सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

शिवाजीची बारदेश स्वारी व पोर्तुगीज पाद्र्यांचे शिरच्छेद प्रकरण






    शिवकालीन पत्रासार संग्रह खंड – १ मधील उपरोक्त पत्र अतिशय महत्त्वाचे आहे. विशेषतः धार्मिकदृष्ट्या. पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे कि, गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथोलिक धर्मीय वगळता इतर धर्मियांच्या हद्दपारीचा हुकुम काढला होता. अर्थात, जबरदस्तीच्या धर्मांतराकरीता अशा प्रकारच्या आज्ञा प्रसंगोत्पात ते काढतच असत. खेरीज याबाबतीत पोर्तुगीजांचे पाद्री विशेष करून अधिक आग्रही असल्याने पोर्तुगीजांची सत्ता इथे डळमळीत होण्यास त्यांचे हे धार्मिक कट्टरतेचे धोरण प्रामुख्याने कारणीभूत ठरले. असो, या स्थळी महत्त्वाचा मुद्दा असा आहे कि, शिवाजीने गोव्याजवळच्या बारदेश सरहद्दीवर स्वारी केली असता तेथील चार धर्मोपदेशक तथा पाद्रींना त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचारणा केली होती.

या स्थळी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे या चार धर्मोपदेशकांनी रोमन कॅथोलिक वगळता इतर धर्मियांच्या हत्येचा व्हाईसरॉयला सल्ला दिला होता. हि गोष्ट लक्षात ठेवूनच शिवाजीने त्या चार पाद्र्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी आज्ञा म्हणा वा विचारणा केली होती. अर्थात, या धर्मोपदेशकांनी शिवाजीची हि धर्मांतराची अट नाकारल्याने शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला. याचा योग्य तो अर्थ घेऊन व्हाइसरॉयने आपला विचित्र हुकुम मागे घेतला. परंतु यांमुळे काही प्रश्न हे अनुत्तरीत वा दुर्लक्षित राहतात, त्याकडे लक्ष वेधण्याचे प्रस्तुत लेखाचे उद्दिष्ट आहे.


स. १६६७ साली शिवाजी ऐन तारुण्यात असला तरी चाळशीकडे झुकला होता. अर्थात, यावेळी तो बऱ्यापैकी परिपक्व झाला होता. त्यामुळे पाद्र्यांनी त्याची अट धुडकावून लावल्याने चिडून जाऊन शिवाजीने असं कृत्य केल्याचं संभवत नाही. परंतु त्याने त्या चौघांचा शिरच्छेद केल्याचे उघड आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याने ज्या चार धर्मोपदेशकांना --- ज्यांचा हिंदू धर्माशी दुरान्वयेही संबंध नाही अशांना --- हिंदू धर्म स्वीकारण्याची अट घातली. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू धर्मीय व्यक्तीचे जबरदस्तीने, स्वेच्छेने, अजाणतेपणी धर्मांतर झाल्यास त्यांना परत स्वधर्मात तथा जातीत घेणे शक्य होते. तसे विधीही उपलब्ध होते व हा प्रकार अखंड चालू होता. परंतु, जे मुळातच हिंदू नाहीत त्यांना शिवाजी हिंदू धर्म स्वीकारण्याची अट घालतोच कशी ? कारण यांचे धर्मांतर कोणत्या प्रकारे करवून घेणार हा एक मुख्य प्रश्न होता. वैदिक ब्राम्हण त्यांचा धर्मांतर विधी पार पाडू शकत नव्हते. हिंदू ब्राम्हणांनी जरी त्यांचे धर्मांतर करायचे ठरवले तरी या चार ख्रिस्त्यांचा हिंदूंच्या नेमक्या कोणत्या जातीत समावेश होणार होता ? कारण हिंदू धर्म हा प्रामुख्याने जातींचा समूह असून प्रत्येक जातीचा स्वतंत्र धर्म आहे. अर्थात, जातींची निर्मिती वांशिक तत्वावर झालेली नाही, हि बाब येथे मुद्दामहून नमूद करणे आवश्यक आहे. तर हिंदू धर्माचे जातींवरील अवलंबित्व पाहता मुळच्या ख्रिस्ती धर्मियांना शिवाजी नेमकं कोणत्या हिंदू जातीत घेणार होता ? हा विधी कोण पार पाडणार होते ? तसेच गैरहिंदूंचे हिंदुकरण यापूर्वी प्रचलित असल्याखेरीज शिवाजी इतका धाडसी निर्णय घेऊ शकत नाही, हे लक्षात घेता, यापूर्वीही अशा प्रकारची धर्मांतरे झाली होती का ? झाली असल्यास त्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत वा नाहीत, तसेच अशा धर्मांतरीतांचा समावेश कोणत्या जातीत करण्यात आला इ. प्रश्नांची उत्तरं शोधणं अत्यावश्यक आहे.


संदर्भ ग्रंथ :-


१)      शिवकालीन – पत्र – सार – संग्रह

 ( शके १४८८ ते शके १६०४ ), खंड – १

प्रकाशन वर्ष – स. १९३०  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: