राप्त झाले. गतजन्मीचे स्मरण असूनही केवळ यवन धर्मांत जन्म झाल्याने अवरंगजेबास आपल्या मनाविरुद्ध अनेक कृत्ये करावी लागत. परंतु, गतजन्माप्रमाणेच याही जन्मी तो थोर ईश्वरभक्त असल्याने आपल्या दिनक्रमातील बराचसा वेळ तो ईश्वरभजनांतच घालवत असे. आपल्या उद्धारार्थ भगवान श्री शिवशंकर नेमके कुठे अवतार घेणार आहेत हे माहिती नसल्याने त्याने आपल्या तुर्कवंशीय राजवटीखाली मोडणाऱ्या विस्तीर्ण भूप्रदेशांत वेळोवेळी दौरे काढले पण पदरी त्याच्या अपयशच आले.



    अखेर एके दिवशी विजापुरीच्या अफझुलखानास शिवाजीहस्ते मोक्ष मिळाल्याची बातमी त्यांस जासुदांनी देताच त्यांस भगवंताच्या आगमनाची सूचना मिळाली. परंतु मनातील शंका दूर करण्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान यांस दख्खनला रवाना केले. शिवाजीच्या दर्शनास दीनदुबळे लोक जातात हे अवरंगला माहिती होते. तेव्हा त्याने आपल्या मामास अशाच एका निमित्ताने शिवाजीची भेट घेऊन त्यांस आजमावण्यास सांगितले. भाच्याच्या विनंतीला मान देऊन शाहिस्तेखान पुण्यास आला खरा परंतु तडक शिवाजीच्या दर्शनास न जाता पुण्यातील शिवबानिर्मित लाल वाड्यात त्याने आपला तळ ठोकला. अवरंग जातीचा तुर्क असला तरी धार्मिक वृत्तीचा होता. परंतु त्याचा मामा म्हणजे साक्षात धर्मलंड ! इस्लामला  नामंजूर असे सर्व काम तो कसलेही विधिनिषेध न बाळगता करू लागला. लाल वाड्याच्या बाहेर त्याने आपल्या निवासासाठी डेऱ्याची उभारणी करून जे हिंदू धर्मास निंद्य ते लाल वाड्यात करायचा - खायचा अन जे इस्लामला वर्ज्य ते आपल्या डेऱ्यांत ! परिणामी ईश्वराची त्याजवरील मर्जी क्रुद्ध झाली. शाहिस्तेखानच्या अधार्मिक वृत्तीचे शासन देण्याकरता खुद्द श्री शिवशंकर अंशतः अवतारी पुरुष शिवबाराजे शाहिस्तेखानच्या अंतःपुरी प्रगटले व त्यांनी खानाच्या उजव्या हाताची बोटे शिक्षा म्हणून छाटून टाकली. जेणेकरून खानास पापकर्माकरीता प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या उजव्या हातास व पापवृत्तीस धडा मिळावा ! लाखोंच्या सेनासागरात, खानाच्या खासगत पहारेकऱ्यांच्या हजेरीत शिवाजीने येऊन खानाची बोटे छाटून त्यांस शिक्षा केल्याची वार्ता अवरंगला मिळताच त्याने तातडीने मसनदीवरून उठून यवनधर्मास स्मरून नमाझ पढण्यास आरंभ केला. परंतु मनोमन भगवान श्री शिवशंकराची आराधना करून त्यांस लवकरात लवकर दर्शन देण्याची काकुळतीने विनंती करू लागला.    
    अवरंगच्या विनवणीमुळे प्रभूच्या हृदयाला पाझर फुटून ईश्वराने ज्योतिर्मय स्वरुपात दृष्टांत देऊन आपणांस दख्खनमधून उत्तरेत भेटीस घेऊन येण्याची आज्ञा केली. ईश्वराच्या आज्ञेनुसार अवरंगने लगेच दुसऱ्या दिवशी दरबारातील थोर शिवभक्त जैसिंग यांस शिवाजीच्या भेटीस जाण्याचा हुकुम फर्मावला अन राजांना सन्मानाने, भक्तिभावाने आगाऱ्यास भेटीला आणण्याची सूचना केली. या समयी दिल्लीत अतिशय उष्मा असल्याने भगवंतास विश्रामाकरिता आग्रा हे ठिकाण सोईचे पडेल असा अवरंगचा होरा होता. धन्य तो भक्त, अन धन्य तो अवतारी पुरुष !
    बादशाही हुकुमावरून जैसिंग दख्खनला निघून आला. मधल्या काळात दख्खनमध्ये बरीच उलथापालथ झाली होती. संसाराचा पूर्ण अनुभव घेऊन सर्व काही मिथ्या असल्याचे उमगल्यावर थोर वैष्णवभक्त तुकाराम वैकुंठवासी झाले होते तर कसल्याही संसारसुखाचा अनुभव गाठीशी नसतानाही केवळ दैवी अवतारस्वरूप रामदासाने विविध विषयांवर ग्रंथलेखन केले होते.
    शिवबा मावळ कोकणांत शिवमंदिरे बांधत सुटला होता. शिवबाची शिवभक्ती इतकी विलक्षण कि, जैसी श्रीकृष्णाने समुद्री द्वारका निर्मिली तद्वत सागरात शिवमंदिर उभारून त्याभोवती उत्तम इमारतीं भिंतींचे काम करून त्यांस सिंधुदुर्ग ऐसे नाम दिले.
    जैसिंग जेव्हा दख्खनला आला तेव्हा शिवबा अशाच एका मंदिर उभारणी मोहिमेवर होता. जैसिंग पुण्यास आल्याचे समजताच शिवबा तातडीने पुण्यास परतला व त्याने जैसिंगाची भेट घेतली. शिवबाचे दर्शन होताच जैसिंगाच्या दृष्टीपटलावरील भ्रमाचा पडदा दूर होऊन त्यांस शिवाजीच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले. त्याने तात्काळ शिवबाचे चरणस्पर्श करून आपला व आपल्या मागील पुढील बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करून घेतला. 

