शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

प्रकरण १६) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





आगऱ्याहून सुटका ! शिवचरित्रातील एक अत्यंत गूढ प्रकरण. शिवजन्मतिथी निर्णयाबाबत अपुऱ्या पुराव्यांमुळे अनेक पक्ष निर्माण झाले खरे परंतु आगऱ्याहून सुटकेसंदर्भात ढीगभर पुरावे उपलब्ध असूनही केवळ पूर्वपरंपरेला प्रमाण मानणे, पूर्वग्रहदुषित नजरेने त्याकडे पाहणे व चिकित्सकवृत्ती / बुद्धीला जरुरीपेक्षा आळा घालणे इ. दोष या घटनेच्या विश्लेषणार्थ केलेल्या विवेचनांत आढळून येतात. कोणाला शिवाजीचं अलौकिकत्व, दैवी सामर्थ्य दाखवायचं आहे. कोणाला औरंगचा कपटी परंतु मूर्ख स्वभाव तर कोणाला रामदास स्वामीची या कामी योजना करायची आहे. या त्रिकोणाच्या तीन बाजूंना आणखी एक चौथी बाजू मिळून चौकोन प्राप्त होतो व ती म्हणजे शिवाजीच्या पलायनात औरंगचा हात होता !  

अशा ह्या मतमतांतराच्या गोंधळात उपलब्ध झाले तितके पुरावे ग्राह्य धरत प्रस्तुत घटनेचं शक्य तितक्या तपशीलवार वर्णन करण्याचा मानस आहे.

सर्वप्रथम आपणांस हे लक्षात घेतले पाहिजे कि, या प्रकरणात किती जणांचे हितसंबंध गुंतले होते व कोणाचे नेमके स्वार्थ काय होते. यादृष्टीने प्रथम औरंगचा विचार करू.

औरंगचे साम्राज्यवादी धोरण असून दख्खनमधील आपल्या सत्तेचा विस्तार करण्याचे आनुवंशिक कार्य त्याने शहजादा असतानाच हाती घेतले होते व त्याच्या प्रयत्नांनी विजापूर व गोवळकोंडा या दख्खनच्या दोन प्रमुख बलिष्ठ सत्ता बऱ्यापैकी दुर्बल झाल्या होत्या. परंतु याच काळात शिवाजीच्या स्वतंत्र सत्तेचा उदय झाल्याने दख्खनचे राजकारण तिरंगी बनले. एकाच वेळी मोगल तीन आघाड्यांवर लढू शकत असले तरी विजयाची खात्री मात्र नव्हती. अशा स्थितीत एका वेळी एकाच शत्रूशी वा दोन शत्रूशी झुंजण्याची चाल त्यांनी अवलंबली. यातही आणखी त्यांचे भेद होते. मोगली राजकारण हे इतरांप्रमाणेच शस्त्रबळ व भेदनीतीवर आधारित असल्याने एकाच वेळी दोन शत्रूंच्या चिमट्यात त्यांनी स्वतःला अडकू दिले नाही. मिर्झा राजाच्या स्वारीतही हेच घडून आले. प्रथम शिवजीचा अडसर दूर करून त्याला आपल्या गोटात घेईपर्यंत मोगलांनी विजापूर - गोवळकोंड्यासोबत केवळ दबावाचे राजकारण केले व शिवाजीचा काटा निघताच त्यांनी विजापूरवर शस्त्र उपसले. इथपर्यंतचा क्रम समजावून घेता येतो परंतु अचानक शिवाजीच्या आग्रा भेटीचे प्रयोजन निर्माण होऊन तो तिकडे कैदेत पडतो व त्याला मुक्त करावे, जिवंत कैदेत ठेवावे या गोंधळात औरंग पडतो असं जरी सर्वसाधारण चित्र दिसत असलं तरी तेच सत्य नाही.

नाण्याची दुसरी बाजू बघत असताना दख्खनच्या राजकारणावर औरंगचे शिवाजीविषयक धोरण अवलंबून असल्याचे दिसून येते. पुरंदरचा तह जरी त्याच्या मर्जीविरुद्ध झाला असला तरी शिवाजीच्या बाबतीत तो पूर्णतः जयसिंगच्या सल्ल्यावर अवलंबून होता व मिर्झा राजाने त्यांस जी पत्रे पाठवली त्यावरून त्याने प्रथम शिवाजीची दख्खनला पाठवणी करण्याचा निर्णय घेतला परंतु नंतर त्याने शिवाजीला कैद केले. या कैदेमागे मिर्झाचा हात किती, याविषयी निश्चित प्रमाण नसल्याने ठामपणे विधान करणे शक्य नाही. परंतु शिवाजीच्या कैदेमागील औरंगचा प्रमुख हेतू म्हणजे शिवाजीने आपल्या ताब्यातील उर्वरित गड - किल्ल्यांची व मुलखाची सोडचिठ्ठी देणे, हा होय. यामुळेच त्याने शिवाजीला कडेकोट बंदोबस्तात ठेवले. परंतु विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे शिवाजीला नजरकैदेत ठेवण्यापलीकडे त्याने त्यांस उपद्रव दिला नाही. उलट शिवाजीने व्यक्तिगत कारणांस्तव आपल्या तळावरून मेवा - मिठाया वाटण्याचा निर्णय घेतला, त्यांस शक्य असतानाही त्याने आडकाठी केली नाही. अगदी अखेरच्या चार - सहा दिवसांचा अपवाद केल्यास शिवाजी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडून शेजारच्याच रामसिंगाच्या गोटात ये - जा करत होता व औरंगची त्यास तोवर हरकत नव्हती हेही लक्षात घेतले पाहिजे.

यापूर्वी आपल्याच रक्तामांसाच्या लोकांशी कैदेत असता केलेले वर्तन व शिवाजीसोबतची वागणूक यांचा तौलोनिक सूक्ष्मरीत्या विचार करता असे लक्षात येते कि, शिवाजीला आगऱ्यास पाठवून जयसिंगाने जी विजापूर विरोधी मोहीम चालवली होती, त्या मोहिमेत शिवाजीचे सरदार, सैन्य -- मग ते संभाजीच्या मनसबीच्या वतीने असो वा प्रत्यक्ष शिवाजीच्या -- हजर होते. त्याचप्रमाणे पुरंदर तहापूर्वी शिवाजीचे जे अधिकारी, वतनदार फितूर होऊन मोगलांना मिळाले होते, त्यांचा मोगल पक्षावर तसेच मुत्सद्यांच्या वचनावर भरवसा कायम राहावा याकरता शिवाजीला जरुरीपेक्षा जास्त कठोर वागणूक देणेही औरंगला शक्य नव्हते.

येथे प्रश्न उपस्थित हा होतो कि, शिवाजी जयसिंगाच्या व्यक्तिगत हमीवर आगऱ्यास आला होता, मग औरंगचा संबंध कसा व का येतो ? तर याचे उत्तर असे आहे कि, ज्याप्रमाणे शिवाजी जयसिंगाच्या व्यक्तिगत वचनावर आगऱ्यास गेला त्याचप्रमाणे शिवाजीचे अधिकारी - वतनदार जयसिंगाच्या शब्दावर भरवसा ठेवूनच फितूर झाले होते. अशा स्थितीत बादशहा जर आपल्याच अधिकाऱ्याच्या शब्दाची बुज राखणार नाही तर मग त्यावर विश्वास कोण ठेवतो ? त्याचप्रमाणे बादशहाने जरी सर्व संभाव्य शक्यता नजरेआड करून शिवाजीला ठारच केले असते तर मग शिवाजीचे सरदार तर बिथरलेच असते परंतु त्याने देऊ केलेल्या प्रलोभनामुळे मोगली पक्षास सामील झालेले अधिकारी - वतनदारही मोगलांवर उलटले असते व त्यांनी शिवाजी वा आदिल - कुतुब यांपैकी एका पक्षाची साथ केली असती. हे लक्षात घेता औरंग शक्य असूनही शिवाजीसोबत नरमाईने का वर्तत होता या कोड्याची उकल होते. तसेच आणखी एक बाब म्हणजे विना आवश्यकता त्याने राजकीय कैद्यांची कत्तल केल्याची उदाहरणे फारशी आढळत नाहीत. उदाहरणार्थ, नेताजीला नंतर त्याने कैद केले परंतु त्यांस इस्लामी करण्यातच समाधान मानले. शक्य असूनही त्याने त्याचा खून केलेला नाही. असो.

शिवाजीच्या कैद व सुटकेप्रकरणी मिर्झा राजाची काय भूमिका होती याची आपण संक्षेपात चर्चा करू. मिर्झाच्या मनावर शिवाजीची छाप पडली होती वा शिवाजीविषयी त्याच्या मनात काही विशेष भाव वा आपुलकी निर्माण झाली होती, अशा आशयाची विधानं कित्येक इतिहासकारांनी केलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र तसे काही आढळून येत नाही. विजापूर स्वारीत अकल्पनीय प्रसंग उद्भवल्याने शिवाजीला दख्खनमधून बाहेर काढणं जरुरी झालं होतं व त्यामुळेच नाना परीने त्याची समजूत काढत, प्रलोभनं दाखवत मिर्झाने त्यांस आगऱ्यास पाठवलं. या सर्व वाटाघाटीत, बोलाचालीत मिर्झाची फक्त एकच गोष्ट खरी होती व ती म्हणजे शिवाजीच्या जीविताचे वचन. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी मिर्झाने स्वतःवर घेतली होती. बाकी, शिवाजीला औरंगने कैद करणे वा त्याच्याकडून जबरदस्तीने उर्वरित राज्याची सोडचिठ्ठी लिहून घेणे यांस त्याची कसलीच हरकत नव्हती. किंबहुना याकरताच त्याने शिवाजीला संभाजीसह आगऱ्यास पाठवले होते असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
मिर्झाच्या मनात असलेली मोगलांप्रती निष्ठा हि एक वेगळी बाब आहे. मोगलाई असो वा शिवशाही अथवा पेशवाई. आपल्या स्वार्थापेक्षा राजनिष्ठेला मुत्सद्द्यांनी प्राधान्य दिलेयाची उदाहरणं अपवादात्मकच आढळून येतात. हे लक्षात घेता मिर्झाच्या वागणुकीचे विश्लेषण करणे अवघड नाही. मिर्झाचे घराणे अकबराच्या काळापासून मोगलांचे मांडलिक व नोकर होते परंतु त्यापूर्वी ते एक स्वतंत्र संस्थानिकही होते. मिर्झाचा पूर्वज मानसिंग हा अकबराचा मुख्य सेनापती असून त्याच्या पराक्रमावर खुश होऊन अकबराने त्यांस ' मिर्झा ' म्हणून किताब दिला होता. बादशाही निष्ठा व बादशाही घराण्याशी नातेसंबंध मिर्झाच्या परिवारात जुने असले तरी त्यांची दुसरीही एक बाजू होती व ती म्हणजे तत्कालीन राजपूत राजांमध्ये चितोड, जयपूर व जोधपुर हि तीन घराणी प्रमुख असून एक चितोड अपवाद केल्यास जयपूर, जोधपुरकर शाही सेवक तसेच नातलग होते. तसेच या तिघांचेही परस्परांशी तसे खास स्नेहाचे वगैरे संबंधही नव्हते. काहीजण यांस राजपुतांचा वा हिंदुंचा अहंकारी मूर्खपणा किंवा मोगलांची भेदनीती कारणीभूत म्हणतील. परंतु हे तीन राजे स्वतंत्र असल्याचे लक्षात घेता इतर कारणांची काही आवश्यकताच भासत नाही.

मिर्झा ज्यावेळी मोगल मनसबदार म्हणून दख्खन मोहिमेत विरुद्ध पक्षीयांना प्रलोभनं दाखवतो, वचनं देतो तो निव्वळ मोगल मनसबदार म्हणून वा राजपूत आहे म्हणून लोकं त्यावर विश्वास टाकत नाहीत तर तो एक राजा आहे, हे लक्षात घेऊनच त्यावर विसंबत. शिवाजीच्या रक्षणाचे दिलेले वचनही मिर्झाने मोगल मनसबदार म्हणून नव्हे तर जयपूर नरेश म्हणून दिलेलं होतं. त्यामुळेच शिवाजी आगऱ्यास गेला व रामसिंगाने अखेरपर्यंत त्याच्या रक्षणाचे प्रयत्न केले. शिवाजीच्या आग्रा मुक्कामातील राजपुतांचे --- विशेषतः रामसिंगाच्या वर्तनाचेही टप्पे पडतात. प्रथम त्याचा हेतू फक्त शिवाजीच्या जीविताचे रक्षण हेच होते. बादशहाने कैद केले तरी तो शिवाजीला जिवंत कसा ठेवेल याकडे लक्ष पुरवणे एवढीच त्याची जबाबदारी होती. त्यादृष्टीने वेळप्रसंगी बादशहावर राजकीय दडपण आणण्यासही त्याने बापाच्या सूचनेवरून मागेपुढे पाहिलेलं नाही. नंतर जेव्हा बादशहा शिवाजीला त्याच्या तळावरून हलवून विठ्ठलदासच्या हवेलीत नेण्याच्या बेतात होता त्यावेळी कदाचित शिवाजीच्या जीवास धोकाही पोहोचेल म्हणून शिवाजीच्या सुटकेच्या कारवायांकडे त्यानेही हेतुतः दुर्लक्ष केले. शिवाजीच्या पलायनास त्याची मूक संमती असू शकते परंतु प्रत्यक्ष सक्रीय पाठिंबा कितपत होता याविषयी मात्र साशंकता आहे. असो.

आता आपण शिवाजीची या प्रकरणातील भूमिका पाहू. बादशाही भेटीत शिवाजीच्या नेमक्या कोणत्या वर्तनाने औरंगची त्यावर गैरमर्जी ओढवली व या भेटीमागे शिवाजीची नेमकी काय कल्पना होती याविषयी आजतरी इतिहास मूक आहे. शिवाजीवर औरंगने जरी नजरकैद बसवली असली तरी मुक्कामाच्या तळावरून बाहेर न जाण्याचेच त्यावर बंधन होते. प्रत्यक्षात त्या परिघांतर्गत असलेल्या रामसिंगाच्या निवासस्थानी तो शेवटच्या काही दिवसांचा अपवाद करता जाऊ शकत होता. दुसरे असे कि, शिवाजी वरील औरंगची नजरकैद हि अखेरपर्यंत कायम नव्हती. मधे एक काळ असाही होता कि, जेव्हा औरंगने त्यावरील फौलादखानाचा पहारा उठवला होता. परंतु नंतर काही काळाने पुन्हा एकदा फौलादखानाची शिवाजीवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. अर्थात, याम्गील कारणपरंपरा आजही अज्ञात आहे.

आगऱ्याच्या कैदेत आरंभीच्या काळात तरी शिवाजी स्वतःच्या जीविताविषयी साशंक बनला होता. नंतर त्यांस समजून आले कि, राजपुतांचा दरबारातील प्रभाव बऱ्यापैकी कायम असल्याने व बव्हंशी मुस्लीम मनसबदारही त्यांना अनुकूल असल्याने एकदम हिय्या करून औरंग आपणांस ठार मारणार नाही. उलट मरेपर्यंत कैदेत ठेवून विविध मार्गांनी छळ करून वा प्रलोभनं दाखवून तो आपल्याकडून राज्याची सोडचिठ्ठी घेईल. हि गोष्ट लक्षात ठेवूनच त्याने आपला वर्तनक्रम आखला व त्यानुसारच त्याच्या पुढील हालचाली घडून आल्या. त्याचप्रमाणे हेही लक्षात घेतले पाहिजे कि, त्याने आगऱ्यातील आपल्या मुक्कामात व सुटकेच्या संदर्भात ज्यांच्याशी स्नेहाचे वर्तन ठेवले वा निर्माण केले त्यात बव्हंशी राजपूत असले तरी मुस्लीमही काही कमी नव्हते व या सर्वांशी जो काही त्याचा स्नेहभाव होता त्याचा त्याला प्रत्यक्ष फायदा इतकाच झाला कि, बादशहाने त्याची कैद कडक केली नाही तसेच त्याचा बळी घेतला नाही. बाकी सुटकेच्या बाबतीत त्याच्या या मित्रांची मदत प्रत्यक्षात क्वचितच झाली असेल व शिवाजीनेही त्यांच्यावर तितक्यापुरताच विश्वास ठेवला. कारण त्याचे हे मित्र व्यक्तीशः त्याचे स्नेही असले तरी फक्त त्याच्या जीवाच्या रक्षणापुरतेच होते. त्याची सुटका वा राज्य यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळेच सुटकेच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होण्याची फारशी शक्यताच नव्हती. परंतु त्यानुकुल वातावरण बनवण्यास मात्र ते निश्चित उपयुक्त होते व शिवाजीने त्यांचा तेवढ्यापुरताच उपयोग केला.

या स्थळी मोगल मनसबदरांचीही भूमिका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मोगलांमध्ये मनसबदारीची पद्धती असून ती वंशपरंपरागत नव्हती. त्याचप्रमाणे सरकार चाकरीवरील नोकरास सेवेत असताना मृत्यू आल्यास त्याने जमवलेली सर्व संपत्ती, जमीन सरकारजमा होऊन बादशाही मर्जीनुसार त्यातील मृताच्या मुलांना वाटा मिळत असे. मोगल मनसबदार लाचखोर बनण्याचे हे महत्त्वाचे कारण होते. कारण संपत्ती संचयाचा फायदा जर बादशहालाच होणार असेल तर मिळेल तितका पैसा जमवून आहे ते आयुष्य ऐषोरामात, चैनीत जगण्याची त्यांना सवय लागली. याचे आर्थिक स्थितीवरही दुष्परिणाम झालेच परंतु त्याची चर्चा येथे अप्रस्तुत असल्याने त्यासंबंधी काही लिहित नाही. आपल्या विषयाच्या मर्यादेपुरतं इतकंच इथे नमूद करतो कि, आग्रा मुक्कामाच्या पूर्वी दख्खनला असताना व आगऱ्याच्या प्रसंगानंतरही बव्हंशी मोगल उमरावांशी शिवाजीचे जे काही स्नेहाचे संबंध आले त्यामागे मोगलांची हि आर्थिक बाजू बऱ्यापैकी कारणीभूत होती. शिवाय असेही काही उमराव होते ज्यांना साम्राज्याच्या भवितव्याची चिंता असून त्याकरता बादशहाने शिवाजीच्या जीवास अपाय न करता त्यांस कैददाखल तसेच ठेवले तरी त्यावर त्यांचे समाधान होते. ज्यामुळे साम्राज्याचे हित व आयुष्य दोहोंचा बचाव होऊ शकत होता. त्यामानाने केवळ औरंगची मर्जी रक्षून खुशमस्कऱ्याची भूमिका बजावणारे जे मुत्सद्दी होते त्यांनी परिस्थिती बघत औरंगला अनुकूल अशीच मसलत देण्याची वाट धरली. याहीपलीकडे एक गट होता जो कट्टर इस्लामी मनसबदारांचा असून जरी यांचे प्रमाण अत्यल्प असले तरी बादशहावर यांचा प्रभाव बऱ्यापैकी होता. शिवाय व्यक्तिगत महत्त्वकांक्षा, स्वार्थ, लोभ, द्वेष इ. विकारांनी बाधितही होते जे कोणत्याच पक्षास चिटकून नसून प्रसंग येईल त्याप्रमाणे वर्तून आपला स्वार्थ साधू पाहत होते. मोगल मनसबदारांतील हि विविध प्रकार, गट, त्यांचे मनोभाव लक्षात घेऊनच आपणांस या प्रकरणाची तपशीलवार चर्चा करणे भाग आहे. असो.
शिवाजीच्या अटक व सुटके संदर्भाच्या समकालीन नोंदी तपशीलवार पाहू.

संदर्भ ग्रंथ :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा
औरंगजेबाच्या दरबारचे अखबार
संपादक :- प्रा . गणेश हरी खरे
सहसंपादक :- गोविंद त्र्यंबक  कुळकर्णी

दि. ३१ मे १६६६ रोजीची औरंगच्या दरबारी अखबारातील नोंद

सितामऊ संग्रह                                                   श. १५८८ ज्येष्ठ शुद्ध ८
जु. ९ जिल्हेज                                                   इ. १६६६ मे ३१
६ गुरु.
फौलादखानाने अर्ज केला कीं, सीवाकडील सर्व दख्खनी लोक तक्रार करीत आहेत व सीवाही याचना करून सांगत आहे कीं, ‘ माझ्याकडून कांहीं एवढी मोठी चूक झाली नाहीं कीं, बादशाहानीं माझ्यावर एवढी अवकृपा करावी. ऐकून बादशाह गप्प बसला. मुहम्मद अमीनखानास हुकूम झाला कीं, गाझीबेग गुर्जबर्दारास विचारावें कीं, सीवाने इमामविर्दीखानाकडून किती हत्ती विकत घेतले ? उपर्युक्ताने चौकशी करून त्याने पंधरा हजार रुपयांचे घेतले आहेत व ते पैसे अजून वसूल झाले नाहींत असे कळविले.    

शककर्ते शिवराय या विजय देशमुखांच्या शिवचरित्रानुसार ( बहुधा ) दि. ५ जून रोजी औरंगने शिवाजीस निरोप पाठवला कि, सर्व किल्ले ताब्यात दिल्यास मनसब कायम केली जाईल. तसेच तुमच्या पुतण्यालाही येथे बोलवा. त्यालाही मनसब देण्यात येईल. यावर शिवाजीने जबाब दिला कि, मला मनसबदारी नको व राज्यातील किल्ल्यांवर आता माझा ताबा उरलेला नाही. शिवाजीच्या उत्तराने औरंग नाराज झाला. याच सुमारास रामसिंगाच्या छावणीत त्याच्या राज्यातील सैनिक येऊन जमा होऊ लागल्याने औरंगला संशय येऊन त्याने याबाबतीत रामसिंगास विचारणा केली असता, बादशहानेच काबूल मोहिमेवर आपली नेमणुक केल्याने आपण लष्करास पाचारण केले होते परंतु काबूल स्वारी रद्द झाल्याने मी सैन्यास इकडे न येण्याचे आदेश दिले आहेत असा त्याने जबाब दिला.
यावेळी बहुतेक शिवाजीच्या बाबतीत कठोर पाउल उचलण्याचा औरंगचा मानस असावा परंतु रामसिंगाचे शिपाई तळावर जमा झाल्याने त्याने आपला हात आवरता घेतला.

यास्थळी हेदेखील नमूद करणे योग्य ठरेल कि, औरंगच्या बहिणीने --- जहांआरा बेगमनेही याबाबतीत औरंगला सबुरीचा सल्ला देत त्यांस सुनावले कि, शिवाजी जयसिंगाचा कौल घेऊन आला आहे. त्याला जर ठार केलेत तर आपल्या वचनावर विश्वास कोण ठेवील ?
तसेच बहुतेक याच दिवसापासून खासा शिवाजीच्या निवासस्थानाभोवती रामसिंगाच्या कडव्या राजपुतांचा पहारा बसला.

दि. ७ जूनला शिवाजीने आपल्या सोबतच्या लोकांना दख्खनला परत जाण्याचा परवाना मिळावा अशी विनंती केली. त्यानुसार हवी तशी दस्तके देण्याची औरंगची आज्ञा झाली.

दि. १२ जून रोजी औरंगला शिवाजी कदाचित आगऱ्याहून पळून जाण्याचा प्रयत्न करेल अशी शंका आल्याने त्याने आज्ञा केली कि, शिवाजी आग्रा येथून पळून मौजाबाद परगण्याच्या वाटेने आला तर तो तेथून जाऊ शकणार नाही अशी खबरदारी घेण्यात यावी.

दि. १६ जून रोजी शिवजी तर्फे दरबारात अर्ज पेश झाला, त्यानुसार शिवाजीने सन्यास घेण्याचे ठरवून बनारसला जाण्याकरता परवानगी मिळावी अशी विनंती केली. त्यावर औरंगने सुचवले कि, शिवाजीने संन्यास घेऊन प्रयागच्या किल्ल्यात राहावे. बहादूरखान तिथला सुभेदार आहे. तो शिवाजीवर लक्ष ठेवील.

दि. २४ जुलै ते २७ जुलै पर्यंत रामसिंग बादशहा सोबत शिकारीला गेला.

दि. १३ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजीच्या तळाभोवती पहारा कडक करण्यात येऊन त्यांस रामसिंगाच्या तळावरून हलवून विठ्ठलदासाच्या हवेलीत ठेवण्याचा बादशहाचा विचार असल्याचे अंतस्थ सूत्रांकडून शिवाजीस समजले. बातमीची खात्री करून घेण्यासाठी तो रामसिंगाच्या निवासस्थानी गेला असता त्याने त्याची भेट घेतली नाही. शिवाजी भेटीस आल्याची वार्ता घेऊन येणाऱ्या शाही चौकीदारामार्फत त्याने निरोप पाठवला कि, बादशहाने भेटीस मनाई केली आहे.

दि. १६ ऑगस्ट १६६६ रोजीचा औरंगजेबच्या दरबारातील अखबार

ज. ९ सफर २५                                   श. १५८८ श्रावण वद्य ११
(
२४ ) गुरु.                                      इ. १६६६ ऑगस्ट १६
कुंवर रामसिंगास हुकूम झाला कीं, ‘ सीवा मनसब कबूल करील अशा तऱ्हेने  त्याचें मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांस हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. त्याची येथून काबूल येथें नेमणूक करीन.रामसिंगाने अर्ज केला कीं, ‘ सीवा विनंती करीत आहे कीं, ‘ बंद्यास वतनावर असूं  द्यावे. मग हुकूम होईल तो मान्य आहे.

यानंतरच्या काही घटना अशा आहेत, ज्यांच्या तारखा मला उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
(१) शिवाजीने रामसिंगाकडून सहासष्ट हजार रुपये कर्जाऊ घेतले. (२) मुहंमद अमीनखान व आकीलखानाच्या मार्फत शिवाजीने बादशहास अर्ज केला कि, मी सर्व किल्ले बादशहाच्या ताब्यात देण्यास तयार आहे. फक्त किल्ल्यांचा ताबा देण्याकरता मला परत जाऊ द्यावे. कारण निव्वळ माझ्या लेखी हुकमावर माझे अधिकारी किल्ल्यांचा ताबा देणार नाहीत. परंतु औरंगने हा अर्ज फेटाळत म्हटले कि, शिवाजीच्या जाण्यामुळे जर किल्ले मिळू शकतात तर त्याच्या पत्रामुळे का नाही ? (३) शिवभारतकर्ता कवींद्र परमानंद शिवाजी सोबत आगऱ्यास होता. शिवाजीने आपल्या सोबतच्या व्यक्तींकरता आगऱ्यातून बाहेर जाण्याचा, दख्खनला जाण्याचा परवाना मागितला त्यांपैकी परमानंद एक असून मुक्काम सोडण्यापूर्वी काही दिवस आधी शिवाजीने त्यांस एक हत्ती, एक हत्तीण, एक घोडा, सरोपा व एक हजार रुपये रोख भेटीदाखल दिले. तसेच परमानंद तळावरून जाण्याआधी आणखी एक हत्ती देण्याचे वचन दिले.

इथपर्यंतचा मजकूर औरंगजेबाच्या दरबारातील अखबार, सेतू माधवराव पगडींचे ' छत्रपती शिवाजी ' व ' श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ ' तसेच विजय देशमुखांच्या ' शककर्ते शिवराय ' मधून घेतला आहे. इथे हि बाब नमूद करणे योग्य ठरेल कि, पगडी व देशमुखांनी घटना सारख्याच दिल्या असल्या तरी तारखांबद्दल त्यांच्यात एकमत नाही. पगडी एक दिवस नंतरची तारीख देतात तर देशमुख आधीची. इथे मी देशमुखांच्या तारखा ग्राह्य धरल्या आहेत. कारण त्यांनी संदर्भ कोठून घेतले याची नोंद दिली असून पगडींनी याबाबतीत कसलाच खुलासा केलेला नाही.

आता आपण शिवाजीच्या आग्रा भेट व अटकेसंदर्भातील मिर्झा राजाचा शिवकालीन पत्रसार संग्रहातील उपलब्ध पत्रव्यवहार पाहू.

 पसासं ले. क्र. ११२९
                                           { श. १५८८ ज्येष्ठ - आषाढ
                                           { इ. १६६६ जून - जुलै (?)
मिर्झा राजा जयसिंग याचा गुमास्ता ---
" शिवाजी भेटीस आला त्यावेळी दरबारी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्यामुळे थोडे दिवसपर्यंत बादशहाने त्याला दरबारात येण्याची बंदी केली होती. परंतु नंतर त्याचा सन्मान करून व कृपा दाखवून त्याला परत पाठवावा असा औरंगजेबाचा बेत होता. "
=======================================================================

पसासं ले. क्र. ११३०
                                              { श. १५८८ ज्येष्ठ - श्रावण
                                              { इ. १६६६ जून - ऑगस्ट (?)
                 जयसिंग - रामसिंह
' प्रथम, शिवाजीबद्दल जामिनकी व जबाबदारी तुझ्याकडून बादशहाने काढून घेतली होती असे कळले. त्यावरून, ' तुझा त्यात काही संबंध नव्हता ' असे जे मी पत्र पूर्वी पाठविले होते त्याचा उपयोग झाला ; आणि तुझ्यावरील जबाबदारी संपली ; असे मी समजत होतो. परंतु आताच बादशाही पत्र मिळाले त्यावरून शिवाजीला तुझ्याच ताब्यात देण्याचा इरादा दिसतो ! आजपर्यंत वाट पाहिली तशीच आणखी थोडी पहा. इतक्यांत माझे अर्झाचे उत्तर येईल आणि त्याचे अनुरोधाने शिवाजीबद्दल काय विनवायचे ते ठरविता येईल. मी असा अर्ज केला आहे की, " एकतर मला दख्खनच्या सैन्याचा संपूर्ण अधिकार सोपवून द्या आणि भरपूर कुमक पाठवा ; किंवा तसे जमत नसेल तर दरबारकडे परत तरी बोलवा. " तुला आग्ऱ्याचा फौजदार नेमून पुनः शिवाजीला तुझ्याच ताब्यांत ठेवण्याचा बादशहाचा विचार आहे असे तू लिहितोस ; त्यावर आपल्याला बादशाही दौरा सोडून कधीच रहावे लागले नसल्यामुळे यावेळीहि बरोबर घ्यावे असे बादशहाला म्हणावे.
जर बादशहा स्वारीवर निघत असतील, तर शिवाजीला आगऱ्यालाच ठेवणे सोईचे पडेल. त्याची समजूत करून त्याला असे आश्वासन दिले पाहिजे की, दरबार दख्खनमध्ये पोचताच त्याला तिकडे बोलविण्यात येईल. तू मात्र, नित्याचे धोरण म्हणून बादशहाबरोबरच राहणे इष्ट आहे. नाहीतर तुझे अनुयायी निराश होऊन त्यांची निष्ठा पक्की राहणार नाही.
=========================================================================

पसासं ले. क्र. ११३१  
                                         { श. १५८८ ज्येष्ठ - श्रावण
                                         { इ. १६६६ जून - ऑगस्ट ?
          जयसिंग - भोजराज कछवा
शिवाजी आगऱ्यास आहे त्या बाबतीत ( कुमार रामसिंहास असे कळवा की ) बादशाही सत्तेला कोणत्याहि प्रकारचा अपाय न होतां माझ्या व तुझ्या शब्दाची किंमत राहील असे वर्तन ठेवावे.
=========================================================================

पसासं ले. क्र. ११३२
                                               { श. १५८८ ज्येष्ठ - श्रावण
                                               { इ. १६६६ जून - ऑगस्ट
                        जयसिंग - औरंगजेब
" पूर्वी शिवाजीला परत जाऊ द्यावे असे मी विनविले होते. तेव्हा दख्खनमधील परिस्थिती थोडी निराळी होती. आता ( मोगलांची परिस्थिती ) थोडी बिकट झाली असल्यामुळे शिवाजीला इकडे सोडणे शहाणपणाचे होणार नाही. परंतु तेथे ठेवण्यात सावधगिरी राखिली पाहिजे. नाहीतर त्याचे जीवित व स्वातंत्र्य धोक्यात आहे अशी कल्पना झाली म्हणजे त्याचे ( दक्षिणेतील ) अमलदार निराशेने आदिलशहाला मिळतील. आणि मग सर्वत्र अंदाधुंद माजून बखेडा मात्र होईल. "
" शिवाजीवर मला खुद्द बादशहांनी पाठविले .... अगदी थोड्या वेळांत मला यश प्राप्त झाले. आणि नंतर हजारो युक्त्या करून त्यला आणि त्याच्या मुलाला दोघांनाही मी बादशहासमोर पाठवून दिले. बादशहांना या गोष्टी माहीत आहेत. असे असून दरबारी लोक आता म्हणतात ' शिवाजी हा असा होता, हे तुला माहीत असतांना त्याला कशाला दरबारला पाठविले ? ' ..... असे ऐकतो. जेव्हां मी त्याला पन्हाळ्यावर पाठविले तेव्हांहि ' जयसिंगाने त्याला आपल्या काबूंतून पळून जाण्यास संधी दिली ' अशीही टीका केली. आणि आतां त्याला ( ताब्यात आणून देण्याकरिता ) बादशाही मुलाखतीला पाठविले तरीहि ' कशाला पाठविले ? ' म्हणून म्हणणे आहेच. या प्रकारांनी एवढेच झाले की, अर्धवट राहिलेले विजापूरचे प्रकरण मात्र अधिक घोटाळ्यात पडले आहे. "
==================================================================

पसासं ले. क्र. ११३४
                                          { श. १५८८ श्रावण
                                          { इ. १६६६ ऑगस्ट
                             जयसिंग --
शिवाजीला दरबारी पाठविण्याकरिता केलेल्या युक्त्याप्रयुक्त्या व्यर्थ होऊन माझे दैवी खडतर आपत्ति आली आहे ... माझ्या शत्रूंनी चिथावून दिल्यामुळे, शिवाजीच्या पदरचे ब्राह्मणांनी, शिवाजीचे सुटकेची सर्व जबाबदारी रामसिंगावर घातली. रामसिंगाचे सांगण्यावरून, आणि रामसिंगाच्या पहाऱ्यांतील ढिलाईमुळे शिवाजीला जातां आले ; अशी त्यांनी समजूत करून दिल्यामुळे रामसिंगाची मनसब व जहागीर काढून घेण्याचे घाटत आहे. माझ्या मनांत असे बेमानीचे विचार आले असतील तर मला मरण येवो ! मी शिवाजील जेरीस आणिले ; त्या माझे शब्दांवर विश्वास न ठेवता शिवाजीचे ब्राह्मण जास्त खरे कां मानावे !    

मिर्झा राजाच्या पत्रांच्या निश्चित तारखा उपलब्ध नसल्याने कोणतं पत्र कोणत्या प्रसंगास, घटनेस व कोणत्या महिन्यातील घडामोडीस अनुलक्षून आहे, हे ठरवणे अवघड पडते. परंतु या पत्रांवरून काही गोष्टी निश्चित होतात त्या अशा :- (१) केवळ शिवाजीच नव्हे तर संभाजीलाही दख्खनमधून बाहेर काढत उत्तरेस पाठवण्यामागे मिर्झाचा हात होता. (२) दरबारी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्यामुळे बादशहाची त्यावर नाराजी ओढवली होती. (३) औरंगची नाराजी शिवाजीच्या जीवावर बेतू नये तसेच बादशाही सत्ता व मिर्झाची प्रतिष्ठा कायम राहील याकरता रामसिंगाने प्रयत्नशील राहावे अशी मिर्झाची इच्छा होती. (४) मिर्झाच्या रदबदलीमुळे औरंगने शिवाजीच्या संदर्भातील रामसिंगाचा जामीन काढून घेण्यास अनुकूलता दर्शवली. (५) मिर्झाला विजापूर स्वारीत अपेक्षित यश न मिळाल्याने स्वतः औरंग दख्खनला जायच्या विचारात असून शिवाजीला --- जयसिंगाच्याच सुचनेनुसार / सल्ल्यावरून आगऱ्यास कैदेत / स्थानबद्धतेत ठेवण्याचा त्याचा बेत असून शिवाजीच्या देखरेखीचे व आगऱ्याच्या फौजदारीचे काम तो रामसिंगाच्या गळ्यात टाकणार होता. तापैकी रामसिंगाने आग्रा व शिवाजीची भानगड आपल्या गळ्यात बांधून न घेता औरंगसोबत --- जर तो आलाच तर --- दख्खनला यावे अशी जयसिंगची सूचना होती.  

यावरून हे स्पष्ट होते कि, किमान शिवाजीच्या स्थानबद्धतेसंबंधी औरंग मिर्झाच्या तंत्रानेच चालला होता. मिर्झाच्या पत्रांतील काही मुद्द्यांना पुष्टी देणारा उल्लेख मआसिरी आलमगिरीत मिळतो. त्यानुसार मिर्झा राजाने बादशहास अर्जी पाठवली कि, शिवाजीला वचन दिल्याने व इकडील मसलतीकरता त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करावे. त्यावरून बादशहाने फौलादखानाचा पहारा शिवाजीच्या तळावरून उठवला व रामसिंगानेही पुरेशी खबरदारी न घेतल्याने शिवाजी आपल्या मुलासोबत वेषांतर करून पळून गेला. 

यावरून आता एवढा विश्वसनीय घटनाक्रम मिळतो कि, मिर्झाने सहेतुक शिवाजी - संभाजीला आगऱ्यास पाठवले. दरबारी वर्तनात अंतर पडल्याने बादशहाची शिवाजीवर गैरमर्जी ओढवून त्यांस नजरकैद घडली. जयसिंगाच्या सुचनेनुसार रामसिंगाने शिवाजीच्या रक्षणासाठी जामिनगिरी पत्करली. पुढे जयसिंगाच्याच विनंतीने औरंगने रामसिंगाची शिवाजीच्या जामीनदारीतून मुक्तता केली. तसेच शिवाजीवरील पहाराही काढून घेतला. परंतु त्याला शहराबाहेर वा मायदेशी जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर मिर्झाच्याच सल्ल्यावरून तसेच इतरही काही अज्ञात कारणांनी औरंगने शिवाजीवर पुन्हा पहारा बसवत त्याच्या मुकामच्या जागेत बदल करण्याचे ठरवले व अखेरची कृती / निर्णय अंमलात येण्यापूर्वीच शिवाजी कैदेतून पळून गेला. 

शिवाजीच्या अटकेच्या संदर्भात पहाऱ्याची जी व्यवस्था होती, तिची नोंद पगडी व देशमुख या दोघांनीही आपापल्या ग्रंथांत दिली असून त्यावरून असे दिसून येते कि :- शिवाजीच्या निवासस्थानाभोवती रामकृष्ण ब्राह्मण, जिवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय आणि पुरोहित बलराम हि रामसिंगची मंडळी पहाऱ्यावर होती. परंतु यांना प्रत्यक्ष आत जाण्याची मुभा नव्हती. देवडीच्या दरवाजाबाहेर बंदूकधाऱ्यांचा पहारा असे. इथे देवडीचा अर्थ ' तळाच्या दरवाजाबाहेर ' असा पगडींनी घेतला आहे तर देशमुखांनी थेट देवडी शब्द वापरला आहे. तळाभोवती मीना जातीच्या शिपायांचा चौफेर पहारा असून त्यांच्या मागे बादशाही सैनिक व शेवटी सिद्दी फौलादखानाचे शिपाई होते. म्हणजे शिवाजी भोवती पहाऱ्याचं तिहेरी कडं होतं. 

शिवाजीच्या बंदोबस्ताची हि स्थिती पाहता काही प्रश्न, शंका उत्पन्न होतात. (१) रामसिंगाचे पहारेकरी प्रत्यक्ष तंबूत नव्हते, हे तर स्पष्ट आहे परंतु देवडीवर तसेच तळाभोवती जे बर्कंदाज व मीना जातीचे शिपाई होते, ते नेमके कोणाचे होते ? रामसिंगाचे कि औरंगचे ? (२) मीना जातीच्या शिपायांनंतर बादशाही व त्यानंतर फौलादखानाचे सैनिक असा पहारा होता तर मग यामध्ये तथाकथित मिठाईचे पेटारे तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणावर होती ? या तिन्ही कड्यांमधील लोकांवर कि फक्त फौलादखानावर ? या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे.
आता आपण सुटकेचा वृत्तांत पाहू. 

दिनांक १६ ऑगस्ट रोजी औरंगने रामसिंगास हुकुम केला कि, ' सीवा मनसब कबूल करील अशा तऱ्हेने  त्याचें मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांस हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. त्याची येथून काबूल येथें नेमणूक करीन. त्यावर शिवाजीचे त्याच दिवशी रामसिंगामार्फत उत्तर आले कि,  बंद्यास वतनावर असूं  द्यावे. मग हुकूम होईल तो मान्य आहे. विशेष म्हणजे संभाजी या दिवशी दरबारात हजर झाला होता / नव्हता याची स्पष्टता होत नाही.

दि. १७ ऑगस्ट रोजी शुक्रवार असल्याने दरबारी कामकाज बंद होते. त्यामुळे संभाजीही निवासस्थानीच असणार. 

दि. १८ ऑगस्ट रोजीचा बादशाही दरबारचा अखबार येणेप्रमाणे :-         

जु. ९ सफर २७                                      श. १५८८ श्रावण वद्य १३
(
२६ ) शनि.                                       इ. १६६६ ऑगस्ट १८
 
(१)   बख्तावरखानाने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग म्हणतो सीवा पळून गेला.फौलादखानाने अर्ज केला कीं, ‘ मलाही कळले नाहीं. त्याच्या पलायनाचे रहस्य कोणासही उमगले नाहीं.हुकूम केला तूं जा व बातमी काढ.फौलादखान सीवाच्या डेऱ्यापाशी गेला तेव्हां त्याने ऐकले ( पाहिले ) कीं, एक बांधलेली पगडी व एक आरसा पलंगावर आहेत व त्याचे जोडे खाली पडले आहेत. तीन घोडे, दोन पालख्या व एक नोकर पाठीमागें सोडून तो गेला. इतर कांहीही सामान नाहीं. तेव्हां उपर्युक्त खानाने येऊन तसा अर्ज केला. यावर हुकूम केला, ‘ त्याचा तपास करा.या बाबतींत राय ब्रिंदाबनने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग घुसलखान्यांत  बसला आहे.यावर हुकूम केला कीं, ‘ त्याला म्हणावे तू त्याचा ( सीवाचा ) जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस. नाहींतर तो गेला आहे तेथें तूही जा.कुंवर रामसिंगास खास, आम व घुसलखाना यांत येऊं देऊं नये.कुंवरचे चार ब्राम्हण सीवाच्या पलंगापाशीं पहाऱ्यास होते त्यांस कैद करावे व फौलादखानास हुकूम केला कीं, शहरांतही ताकीद करावी.
(
२)    जुम्दतुल्मुल्कास हुकूम केला कीं, देशांतील सुभेदार, फौजदार मार्गाधिकारी ( गुजर पाथानच ) व जमीदार यांस लिहा सीवा हुजुराकडून पळाला आहे. प्रत्येकाने आपापल्या सरहद्दीबाबत जागरूक असावे. प्रत्येकाच्या हद्दींत जो कोणी येईल त्याचा तपास करावा. सीवा ज्याच्या हद्दीतून निसटेल त्यास काढून टाकण्यात येईल.
(
३)    महाराजास हुकूम केला कीं, ‘ बघितलेस, कुंवर रामसिंगाने काय केलें. सीवास हातांतून निसटूं दिले.त्याने अर्ज केला कीं, ‘ तो आपल्या घरचा आहे. त्याची काय छाती आहे कीं, तो असें करील आणि तो ( सीवा ) तरी कुठे जाऊं शकेल. त्यास बांधून आणीन.
(
४)    हाजी अब्दुल वहहाब व आबिदखान यांनी अंतस्थ अर्ज केला कीं, ‘ सीवा पळून गेला आहे. हुकूम केला कीं, ‘ सीवा कुठे जाईल ? त्याने मातबर जामीन दिला आहे.

यानंतर सर्वत्र धरपकड झाली. त्यामध्ये शिवाजीच्या सोबत्यांपैकी राघोजी, केसोजी सहित आणखी काही व्यक्ती पकडल्या गेल्या. त्यांची नावे समजू शकली नाहीत. खेरीज शिवाजीच्या वकिलासही कैद करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व एकाच ठिकाणी वा एकाच वेळी पकडण्यात आले नाहीत. यानंतर कैद्यांची चौकशी झाली. त्यापैकी बलराम पुरोहितची जबानी पगडींनी दिली ती अशी :- ' रात्र संपण्यास घडी अर्धा घडी असताना मी शिवाजीला पाहिले. पहाटे त्यांनी सुका मेवा मागून घेऊन खाल्ला. यानंतर ते केव्हा निघून गेले हे माहीत नाही. भोवती चौकी पहारा असे. पण ते प्रत्यक्ष झोपत तेथे कोणी जात नसे. शिवाजी अंगावर शाल पांघरून इकडे तिकडे फिरत असे. त्यांनी बिछान्यावर पांघरून घातले. बिछान्याच्या टोकाला आपले पागोटे ठेवले आणि स्वतः निघून गेले असावेत. '

शिवाजीच्या पलायनासंदर्भात परकालदासने जयसिंगचा दिवाण कल्याणदास यांस दि. २३ ऑगस्ट १६६६ च्या पत्राचा वृत्तांत पगडींनी दिला आहे, तो येणेप्रमाणे :- " और सेवा सौ भाग तौठा पहली दीन चार थे गढास दोई चौकी कौ -- महाराज निघून जाण्यापूर्वी चार दिवस चौकी पहारे अधिक कडक करण्यात आले होते -- और पाती सादजी पाछौ मारी नाखीबा कौ हुकुम कीयौ -- बादशहाने पुन्हा एकदा शिवाजीला मारावे असा नकीबाला ( अधिकाऱ्याला ) हुकुम केला -- पाहगै राजा विठ्ठलदास की हवौली मौ राखीबा कौ हुकुम कीयौ -- पण नंतर त्याला राजा विठ्ठलदास याच्या हवेलीत ठेवण्यात यावे अशी आज्ञा केली -- सू सगला समाचार सेवा नौ पहुता -- हे सर्व वृत्त शिवाजीला मिळाले -- तब सेवौ हकीकती पुछीवानौ श्री महाराज कवार जी कौ डेरौ आयौ -- तेव्हा हकीकत विचारण्यासाठी शिवाजी महाराज कुमार ( रामसिंग ) याच्या मुक्कामावर आला -- श्री महाराज कंवार जी आपणी हजुरी बुलावौ ही नही आर सेमौ केतेक वार वौठो रही उठी गयौ -- पण महाराज कुमारांनी त्याला आपल्यासमोर बोलाविले नाही. थोडा वेळ वाट पाहून शिवाजी तेथून निघून गेला -- ताठौ पाछौ श्री महाराज कंवारजी फुरमायौ जू -- यानंतर महाराज कुमारांनी आज्ञा केली की, -- पातीसाही लोगोनौ कहौ ' सेवा नो म्हारो भी देरौ आवा मती दौ ' -- बादशाही अधिकाऱ्यांना सांगा ' शिवाजीला माझ्या तळावर येऊ देऊ नका. ' -- कहौ ' कवरको भी जावा नेई पाती साहजी मनौ कीया हो ' -- त्याला म्हणावे ' शिवाजीने कुमारकडेही जाऊ नये. बादशहाने मनाई केली आहे. ' -- कंवरजी आपणौ डेरौ भी आवा थे मनौ कियौ -- कुमारांनी शिवाजीला आपल्या तळावर येण्याची मनाई केली आहे -- तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो -- तेव्हा शिवाजीने जाणले की, तेव्हा शिवाजींनी ओळखले की, आता अनर्थ होणार. तेव्हा ते पळून गेले.

