मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

प्रकरण १७) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    मागील प्रकरणी आपण आगऱ्याहून सुटकेचा सविस्तर वृत्तांत पाहिला. आता त्यापुढील घटनांची चर्चा करण्यापूर्वी काही ऐतिहासिक संज्ञांच्या बाबतीत माझी मतं मी प्रथमतः व्यक्त करतो.

    सामान्यतः इतिहासात बाबर स्थापित बादशाहीस मोगल बादशाही म्हणण्याचा प्रघात आहे. मोगल हा वंश असला तरी वांशिकदृष्ट्या बाबर आणि त्याचे वंशज स्वतःला तुर्क समजत असल्यामुळे इथून पुढे मोगल या शब्दाऐवजी तुर्क या शब्दाचाच वापर केला जाईल, याची नोंद घ्यावी.
    तसेच तत्कालीन प्रचलित संज्ञेनुसार हिंदुस्थानचे दोन भाग कल्पून नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशास हिंदुस्थान व दक्षिणेकडील भागास दख्खन म्हटले जाई. तेव्हा लेखात देखील हाच भेद प्रमाण मानून त्यानुसार उल्लेख केला जाईल.

    रामसिंगाच्या मदतीने शिवाजी व त्याचे मदतनीस संभाजीसह आग्रा शहरातून बाहेर पडले. परंतु हे भाग्य त्याच्या सर्वच सदस्यांना लाभलं नाही. जे शिवाजी सोबत नव्हते त्यांना आगऱ्यातून बाहेर पडणं शक्य न झाल्याने ते शहरातच अडकले व तुर्कांच्या हाती सापडले. त्यांच्या नशिबी कैद व छळ, दोन्ही योग आले.

    इकडे शहरातून बाहेर पडल्यावर शिवाजीने दक्षिणेऐवजी उत्तरेचा --- मथुरेचा मार्ग धरला. मथुरेत मोरोपंत पिंगळ्याचा मेव्हणा कृष्णाजी त्रिमल असून त्याच्या घरी संभाजीस ठेवण्यात आले व कृष्णाजीपंतास शिवाजीने आपल्या सोबत वाटाड्या म्हणून घेतले. या स्थळी काशिपंत व कृष्णाजीपंत असा नावांचा थोडा गोंधळ आहे. शककर्ते शिवराय मध्ये दिलंय कि, काशिपंत हा मोरोपंताचा मेव्हणा असून कृष्णाजी हा त्याचा मुलगा होता. संभाजीला शिवाजीने काशिपंताच्या स्वाधीन करून कृष्णाजीपंतास सोबत घेतले.
    यांपैकी कोणताही उल्लेख खरा मानला तरी त्यातून निष्कर्ष एवढाच निघतो कि, मथुरेस संभाजीला जरी ठेवण्यात आलं असलं तरी, ज्यांच्या घरी संभाजीला शिवाजीने ठेवले, त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळेच मार्ग दाखवण्याच्या मिषाने त्याने, त्या कुटुंबातील एक व्यक्ती ओलीसादाखल जवळ बाळगली. यदाकदाचित संभाजीला दगा झाला तर मग ओलीसाचेही तेच केले जाईल अशी हि गर्भित धमकी असावी. असो. संभाजीच्या सोबत बहुतेक सर्जेराव जेध्यास ठेवण्यात आले असावे. कारण संभाजीच्या आगमनाच्या नोंदीत सर्जेरावही परतल्याचे जेधे शकावली सांगते.

    मथुरेत संभाजीला ठेवून शिवाजी तसाच यमुनापार करून पूर्वेस जाऊन मग दक्षिणेकडे वळला. एवढा मोठा वळसा मारण्याचे प्रयोजन म्हणजे, शिवाजी पळून गेल्यावर त्याचा शोध प्रामुख्याने आग्रा व आसपासची ठिकाणे तसेच दक्षिणच्या रस्त्यावर मोठ्या कसोशीने घेतला जाणार. त्याउलट शिवाजी उत्तरेस वा पूर्वेस जाण्याची शंका तुर्कांना सहजासहजी येणार नाही. तसेच त्या प्रदेशात तुर्की साम्राज्यावर असंतुष्ट असलेल्या हिंदूंची संस्थाने असल्याने त्या मार्गावर तुर्कांचा  विशेष उपद्रवही नव्हता. यामुळेच जरा लांबचा पण त्यातल्या त्यात कमी धोक्याचा मार्ग शिवाजीने निवडला.

    दि. २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान शिवाजी राजगडास येऊन दाखल झाला. वाटेत गोवळकोंडा राज्यातून येत असता तिथल्या सत्ताधीशाशी याच वेळेस एक गुप्त सलोखा घडून आला असावा किंवा राजगडास पोहोचल्यानंतर कुतुबशहा सोबत शिवाजीचा तह जुळून आला. त्यानुसार उभयतांनी परस्परांच्या राज्यविस्तारास मदत करण्याचे ठरले. याकामी गोवळकोंडेकरांनी सर्व प्रकारची मदत करावी व शिवाजीने आपले लष्करी सामर्थ्य वापरात आणावे असा ठराव झाल्याची शक्यता दिसून येते. अर्थात या समझोत्याविषयी याहून अधिक माहिती उपलब्ध नसल्याने अधिक काही लिहिणे शक्य नाही. तसेच हा तह आदिल किंवा तुर्क विरोधी होता कि दोघांच्या विरोधात होता हेही समजायला मार्ग नाही. असो.

    आता आपण आगऱ्याची हालहवाल पाहू. शिवाजी नजरकैदेतून पळाल्याचे औरंगला दि. १८ ऑगस्ट रोजीच कळले असले तरी प्रथमतः तो आगऱ्यातच लपून बसला असेल अशी त्याची समजूत झाली. कारण शहर सोडण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता व बहुधा यामुळेच शिवाजीचे काही साथीदार अटकेत पडले असावेत. घडल्या घटनेची माहिती घेत असता औरंगला रामसिंग व हसरतराय हरकारा दोषी आढळून आले. त्याने रामसिंगाची चार हजाराची मनसब बडतर्फ करत हसरतरायच्या असल ४०० व ५० मध्ये अनुक्रमे १०० व २० ने घट केली. तसेच हसरतचा नातलग किसनरायची ३०० ची मनसब बडतर्फ करण्यात आली. ( दि. २० ऑगस्ट १६६६ ) 

    दि. २३ ऑगस्टला नरवरच्या फौजदाराची बातमी आली त्यानुसार संध्याकाळी नमाजाच्या वेळी शिवाजी पाच स्वारांसह तिथून निघून गेला. त्याच्याकडे मुहम्मद अमीनखानाच्या शिक्क्याच्या परवना असल्याने फौजदाराने त्यांस अडवले नाही. परवान्याची तपासणी झाल्यावर ' आम्ही सीवाच आहों ' असं त्यातील एकजण बोलल्याचेही फौजदाराने नमूद केले. अर्थात औरंगला जरी याबाबतीत हळहळ वाटली असेल तरी प्रत्यक्ष शिवाजी काही तेथून गेला नाही हे निश्चित. कारण आगऱ्याहून बाहेर पडताच त्याने मथुरा गाठल्याचे नमूद आहे. तसेच दि. २९ ऑगस्ट पर्यंत शिवाजीच्या शोधार्थ रामसिंगही चंबळच्या अलीकडे तळ ठोकून राहिल्याचे औरंगच्या दरबारी अखबारवरून स्पष्ट होते.

    दि. २६ सप्टेंबर रोजी मिर्झाने नेताजीला कैद केल्याची बातमी बादशहाला समजली. त्याने रामसिंगाचे मानमरातब मागवले. पण बहालीचा उल्लेख नाही.

    दि. ४ नोव्हेंबर रोजी शिवाजी राजगडास आपल्या मुलासह पोचल्याची, मुलगा आजारी पडून मेल्याची बातमी दरबारात आली.

    दि. १५ नोव्हेंबर रोजी शिवाजी आजारी असल्याची व त्याच्या घरी मुलगा जन्मल्याची बातमी आली.

    दि. १० जानेवारी १६६७ रोजी बेगमसाहिबास हुकुम झाला की, ' मीर्जा राजा जयसिंगाच्या मामाने लिहिले की, सीवा स्वतःच्या मुलखांत पोचला. तो राजाच्या इशारतीवरून गेला आहे. [ त्याचा ] एकनिष्ठपणा उघड झाला. '

( ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड - ६ )

    यावरून शिवाजीच्या पलायनात रामसिंगाचा प्रत्यक्ष तर मिर्झाचा अप्रत्यक्ष हात असल्याचेच सिद्ध होते. असो.

    शिवाजी आगऱ्यास गेल्यापासून ते परत येईपर्यंतच्या काळात त्याच्या अनुपस्थितीत जिजाबाईच्या नेतृत्वाखाली सरदार - मंत्र्यांनी राज्याचा चोख बंदोबस्त ठेवल्याचे सर्वच इतिहासकार नमूद करतात परंतु याहून अधिक काहीही माहिती उपलब्ध होत नाही. कारण या काळातील शिवाजीच्या सरदार - मंत्र्यांचा पत्रव्यवहारच अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही.  त्यामुळे जयसिंगाने शिवाजीच्या गैरहजेरीत चालवलेल्या विजपुर स्वारीत शिवाजीचे सरदार सहभागी होते / नव्हते किंवा या युद्धांत त्यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याची स्पष्टता करता येत नाही. नाही म्हणायला औरंगच्या दरबारी अखबारात दि. १३ सप्टेंबर १६६६ ची नोंद आहे त्यानुसार शिवाजीचे लोक लुटमारीची इच्छा बाळगून असल्याचे समजते. औरंगने यासंदर्भात मिर्झाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी यावरून असेही म्हणता येते कि, शिवाजी आगऱ्याहून निसटल्याचे समजताच इकडे जिजाबाईच्या आज्ञेने मराठी सरदारांनी तुर्कांवर प्रत्यक्ष लष्करी कारवाई न आरंभता केवळ दबावाच्या राजकारणाचा प्रयोग अवलंबला. मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यावेळी निर्णायक विजय प्राप्त न झाल्याने जयसिंगाने विजापूर मोहीम आटोपती घेण्यास आरंभ केला होता.

    स. १६६६ हे वर्ष एका अनिश्चिततेत संपुष्टात आलं. या काळात तुर्क - आदिल यांच्यात तात्पुरता तह होऊन युद्ध थंडावलं होतं. आगऱ्याहून सुटून आलेला शिवाजी पुन्हा काय उपद्व्याप करतो याकडे आता दख्खनमधील सर्व सत्ता व तुर्की अधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले.
    वस्तुतः जयसिंगाच्या विजापूर मोहिमेतील अपयशाने शाही सेनाधिकाऱ्यांतील दुफळी, अपुरे सैन्यबळ इ. तुर्की पक्षाची दौर्बल्य स्थानं उघड होऊन विजापूर व शिवाजीला संयुक्त आघाडी करून हा लढा शेवटास नेणे शक्य होते. परंतु एक मिर्झा राजा म्हणजे समस्त तुर्की बादशाही नव्हे, याची उभयतांना जाणीव होती.  त्याशिवाय विजापूर व शिवाजी यांच्यातही म्हणावे तसे परस्पर सख्य नव्हते. तसेच खुद्द विजापूरही अंतर्गत बंडाळ्यांनी त्रस्त असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या मदतीबाबत शिवाजीही साशंक असणे स्वाभाविक होते.
    सारांश, अगदीच विचित्र बनलेल्या या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी काहीतरी हालचाल आवश्यक होती व ती यावेळी शिवाजी, आदिल, औरंग या तिघांनी आपापल्या परीने केली.

    स. १६६६ च्या मे मध्ये शिवाजीतर्फे रावजी सोमनाथाने आदिलशाही हद्दीतील रांगणा किल्ला जिंकून घेतला होता. तो परत मिळवण्यासाठी आदिलशहाने स. १६६७ मध्ये बहलोलखान सोबत शिवाजीचा सावत्र भाऊ -- व्यंकोजी याला रवाना केले. परंतु शिवाजी विरुद्ध हि मोहीम काढण्यापूर्वी तुर्की आघाडीवर युद्धबंदी आवश्यक असल्याने स. १६६६ च्या नोव्हेंबर मध्येच विजापूर दरबारने मिर्झा राजासोबत तहाची वाटाघाट चालवत तात्पुरती शांतता पदरात पाडून घेतली होती.
    बहलोल - व्यंकोजीने स. १६६७ मध्ये रांगण्याला वेढा घातला खरा पण किल्ला काही त्यांना जिंकून घेता आला नाही व शिवाजीने अतिरिक्त कुमक पाठवल्याने वेढा उठवून मागे फिरण्याची नामुष्की आदिलशाही सरदारांवर ओढवली. यानंतर आदिलशहाने शिवाजी सोबत तह करून दक्षिण तळकोकणातील त्याचा अधिकार मान्य केला. परंतु हा केवळ एका युद्धाचा परिणाम होता का ?

    या प्रश्नाचे किंबहुना पुढील बव्हंशी घटनाक्रमाचे उत्तर शोधण्यासाठी आपणांस पुन्हा एकदा शिवाजीच्या आग्रा भेटीचा विचार करणे भाग आहे. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे शिवाजी आगऱ्यास जाण्यास का तयार झाला ? व दुसरा म्हणजे, या आग्रा भेटीत शिवाजीने साध्य काय केले ?

    पुरंदरच्या तहाने शिवाजी आगऱ्यास जाण्याकरता बांधील नव्हता. परंतु दख्खनमधून त्याला बाहेर काढून त्याच्या अनुपस्थितीत विजापूरकरांना लोळवण्यासाठी मिर्झाने त्यांस हिंदुस्थानात जाण्यास भाग पाडले हा एक भाग झाला. दुसरा अप्रत्यक्ष भाग म्हणजे शिवाजीचं राजपुतांशी असलेलं संधान. राजपुतान्यात मेवाड, अंबर व जोधपुर हि तीन घराणी प्रमुख असुन राजपुतांतील श्रेष्ठत्वाच्या वादात हे तिघेही सामील होते. पैकी, मेवाडकर सोडल्यास नंतरचे दोन बादशाही चाकर होत. या दोघांतही जितक्यास तितकं सौरस्य असलं तरी शिवाजीच्या पक्षास या उभयतांची सहानुभूती होती. याचे रहस्य कदाचित औरंगच्या दरबारात परदेशी मुसलमानांना मिळणाऱ्या झुकत्या मापात असू शकतं. कारण, धर्मरक्षणार्थ वा स्वातंत्र्यप्राप्तीकरता शिवाजी सोबत युती करण्याचा राजपुतांचा निदान या काळात तरी विचार असल्याचे दिसून येत नाही.

    शिवाजीने आग्रा भेटीत नजरकैदेखेरीज साधलेल्या बाबी म्हणजे त्याच्या जहागीरीस तुर्की बादशहाची मान्यता व देशमुखीचे हक्क. शहाजीने जहागीर व मोकासा दाखल प्राप्त प्रदेश शिवाजीच्या नावे केला होता. तो आनुवंशिक तत्वावर जहागीर म्हणून औरंगने शिवाजीच्या ताब्यात देण्यास आपली मान्यता दर्शवली. ज्याला स्वराज्याचा गाभा असे इतिहासकार म्हणतात तो हाच भूप्रदेश ! म्हणजे शिवाजीच्या उद्योगास, मूळ पायास एकप्रकारे कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झाले.
    इथे धोरणात्मक बाब देखील समजावून घेणे अत्यावश्यक आहे. जगाच्या दृष्टीने शिवाजी हा बंडखोर असल्याने केलेले करार, वचनं तो सहज उडवून लावू शकत असे परंतु औरंग हा सार्वभौम सम्राट असल्याने क्षुल्लक बाबतीतही वचन, करार करताना / मोडताना त्याला हजारदा विचार करावा लागे.
    या दृष्टीने पाहिल्यास वेळोवेळी शिवाजीने औरंगकडून आपल्या काही मागण्या तरी मान्य करवून घेतल्याचे दिसून येते.

    आग्रा भेटीचा दुसरा अप्रत्यक्ष, दीर्घकालीन गुप्त कटाचा भाग म्हणजे नेताजी पालकरचे पक्ष बदल करणे !
    प्रथम पुरंदरच्या तहानंतर कोणत्या तरी अज्ञात मुद्द्यावर शिवाजी सोबत खटकल्याचे निमित्त होऊन नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळतो. यावेळी शिवाजी मिर्झा राजाच्या जोडीने विजापुरकरांशी लढत होता तर आदिलशाही वाचवण्यासाठी गोवळकोंडेकर मदतीला धावून आला होता. यामुळे मिर्झाला दहशत पडून त्याने शिवाजीला दख्खन मधून बाहेर काढले.
    शिवाजी आगऱ्याच्या वाटेस लागताच नेताजी मिर्झाच्या म्हणजे तुर्की गोटात दाखल झाला. यामागे मिर्झाचे फितुरीचे प्रयत्न कारणीभूत असले तरी वर्तनात एकप्रकारचा आगाऊ आखलेला निश्चित क्रम दिसून येतो. अर्थात, इथपर्यंतचा सिद्धांत ' शककर्ते शिवराय ' चे श्री. विजय देशमुख यांचा आहे, माझा नाही. यापुढील भाग श्री. संजय सोनवणींच्या सहाय्याने मी मांडत आहे.
        
    शिवाजी आगऱ्याच्या कैदेत पडून सुटल्यावर औरंगने नेताजीला कैद करून दरबारात पाठवण्याचा मिर्झाला गुप्त निरोप पाठवला. यानंतर नेताजी कैद होऊन दिल्लीला जातो. तिथे त्याचा छळ होऊन दि. १५ फेब्रुवारी १६६७ रोजी तो इस्लाम कबूल करतो. दरम्यान त्याच्या तीन पैकी दोन बायकाही कैद करून हिंदुस्थानात पाठवल्या जातात. त्यांचेही धर्मांतर होऊन नेताजीसोबत त्यांचा पुनर्विवाह लावला जातो. यानंतर नेताजीची नेमणुक वायव्य सरहद्दीवर करण्याचे बादशाह योजतो. प्रथमतः पंजमीर व नंतर गझनी अशी त्याची नोकरीची स्थानेही निश्चित होतात पण प्रत्यक्षात त्याची नेमणुक घोरबंदच्या ठाण्यावर केली जाते. काबूलमधील या नेमणुकीच्या स्थळाकडे रवाना होण्यापूर्वी नेताजी औरंगच्या कैदेत असलेल्या शिवाजीच्या नोकरांना मुक्त करून आपल्या सेवेत घेण्याची इच्छा व्यक्त करतो. जी बादशहा मान्य करतो. यानंतर काबूलकडे रवाना झाल्यावर नेताजी पळून जाण्याचा प्रयत्न करतो, जो अपयशी ठरून पुन्हा कैद करून त्यांस नियोजित स्थळी नेण्यात येते. तिथे अर्धा पाउण दशकाचा काळ व्यतीत केल्यावर स. १६७६ मध्ये दख्खन मोहिमेवर त्याची नेमणुक होते. तो दख्खनला येतो व सरळ रायगड गाठतो. या वेळपर्यंत शिवाजी मराठ्यांचा राजा बनलेला असतो. तो नेताजीचे पुनश्च धर्मांतर करून त्यांस हिंदू धर्मात घेतो.
    यानंतर नेताजी शिवाजीच्या चाकरीत असला तरी त्याला पूर्वीचा वा त्याच प्रकारचा हुद्दा दिलेला दिसत नाही. पण शिवाजीच्या पश्चात संभाजी गादीवर आल्यानंतर ज्यावेळी औरंगपुत्र अकबर आश्रयार्थ मराठ्यांच्या राजाकडे येतो, तेव्हा त्याच्या देखरेखीची जबाबदारी संभाजी नेताजीकडे सोपवतो. तसेच स. १६८२ मध्ये पुन्हा त्यास सरनौबतही बनवतो.

      हा एकूणच घटनाक्रम संशयास्पद आहे. कारण पुढील काळात शहजादा मुअज्जम ज्याप्रमाणे प्रतापराव, निराजीपंत यांची अटक टाळू शकला तसेच मिर्झा राजाही करू शकत होता. पण तो ते करत नाही. दुसरे असे कि, नेताजीप्रमाणेच शिवाजीचे अन्य साथीदारही तुर्की कैदेत होते. पण धर्मान्तरास फक्त नेताजीच कबूल झाला. लष्करी पेशाचा इसम, मुलकी चाकरीच्या लोकांपेक्षा छळास तोंड देण्यास कमकुवत निघावा हे काही पटत नाही. शिवाजी - नेताजीत तंटा असूनही शाही कैदेत पडलेल्या शिवाजीच्या नोकरांना सोडवण्यासाठी नेताजी, धर्मांतरीत महंमद कुलीखान बादशाहकडे अर्ज करतो व बादशाह तो मान्य करतो. यानंतर मग काबुलच्या वाटेवर असताना नेताजी पळण्याचा प्रयत्न करतो. हि बाब देखील संशयास्पद आहे. कारण धर्मांतरीत झाला तो हिंदू धर्मास अंतरला हे जर सत्य असेल, वास्तव असेल तर मग नेताजी पळून जाऊन काय साध्य करणार होता ? त्याला आश्रय तरी कोण देणार होते ?

    स. १६७६ मध्ये नेताजी रायगडावर येताच शिवाजी तत्काळ त्यास हिंदू धर्मात परत घेतो. परंतु पदावर नेमत नाही. याचे कारण काय असावे ?
    माझ्या मते, यामागेही शिवाजीचे काही गुप्त बेत, डाव असावेत. कारण संभाजी प्रकरणातही, संभाजी तुर्की गोटातून पळून आल्यावर शिवाजीने त्याला राजधानीत न नेता मुद्दाम पन्हाळ्यासारख्या सरहद्दीच्या ठिकाणी नेमले. यामागील प्रमुख कारण हेच संभवते कि, आपला या लोकांवर विश्वास नाही अशी शत्रूच्या नजरेत धूळफेक करण्याचा प्रयत्न करणे. अर्थात, यामुळे तत्कालीन मुत्सद्दी कितपत फसले याबद्दल शंका असली तरी इतिहासकार म्हणवणारी जमात मात्र यात पूर्णतः फसून गेली हे निश्चित !
    कारण नेताजी पालकर परत आल्यानंतरच संभाजीचे दिलेरखानाकडे जाणे होते. याच सुमारास म्हणजे स. १६७८ च्या डिसेंबर मध्येच राजपुतांचा बंडावा उत्पन्न होतो. यातूनच पुढे अकबराचे बंड उद्भवून त्याचे दख्खनमध्ये मराठ्यांच्या आश्रयार्थ आगमन घडून येते. या सर्व घटनाक्रमात फक्त एकच गोष्ट अनपेक्षितरित्या घडते व ती म्हणजे शिवाजीचा मृत्यू !
    औरंगजेबाच्या पाताळयंत्री, कुटील राजकारणी स्वभावास तशीच बुद्धी असलेला एक शिवाजी तेवढा पुरून उरतो. संभाजी तुलनेनं हलका पडल्याने औरंगकडून मारला जातो. बिनबुडाचे, विशेषतः केवळ जातीसाधार्म्यामुळे शिवाजी - संभाजीला मानणारे मराठा इतिहासकार निर्बुद्धासारखे केवळ महाराज, शंभूराजे, औरंग्या या निरर्थक शब्दरचनांतच गुंतून पडतात तर वैदिकाभिमानी रामदास - दादोजी गुणवर्णनात ! यामध्ये इतिहासाची मात्र हानी होऊन शिवाजी सारखी असामान्य व्यक्ती व तिचे सहाय्यक, वंशज तेव्व्ध्ये पक्षाभिमानामुळे सामान्य बनून त्यांची अवस्था ऐतिहासिक चरित्र, व्यक्तीरेखेपेक्षा निव्वळ काल्पनिक, दंतकथेतील पात्रासारखी होते ! असो.

    चर्चेच्या ओघात थोडे विषयांतर झाले खरे. असो. आपण पुन्हा स. १६६६ - ६७ च्या स्थितीकडे पाहू. पुरंदर तहाने शिवाजी - औरंग यांच्यात तात्पुरता सलोखा झाला असला तरी आग्रा प्रकरणामुळे तो तह कायम आहे, नाही याविषयी अनिश्चितता होती.
    तुर्की साम्राज्याची हद्द शिवाजीच्या राज्याला थेट भिडल्याने व त्यांनी त्याचे निम्मे राज्य गिळल्यामुळे अफझल प्रकरणाप्रमाणे यावेळेला विजापुरकरंना तुर्कांच्या मदतीच्या नावाखाली शिवाजी विरुद्ध शस्त्र उपसणे शक्य नव्हते. उलट आता त्यांना शिवाजी - तुर्क यांच्या संयुक्त चढाईची धास्ती वाटत असल्याने शिवाजी - औरंग यांच्यात पक्का तह बनत नाही तोच किमान रांगण्याचा किल्ला तरी परत जिंकून घ्यावा व अशा रितीने शिवाजीचा बळी देऊन तुर्की मैत्री पदरात पाडून स्वतःचा बचाव साधण्याचा बेत आखून त्यांनी तशी मोहीम आखली व ती फसली. त्याचसोबत राजकीय आघाडीवरही त्यांना पराभव पदरात पाडून घ्यावा लागला.

     आगऱ्याहून आल्यानंतर शिवाजीने मनाशी काहीएक धोरण आखून त्यानुषंगानेच आपल्या पुढील हालचाली केल्या. अफझलखानाचा निकाल लावल्यापासून त्याला विजापुरकरांची धास्ती तितकीशी उरली नव्हती. मात्र तुर्की आक्रमणाची टांगती तलवार कायम असल्याने त्याने स. १६५६ - ५७ मध्ये खेळलेला डाव परत एकदा अवलंबला.

     दि. १० एप्रिल १६६७ च्या औरंगजेबच्या दरबारी अखबार नुसार शिवाजी कलबुर्ग्याकडे जाऊन त्याने विजापुरी सरहद्दीवर लुटमार केली.

     शिवाजीच्या कलबुर्गा स्वारीचा योग्य तो परिणाम घडून औरंगने दि. २० एप्रिल १६६७ रोजी शिवाजीच्या वकिलास कैदमुक्त करण्याचे आदेश दिले व शिवाजीकडे निरोप पाठवला कि, ' विश्वासू जामीन दिलास आणि स्वतःच्या मुलास हुजूर ठेवलेस तर तुझे अपराध माफ होतील. '

    बादशाहचा निरोप शिवाजीकडे पोहोचण्यापूर्वीच दि. २२ एप्रिल १६६७ रोजी शिवाजीचा अर्ज दरबारात दाखल करण्यात आला. त्यानुसार -- ' मी अर्ज केला आहे की, माझा मुलगा संभाजी याने चारशे स्वारांच्या जमेतीसह येऊन आपली चाकरी करावी. आपण त्यास मनसब दिली तर फारच छान होईल ; मनसब दिली नाहीत तरी सुद्धा तो मनसबीशिवाय ४०० स्वारांसह आपल्याबरोबर राहून चाकरी करीत राहील. जे कांही कोटकिल्ले माझ्याजवळ होते ते मी या पूर्वीच पेशकश म्हणून दिले आहेत व सध्या जे काही कोटकिल्ले मजकडे आहेत ते सर्व व माझा प्राण देखील बादशाहाचाच आहे. ' 

    औरंगने या अर्जावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. शिवाजीने मात्र यावेळी पक्के गळेपडूपणाचे धोरण स्वीकारले होते, हे निश्चित !

    दि. २४ एप्रिल १६६७ रोजी बादशाहने मिर्झाच्या बदलीचा हुकूम काढत शहजादा मुअज्जमची त्याच्या जागी नियुक्ती केली.

    दि. ६ मे १६६७ रोजी बादशहाने हुकूम केला कि, ' सीवाच्या वकिलास बोलावून त्यास दिलासा द्यावा, खर्चास देऊन दोन महिन्यांत परत येण्याच्या अटीवर सीवाकडे जाण्यास निरोप द्यावा व त्यास सांगावे की, स्वतःच्या मालकाकडे जाऊन त्यास कळवावे की, ' तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत. तुझ्या मुलास चाकर ठेऊन घेतले आहे. जो विजापुरी मुलूख काबीज करशील तो तुला देऊं. स्वतःच्या मुलखांतच कायम रहावे. तुजकडे असलेला प्रत्येक महाल शाहजाद्याकडे रुजू करावा. ' असा हुकूम लिहून त्याच्या वकिलाकडे द्यावा. ' 

    परंतु हा हुकूम अंमलात येण्यापूर्वीच दि. १५ व १६ मे रोजी दोन वृत्तांत दरबारात दाखल झाले, ते पुढीलप्रमाणे :-

    दि. १५ मे १६६६ :- ' दाराबखानाने अर्ज केला की, परिंड्याचा किल्लेदार मुख्तारखान याचे मला पत्र आले आहे. तो लिहितो ' मुहम्मद मुअज्जम हुजुराहून इकडे येण्यास निघाल्यापासून विजापुरी व सीवाचे लोक बादशाही मुलूख उध्वस्त करीत आहेत. सीवाचे लोक या वाटेने येऊन विजापूरचे सरहद्दीपर्यंत जातात. ' हुकूम झाला की, सीवाचे लोक या वाटेने येजा करीत असतील तर त्यांना अडवावे आणि सरहद्दीबद्दल खबरदार असावे. '

    दि. १६ मे १६६६ :- ' जुम्दतुल्मुल्काने अर्ज केला की, सीवाने स्वतःच्या वकिलास पत्र लिहिले होते. ते पत्रच तो घेऊन आला. त्यांत मजकूर असा होता ' त्याचा नोकर सुभानसिंग याने विजापुरी हद्दीतील तळकोकण मधला अंकर किल्ला उध्वस्त करून स्वतःच्या ताब्यात घेतला. ' बादशाह ऐकून गप्प बसला.

     यानंतर औरंगला ठामपणे निर्णय घेणे भाग पडून त्याला शिवाजीसोबत काही काळ का होईना शांततेचे धोरण स्वीकारावे लागले. अर्थात, हा निर्णय त्याने सहजासहजी घेतलेला नव्हता.

    आपल्या सुरतकर अधिकाऱ्याच्या मार्फत औरंगने गोवेकर पोर्तुगीजांशी बोलणी चालवून त्यांना शिवाजी विरुद्ध आरमारी मोहीम उघडण्याची चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. जमिनीवरून बादशाही सेना व समुद्रमार्गे पोर्तुगिजांचा नाविक काफिला असे या संयुक्त चढाईचे स्वरूप असणार होते. या मोहिमेत सहभाग घेतल्यास विजयानंतर शिवाजीच्या ताब्यातील सर्व बंदरे पोर्तुगीजांना देण्याचे मान्य केले होते. परंतु पोर्तुगीजांनी तुर्कांचा सल्ला मानला नाही. याची मुख्य कारणं म्हणजे तुर्कांकडून पत्रव्यवहार सुरु झाला, त्यापूर्वीच कुडाळकर देसायांचे निमित्त करून शिवाजीने पोर्तुगीजांवर स्वारी केली होती व तुर्की मदत येईपर्यंत शिवाजीचा जमिनीवर सामना करण्याइतपत त्यांची तयारीही नव्हती. कारण आक्रमणासाठी निवडलेली वेळ शिवाजीच्या सोयीची होती, पोर्तुगीजांच्या नव्हे !
    दुसरे असे कि, बादशाही फौजा प्रथम शिवाजीवर चाल करतील कि विजापुरी प्रदेशात घुसतील याची नेमकी अटकळ बांधणे शक्य नसले तरी या भूप्रदेशात सुमारे शतकाहून अधिक काळ व्यतीत केल्याने तुर्की सम्राट शिवाजी ऐवजी विजापूरच्या बंदोबस्तास अधिक प्राधान्य देईल असा पोर्तुगिजांचा अंदाज असावा. त्यामुळेच त्यांनी शक्य असतानाही तुर्कांची मैत्री न स्वीकारता शिवाजीच्या गळ्यात गळा घातला !

     शिवाजी आगऱ्याहून निसटून गेल्यावर औरंगला त्याच्याशी तह करावा लागला त्यामागे त्याची अगतिकता असल्याचा समज बऱ्याच इतिहासकारांनी करून घेतला आहे. परंतु वास्तविकता काय आहे ?
      औरंगने शहजादा असताना अहमदनगर, विजापूर विरुद्ध लढ्यांत सहभाग घेतला होता. जोवर आदिलशाही जिवंत आहे तोवर शिवाजीचा बंदोबस्त करणे, त्यांस समूळ उखडून काढणे शक्य नाही याची त्याला पुरेपूर कल्पना येऊन चुकली होती. यामुळेच त्याने दख्खन मोहिमेची फेरआखणी करत आपले प्राथमिक उद्दिष्ट विजापूरचा नाश हेच निश्चित केले व त्यानुषंगाने त्याने आपल्या सरदारांना सूचनाही दिल्या. परंतु बऱ्याचदा व्यवहारात दिसून येते कि, मालकाची दृष्टी नोकरात नसते. औरंग व त्याच्या सरदारांच्या बाबतीतही हेच झाले. ते मुस्लीम, तुर्की, पठाणी बंधुभावात तसेच लाचखोरीत अडकून पडले व त्या प्रमाणात शिवाजीच्या सत्तेला जीवदान व बळ प्राप्त होत गेले.

     विजापुरकरांचा नाश करताना शिवाजी सोबत तह आवश्यक असला तरी त्याला उसंत लाभू नये यासाठी औरंगने पोर्तुगीजांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला जो, शिवाजी - पोर्तुगीजांनी उधळून लावला. परिणामतः औरंगला धड विजापूर जिंकून घेता आले नाही तसेच शिवाजीलाही स्थिर होऊ न देण्यात त्यांस अपयश आले.
     
    त्याउलट स्थिती शिवाजीची होती. तुर्की गटातील फितुरी जेव्हा फळास येईल तेव्हा येईल, परंतु प्रत्यक्ष राजकीय - लष्करी आघाडीवर त्यांस भविष्यातील तुर्कांसोबतच्या लढ्याकरता तयारी करणे भाग होते. त्यानुसार त्याने तुर्क तसेच आदिल, पोर्तुगीज यांच्याशी प्रथम झुंज व नंतर समेटाचे धोरण स्वीकारत कोकणातील, विशेषतः किनारपट्टी प्रदेशातील भाग आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न केला. यामागील मुख्य हेतू म्हणजे राज्याची पाठ संरक्षित करणे हा होय. कारण, त्याच्यापुढे नगरच्या निजामशाहीचे नसले तरी शहाजीचे उदाहरण होतेच.

    तुर्कांना विजापूर, गोवळकोंडा या सत्ता एका फटक्यात नष्ट करता आल्या. कारण या तुलनेने सपाट मैदानी प्रदेशात होत्या. परंतु प्रथम नगरची निजामशाही व रायगडची मराठशाही ते नष्ट करू शकले नाहीत. कारण त्या दुर्गम, डोंगराळ प्रदेशात वसलेल्या होत्या. हेच चित्र अफगाण बंडखोरांनी व्यापलेल्या भूप्रदेशातही दिसून येते. शिवाजीच्या पश्चात संभाजी कोकणातच पाय मुरगळून बसून राहिला त्याचेही इंगित हेच होते. दुदैवाने कोणत्याच मराठी इतिहासकारास याची जाणीव झालेली नाही. असो.

    स. १६६७ च्या सप्टेंबरात कुडाळकर देसायाच्या बंडाळीचे निमित्त साधून शिवाजीने कुडाळ स्वारी हाती घेतली. पण त्याचे उद्दिष्ट जंजिरेकर सिद्द्याचा बंदोबस्त करणे हे असल्याने, या स्वारीच्या निमित्ताने प्रथमतः पोर्तुगीजांना जाग्यावर बसवणे आवश्यक होते. व म्हणून कुडाळकरांचा बंदोबस्त होताच शिवाजी तसाच गोवेकर पोर्तुगीजांच्या ताब्यातील बार्देश प्रदेशात शिरला. या स्वारीत पोर्तुगीज मुलखाची नासाडी करून व पोर्तुगीज धर्माधतेला सणसणीत चपराक म्हणून चार पाद्र्यांना प्रथम धर्मांतरासाठी विचारणा करून, त्यास त्यांनी नकार देताच त्यांची मुंडकी कापून डिचोलीत मागे फिरला. ( स. १६६७ नोव्हेंबर )

    शिवाजीच्या हल्ल्याने घाबरून पोर्तुगीजांनी त्याच्याशी तहाची वाटाघाट आरंभली व दि. ११ डिसेंबर १६६७ रोजी खालील अटींवर तह घडून आला.              
                   
    ' महान शिवाजी राजे व कौंट व्हिसेरेइ यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या कराराचा मसुदा '

    ' महान कौंट व्हिसेरेइ यानी जो करारनामा पाठविला त्याचा आशय असा :

    ' आमच्या राज्याच्या आश्रयास आलेल्या देसायांचा पाठलाग करीत शिवाजी राजे आपल्या सैन्यासह आमच्या राज्यात घुसल्याचे पाहून आम्हाला फार वाईट वाटले. त्याचे परिमार्जन करण्यासाठी शिवाजी राजे यानी आम्हाला वारंवार पत्रे पाथ्व्वून दिलगिरी प्रदर्शित केली व ह्या राज्याशी असलेली त्यांची मैत्री टिकविण्याची व ती पुढे चालू ठेवण्याची इच्छा दर्शविली. त्याच्या विनंतीस अनुसरून आम्ही पुढील अटी सुचविल्या :

    १. शिवाजी राजे यांच्या सैन्याने बार्देशमध्ये दि. १९ नवंबर १६६७ रोजी जी बायका मुले कैद करून नेली त्याना त्यानी खंडणी न घेता अथवा त्याना ओलीस न ठेवता सोडून द्यावे त्याचप्रमाणे आमच्या स्वामीच्या प्रजाजनांची गुरेढोरे आणि गोणीचे बैल पळविण्यात आले, तेही परत करावेत. कारण महान व्हिसेरेइ यानी ज्या अर्थी सौम्यपणे लिहिले त्याअर्थी आणि त्यानी लिहिल्याप्रमाणे जी माणसे इकडे कैद करून ठेवण्यात आली होती, त्याना एक छदामही न घेता मुक्त करून, पाद्रि गोंसालु मार्तीश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    २. लखम सावंत आणि केशव नाईक हे जे देसाई आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिले आहेत. त्याना ताकीद करण्यात येत आहे की, त्यांचे वास्तव्य आमच्या राज्यात असेस्तोवर तो त्यांनी शिवाजी राजे यांच्याशी अथवा त्यांच्या प्रजाजनाशी युद्ध करू नये वा त्यांची कुरापत काढू नये. त्यानी जर तसे केले, आणि ते जर मला कळले, अथवा शिवाजी राजे यानी माझ्या निदर्शनास आणले, तर त्याना आमच्या स्वामीच्या राज्यात फिरून प्रवेश मिळणार नाही. आमच्या राज्यात असलेले नारबा सावंत आणि मल्लू शेणवी या दोघाना देखील असाच इशारा देण्यात येत आहे. जे देसाई आमच्या राज्यात येऊन राहिले आहेत, त्यानी बंडाळीस प्रवृत्त होऊ नये म्हणून त्याना गोवा शहरातच वास्तव्य करण्याची सक्ती केली जाईल. त्यानी साष्टीत अथवा बार्देशमध्ये काही गडबड न करता राहिले पाहिजे. त्यानी दंगेधोपे माजविले अथवा या राज्यातील प्रजाजनाची कुरापत काढली, तर त्याना या बेटातून हद्दपार करण्यात येईल.

    ३. बालाघाटातून जो व्यापारी माल आणि गोणीचे बैल या बेटात तसेच साष्टी आणि बार्देश प्रांतात येतील त्याना प्रतिबंध केला जाऊ नये, अथवा माल अडवून ठेवण्यात येऊ नये. तसेच या बेटांतून अथवा आमच्या स्वामीच्या इतर प्रदेशातून जे गोणीचे बैल बालाघाटी माल आणण्यासाठी जातील त्याना अडथळा केला जाऊ नये. शिवाजी राजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध जुंपले, तरी देखील हा व्यापार चालू राहावा.

    ४. उभय पक्षांची जमिनीवर आणि समुद्रावरही मैत्री असावी. जर या मैत्रीत व्यत्यय येण्यासारखा एकादे कृत्य घडले तर शिवाजी राजे यानी कौंट व्हिसेरेइ यांच्याकडे व कौंट व्हिसेरेइ यानी शिवाजी राजे यांच्याकडे त्याचा खुलासा मागवा. हा खुलासा मिळाल्याखेरीज मैत्री भंग पावू नये.
उपरिनिर्दिष्ट अट मान्य करण्यात येत आहे.

    ५. शिवाजी राजे याना कौंट व्हिसेरेइ यांच्याशी एकाद्या कामाविषयी वाटाघाटी करायच्या असतील, तर एकाद्या विश्वासू मनुष्यामार्फत त्या करता येतील. तीच गोष्ट हत्यारांच्या उपयोगाचीही आहे.

    गोवा ५ डिसेंबर १६६७

    कौंट व्हिसेरेइ यानी लिहिल्याप्रमाणे व उल्लेखिल्याप्रमाणे मी हे मान्य करीत आहे.
    २५ जमादिलाकर, १०६८ पोर्तुगीज ११ डिसेंबर १६६७

    शिवाजी राजे यांचा शिक्का.

संदर्भ ग्रंथ :-
१) पोर्तुगीज - मराठा संबंध :- स. शं. देसाई         

    या तहाने मुख्य प्रश्न कधीच निकाली निघाले नाहीत. परंतु तात्पुरता सलोखा, शांतता शिवाजीस आवश्यक होती, ती मात्र प्राप्त झाली.

    उपरोक्त तहातील विचारात घेण्यासारखा महत्त्वाचा भाग म्हणजे या मोहिमेत शिवाजीच्या सैनिकांनी युद्धकैदी म्हणून बायका - मुलांना बंदी बनवले होते. परंतु हा प्रकार प्रथमच घडला अशातला भाग नाही.

    या संदर्भातील पसासं खंड - ३ मधील नोंद क्र. २७०२ मध्ये कुडाळ परगण्यातील सूर्याजी बिन तुबाजी नाईक देसाई म्हणतो कि, ' .... सिवाजी भोसलेने आपले घर लुटले, गुरे घोडी नेली, आपली बहिण अदबखानेत ठेऊन दंड ३०० होन व सिलकावणी होन ६० घेतले. '

     उपरोक्त नोंदीत देसायाच्या बहिणीला अटकेत ठेवून तिच्याकडून दंडादाखल द्रव्यवसुली केल्याचा उल्लेख आहे.

     सामान्यतः युद्ध मोहिमांत सैन्याने सोबत बायकापोरे बाळगू नये, शत्रूप्रदेशातील बायकामुले धरू नयेत अशी शिवाजीची लष्करास सक्त आज्ञा असल्याचे सांगितले जाते. परंतु वास्तविकता तशी नाही.
त्याकाळात शत्रूप्रदेशावर स्वारी करताना युद्धकैदी म्हणून नागरिकांना पकडणे -- ज्यात आबालवृद्ध स्त्री - पुरुषांचा समावेश असे -- सर्वमान्य होते व शिवाजीही याचा वापर करणे गैर समजत नसे. व अशा युद्धकैद्यांची तहानंतर मुक्तताही केली जात असे.
     राहिला प्रश्न परमुलखात बायका पोरं न धरण्याच्या हुकुमाचा तर याचा सरळ अर्थ असा आहे कि, वासनातृप्तीसाठी सैनिकांनी स्त्रियांना धरू नये. तसेच गुलाम खरेदी - विक्रीसाठी बायका पोरांचा वापर करू नये. बाकी स्त्री दाक्षिण्य म्हणाल तर शत्रू पक्षातील मातबरांच्या स्त्रिया हाती पडल्यास त्यांची सन्मानाने परत पाठवणी करणे वा त्यांना स्वतःच्या जनान्यात सामील करून घेणे हे दोन्ही पर्याय समाजमान्य असूनही शिवाजीने प्रथम पर्यायाचा अवलंब केल्याचे दिसून येते. परंतु हा भाग नैतिक वर्तनाशी, राजकारणाशी संबंधित असून याचा व युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या बायका - मुलांशी संबंध जोडू नये.

    स. १६६८ हे वर्ष दख्खनमध्ये तसे शांततेच गेले. या वर्षी मार्च महिन्यात मुअज्जमच्या शिफारसीनुसार औरंगने शिवाजीला ' राजा ' किताब देऊन एकप्रकारे त्याची सत्ता मान्य करत तिला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून दिले. अर्थात हा किताब एक मांडलिक या नात्यानेच त्याने शिवाजीला दिला होता. स्वतंत्र सत्ताधीश म्हणून नव्हे ! परंतु याची दुसरी बाजू म्हणजे तुर्की बादशहाने शिवाजीला ' राजा ' म्हटल्याने इथून पुढे त्यास बंडखोर, जमीनदार वगैरे म्हणणे इतरांना व्यवहारात तरी शक्य झाले नाही. तसेच त्याचे जे स्वतःचे सरदार मंडळ होते, ते देखील स्वतःस गौरवाने, अभिमानाने ' राजे ' म्हणवून घेत, त्यांच्या तुलनेने शिवाजीच्या राजेपणास अधिक महत्त्व प्राप्त झाले.

    स. १६६८ च्या सप्टेंबर मध्ये विजापुरकरांनी सोलापूरचा किल्ला व त्याखालील काही लक्ष होनांचा मुलूख तुर्कांना देत त्यांच्याशी तह केला. तसेच पुढच्याच महिन्यात पश्चिम किनाऱ्यावरील आपल्या सत्तेत मोडणाऱ्या प्रदेशाची, पण बहुधा शिवाजीच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशाची सुभेदारी त्यांनी शिवाजीला देऊन टाकली. त्याबदल्यात दरसाल सहा लक्ष खंडणी देण्याचे शिवाजीने मान्य केले. परंतु प्रश्न असा आहे कि, कोणत्या कारणांस्तव शिवाजी - आदिलमध्ये हा तह घडून आला होता ? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारकपणे मिळत नाही. मात्र या तहामुळे जंजिरेकर सिद्दी व शिवाजी यांच्यातील भांडण पुन्हा पेटले. परिणामतः स. १६६९ च्या एप्रिल - मे महिन्यात शिवाजीने सिद्दीविरुद्ध मोहीम आखली. सिद्द्यांनी शिवाजीचा शक्य तितका प्रतिकार केला परंतु शिवाजीने जंजिऱ्याची नाकेबंदी केल्याने त्यांच्यापुढे उपासमारीचे संकट उद्भवले.

    यावेळी सिद्द्यांनी मदतीकरता इंग्रज, पोर्तुगीज व तुर्कांकडे मदतीची याचना केली. पैकी, इंग्रजांनी इच्छा असूनही शिवाजीचा सामना करण्याची कुवत नसल्याने त्यांनी हात वर केले.
    यावेळी कल्याणला तुर्की सेनानी लोदीखान असून त्याच्या हवाली जंजिरा करण्याचा सिद्द्यांचा बेत होता. परंतु शिवाजीने या दोघांची हातमिळवणी होऊ दिली नाही.
    
    पोर्तुगीजांनी स. १६७० च्या आरंभी सिद्दीला आपले मांडलिक मानत अंतस्थरित्या त्यांस मदत पुरवली. हि बाब शिवाजीच्या लक्षात येताच त्याने पोर्तुगीजांकडे तक्रार केली. तेव्हा उभयतांत फिरून स. १६७० च्या फेब्रुवारीत तह बनला. ज्यान्वये पोर्तुगीजांनी तुर्कांविरुद्ध लढ्यात शिवाजीची मदत करण्याचे नाकारले तर सिद्दी आपला मांडलिक असून त्याच्या व शिवाजीच्या दरम्यान तंटा असल्यास मध्यस्थाची भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली. बाकी या तहाचा व्यापारा व्यतिरिक्त शिवाजीला फारसा फायदा झाला नाही व होणेही शक्य नव्हते. कारण यावेळी राजकारणाची स्थिती बदलली होती.

    आपल्या सोबत तह करून शिवाजी दख्खनमधील आपल्या राज्याचा पाया मजबूत करत आहे व आपले दख्खनचे अधिकारी --- विशेषतः शहजादा मुअज्जम याबाबतीत उदासीन आहे, हे पाहून औरंगला भावी संकटाची चाहूल लागली. त्याने शिवाजी सोबतचा तह उडवून लावण्याचे ठरवले.
त्यानुसार त्याने शहजाद्याला गुप्त हुकूम पाठवला कि, संभाजीचे प्रतिनिधी म्हणून प्रतापराव गुजर व निराजीपंत औरंगाबदेत शाहजाद्याजवळ होते, त्यांना सैन्यासह कैद करावे. तसेच संभाजीला तनख्याची जागीर म्हणून वऱ्हाड प्रांतातील काही भाग प्राप्त झाला होता., त्याच्या बंदोबस्तासाठी शिवाजीने रावजी सोमनाथास नेमले होते. त्यासही दगा करण्याचा बादशहाचा हुकूम होता.
    मुअज्जमच्या दिल्लीतील वकिलाने शाही खलिता येण्यापुर्वीच या गुप्त पत्रातील बातमी शहजाद्याकडे पाठवली व त्याने मराठा सरदारांना आगाऊ इशारत देऊन पळून जाण्याची संधी प्राप्त करून दिली. ( डिसेंबर १६६९ )
    बादशहाच्या हुकमाने तह तर मोडला होताच पण रावजी सोमनाथाने वऱ्हाड प्रांत सोडताना तुर्की प्रदेशांत लुटालूट करून तुर्कांविरुद्ध लाद्याचे रणशिंग फुंकले !      
       
       यावेळी आधी सांगितल्याप्रमाणे शिवाजी जंजिरा मोहिमेवर असून त्याने जंजिऱ्याची नाकेबंदी केल्याने आतील सिद्दी टेकीस आले होते. व जरी पोर्तुगीजांकडून त्यांना मदत मिळत असली तरी शिवाजीपुढे निभाव लागण्यासारखी त्यांची स्थिती नव्हती. अशात फत्तेखान या सिद्दी प्रमुखाने शिवाजीसोबत तहाची बोलणी आरंभत शरण येण्याची तयारी दर्शवली. परंतु त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी फत्तेखानासच कैद करून शिवाजीच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. याच सुमारास औरंगने तह मोडल्याची बातमी आल्याने शिवाजीला जंजिऱ्याची मोहीम अर्ध्यावर सोडून देणे भाग पडले. दरम्यान औरंगजेबने जंजिऱ्यातील सिद्दी संबूळ, खैरियत व याकूत यांना मनसबदारी देत आपल्या चाकरीत दाखल करून घेतले. ( स. १६७१ पूर्वार्ध ) 


                                                      ( क्रमशः )

२ टिप्पण्या:

Harshad Vaidya म्हणाले...

sir pudhacha bhag lavkar yeu dya. yat tumhi jo netaji palkar ani sambhajiche mughlankade jana he eka katacha bhag hota asa mhanta te kashavrun karan ata paryantacha itihas asach sangto ki sambhajicha mughlankade jana hi tyachi chukach hoti. mag jar evadha motha kat zhala asel ani var ullekh kelelya vyaktinna hyachi mahiti asel tar shivajichya mrutyu nantar zhalelya rajkiy khelyanchya veli netaji kay karat hota tyane konachi baju ghetli hoti karan tyaca kuhech ullekh kela jat nhi ani pudhe jaun asahi mhanta yeil ka ki hambirrao mohitehi hyat samil hota????

advsnt म्हणाले...

हा भाग अतिशय चपखल लिहिलाय ...
'औरंगजेबाच्या पाताळयंत्री, कुटील राजकारणी स्वभावास तशीच बुद्धी असलेला एक शिवाजी तेवढा पुरून उरतो. संभाजी तुलनेनं हलका पडल्याने औरंगकडून मारला जातो. बिनबुडाचे, विशेषतः केवळ जातीसाधार्म्यामुळे शिवाजी - संभाजीला मानणारे मराठा इतिहासकार निर्बुद्धासारखे केवळ महाराज, शंभूराजे, औरंग्या या निरर्थक शब्दरचनांतच गुंतून पडतात तर वैदिकाभिमानी रामदास - दादोजी गुणवर्णनात ! यामध्ये इतिहासाची मात्र हानी होऊन शिवाजी सारखी असामान्य व्यक्ती व तिचे सहाय्यक, वंशज तेव्व्ध्ये पक्षाभिमानामुळे सामान्य बनून त्यांची अवस्था ऐतिहासिक चरित्र, व्यक्तीरेखेपेक्षा निव्वळ काल्पनिक, दंतकथेतील पात्रासारखी होते ! असो.'