    जैसिंगाने अवरंगचा निरोप राजियांस कथन करताच राजियांनी आगऱ्यास येण्याचे तात्काळ मान्य केले. त्यानंतर राजपूत भक्तांचा सत्कार स्वीकारून राजे स्वगृही परतले. यासमयी शिवबा यवनश्रेष्ठाच्या भेटीस्तव आगऱ्यास जाणार असल्याची वार्ता सर्वांस समजली होती. अवतारी पुरुषाची माता असली तरी मनुष्य असल्याने जिजाबाईस चिंतेने घेरले. तसेच राजियांचा राणीवसाही चिंतेने व्याकूळ झाला. शिवबाचे मंत्रीगणही काळजीने त्रस्त झाले. परंतु, आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता आगऱ्यास जाण्याचे शिवबाने निश्चित केले. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्टापुढे कोणाचे काही चालले आहे का ? तद्वत शिवाजीराजाने जाण्याचे निश्चित केल्यावर इतरांचा इलाज चालेना. राजियांची थोरली स्त्री सोयराबाई हिस राजियांचा भक्तीभोळा स्वभाव चांगलाच ठावका होता. उत्तरेत राजे रमले तर दक्षिणेत स्वगृही त्यांचे आगमन लवकर होणार नाही अशी भीती त्यांस पडली. त्यांनी आपल्या मनातील शंका इतर राण्यांच्या कानी घालून त्या सर्वजणी जिजाबाईच्या भेटीस गेल्या. आपल्या सुनांचे म्हणणे ऐकून जिजाबाईही विचारात पडली. आपल्या मुलाचा धर्मभोळा स्वभाव तिला नवीन नव्हता. दिसेल त्या पर्वती, निर्जन स्थळी शिवमंदिरे बांधण्याचे वेड तिला चांगलेच माहिती होते. गेली दोन तीन शतके उत्तरेतून हिंदूधर्माचे अस्तित्व शून्यवत झाल्याने आपला मुलगा तिकडे गेल्यास सारी हयात हिंदूधर्माच्या उद्धारासाठी देवळे उभारीत बसेल अशी साधार भीती तिस वाटून तिने मुलाच्या पायांत खोड घालण्यासाठी शिवबाच्या थोरल्या मुलास --- संभाजीला शिवबासोबत उत्तरेत पाठवण्याचे ठरवले. संभाजीचा नुकताच विवाह झाल्याने आपल्या मुलाच्या संसारसुखाच्या ओढीने तरी शिवबा दख्खनला तातडीने परतेल अशी तिची आशा होती. मातेची आज्ञा प्रमाण मानून शिवबाने संभाजीला आपल्यासोबत घेऊन उत्तरेत प्रस्थान ठेवले.

    राजियांच्या आगमनाची पूर्वसूचना जैसिंगाने बादशाहास दिली असल्याने प्रत्येक मुक्कामी राजियांचे स्वागत मोठ्या थाटाने केले जाई. परंतु या मर्त्य लोकांच्या ऐषोआरामी जीवनाची कल्पना अवतारी पुरुषांस थोडी लागू पडणार ? मात्र, संभाजी व शिवबाचे सेवक या शाही आदरातिथ्याने अतिशय भारावून गेले होते. असो, ईश्वरी भेटीसाठी यवन अवरंगने कित्येक ब्राह्मण मौलवींकडून शुभ मुहूर्त काढून त्या समयी शिवबाचे दर्शन घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार भेटीसाठी शिवबाने अवरंगच्या दरबारी प्रस्थान केले. यासमयी दरबारचा थाट, वैभव अवर्णनीय असेच होते. प्रत्येकजण तुर्की बादशाहीच्या वैभवाची आपसांत चर्चा करीत होते परंतु खुद्द अवरंगचे लक्ष मात्र दरबाराच्या द्वारी खिळले होते. अखेर युगायुगांची प्रतीक्षा संपुष्टात आली. भगवान श्री शिवशंकर शिवबाच्या रुपात दरबारी प्रगटले. प्रभूंच्या प्रत्येक पावलागणिक अवरंगचा आनंद उरांत व उदरांत मावेनासा झाला होता. भक्ताच्या चर्येवरील, नेत्रांतील हर्षभाव न्याहाळत प्रभू अवरंगच्या आसनानजीक  आले. काय हि शिवलीला !

    साक्षात ईश्वरी अवतार दरबारी सामान्य मानकऱ्यांत उभा असून भक्तश्रेष्ठ सर्वोच्च बादशाही आसनावर विराजमान होता. भगवंताला पाहताच आसन त्यागण्याची अवरंगला तीव इच्छा झाली परंतु भगवंतांनी त्यांस नजरेनेच तसं न करण्याची इशारत केली. तद्नंतर आपल्या अलौकिक सामर्थ्याने प्रभूने दरबारातील उपस्थित सर्वांची नजरबंदी करून आपला दिव्यात्मा व अवरंगचा आत्मा वेगळा केला व त्याच्याशी ते संवाद साधू लागले. उपस्थित सर्व मर्त्य मानवांना फक्त शिवबा व अवरंगची शरीरं दिसत होती आणि त्यांच्या कानी केवळ बिजलीचा कडकडाट पडत होता. देव अन भक्तात काय संवाद झाला ते कोणालाच समजले नाही परंतु जेव्हा ईश्वराने नजरबंदी काढून टाकली तेव्हा शिवबा दरबारातून परत जाताना दिसला तर अवरंग देहभान विसरून शिवाजीची पाठमोरी मूर्ती न्याहाळताना दिसला.

    देवश्रेष्ठाने भक्तश्रेष्ठाची भेट घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी कूच केले. तळावर पोहोचल्यावर शिवबा आराम करण्यासाठी पलंगावर निजणार तोच थोर शिवभक्त जैसिंगाचा पुत्र रामसिंग दर्शनास आला. त्याने आपल्या बापाच्या आज्ञेनुसार राजियांचा आदरसत्कार करून सेवेसाठी आपली माणसं नेमून दिली. इकडे अवरंग आपल्या महाली अत्यंत बेचैन झाला होता. देवाची भेट तर झाली पण त्याचा सहवास न मिळाल्याची त्यांस खंत होती. शिवाय उभयतांचे लौकिक धर्म निराळे असल्याने उघडपणे भेटण्याची, राहण्याचीही त्यांस चोरी होती. तेव्हा त्याने आपल्या लोभवृत्तीस अनुसरून शिवरूपी शिवबास आगाऱ्यासच कायमस्वरूपी राहण्याची विनंती गुप्तरूपे केली. भक्ताची विनंती मोडण्याचे भगवंताच्या जीवावर आले परंतु समोर पुत्राचे भवितव्यही दिसत होते. अर्थात, लौकिक संसारातील गोष्टी जरी त्यांस बंधनकारक नसल्या तरी ब्रह्मदेवाने नेमून दिल्याप्रमाणे त्यांस आपली अवतार भूमिका बजावणे अत्यावश्यक होते. त्यानुसार आगऱ्याहून निघून जाण्याचे भगवंतांनी ठरविले. इकडे अवरंगने प्रभूंच्या सेवेकरता आपले अत्यंत विश्वासू सेवक नेमले होते. प्रभूंच्या आरामात, सेवेत जराही कुचराई न करण्याचा त्याने आपल्या नोकरांना सक्त हुकुम केला होता.

    अवरंगच्या आदरातिथ्याने शिवबाच्या सोबतचे लोक खूपच भारावून गेले होते. संभाजी तर जणू उत्तरेतच जन्मला वाढल्याप्रमाणे तेथील वातावरणात रुळला होता. सर्व परिस्थिती पाहून शिवबाने एके दिवशी आपल्या तपोबलाने दुसऱ्या शिवाजीची निर्मिती करून त्यांस तेथे मंचकी स्थापिले व स्वतः संभाजीसह गुप्त होऊन थेट राजगडाच्या पायथ्याशी तो प्रगटला. अवरंग पुण्यवंत असल्याने त्यांस देवाने आग्रा त्यागल्याचे लगेचच जाणवले. तो स्वतः धावत पळत प्रभूंच्या निवासस्थानी आला तर पाहतो तो प्रभूंची प्रतिकृती मंचकी पहुडली होती. भक्तश्रेष्ठ अवरंगला ईश्वरीलीलेचे अपार आश्चर्य व कौतुक वाटून त्याने मनोमन श्री शिवशंकरास प्रणाम केला. तेचक्षणी शिवबाची प्रतिकृतीही अंतर्धान पावली.

    आगऱ्याहून राजगडी आगमन झाल्यावर शिवबाने ईश्वरी प्रेरणेने आपल्या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने रामदासास भेटीचा निरोप पाठवला. यासमयी रामदास चाफळ जवळच्या राम मारुती मंदिरात आपल्या आराध्याच्या भजन पूजनांत मग्न होता. शिवबाचा निरोप येताच तो टाकोटाक राजगडी रवाना झाला. परंतु तोपर्यंत शिवबाला कुठला दम धरवतोय ? रामदासास निरोप पाठवून काही वेळाने तो स्वतःच स्वार होऊन चाफळला यायला निघाला होता. अर्ध्या वाटेत रामा शिवाची भेट होऊन शिवबाने राज्याभिषेकाची कल्पना रामदासासमोर मांडली. तोपर्यंत भूतलावर केवळ अहिंदू सत्ताधीशच राज्याभिषेक करवून घेत असल्याने हिंदू धर्माच्या उद्धारासाठी शिवबास स्वतःला राज्याभिषेक करवून घेणे प्राप्तच होते. किंबहुना या शिवलीलेचे तेच मुख्य प्रयोजन होते. रामदासास हि कल्पना पसंत पडली परंतु यांस शेवटास नेण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नव्हते. कारण, रामदास जरी अवतारी पुरुष असला तरी मारुती अवतारानंतर कित्येक युगे तो या भूतली न अवतीर्ण झाल्याने त्यांस शास्त्रांचे म्हणावे तसे ज्ञान नसणे स्वाभाविक होते. तेव्हा उभयतांनी एकविचाराने चार वेद, सहा शास्त्रे, सोळा पुराणे, ज्योतिष व मंत्रशास्त्रांत प्राविण्य मिळवलेल्या गागाभटाकडून राज्याभिषेकविधी करवून घेण्याचे योजले. गागाभट हा गतजन्मीचा यवन. परंतु परम ईश्वरभक्त. परमेश्वरावर त्याची श्रद्धा अतिशय डोळस होती. त्यामुळेच परमेश्वराने त्यांस या जन्मी ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मल्या ब्राह्मण ज्ञातीत जन्मास घातले व त्याच्याच हातून आपल्या अंशतः अवताराचा राज्याभिषेक विधी करवून घेण्याचे योजले.

    त्यानुसार राज्याभिषेक समारंभासाठी स्थलनिश्चिती करून काशीस्थित गागाभटास दख्खनला आणण्याची व्यवस्था करण्यात आली. दिल्लीमध्ये अवरंगला जेव्हा शिवबाच्या अपूर्व समारंभाची पूर्वसूचना मिळाली तेव्हा त्यांस अतिशय आनंद झाला. आपला हर्ष व्यक्त करण्यासाठी त्याने तीन दिवस स्वतःला महाली कोंडून घेतले व रात्रंदिवस परमेश्वराचे आभार मानत हा समारंभ निर्विघ्न पार पडावा अशी विनवणी करत राहिला. इतकेच नव्हे तर दख्खनेतील आपल्या लोकांनी तसेच इतर सत्तांनी समारंभास अपशकून करू नये अशा आज्ञा काढण्यात आल्या. उत्तरेतील थोर शिवभक्त राजपूत राजांनी या शुभकार्यास सर्वोतपरी मदत देऊ केली. एकूण हि शिवलीला योजल्याप्रमाणे पूर्ण होणार अशी चिन्हं दिसत असतानाच कलीने आपले अस्तित्व दाखवून दिले. साक्षात भगवान श्री शिवशंकराचे अंशतः अवतारी पुरुष शिवाजीस क्षत्रिय म्हणून वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करवून घेण्याचा अधिकार नसल्याचे काहींचे म्हणणे पडले. यांमुळे कितेक वैदिक हिंदू धर्मियांत मतभेद निर्माण होऊन लोकांची मनं कलुषित झाली. लोकवार्ता शिवबा तसेच रामदासाच्या कानी पडून त्यांचीही मने व्यथित झाली. लोकांच्या हितार्थ, उद्धारास्तव घेतलेल्या अवतारांची हीच का फलश्रुती असा त्यांस प्रश्न पडून रामाने जनवार्तेस्तव पत्नीचा त्याग केल्याची त्यांस तीव्रतेने आठवण झाली. असो, नियोजित देवकार्य पार पाडण्याचे मनावर घेऊन शिवबाने राज्याभिषेकाचा भव्यदिव्य समारंभ घडवून आणला. पश्चात काही दिवसांनी शिवबाची माता कैलासवासी झाली. पिता शहाजी यापूर्वीच शिवलोकी गेल्याने शिवबास आपल्या अवतारकृत्याची समाप्ती नजीक आल्याची जाणीव झाली. देहत्याग करण्यापूर्वी उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक समारंभ होताच शिवबा दक्षिण देशी कर्नाटकांत रवाना झाला.

    इकडे उत्तरेत शिवबाच्या राज्याभिषेकाची वार्ता अवरंगजेबास समजताच त्याने मनोमन धन्यता मानून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काही दिवस दरबार बंद केला व खासागीकडे तो आपला काळ व्यतीत करू लागला.

    शिवबा कर्नाटकांत धर्मोद्धाराकरिता फिरत असताना इकडे युवराज संभाजी वयात येऊन त्यांस बालवयात पाहिलेल्या तुर्की वैभवाची, विलासाची याद तीव्रतेने येऊ लागली. संभाजीच्या वृत्ती ओळखून अवरंगचा सरदार दिलेरखानाने त्यांस आपल्या सोबत तुर्की चाकरीत येण्याची शिफारस केली. संभाजीला हा बेत पसंत पडून त्याने दिलेरच्या गोटाकडे प्रयाण केले. ते समयी शिवबा श्रीशैल येथील मल्लिकार्जुन मंदिरात होता. संभाजीच्या कृत्याची त्यांस अंतर्ज्ञानाने जाणीव झाली परंतु भवितव्यता ठाऊक असल्याने त्यांस या गोष्टीचा खेद वाटला ना खंत ! उलट आपल्या अवतार कार्याची या स्थळीच समाप्ती व्हावी असे त्यांस तीव्रतेने वाटू लागले परंतु ब्रह्माने सूक्ष्मरूपाने त्याच्या कानांत सांगितले कि, ‘ वृक्ष या स्थळी पडणे योग्य नाही. जेथे अवतारकृत्य घडले तेथेच पडावा. ब्रह्माची आज्ञा प्रमाण मानून शिवबा कर्नाटकातून स्वगृही रवाना झाला.

    यावेळी रामदास सज्जनगडी असून त्यांसही शिवबाच्या अवतारकृत्यसमाप्तीची जाणीव जाली. तेव्हा रायगडाच्या वाटेवर असलेल्या शिवबास त्यांनी आपल्या भेटीस बोलावले. ते समयी उभयतांनी एकाच वेळी, दिवशी अवतार संपुष्टात आणावा असे रामदासाचे म्हणणे पडले. परंतु शिवबाने आणखी एक कार्य त्याच्यावर सोपवून ते पूर्ण करून मगच शिवलोकी येण्याची सूचना केली.

    रामदासाची भेट घेऊन शिवबा रायगडी आला. दरम्यान यवनी विलासाचा उबग येऊन तसेच अवरंगने केलेल्या कानउघडणीने संभाजीचे मनःपरिवर्तन होऊन तो पन्हाळगडी श्री शंभूमहादेवाच्या चरणी येऊन सेवाभावी वृत्तीने निर्वाह करू लागला. संभाजीचे भवितव्य माहिती असूनही मनुष्य लोकी जन्म घेतल्याने कर्तव्यवश शिवबा पन्हाळगडी गेला. तेथे संभाजीची भेट घेऊन त्यांस त्याने आपल्या देहत्यागाची कल्पना देऊन आपल्या पश्चात सुखासमाधानाने राहण्याची आज्ञा केली. तदोपरांत शिवबा लौकिकार्थ आपल्या धाकट्या मुलाच्या विवाहासाठी परंतु प्रत्यक्षात अवतारसमाप्तीस्तव रायगडी आला. विवाह समारंभानंतर काही दिवसांतच रायगडस्थित सर्व लोकांसमक्ष त्याने आपली इहलोकीची यात्रा पूर्ण केली. ते समयी दिवस असूनही रात्र पडल्याचे दिसत होते. पाण्यांतील मासे पक्ष्यांप्रमाणे उडू लागले होते. हत्ती हरीणांसारखे धावू लागले होते तर घोडे सिंहाप्रमाणे गरजू लागले होते. संपूर्ण रायगड किल्ला गदागदा हलू लागला होता. अशातच वाऱ्याची एक जोरदार वावटळ येऊन शिवदूतांनी शिवबाच्या शरीरातील शिवात्म्यास विमानातून कैलासी परत नेला.



    या समयी मर्त्य मानवांनी, शिवबाच्या आप्तेष्टांनी जो शोक व्यक्त केलं तो व्यक्त करण्याचे सामर्थ्य लेखणीत नाही. शिवबाच्या अवतारसमाप्तीची वार्ता उत्तरेत अवरंगजेबास मिळताच त्याने दुःखातिशयाने अन्नपाण्याचा त्याग केला. दरबार बंद केला. स्वतःला अंधाऱ्या खोलीत कोंडून घेऊन त्याने मृत्यूदेवतेची आराधना चालवली. ते समयी रामदास सज्जनगडी समाधिस्त होते. त्यांनी शिवबाच्या सूचनेस स्मरून तसेच अवरंगजेबाची स्थिती अंतर्ज्ञानाने जाणून त्यांस दृष्टांत दिला कि, ‘ शिवबाचा पुत्र संभाजी यांस राज्यकारभाराची शिक्षा देण्याकरिता तुला दख्खनला यावे लागेल. संभाजीवर कलीचा प्रभाव असल्याने तो तुला जुमानणार नाही. तेव्हा त्यांस देहाच्या बंधनातून मुक्त करण्याचे कृत्य तुला स्वहस्ते पार पाडावयाचे आहे. तदोपरांत संभाजीच्या पुत्राचा सांभाळ करून त्यांस राज्यकारभारास लायक केल्यावरच तुजला जन्मोजन्मीच्या फेऱ्यांतून मोक्ष मिळेल. सांगितल्या कार्यात जराशी जरी चूक झाली तर पापक्षालनार्थ तुजला फिरुनी मनुष्य देह धारण करावा लागेल. तपस्वी ब्राह्मणाच्या दृष्टांताने अवरंगजेबाचे सांत्वन होऊन मोक्षप्राप्तीस्तव तो दख्खनला आला. तोपर्यंत संभाजी राजा बनून कलीच्या आहारी गेला होता. तेव्हा नियतीने सोपविलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी अवरंगजेबाने आपले मृदू मन कठोर केले. इकडे अवरंगजेब दख्खनला येताच रामदासाला आपल्या अवतारसमाप्तीची जाणीव होऊन सज्जनगडी त्याने कैलासाचा मार्ग धरिला. त्याच्या निष्प्राण देहाचे शिष्यांनी यथोचित सार्थक केले

    शिवबा पाठोपाठ रामदासाच्या देहत्यागाने अवरंग अधिकच व्याकूळ झाला. त्यांस आपले जीवित्व नकोसे झाले. परंतु ईश्वरी इच्छेस डावलण्याचे त्यांस साहस न झाल्याने तसेच मोक्षप्राप्तीच्या मोहाने त्याने संभाजीस योग्य पद्धतीने राज्यकारभार कसा करावयाचा याचे शिक्षण देण्यास आरंभ केला. परंतु संभाजीवर कलीचा पगडा बसल्याने त्याने अवरंगजेबाची अवज्ञा करून त्याची येता जाता, उठता बसता थट्टा करण्याचा उपक्रम आरंभला. परिणामी परमेश्वरी आज्ञेनुसार अवरंगने संभाजीच्या पवित्र आत्म्यास देहाच्या बंधनातून मुक्त केले व त्याच्या पुत्रास --- ज्यांस दुसरा शिवाजी म्हटले जाई त्यांस --- आपल्या जवळ ठेवून त्याचे पालन पोषण केले. त्याच्या शिक्षणावर जातीने देखरेख करून राज्यकारभार योग्य त्यांस बनवले. स्वतः यवनधर्मीय असूनही गतजन्मीच्या स्मरणामुळे बादशाहच्या मनी हिंदू मुस्लीम विषयक कमालीची समतोल वृत्ती होती. जी दुसरा शिवाजी तथा शाहूच्या अंगीही नकळत बाणावत गेली. आपल्या आराध्याच्या वंशजाचे शाहू हे नामकरणही बादशाहाने जातीने केले. पुढे शाहू वयात येतांच अवरंगची प्रकृती उत्तरोत्तर खालावत जाऊ लागली तसे त्यांस आपल्या अंतसमयाची जाणीव होऊन त्याने आपल्या डोळ्यांदेखत शाहूस सर्व सरंजामानिशी आपल्या वडिलोपार्जित राज्याचा अधिकारी म्हणून नियुक्त करीत रायगडी पाठवून दिले.



    शाहू अवरंगच्या तळावरून गेल्यावर मागती अवरंगला प्रभूने दृष्टांत दिला कि, ‘ तुजवर सोपविलेले कार्य तू निष्ठेने पार पाडल्याने मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या इच्छेनुसार लवकरच मोक्षप्राप्ती मिळेल. शिवाय जोवर शाहू व त्याचे वंशज राज्याचे अधिकारी बनून राहतील तोवर तुझे वंशज दिल्लीस सुखाने नांदतील असा तुला आशीर्वाद देतो. असे म्हणून प्रभू अंतर्धान पावले. अंतसमयी ईश्वरी कृपा झाल्याने शांत चित्ताने व अतीव समाधानाने अखेर अवरंगने आपल्या जीर्ण देहरूपी वस्त्राचा त्याग करून सुखाने स्वर्गी प्रयाण केले.


    तर अशा या शिवचरित्राचे जो कोणी निष्ठेने, श्रद्धेने पठण करील त्याच्या चालू व मागील पुढील मिळून बेचाळीस पिढ्या स्वर्गप्राप्ती करतील. आजारी, दरिद्री व्यक्तींनी या चरित्राचे श्रद्धायुक्त भक्तीभावाने पारायण केले असता त्यांच्या व्याधी, दारिद्र्य, चिंता दूर होऊन त्यांस आरोग्य, संपत्ती, स्वास्थ्याचा लाभ होईल. या शिवचरित्राच्या श्रद्धायुक्त श्रवणाने मनुष्याचे जीवन सुखमय होईल. अशा या अलौकिक अवतारी पुरुषास मनोमन नमन करीत मी आपली लेखणी थांबवत आहे.

                  
                 ओम नमः शिवाय !        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: