सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

शिव - पेशवेकालीन राज्यनिष्ठा, राजनिष्ठा व फितुरी : एक चिंतन ( भाग – ६ )




    छत्रपतीने रघुनाथास पेशवाईवरून बडतर्फ केले. सवाई माधवाचा जन्म होऊन त्यांस पेशवेपद मिळाले व आजवर बंडखोर असलेले कारभारी सरकार नियुक्त अधिकारी ठरले तर सरकार प्रतिनिधी असलेला दादा बंडखोर ठरला. राजकरण वा व्यवहाराचा हा प्रवास विलक्षण असून तितकाच विस्मयकारकही आहे. ज्यांनी दादाला पेशवा बनवण्यासाठी नारायणराव पेशव्याला धरण्याच्या कामी सहभाग घेतला त्यांनीच दादाला पेशवाईवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करवा हे कुठेतरी खटकण्यासारखे आहे. सत्तेचा लोभ आपल्याला नाही असं दादा – आनंदी या बदनाम जोडगोळीने कधीच दर्शवलं नाही. परंतु त्यासोबत नारायणच्या खुनात आपला सहभाग नसल्याचाही त्यांचा दावा होता त्याचं काय ?


    याबाबतीत काही प्रमुख मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.


    नारायणचा खून झाल्यावर सप्टेंबर महिन्यात दादाने महंमद इसफ व सुमेरसिंगाच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केल्याचा उल्लेख मिळतो. शिवाय आनंदवल्लीला त्याने लक्ष भोजनाचाही कार्यक्रम केला. या गोष्टी त्यांस घडल्या प्रकाराचे अजिबात दुःख नसल्याचे दर्शवणाऱ्या आहेत, यात संशय नाही. परंतु तरीही नारायणच्या खुनात त्याचा हात होता, असे म्हणवत नाही. नारायणावर हुकुमाबाहेर जाऊन सुमेरसिंगाने शस्त्र चालवले. या सुमेरसिंगाला अटक करून त्याची जबानी घेण्याचा प्रयत्न झाला होता का, याविषयीचा खुलासा / माहिती अद्याप माझ्या वाचनात आली नाही. पेशवाईतील तत्कालीन न्यायधीश रामशास्त्रीने या प्रकरणी सर्व चौकशी करून दादास सादर केल्याचा उल्लेख सरदेसाई करतात. मात्र शास्त्र्याचा निष्कर्ष त्यांनी दिलेला नाही. असो.


    सवाई माधवाच्या जन्मानंतर कारभाऱ्यांचा पक्ष बळावून तुलनेनं दादाचे पारडे हलके झाले. त्याची भिस्त ज्या मुधोजी भोसल्यावर होती, तो देखील प्रसंग पाहून बारभाईंच्या पक्षाला मिळाला. भोसल्यांचाच कित्ता निजामानेही गिरवत दादाच्या अपेक्षांवर पाणी फिरवले. राहता राहिला हैदर. तर तो देखील कृष्णेच्या पुढे यायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत दादाने गुजरातमध्ये गायकवाड दरबारी तसेच मुंबई – सुरतला इंग्रजांकडे सूत्र लावून पाहण्यास आरंभ केला. कारभाऱ्यांच्या फौजांना झुकांड्या देत स. १७७४ च्या एप्रिलमध्ये नर्मदापार माळव्यात गेला. यावेळी जमल्यास शिंदे – होळकरांच्या मदतीने गमावलेला डाव भरून काढण्याचा त्याचा विचार होता. दादाची चाल ओळखून कारभाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे – होळकरांना दादाला पकडण्याची पत्रे पाठवली होती. खुद्द हरिपंत फडके निजाम – भोसल्यांच्या सैन्यासह दादाच्या पाठीवर होताच.

या काळातील दादा, सरदार, कारभारी यांचे उद्देश नेमके काय होते, हे जाणून घेतल्याखेरीज एकंदर प्रकरणाची उकल होणे अवघड आहे.


    आपण बाळाजी विश्वनाथाचे वंशज असून पेशवाईवर आपला अधिकार असल्याची दादाची प्रामाणिक भावना होती. पेशवाई न मिळाल्यास किमान राज्याची वाटणी तरी व्हावी अशी त्याची रास्त मागणी होती. नारायणास धरण्याच्या बेताचे खुनात रुपांतर झाले व त्यानंतर बारभाईची स्थापना होऊन दादाचा राज्यातून उठावा झाला असला तरी राज्यावरील हक्क त्याने कधीच सोडला नाही. छत्रपतीच्या आज्ञेने निघालेल्या पत्रकानुसार दादा जरी बंडखोर ठरत असला तरी त्यात, त्यांस गुन्हेगार मानलेलं नाही. अर्थात, भट घराण्याच्या मिळकतीवर त्याचा अधिकार कायम असल्याचे गृहीत धरले गेले व समस्त राज्य --- निदान पेशव्यांच्या अंमलाखाली येणारं --- हि भट घराण्याची खासगी मिळकत समजूनच दादा निम्म्या वाटणीचा हेका धरून बसला होता. खेरीज बारभाई मंडळास तो फितूर म्हणत असे. हि मंडळी आपल्या जीवास अपाय करतील वा कैदेत टाकतील हि भीती त्याच्या मनात अखेरपर्यंत राहिली. जेव्हा बाहेरील आधार साफ तुटला व त्यांस पुणेकरांच्या स्वाधीन व्हावे लागले तेव्हा मातबर जामीन घेऊनच त्याने पुणे दरबारी समर्पण केले.


    पुणे दरबारच्या सरदारांमध्ये प्रामुख्याने दोन तट होते. पहिला गट नाना फडणीस व फडके, पटवर्धन प्रभूती सरदारांचा. त्यांच्या लेखी सामान्य गुन्हेगार व राजकीय गुन्हेगार असा फरकच नसल्याने त्यांनी राज्यकारभार दुय्यम मानून गुन्हेगारांचा शोध, अटक व शिक्षा या कृत्यांना प्राधान्य दिलं. परिणामी, राज्यात अव्यवस्था माजायची ती माजलीच. शिवाय कारणपरत्वे दादा व त्याच्या पक्षीयांशी संबंध ठेवणारेही शत्रूगोटांतले मानले जाऊ लागले. या वृत्तीने राज्याचे अपरिमित नुकसान झाले. मात्र याचे दृश्य परिणाम लगोलग नजरेस न पडता प्रत्ययास येण्यास काही काळ लोटावा लागला.


    दरबारातील दुसऱ्या गटाची भावना वेगळीच होती. पुणे दरबारातील बव्हंशी सरदार घराणी बाजीरावाच्या काळात उदयास आलेली व नानासाहेब पेशव्याच्या काळात उत्कर्ष पावलेली. कित्येकांनी प्रसंगी बाजीरावापासून दादाच्या नेतृत्वाखाली मोहिमांत सहभाग घेतला होता. त्यांमुळे दादा विषयी त्यांच्या मनी फारशी कटुता नव्हती. उदाहरणार्थ, महादजीला शिंद्यांची सरदारकी न मिळावी यासाठी दादाने कित्येक कारवाया केल्या तरी प्रसंगी दादाला पकडून पुणेकरांच्या ताब्यात देणे महादजीनेही कित्येकदा टाळल्याचे दिसून येते. यामागील कारण उघड, स्पष्ट आहे. दादाची जी भूमिका होती, ती सरदारांनाही मान्य असून मुरारराव घोरपड्याने तर कारभाऱ्यांना स्पष्ट सल्ला दिला होता कि, थोरल्या माधवरावाच्या काळात होती तशी दादाची व्यवस्था लावून द्यावी. म्हणजे दौलतीत बंडावा होणार नाही. परंतु राज्यातील सर्वात अनुभवी इसमाचे मत यावेळी कोणीच विचारात घेतल्याचे दिसून येत नाही.


    माळव्यात शिंदे – होळकरांनी दादाला रोखले. त्याच्याशी वाटाघाट आरंभली. त्यांच्या शब्दावरून हरिपंतही दादाच्या नजीक न येता लांब राहिला. दरम्यान दादाने इंग्रजांशी लावलेलं संधान फळास आलं. आरंभी साष्टी – वसईच्या मुद्द्यावरून फिस्कटलेला दादा – इंग्रजांचा तह, नंतर जुळून वसई – साष्टी ऐवजी सुरतजवळचा १८ लक्ष उत्पन्नाचा प्रांत देऊन त्याने इंग्रजांकडे आपले संधान पक्के जुळवले. शिंदे – होळकरांना याची कल्पना होती, नव्हती याची स्पष्टता होत नाही. दादाला नर्मदापार कारभाऱ्यांच्या हवाली करणे हीच जोखीम त्यांच्याकडे होती व त्यानुसार त्यांच्याकडून कार्य करून घेण्याची जबाबदारी फडक्यावर होती.


    स. १७७४ चा डिसेंबर महिना अतिशय वेगवान घडामोडींचा होता. पुरंदरावर बाल पेशव्याला पुरषोत्तम पटवर्धनाच्या संरक्षणात ठेवून नाना – बापू हरीपंताकडे निघाले होते. दादासोबत समक्ष वाटाघाटी करून त्याच्या मागण्यांचा निकाल करण्याचा त्यांचा हेतू होता. याच सुमारास दादा – इंग्रजांचा तह बनून इंग्रजांनी ठाण्याचा किल्ला जिंकला. यासंबंधीची पूर्वकल्पना पुणे दरबार असून त्यांनी ठाण्याच्या किल्ल्याला कुमकही पाठवली होती. परंतु पुण्याहून लष्करी मदत येण्यापूर्वीच ठाण्यावर इंग्लीशांनी हल्ला केला. इंग्रजांच्या चढाईचे वर्तमान मिळताच वा त्यापूर्वीच दादानेही बऱ्हाणपुरावरून गुजरातचा रस्ता धरला. शिंदे – होळकर जवळच होते पण त्यांनी हरिपंतास या घटनेची कल्पना देण्यापलीकडे काही केलं नाही. 


    यानंतर दादाच्या मदतीचे निमित्त करून इंग्रजांनी स. १७८३ पर्यंत पुणे दरबारशी युद्ध खेळून भयंकर नुकसान सोसत बऱ्यापैकी फायदा मिळवला. त्याउलट पुणे दरबारास रघुनाथरावाचा ताबा, वसईचा कब्जा यावरच समाधान मानावे लागले. ठाणे व आसपासची तीन बेटं, भडोच शहर इंग्रजांकडे राहिले. गायकवाडांवर काही प्रमाणात इंग्रजांचा वरचष्मा बसला. दादा जरी ताब्यात आला असला तरी त्यास अपाय न करण्याची अट इंग्रजांनी घालूनच त्यांस पुणेकरांकडे सोपवल्याने या दीर्घ युद्धातून पुणे दरबारने नेमके काय साध्य केले हा प्रश्न राहतोच. त्याचप्रमाणे आरंभीच प्रकरण सहजी निकाली काढता येण्यासारखे असतानाही कारभारी व सरदारांनी निकड का केली नाही, याचाही विचार करणे भाग आहे.


    बारभाई कारस्थान शिजून कर्नाटक स्वारीत दादा असतानाच त्यांस त्यावेळीच कैद करण्याची सुवर्णसंधी बारभाईंच्या सरदारांकडे होती. दादाच्या तळावरील त्याचे मोजके पक्षपाती वगळल्यास सर्व बारभाईंचेच साथीदार होते. परंतु, दादाला तेव्हाच न घेरता त्यांनी त्यास मोकळा फिरू दिले हि पहिली चूक. नंतर शिंदे – होळकरांनी त्यांस माळव्यातून गुजरातला जाऊ दिले हि दुसरी चूक. वडगावच्या तहानंतर दादा हाती आला असता व पूर्वानुभव गाठीशी असूनही कारभाऱ्यांनी त्यांस शिंद्याच्या हवाली केले. त्यावेळी शिंद्याची ढिलाई म्हणा वा दादाची चतुराई, त्यावेळीही तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. हि तिसरी चूक.


    ज्या अटींवर सालबाईच्या तहानंतर दादा पुणेकरांच्या हाती आला, जवळपास त्याच अटी – शर्तींवर त्यांस कब्जात घेणे शक्य असूनही तसे करण्यात आले नाही. यावरून दादाचा बंडावा पुढे करून या काळात मुत्सद्दी – सरदारांनी आपापले स्वार्थ – हितसंबंध साधण्याचा प्रयत्न केल्याचे उघड आहे. स्पष्ट आहे. पुणे दरबारशी मैत्री करण्यास उत्सुक असलेल्या फ्रेंचांचेही जवळपास हेच मत असल्याचे दिसून येते. सालबाईच्या तहानंतर पुणे दरबार बारभाईंच्या हाती न राहता नाना फडणीसच्या वर्चस्वाखाली आला तर उत्तरेत शिंद्यापुढे होळकराचे तेज फिके पडून शिंदे बलवान होऊ लागला. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात राज्यात जी अंदाधुंदी माजली, त्याची बीजं याच पहिल्या इंग्रज – मराठा युद्धात रुजल्याचे अभ्यासू वाचकांच्या लक्षात येईल.


    रघुनाथरावास राज्यबुडव्या, काळराहू, घरभेदी हि विशेषणे देण्यापूर्वी इतिहासकारांनी नारायणाच्या खुनाचा नेमका फायदा कोणी व कसकसा घेण्याचा प्रयत्न केला याची डोळस पाहणी केली असती तर राघोबाचे चरित्र आज काळंकुट्ट रंगवलं जात आहे, ते तसे कधीच बनले नसते.


    बारभाई मंडळ उभारणीची कल्पना कोणाची हा प्रश्न जरी अनुत्तरीत असला तरी असं मंडळ उभारल्यावर व त्यांस आरंभी यश आल्यावर आपल्याच साथीदारांचा नाश करण्यासाठी बारभाईंनी ‘ दादा ‘ नावाच्या बाहुल्याचा वापर केला. यापासून ना बापू अलिप्त आहे, ना मोरोबा ना फडणीस नाना !


    रघुनाथाला बारभाईंनी आरंभीच कैद केलं असतं तरी त्याला देहदंड देण्याची त्यांची तयारी होती का याचाही विचार होणे आवश्यक आहे. जिथे माधवासारखा पेशवा प्रत्यक्ष सदाशिवाच्या तोतयाला जगातून नाहीसा करू शकला नाही, तिथे पेशव्यांचेच आश्रित नोकर ; पेशवे कुटुंबीयातील दादाला देहदंड देऊ शकत होते का ? स्पष्टपणे याचे उत्तर देणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. मोगलाई मसलत करून दादाचा निकाल त्यांना लावता आला असता, परंतु तसे करण्यात आले नाही. म्हणजे, दादाचा बंदोबस्त करायचा पण त्याला ठार करायचे नाही. त्याचे अस्तित्व कायम ठेवायचे हि बारभाईंची गरज असल्यानेच स. १७७४ च्या आसपास संपुष्टात येऊ शकणारा दादाचा बंडावा स. १७८२ पर्यंत चालला. 


    आता पुण्याचे मुत्सद्दी आपल्याच एकेकाळच्या धन्याच्या नावाचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधू पाहत असतील तर मग व्यापारी इंग्रजांनी असं कोणतं काळं मांजर मारलं होतं ? त्यांनीही दादाच्या निमित्ताने आपल्या राज्यविस्ताराचा मोका साधून घेतला. युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात तर महादजी शिंदे उभयपक्षी जामीन राहून पेशवा – इंग्रजांच्या तोडीचा सत्ताधीश बनला. एका बंडाव्यातून घडून आलेल्या या राज्यक्रांतीचा अजूनही म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही एवढं नमूद करून हा विषय इथेच पुरा करतो.


    दादाचा बंडावा, इंग्रजांशी पुणेकरांचे युद्ध सुरु असताना सदाशिवाच्या तोतयाचे प्रकरण पुनरपि उद्भवून काही काळ राज्यात मोठी गडबड उडाली होती. थो. माधवाने सदोबाच्या तोतयाला देहदंड न देता डोंगरी किल्ल्यावर कैदेत टाकले होते. दादा पेशवाईवरून पायउतार झाला व इंग्रजांच्या आश्रयास गेला. पुणेकर इंग्रजांशी लढण्यात गुंतले, त्यावेळी रत्नागिरीचा मामलेदार व पेशव्यांचा सावकार रामचंद्र नाईक परांजप्याने रत्नागिरीच्या किल्लेदारास फितवून सदोबाच्या तोतयास कैदमुक्त करण्याची सूचना केली. ज्यावेळी किल्लेदाराने तोतयास बंधमुक्त केले त्यावेळी स्वतः नाईक मजकूर तिथे नव्हता परंतु त्याची पत्नी व मुलगा रत्नागिरीस असल्याचे इतिहासकार नमूद करतात. सदोबाचा तोतया मुक्त होताच बारभाईंचे विरोधक त्याच्याभोवती गोळा होऊ लागले. यावेळी दादाचे तोतायाशी अंतस्थ सूत्र असून सदाशिवरावाच्या हस्ताक्षरातील एक पत्र त्याने तोतयास पाठवून त्याबरहुकुम हस्ताक्षर काढण्याची सूचना केल्याचे सरदेसाई लिहितात.


    तोतयाच्या बंडाने उग्र स्वरूप धारण करण्यास आरंभ करताच कारभाऱ्यांनी महादजी शिंदेला भिवराव पानसे सोबत कोकणात पाठवले. या दोघांनी ठिकठिकाणी तोतयाच्या सरदारांचा पराभव केला. तेव्हा त्याचा पक्ष मोडून त्याचे साथीदार पांगले. त्यावेळी इंग्रजांचा आश्रय घेण्यासाठी तोतया मुंबईस गेला असता तिथे काम न बनल्याने रघुजी आंग्रेकडे गेला. रघुजीने त्यांस महादजीच्या हवाली केले. पुढे परत एकदा चौकशी होऊन तो तोतया असल्याचे सिद्ध होताच स. १७७६ च्या अखेरीस मेखसूने त्याचे डोके फोडण्यात आले. अशा प्रकारे पेशवाईतील एक प्रकरण निकाली निघाले.


    स. १७८३ मध्ये पहिलं इंग्रज – मराठा युद्ध सालबाईच्या तहाने संपुष्टात आलं. त्यावेळी मराठी राज्याची एकूणचं स्थिती पार पालटली होती. सातारकरांवर पुणेकरांचा पूर्णतः पगडा बसला होता. परंतु पुणेकर पेशवेही कुठे स्वतंत्र राहिले होते ? त्यांचे अधिकार आरंभी बारभाई व नंतर नाना फडणीसच्या हाती एकवटले. पुणे दरबारचे प्रमुख सरदार शिंदे, होळकर, गायकवाड व भोसले. पैकी, पहिले दोन पेशव्यांकडे पूर्वीपासूनच होते. शेवटचे दोन नंतर पेशव्यांनी रगडून आपल्या नियंत्रणाखाली आणलेले.


    पहिल्या दोघांपैकी शिंद्याने स्वतः मध्यस्थी करून पुणेकर – इंग्र्जांत तह घडवून आणल्याने एकप्रकारे तो स्वतंत्र सत्ताधीश बनला होता. होळकर यावेळी गृहकलहात अडकून राहिला. दिवाणी कारभार अहिल्याबाईकडे तर लष्करी तुकोजीकडे ! पर्यायाने उभयतांचे वारंवार मतभेद होऊन कारभाऱ्यांना हवी तशी चाकरी दोघांच्यानेही होईना. शिवाय या दोन बलवान सरदारांना नियंत्रणात आणण्यासाठी एकाला नेहमी मधाचे बोट लावून ठेवण्याचे पेशव्यांचे धोरण कारभाऱ्यांनीही पुढे रेटले होते. आरंभी त्यांचा भरवसा शिंद्यावर होता. परंतु शिंदे स्वतंत्र वृत्तीचा असल्याचे पाहून त्यांनी तुकोजी होळकरास जवळ केले. पर्यायाने या दोन सरदारांतील दरी वाढतच राहून राज्यानाशास कारणीभूत बनली. शिवाय पुणेकरांनाही क्षणिक फायद्याखेरीज यापासून काही मिळाले नाही.


    गायकवाड मंडळी मुळची दाभाड्याच्या सेवेतील. दाभाडे निस्तेज पडल्यावर स्वतंत्र होऊ पाहणारे. परंतु निम्मी गुजरात हाताखाली घालण्याच्या पेशव्याच्या कृत्याने पुणे दरबारच्या अधिपत्याखाली अनिच्छेने आलेले. जेव्हा दादाचा बंडावा सुरु झाला तेव्हा बडोदेकर गायकवाडही अंतर्गत कलहात गुंतलेले. सरदारीच्या हक्कासाठी तेथील वारसदार परस्परांच्या जीवावर उठलेले. त्यांत पेशवे घराण्यातील कलहाची भर पडून एकाचा पक्ष दादाने तर दुसऱ्याचा पुणेकरांनी घेतला. दरम्यान दादा इंग्रजांना सामील झाल्याने व गुजरातमध्ये प्रदेश विस्तार करण्याची इंग्रजांची महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनीही गायकवाडांच्या वारसायुद्धांत सहभाग घेत तिथे आपलं वर्चस्व स्थापण्याचा यत्न केला. पुणेकर पेशव्यापेक्षा सुरतचे इंग्रज बरे म्हणून गायकवाडांनी आपली मान इंग्लिशांच्या हवाली केली. सालबाई तहाच्या निमित्ताने गायकवाडांशी इंग्रजांनी केलेले आधीचे तह रद्द करण्याची अट घालणे शिंदे व पुणेकरांना शक्य होते वा नव्हते माहिती नाही. परंतु जरी त्यांनी तसं केलं असतं तरी गायकवाडांचा त्यांस पाठिंबा मिळाला असता का हा मोठा प्रश्न आहे.


    नागपूरकर भोसल्यांचीही काही वेगळी गोष्ट नाही. ते थेट शाहूचे सरदार. थोरल्या माधवरावाने आपल्या मृत्यूपूर्वी त्यांना पुणे दरबारी रुजू होण्यास भाग पाडले. परंतु प्रथम नागपूरचा जानोजी भोसले व नंतर थो. माधवराव पेशवा मरण पावल्याने नागपूरकरांच्या घरात असलेली भाऊबंदकी आळ्यात ठेवणे कोणालाच शक्य झाले नाही. नागपूरकरांचा वारसा प्रश्न हातघाईवर आला असतानाच दादा – बारभाई संघर्षास आरंभ झालेला. त्यांत जरुरीपुरता सहभाग घेत भोसल्यांनी आपली व्यवस्था लावून घेतली. परंतु पुणेकरांचा इंग्रजांशी लढा सुरु झाल्यावर भोसल्यांनी स्वार्थाकडे लक्ष देत आपले राजकारण स्वतंत्र पद्धतीने चालवले. वरकरणी पुणेकरांच्या आज्ञेनुसार इंग्रजांच्या बंगालवर हल्ला चढवण्याचे नाटक करत अंतस्थपणे पैसे खाऊन स्वारी निष्फळ केली.शिवाय बंगालच्या इंग्लिश सैन्याला दक्षिणेत येण्याचा रस्ताही रिकामा करून दिला. भोसल्यांच्या या राजकारणाकडे पुणेकरांच्या दृष्टीने पाहिले तर फितुरी म्हणता येईल. परंतु जर नागपूरकरांची दौलत स्वतंत्र आहे, या भावनेने सदर कृत्याकडे पाहिल्यास प्राप्त स्थितीत आपलं सामर्थ्य, महत्त्व रक्षण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला त्यांस अयोग्य म्हणणे चुकीचे ठरेल. सत्ता समतोलासाठी अशी दुटप्पी भूमिका प्रत्येक सत्ताधीशाला बाळगावीच लागते.


    उदाहरणार्थ, पहिल्या इंग्रज – मराठा युद्धास आरंभ होण्यापूर्वी हैदरअलीने मराठी राज्याचे बरेच लचके तोडले होते. छत्रपतींचा सेनापती मुरारराव घोरपडे तर त्याच्या कैदेतच मरण पावला. घोरपडे – पटवर्धन घराण्यांतील काही वीरपुरुष हैदरच्या स्वाऱ्यांत मारले गेले वा कैद झाले होते. परंतु जेव्हा पुणेकरांचा इंग्रजांशी झगडा जुंपला तेव्हा हैदरने पुणेकरांचा पक्ष स्वीकारला. कारण इंग्रजांचे सामर्थ्य वाढणे त्यांस हितकारक नव्हते. हाच उपक्रम निजामानेही अंगीकारल्याचे दिसून येते, मग गायकवाड – भोसले निराळे काय वर्तले ?


    पहिल्या इंग्रज – मराठा युद्धाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुण्यापासून कलकत्त्यास स्थलांतरित झाले. यापूर्वी पुण्याकडे देशातील सत्ताधीशांचे लक्ष असे. आता कलकत्ता दरबार काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे डोळे लागू लागले. हा बदल, फरक फार कमी अभ्यासकांच्या लक्षात आल्याचे दिसून येते. असो.


    पहिल्या इंग्रज – मराठा युद्धामुळे लौकिकात जरी उभयतांची बरोबरी झाली असली तरी राजनीतीच्या दृष्टीने इंग्रजांचाच विजय झाल्याचे नाकबूल करता येत नाही. मराठी सरदारांचा संघ फोडून त्यांच्यातील वैरभावनेस खतपाणी घालण्याचे कर्तव्य त्यांनी चांगलेच बजावले. एकहाती सत्ता असल्याने जे अनिष्ट परिणाम उद्भवतात त्याचे हे एक उदाहरण म्हणता येईल. जोवर छत्रपती मजबूत तोवर राज्य स्थिर. नंतर छत्रपती निस्तेज होताच पेशवा प्रभावशाली बनला. पुढे त्याचीही छबी मावळताच कारभारी वर्ग सत्ता गाजवू लागला. पण हि सत्ता ज्या सरदारांवर ते गाजवत, ते दर्जाने बरोबरीचे असल्याने सरदारांनी कारभारी मंडळाचे का ऐकावे ?


    स. १७८३ पासून ते महादजी, सवाई माधवाच्या मृत्यूपर्यंत हा वाद चालूच राहिला. या वादातून, संघर्षातून वाट काढणे कोणालाच जमले नाही. जमणार तरी कसे ? आजवरची मराठी राज्याची राज्यघटना हि जबरदस्तापुढे मान तुकवणे, याच एका नियमावर विसंबून होती. स. १७७३ नंतर पेशवा नाममात्र राहून कारभारी – सरदार हे दोन बरोबरीचे मानकरी जबरदस्त झाल्याने निर्णायक शब्द कोणाचा मानायचा, हा प्रश्न इतरांपुढे उभा राहिला.


    उदाहरणार्थ, महादजी शिंदे लष्करीदृष्ट्या प्रबळ बनला. बादशाही सर्वाधिकार पेशव्याच्या नावे त्याने मिळवून दुय्यमपद स्वतःकडे घेतले. तुलनेनं तो आता पेशव्याच्या बरोबरीचा झाला. तेव्हा साहजिकच राज्यकारभारात आपलाही हात असावा, सहभाग असावा अशी इच्छा त्याच्या मनी बळावली. हा नाना फडणीसच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप असल्याने उभयतांचे प्रथम पत्रांद्वारे व नंतर दरबारी बोलाचालींत बराच काळ शीतयुद्ध चालू राहिलं. पुण्यात येऊन बसलेला महादजी लष्करी बळावर दरबारी निर्णयांत हस्तक्षेप करू लागला. नानाला हे खपणे शक्य नव्हते. तद्वत होळकरांनाही शिंद्याचे प्रस्थ वाढणं परवडण्यासारखं नव्हतं. परिणामी दोन समविचारी एकत्र येऊन शिंद्याविरोधी कारवाया करू लागले. पैकी, नानाकडे राजकीय आघाडी तर होळकराकडे लष्करी ! राजकीय आघाडीवर खुद्द पेशवा स. माधव नानाच्या बाजूला आल्याने महादजीला माघार घ्यावी लागली. मात्र लष्करी आघाडीला हे सुदैव लाभले नाही. लाखेरीवर शिंदे – होळकरांचे सैन्य परस्परांना भिडले. होळकारी सैन्याचा पराभव झाला. सुमारे अर्धशतकभर धुमसणाऱ्या वैराग्नीचा जो स्फोट यावेळी झाला, त्याने समस्त मराठी राज्याचाच अंती नाश केला.


    स. १७९४ मध्ये महादजी शिंदेचा मृत्यू होऊन राजकीय आघाडीवर नाना फडणीसचा मार्ग निष्कंटक झाला तर लष्करी आघाडीवर होळकरांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. परंतु या स्थितीचा लाभ घेणे नाना  होळकरास बिलकुल जमले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स. माधवाचा अपघाती मृत्यू !


    चर्चेच्या ओघात आपण कालानुक्रमाच्या बरेच पुढे आलो आहोत. स. माधवाच्या मृत्यूपूर्वीच्या दशकातील राजकारणाचा संक्षिप्त आढावा घेतल्याखेरीज एकंदर देशभरातील राजकारणाचा आपणांस योग्य तो अंदाज येणार नाही.


    पहिल्या इंग्रज – मराठा युद्धांत हैदरची मदत घेताना पुणे दरबारने त्याच्याशी एक करार केला होता. त्यानुसार परस्परांच्या अनुमतीशिवाय कोणीही इंग्रजांशी तह करायचा नव्हता. परंतु प्रथम महादजी शिंदे या युद्धातून बाहेर पडल्याने उत्तर इंग्रजांना मोकळी झाली. तेव्हा पुणेकरांनाही इंग्रजांशी तह करणे भाग पडले. अर्थात, म्हैसूरकराला न विचारता हा व्याप करणे भाग होते. तरीही नानाने हि वार्ता हैदरला कळवली. हैदरला हि गोष्ट बिलकुल मंजूर नव्हती. मात्र सालबाईचा तह पूर्ण होण्याआधीच त्याचे निधन झाले व त्याचा मुलगा टिपू राज्यावर आला. आरंभी बापाप्रमाणेच त्यानेही सालबाईचा तह मान्य करण्याचे साफ नाकारले. तेव्हा इंग्रजांच्या आग्रहाने महादजीने पुणेकरांना टिपूवर लष्करी कारवाईकरता इंग्रजांना मदत करण्याची सालबाईच्या तहान्वये सूचना केली. शिवाय टिपूशी कोणी परस्पर तह करू नये असेही शिंदे – इंग्रजांचे ठरून टिपूच्या जिंकलेल्या प्रदेशाची पेशवे, शिंदे, इंग्रज यांच्यात समान वाटणी होण्याची दुरुस्तीही यावेळी सालबाईच्या तहात करण्यात आली.


    इंग्रज – पुणेकरांची संयुक्त स्वारी होण्यापूर्वीच टिपूने अर्धमेल्या मद्रासकर इंग्रजांचा साफ धुव्वा उडवून त्यांस शरण येण्यास भाग पाडले. आपल्या लोकांना टिपूच्या कैदेतूनही सोडवणे यावेळी मद्रासकरांना अशक्यप्राय बनले यावरून म्हैसूरच्या लष्करी ताकदीची कल्पना यावी. स. १७८४ मध्ये टिपू – इंग्रजांचा मंगळूर येथे तह घडून आल्याने महादाजीच्या मध्यस्थीने ठरलेला पुणेकर – इंग्रजांचा तह फिस्कटला.


    मंगळूरच्या तहाने इंग्रज – टिपू मित्र बनले तर पुणेकर आता टिपूचे प्रमुख शत्रू ! सत्तेचा बिघडलेला समतोल साधण्यासाठी नानाने निजामाच्या गळ्यात गळे घातले. निजामालाही टिपू – इंग्रज युती अनिष्ट वाटत होती. त्यानेही पुणेकरांची साथ केली. होळकर – भोसल्यास मदतीला घेऊन स. १७८५ मध्ये नानाने निजामाच्या सैन्यासह टिपूवर चाल केली. स. १७८५ ते ८७ अशी दोन वर्षे या मोहिमेत खर्ची पडून बत्तीस लाखांची रोख खंडणी व सोळा लक्षांचे वायदे ; गजेंद्रगड, बदामी, नरगुंद, कित्तूर हि स्थळे पुणेकरांस तर अदवानी निजामाला देण्याचे टिपूने मान्य केले. शिवाय आधीच्या स्वाऱ्यांतील कैदीही सोडण्याचे त्याने कबूल केले. दोन वर्षे निजाम – पेशव्याच्या फौजा टिपूशी झुंजूनही त्यांस दमवू शकल्या नाहीत. याची कारणे उघड आहेत.


    नाना फडणीस आरंभी स्वारीत होता, पण लवकरच तो पुण्यास परतला. त्याच्याआधी निजामही घरी जाऊन बसला. नागपूरकर मुधोजी भोसल्याने तरी मग कर्नाटकात का रेंगाळावे ? लष्करी पथके चाकरीस ठेवून त्याने नागपूर गाठले. राहता राहिले फडके, पटवर्धन, रास्ते, होळकर वगैरे मंडळी. तर यात होळकराविषयी सारेच साशंक. निजामाच्या सैन्याचे लढण्यात मन नाही.भोसल्याच्या फौजेला पगार नसल्याने तिचीही तीच बोंब. फडके, पटवर्धन, रास्ते, होळकराची देखील याहून वेगळी स्थिती नाही. मग अशा भाडोत्री, खोगीरभरतीच्या जमावाकडून टिपूचे काय नुकसान होणार होते ?


    उलट याच सुमारास लॉर्ड कॉर्नवॉलिस हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बनून कलकत्त्यास येऊन दाखल झाला होता. टिपूने मंगळूर येथे इंग्रजांची केलेली अवहेलना त्याच्या मनात डाचत असून त्याने प्रथम आपली आर्थिक स्थिती सुधारत टिपूवर लवकरचं स्वारी करण्याचा बेत आखला. टिपूला आपल्या शेजाऱ्याच्या बेतांची कल्पना असल्याने त्यानेच निजाम – पेशव्याशी समेटाचे धोरण स्वीकारत संभाव्य इंग्रजी हल्ल्याच्या प्रतिकाराच्या तयारीकडे लक्ष पुरवले.


    बारभाईंनी दादास पदच्युत करून सत्ता हाती घेतली तेव्हा दादा इंग्रजांच्या आश्रयास गेला. तेव्हा त्याने, हैदरला पुणेकरांशी हातमिळवणी करू न देण्याची खबरदारी घेण्याचा इंग्रजांना सल्ला दिला होता. त्यावेळी इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु यावेळी कॉर्नवॉलिसने मागील चुकीची पुनरावृत्ती बिलकुल केली नाही. टिपूवर मोहीम आखताना त्याने पुणेकर व निजामालाही आपल्यासोबत स्वारीत सहभागी होण्यास तयार केले. टिपूविरुद्ध पेशवे – निजाम – इंग्रज यांची आघाडी उभी राहत असल्याची बातमी शिंद्यास कळली तेव्हा त्याने इंग्रजांशी हातमिळवणी न करण्याचा नाना फडणीसला सल्ला दिला.


    कॉर्नवॉलिसचा तडाखा व इंग्रजांचे चढाईचे धोरण बादशाही कारभारात त्याने जवळून पाहिले होते. टिपूला समूळ उखडल्यास इंग्रजांचा एक काटा दूर होईल हे त्यांस थोडेफार कळून चुकले होते. परंतु नाना फडणीसने यावेळी शिंद्याच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले. राजकारण हे स्थिर नसून प्रवाही असते हेच खरे !


    सालबाईचा तह बनते समयी व त्यानंतर काही काळ नाना इंग्लिशांवर चिडून होता तर महादजी अनुकूल होता. आता महादजी इंग्रजांच्या विरोधात तर नाना इंग्रजांच्या बाजूला. सत्तास्पर्धा, महत्वाकांक्षा, राज्याचा अधिकार इ. कारणांनी राजकारण अनाकलनीय वळण घेत होतं. मात्र, खबरदारी म्हणून हरिपंत फडक्यामार्फत नानाने निजामाशी गुप्त तह करून ठेवला कि, कोणत्याही स्थितीत टिपूला साफ बुडवू द्यायचा नाही. अशा प्रकारे स. १७९० पासून ९२ पर्यंत टिपूववर त्रिवर्गाची स्वारी चालून, त्यांनी ठिकठिकाणी टिपूला पराभूत करून शरण येण्यास भाग पाडले. 

    कॉर्नवॉलिस यावेळी टिपूला साफ बुडवण्याच्या विचारांत होता. परंतु निजाम – पेशव्याने मध्यस्थी केल्याने व युद्ध अपेक्षेपेक्षा अधिक काळ लांबून कंपनीचा खजिना रिता होऊ लागल्याने त्यानेही आपला हात आवरता घेतला. अर्धे राज्य व रोख तीन कोट रुपये देऊन टिपूने आपला बचाव साधला. हाती आलेल्या प्रांताची तिघांनी आपसांत वाटणी करून घेतली. घडल्या प्रकाराने इतकेच साध्य झाले कि, टिपूचे अर्धे राज्य नष्ट होऊन त्याचे बळ घटले व कर्नाटकांत आता इंग्रजांना रोखणारी पुणेकरांशिवाय इतर कोणतीही बलिष्ठ सत्ता उरली नाही. नाही म्हणायला निजामाचे या दोन बलवानांच्या दरम्यान राज्य असून त्याची थोडीफार धास्ती पुणेकरांना होती. इंग्रज तर त्याला जमेतही धरत नव्हते. 

    सारांश, दक्षिणेतील सत्तासमतोल पूर्णतः बिघडून इंग्रज बळावू लागले होते. या पार्श्वभूमीवर महादजी शिंदे दक्षिणेत आला, ते इंग्रजांशी परत एकदा झून घेण्याच्या ईर्ष्येने. मात्र नाना फडणीस आरंभी त्याविषयी साशंक असल्याने व पुढे आजारपणात त्याचा अंत झाल्याने महादजीचे बेत त्याच्यासोबतचं संपले.


    महादजीच्या मृत्यूनंतर पेशव्याचा निजामाशी झगडा उपस्थित झाला. यावेळी निजामाने मदतीकरता इंग्रजांकडे पदर पसरला. परंतु यावेळी इंग्रजांनी त्याची साफ उपेक्षा करत पेशवे – निजामाच्या दरम्यान मध्यस्थी करण्याची तयारी तेवढी दर्शवली. परिणामी पेशवे – इंग्रजांचा तंटा विकोपास जाऊन खर्ड्याच्या रणभूमीवर उभयतांची गाठ पडली. संग्राम निर्णायक बनला असता तर निजामाचा त्यात संहार उडाला असता वा निर्वाहापुरते संस्थान त्याच्याकडे राहिले असते. मात्र निजामाने पराभवाचा रंग दिसताच तहाची वाटाघाट आरंभून तीस लाखांचा मुलूख, दौलताबादचा किल्ला, पाच कोट रुपये, बीड परगणा व आपला दिवाण गुलाम सय्यदखान मुशीरून्मुल्क यांस पेशव्याच्या हाती सोपवून स्वतःचा बचाव केला.


    पैकी, ३० लक्ष रोख मिळाले. उर्वरित रकमेचे वायदे करण्यात आले. तीस लक्षांचा मुलूखही त्वरित ताब्यात आला नाही. बीड परगणा शिंद्यास हवा होता, तोही कागदावर मिळाला. भोसल्याचे प्रश्न तसेच राहिले. नाही म्हणायला निजामाच्या दिवाणास बंदी बनवून विजयाचे प्रतीक म्हणून पुण्यास मिरवत नेण्यात आले.

खर्ड्याच्या संग्रामाचे फलित म्हणजे निजामाचे लष्करी दौर्बल्य व त्याची परंपरागत यशस्वी मुत्सद्देगिरी, मराठी सैन्याचे शक्तीप्रदर्शन व भावनिक राजकारण यापलीकडे काही नाही. घडल्या घटनेचा फायदा घेत इंग्रजांनी मात्र नंतर लगोलग निजामाच्या राज्यातला आपला पाया मजबूत करून घेतला.


    खर्ड्याच्या संग्रामानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे दि. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी पेशवा सवाई माधवरावाचे शनिवारवाड्यात अपघाती निधन झाले. परंतु मला जे या विषयी तपशील उपलब्ध झाले आहेत्त त्यावरून पेशव्याचा मृत्यू अपघाती नसून खून होता, असे माझे मत बनले आहे.  


    सवाई माधवाच्या खुनानंतर परत एकदा पुणे दरबारात राज्यक्रांतीचा संभव दिसू लागला. सवाई माधवाला मुलबाळ नव्हते. पर्यायाने नानासाहेब पेशव्याचा वंश समाप्त होऊन भट कुटुंबातला रघुनाथराव पेशव्याचाच तेवढा वंश शिल्लक राहिला होता. ज्या रघुनाथास पेशवाईवरून काढण्यासाठी मुत्सद्द्यांनी जीवाचे रान केले, आता त्याच रघुनाथाच्या मुलांपैकी एकाला गादीवर बसवणे भाग पडले. मात्र नाना फडणीसला हि गोष्ट नामंजूर होती. त्याच्या मते, स. माधवाच्या पत्नीस दत्तक पुत्र देऊन त्याच्या नावे कारभार पुढे चालवावा. नानाच्या योजनेला आरंभी दरबारी मुत्सद्दी – सरदारांनी मान्यता दिली असली तरी कित्येक जाणत्या मंडळींना नानाचा हा बेत रुचला नाही. परिणामी, स. माधवाच्या मृत्यूपासून ते स. १७९६ च्या मे महिन्यात रघुनाथपुत्र चिमाजीची सवाई माधवाचा दत्तक पुत्र म्हणून पेशवेपदावर स्थापना होईपर्यंत पेशव्यांची मसनद रिकामीच राहिली.


    चार – सहा महिने कोणाला धनी म्हणून निवडावे यावर मुरब्बी, कर्तबगार मंडळी निष्कारण घोळ घालू लागली तेव्हा कट – कारस्थानांचे पेव फुटणे स्वाभाविकचं होते. आणि एकदा कट – कारस्थानांना आरंभ झाला कि, कोण चूक व कोण बरोबर ते ठरवणार कसं ? स्वाभाविकपणे हा प्रश्न लष्करी बळावर मिटवण्याचे प्रयत्न सुरु होऊन आरंभी शिंद्याचे दरबारात प्रस्थ माजले. त्याने मन मानेल तसा धिंगाणा घालून झाल्यावर होळकराची पाळी आली. त्याने शिंद्याची व्यवस्था उडवून लावत नाना फडणीसच्या काळाप्रमाणे दरबारची घडी बसवण्याचा यत्न केला. तोच रघुनाथपुत्र बाजीरावाने वसईला जाऊन इंग्रजांचा आश्रय घेत स्वतःला बंधनकारक असा तह करून घेतला. त्यामुळे होळकराला काहीच कार्यभाग राहिला नसल्याने त्याने पुण्यातून काढता पाय घेतला. 

    सारांश, स. १७९५ ते १८०२ या पाच सात वर्षांतील प्रमुख घडामोडींनी मराठी राज्याचे भवितव्य काय असणार आहे, हे स्पष्ट केलं होतं.
                                  ( क्रमशः )



संदर्भ ग्रंथ :-

१)      छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे

२)      ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स. सरदेसाई

३)      काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर

४)      मराठी रियासत ( खंड १ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई

५)      मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे

६)      मराठेशाहीतील वेचक – वेधक :- य. न. केळकर

७)      भूतावर भ्रमण : ऐतिहासिक लेखसंग्रह :- य. न. केळकर

८)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर

९)      नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे

१०)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे

११)  मराठी दफ्तर रुमाल पहिला (१) :- वि. ल. भावे

१२)  मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- वि. ल. भावे

१३)  फार्शी – मराठी कोश :- प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन

१४)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे

१५)  दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे

१६)  छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी

१७)  ताराबाई – संभाजी ( १७३८ – १७६१ ) :- गो. स. सरदेसाई

१८)  ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस

१९)  पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :- कृ. वा. पुरंदरे

२०)  नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे

२१)  सरदेसाई स्मारक ग्रंथ :- श्रीपाद रामचंद्र टिकेकर

२२)  मराठी सत्तेचा उत्कर्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे

२३)  शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके 

२४)  मराठ्यांची बखर :- ग्रँट डफ लिखित व कॅप्टन डेविड केपन अनुवादित ( आवृत्ती ६ वी )      
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: