सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

कुरआन मजीद चिकित्सा :- भाग - १




 
                      १ सूरः फातिहः ५


    कुराणातील हा अध्याय वा सूरः मक्केमध्ये प्रकट,  अवतीर्ण झाली अथवा मोहम्मदला स्फुरली. यामध्ये अल्लाह ची प्रशस्ती असून त्यांस सर्वश्रेष्ठ मानत त्याचीच पूजा करण्याचा मानस व्यक्त केला असून त्यांस आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्याची, सरळ मार्गाने चालण्याची बुद्धी देण्यास्तव विनवले आहे.




                         पहला पारः

                         अलिफ - लाम् - मीम 

                         २ सूरः ब - कर : ८७ 


    या अध्यायाचे नाव अलिफ - लाम् - मीम असून याचा अर्थ हिंदी लिप्यंतर करणाऱ्याने दिलेला नाही. कारण याचे ज्ञान त्यांस नाही. त्याच्या मते मोहम्मद पैगंबरास याचा अर्थ सांगितला असावा अथवा माहिती असावा. परंतु तो त्याने जाहीर केलेला नाही.
    मात्र कुरणाच्या इंग्रजी अनुवादात अलिफ - लाम् - मीम चा अर्थ I am Allah, the All-Knowing असा दिला आहे. 


    या स्थळी प्रथमतः हे स्पष्ट करतो कि, इथून पुढे कुराण हि मोहम्मद पैगंबर व त्याच्या अनुयायांची, मनुष्य कृत रचना मानून विवेचन केलं जाणार आहे.
तसेच या विवेचनाचा भर मुख्यतः ' कुरआन मजीद :- अनुवादक - हजरत मौलाना अशरफ अली थानवी रह. हिंदी लिप्यंतर - मौलाना मुहम्मद इमरान कासमी बिज्ञानवी '  या ग्रंथावर जरी असला तरी अधूनमधून संदर्भांकरता इंग्रजी अनुवादाचीही मदत घेतल्याची नोंद घ्यावी.
        
    सूरः ब - कर च्या प्रथम ७ आयतांमध्ये अल्लाची सर्वश्रेष्ठता, आस्मानी किताबची पूर्वपरंपरा तसेच आधीच्या प्रेषितांचा उल्लेख व त्यास असलेली अल्लाची -- म्हणजे मोहम्मदची मान्यता  असून हि परंपरा न मानणाऱ्या तसेच मोहम्मदला न मानणाऱ्या, म्हणजे त्याने सांगितलेला मार्ग, धर्म न स्वीकारणाऱ्यांना काफिर म्हणण्यात आलं आहे.


    आयत क्र. २१ - २९ मध्ये अल्लाच्या तोंडून मोहम्मदने आपल्या धर्माची, धर्म कल्पनांची, वाचनाची प्रशस्ती वदवली आहे. पैकी आयत क्र. २५ मध्ये जन्नत मधील वाहत्या नद्या, भोज्य पदार्थ तसेच स्त्रियांचा उल्लेख आहे. पैकी नद्या व भोज्य पदार्थांचे प्रयोजन समजता येते. परंतु अनुवादकाने जन्नत मध्ये जाणाऱ्यांना पत्नी स्वरूपात साफ व पाक असतील असं म्हटलं आहे. इथे स्त्रियांकरता साफ व पाक शब्द का योजले असावेत ? मोहम्मद ज्या प्रदेशात होतं तिथल्या स्त्रिया कोणत्या कारणास्तव अपवित्र, अशुद्ध बनल्या होत्या ? कि याचा संबंध शरीरधर्मानुसार होणाऱ्या गोष्टींकडे आहे ? आणि जर, धरतीवरील स्त्रिया अपवित्र होत तर त्यापासून उत्पन्न झालेली संतती -- अगदी मोहम्मद पैगंबर तरी पवित्र कसा मानायचा ?      


    आयत क्र. ३० ते ३९ मध्ये बायबल प्रणीत अॅडम आणि इव्हची कथा इथे आदमच्या रूपाने अवतीर्ण होते. अल्लाने या आदमची, प्रथम प्रेषिताची निर्मिती केली. तेव्हा हजर सर्व देवदूतांनी अल्लाच्या आज्ञेने अभिवादन केले परंतु इब्लीस -- सैतानाने मात्र असे करण्यास नाकारले. त्यामुळे अल्लाने त्यांस काफिर घोषित केले. यानंतर अल्लाने आदम व त्याच्या पत्नीस जन्नतमध्ये राहण्याची आज्ञा देत विशिष्ट झाडाजवळ न जाण्याची ताकीद दिली. परंतु इब्लीसने त्यांना बहकवल्याने ते त्या झाडाजवळ गेले. त्यामुळे अल्लाने आदम व हव्वाला जन्नत मधून बाहेर काढत खाली जमिनीवर पाठवले.


    आदमने अल्लाची करुणा भाकली असता अल्लाने त्यावर कृपा करत असे फर्मावले कि, माझ्याकडून संदेश घेऊन जो कोणी येईल -- व्यक्ती -- त्याचे आज्ञापालन करणारे दुःखी राहणार नाहीत व जे लोक त्यांस नाकारतील, आज्ञापालन करणार नाहीत, कुफ्र करतील ते दोजखवाले -- नरकवासी बनून त्यात कायम राहतील.


    ख्रिस्ती व ज्यूंच्या अॅडम - इव्ह कथेचं हे अरबी रुपांतर. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रथमतः इब्लीसलं काफिर घोषित केल्यानंतर अल्ला त्याला जन्नतमध्येच ठेवून का घेतो ? किंवा त्या जागे आसपास त्याला संचार करण्याची अनुमती कशी देतो ? इब्लीसच्या नादाने बहकलेल्या आदम - हव्वाला अल्ला जमिनीवर -- पृथ्वीवर पाठवतो व वरून त्यांस फर्मावतो कि, माझा संदेश घेऊन जो कोणी येईल त्याची आज्ञा पाळा. जे पालन करणार नाहीत ते काफिर बनून नरकात जातील.


    या संकल्पनेनुसार आदम - हव्वा हि अल्लाची निर्मिती. जन्नत मधून पृथ्वीवर पाठवताना अल्ला आदमला चंद अल्फाज तथा काही संदेश देऊन पाठवतो. पण कोणासाठी ? आदम - हव्वा खेरीज पृथ्वीवर असलेल्या लोकांसाठी कि आदमच्या वंशजांसाठी ? वंशजांसाठी मानलं तर मग हि एकप्रकारची विश्वकुटुंब - धर्म योजना दिसते. मोहम्मद वा हि कथा रचणाऱ्यांच्या मनी अशी कल्पना असावी ? कि धर्मप्रसारार्थ तिचा वापर / निर्मिती करण्यात आली ?


    तसेच आदम हा जर पहिला पैगंबर आहे तर त्याचे वंशज हे त्याचे अनुयायी ठरतात. पण मग पुढे या अनुयायांत मतभेद होण्याचा संभव अल्लाला का वाटतो ? अल्लाच्या मार्गावरून त्यांना पथभ्रष्ट कोण करील ? तसेच अल्ला एकच आहे हे सांगण्यासाठी त्यास वारंवार प्रेषित पाठवण्याची आवश्यकता का वाटावी ?


    माझ्या मते, मूळ यहुदी, ज्यूं करता हि कथा रचताना रचेयत्याच्या ज्ञात भौगोलिक प्रदेशांत जे रहिवासी होते, त्यांचा समावेश या कथेनुसार आदमच्या वंशजात होऊन जे त्या ज्ञात प्रदेशाबाहेर होते वा ज्ञात होत गेले, त्यांच्याकरता वारंवार प्रेषित पाठवण्याची कल्पना, गोष्ट मागाहून रचण्यात आली.

 इब्लीसच्या कथेकडे आणखी काही दृष्टिकोनांतून पाहता येते. इब्लीस हा जिन्न / फरिश्ता पातळीवरील अल्लाचा सेवक. जेव्हा अल्ला आदमची निर्मिती करतो तेव्हा सर्व सेवकांना त्यांस अभिवादन करण्याचा आदेश देतो, ज्याचे पालन इब्लीस करत नाही. म्हणून तो काफिर घोषित केला जातो. परंतु सामान्यतः इस्लाममध्ये अल्ला खेरीज कोणासमोर नतमस्तक न होण्याची प्रथा असल्याचे मानले जाते, त्याचे काय ?


    इथे आणखी एक अनुल्लंघनीय परंपरा जनमानसावर ठरवण्याचा प्रयत्न केला जातो व ती म्हणजे अल्लाच्या आदेश असेल तरच त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणी वंदनीय आहे. अन्यथा नाही. तसेच अल्लाची अवज्ञा करणारा काफिर समजण्यात येतो.


    आयत क्र. ४० - ४६ मध्ये मोहम्मद पुन्हा एकदा यहुदींचा अनुनय करताना दिसतो. तौरातला ईश्वरी किताब मानत कुरण त्याच परंपरेतील असल्याचा त्याचा दावा आहे. इथे हि शंका उपस्थित होऊ शकते कि, जर मोहम्मदच्या हयातीत कुराण पुस्तक रूपाने बनलेच नाही तर ते तौरातच्या परंपरेत कसे बसू शकते ? असो.


    आयत क्र. ४९ - ५५ मध्ये मुसा तथा मोझेस व त्याच्या अनुयायांचा तसेच फिरौनचा उल्लेख आहे.

    यातला महत्त्वाचा भाग म्हणजे यहुद्यांमध्ये गौसाला -- वासराच्या, बछड्याच्या पुजेची प्रथा असून अल्लाच्या आदेशान्वये मोझेस तथा मुसाने त्यांस याबाबत मनाई केली होती.

    नंतर विशिष्ट लोकांनी विशिष्ट लोकांना ठार करण्याचा आदेश झाला. (५४) परंतु या अर्थासंबंधी कुरणाच्या काही अनुवादांत मतभेद आहेत. त्यानुसार इथे ठार करण्याचा आदेश नसून अल्लाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या पश्चाताप संबंधी आहे. खरा अर्थ काहीही असला तर प्रत्यक्ष व्यवहारात दोन्ही अर्थ वापरात असून याधारे इस्लामी व्यक्ती केवळ गैरइस्लामीच नव्हे तर इस्लामी व्यक्तीसही कत्ल करू शकते.


    आयत क्र. ६० मध्ये मुसाने दगडावर काठी मारून १२ झरे निर्माण केल्याचा उल्लेख आहे. हे बारा झरे म्हणजे यहुद्यांची बारा कुटुंबे. ( कि टोळ्या ? ) या ठिकाणी सहज उद्भवणारी शंका म्हणजे इस्लाममध्येही बारा इमामंची परंपरा आहे. ती यावरूनच तर उचलली नसावी ना ?


    आयत क्र. ६७ - ६९ मध्ये मुसाने अल्लाच्या आदेशान्वये आपल्या अनुयायांना बैलाचा बळी देण्याची आज्ञा केली. इथे बैल शब्दाबद्दल संदिग्धता आहे. कुरणाच्या इतर अनुवादांत गाईचा उल्लेख आहे. परंतु मूळ अरेबिक कुराणात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे हे त्या भाषेच्या अज्ञानामुळे निश्चित सांगणे शक्य नाही. 


    आयत क्र. ७३ - ७९ विशेष महत्वाची आहे. यात मोहम्मद अल्लाच्या नावे स्वतःच प्रश्न विचारतोय कि, तुम्हांला अजूनही आशा आहे का, हे यहुदी इस्लाम कबूल करतील म्हणून ? यानंतर यहुद्यांची सौम्य नालस्ती करताना मोहम्मद त्यांच्यावर असाही आरोप करतो कि, यहुद्यांपैकी काहींनी तौरात मध्ये अल्लाच्या नावे स्वतःच्या मर्जीमाफक बदल केले आहेत. वस्तुतः या आरोपापासून मोहम्मदचे कुराणही अलिप्त नाही स्वतः मोहम्मदही अल्लाच्या नावे कुराण रचत होतच कि !


    आयत क्र. ८७ - ९६ मध्ये मोहम्मद यहुद्यांवर टीका व त्यांचा अनुनय करताना दिसतो. मुसाच्या काळातील बछड्याची पूजा, तौरात वरील यहुद्यांची श्रद्धा तसेच त्याखेरीज इतर धर्मग्रंथ न मानण्याची त्यांची भूमिका, येशू ख्रिस्ताला ठार केल्याचा आरोप इ. चा यात समावेश आहे. इथे प्रश्न असा उपस्थित होतो कि, मोहम्मदला कुराणावर यहुद्यांनी श्रद्धा ठेवावी असे का वाटावे ? यहुद्यांनी येशूच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले ते पाहता येशूला क्रुसावर चढवणारे मोहम्मदला भजतील वा त्याने सुचवलेल्या मार्गाचा अवलंब करतील हे अशक्य कोटीतील होते. तरीही मोहम्मद वारंवार त्यांचा अनुनय करतो त्यार्थी त्याची गणना मुर्खातच करणे योग्य ठरेल. कारण तौरात जर ईश्वरी ग्रंथ आहे तर तो अंतिम का नाही ? किंवा मोहम्मद येशू व बायबलही मानतो. मग ते का अंतिम समजू नये ? याचाच अर्थ तौरात, इन्जील हे मनुष्यनिर्मित असल्याने त्यातील कालानुरूप नजरेस येणाऱ्या त्रुटी दूर करणे हे पुढील पिढीतील व्यक्तीचे काम बनून जाते हे मोहम्मदला चांगलेच माहिती होते व त्यामुळेच त्याने कुराणाची रचना केली व पूर्वपरंपरेनुसार त्याने कुराण हे अंतिम मानण्याचा आग्रह केला.


    आयत क्र. ९७ - १०३ या देखील अशाच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यामध्ये मोहम्मद पुन्हा एकदा ज्यूंच्या धर्मग्रंथाला, त्यांच्या प्रेषित तसेच देवदूतांना मानताना दिसतो परंतु ज्यू लोकं आपल्या देवदूतांना मानत नसल्याची -- विशेषतः जिब्रइलला शत्रुवत मानत असल्याची तक्रार करतो. तसेच ज्यूंनी कुराण तसेच अल्लावर श्रद्धा ठेवावी असाही आग्रह धरतो. शिवाय यात सुलेमानचा उल्लेख असून त्यानुषंगाने जादूचा निषेध व त्यातील अल्लाच्या दृष्टीने असलेला फरकही विशद केला आहे. इथे मोहम्मदची थोडीफार तारांबळ उडाल्याचे दिसते पण अशा विसंगत्या, कच्चे दुवे कुराणात पदोपदी असल्याने प्रत्येकाचा समाचार घेऊ म्हटल्यास पार लागणार नाही.


    आयत क्र. १०४ थोडी मनोरंजक आहे. काही यहुदी मोहम्मदला भेटताना त्यांस ' राअिना ' असे संबोधत. ज्याचा हिबू भाषेत वाईट अर्थ असून अरबी मध्ये चांगला आहे. परंतु यहुदी वाईट अर्थानेच तो वापरत व त्यांच्या अनुकरणाने मुसलमानही मोहम्मदला याच नावाने संबोधू लागले तेव्हा अल्लाच्या नावे मोहम्मदने राअिना ऐवजी ' उन् जुरना ' म्हणण्याची आज्ञा केली. आणि जे हि आज्ञा पाळणार नाहीत ते काफिर समजले जाऊन त्यांना दोजखची शिक्षा प्राप्त होण्याची भयप्रद भविष्यवाणी उच्चारण्यात आली.

    आयत क्र. १०६ हि आयत क्र. ११५ शी संबंधित आहे. १०६ नुसार अल्लाला आयत निर्माण करण्याचा, रद्द करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. व ११५ नुसार अल्लाची सर्व दिशांवर हुकूमत असल्याने ( मशरिक - पूर्व, मगरिब - पश्चिम, शुमाल - उत्तर, जनूब - दक्षिण ) -- विशेषतः मशरिक - पूर्व, मगरिब  - पश्चिम, कोणत्याही दिशेला तोंड कराल ते अल्लाच्या दिशेनेच असल्याचे म्हटले आहे.
    या दोन आयतांचा परस्पर संबंध हा कि, मोहम्मदने प्रथमतः नमाजाची दिशा जेरुसलेमकडे नेमली होती ती फिरवून नंतर काब्याकडे केली. यावर काही यहुदींनी -- जे इस्लाम व मोहम्मदचे विरोधक होते त्यांनी, आक्षेप घेताच मोहम्मदला हि सारवासारव करणे भाग पडले.

     वास्तविक या दिशा - स्थळ बदलांनी मोहम्मदच्या प्रेषित्वाचा बुरखा साफ फाटला. कारण खरोखर मोहम्मद प्रेषित असता तर त्यास अशी दिशा - स्थळांची अदलाबदल करण्याची गरजच का पडावी ? तसेच पूर्व काय व पश्चिम काय, सर्व दिशांना अल्ला आहे तर मग काब्याचा आग्रह तरी का ?

    आयत क्र. १०४ - १२१ काहीशा विस्कळीत स्वरूपाच्या आहेत. ज्यांची परस्परांशी संगती क्वचित लागते. तसेच या आयतांमध्ये प्रामुख्याने यहुदी व ख्रिस्त्यांवर टीका करण्यात आली आहे जे मोहम्मदला प्रेषित मानण्यास इन्कार करतात. मोहम्मदने या दोन धर्मातील मरणोत्तर जगाची संकल्पना ' आखिरात ' च्या नावाने उचलली, परंतु त्यासही उपरोक्त धर्मियांनी हरकत घेत या मार्गाने स्वर्ग वा मोक्षप्राप्ती होत नाही असा दावा केला. या डाव्यांचे खंडन करण्यापलीकडे या आयतांमध्ये विशेष असे काही नाही.

    आयत क्र. १२१ - १३५ मध्ये मोहम्मद परत एकदा ज्यू, ख्रिस्ती तथा अब्राहामी धर्मांशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करतो. याकरता त्याने अब्राहम उर्फ इब्राहीमचा दाखला देत काब्यातील मंदिर त्यानेच बांधल्याचा व इस्माईलही त्यात सहभागी असल्याचा दावा केला आहे. पैकी काब्याची निर्मिती अब्राहमने केल्याचे सर्वांनाच मान्य असल्याने त्यासंबंधी आक्षेपाचं काहीच कारण दिसत नाही. तसेच यात मकामे इब्राहीमचा उल्लेख आहे. मकामे इब्राहीम हा खास दगड असून या दगडावर उभं राहून अब्राहम / इब्राहीमने काब्याचे काम केल्याची समजूत आहे.

    आयत क्र. १३६ - १४१ विशेष महत्त्वाच्या आहेत. यामध्ये इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब, ईसा व इतर प्रेषित परंपरा मान्य केल्या असून त्यावर व त्यांनी दिलेल्या ईश्वरी संदेशावर आपलं ईमान असल्याचे मोहम्मद कबूल करतो. व या प्रेषितांचे अनुयायी आपले अनुकरण करत इस्लाम कबूल करतील अशी अपेक्षा बाळगतो. अर्थात असे न केल्यास अल्लाचा कोप होण्याची भीतीही त्याने दाखवली आहेच. व शेवटी इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब व त्याचे वंशज ( टोळी अथवा नंतरचे प्रेषित ) हे यहुदी वा ईसाई असल्याचा जो दावा केला जातो, त्यातील सत्य फक्त अल्लालाच ठाऊक असल्याचे तो म्हणतो. अर्थात इथे इब्राहीम ते याकूब व अन्य प्रेषित हे लौकिकात यहुदी, ईसाई जरी असले तरी ते प्रथमतः इस्लामीच होत असाच याचा भावार्थ असल्याचे दिसून येते.
                                                                  

संदर्भ ग्रंथ :-

१) कुरआन मजीद :- अनुवादक - हजरत मौलाना अशरफ अली थानवी रह.

हिंदी लिप्यंतर - मौलाना मुहम्मद इमरान कासमी बिज्ञानवी          

५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

प्रयत्न स्तुत्य आहे... मराठीतील कुअरान मी पूर्वी विकत घेतले होते. मिरजेच्या एका अभ्यासकांनी ते केले होते..

An Nur म्हणाले...

Http://pahilamanav.blogspot.com
Http://marathitunislam.blogspot.com
Https://marathitunislam.wordpress.com
पूर्ण माहिती असल्याशिवाय, दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांचा खेळ करू नये. तुम्ही त्या धर्माचे नाहीत, म्हणून तुम्ही त्यांची टीका करणे योग्य कसे असेल.सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, फक्त आधी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे की, एकच ईश्वर आहे..

An Nur म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
An Nur म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
An Nur म्हणाले...

http://cpsquran.com/images/pdf/Marathi_Quran.pdf