शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

शिव – पेशवेकालीन राज्यनिष्ठा, राजनिष्ठा व फितुरी : एक चिंतन ( भाग – ४ )




    दि. २३ जून १७६१ रोजी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या निधनानंतर पेशवेपदी कोण बसणार हा प्रश्न उद्भवून त्यासोबत पेशव्याच्या नेतृत्वाखालील सरदारांचा जो संघ होता वा राज्यसंघ होता त्याचे महत्त्व याचवेळी अधोरेखित झाले. स. १७०७ वा स. १७४९ – ५० चा छ्त्रपतीच्या नेतृत्वाखालील मराठी सरदार – प्रधानांचा संघ व पेशव्याच्या नियंत्रणाखालील सरदारांचा संघ यात बरेच साम्य असलं तरी भेदही पुष्कळ होता. छत्रपती आपल्या सरदारांवर जसे पूर्णतः अवलंबून होते तसा पेशव्याचा प्रकार नव्हता. परंतु असे असले तरी तो सरदारांना पूर्णतः दुर्लक्षितही करू शकत नव्हता. त्याचप्रमाणे छत्रपतीच्या पदरी जे प्रधान – सरदारांचे मंडळ होते --- तेच मंडळ पेशव्याच्या नियंत्रणाखाली असून त्यात पेशव्याच्या पदरच्या सरदारांची आणखी भर पडली होती. परंतु पेशवेपदी कोण बसणार याचा फैसला छत्रपती वा त्यांचे प्रधान – सरदार मंडळ करणार नसून फक्त पेशव्याचेच सरदार निर्णय घेणार होते.  

    यावेळी पेशवेपदासाठी मृत नानासाहेबाचा धाकटा भाऊ रघुनाथराव प्रतिस्पर्धी म्हणून नानासाहेबाच्या मुलाच्या --- माधवरावाच्या विरोधात अप्रत्यक्षपणे उभा राहिला. यावेळी पेशवे घराण्यातील कर्ता, अनुभवी पुरुष रघुनाथ असून माधव हा तुलनेने सर्वच बाबतीत कनिष्ठ होता. परंतु तत्कालीन प्रचलित रूढीनुसार मृताचा जवळचा नातलग मुलगा असून तो अगदीच अल्पवयीन असल्यास त्यांस पदावर नेमून त्याच्या वतीने पालक म्हणून कारभार करणे एवढेच रघुनाथाचे कर्तव्य उरले होते. रघुनाथ उर्फ दादास याची कल्पना असल्याने पेशवेपदासाठी त्याने अप्रत्यक्षरित्या स्वतःचे नाव हस्तकांमार्फत पुढे केले. परंतु इतरांनी त्यास विरोध दर्शवल्याने त्याने माधवरावास पेशवेपद घेण्यास आडकाठी केली नाही.  

    माधवराव पेशवा झाला त्यावेळी त्याच्यासमोर पुढील महत्त्वाचे प्रश्न होते :- (१) उत्तरेतील राज्याची ढासळती स्थिती सावरणे. (२) कर्नाटकांतील आपली अस्थिर सत्ता स्थिर करणे. (३) निजामाला आळ्यात ठेवणे. (४) गृहकलहास तोंड देणे. (५) सरदारांना डोईजड न होऊ देणे.  

    माधवरावाची संपूर्ण कारकीर्द याच पाच प्रश्नांचा बंदोबस्त करण्यात खर्ची पडल्याचे दिसून येते. पैकी, शिंदे – होळकरांच्या मार्फत त्याने उत्तरेची विस्कटलेली घडी सावरत प्रसंगी बिनीवाले – कानडे यांना उत्तरेत पाठवून शिंदे – होळकरांना रगडून आपले वर्चस्व स्थापित केले. नानासाहेब पेशव्याच्या कर्नाटक स्वाऱ्यांनी तेथील प्रबळ प्रस्थापित हिंदू – मुस्लीम संस्थानिक दुर्बल होऊन हैदरअलीच्या उदयास योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण होऊन त्याचे प्रस्थ वाढू लागले होते. माधवरावाने कर्नाटकांत वारंवार स्वाऱ्या करून हैदरला समूळ उखडून काढण्याचे प्रयत्न केले. परंतु एका मर्यादेपर्यंत हैदरचा बंदोबस्त तो करू शकला नाही. याची मुख्य दोन कारणे म्हणजे हिंदुस्थानात रंगलेला इंग्रज – फ्रेंचांचा सामना व बदलत्या युद्धतंत्राकडे केलेली पेशव्याने डोळेझाक ! 

    निजाम व गृहकलहाची चर्चा थोडी तपशीलवार व स्वतंत्र करण्याजोगी असल्याने त्याचा विचार आपण पुढील परिच्छेदांत करू. राहिला प्रश्न डोईजड सरदारांचा तर गृहकलहात भाग घेणाऱ्या गायकवाडांना त्याने चांगलेच नरम केले. परंतु त्यामुळे पुढे गायकवाड पेशव्यावर नाराज होऊन इंग्रजांना सामील झाले. शिंदे – होळकर कितीही वजनदार सरदार असले तरी अद्याप पेशव्याच्या विरोधात जाण्याची त्यांची छाती नसल्याने त्यांनी माधवरावाच्या कारकिर्दीत पेशव्याच्या तंत्रानेच निभाव केला. नागपुरकर भोसल्यांचे प्रकरण त्यामानाने थोडे वेगळे बनले.  

    वस्तुतः नागपूरकरांना नानासाहेबाने आपल्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणले होते. त्यातच गृहकलहांनी ती सत्ता उतरणीला लागली असली तरी त्यांचा नाममात्र प्रमुख जानोजी भोसले हा मोठा उपद्व्यापी होता. रघुजीचा हा मुलगा शूर असला तरी बापाची कर्तबगारी, मुत्सद्देगिरी त्याच्या अंगी बिलकुल नसल्याने केवळ पेशव्याला विरोध करण्याच्या नादात त्याने निजामाच्या मदतीने पेशव्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले. परंतु पेशव्याने प्रथम निजामास नरम करून मग भोसल्यावर स्वाऱ्या करून त्यांस अधिकृतरीत्या आपल्या अंमलाखाली आणले.  

    दि. २३ मार्च १७६९ रोजी झालेल्या पेशवा – भोसले यांच्या कनकापूर तहातील प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे : - (१) पेशव्याच्या आज्ञेशिवाय भोसले फौज वाढवू अथवा कमी करू शकत नव्हते. (२) पेशवे बोलावतील तेव्हा चाकरीस यावे लागेल. (३) पेशव्याच्या विरोधात बंड, फितुरी करणाऱ्यांना थारा न देणे. (४) दिल्लीचा बादशाह, अयोध्येचा नवाब, रोहिले, इंग्रज व मोगल यांच्याशी पेशव्याच्या परवानगीशिवाय राजकारण करू नये. (५) पेशव्यांना दरसाल ५ लाखांची खंडणी देणे. (६) भोसल्याच्या ओरिसा प्रांतास बंगालचे इंग्रज उपद्रव देतात. तेव्हा त्यांच्यावर फौज पाठवण्याचा प्रसंग आल्यास पेशव्याला विचारून पाठवावी. (७) भोसल्यावर परचक्र आल्यास पेशव्याने मदतीस सैन्य पाठवावे.   

    कनकापूरच्या तहातील या निवडक अटी पाहिल्यास नागपूरकर आता पेशव्यांचे मांडलिक बनून राहिल्याचे स्पष्टपणे दिसून येत असले तरी हि स्थिती काही कारणांनी दीर्घकाळ न राहता भोसले फिरून पूर्वपदावर आले व पेशव्यांच्याही घरात दुफळी निर्माण होऊन पुढे त्यांच्या कारभाऱ्यांचे राज्यात अतोनात प्रस्थ माजल्याने भोसले इंग्रजांकडे वळले. 

    चीनकिलीजखान निजामउल्मुल्कने दख्खनमध्ये आपल्या राज्याची स्वतंत्र स्थापना न करता दख्खनचा सुभा बादशाहकडून सुभेदारीसाठी मिळवून त्यावर आपला अंमल बसवला. या सुभ्यातील कोणत्याही घडामोडीशी वा घटनांशी त्याने मोगल बादशाहचा संबंधचं येऊ दिला नाही. जे धोरण पेशव्यांनी किंवा शाहुच्या सरदारांनी अंमलात आणले त्याच धोरणाची पूर्तता मोगल बादशाहीत निजाम करत होता. निजामाच्या दक्षिणेतील बैठकीमुळे सातार – कोल्हापुरास चाकरी करण्याची इच्छा नसणाऱ्या मराठी सरदारांना नोकरीसाठी एक नवीन दरबार प्राप्त झाला. त्यातही शाहू स्वतःला मोगलांचा ताबेदार समजत असल्याने व पुढे पेशव्यांनीही स्वतंत्र राजसत्तेची स्थपना न केल्याने मराठी सरदारांच्या दृष्टीने सर्वच चाकऱ्या अखेर मोगलांच्याच होत्या. मग ती सातार – कोल्हापूर वा पुणे दरबारची असो अथवा खुद्द हैद्राबादची !  

    उपरोक्त दरबारांतील सत्ताधीश मोगल बादशाहलाच सार्वभौम मानत असल्याने मराठी सरदारांनी निजामाच्या चाकरीला प्राधन्य दिल्यास नवल काय ? शिवाय, शाहू वा संभाजी किंवा पेशव्याच्या नियंत्रणाखाली न राहता स्वतंत्र जहागीर पदरात पाडून घ्यायची असल्यास मोगल दरबारी निजामाशिवाय दुसऱ्या कोणाचा वशिला चालणार ? वेळप्रसंगी खुद्द पेशवा आणि त्याच्या सरदारांनीही सुभ्यांकरता निजामाच्या मार्फत मोगल दरबारी रदबदली केल्याची उदाहरणे डोळ्यांसमोर असताना जहागिरीसाठी निजामाला मिळणाऱ्या मराठी सरदारांना दूषणं देण्यात काय अर्थ ? 

    शाहूचे विशिष्ट धोरण, पेशव्यांची अपुरी लष्करी व्यवस्था अन निजामाची मुत्सद्देगिरी. या तिघांचा एकत्रित परिणाम म्हणजे पालखेडपासून उदगीरपर्यंत पेशव्याने निजामाला पराभूत करूनही दक्षिणेत निजाम कायम राहिला. उदगीरनंतर सदाशिवराव उत्तरेत जाऊन पानपती अडकला तेव्हाच निजामाने दक्षिणेत उचल खाल्ली. यावेळी नानासाहेब उत्तरेच्या वाटेवर असून त्याने रघुनाथास निजामाला मदतीस घेऊन येण्याचे वा त्यांस ठार / कैद करून त्या जागी दुसऱ्या इसमास नेमण्याची अव्यवहार्य सूचना केली होती. अर्थात, पेशव्याची सूचना दादाने अंमलात आणली नाही व पुढे पानिपतचे वर्तमान समजल्यावर पेशवाही अर्ध्या रस्त्यातून मागे फिरल्याने निजामासोबत लागलीच तंट्याची वेळ आली नाही. 

    नानासाहेब दक्षिणेत परतला व अल्पावधीत मरण पावला. त्यावेळी उदगीर प्रकरणी झालेली हानी भरून काढण्याची तयारी निजामाने चालवली होती. तेव्हा माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळताच दादा – माधव निजामाच्या बंदोबस्तासाठी ससैन्य चालून गेले.  

    उभयपक्षांच्या काही चकमकी होऊन ता. ५ जानेवारी १७६२ रोजी उरळी येथे निजाम – पेशव्याचा तह होऊन ४० लाखांचा मुलुख निजामाला गमवावा लागला. याविषयीची अधिक चर्चा गृहकलहात करायची असल्याने अधिक काही लिहित नाही. उरळीवर निजामाला चेपल्यावर काही काळ तो स्वस्थ राहिला. परंतु परत एकदा फिरून त्याने नागपूरकर भोसल्यांना हाताशी धरून पेशव्यावर वर्चस्व बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी माधवराव नामधारी पेशवा असून कारभार रघुनाथराव करत होता. निजाम – भोसल्याच्या युतीने पेशवे अल्प काळ अडचणीत सापडले पण प्रसंगाचे महत्त्व जाऊन माधवाने कारभार हाती घेऊन राक्षसभुवन येथे ता. १० ऑगस्ट १७६३ रोजी निजामाचा जबरदस्त पराभव करून त्यांस गुडघ्यावर आणले. तेव्हा सप्टेंबर महिन्यात निजामाने पेशव्याला उदगीर तहातील साठ व नव्याने २२ लाखांचा मिळून ८२ लक्षांचा प्रांत तोडून देत स्वतःस रक्षिले. स. १७६३ साली निजाम पेशव्याचा अंकित बनला तो खर्ड्याच्या प्रकरणापर्यंत !  

    दरम्यान पेशव्याने निजामाच्या प्रसंगोत्पात भेटीगाठी घेऊन त्यांस राजी राखले. भोसले निजामाच्या साथीने पेशव्याला उपद्रव देत म्हणून भोसल्यावरील स्वारीत निजामाला हाताशी धरून त्याने भोसल्यांचा बंदोबस्त केला. जेणेकरून निजाम – भोसले नजीकच्या काळात तरी एकत्र येण्याची शक्यता राहिली नाही. त्याचप्रमाणे निजाम पेशव्यांच्या गृहकलहात हात घालणार नाही याचीही पेशव्याने योग्य ती खबरदारी घेतली.  

    माधवरावाच्या तडाख्यातून जरी निजामाचे राज्य बचावले असले तरी अंतस्थरीत्या इंग्रज – फ्रेंच त्यास पोखरत गेल्याने हि सत्ता नाममात्र प्रमुख राहिली. अर्थात, हा दृश्य परिणाम खर्ड्यानंतर सर्वांना दिसून आला असला तरी काही मुत्सद्द्यांना त्याची याच काळात जाणीव होऊ लागली होती.  

    पेशवेपदाच्या प्राप्तीपासून ते अखेरच्या घटकेपर्यंत माधवरावाची गृहकलहातून सुटका झाली नाही. प्रथम रघुनाथराव, नंतर सदाशिवरावाचा तोतया व फिरून रघुनाथदादा. पैकी, प्रथम 
सदाशिवरावाच्या तोतयाची आपण थोडक्यात चर्चा करू.  

    पानिपतच्या युद्धांत सदाशिवराव मेल्याबद्दल कित्येकांची खात्री असली तरी सदोबाची पत्नी --- पार्वतीबाई व कित्येक मुत्सद्यांच्या मते तो पानपती मेला नाही. अर्थात, सदाशिवाचा अंत पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने व ज्यांनी त्याचे प्रेत पाहिले त्यांनी काही कारणांनी मौन बाळगल्याने हा प्रश्न तेव्हाही व आजही अनुत्तरीत आहे. माधवराव पेशवाईवर आला त्याच सुमारास सदोबाचा तोतया उत्तरेत प्रकटला. उत्तरेतील पेशव्याच्या काही सरदारांनी देखील त्याचा पक्ष उचलून धरल्याने दक्षिणेत बरीच खळबळ माजली. यावेळी पेशवा निजामाशी झगडण्यात गुंतल्याने त्याने हि गोष्ट काहीशी दुर्लक्षित केली. पुढे निजामाचे प्रकरण आटोपून पेशवा कर्नाटकांत गेला तेव्हा सदोबाचा तोतया दक्षिणच्या वाटेवर होता. यावेळी दादा – माधव एकत्र असून त्यांनी शिंदे – होळकरांना तोतयाची पूर्ण चौकशी क्कारून खरा असल्यास घेऊन येण्याची व खोटा असल्यास पारिपत्य करण्याची सूचना केली. 

    स. १७६४ च्या ऑगस्टमध्ये मल्हारराव होळकराने तोतयाची चौकशी करून तो भाऊ नसल्याचे पेशव्यास कळवले व त्यांस पकडून पुण्याला पाठवले. तिथे फिरून चौकशी होऊन तोतया असल्याचे सिद्ध झाले व त्यास डोंगरी किल्ल्यात कैदेत टाकले. परंतु बाळाजी विश्वनाथची मुलगी व रघुनाथाची आत्या --- अनुबाई घोरपडेने हा तोतया नसून खरा सदाशिवराव असल्याचे सांगितल्याने फिरून संभ्रम निर्माण झाला. तेव्हा पंधरा दिवस त्यांस अनुबाईच्या घरी ठेवण्यात आले. नंतर अनुबाईने आपला शब्द फिरवून त्यांस तोतया म्हणून जाहीर केले. त्यानंतर एके दिवशी पुणेकरांसमोर त्यांस उभे करण्यात आले व नंतर पर्वतीवर अनेक मुत्सद्दी – पंडितांनी त्याची चौकशी करून तो तोतया असल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी तोतयाने आपण कनोजी ब्राम्हण असून आपले नाव सुखलाल असल्याची कबुली दिली. तेव्हा त्यांस नगरच्या किल्ल्यात अटकेत टाकण्यात आले.  

    माधवरावाच्या काळात सुखलाल कैदेतचं राहिला. हा इसम जरी तोतया निघाला तरी आपला पती जिवंत आहे, यावर असलेली पार्वतीबाईची श्रद्धा अजिबात ढळली नव्हती. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रथम हाच इसम खरा सदाशिव असल्याचे सांगणारी अनुबाई पंधरा दिवसांनी त्यांस तोतया का म्हणाली ? पार्वतीबाई व त्या तोतयाची भेट का घडू दिली नाही वा चौकशी समयी तिला का बोलावण्यात आले नाही ? तोतयाची खात्री पटल्यावरही माधवाने त्यांस जिवंत का ठेवलं ? हे मुख्य प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.  
    सदोबाचा तोतया पेशव्याचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहण्यापुर्वीच रघुनाथरावाच्या रूपाने माधवाला घरगुती व राजकीय कलहास तोंड द्यावे लागले. अर्थात पेशव्याच्या घरचे भांडण हे फक्त भट घराण्यापुरते मर्यादित न राहता त्याचा उपसर्ग समस्त राज्याला व राज्याच्या परराज्य धोरणालाही झाला. सर्वप्रथम आपण या तंट्यामागील उभयपक्षांची मनोभूमिका पाहू.  

    पानिपतचा पराभव, विश्वासरावाचा मृत्यू व पाठोपाठ नानासाहेबाच्या निधनाने पेशव्यांच्या सत्तेला बऱ्यापैकी हादरा बसला होता. पेशव्याचे सरदार जरी कायम असले तरी पेशवे घराण्यातील कर्ती माणसं काळाच्या पडद्याआड गेल्याने व राज्याभोवती निजाम – हैदरसारखी वादळं घोंगावू लागल्याने यासमयी पेशवेपद अथवा मुख्य कारभार आपल्या हाती आला तरच निभाव लागेल अशी रघुनाथरावाची प्रामाणिक समजूत होती. तत्कालीन वारसा पद्धत लक्षात घेता पेशवेपद थेट त्यांस मिळणे मुश्कील असल्याने माधवाने आपल्या आज्ञेत राहून कारभार करावा यावरच तो समाधान मानण्यास तयार होता. परंतु त्याच्या पक्षाचे जे मुत्सद्दी होते, त्यांची वासना निराळीच होती. रघुनाथाने राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्यास त्यांस आपल्या तंत्राने कारभार करणे भाग पडून आपले महत्त्व वाढेल व स्वार्थ साधला जाईल अशी त्यांची कामना होती. याकरता दादाने थेट प्रमुखपद हाती घ्यावे याकरता ते प्रयत्नशील होते.  

    माधवरावाची स्थिती थोडी वेगळी असली याहून फारशी भिन्न नव्हती. वारसा हक्काने मिळणारी पेशवाई तर त्यांस हवीच होती परंतु, राज्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला दादा व त्याच्या मुत्सद्द्यांचीही आवश्यकता भासत होती. अर्थात, पेशवेपद स्वीकारतेवेळी हे सर्व त्याच्या होते असे म्हणवत नाही. परंतु ज्या परिस्थितीत त्यांस पदाची प्राप्ती झाली ती मात्र याचं गोष्टींकडे इशारा करते. 

    माधवाच्या पक्षपात्यांकडे मात्र दूरदृष्टीचा अभावचं होता. माधवाची पहिली व खंबीर पक्षपाती म्हणजे गोपिकाबाई ! राजकारणात सहभाग घेणाऱ्या तत्कालीन घराण्यांतील स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असल्याचे आपणांस दिसून येते. गोपिकाबाई अथवा भट कुटुंबातील स्त्रियाही यांस अपवाद नव्हत्या. नानासाहेबाच्या काळात गोपिकाबाईचा राजकारणात कितपत सहभाग होता हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी ती राजकारणापासून अलिप्त होती असे म्हणता येत नाही. पतीच्या निधनानंतर मुलाचा राजकारणात व कुटुंबात जम बसवण्याची जबाबदारी आपली असून ती आपणच पार पाडली पाहिजे अशी बाईची प्रामाणिक भावना ! पर्यायाने दादा – गोपिकाचा अप्रत्यक्ष झगडा जुंपणे स्वाभाविक होते. पटवर्धन, पेठे प्रभूती मंडळी गोपिकाबाईचे मुख्य सल्लागार असून यांच्या व इतरांच्या मदतीने दादाला नियंत्रणात आणून माधवचा --- पर्यायाने आपला शह राज्यकारभारावर बसवण्याचा गोपिका – माधवाच्या पक्षपात्यांचा हेतू होता.   
  
    त्यात आणखी कोकणस्थ – देशस्थ या ब्राम्हणी जातीअंतर्गत वादाचीही भर पडली. सखाराम देशस्थ असल्याने त्याचा पक्ष वेगळा. त्याविरुद्ध बव्हंशी कोकणस्थ माधवाच्या बाजूने उभे राहिले. अर्थात सर्वच देशस्थ बापूला व सर्वच कोकणस्थ गोपिकाबाईच्या पक्षाला अनुकूल होते असे नाही.

    दादा – माधवाच्या या झगड्यात उभय पक्षीय समर्थकांचे हितसंबंधही गुंतल्याने चुलत्या – पुतण्याचे ऐक्य जमणे हि कवीकल्पनाच झाली होती ! त्यातल्यात्यात निजामाने पानिपतचा रंग पाहून राज्यावर चाल केल्याने दादा – माधवाने एकत्र येऊन त्याचा सामना करत उरळीवर निजामास शरण आणले. यासमयी निजामाचा संहार करण्याची संधी असूनही दादाने त्यांस भावी राजकारणाकरता जीवदान दिल्याचे बव्हंशी इतिहासकारांचे मत असले तरी पुराव्यांच्या आधारे असे दिसते कि, यासमयी एका मर्यादेपेक्षा निजामाचा अधिक बंदोबस्त करण्याची कुवत मराठी सैन्यात नसल्याने दादाने प्रकरण तहाने आटोपते घेतले. ज्या निजामाचा स. १७६० च्या अखेरीस बंदोबस्त करणे दादाला अशक्यप्राय वाटत होते, त्याच निजामाचा स. १७६२ आरंभी सर्वनाश करणे कितपत शक्य होते याचा अभ्यासू वाचकांनीच विचार करावा. किंबहुना राक्षसभुवन नंतर थेट खर्ड्याच्या संग्रामातही मराठी फौजा निजामाला सर्वस्वी बुडवू शकल्या नाहीत व पेशवाई अस्तानंतरही ते राज्य मांडलिक तत्वावर कायम राहिलं यामागे त्या सत्तेच्या या भूमीत रुजलेल्या मुळांचा थोडाफार तरी हातभार असण्याची शक्यता नाकारण्यात काय अर्थ आहे ?

    उरळीचे प्रकरण आटोपल्यावर फिरून दादा – माधव मूळ पदावर आले. पेशव्याची अडवणूक करण्यासाठी दादा – बापूने निवृत्तीचे सोंग घेतले. तेव्हा गोपिकाबाईने मध्यस्थी करून बापूला घरी बसवत त्रिंबकराव पेठे व बाबूराव फडणीसाने दादाच्या सल्ल्याने कारभार करण्याची तोड काढून दादा – बापूची युती फोडली.  या तोडग्याने पेशवा तसेच दादा समाधानी झाले नाहीत. परंतु इतक्यात वर्दळीवर येण्याची त्यांची तयारी नसल्याने त्यांनी तात्पुरती पड खाल्ली व दोघेही कर्नाटक स्वारीवर निघून गेले. परंतु दादा निम्म्यातून मागे फिरला. याच समयी मल्हारराव होळकर वाफगावी येऊन दाखल झाल्याने पेशव्यास धास्ती पडून तोही पुण्यास परतला. यावेळी दादा – माधवास होळकराच्या पाठिंब्याची तीव्रतेने गरज भासत होती. परंतु होळकरास पेशव्याच्या गृहकलहात रस नसल्याने त्याने उभयतांची समजूत काढत पेशव्याचे कारभारी पेठ्याकडे ठेवण्याची व पेशव्याने आबा पुरंदरे, सखारामबापु यांच्या सरंजामांची घालमेल न करण्याची सूचना करत उभयतांचा मिलाफ घडवून आणला. प्रथम गोपिका व नंतर मल्हारीच्या सूचना कितीही व्यवहार्य असल्या तरी सत्तेच्या अधिकारासाठी हट्टास पेटलेल्या चुलत्या – पुतण्याची समजूत काढण्यास पुरेशा नव्हत्या. त्यात दादा अधिक उतावीळ असल्याने त्याने पेशव्याकडे पाच किल्ले व दहा लाखांच्या जहागीरीची मागणी करत राज्यवाटणीच्या मुद्द्याला अप्रत्यक्ष हात घातला. परिणामी, उभय पक्षांच्या झुंजी होऊन माधवरावाचा पराभव झाला व त्याला दादाच्या नजरकैदेत राहवे लागले.

    पेशवेपद माधवाकडे कायम राहून सर्व कारभार दादाने आपल्या हाती घेतला. यासमयी जे जे दादाच्या मदतीस आले त्या सर्वांना दादाने भरभरून मोबदला दिला. ( स. १७६२ ) आळेगावचा हा प्रकार प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत विशेष नसला तरी अल्पसा महत्त्वाचा आहे. आळेगाव प्रकरणी दादाने निजामाला सुमारे ६० लाख उत्पन्नाचा प्रदेश देत दौलताबादचा किल्लाही देऊन टाकला. यांमुळे निजामाची भूक आणखीनच भडकली. नागपूरकर भोसल्यांकडे त्याचे यापूर्वीच संधान जुळले असून त्याची अनुकूलता पाहून निजामाने आपले जाळे विणायला आरंभ केला. त्यांस पेशव्याच्या गृहकलहाने हातभार लावला.

    सांगोला मोहिमेच्या वेळी ताराबाईचा पक्षपाती प्रतिनिधी जगजीवन परशुराम उर्फ दादोबा प्रतिनिधीला शह देण्यासाठी नानासाहेबाने भवानरावास प्रतिनिधीपद दिल्याचा उल्लेख मागे आलाच आहे. पुढे दादोबा – पेशव्यात सौरस्य निर्माण होऊन तो वाद निकाली निघून दादोबाच्या पश्चात भवानराव प्रतिनिधी बनला. वास्तविक प्रतिनिधीचं काय पण अष्टप्रधानातील एक पेशवा सोडल्यास इतर पदांना बिलकुल महत्त्व राहिले नसले तरी पेशवाईची वस्त्रे छत्रपतीकडून घेताना प्रतिनिधीची गरज पडत असल्याने व अधिकारात प्रतिनिधी पेशव्याचा वरिष्ठ असल्याने या पदावर आपल्या पक्षाचा व्यक्ती बसला पाहिजे म्हणून दादाने भवानरावाचे प्रतिनिधीपद स्वतःच्या अल्पवयीन पुत्रास --- भास्कररावास दिले अन नारो शंकरला मुतालिक म्हणून नेमले. या घडामोडींमुळे भवानराव आणि त्याचा मुतालिक गमाजी पेशव्यावर रुष्ट होऊन निजामाला मिळाले.

    दरम्यान दादा कर्नाटक स्वारीस जात असता मिरजेचे ठाणे रिकामे करण्यावरून पटवर्धन – दादाचा झगडा होऊन दादाने लढाई करून मिरज ताब्यात घेत उर्वरित प्रदेश पटवर्धनांकडे कायम ठेवला. अर्थात, पटवर्धनांनी त्यावर संतुष्टता न मानता निजामाकडे धाव घेतली. पर्यायाने पेशव्याची बाजू उत्तरोत्तर हलकी पडत निजामाचा गोट बळावत जाऊन एका नव्या कारस्थानाचा जन्म झाला.

    प्रतिनिधी, भोसले व निजाम या त्रिकुटाने आपसांत विचार विनिमय करून पेशव्याचा नक्षा उतरवण्याचे ठरवले त्यानुसार (१) प्रतिनिधी – भोसल्याच्या मदतीने रामराजास छत्रपतीपदावरून काढून जानोजी भोसल्यास सातारची गादी मिळवून देणे किंवा हे न जमल्यास छत्रपतीचा पालक म्हणून जानोजीची नेमणूक करणे. (२) राघोबाने अलीकडे ज्या घालमेली करून जुन्या मुत्सद्दी मंडळींना घरी बसवले, त्यांना त्यांची पदे परत मिळवून देणे. (३) या बदल्यात निजामाला २० लाखांची खंडणी मिळणार असून जिंकलेल्या प्रदेशात जो मुलुख – पैसा मिळेल त्याची निजाम – भोसल्यांत शेकडा साठ – चाळीसच्या हिशेबाने वाटणी व्हावी.

    निजामाने जानोजीसोबत जरी हा तह केला तरी नागपूरकरांवर त्याचा फारसा विश्वास नसल्याने याच अटींवर त्याने कोल्हापूरकरांशी देखील सूत्र जुळवले. सारांश, पेशव्याची राजकीय सत्ता पूर्णतः निष्प्रभ करण्याचा उपक्रम निजामाने आरंभला होता तर प्रसंगी सातारची गादी वा पेशव्याप्रमाणे राज्याची कुलमुखत्यारी मिळवण्यासाठी जानोजीची धडपड चालली होती. तुलनेनं गमाजी वा पटवर्धन स्वतःच्या स्वार्थापलीकडे फार काही बघत नव्हते.

    सर्व तयारी होताच निजामाने कुरापतीकरता पेशव्याला आपल्या मागण्या कळवल्या :- (१) प्रतिनिधी, पटवर्धन, पिराजी नाईक निंबाळकर यांच्या जहागिऱ्या, किल्ले तुम्ही घेतले आहेत ते परत करणे. (२) जानोजी भोसल्यास आणखी नवीन जहागीर देणे. (३) भीमे अलीकडील जे राज्य आहे ते सर्व निजामाला देणे. (४) राज्यातील बळकट किल्ले निजामाकडे सोपवणे व (५) निजामाने नेमून दिलेल्या कारभाऱ्यामार्फत  राज्याचा कारभार करणे.
निजामाच्या मागणीने तात्पुरते दादा – माधवात सख्य होऊन त्यांनी राक्षसभुवनवर निजामाला चेपले. तत्पूर्वी भोसले, पटवर्धन, प्रतिनिधीशी त्यांनी संधान बांधून त्यांना आपल्या पक्षात वळवले होते.

    राक्षसभुवन नंतर काही काळ दादा – माधवातील कलह तात्पुरता थंडावला असला तरी पुरंदर किल्ल्याच्या निमित्ताने उभयतांचे शीतयुद्ध पुन्हा सुरु झाले. ( याविषयी सविस्तर माहिती थोरला माधवराव आणि रघुनाथव पेशव्या संबंधीच्या लेखांत दिलेली असल्याने त्याची पुनरोक्ती करत नाही. ) त्यावेळीही उभयतांचा संघर्ष हातघाईवर येता येता राहिला.

    त्यानंतर पेशव्याने दादाचे चाळे बंद पाडण्यासाठी त्याला उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेवर रवाना केले. परंतु दादाचे मन पेशवाईत अडकल्याने त्याची उत्तर स्वारी अपयशी ठरलीच परंतु मल्हारराव व मालेराव होळकराच्या निधनानंतर हओल्कारी दौलातीवर ताबा मिळवून फिरून पेशवाईकरता यत्न करण्याचा त्याचा डाव माधवरावाच्या पाठींब्यावर अहिल्याबाईने धुळीस मिळवल्याने त्याची पतही संपली.

    उत्तरेच्या मोहिमेचा बोजवारा उडाल्याने दादाने दक्षिणचा रस्ता धरला व पेशव्याकडे राज्याच्या वाटणीचा प्रस्ताव पाठवला. पेशव्याने याही वेळेस दादाची मागणी धुडकावून लावली तेव्हा त्याने सैन्याची जुळवाजुळव करत निजाम, हैदर, इंग्रज, गायकवाड, भोसले इ. कडे आपले दूत रवाना केले. पेशव्यानेही प्रकरण निकाली काढण्यासाठी लष्करी सिद्धता आरंभली. दरम्यान दादाने भुस्कुट्यांचा मुलगा दत्तक घेऊन गृहकलहाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. परिणामी स. १७६८ च्या जून मध्ये नाशिक जवळ धोडप येथे उभयतांची झुंज होऊन दादाचा पराभव झाला. पेशव्याने त्याच्यावर नजरकैद बसवली तरी त्याच्या ऐशोआरामात कसली उणीव पडू दिली नाही. या नंतर माधवरावाच्या मृत्यूपर्यंत दादा नजरकैदेतचं राहिलं. परंतु हि कैद त्याने सुखासुखी उपभोगली नाही. संधी मिळेल तेव्हा पळून जाण्याचे त्याचे प्रयत्न चालूच राहिले. पेशव्याने प्रसंगी कनिष्ठपणा घेऊन त्याची समजूत काढून जसे तसे निभावले खरे परंतु त्याच्या मृत्यू नंतर सर्व चित्रचं बदलले.

    रघुनाथरावाच्या राज्य वाटणीच्या मुद्द्यावरून तसेच सत्ता प्राप्तीसाठी त्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पेशवाईतील कलीपुरुष, काळराहू, घरभेदी इ. शेलक्या विशेषणांनी बव्हंशी इतिहासकारांनी त्याची संभावना केली आहे. परंतु इतिहासकरांचे हे शेरे टोकाचे आहेत. बापजाद्यांनी कमावलेल्या जहागिरीचा – राज्याचा वाटा रघुनाथाने मागणे यात नेमकं गैर असं काय आहे ?

    पेशवाई बाळाजी विश्वनाथने संपादली. तिचा विस्तार बाजीरावाने केला. पुढे नाना – भाऊ – दादाने तिला साम्राज्याचे स्वरूप मिळवून दिले. नंतर माधवराव मुख्त्यारीने कारभार करू लागला तेव्हा दादापुढे दुसरा कोणाता मार्ग उरला होता ? नानासाहेब पेशव्याने लष्करी चाकरी दादाकडे तर मुलकी भाऊकडे देत उभयतांना सांभाळून घेत राज्यकारभार चालवला. हा क्रम नानासाहेबाच्या पश्चात चालणे शक्य नव्हते व झालेही तसेच. पुणे दरबारातील मुत्सद्दी मंडळींच्या तुलनेने दादा – माधव दोघेही हीन होते. पैकी, माधवाने अल्पावधीत आपली करामत दाखवत मुत्सद्द्यांवर आपला पगडा बसवला. परंतु दादाकडे ती कुवत नव्हती. पण अधिकाराचा लोभ होता. तेव्हा त्या लोभास्तव त्याने हात – पाय मारून बघितले. त्यामागील त्याचा हेतू अधिकारप्राप्ती असून राज्यानाश नव्हता. मात्र हीच गोष्ट इतिहासकारांनी दुर्लक्षित केली. राज्याचा नाशचं करून घ्यायचा असता तर पाहिजे त्या अटींवर त्याने निजाम – हैदरची मनधरणी करून त्यांच्या सहय्य्याने दौलतीचा विध्वंस केला असता. परंतु इच्छित कार्यापुरता त्यांचा अवलंब करून फिरून त्यांच्यावर शस्त्र उपसण्याची दादाची वृत्ती नेमकं काय सांगते ?

    दादाने इंग्रजांची मदत घेऊन त्यांना घरात घेतल्याचे बोलले जाते परंतु, तत्कालीन राजकारणात शेजारच्या सत्तेची मदत घेण्याचा प्रघात असल्याने व दादासाहित सर्वच एतद्देशीय राजकारणी इंग्रज, फ्रेंच प्रभूती युरोपियन्सना आपल्यापैकी एक असेच समजत असल्याने त्याच्यावर इंग्रजांना घरात घेतल्याचा आरोप करणे कितपत योग्य आहे ? दीर्घकाळ या देशार इंग्रजांनी आपली सत्ता गाजवल्याने ज्यांनी त्यांची मदत घेतली तो देशद्रोही, गद्दार अशीच आपली मानसिकता बनल्याने बहुधा इतिहासकारांनी दादा सहित ज्या – ज्या व्यक्तींनी इंग्रजांची मदत घेतली त्यांना घरभेदे ठरवले आहे. परंतु, हा नियम देखील सर्वांना सारखाच लागू केलेला नाही, हे देखील अभ्यासू वाचकांनी लक्षात घ्यावे. या संदर्भात विषयानुरूप विवेचन पुढे तपशीलवार येणार असल्याने तूर्तास इतकेच पुरे.
                                    ( क्रमशः )

संदर्भ ग्रंथ :-
१)      छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)      ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स. सरदेसाई
३)      काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)      मराठी रियासत ( खंड १ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई
५)      मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)      मराठेशाहीतील वेचक – वेधक :- य. न. केळकर
७)      भूतावर भ्रमण : ऐतिहासिक लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
९)      नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
१०)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)  मराठी दफ्तर रुमाल पहिला (१) :- वि. ल. भावे
१२)  मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- वि. ल. भावे
१३)  फार्शी – मराठी कोश :- प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)  दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)  छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी
१७)  ताराबाई – संभाजी ( १७३८ – १७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)  ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)  पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :- कृ. वा. पुरंदरे
२०)  नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे
२१)  सरदेसाई स्मारक ग्रंथ :- श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)  मराठी सत्तेचा उत्कर्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे
२३)  शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके 
२४)  मराठ्यांची बखर :- ग्रँट डफ लिखित व कॅप्टन डेविड केपन अनुवादित ( आवृत्ती ६ वी )      
 

३ टिप्पण्या:

Nitin Balpatki म्हणाले...

छान माहिती. समतोल विवेचन

sanjay kshirsagar म्हणाले...

Nitin Balpatki Balpatki
धन्यवाद सर !

Unknown म्हणाले...

शिवाजी महाराजांना जे १७ व्या शतकात समजले. ते रघुनाथारावाला प्लासी आणि बक्सारच्या लढाईनंतरहि समजले नाही कि सत्तेच्या लोभामुळे त्याला दुसरे काही दिसले नाही.ब्रिटिशांनी सुरतेला शिवाजी महाराजांना विरोध केला. पन्हाळ्यावर तोफा डागल्या, औरंगजेबाच्या हयातीत मुघलांशी बंगालमध्ये १६९३ ला युद्ध केले. कान्होजी आंग्रे विरुद्ध युद्ध केली. तुळाजी आंग्रेला नानासाहेब पेशव्याच्या मदतीने बुडवले त्या इंग्रजांना रघुनाधराव ओळखत नव्हता का? रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात टोपीकरांचा उल्लेख करून त्यांच्या कारवायांवर अचूक बोट ठेवतात , " यांचे खावंद देशोदेशी राज्य करतात. राज्य करणाऱ्यास स्थळलोभ नाही असे काय घडो पाहते. त्यास हि हट्टी जात. घेतली जागा मेल्यानेही सोडावयाचे नाही." हे अमात्यांचे शब्द. इंग्रज काय किंवा इतर युरोपिय सत्ता काय या फक्त शेजारच्या सत्ता नव्हत्या. तर देश बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या परकीय सत्ता होत्या. खुद्द आनंदिबाई सखाराम बापूला पत्रात म्हणते, " अंग्रेज घरात येऊ पाहतात.आमचे निमित्ये करून सर्व दौलतीस गिऱ्हाईक होतील. शुजाउदौले व महंमद अली चाकरीस येतो म्हणून आले आणि दौलतेचे धनी बनले. हे सर्व तुम्हास ठाउकीच आहे." निजाम आणि हैदरची मनधरणी तर दादा माधवरावाच्या हयातीपासून करतच होता. पण निजामाने ऐनवेळी आपले रंग दाखवले आणि राक्षसाभूवनला माधवरावाकडून चोप खाल्ला. हैदरला तर माधवरावाने इतके धुतले कि त्यांच्या हयातीत दादा हैदाराकडून मदत घेऊ शकला नाही. नारायणरावाच्या खुनानंतर त्याने तसे प्रयत्न केले. तेव्हा बारभाईनी हैदारका तुंगभद्रा नदीपलीकडचा प्रदेश देऊन त्याच्याशी तह केला. नादीरशहाच्या स्वारीवेळी "परराज्य राहिले तर ते सर्वांवरी आहे." असे म्हणुन आपल्या शत्रूच्या मदतीला म्हणेजच मुघल बादशहाच्या निघणारे पहिले बाजीराव कुठे, आणि त्यांचा हा स्वार्थी पुत्र कुठे. मराठेशाही इंग्रजांपासून वाचवण्याचे श्रेय नाना फडनिसाला आहे. शिवाय राज्याची वाटणी मागण्याचा दादाला काहीहि अधिकार नव्हता. कारण राज्याचे मालक छत्रपती होते,पेशवे नव्हते. इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे.