मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

कुरआन मजीद - चिकित्सा





    कुरआन ईश्वरनिर्मित असल्याची इस्लाम धर्मीयांची श्रद्धा आहे. परंतु श्रद्धेला वास्तविकतेचीही जोड द्यावी लागते व काही वेळा अघटीत, अकल्पित गोष्टी घडून येतात त्यांस चमत्काराची जरी संज्ञा प्राप्त होत असली तरी देवदुताने महंमद पैगंबरास येऊन ईश्वरी संदेश सांगावा व त्याचे महंमदाने जनांत प्रवचन करावे, प्रसार करावा आणि हे वारंवार घडावे हा निश्चित योगायोग अथवा चमत्कार मानता येत नाही.

    प्रस्तुत स्थितीत जे कुराण उपलब्ध आहे त्याची ग्रांथिक स्वरूपात निर्मिती महंमद पैगंबराच्या हयातीत झालेली नाही. समस्त कुराणातील ईश्वरी वचनं फक्त महंमदलाच देवदूतांनी सांगितलेली असल्याने व महंमदानेच त्याचा सर्वत्र प्रचार, प्रसार केल्याने कुराणाची लिखित परत त्याच्या हयातीत बनली असत तर कदाचित ती निर्दोष मानली जाऊ शकत होती.

    इस्लामियांची श्रद्धा काहीही असली तरी चिकित्सकाला श्रद्धेच्या अडथळ्याला न जुमानता आपले कार्य करावेच लागते व त्यास अनुसरून असे म्हणता येते कि, जरी महंमदाच्या पश्चात नंतरच्या इमाम - खलिफांनी जरी कुरणाच्या लिखित प्रती निर्मितीस आरंभ केला असला तरी मूळ महंमद प्रणित वचनांचा यात जसाच्या तसा संग्रह करण्यात आला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण महंमदाने ज्याप्रमाणे धर्मगुरू व शासक -- इमाम व खलिफा पद आपल्याकडे घेतले होते तद्वत अबु बकर, उमर, उस्मान, अली इ. नी हे पद भूषवले. पैकी अबु बकरच्या कारकिर्दीत कुरणाच्या ग्रांथिक निर्मितीस आरंभ होऊन हे कार्य उमरच्या कारकिर्दीत शेवटास गेले.

    या काळात इस्लाम हा केवळ धर्म न राहता राज्यप्रसाराचेही कारण बनला होता. व खलिफा - इमाम पदाचे एकाच व्यक्तीकडे असणे आणि महंमद नंतरचा खलिफा - इमाम कोण ? या प्रश्नावरून खुद्द अरब इस्लामी धर्मियांतच --- म्हणजे महंमद पैगंबराच्या अनुयायांतच तट पडले यावरून या पदाचे राजकीय, धार्मिक, सामाजिक महत्त्व लक्षात यावे. व अशा पदांवर कार्यरत व्यक्ती धर्मवचनांच्या संग्रहात मर्जीमाफक घालघुसड करणार नाही यावर कोण विश्वास ठेवेल ?

    तसेच महंमद पैगंबराच्या काळात कुराण हे मौखिक स्वरूपात होते. पुढे इस्लाम धर्माच्या व राज्याच्या प्रसारार्थ युद्धांत अरब चहू दिशांकडे फाकले जाऊन ज्यांना या कुराणाचे मौखिक परंपरेने चालत आलेले ज्ञान होते ते नष्ट होण्याचा संभव प्राप्त झाल्यानेच याच्या लिखित प्रतीची आवश्यकता भासल्याचे कुराण मजीद चे हिंदी लिप्यंतर करणारे मौलाना मुहम्मद इमरान कासमी बिज्ञानवी म्हणतात. यावरून असेही संभवते कि, मौखिक परंपरेत काही शब्द बदलूही शकतात व काही ठिकाणी नव्या शब्दांची रचनाही केली जाऊ शकते. भलेही कुराणाची अंतिम संहिता विचारविनिमयाने निश्चित करण्यात आली असली व यात तज्ञांचा सहभाग जरी असला तरी तज्ञांच्या निष्ठांना वाली कोण ?

    दुसरी गोष्ट अशी कि, पारंपारिक कुराणातील काही आयत नंतर वगळण्यात आली आहेत. उदाहरणार्थ :- सूरः लम् यकुन् व दुआ - ए - कनूत चा काही भाग. या वचनांना कुराणातून काढून टाकण्यात आले आहे व हे कार्य महंमदाच्या हयातीत अल्लाच्या आज्ञेने झाले. जर अल्ला सर्वज्ञ, सर्वसाक्षी आहे व निर्दोष कलाकृतीचा जनक आहे तर त्याने तात्पुरत्या रचना निर्माण करून परत त्या रद्द का कराव्यात ?

    महंमद पैगंबर निरक्षर होता. परंतु निरक्षरांना काव्यरचना करता येत नाही असं समजणं मूर्खपणाचं लक्षण आहे. कित्येक हिंदू संतांनीही अशा काव्यरचना केल्या आहेत. तसेच आजही कित्येक ग्रामीण भागातील निरक्षर व्यक्ती कवन, अभंग रचतात. प्रतिभा आणि प्रतिभा व्यक्त करण्याचं साधन यांचा परस्परांशी संबंध असला तरी विना प्रतिभा, प्रतिभा व्यक्त करण्याचे साधन निरुपयोगी आहे.

    माझे स्पष्ट मत आहे कि, कुराण हि सर्वस्वी महंमद पैगंबरची रचना आहे. व्यक्ती आपल्या चांगल्या कृत्यांचे श्रेय परमेश्वराला देतो व महंमदानेही तसे दिले असावे असाही तर्क संभवतो. परंतु ते काहीही असले तरी कुराण हि मनुष्य रचना आहे, हे निश्चित !

    संदर्भ ग्रंथ :-
१) कुरआन मजीद :- अनुवादक - हजरत मौलाना अशरफ अली थानवी रह.
हिंदी लिप्यंतर - मौलाना मुहम्मद इमरान कासमी बिज्ञानवी           

२ टिप्पण्या:

An Nur म्हणाले...

हा फक्त तुमचा पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे.जिथे विश्वास असायला पाहिजे, तिथे संशय आणि शंका आहेत...

An Nur म्हणाले...

http://cpsquran.com/images/pdf/Marathi_Quran.pdf
पूर्ण कुराण वाचा ही विनंती आहे.काही भाग वाचल्याने उत्तरे मिळत नाहीत.शिवाय वेद, भगवद्गीता,रामायण,बायबल,तोरह,आणि कुराण हे ही वाचल्यावर असेच समजते की ईश्वर एकच आहे.आणि त्याची आकृती,चित्र,प्रतिमा नाही कारण त्याला कोणी पाहिले नाही.फक्त विश्वास करून आराधना करण्याचा आदेश आहे.कारण हे जीवन एक परीक्षा आहे.त्यात यश सहजासहजी मिळणे कठीण आहे.ईश्वराची मदत तर लागणारच.पण जो ईश्र्वरापासून मानवाला घेऊन जातो त्याच्याविषयी कधी विचार केला का? जगात पाप का घडते? जर या जगात वाईट घडते, तर वाईट कृत्य घडविणाऱ्या च्या विरुद्ध कुणाची मदत असेल,फक्त परमेश्वराची.