यानंतर दि. ३ सप्टेंबर १६६६ रोजीच्या परकालदासच्या पत्रातील पगडींनी दिलेला वृत्तांत येणेप्रमाणे :- " दिवस चार घटका वर आला असता बातमी आली की, शिवाजी पळाला. चौक्या - पहाऱ्यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला, आणि कोणत्या चौकीतून पार झाला, त्या वेळी कुणाचा पहारा होता हे कोणीही सांगू शकले नाही. मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटाऱ्यांची ये - जा होती त्यामुळे तो पेटाऱ्यांत बसून निघाला असावा. ( तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यारां की आमदरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो. ) "        

हा सर्व तपशील लक्षात घेता आगऱ्याहून शिवाजीच्या सुटकेविषयीचा एकही प्रत्यक्षदर्शी, विश्वसनीय वृत्तांत आजमितीला उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. मआसिरे आलमगिरी असो वा परकालदासची पत्रे दोन्हीतही केवळ तर्कच आहेत. राहता राहिली जेधे शकावली. तर तिच्याही नोंदीवर घेण्यासारखे आक्षेप खूप आहेत.

सर्वप्रथम आपण उपलब्ध साधनांतील माहितीच्या आधारे उद्भवणाऱ्या शंका व त्याच्या निरसनार्थ काही उत्तरांची चर्चा करू.

शिवाजीवरील पहारा मधल्या काळात औरंगने उठवला होता. अर्थात इथे एक मुद्दा अनुत्तरीत राहतो व तो म्हणजे सिद्दी फौलादखानाचे पहारे उठवल्याचा उल्लेख मआसिरे आलमगिरीत आहे. परंतु बादशाही पहाऱ्यांविषयी कसलाच शब्द नाही. तेव्हा --- जर बादशाही रक्षकांचा पहारा कायम असेल असे गृहीत धरून --- फौलादखानाचा पहारा उठवल्यानंतर शिवाजीने आगऱ्याहून निसटण्याचा प्रयत्न का केला नाही ?

उपलब्ध साधनांतील दरबारी अर्जांचे जे मसुदे शिवाजीच्या वतीने दाखल केले होते व त्यावरील औरंगच्या प्रतिक्रिया तसेच अटकेच्या काळातील शिवाजी विषयक परकालदासच्या पत्रांतील नोंदी लक्षात घेता शिवाजीने या काळातही सुटकेसाठी हात - पाय मारल्याचे दिसून येते. परंतु बहुधा त्या प्रयत्नांत जोर नसावा किंवा त्यांस अपयश लाभले असावे. दुसरे असेही म्हणता येईल कि, फौलादखानाचा पहारा उठल्याने बादशहा कदाचित आपल्या रवानगीचा निर्णय घेईल वा त्या विचारांत असेल अशीहि शिवाजीची समजूत असावी. या शक्यतेस मिर्झाची पत्रे पुष्टी देतात. परंतु एकूण परिस्थिती लक्षात घेता यावेळी औरंग, मिर्झा व शिवाजी या तीन व्यक्ती एकाच हेतूंनी प्रेरित न होता वेगवेगळ्या हेतूंनी प्रेरित होऊन वर्तत असल्याने इथे कोणाच्याच अपेक्षेनुरूप घडून आलं नाही व ते शक्यही नव्हतं.

मिर्झाची बालिश अपेक्षा होती कि, औरंगने शिवाजीला एकदम मोकळंही करू नये वा कडक कैदेतही ठेवू नये. रामसिंगासही तो परहस्ते सूचना देतो कि, बादशाही सत्ता व आपल्या प्रतिष्ठेस धक्का न बसेल अशा रितीने शिवाजीचा बचाव करावा. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता मिर्झाच्या या दोन्ही सूचना, अपेक्षा अगदीच बाळबोध म्हटल्या पाहिजेत.

औरंगच्या दरबारचे अखबार चाळले असता काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात व त्या म्हणजे, राजकीय स्वार्थ व इस्लामची सेवा ! पुरंदरचा तह तर त्यांस मुळातच मान्य नव्हता पण मिर्झाची व आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याने तो वरवर मान्य केला. शिवाजी आगऱ्यास यावा अशीही त्याची इच्छा नव्हती पण एकदा तो मुलासह येताच व याच्यापासून दरबारी शिष्टाचारात अंतर पडताच पुरंदर तहाचा अलिखित भाग त्याने पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला. त्यानुसार हर प्रयत्ने तो शिवाजीकडून उर्वरित राज्य व किल्यांची सोडचिठ्ठी मागत होता. तसेच याबदल्यात तो शिवाजीव त्याच्या नातलगांस मनसब देण्यासही तयार होता. वास्तविक पुरंदर तहाची सिद्धता झाली तेव्हाच शिवाजी मोगल मनसबदारी स्वीकारणार नाही हे निश्चित झाले होते. परंतु औरंगसारख्या सार्वभौम सत्तेच्या अधिकारी पुरुषास आपल्या अंमलात एखादं स्वतंत्र संस्थान, राज्य अस्तित्वात राहावं व त्याला आपण मान्यताही द्यावी, हे पटण्यासारखं नव्हतं. पुरंदरच्या तहानं शिवाजीचं निम्मं राज्य - गड मिळाले पण त्याचं स्वातंत्र्य नाही ! आणि औरंगला तेच पाहिजे होतं !!

कागदोपत्री जरी शिवाजीनं हि पराधीनता मान्य केली असती तर दोन पिढ्यांचा उद्योग मातीत जाण्याची वेळ ओढवली असती. एकदा बसलेला जम मोडल्यावर फिरू व्यवस्था लावणे त्याच्याही आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यामुळेच त्यानेही शेवटपर्यंत, आपण मनसबदारी स्वीकारार नसल्याचाच हेका कायम ठेवला.

शिवाजीला ठार करून संभाजीला हाताशी धरून शिवाजीचं उर्वरित राज्य गिळंकृत करण्याचाही पर्याय त्याच्यापुढे होता. परंतु मिर्झा राजा त्या मार्गातली मोठी धोंड होती. तेव्हा शक्य तितक्या नरमाईने वर्तूनच त्याने शिवाजीकडून आपणांस हवे ते किल्ले, प्रांत लिहून घेण्याचा यत्न केला. जेव्हा सामोपचाराचे मार्ग खुंटले तेव्हा त्याने शिवाजीला रामसिंगाच्या तळावरून विठ्ठलदासाच्या हवेलीत नेण्याचा निर्णय घेतला. या हवेलीत काय घडणार होतं ? शिवाजीचा खून कि छळ ? कि धर्मांतर ?? माझ्या मते, हा क्रम छळ, धर्मांतर व नंतर खून असाच घडून आला असता. शिवाजीकडून कोणत्याही मार्गाने प्रांत - मुलखाच्या सोडचिठ्ठ्या लिहून घेणे महत्त्वाचे होते. त्यानंतर मग मनसबदारी व धर्मांतर. आणि यास दाद न दिली तर खून. नेताजी पालकरचे उदाहरण याच परंपरेतलं असल्याची इथे आठवण होते.

रामसिंगाच्या तळावरून आपल्याला विठ्ठलदासाच्या हवेलीत नेले जाणार व तळाभोवती परत एकदा बसलेले फौलादखानाचे पहारे पाहून शिवाजीला भावी संकटाची कल्पना आली. एकदा हवेलीत जाणं झालं कि बाहेर पडण्याचा रस्ता नाही. तसेच दि. १६ ऑगस्ट रोजी औरंगने रामसिंगास शिवाजी संदर्भात जी विचारणा केली, ती लक्षात घेता त्या दिवशी रामसिंग - शिवाजीची भेट झालीच नसावी असं म्हणणं धारीष्ट्याचं ठरेल. अर्थात दि. १६ ऑगस्ट रोजीच शिवाजीच्या सुटकेचा कट शिजला हे निश्चित ! आपल्याला येथून हलवणार हे शिवाजीला आधीच समजले होते व रामसिंगालाही याची कल्पना होती. परंतु बादशहाला शिवाजीकडून नेमकं काय पाहीजे याची प्रथम व सुस्पष्ट कल्पना शिवाजी - रामसिंगास दि. १६ ऑगस्ट रोजीच्या औरंगच्या दरबारी बोलण्यातून झाली व तेव्हाच रामसिंग - शिवाजीने पुढील कार्यभागाची आखणी केली. निसटून जाण्याचे मार्ग, बेत वगैरेंची तरतूद, योजनेतील त्रुटी व त्यावरील सूचना - दुरुस्त्या हे प्रत्यक्ष भेटीऐवजी हस्तकांच्या मार्फतही घडून येणे शक्य आहे. तसेच रामसिंग ज्यावेळी शिवाजीला भेटायला जाई तेव्हा त्याच्या सोबत बादशहाचे इतर अधिकारी असलेच पाहिजेत असा काही औरंगचा हुकुम नव्हता, हेही लक्षात घेतले पाहिजे.
प्रश्न फक्त आता इतकाच आहे कि, शिवाजीची सुटका कशाप्रकारे झाली असावी ? पेटाऱ्यातून वा वेषांतराने, पण पेटाऱ्यांसोबत !

पेटाऱ्यातून राजे निघोन गेले, हा सर्वांच्या आवडीचा सिद्धांत आहे. परकालदासचे पत्र, जेधे शकावली - करिना, इंग्रजी पत्रांसारखी समकालीन साधने यास दुजोरा देतात. परंतु परकालदासच्या पत्रातही ' पेटाऱ्याची ' शक्यताच वर्तवली आहे. ठाम बातमी नव्हे ! तसेच जेधे घराण्यातील सर्जेराव जेधे जरी आगऱ्यास शिवाजीसोबत गेला असला तरी प्रत्यक्ष सुटकेच्या दिवसापर्यंत / क्षणी तो सोबत असल्याचा उल्लेख नाही. शिवाजीने आपले बरेचसे सोबती यापूर्वीच दख्खनला मार्गस्थ करण्यासाठी शाही परवाने घेतले होते व त्यामुळे त्याची माणसे मुक्कामाच्या जागेतून निघूनही गेली होती. प्रत्यक्ष सुटकेच्या दिवशी शिवाजी सोबत कोण होते, नव्हते याविषयी कसलीच माहिती आजमितीस उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे मदारी मेहतर निकाली निघतो तद्वत हिरोजी फर्जंद व पेटाराही !

परंतु केवळ एवढ्यावरून पेटाऱ्याची कथा मोडीत निघत नाही. कारण एकाच वेळी इंग्रजी, राजस्थानी, मराठी साधनांत पेटाऱ्यांचा उल्लेख येणे हा काही योगायोग वा पूर्वनियोजित प्रकार नाही. सर्वप्रथम आपण हे पाहिले पाहिजे कि, हे पेटारे नेमके कशाचे, कशासाठी व कधी सुरु झाले.

समकालीन साधनांपैकी परकालदासच्या पत्रात पेटाऱ्यांचा उल्लेख येतो पण ते कशाचे --- म्हणजे फळांचे कि मिठाईचे वा सामानाचे याचा उल्लेख नाही. स्पष्टता नाही. तसेच पेटाऱ्यांचा राबता कधी व कशासाठी पडला याचाही उल्लेख नाही.

दुसरे समकालीन साधन म्हणजे पसासं ले. क्र. ११३६ हे सुरतकर इंग्रजांचे कंपनीस गेलेले दि. २५ सप्टेंबर १६६६ चे पत्र. यामध्ये शिवाजी - संभाजी पेटाऱ्यांतून निसटल्याचा उल्लेख आहे. परंतु पेटारे कशाचे, कशासाठी याची माहिती नाही.

मआसिरे आलमगिरी तथा औरंगजेबनामा या देवीप्रसाद कृत हिंदी अनुवादात शिवाजी वेष बदलून गेल्याचा उल्लेख आहे. पेटाऱ्यांचा नाही. तसेच शिवाजीच्या तळावरून पेटारे जात होते, नव्हते याचाही उल्लेख नाही.

फुतुहात इ आलमगिरी या ईश्वरदास नागर कृत व Tasneem Ahmad इंग्रजी अनुवादात मिठाईचे पेटारे येतात. परंतु यातील माहिती अग्राह्य आहे. कारण यात रामसिंगाचा उल्लेख नसून किरातसिंग -- मिर्झाच्या दुसऱ्या मुलाचा नामोल्लेख आहे. शिवाय पेटाऱ्यांची युक्ती मोगल मनसबदार सलाबत खानाची असल्याचे यात नमूद आहे.

तारीखे दिल्कुशा या भीमसेन सक्सेनाच्या वृत्तांतात मिठाईच्या पेटाऱ्यांची माहिती येते, असे पगडींनी नमूद केले आहे. तसेच हे पेटारे शिवाजी दर गुरुवारी देवाचा प्रसाद म्हणून बाहेर वाटण्यासाठी पाठवत असून त्याच्या तळावरही, निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर मिठाई वाटप होत असून त्यावेळी खूप गर्दी जमत असल्याचा उल्लेख आहे.

मराठी साधनांपैकी जेधे शकावली - करीन्यात फक्त पेटाऱ्यांचा उल्लेख आहे. बाकी मुद्द्यांची त्यात कसलीच चर्चा नाही. तुलनेने कमी विश्वसनीय अशा सभासद बखरीत मेव्याचे पेटारे असा मजकूर आहे. परंतु प्रयोजन, आरंभ यांची स्पष्टता नाही. फक्त वजीरांस मेवा जात होता एवढेच नमूद आहे. येथे वजीर म्हणजे बादशाही उमराव अभिप्रेत आहेत. कारण एकाच वजिराला शिवाजी मेवा का पाठवत बसेल हाही प्रश्न आहे. शिवाय सभासद बखरीनुसार हे पेटारे वेळूचे असून यात ' नाना जिन्नस मेवा ' भरून दोन मजुरांच्या मार्फत पालखी प्रमाणे वाहून नेले जात. याखेरीज अतिरिक्त तपशील म्हणजे पेटाऱ्यांची संख्या दहा होती.

एकूण पाहता, शिवाजीच्या गोटातून पेटारे जात होते याविषयी शंका नाही. तसेच विविध साधनांतील त्यांचा उल्लेख लक्षात घेता आकारानेही ते बऱ्यापैकी मोठे असावेत हेही समजण्यासारखे आहे. परंतु त्यावरून शिवाजी त्यात बसून निघून गेला हे पटण्यासारखं नाही. प्रथम आक्षेप मग असा येतो कि, पेटाऱ्यातून शिवाजी एकटाच न जाता संभाजीलाही घेऊन गेला. प्रत्यक्षात उपलब्ध माहितीनुसार संभाजीला तळावरून बाहेर पडण्यास कसलीही मनाई नव्हती. म्हणजे संभाजीला पेटाऱ्यात दडवण्याची गरजच मुळातच नाही.

दुसरा आक्षेप असा कि, शिवाजीच्या तळाभोवती सुरक्षा रक्षकांचे तिहेरी कडं होतं. बर्कंदाजांची एक टोळी, मीना जातीच्या शिपायांची पथकं --- यांपैकी एक रामसिंगाचे असावे असे माझे मत आहे. त्यानंतर बादशाही रक्षक व फौलादखानाचे पहारेकरी. यांपैकी कोणत्याही एका ठिकाणी वा तिन्ही ठिकाणी पेटाऱ्यांची तपासणी होऊ शकते. रामसिंग जरी शिवाजीच्या सुटकेस अनुकूल असला तरी बादशाही रक्षक व फौलादखानाविषयी तसं म्हणणं थोडं धारीष्ट्याचं ठरेल. यास्थळी फारतर बादशाही परवानगी विरुद्ध बाहेरची अतिरिक्त माणसं तळावर येण्यास परवानगी देणं किंवा तळावरील व्यक्तीस नियमाविरुद्ध सवलत देणं असे किरकोळ प्रकार होऊ शकतात. परंतु पेटारेच तपासायचे नाहीत असं घडणं शक्य नाही व शिवाजी सारखी चाणाक्ष व्यक्ती अगदी जीवावर बेतल्यावरही शत्रूच्या चुकीवर किंवा दयाबुद्धीवर क्षणभर विसंबेल हे संभवत नाही. त्यामुळे पेटाऱ्यात बसून शिवाजी आगऱ्याहून निसटला हे सर्वथैव त्याज्यचं मानलं पाहिजे.

आता वेषांतराचा मुद्दा पाहू. वेषांतराची शक्यता तशी बऱ्यापैकी ग्राह्य आहे. रामसिंगाने नियुक्त केलेले चार पहारेकरी, स्वतः रामसिंग व त्याचे काही विश्वासू सरदार, फौलादखान अपवाद केल्यास अगदी जवळून, निरखून किती जणांनी शिवाजीला पाहिलं असेल ? तळावर शिवाजी हिंडायचा - फिरायचा. अगदी रामसिंगाच्याही गोटात जायचा. परंतु तो नेहमीच्या वेषात. शिवाजीराजे म्हणून ! राजचिन्हे, वस्त्रे जर त्याने त्यागली व दुसराच कोणता वेश / पोशाख परिधान केला तर ? ज्यांना वेषांतराचा मुद्दा मान्य आहे त्यांनी त्याकरता मिठाईचे पेटारे वाहून नेणारे / सोबत जाणारे अशाच कल्पना लढवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु पहाऱ्यावरील रामसिंगातर्फे नियुक्त एखाद्या राजपूत शिपायाचा पेहराव करून शिवाजी निघून गेला तर !

 हीही शक्यता अगदीच अग्राह्य नाही व कोणाच्याही लक्षात येणार नाही. कारण रामसिंगाच्या शिपायांची तपासणी कोण करणार ? ते तर तळाच्या आतच होते. म्हणून आतले शिपाई जर काही कामानिमित्त तळावरून बाहेर जाऊ म्हणतील तर बादशाही रक्षक वा फौलादखानाचे शिपाई त्यांस थोडी अडवणार ? व समजा, तशीही पद्धत असेल तर रामसिंगाच्या गोटातूनही दुसरा कोणताही वेष घेऊन जाऊ शकतोच कि ! रामसिंग राजपूत राजपुत्र असल्याने व काबूल मोहिमेनिमित्त त्याच्याकडे गोळा झालेले सैन्य --- जे परत गेल्याचा उल्लेख मिळत नाही --- तळावरच असल्याने माणसांचा घोळका, गर्दी असणे स्वाभाविक असून यांत एखादा शिवाजी सहज खपू शकतो. शेवटी बादशाही रक्षक काय व फौलादखानाचे शिपाई काय, त्यांना फक्त शिवाजीला अटकावून ठेवणे बंधनकारक होते. इतरांना नाही ! खेरीज परकालदासने प्रत्यक्ष शिवाजीचे केलेले वर्णनही येथे लक्षात घेणे भाग आहे. त्यानुसार शिवाजी दिसण्यात किरकोळ आहे पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे.

शिवाजीच्या सुटकेचा अधिकाधिक तर्काधिष्ठित वृत्तांत याप्रमाणे जुळवता येतो. आता प्रश्न असा आहे कि, हे नेमकं कधी घडलं असावं ? शुक्रवारी दिवसभरात पेटाऱ्यांची ये - जा सुरु होती / नव्हती याची माहिती मिळत नाही. समजा पेटारे येत - जात असले तरी त्यांचे आकारमान लक्षात घेता रक्षकांचे सर्व लक्ष त्या पेटाऱ्यांभोवतीच केंद्रित असणार. कारण शिवाजी पळून जाण्याचा यत्न करील तर तो पेटाऱ्यातूनच ! वेषांतर वगैरेची कल्पना ते का करतील ? व समजा केली तरी शिवाजीच्या गोटातून बाहेर पडणाऱ्या दख्खनी वा उत्तरी व्यक्तीची चौकशी होऊ शकते. रामसिंगाच्या राजपुतांची चौकशी कोण करणार ? शिवाय औरंगची वृत्ती लक्षात घेता प्रत्यक्ष तळावरील पहारेकऱ्यांत त्याचे नजरबाज नसतीलच असे म्हणवत नाही. त्यामुळे राजपुतांच्या घोळक्यातून निघून जाणे शिवाजीला जितकं सोपं होतं तितकं इतर मार्गांनी नाही. असेही अनुमान सिद्ध होते.

आधी सांगितल्याप्रमाणे संभाजीला तळावरून बाहेर पडण्यास आडकाठी नसल्याने तो कोणत्याही कारणांनी बाहेर पडला असावा व मग काही वेळाने नित्य दिनचर्या आटोपून वा त्यात संशयास्पद खंड पडू न देता शिवाजीही निघून गेला. पगडींनी बलराम पुरोहिताची जी जबानी दिली आहे, ती जर पूर्ण असेल वा त्यातील तेवढाच भाग महत्त्वाचा असेल तर मग बलरामने आपल्या जबाबात फक्त शिवाजीचा दिनक्रम दिल्याचे लक्षात येते. त्यानुसार पहाटेपूर्वी शिवाजी नैसर्गिक विधीकरता उठून आपली कामं आटोपून, नंतर सुका मेवा मागवून खात असे. एवढंच सिद्ध होतं. प्रत्यक्षात दि. १८ ऑगस्ट रोजी पहाटे हा क्रम पाळलाच गेला होता याचा पुरावा तरी काय आहे व माहिती तरी कुठे आहे ? तसेच बादशाही अखबार नुसार शिवाजीच्या गोटात शोध घेण्यास माणसं गेली त्यावेळी फक्त एक नोकरच त्यांस आढळून आला. त्याव्यतिरिक्त एकही मनुष्य नाही.

दुसरे असे कि, शिवाजी पळून गेल्याची माहिती प्रथम रामसिंगानेच बादशहाला दिल्याचे उपलब्ध साधनांतून स्पष्ट होते. जर दि. १८ ऑगस्ट रोजी पहाटे शिवाजीने आपला नेहमीचा दिनक्रम उरकून पलायन केले असते तर अल्पावधीतच रामसिंग बादशहास तशी वर्दी देणे शक्य नाही. शिवाजी औरंगच्या कक्षेतून बाहेर पळून गेल्यावर त्याने ती बातमी औरंगला कळवली व ती देखील नेहमीच्या दिनचर्येनुसार.

उपलब्ध माहितीनुसार रामसिंग शिवाजीच्या मुक्कामी जाऊन त्याची भेट घेत असे, म्हणजे तो जिवंत असल्याची व पळून न गेल्याची खात्री करून घेत तशी बादशहा व मिर्झा राजास बातमी देत असे. व जरी बादशहाने रामसिंग - शिवाजीच्या भेटीस दि. १३ ऑगस्टला हरकत घेतली असली तरी दि. १६ ऑगस्टला औरंगच्याच आज्ञेने रामसिंगास शिवाजीला बादशाही प्रस्तावाचे उत्तर विचारणे भाग होते. तसेच रामसिंगाने शिवाजीच्या तळावर जाऊ नये असा औरंगचा निर्बंध असल्याचे कुठे आढळत नाही.
त्याचप्रमाणे बादशाही अखबारनुसार रामसिंग जेव्हा शिवाजीच्या पलायनाची बातमी घेऊन आला तेव्हा औरंगने त्यांस हि बातमी कशी समजली व तू तिथे का गेला अशी विचारणा केल्याचेही नमूद नाही. हेही लक्षात घेतले पाहिजे.

उलट त्याने शिवाजीला पळून जाण्याकरता मदत केल्याचा औरंगचा पक्का वहीम होता व मआसिरे आलमगिरीतही याविषयी स्पष्ट ठपका न देता ' और कुँवर रामसिंहने भी खबरदारीसे गफलत की ', अर्थात पुरेशी सावधगिरी न बाळगल्याची नोंद आहे. त्यावरून असे दिसून येते कि, रामसिंगास पूर्णतः दोषी मानण्या / सिद्ध करण्याइतपत औरंगलाही पुरावा न सापडल्याने त्याने मुद्दाम बेफिकिरी दाखवल्याचा व शिवाजीस पळून जाण्यास मदत केल्याचा मोघम आरोप करत फक्त त्याची मनसब रद्द केली. याव्यतिरिक्त तो शिक्षाही देऊ शकला नाही. वास्तविक ते त्याच्या हाती होतं व राजकीय गुंतागुंत लक्षात घेता रामसिंगाचा गुन्हाही मोठा होता परंतु गुन्हेगार व्यक्तीची पार्श्वभूमी व संशयाचा फाय्दां आणि पुरेशा पुराव्यांचा अभाव यांमुळे रामसिंग थोडक्यात बचावला.

इथपर्यंतचा शिवाजीच्या आगऱ्याहून सुटकेचा वृत्तांत शक्य तितका संदर्भ साधनांच्या आधारे तपशीलवार व वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगता येतो. आता शिवाजीच्या सुटकेची व मिठाईच्या पेटाऱ्याची सांगड का व कशी घातली गेली असावी यासंबंधी माझे मत नोंदवून प्रकरण आटोपते घेतो.
आगऱ्याच्या मुक्कामातून शिवाजीने पेटारे पाठवण्यास कधी आरंभ केला याची विश्वसनीय नोंद मिळत नाही. विजय देशमुखांनी पेटारे पाठवण्याची तारीख श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आसपासची व कृष्णजन्मोत्सवानिमित्ताने या कार्यास आरंभ केल्याचे नमूद करत दिलेली आहे. बाकी राजस्थानी पत्रे, जेधे शकावली - करिना, सभासद बखर, इंग्रजी पत्र, भीमसेन सक्सेना व ईश्वरदास नागर यांच्या वृत्तांतांची चर्चा यापूर्वीच आपण केली आहे.

त्यावरून असे दिसून येते कि, पेटाऱ्यांच्या कथेत मूळ पेटारे मिठाईचे कि मेव्याचे कि आणखी कशाचे हा प्रथम वाद. नंतर ते सुरु कधी व कोणत्या कारणांनी झाले याचीच अनिश्चितता. मग बाकीचे ओढून ताणून तर्क करण्यात प्रयोजन काय ? माझ्या मते, पेटाऱ्यांची आवक - जावक पहारेकऱ्यांचे लक्ष वेधून घेणे वा विचलित करण्यासाठीच केली होती. पेटाऱ्यांचे आकार, वजन वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेता पहारेकरी त्याच्याच देखरेखीत मश्गुल राहतील हि शिवाजीची किंवा रामसिंगाचीही कल्पना असू शकते. कारण, शिवाजीच्या तळावरून बाहेर पडणारी तीच एकमेव बंदिस्त वस्तू होती ज्यात व्यक्ती बसू शकते ! शिवाजी - रामसिंगाचा पहारेकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्देश त्यावेळी तर यशस्वी झालाच परंतु आजतागायतही तो इतिहासकार व अभ्यासकांची दिशाभूल करण्यात यशस्वी ठरत आहे. यावरूनच त्याच्या योजनेचे प्रयोजन, महत्त्व लक्षात येते !!                    
                                  ( क्रमशः )

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Samrat Shivaji ya malikechya pudhil bhhaganchi utsukta wadhali aahe lavkarat lavkar hi malika purna karrvi hi vinanti.